महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
पूर्वी मात्र असं नव्हतं . महाराष्ट्रात अनेक छोटे व्यवसाय किंवा रोजगार सुरू असायचे . पोटापाण्यासाठी काम धंदा निवडणारे अनेक लोक होते , तर पारंपारिक काम करणारे असेही होते .अशा रोजगारांची एक मोठी यादी तयार होते . हे रोजगार स्वतंत्र असायचे पण कुटुंब एकत्र येऊनच करायचे . उत्पन्न कुटुंबातील सर्व सदस्यांचे असायचे .खेड्यात- गावात बारा बलुतेदार असायचे ,असे बलुतेदार प्रत्येक गावीच असायचे .शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची काम करणारे त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे ते बलुतेदार . गावातील पाटील, कोतवाल ,कुलकर्णी सोडून हे बलुतेदार असायचे . सुतार ,लोहार , चांभार, तेली , कुंभार ,नाव्ही ,सोनार , परीट, गुरव आणि कोळी .
आता एकेकाची काम बघुयात .
कुंभार मातीची भांडी घडवणे ,पिण्याच्या पाण्याचे माठ, रांजण ,घट ,गाडगी, मडकी ,पणत्या , कवेलू इत्यादी तयार करायचे त्यांना भाजून विकायचे . स्वयंपाकाची भांडी तयार करायची ती विकायची . गौरी- गणपतीच्या मुर्त्या तयार करायच्या , दुर्गा देवीच्या मुर्त्या तयार करायच्या आणि त्या विकायच्या . कुंभार सुगडी तयार करायचे संक्रांतीला ती विकायचे . अशा प्रकारे आपल्या घरात येणारी सगळी जी मातीची भांडी होती ती कुंभाराच्या आव्यात तयार होऊन भट्टीत भाजून आपल्यापर्यंत पोहोचत असत . सुदैवाने आजही कुंभार ही कामे करतात . कारण ते काम इतर कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही .
कोळी नदीतून नावेतून प्रवास करवून आणायचे . यांना ढिवर धीवर असेही म्हणतात . समुद्रात शोध घेऊन मासे ,शंख शिंपले शोधून आणणे , माशांवर विविध प्रक्रिया करून ती लोकांपर्यंत नेऊन विकणे अशी काम गावातील कोळी करायचे . त्याशिवाय लहान- लहान गावात नदीच्या पात्रातून पैलतीरी स्वतःच्या नावेतून नेऊन सोडण्याची कामही कोळी करायचे .
गुरव - गुरव हे गावातल्या देवळात पुजारी म्हणून काम करायचे . घरोघरी बेलपत्री पोहोचवण्याचे काम गुरव करायचे .गुरव देवळात गात असत , गुरुवांच्या अनेक पिढ्या देवळात राहात , देऊळ संरक्षणाचे काम देखील करत असत .
चांभार - चांभार गावातल्या मृत जनावरांच्या कातड्यांपासून निरनिराळ्या वस्तू तयार करायचे ते विकायचे . चपला , बूट , कातडी सामानं , मोटं इत्यादी दुरुस्त करायचे नवीन वस्तू तयार करायचे आणि ते विकायचे . आता आपण आपली पादत्राणे शोरूममधून घेतो .
मातंग - मातंग समाज केतकी पासून निघणारा जो तंतू आहे त्याचे दोरखंड तयार करायचे . शिंदीच्या पानांपासून झाडू तयार करायचे . सुपं , टोपल्या ,परडे इत्यादी वेताच्या वस्तू तयार करायचे आणि गावात विकायचे . शुभप्रसंगी हलगी वाजवायचे . इत्यादी कामे मातंग समाज करायचे . आता आपण वरील सगळ्या वस्तू माँलमधे किंवा दुकानात घेतो .
तेली - तेली शेतकऱ्याने दिलेल्या तेल बियांपासून तेल काढून द्यायचे . लाकडाच्या घाण्यावर बैलाला फिरवून शेंगदाणा , जवस , तीळ , करडई , मोहरी , एरंडेल तेल काढायचे. सरकी, ढेप ,पेंड विकणे वंगण विकणे इत्यादी कामे तेली करीत असत . तेलाच्या व्यवसायाशी संबंधित बाकी सगळे लहान मोठे व्यवसाय तेली करत असत . एक बैले किंवा दोन बैलें तेली असायचे . म्हणजेच एका बैलाचे फिरवून तेल काढणे किंवा दोन बैलांना फिरवून तेल काढणे अशी ती पद्धत असे .आता आपण डबेबंद ,. बाटलीबंद सिलबंद रिफायनरी तेल वापरतो , किंवा लाकडी घाण्याचा व्यवसाय हल्ली वाढतांना दिसतो आहे .
न्हावी- न्हावी गावातील लोकांची दाढी करणे , केशभूषा करणे , केशरचना करणे इत्यादी कामे करत असत . विधवा स्त्रियांचे केशवपण करणे केशकर्तनालय चालवणे , लहान मुलांची जावळं काढणे, एखाद्या घरी कार्यक्रम असेल घरोघरी जाऊन जेवणाची आमंत्रण देणे ही कामे नाभीक करत असत.
परीट आपण यांना धोबी या नावाने ओळखतो . घरोघरी जाऊन मळलेले कपडे गोळा करायचे ते नदीवर किंवा घाटावर न्यायचे तिथे धुवायचे, वाळू घालायचे, धुवून इस्त्री करून पुन्हा घरोघरी पोहोचवून देणे हे त्यांचे काम होते .आता आपण त्यांना आयरन वाला , इस्त्रीवाला या नावाने ओळखतो त्यांच्या व्यवसायात आता बराच बदल झालेला आहे.
माळी - माळी स्वतःच्या बागेत माळवं पिकवायचे, म्हणजेच फुले ,भाज्या ,कांदा बागायती पिके काढायचे आणि ते गावात विकणे अशी काम करायचे . "आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत " ही संत चोखोबांची ओळ आठवते .
लोहार लोखंडाच्या वस्तू घडवणारे हे कारागीर असत . तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून विविध वस्तूंचे आकार देण्याचे काम ते करायचे . शेतीची अवजारे तयार करणे , बैलगाडीचे आरे तयार करणे , बाग कामाची अवजारे तयार करणे , विळे , कोयते , सळया , प्राण्यांच्या खुरांची नालं तयार करणे , कुदळी , घमेली , पावडे , खिडक्यांची गजं , दाराच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम लोहार करत असत . " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी- ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे " हे गाण्याचे बोल आठवले का ?
सुतार लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम सुतार करायचे . त्यांना कारागीर असे म्हणत . लाकूड आणल्यावर त्याला तासायचे , करवतीने कापायचे , पटाशी वापरून, रंधा वापरून गुळगुळीत करून विविध वस्तू तयार करायचे . पाटं , खुर्च्या , स्टूल , चौरंग , घरातली छोटी देवळं , दाराच्या चौकटी, खिडकीच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम सुतार करत असतं . लाकडी खेळणी तयार करायचे , बंगया तयार करायचे, बारशासाठी पाळणे तयार करायचे, लाकडाचे छोटे नंदी तयार करायचे अशी कामे सुतार करायचे .
सोनार - सोन्या-चांदीचे दागिने घडवायचे , देवांचे टाक घडवायचे , वास्तुदेवतेच्या प्रतिमा तयार करायचे चांदीची भांडी दागिणे इत्यादी तयार करण्याचे काम सोनार करत असत . गावागावात जिवती म्हणजेच दीपपूजा हा सण असतो त्यावेळी दारावर जीवती लावण्याचे काम सोनार करायचे .
हल्ली आपल्याला ज्वेलर्स आढळतात पण बारकी दुकाने टाकून सोनाराचे काम पण सुरू असतं .
हे जे बारा बलुतेदार होते ते आपला व्यवहार पैसा न घेता करायचे .कामाच्या मोबदल्यात सुगीच्या दिवसात वर्षभराचे धान्य द्यावे लागे .
या बारा बलुतेदारांशिवाय गावोगावी फिरून आपले पारंपरिक उद्योग करणारे , व्यवसाय करणारे असत . अशावेळी हे पूर्ण कुटुंब बैलगाडी , खाचर किंवा घोड्यावरून सामान वाहून नेत गावी जाऊन राहुटी ठोकत व तिथेच काही दिवस मुक्काम करत , तिथेच आपला व्यवसाय सुरू करत असतं . तिथला व्यवसाय झाला की पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं .
कल्हई करणारे- गावात कल्हई करणारे लोक तांब्या- पितळेची भांडी कल्हई करून देत असत . ते स्वतः बैलगाडीवर प्रत्येक गावाला जायचे , त्यांचे कुटुंब सोबत असायचे . गावाच्या वेशीवर एखाद्या वडाच्या सावलीला कोळशावर चालणारा भाता जमिनीत गाडून ते बसवत असत . त्याला फिरवायला दांडा असे , तो दांडा फिरवला की निखारे फुलत , त्यावर पितळी भांडी तांब्याची भांडी गरम करून त्यावर नवसागराचा लेप देऊन कल्हई केली जात असे . आता पितळेची भांडी वापरणे बंद झाल्यामुळे कल्हई प्रकार दिसत नाही .
वडार - वडार लोक गावोगावी फिरून दगडाचा पाटा- वरवंटा , दगडी खल विकायचे .भटक्या जमाती तील हे लोक कुठेही आपली झोपडी शाकारायचे व व्यवसाय संपला की इतरत्र जायचे . गावातले लोक त्यांच्याकडून दगडाच्या वस्तू विकत घ्यायचे , आता मिक्सरने हे उद्योग बंद केले .
बोहारीण - डोक्यावर मोठ्या गाठोड्यात कपडे बांधून भांडी घ्या अशी आरोळी ठोकत बोहारीन दारात येते आणि जुन्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला अनेक घासाघसी नंतर एक भांडे देते . आजकाल बोहारीन प्लास्टिकची टोपले ,सुपं , भरण्या असा ऐवज पण मोबदल्यात देते . तिच्याशी घासाघिस करण्यात एक तास जातो .पण कापडं उपयोगात येतात वाया जात नाही .
पोतराज - अंगावर कपड्यांच्या माळा ,घुंगरांच्या माळा घालून , कपाळावर कुंकवाची मळवट भरून उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारत , कोरडा ओढत पोतराज अंगणात येतो . पायात मोठे घुंगराचे चाळ बांधलेले असतात, सोबत बायको असते , तिच्या डोक्यावर देवीचे छोटेसे देऊळ असते . ते घेऊन ते घरोघरी जातात आणि शिधा मागत पोतराज फिरत असतो . हल्ली हे प्रमाण कमी झालेले आहे तरी नामशेष मात्र झालेले नाही कधीतरी पोतराज आढळतो .
सरोदी - फाटलेल्या दर्या सतरंज्या जोडणारे . हातात दाभन , जाड सुया आणि दोरा घेऊन फिरणारे भटके लोकं गोण्याला ठिगळ लावून देणारे , हे लोक गावातून फिरत असायचे आता हे लोक दिसत नाहीत .
सरोदी लोक पत्रावळी द्रोण तयार करण्याचे काम करीत असत . मोहाची पाने , पळसाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करायचे .
शिकलगार - सायकलवर आपले अवजार घेऊन फिरणारे , हातात पत्रा कापायची कात्री , हातोडी , रिपीट , खिळे घेऊन गल्लीबोळ्यातून आवाज देत हे लोक फिरत असायचे . लोखंडी बादलीचे बुड बदलवून द्यायचे , लोखंडी बादली कापून त्याची शेगडी तयार करून द्यायची ,चाळणी तयार करून द्यायची, घमेल्या
ला बुड बसवून द्यायचे अशी लोखंडी पत्र्याशी संबंधित असलेले काम हे शिकलगार लोक करायचे .आता ते चाळण्या , लोखंडी कढया ,खलबत्ते असे विकतात .
कासार - बांगड्या भरणारे. सायकल वर बांगड्यांची माळ लावून गावोगावी खेडेपाडी जाऊन काचेच्या बांगड्या भरणारे लोकं . काही गावात बाया डोक्यावर टोपली घेऊन बांगड्या विकायच्या अजूनही विकतात . फार पूर्वी कासार लोक घोड्यावरून बांगड्या वाहून न्यायचे आणि भरायचे आता सगळं हातगाडीवर मिळतं , त्यामुळे जायची गरज नाही . पण गावात अजूनही कासार जात असतो , विशेषतः सणावाराला ग्रामीण भागातल्या बाया चुडा भरतात .
मातीच्या भिंतींना गिलावा करून देणारे सारवून देणारे लोक गावात फिरवून आरोळी द्यायचे . अशावेळी ज्यांना आपली घर सारवायची असत ते लोक यांना बोलवून आपल्या भिंतींना गिलावा करून घेत असत . आता मातिच्या भिंती नाही त्याच्यामुळे गिलावाही नाही.
घर साकारणारे - घराच्या छतावर नळ्याची कवेलू किंवा इंग्रजी कवेलू असायची. ती पावसाळ्यापूर्वी शाकारून घ्यावी लागायची . अशी कवेलू शाकारून देणारी माणसं गावात यायची . लोक त्यांच्याकडून कवेलू शाकारून घ्यायचे . दरवर्षी हे काम उन्हाळ्यात करावं लागे .
वीट भट्टीवर विटा भाजण्याचे काम करणारे लोक होते , आताही आहेत . आताही गावाबाहेर वीट भट्टी दिसते आणि त्यावर काम करणारे मजूरही दिसतात .
गारुडी - आपल्या खांद्यावर एक झोळी अडकवून त्यात पुंगी पेटारा असे साहित्य घेऊन गारुडी गावोगावी फिरत असत , आणि सापाचे खेळ दाखवत असत . विशेषता नागपंचमीत गारुडी जास्त दिसायचे . पुंगी वाजवली आवाज केला तर गावातली बालमंडळी गोळा होत असे आता प्राण्यांच्या खेळांवर बंदी असल्यामुळे हे गारुडी दिसेनासे झाले .
केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .
आईस गोळे किंवा आईस कांड्या , कुल्फी विकणारे लोक दारासमोर गाडी किंवा सायकल घेऊन यायचे आणि गोळे विकायचे .
बुरडकाम करणारे लोक बेताच्या बारीक कमच्यां पासून सुपं , टोपल्या , परडे , झालं , पेटारे असे विनत असत आणि गावोगावी नेऊन विकत असत . आता हे सगळं साहित्य दुकानात मिळतं .
विणकर - हाताने सूतकातून त्या सुतापासून मागट्यावर हातमाग यंत्रावर कापड विणणारे विणकरी होते .
रंगारी विणकर जे कापड विणत असत त्या कापडाला रंगवण्याचे काम रंगारी करत असत .
बेलदार मातीच्या भिंती बांधण्याची मातीचे घरे बांधण्याची काम बेलदार करत असत .
कानातला मळ काढणारे लोक हातात एक तेलाची बुधली आणि जाड तांब्याचा तार घेऊन गावोगाव फिरत असत आणि कानातला मळ काढून देत असत .
नंदीवाला - सोबत एक नंदी घेऊन नंदीवाला घरोघरी फिरत असे . हा नंदीवाला गावाच्या बाहेर राहूटी ठोकत असे . लोकांचे भविष्य सांगण्याचे काम तो करत असे आणि ते भविष्य ऐकून त्याचा नंदी होकारार्थी मान डोलवत असे .
धार लावणारा - लावण्याची काम करणारे लोक सायकलवर आपलं धार लावायचं छोटसं यंत्र घेऊन यायचे आणि सायकल ला पैडल मारून ते धार लावून देत असत .
जादूचे खेळ दाखवणारे जादूगार आपली पोतडी घेऊन यायचा एक विशिष्ट प्रकारचा पोशाख घालायचा गावातले बाळ गोपाळ गोळा करायचा त्याच्या हातात एक जादूची काडी असायची आणि तो काही मंत्र म्हणून छोटे छोटे हात चलाखीचे खेळ दाखवून ही जादू असे सांगत असे .
मोड घेणारे - पितळेची , हिंडालियमची , तांब्याची जुनी भांडी घेऊन त्या मोबदल्यात पैसे किंवा नवीन भांडी अशी देवाणघेवाण हे मोड घेणारे लोक करत असत .
चित्रपट दाखवणारे - एक षटकोनी आकाराचा डबा घेऊन त्याला आत बघता येईल अशी पाच-सहा झाकणे असलेल्या खिडक्या असत . त्यातून आत बघितले तर आतला सिनेमा दिसत असे . असे चालते बोलते सिनेमागृह डोक्यावरून वाहून नेले जाई . आणि जिथे मुक्काम असे तिथे एका फोल्डिंग स्टॅन्ड वर ठेवले जाई .दहा पैसे घेऊन दहा मिनिटांकरिता हा सिनेमा बघता येत असे .यानंतर दुसरे सहा मुलं बघत असत . अशा प्रकारचे हे चलचित्र दाखवणाऱे खऱ्या अर्थाने चल असे फिरतीवर होते . गावोगावी चालून तो चित्रपट दाखवायचे . त्या सिनेमाची मजा आता कशातच नाही .
पिंजारी लोक- सायकलवर किंवा गाडीवर पिंजण्याचे यंत्र घेऊन गादी भरून देण्यासाठी उशा भरून देण्यासाठी पिंजारी लोक गल्ली बोळात फिरायचे आणि कापूस पिंजून रजया , गाद्या, उशा भरून द्यायचे .
आधी मातीच्या भिंती असत ,त्यावेळी त्या सारवण्यासाठी मालामिट्टी नावाची एक प्रकारची चिकन माती येत असे . बैलगाडीतून ती माती विकणारे लोक यायचे आणि दहा पैसे पायलीच्या हिशोबाने ती माती विकत घेऊन बाया घरोघरी साठवून ठेवायच्या नंतर वर्षभर त्या सारवणासाठी उपयोगी आणत असत .
तेल मालिश करून देणारे हातात तेलाची बाटली कंगवा एवढेच साहित्य घेऊन गावात तेल मालिश वाला फिरत असे . आठवला का जॉनी वॉकर सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराए .
गोंदवणारे सुया घ्या बिबे घ्या दाभन घ्या अशी हाक मारत गोंदवून देणाऱ्या बाया गावात येत असत . आणि त्यांच्या जवळच्या सुईने त्या कपाळावर हातावर नावे गोंदवून देत असत .
वासुदेव भल्या पहाटे दारात येत असे आणि भुपाळी आळवत असे .काही भागात अद्यापही वासुदेव फिरताना दिसतात .
गावात बारई लोक विड्याच्या ( नागवेलीची पाने ) पानांची विक्री करत होते .सायकलवर पानाचा पेटारा बांधून गावात फिरायचे .
विहिरी खोदून, बांधून देणारे लोक असायचे .आजही आहेत . विहीरी उपसून स्वच्छ करून देतात .
वरील व्यवसायांचे स्वरूप आता बदललेले आहेत यातले काही जसेच्या तसे आहेत तर काहींचे रंगरूप बदललेले आहेत .काही दुकानातून व्यवसाय करतात , काही ऑनलाईन करतात , काही नुसत्या फोनवरून घरोघरी पोहोचतात अशा प्रकारे काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत . समाज मागणीनुसार व्यवसाय बदलतात आणि आपणही ते सहज स्वीकार करत करत बदलत जातो . त्यामुळे अनेक व्यवसाय आता वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतात एक आठवण म्हणून सहज लिहून बघितले .
लिहिता लिहिता यातले काही व्यवसाय कदाचित सुटलेले असतील . नव्या व्यवसायांची यादी करते म्हटलं तर ती इतकी मोठी होणार आहे की त्याचा एक स्वतंत्र लेख द्यावा लागेल आणि त्यातले पूर्ण स्वरूपही कधीकधी माहीत नसते .
या व्यवसायांमध्ये मुद्दाम पैठणी चा उल्लेख केलेला नाही . कारण पैठणी तयार करणारे लोक वर्षभरात सर्व कुटुंब मिळून काहीच पैठण्या तयार करत असत . आणि त्यांना राजाश्रय असल्यामुळे त्यांचा पिढीजात पैठणी तयार करणे हाच होता .असे कौशल्य असणारे काहीच कुटुंब असतात त्याच्यामुळे हा व्यवसाय पैठण किंवा गुजरातमध्ये पाटण येथेच होता .पैठण ची पैठणी आणि पाटणचा पटोला प्रसिद्ध आहे .हे लोक आपल्या मुळ गावातच राहिले .गाव आणि व्यवसाय बदलला नाही .
या सगळ्यात एक लिहायचे राहिले ते म्हणजे शाळेच्या आवारात जी आजी बसायची टोपलं घेऊन ती .आठवते का . कवठ ,चिंच ,बोरे ,पेरू ,बोरकूट, फुटाणे खारे दाणे अशा मैत्रीभाव असलेल्या वस्तू तिच्या जवळ मिळायच्या आणि मैत्री नांदवायच्या .या खाऊचे वैशिष्ट्य असे होते की तो कितीही कमी पैशात घेतला तरीही सगळ्यांना पुरत असे .
वर उल्लेख केलेल्या व्यवसायात काही सुटलेले आहेत तर काही व्यवसाय थोड्याफार फरकाने नवीन रूपात समोर येत आहेत .व्यवसाय भिन्नता बघून आनंद होतो . जो तो आपल्या क्षेत्रात निष्णात .आपले पूर्ण आयुष्य एकाच उद्योग व्यवसायात लावून निष्ठेने कर्म करत राहणे हेच एक उद्दिष्ट होते .फसवणूक, लबाडी याचा मागमूसही नव्हता या किरकोळ धंद्यात . शुद्ध व्यवहार .त्यांना तपासून घेण्यासाठी कोणीही भेषज अधिकारी नव्हते .त्यांचे शुद्ध मन हेच त्यांचे सर्वस्व होते .माणुसकीचा अमोल ठेवा जपला या जुन्या लोकांनी .आभारी आहोत
©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )
यामध्ये शेजाऱ्याकडून मागून
यामध्ये शेजाऱ्याकडून मागून आणलेल्या पेपरातले >>> ट्रेनमधे जर पेपर घेतला तर संपूर्ण डब्यात फिरायचा. दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळात सुद्धा खालून मराठी पेपर आणला कि सुटी सुटी पानं घेऊन जात लोक. कधीच संपूर्ण पेपर वाचायला मिळायचा नाही. त्यावर उपाय म्हणून मग पेपर बाहेर पडतानाच घ्यायला सुरूवात केली.
उन्हाळ्यात मीठ, पांढऱ्या
उन्हाळ्यात मीठ, पांढऱ्या कांद्यांच्या माळी (हो,माळीच!)हातगाडीवर दारोदार विकणारे यायचे. लोणच्याच्या बरण्यासुद्धा गाडीवर यायच्या. लोणकढे तूप किंवा बेळगावी, कोइंबतूरी, खानदेशी लोणी दारावर विकणारे असायचे. मिरच्या, हळकुंडे कांडून देणाऱ्या कांडपिणी आपापली उखळ मुसळे घेऊन यायच्या. तिघी तिघींचा संच असायचा. सकाळी नऊ वाजेपर्यंत यायच्या. मिरच्यांचे देठ काढून उन्हात वाळवत टाकायच्या. तोपर्यंत हळद कुटून घ्यायच्या. मिरच्या कडकडीत वाळेपर्यंत स्वतःची जेवणे आणि एक झोप आटपून घ्यायच्या. मग एकापाठोपाठ एक तीन तीन घाव घालून कांडायच्या. चाळून साफ करून वेगळ्या बिया आणि पूड असे वजन मोजून द्यायच्या. पुढे पुढे गावातल्या भात गिरण्या बंद पडू लागल्या, त्यात उन्हाळ्यात हे मसाले दळण्याचे काम चाले. दणक्याही असायच्या. त्या अजूनही कुठे कुठे दिसतात. शहरातली शेते गेली, तशी भातेही पिकेनाशी झाली. त्या अजस्र गिरण्याही गेल्या.
खारे मासे पण आमच्या कडे
खारे मासे पण आमच्या कडे विकायला यायचे.
पावसाळा चालू होण्या अगोदर.
खारे मासे म्हणजे.
मासा मीठ लावून सुकवला जायचा.
तो मासा पावसात वापरला जायचा.
तेव्हा खूप पावूस पडत असे.
घरा बाहेर पडणे मुश्किल होत असे
घरापुढे चार सहा कपाशीची झाडे
घरापुढे चार सहा कपाशीची झाडे लावली की वर्षभराचा पूजेसाठीचा कापूस मिळे. बायका कलत्या दुपारी तो सुटा करायला म्हणजे सरकी काढायला बसत. छोटीशी धनुकली असली तर हे काम पटकन होई. सरकी गुरांच्या आंबवणात जाई. हा कापूस सहसा बाहेरून विकत आणला जात नसे.
एकोणिसाव्या शतकापर्यंत, स्वतः पुरते सूत घरोघर कातले जाई. ते कोष्ट्याकडे देऊन विणून रंगरेजाकडे जाई. किंवा आधी रंगवून मग विणले जाई. मुंबई पुण्यात रंगारी बदक चाळ किंवा भाऊ रंगाऱ्याचा विवाद्य गणपती एवढ्यापुरताच रंगारी हा शब्द उरला आहे. मग यंत्रमाग, गिरण्या आल्या आणि वस्त्रोद्योगात क्रांतीच झाली. तोपर्यंत महिलांच्या चोळ्या घरीच शिवल्या जात. बाराबंद्या शिवणारे शिंपी असत, तसेच पगड्या फेटे पागोटे बांधणारे पगडबंद असत. डोक्यावर रुमाल घरच्या घरी गुंडाळले जात. आता विशेष प्रसंगी किंवा चित्रीकरणासाठी फेटे बांधणारे, नऊ वारी/ सहा वारी पातळ आणि धोतर नेसवणारे व्यावसायिक आहेत.
पूर्वी फुलपुडी घरात टाकणारे, अंडी पाव सायकलवर विकणारे, अल्युमिनियमच्या, कडीवाल्या बरण्यांतून दुधाचा रतीब घालणारे असत.
घरोघरी शिवणयंत्र अवतरले आणि हाताने शिवणे बंद झाले. मात्र शिंपी लोकांना काही काळ ऊर्जितावस्था आली. कारण पोशाख बदलले. लांबलचक flowing वस्त्रे जाऊन अंगालगत शिवलेली वस्त्रे आली. आणि आता तर तयार कपडेच वापरले जातात.
मंगलाताईंनी विहिरी बांधून
मंगलाताईंनी विहिरी बांधून देणाऱ्यांचा उल्लेख केला आहे. तसेच जमिनीत पाणी कुठे लागेल त्याचा अंदाज सांगणारेही असत. पाणी वाहून नेणारे भिस्ती आणि पाणकेही असत.
'केसांवर फुगे विकणे' ही म्हण
'केसांवर फुगे विकणे' ही म्हण आहे ना ?
म्हणजे कवडीमोल भावात वस्तू विकणे.
ल्हानपणी म्हाताऱ्याकोताऱ्यांकडून टोमणे ऐकलेले आहेत.
बायदवे, काही ठिकाणी खेडोपाडी आजही हे लोक हिंडतात आणि फुग्यांऐवजी भांडी विकतात.
जमिनीत पाणी कुठे लागेल त्याचा अंदाज सांगणारेही असत. >>>पान्हाडी ! हा व्यवसाय करणारे आजही आहेत.
लहानपणी सायकल मार्ट मधून
लहानपणी सायकल मार्ट मधून भाड्याने पिटुकली सायकल घेऊन गावभर भटकायचो. आता मिळत नसावी बहुतेक.
मग अस्वल घेऊन फिरणारे कोण?
मग अस्वल घेऊन फिरणारे कोण? अस्वलाचा केस काढून विकत.
<<
अस्वलवाला म्हणजे दरवेशी.
पान्हाडी! करेक्ट. हा शब्द
पान्हाडी! करेक्ट. हा शब्द आठवत नव्हता. काही वर्षांपूर्वी 'गाणाऱ्याचा पोर ' मध्ये वाचला तेव्हा आठवला होता, आणि आता तुम्ही आठवण दिलीत.
धन्यवाद हाडळीचा आशिक!
खांद्यावर कावड घेऊन किंवा
खांद्यावर कावड घेऊन किंवा बादलीनेच पाणी भरून देणारे. काही रेड्यांवर पखालीत पाणी आणून देणारे पाणकेही असत.
खानदेशी रवाळ तूप जे दारावर येई, ते शेळी-मेंढीच्या दुधाचे असते असे आजी सांगायची. त्यामुळे जनरल तळणासाठी वापरले जाई.
'केसांवर फुगे विकणे' ही म्हण
'केसांवर फुगे विकणे' ही म्हण आहे ना ?
म्हणजे कवडीमोल भावात वस्तू विकणे.
<<
नाही.
लिटरली केस विकत घेतात. बायका केस विंचरून गुंता काढतात तो गोळा करून ठेवलेला असतो. त्याचप्रमाणे ब्यूटीपार्लरवाल्या बायका कापलेले लांब केस विकतात. हे केस ह्युमन हेअर विग्ज बनवण्यात वापरले जातात अन दारावर हे विकत घ्यायला येणारे लोक १००० रु. किलोने विकत घेतात. होय. हजार रुपये किलो.
हेच गुंतावाले केस पोराटोरांकडून घेऊन त्याबदल्यात फुगे देण्याचा व्यवसाय करणारे आजही खेड्यापाड्यात आहेत.
हे एक गाणे : https://www.youtube.com/watch?v=8F9R_kiz5io
कवटी भाड्याने देण्याचा
कवटी भाड्याने देण्याचा व्यवसाय ऐकला होता. जास्त माहिती नाही.
करीअर केलेले नाही या क्षेत्रात
बिहार/झारखंडमध्ये दारावर
बिहार/झारखंडमध्ये दारावर मासळी व रसगुल्ले (कावडीमध्ये) विकायला यायचे आता माहिती नाही. तेव्हा हा कल्चरल शॉक होता ...
हीरा
हीरा
ओके अलीबाबा.
केस विकत घेण्यामागचे हे अर्थशास्त्र माहिती नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.
त्रिपुरी पौर्णिमेला भुत्ये
त्रिपुरी पौर्णिमेला भुत्ये यायचे पूर्वी आमच्या चाळीत. आगीचे खेळ करायचे. आता कित्येक वर्षांत नाही पाहिले.
कोष्टी,निराळी,साळी,बुरुड
कोष्टी,निराळी,साळी,बुरुड,लोणारी,ओतारी, कातकरी,घिसाडी,लमाण,वंजारी,येसकर,ढोर,भंडारी/ भांडारी, खाटीक,मुलानी, कसाई,चित्रकथी,पिंगळावाले, कुडमुडे जोशी, तांबोळी, कोल्हाटी,मांगगारुडी,पेंढारी,कामाटी,, कैकाडी,लिंगायत वाणी,पटवेकरी,फासेपारधी,भिल्ल,रामोशी,शिंपी,अंगडीया ,धनगर सनगर
यांच्या व्यवसायांच्या सांप्रत अवस्थेबद्दल काही माहिती मिळू शकेल का
पूर्वी प्लॅस्टिक च्या चपला,
पूर्वी प्लॅस्टिक च्या चपला, बालद्या , टब, मोठ्या बरण्या इ फाटले असेल, चिर गेली असेल तर त्याला पॅच लावून ते दुरुस्त करून देणे हा ही एक व्यवसाय होता.
फ्लॉपी विकणे हा देखील व्यवसाय
फ्लॉपी विकणे हा देखील व्यवसाय बंद झाला
फ्लॉपीSSSय! ... वर्बॅटम,
(No subject)
(No subject)
(No subject)
डीटीपी सेंटरही बंद झाले.
डीटीपी सेंटरही बंद झाले. रैलवे तिकीट एजंट बंद झाले. पासपोर्ट एजंट बंद झाले. ग्रीटींग कार्ड दुकानं संपल्यातच जमा आहे.
सायकल च पंक्चर काढणारी दुकान
सायकल च पंक्चर काढणारी दुकान बंद.
काहीच वर्षात टीव्ही केबल पण बंद होईल.
अमित : D
अमित
आवस वाढणारी दारोदार जायचि
आवस वाढणारी दारोदार जायचि तिला द्द्यायला छोटी नैवेद्याची वाटी भरुन तेल, मिठ, तुर डाळ, भाकरिच पिठ अस एका ताटलित आई काढुन ठेवायची एकदा आई तेल काढायची विसरली होती तर तिने मला तिला वाटित तेल द्यायला सान्गितल तर अस्मादिकानी आखा तेलाचा भरलेला कावळा तिच्याकडच्या भान्ड्यात रिकामा करुन आइचा ओरडा खाल्ला होता.
कल्हईवाल्याला कल्हई करताना बघणे ही उन्हाळ्याच्या सुट्टितली सगळ्यात भारी गम्मत होती.
दारोदार फिरून मालिश करणारे
दारोदार फिरून मालिश करणारे असायचे. मालक उघडाबंब होऊन पालथा पडला कि हे लोक लाथा, बुक्क्यांनी कणिक तिंबावी तशी त्याची धुलाई करत. ते गावी पाहिले होते.
युपी, बिहार भागातून कानातला मळ काढणे, नख कापणे, मालिश करणे असे करणारे लोक मुंबईत असायचे. पुण्यात कधी पाहिल्याचे आठवत नाहीत. मुंबईत पण खूप वर्षांपासून दिसत नाहीत. बहुतेक बंद झाले असावेत. दिल्लीत जिथे भूमीगत पालिका बजार आहे त्याच्या वरच्या हिरवळीवर फिरायचे. एकदा मालीश करून घेतली होती. अंग घुसळणे, हात मागे नेणे, कटकन मोडणे, मान मोडणे, पाठ मोडणे असे प्रकार सुरू झाले. मग घाबरून बंद केलं. गेल्या काही दशकात अशा फिरत्या विक्रेत्यांना त्या हिरवळीवर थांबू देत नाहीत.
रेल्वे तिकीट , पासपोर्ट एजंट
रेल्वे तिकीट , पासपोर्ट एजंट आहेत अजूनही.
मालिशवाले चौपाटीला अजूनही आहेत, असं ऐकलंय. आमच्या भागात रस्त्यांवर त्यांची पोस्टर्सही दिसलीत.
स्मार्ट फोन आल्यावर सायबर कॅफे बंद पडलेत.
सायकली भाड्याने देण्याचा व्यवसाय बंद पडला. मुलं उन्हाळ्याच्या सुटीत तासाला रुपया बोलीने भाड्याने सायकल घेऊन चालवत. एका दुकानात ५०-६० तरी सायकली होत्या.
कॉफी च्या वड्या विकायला
कॉफी च्या वड्या विकायला येणारे एक मामा होते, राजू नावाचा brand होता. पांढऱ्या लाल वेष्टनात गुंडाळून मिळायच्या त्या वड्या. खूपच सुगंधी.
तसा वास ह्या कापूचीनो ला नाही.
कडक असायच्या त्या वड्या.
एकदा बत्त्याने फोडून पाण्यात उकळल्या असं आठवतंय.
फ्लॉपीSSSय! ... वर्बॅटम,
फ्लॉपीSSSय! ... वर्बॅटम, मोझरबेअर मॅक्सेल फ्लॉपीSSSय! स्वस्त टिकाऊ रि-फॉर्मॅटेबल फ्लॉपीSSSय! असे विक्रेते दारोदार यायचे आमच्या काळात---

आता ह्यात pen drive सुद्धा add करा.
Pages