महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय

Submitted by मंगलाताई on 13 March, 2023 - 07:57

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
पूर्वी मात्र असं नव्हतं . महाराष्ट्रात अनेक छोटे व्यवसाय किंवा रोजगार सुरू असायचे . पोटापाण्यासाठी काम धंदा निवडणारे अनेक लोक होते , तर पारंपारिक काम करणारे असेही होते .अशा रोजगारांची एक मोठी यादी तयार होते . हे रोजगार स्वतंत्र असायचे पण कुटुंब एकत्र येऊनच करायचे . उत्पन्न कुटुंबातील सर्व सदस्यांचे असायचे .खेड्यात- गावात बारा बलुतेदार असायचे ,असे बलुतेदार प्रत्येक गावीच असायचे .शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची काम करणारे त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे ते बलुतेदार . गावातील पाटील, कोतवाल ,कुलकर्णी सोडून हे बलुतेदार असायचे . सुतार ,लोहार , चांभार, तेली , कुंभार ,नाव्ही ,सोनार , परीट, गुरव आणि कोळी .
आता एकेकाची काम बघुयात .
कुंभार मातीची भांडी घडवणे ,पिण्याच्या पाण्याचे माठ, रांजण ,घट ,गाडगी, मडकी ,पणत्या , कवेलू इत्यादी तयार करायचे त्यांना भाजून विकायचे . स्वयंपाकाची भांडी तयार करायची ती विकायची . गौरी- गणपतीच्या मुर्त्या तयार करायच्या , दुर्गा देवीच्या मुर्त्या तयार करायच्या आणि त्या विकायच्या . कुंभार सुगडी तयार करायचे संक्रांतीला ती विकायचे . अशा प्रकारे आपल्या घरात येणारी सगळी जी मातीची भांडी होती ती कुंभाराच्या आव्यात तयार होऊन भट्टीत भाजून आपल्यापर्यंत पोहोचत असत . सुदैवाने आजही कुंभार ही कामे करतात . कारण ते काम इतर कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही .
कोळी नदीतून नावेतून प्रवास करवून आणायचे . यांना ढिवर धीवर असेही म्हणतात . समुद्रात शोध घेऊन मासे ,शंख शिंपले शोधून आणणे , माशांवर विविध प्रक्रिया करून ती लोकांपर्यंत नेऊन विकणे अशी काम गावातील कोळी करायचे . त्याशिवाय लहान- लहान गावात नदीच्या पात्रातून पैलतीरी स्वतःच्या नावेतून नेऊन सोडण्याची कामही कोळी करायचे .
गुरव - गुरव हे गावातल्या देवळात पुजारी म्हणून काम करायचे . घरोघरी बेलपत्री पोहोचवण्याचे काम गुरव करायचे .गुरव देवळात गात असत , गुरुवांच्या अनेक पिढ्या देवळात राहात , देऊळ संरक्षणाचे काम देखील करत असत .
चांभार - चांभार गावातल्या मृत जनावरांच्या कातड्यांपासून निरनिराळ्या वस्तू तयार करायचे ते विकायचे . चपला , बूट , कातडी सामानं , मोटं इत्यादी दुरुस्त करायचे नवीन वस्तू तयार करायचे आणि ते विकायचे . आता आपण आपली पादत्राणे शोरूममधून घेतो .
मातंग - मातंग समाज केतकी पासून निघणारा जो तंतू आहे त्याचे दोरखंड तयार करायचे . शिंदीच्या पानांपासून झाडू तयार करायचे . सुपं , टोपल्या ,परडे इत्यादी वेताच्या वस्तू तयार करायचे आणि गावात विकायचे . शुभप्रसंगी हलगी वाजवायचे . इत्यादी कामे मातंग समाज करायचे . आता आपण वरील सगळ्या वस्तू माँलमधे किंवा दुकानात घेतो .
तेली - तेली शेतकऱ्याने दिलेल्या तेल बियांपासून तेल काढून द्यायचे . लाकडाच्या घाण्यावर बैलाला फिरवून शेंगदाणा , जवस , तीळ , करडई , मोहरी , एरंडेल तेल काढायचे. सरकी, ढेप ,पेंड विकणे वंगण विकणे इत्यादी कामे तेली करीत असत . तेलाच्या व्यवसायाशी संबंधित बाकी सगळे लहान मोठे व्यवसाय तेली करत असत . एक बैले किंवा दोन बैलें तेली असायचे . म्हणजेच एका बैलाचे फिरवून तेल काढणे किंवा दोन बैलांना फिरवून तेल काढणे अशी ती पद्धत असे .आता आपण डबेबंद ,. बाटलीबंद सिलबंद रिफायनरी तेल वापरतो , किंवा लाकडी घाण्याचा व्यवसाय हल्ली वाढतांना दिसतो आहे .
न्हावी- न्हावी गावातील लोकांची दाढी करणे , केशभूषा करणे , केशरचना करणे इत्यादी कामे करत असत . विधवा स्त्रियांचे केशवपण करणे केशकर्तनालय चालवणे , लहान मुलांची जावळं काढणे, एखाद्या घरी कार्यक्रम असेल घरोघरी जाऊन जेवणाची आमंत्रण देणे ही कामे नाभीक करत असत.
परीट आपण यांना धोबी या नावाने ओळखतो . घरोघरी जाऊन मळलेले कपडे गोळा करायचे ते नदीवर किंवा घाटावर न्यायचे तिथे धुवायचे, वाळू घालायचे, धुवून इस्त्री करून पुन्हा घरोघरी पोहोचवून देणे हे त्यांचे काम होते .आता आपण त्यांना आयरन वाला , इस्त्रीवाला या नावाने ओळखतो त्यांच्या व्यवसायात आता बराच बदल झालेला आहे.
माळी - माळी स्वतःच्या बागेत माळवं पिकवायचे, म्हणजेच फुले ,भाज्या ,कांदा बागायती पिके काढायचे आणि ते गावात विकणे अशी काम करायचे . "आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत " ही संत चोखोबांची ओळ आठवते .
‌ लोहार लोखंडाच्या वस्तू घडवणारे हे कारागीर असत . तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून विविध वस्तूंचे आकार देण्याचे काम ते करायचे . शेतीची अवजारे तयार करणे , बैलगाडीचे आरे तयार करणे , बाग कामाची अवजारे तयार करणे , विळे , कोयते , सळया , प्राण्यांच्या खुरांची नालं तयार करणे , कुदळी , घमेली , पावडे , खिडक्यांची गजं , दाराच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम लोहार करत असत . " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी- ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे " हे गाण्याचे बोल आठवले का ?
सुतार लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम सुतार करायचे . त्यांना कारागीर असे म्हणत . लाकूड आणल्यावर त्याला तासायचे , करवतीने कापायचे , पटाशी वापरून, रंधा वापरून गुळगुळीत करून विविध वस्तू तयार करायचे . पाटं , खुर्च्या , स्टूल , चौरंग , घरातली छोटी देवळं , दाराच्या चौकटी, खिडकीच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम सुतार करत असतं . लाकडी खेळणी तयार करायचे , बंगया तयार करायचे, बारशासाठी पाळणे तयार करायचे, लाकडाचे छोटे नंदी तयार करायचे अशी कामे सुतार करायचे .
सोनार - सोन्या-चांदीचे दागिने घडवायचे , देवांचे टाक घडवायचे , वास्तुदेवतेच्या प्रतिमा तयार करायचे चांदीची भांडी दागिणे इत्यादी तयार करण्याचे काम सोनार करत असत . गावागावात जिवती म्हणजेच दीपपूजा हा सण असतो त्यावेळी दारावर जीवती लावण्याचे काम सोनार करायचे .
हल्ली आपल्याला ज्वेलर्स आढळतात पण बारकी दुकाने टाकून सोनाराचे काम पण सुरू असतं .
हे जे बारा बलुतेदार होते ते आपला व्यवहार पैसा न घेता करायचे .कामाच्या मोबदल्यात सुगीच्या दिवसात वर्षभराचे धान्य द्यावे लागे .
या बारा बलुतेदारांशिवाय गावोगावी फिरून आपले पारंपरिक उद्योग करणारे , व्यवसाय करणारे असत . अशावेळी हे पूर्ण कुटुंब बैलगाडी , खाचर किंवा घोड्यावरून सामान वाहून नेत गावी जाऊन राहुटी ठोकत व तिथेच काही दिवस मुक्काम करत , तिथेच आपला व्यवसाय सुरू करत असतं . तिथला व्यवसाय झाला की पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं .
कल्हई करणारे- गावात कल्हई करणारे लोक तांब्या- पितळेची भांडी कल्हई करून देत असत . ते स्वतः बैलगाडीवर प्रत्येक गावाला जायचे , त्यांचे कुटुंब सोबत असायचे . गावाच्या वेशीवर एखाद्या वडाच्या सावलीला कोळशावर चालणारा भाता जमिनीत गाडून ते बसवत असत . त्याला फिरवायला दांडा असे , तो दांडा फिरवला की निखारे फुलत , त्यावर पितळी भांडी तांब्याची भांडी गरम करून त्यावर नवसागराचा लेप देऊन कल्हई केली जात असे . आता पितळेची भांडी वापरणे बंद झाल्यामुळे कल्हई प्रकार दिसत नाही .
वडार - वडार लोक गावोगावी फिरून दगडाचा पाटा- वरवंटा , दगडी खल विकायचे .भटक्या जमाती तील हे लोक कुठेही आपली झोपडी शाकारायचे व व्यवसाय संपला की इतरत्र जायचे . गावातले लोक त्यांच्याकडून दगडाच्या वस्तू विकत घ्यायचे , आता मिक्सरने हे उद्योग बंद केले .
बोहारीण - डोक्यावर मोठ्या गाठोड्यात कपडे बांधून भांडी घ्या अशी आरोळी ठोकत बोहारीन दारात येते आणि जुन्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला अनेक घासाघसी नंतर एक भांडे देते . आजकाल बोहारीन प्लास्टिकची टोपले ,सुपं , भरण्या असा ऐवज पण मोबदल्यात देते . तिच्याशी घासाघिस करण्यात एक तास जातो .पण कापडं उपयोगात येतात वाया जात नाही .
पोतराज - अंगावर कपड्यांच्या माळा ,घुंगरांच्या माळा घालून , कपाळावर कुंकवाची मळवट भरून उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारत , कोरडा ओढत पोतराज अंगणात येतो . पायात मोठे घुंगराचे चाळ बांधलेले असतात, सोबत बायको असते , तिच्या डोक्यावर देवीचे छोटेसे देऊळ असते . ते घेऊन ते घरोघरी जातात आणि शिधा मागत पोतराज फिरत असतो . हल्ली हे प्रमाण कमी झालेले आहे तरी नामशेष मात्र झालेले नाही कधीतरी पोतराज आढळतो .
सरोदी - फाटलेल्या दर्या सतरंज्या जोडणारे . हातात दाभन , जाड सुया आणि दोरा घेऊन फिरणारे भटके लोकं गोण्याला ठिगळ लावून देणारे , हे लोक गावातून फिरत असायचे आता हे लोक दिसत नाहीत .
सरोदी लोक पत्रावळी द्रोण तयार करण्याचे काम करीत असत . मोहाची पाने , पळसाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करायचे .
शिकलगार - सायकलवर आपले अवजार घेऊन फिरणारे , हातात पत्रा कापायची कात्री , हातोडी , रिपीट , खिळे घेऊन गल्लीबोळ्यातून आवाज देत हे लोक फिरत असायचे . लोखंडी बादलीचे बुड बदलवून द्यायचे , लोखंडी बादली कापून त्याची शेगडी तयार करून द्यायची ,चाळणी तयार करून द्यायची, घमेल्या
ला बुड बसवून द्यायचे अशी लोखंडी पत्र्याशी संबंधित असलेले काम हे शिकलगार लोक करायचे .आता ते चाळण्या , लोखंडी कढया ,खलबत्ते असे विकतात .
कासार - बांगड्या भरणारे. सायकल वर बांगड्यांची माळ लावून गावोगावी खेडेपाडी जाऊन काचेच्या बांगड्या भरणारे लोकं . काही गावात बाया डोक्यावर टोपली घेऊन बांगड्या विकायच्या अजूनही विकतात . फार पूर्वी कासार लोक घोड्यावरून बांगड्या वाहून न्यायचे आणि भरायचे आता सगळं हातगाडीवर मिळतं , त्यामुळे जायची गरज नाही . पण गावात अजूनही कासार जात असतो , विशेषतः सणावाराला ग्रामीण भागातल्या बाया चुडा भरतात .
मातीच्या भिंतींना गिलावा करून देणारे सारवून देणारे लोक गावात फिरवून आरोळी द्यायचे . अशावेळी ज्यांना आपली घर सारवायची असत ते लोक यांना बोलवून आपल्या भिंतींना गिलावा करून घेत असत . आता मातिच्या भिंती नाही त्याच्यामुळे गिलावाही नाही.
घर साकारणारे - घराच्या छतावर नळ्याची कवेलू किंवा इंग्रजी कवेलू असायची. ती पावसाळ्यापूर्वी शाकारून घ्यावी लागायची . अशी कवेलू शाकारून देणारी माणसं गावात यायची . लोक त्यांच्याकडून कवेलू शाकारून घ्यायचे . दरवर्षी हे काम उन्हाळ्यात करावं लागे .
वीट भट्टीवर विटा भाजण्याचे काम करणारे लोक होते , आताही आहेत . आताही गावाबाहेर वीट भट्टी दिसते आणि त्यावर काम करणारे मजूरही दिसतात .
गारुडी - आपल्या खांद्यावर एक झोळी अडकवून त्यात पुंगी पेटारा असे साहित्य घेऊन गारुडी गावोगावी फिरत असत , आणि सापाचे खेळ दाखवत असत . विशेषता नागपंचमीत गारुडी जास्त दिसायचे . पुंगी वाजवली आवाज केला तर गावातली बालमंडळी गोळा होत असे आता प्राण्यांच्या खेळांवर बंदी असल्यामुळे हे गारुडी दिसेनासे झाले .
केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .
आईस गोळे किंवा आईस कांड्या , कुल्फी विकणारे लोक दारासमोर गाडी किंवा सायकल घेऊन यायचे आणि गोळे विकायचे .
बुरडकाम करणारे लोक बेताच्या बारीक कमच्यां पासून सुपं , टोपल्या , परडे , झालं , पेटारे असे विनत असत आणि गावोगावी नेऊन विकत असत . आता हे सगळं साहित्य दुकानात मिळतं .
विणकर - हाताने सूतकातून त्या सुतापासून मागट्यावर हातमाग यंत्रावर कापड विणणारे विणकरी होते .
रंगारी विणकर जे कापड विणत असत त्या कापडाला रंगवण्याचे काम रंगारी करत असत .
बेलदार मातीच्या भिंती बांधण्याची मातीचे घरे बांधण्याची काम बेलदार करत असत .
कानातला मळ काढणारे लोक हातात एक तेलाची बुधली आणि जाड तांब्याचा तार घेऊन गावोगाव फिरत असत आणि कानातला मळ काढून देत असत .
नंदीवाला - सोबत एक नंदी घेऊन नंदीवाला घरोघरी फिरत असे . हा नंदीवाला गावाच्या बाहेर राहूटी ठोकत असे . लोकांचे भविष्य सांगण्याचे काम तो करत असे आणि ते भविष्य ऐकून त्याचा नंदी होकारार्थी मान डोलवत असे .
धार लावणारा - लावण्याची काम करणारे लोक सायकलवर आपलं धार लावायचं छोटसं यंत्र घेऊन यायचे आणि सायकल ला पैडल मारून ते धार लावून देत असत .
जादूचे खेळ दाखवणारे जादूगार आपली पोतडी घेऊन यायचा एक विशिष्ट प्रकारचा पोशाख घालायचा गावातले बाळ गोपाळ गोळा करायचा त्याच्या हातात एक जादूची काडी असायची आणि तो काही मंत्र म्हणून छोटे छोटे हात चलाखीचे खेळ दाखवून ही जादू असे सांगत असे .
मोड घेणारे - पितळेची , हिंडालियमची , तांब्याची जुनी भांडी घेऊन त्या मोबदल्यात पैसे किंवा नवीन भांडी अशी देवाणघेवाण हे मोड घेणारे लोक करत असत .
चित्रपट दाखवणारे - एक षटकोनी आकाराचा डबा घेऊन त्याला आत बघता येईल अशी पाच-सहा झाकणे असलेल्या खिडक्या असत . त्यातून आत बघितले तर आतला सिनेमा दिसत असे . असे चालते बोलते सिनेमागृह डोक्यावरून वाहून नेले जाई . आणि जिथे मुक्काम असे तिथे एका फोल्डिंग स्टॅन्ड वर ठेवले जाई .दहा पैसे घेऊन दहा मिनिटांकरिता हा सिनेमा बघता येत असे .यानंतर दुसरे सहा मुलं बघत असत . अशा प्रकारचे हे चलचित्र दाखवणाऱे खऱ्या अर्थाने चल असे फिरतीवर होते . गावोगावी चालून तो चित्रपट दाखवायचे . त्या सिनेमाची मजा आता कशातच नाही .
पिंजारी लोक- सायकलवर किंवा गाडीवर पिंजण्याचे यंत्र घेऊन गादी भरून देण्यासाठी उशा भरून देण्यासाठी पिंजारी लोक गल्ली बोळात फिरायचे आणि कापूस पिंजून रजया , गाद्या, उशा भरून द्यायचे .
आधी मातीच्या भिंती असत ,त्यावेळी त्या सारवण्यासाठी मालामिट्टी नावाची एक प्रकारची चिकन माती येत असे . बैलगाडीतून ती माती विकणारे लोक यायचे आणि दहा पैसे पायलीच्या हिशोबाने ती माती विकत घेऊन बाया घरोघरी साठवून ठेवायच्या नंतर वर्षभर त्या सारवणासाठी उपयोगी आणत असत .
तेल मालिश करून देणारे हातात तेलाची बाटली कंगवा एवढेच साहित्य घेऊन गावात तेल मालिश वाला फिरत असे . आठवला का जॉनी वॉकर सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराए .
गोंदवणारे सुया घ्या बिबे घ्या दाभन घ्या अशी हाक मारत गोंदवून देणाऱ्या बाया गावात येत असत . आणि त्यांच्या जवळच्या सुईने त्या कपाळावर हातावर नावे गोंदवून देत असत .
वासुदेव भल्या पहाटे दारात येत असे आणि भुपाळी आळवत असे .काही भागात अद्यापही वासुदेव फिरताना दिसतात .
गावात बारई लोक विड्याच्या ( नागवेलीची पाने ) पानांची विक्री करत होते .सायकलवर पानाचा पेटारा बांधून गावात फिरायचे .
विहिरी खोदून, बांधून देणारे लोक असायचे .आजही आहेत . विहीरी उपसून स्वच्छ करून देतात .
वरील व्यवसायांचे स्वरूप आता बदललेले आहेत यातले काही जसेच्या तसे आहेत तर काहींचे रंगरूप बदललेले आहेत .काही दुकानातून व्यवसाय करतात , काही ऑनलाईन करतात , काही नुसत्या फोनवरून घरोघरी पोहोचतात अशा प्रकारे काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत . समाज मागणीनुसार व्यवसाय बदलतात आणि आपणही ते सहज स्वीकार करत करत बदलत जातो . त्यामुळे अनेक व्यवसाय आता वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतात एक आठवण म्हणून सहज लिहून बघितले .
लिहिता लिहिता यातले काही व्यवसाय कदाचित सुटलेले असतील . नव्या व्यवसायांची यादी करते म्हटलं तर ती इतकी मोठी होणार आहे की त्याचा एक स्वतंत्र लेख द्यावा लागेल आणि त्यातले पूर्ण स्वरूपही कधीकधी माहीत नसते .
या व्यवसायांमध्ये मुद्दाम पैठणी चा उल्लेख केलेला नाही . कारण पैठणी तयार करणारे लोक वर्षभरात सर्व कुटुंब मिळून काहीच पैठण्या तयार करत असत . आणि त्यांना राजाश्रय असल्यामुळे त्यांचा पिढीजात पैठणी तयार करणे हाच होता .असे कौशल्य असणारे काहीच कुटुंब असतात त्याच्यामुळे हा व्यवसाय पैठण किंवा गुजरातमध्ये पाटण येथेच होता .पैठण ची पैठणी आणि पाटणचा पटोला प्रसिद्ध आहे .हे लोक आपल्या मुळ गावातच राहिले .गाव आणि व्यवसाय बदलला नाही .
या सगळ्यात एक लिहायचे राहिले ते म्हणजे शाळेच्या आवारात जी आजी बसायची टोपलं घेऊन ती .आठवते का . कवठ ,चिंच ,बोरे ,पेरू ,बोरकूट, फुटाणे खारे दाणे अशा मैत्रीभाव असलेल्या वस्तू तिच्या जवळ मिळायच्या आणि मैत्री नांदवायच्या .या खाऊचे वैशिष्ट्य असे होते की तो कितीही कमी पैशात घेतला तरीही सगळ्यांना पुरत असे .
वर उल्लेख केलेल्या व्यवसायात काही सुटलेले आहेत तर काही व्यवसाय थोड्याफार फरकाने नवीन रूपात समोर येत आहेत .व्यवसाय भिन्नता बघून आनंद होतो . जो तो आपल्या क्षेत्रात निष्णात .आपले पूर्ण आयुष्य एकाच उद्योग व्यवसायात लावून निष्ठेने कर्म करत राहणे हेच एक उद्दिष्ट होते .फसवणूक, लबाडी याचा मागमूसही नव्हता या किरकोळ धंद्यात . शुद्ध व्यवहार .त्यांना तपासून घेण्यासाठी कोणीही भेषज अधिकारी नव्हते .त्यांचे शुद्ध मन हेच त्यांचे सर्वस्व होते .माणुसकीचा अमोल ठेवा जपला या जुन्या लोकांनी .आभारी आहोत

©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

Group content visibility: 
Use group defaults

Unwanted लोक लिफ्ट चा वापर करून building मधील
कोणत्या ही घरात प्रवेश करू नये.
ह्या हेतू नी liftman हा प्रकार अस्तित्व मध्ये आला.

मस्त लेख आणि प्रतिसाद. एकदम नॉस्टॅल्जिक.

पत्र्याच्या मोठ्या ट्रंकेत बेकरीत बनवलेली बिस्किटं, नानकटाई, खारी, बटर, टोस्ट घेऊन येणारे. ट्रंक उघडल्यावर येणारा खमंग वास आणि मग त्या ट्रंकेत कप्पे करून ठेवलेले हे सर्व जिन्नस. ही ट्रंक दुमजली असे. वरचा ट्रे काढता येत असे.

यातली बरीचशी मंडळी डोंबिवलीला आमच्या घरावरून नित्यनेमानं जात. एकदा बहिणीनं कोणा मैत्रिणीकडे खाऊ दिला असताना अजून मागून खाल्ला आणि घरी येऊन सांगितलं. त्यावेळच्या प्रथेनुसार आईनं तिला ' असं हावरटासारखं मागून खाऊ नये. तुला काय हवं ते सांग. आपण घेऊ.' असं समजावलं. झालं! पडत्या फळाची आज्ञा घेऊन बहिणीनं दिसेल त्या विक्रेत्याला हाक मारून घरी बोलवायला सुरवात केली. बिस्किट वाला, आईस्क्रीमवाला, चणे शेंगदाणेवाला, मग लगे हाथो सिनेमा दाखवणारा वगैरेपण आले... मग पुन्हा एकदा शाळा घेऊन वरील धडा 'अनलर्न' करून अपडेटेड व्हर्जन अपलोड करण्यात आलं - कधीकधी चालेल. रोज हे प्रकार चालणार नाहीत.

पण बारा बलुतेदार पद्धती मध्ये सर्वांना जगण्यासाठी हक्क नी
व्यवसाय दिले होते.
त्यांचा मान त्यांना दिला जायचा.>> मान दिला जायचा??>>>>>>>>> आठ दहा वर्षांपूर्वी केळशीच्या देवीच्या उत्सवात पाहिलं होतं त्यात एकजण मुसलमान होता.

मुसलमान शब्द वरून एक आठवले..
गावाच्या यात्रेत जी बकरी बळी दिली जातात.
तो बकरे कापण्याचा मान हा मुसलमान व्यक्ती लाच आहे.
फक्त तोच बकरे कापतो.
ह्याच्या पुढे.
मटणाच्या दुकानात पण बकरे मुसलमान व्यक्ती च कापतो.
त्याला हक्काचा व्यवसाय निर्माण करून दिला आहे.
बारा बलुतेदार पद्धती नी.

आता ही पद्धत जवळ जवळ नष्ट होत चालली आहे.
केस हे न्हावी च कापायचे तो त्यांस व्यवसाय होता हक्कानी.
आता कोणी ही हा व्यवसाय करते.

छान आहे लेख. यातले बरेच व्यवसाय अजुनही गावी सुरु आहेत. बलुतेदारी सुरु आहे, स्वरुप बदललेले आहे. आता पैश्यात मोबदला दिला जातो, पहिल्यासारखे तांदुळ वगैरे फार कमी लोक स्विकारतात.

त्यांचा मान त्यांना दिला जायचा.>> मान दिला जायचा??
कोणत्या जगात वावरता सर तुम्ही>>>

हा मान म्हणजे फुले हार्तुरे घालुन सत्कार किंवा बरोबरीने वागवणे असे नाही. मान देणे याचा अर्थ प्रसंगानुरुप
बदलतो. गणपतीत गौरी आणताना बायक्संसोबत ढोल वाजवत एक पुरुष जातो. हा पुरुष महार असतो, आता त्यांना महार म्हणत नाहीत, पण परंपरेने हे काम ते करतात, दुसर्याने केलेले त्यांनाही चालणार नाही. पाणवठ्यावर जाउन गौरी घेतल्यावर प्रत्येक स्त्री ढोलवाल्याच्या हातात यथाशक्ती नोट देऊन व्यवस्थीत पाया पडते. हा त्याचा मान, तो दिला नाही तर तो पुरुष भडकतो. न देणार्‍यावर इतरजण भडकतात.

सणाच्या दिवशी प्रत्येकाच्या दारात ढोल वाजवला जातो. हल्लीच एक प्रकरण झाले गावात व संबंधीत कुटुंबाच्या दारात होळीची राधा गेली नाही, कोणी शबय मागितली नाही, ढोल वाजला नाही. त्या कुटुंबाचा हा अपमान. हे सगळे प्रकार गावांतुन अजुनही सुरु आहेत. तिथल्या मान अपमानाच्या पद्धती शहरापेक्षा वेगळ्या आहेत, त्या ठेवण्याचे मापदंड वेगळे आहेत.

हेच सांगतोय मी.
देवळात देवाची सेवा करण्यासाठी ब्राह्मण नाही तर गुरव जाती मधील च व्यक्ती असते.
ब्राह्मण .
लग्न,पूजा,बाकी विधी साठी.
शेवटच्या अंत संस्कार ला ब्राह्मण नाही .
प्रतेक जातीत वेगळा व्यक्ती असतो .
काही जातीत त्यांस जंगम म्हणतात.
व्यवसायाचे विकेंद्रीकरण केले होते.
आणि लोक ते न विरोध करता करत कारण आमदनी पण त्या मधूनच च मिळे.
बाकी जातीभेद ,म्हणजे भेदभाव तीव्र प्रमाणात कसा निर्माण झाला त्याची वेगळी कारणे असतील.
त्या जातीभेद चे समर्थन करत नाही
तेलाचे उत्पादन हे तेली च करत.बाकी कोणाला तो व्यवसाय करण्यास परवानगी नव्हती.
आता पण त्या system ची गरज भासते.
मागणी पण करतात लोक.
लहान लहान व्यवसाय .
भाजी विक्री, शिलाई काम, दूध उत्पादन , ह्या आणि अशा लहान उद्योगात .
मोठमोठ्या कंपन्या ना परवानगी नको.
त्यांना हे काम करण्यास मनाई करावी.
घरगुती व्यवसाय हे घरगुती च राहावेत.
त्या मुळे सर्वांना रोजगार मिळेल

बहुसंख्य चित्र असे असले तरी इथेही भिंती आहेत आणि खैरलांजी सारखी गावे आहेत हेही सत्य आहे. असो, विषयांतर झाले.

पिंडदानाच्या वेळी कावळ्यालाही मान देतात. एरवी?
---
मेरी गो राउंडवाले (याला मराठीत काय म्हणतात?) येतात का अजून? आमच्या भागात गेल्या चारपाच वर्षांत दोनदा आकाशपाळणा एके जागी काही दिवस अगदी सकाळी पाहिला होता.

नंदी बैल वाले खूप दिवस बघितले नाहीत.
कासार हल्ली दिसत नाहीत.
लग्न समारंभ असेल तर च घरी बोलावले जातात बांगड्या भरण्यासाठी.
पिंगळा पण हल्ली दिसत नाहीत.
बहुरूपी दिसत नाहीत.
मरी आई वाले,डोंबारी कधी कधी दिसतात.
हातवारे करून नाव ओळखणारे पण दिसत नाहीत.
पाळीव जनावरे पहिली फेकून दिली जायची मेल्यावर.
मग त्यांची कातडी काढली जायची .
ते पण बंद झले आहे .
आता पुरतात जमिनीत.

आंब्याची झाडे आता जी आहेत ती कलमी झाडे उंची ला खूप कमी आहेत.
पण जुनी आंब्याची झाडे ही खूप मोठी आणि उंच होती..
झाडावर चढणारी एक्स्पर्ट तरुण पोरं आंबे उतरून द्यायचे .
100 ला 25 आंबे त्यांना द्यावे लागत.
चिंच ची झाडे पण खूप विशाल असतं.
आता झाडावर चढणारी पोर मिळणे पण मुश्किल आहे.
ह्या क्षेत्रात पण परप्रांतीय येवू शकतात.
धनगर लोक त्यांच्या मेंढ्या साठी झाडे खडसून देत.
त्यांच्या मेंढ्यांना खाद्य मिळे आणि शेतकऱ्याचे पण काम होत असे.
बाभळी सारख्या काटेरी झाडावर चढून त्याच्या जास्त वाढलेल्या फांद्या तोडणे कोणाचे ही काम नाही .
ते काम तीच लोक सराईत पने करत.
आता त्या लोकांची पण कमतरता जाणवत आहे

छान लेख छान विषय आवडला
प्रतिसादही छान आठवणींना उजाळा देणारे

हल्ली ते थंड पाणी विकणारे कुठे असतात का? आमच्यावेळी फिरायचे. दुपारच्या उन्हात क्रिकेट खेळून झाल्यावर काही रईसी शौक असलेली पोरं प्यायची ते पाणी. आतासारखे बाटलीतून पाणी विकले जायची पद्धत तेव्हा नव्हती. त्यामुळे त्या पाण्याची क्वालिटी काय असेल देवास ठाऊक. पण ते थंड असायचे त्याचे पैसे मोजले जायचे. मी कधीच प्यायलो नाही. त्यापेक्षा थोडे अजून पैसे टाकून बर्फगोळासरबत घ्यायचो. तसे आजही मला पाण्याच्या बाटलीला पैसे मोजायला जीवावरच येते. सरकारने पिण्याचे शुद्ध पाणी जागोजागी उपलब्ध करू द्यायला हवे.

वडार समाजाची लोक राहिलीच.

पाटा, वरवंटा,उकल, दगडाचे बनवून द्यायचे.
त्यांच्या बायकाच हे काम करतात.
खुप स्ट्राँग असायच्या त्या आपल्या पुरुषानं पेक्षा पण जास्त

हो.पाट्याला आणि जात्याच्या पाळ्यांना टाकी लावून देणारे असायचे. चेपलेली चिरा पडलेली तांब्यापितळची भांडी ठोकून आणि जोडून देणारे, नळे परतून पाखी झाडून देणारे, झावळ्या विणणारे, नारळ उतरवणारे, स्टव दुरुस्त करणारे, गुरे राखायला घेऊन जाणारे आणि परत आणून सोडणारे, रहाटाचे रज्जू ( सुंभ) वळून देणारे, खराटे बांधणारे अशा अनेकांना आज मोठ्या शहरांत कामे उरली नाहीत.
उलट, दुसरी नवी कामे निर्माणही झाली आहेत. मागवलेल्या वस्तू घरी पोचवणारे, इमारतींचे सुरक्षा रक्षक, वाहने पुसून देणारे, ड्रायव्हर्स,चार आठ दिवसांनी येऊन घरसफाई करणारे, घरात कीटकनाशके फवारणारे किंवा चिकटवणारे, इस्त्रीवाले, लॉनड्री वाले, मोबाईल, कम्प्यूटर, टी वी वगैरे repair करणारे, मंडप डेकॉरेटर्स, इव्हेंट मॅनेजर, कॉस्च्युम डीझायनर्स, ड्रेपर्स, मेंदी काढणारे, साउंड सिस्टीम भाड्याने देणारे, मोठी जेवणे बनवणारे, त्यांच्या हाताखाली मोठ्या प्रमाणावर असणारे मदतनीस, वाढपी, विद्युत रोषणाई करणारे असे अनेक रोजगार नवीन आहेत. जे आधी छोट्या प्रमाणावर होते त्यांची मागणी वाढून ते मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे झाले आहेत.

तांबट!
पुण्यात कसबा पेठेत तांबट आळी ---गल्ली--- होती. रात्रंंदिवस ठोक ठोक करून ठोक्याची भांडी बनवली जात. आता आहे की नाही काय माहित.

पत्र्याच्या मोठ्या ट्रंकेत बेकरीत बनवलेली बिस्किटं, नानकटाई, खारी, बटर, टोस्ट घेऊन येणारे >>> मामी, पुण्यात हे लोक ते "बॉम्बे खारी" म्हणून विकत. मुंबईत काय म्हणून विकत माहीत नाही Happy ते सगळे पदार्थ आवडायचे.

पाट्याला आणि जात्याच्या पाळ्यांना टाकी लावून देणारे असायचे. >>> "टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही" या म्हणीचा अर्थ लहानपणी आधी कळला नव्हता. कारण आधी टाकी म्हणजे पाण्याची टाकी इतकेच माहीत होते Happy

पुण्यात कसबा पेठेत तांबट आळी ---गल्ली--- होती. रात्रंंदिवस ठोक ठोक करून ठोक्याची भांडी बनवली जात. >>> यावरूनच माबोवर एखाद्या घनघोर वादामधे कोणी मधेच जर एकदम न्युआन्स्ड काही मुद्दे काढू लागले तर त्याला "तांबट आळीत सतार वाजवणे" असे कोणीतरी म्हंटले होते Happy

यावरून आठवले - भांड्यांच्या दुकानाच्या बाहेर त्यावर नाव घालून देणारे असतात. आता बहुतेक ते लोक मशीन वापरतात. पण आधी एक पेनसारखे पण बहुधा दगडाचे काहीतरी घेउन त्यावर दगडीच पण चपटी पट्टी आपटून नाव घालत. खूप कौशल्याचे काम असे. त्यातही अनेकांची तशी अक्षरे अगदी सुंदर असत. कधी कधी नातेवाईकांनी/ओळखीच्यांनी प्रसंगाचे संदर्भ नसलेले नाव घातलेले एखादे भांडे सापडले की अजूनही आमच्याकडे त्याने/तिने त्या वर्षी/दिवशी हे भांडे का भेट दिले असावे असे कोडे सोडवल्यासारखी चर्चा होते.

पत्र्याच्या मोठ्या ट्रंकेत बेकरीत बनवलेली बिस्किटं, नानकटाई, खारी, बटर, टोस्ट घेऊन येणारे
>>>>

हे मुंबईला आमच्याकडे आजही येतात.
रोज सकाळी ताज्या ताज्या कडक पाव आणि मस्का नाश्ता यांच्याच कृपेने मिळतो. त्यासोबत खारी वरचेवर आणि नानकटाई अध्येमध्ये घेतले जाणारे पदार्थ.
याला आमच्याकडे खारीवाला बोलतात.
जुन्या बिल्डींगचे रिडेव्हलपमेंट होऊन मोठा टॉवर झाला आणि फेरीवाल्यांना (भाजीवाल्यांना आणि मच्छीवाल्यांना) प्रवेश निषिद्ध झाला तरी या खारीवाल्याला प्रवेश कायम होता.

छान लेख. नॉस्टॅल्जिक झाले.

खरं तर ह्यातले बरेच जण अजूनही डोंबिवलीत दिसतात पण सोसायटीत येऊ दिलं जात नाही, सुरक्षेच्या दृष्टीने बरोबर आहे म्हणा. कोणी बोलावलं तर खारीवाला, आवसवाली, चाकू सूरी धारवाला यांना आत येऊ देतात.

बालपण चाळीत गेल्याने तेव्हा मात्र मुक्तपणे ह्या गोष्टी जवळून बघितल्या आहेत, बायोस्कोपही. केसावर फुगे माहीती नाही मात्र.

चिंधीवालीही यायची एक, प्लॅस्टीकवर लसूण विकायलाही यायचे. चिंध्या देऊन पैसे का घ्यायचे मला वाईट वाटायचं, मी आईला अश्याच दे तिला सांगायचे. आवस वाढावालीच्या टोपलीतले पीठ, मीठ, लाल मिरच्या, तेल बघुन आकर्षण वाटायचं लहानपणी, मी तिला टोपले दाखवायला सांगायचे. नंतर जरा मोठं झाल्यावर वास्तव समजल्यावर जाम वाईट वाटलं. अजूनही अंगावर चाबूक मारून घेणारे (कडकलक्ष्मी) फिरतात. दे दान सुटे गिर्हाण ऐकू येतं, ग्रहण सुटल्यावर, वाईट वाटतं. काहीजण अजूनही यावर अवलंबून आहेत.

केसावर फुगे गाणे युट्युब वर फेमस आहे. मी एकदा कराओके नाइट ला म्हटले होते. परत त्यांनी बोलवले नाही. >>> हाहाहा.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन बहिणीनं दिसेल त्या विक्रेत्याला हाक मारून घरी बोलवायला सुरवात केली. बिस्किट वाला, आईस्क्रीमवाला, चणे शेंगदाणेवाला, मग लगे हाथो सिनेमा दाखवणारा वगैरेपण आले... मग पुन्हा एकदा शाळा घेऊन वरील धडा 'अनलर्न' करून अपडेटेड व्हर्जन अपलोड करण्यात आलं - कधीकधी चालेल. रोज हे प्रकार चालणार नाहीत. >>> धमाल किस्सा, हाहाहा.

एकंदरीत लेख बरा होय, पर इंग्रजीत म्हणते तसे hunky dory चितरंग नसते दरेक वखती, कालबाह्य होयेल व्यवसायातील कैक कामधंदे फक्त त्यांच्याशी संलग्न अशेल जातपात शिवाशिव अन् इतर कुप्रथा (सरकारी पातळीवरून) बंद केल्यानं आता किमान माणुसकी असणार मानुस तेच्या साठी रडत नोय.

अर्थाअर्थी पायता लय सारे कामधंदे हे फक्त त्याहीच्या जातीय संलग्नते पाई बंद होयेल हायत अन् ते काई खराब नाई असे मले वाटते

लहाणपणी दादरला चाळीमध्ये एक पापडवाला यायचा..मोठी पिशवी प्लास्टिकची अन कुरकुरीत तळलेले पापड.. इतक्या छान गोष्टी रंगवुन सांगायचा आंम्ही लहान मुलं अन मोठी लोकहि ऐकत रहायचे उभे.. हातोहात पापड घेतले जात त्याचे.
तसेच कल्हईवाले.. तो कल्हईचा वास अजुनहि मला आठवतो.. योगा करणारे योगी यायचे ... कसले भन्नाट योगा करायचे पब्लिक स्तंभित अन आंम्ही अचंबित Happy
पेटी घेवन येणारा खारीवाला.. आता नाहि दिसत खरं .. पण ते पण एक अप्रुप होतं आमच्यासाठी.

पूर्वी 'ऑय्स्टर्स, क्लॅम्स अ‍ॅण्ड कॉकल्स' असं ओरडत ते विकणारी एक आर्या नावाची मुलगी यायची. पुढे कुठेतरी ती गायब झाली. काही वर्षांनी तमराज नाईट किंगच्या वधात तिचा हात होता असं ऐकीवात आलं.

पूर्वी 'ऑय्स्टर्स, क्लॅम्स अ‍ॅण्ड कॉकल्स' असं ओरडत ते विकणारी एक आर्या नावाची मुलगी यायची. पुढे कुठेतरी ती गायब झाली. काही वर्षांनी तमराज नाईट किंगच्या वधात तिचा हात होता असं ऐकीवात आलं>>>>
अय्यो... Proud

पाणीपुरीवालाही रोज आमच्या दारात यायचा. बहुतांशी लोकं आपल्या घरून ताटल्या घेऊन यायचे आणि तो त्यातच बनवून द्यायचा. त्यालाही प्लेट धुवायचा त्रास नाही. लोकांनाही याने प्लेट कशी धुतली असेलचे टेंशन नाही.

काही लहान लहान मुले चॉकलेट घ्यावे तसे एकदोन पाणीपुरी मागायचे. कारण पैसे तेवढेच घेऊन यायचे. तो ही मग लहान मुलांना तसे द्यायचा. सहाची पुर्ण प्लेटच घ्या म्हणून अडून नाही बसायचा.

रात्रीचे मालिशवाले यायचे. ज्यासाठी लोकं थायलंडला जातात ते अगदी दारात यायचे. ज्यांना हौस होती अशी मोठी लोकं बाहेर दादरावर म्हणजे कॉमन पॅसेजमध्येच झोपून त्याच्याकडून मालिश करून घ्यायचे. तेव्हा त्यांना मिळणारे स्वर्गसुख बघून हेवा वाटायचा. पण तो जशी मालिश करायचा तशी आपल्या नाजूक अंगाला झेपणार नाही ही भितीही वाटायची.

Pages