लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

मागे दिलेल्या एका प्रतिसादात "गूगल लेन्सच्या पिक्चर टू टेक्स्ट कन्वर्जनमध्ये आणखीन सुधारणा झाल्यास" असा उल्लेख आहे. त्यात आणखी काय सुधारणा अपेक्षित आहेत? स्क्रीनशॉट नीट घेतल्यास गूगल लेन्समधून अगदी व्यवस्थित मराठी युनिकोड वाचता येते. उदाहरण म्हणून हे एक अख्खे पान स्कॅन केले.

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आहे की कुठून डाऊनलोड केले ते आता आठवत नाही. प्रताधिकार भंग किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याचा हेतू नसून अभ्यासासाठी स्क्रीनशॉट घेतला आहे. टेलिग्रामच्या "marathispellbot" या बॉटला हा मजकूर दिल्यावर खाली दिलेला प्रतिसाद मिळाला.

फक्त दोन (मोफत) अ‍ॅप वापरून एका मिनिटात खालील निष्कर्ष निघाले.
१) नेमुन, पुर्तता, नसुन, सुचना, तारिख, राहिल, करुन, सुरु, पासुन हे सर्व शब्द दीर्घ हवेत.
२) शुध्दीपत्रक, पध्दतीने, प्रसीध्द या शब्दातील ध्द चुकीचा असून तो द्ध असा हवा (ध + द / द + ध) ते शब्द असे हवे: शुद्धिपत्रक, पद्धतीने, प्रसिद्ध
३) अधीपत्य, अधीकारी, शैक्षणी़क, प्रसारीत, अराजपत्रीत, निश्चीत , नोंदनी, उमेवारांनी आणि मुख्य म्हणजे परिक्षा हे शब्द अनुक्रमे अधिपत्य, अधिकारी, शैक्षणिक, प्रसारित, अराजपत्रित, निश्चित, नोंदणी, उमेदवारांनी, परीक्षा असे हवे होते.
४) शब्द तोडून लिहिण्याची हिंदीसारखी पद्धत मराठीत सर्वमान्य होत चालली असावी. कारण "भरती करिता", "आरक्षणा नुसार", "उमेदवारां कडून", "प्रक्रिये संबंधी" अशा शब्दात विनाकारण स्पेस दिलेली दिसत आहे.
५) "अंतिमदिनांक" या शब्दातील "नांक" पुढच्या ओळीत गेला आहे. त्यासाठी "अंतिमदि" नंतर हायफनची अपेक्षा करणे म्हणजे फारच अवास्तव अपेक्षा केल्यासारखे ठरेल.

अच्छा. हे उत्तम आहे. म्हणजे आधीचा स्क्रीनशॉट चांगला नसल्याने कदाचित एवढे चुकीचे शब्द आलेले दिसतात.

ऑनलाइन मराठी वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील वाहिन्यांवरील बातम्यांच्या घसरत्या दर्जाबद्दल आपण जाणतोच. या माध्यमांशी तुलना करता आकाशवाणी हे त्यातल्या त्यात दर्जेदार माध्यम समजले जाते; अनेक वर्ष तसा अनुभव देखील आहे. परंतु अलीकडे त्यावरील मराठी बातम्यांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष माहितीमधील चुका, सदोष उच्चार आणि वाक्यरचना अनुभवायला येत आहे.

आज सकाळी पुणे आकाशवाणीवरील मराठी बातम्यांमधील निवेदकेचा ‘ज’ या अक्षराचा उच्चार तर वारंवार चुकीचा होताच. ते एक वेळेस सोडून देऊ. पण,
“ केंद्रीय संरक्षणमंत्री अजय भट्ट”,

असे म्हणणे चुकीचे आहे; संरक्षण राज्यमंत्री असेच म्हणायला हवे होते. अत्यंत महत्त्वाच्या राजकीय पदांबाबत मंत्री/राज्यमंत्री अशी गल्लत /गफलत होता कामा नये.

अधिकार / अधीकार, नागरिक / नागरीक अशा काही "किरकोळ" चुकांकडे दुर्लक्ष करावे हा सल्ला मला देखील पटतो. पण मग जोडाक्षरे, संधी शब्द, विरामचिन्हे यांच्याकडे तरी कशाला बघायचे? "पक्षाच्या पदाधीकार्यांचा सत्कार" असा बॅनर लागला तर त्यात "तोबा तोबा" करत छाती पिटण्यासारखे काय आहे? लोकसत्तासारख्या आघाडीच्या वर्तमानपत्रात कालच आलेली ही बातमी पाहू. (त्यांच्या वेबसाईटवरील "ईपेपर" या विभागातील "crop & share" हा पर्याय वापरून कात्रण तयार करण्याची सोय फारच चांगली आहे.)

१) "यापूर्वी ची", "अमृता हून", "बॅक लॉग" , "भुमिका मुळे" हे शब्द एकत्र जोडून हवे होते.
२) "गौरोद्गार" हा शब्द वास्तविक "गौरवोद्गार" असा आहे. तर "भुमिका" मधील भू दीर्घ आहे.
३) अनेकवचन करताना अनुस्वार दिला तर चांगले. म्हणजे "तीन वर्षाचे" या बदली "तीन वर्षांचे" असे तर "भुमिका मुळे" बदली "भूमिकां मुळे".
४) सराफ यांच्या "पडद्यावरील" किंवा "चित्रपटातील" भूमिकांमुळे असे लिहिले असते तर संदर्भ स्पष्ट झाला असता. म्हणजे त्यांच्या "राजकीय" भूमिकेशी याचा काही संबंध उरणार नाही.
५) वाक्याच्या शेवटी दिला जाणारा पूर्णविराम कुठे दिसला नाही. हे केवळ ऑनलाईन आवृत्तीतच आहे असे नाही तर प्रिंट मिडियामध्ये देखील अगदी असेच आहे.

'गौरोद्गार' ऐवजी 'गैरोद्गार' असे लिहिले नाही हे चांगले झाले. नाहीतर "गैर + उद्गार" असा अगदी उलटा अर्थ निघाला असता.

धन्य आहे. शिवाय महारष्ट्र, 'राज्य शासनाचे नेऊन ठेवले आहे', 'भुमिका महाराष्ट्राने पहिल्या आहेत', 'बॅक लाँग भरून काढला' (बॅकलॉग पाहिजे - अनुस्वार नको) या आणखी चुका टोचल्या.

सध्याच्या वृत्तमाध्यमांवर परखड भाष्य करणारा एक चांगला लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/7129

" ‘दुरुस्ती आणि स्पष्टीकरण’ असं सदर कुठल्याही मराठी वर्तमानपत्रात नसतं. ‘खुलासा’ किंवा ‘दिलगिरी’ कधीतरी छापली जाते, तीही प्रकरण फारच अंगलट येण्याची शक्यता असेल तर. पण ती कशी, तर ज्याच्याबाबत ती व्यक्त केली जाते, त्याच्यावर उपकार केल्यासारखी. एखाद्या मराठी वर्तमानपत्राने आपल्या चुकीबद्दल मनमोकळेपणाने माफी मागितलीय, अशी उदाहरणं सहसा सापडत नाहीत, निदान अलीकडच्या काळात तरी. मराठी वर्तमानपत्रं आणि त्यात काम करणारे वार्ताहर, उपसंपादक, संपादक हे हल्ली तर ‘सर्वगुणसंपन्न परमेश्वर’ झालेले आहेत. त्यांच्याकडून सहसा चुकाच होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ‘खुलासा’ किंवा ‘दिलगिरी’ व्यक्त करण्याची वेळही येत नाही".

चांगला लेख.

साध्या, सरळ, सोप्या शब्दांत बरंच काही सांगता येतं >> हे विशेष आवडले.

अवांतर: प्रत्यक्ष या लेखातही किमान २ चुका दिसल्या. मायबोलीवर लिहिणारे श्री. शंतनू ओक यांनी, स्वतःच्या कष्टाने मराठी शुद्धलेखनचिकित्सा करणारे ओपन सोर्स टूल बनवले आहे. ते टूल, मीडियात लिहिणारे व्यावसायिक लोक का वापरत नाहीत? असा प्रश्न पडला.

व्यावसायिक लोकांचं जाऊ द्या. मायबोलीवरील किती वाचक वापरतात या सुविधा? माझ्या हिंदी स्पेलचेकच्या छोट्याशा कमेंटमुळे एक सदस्य इतके दुखावले गेले की त्यांनी मला इथे काही लिहिणेच मुश्किल करायचा प्रयत्न केला. दुसर्‍या एका सदस्याने लिब्रे ऑफिस "अजिबात आवडत नाही" असे सांगून विषयच संपवला. अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप आहे पण कदाचित सिक्युरिटी हे कारण असेल किंवा आधीच खूप अ‍ॅप असतील असे काही कारण असेल. आयफोनसाठी टेलिग्राम बॉट आहे असे म्हटले तर म्हणणार आम्ही व्हॉट्स अ‍ॅप वापरतो त्यात काही सोय नाही का?
काही सदस्यांना याच्या अचूकतेबद्दल शंका आहे. एका सदस्याने फक्त एक शब्द तपासून पाहिला "शटकोन". त्यात त्याला अपेक्षित "षटकोन" हा पर्याय न दिसल्यामुळे त्याने वापरणे थांबवले असावे.

कारणे खूप आहेत पण एका बाबतीत मात्र सर्वांचे एकमत आहे. ते कारण म्हणजे हा विषय तितकासा महत्त्वाचा नाही!

(अवांतरः अमेरिकेतील एका गुजराती व्यावसायिकाने एक वर्षासाठी स्पॉन्सरशिप देण्याची तयारी दर्शवली होती. (दहा हजार रुपये प्रति महिना) अट एकच. मराठी आणि हिंदी स्पेलचेकसाठी काम करता येणार नाही. फक्त गुजराती स्पेलचेकवर काम करायचे. मी त्याला नकार दिला. पण गुजराती स्पेलचेक लिब्रे ऑफिससाठी बनविलाच.)

अँड्रॉईस अ‍ॅपबद्दल माहिती नव्हती, किंवा कदाचित नजरेतून निसटून गेले असेल. वरच्या दुव्यांबद्दल धन्यवाद. अँड्रॉईस अ‍ॅप आता मी इन्स्टॉल केले आहे.

इच्छा आणि वेळ असल्यास आपण हातभार लावू शकतो. खालील ढकलपत्र पहावे.

<<<
भारत सरकारने 'भाषिणी' नावाचा प्रकल्प सुरु केला आहे. त्यात 'भाषादान' नावाचा एआय मॉडेलला ट्रेन करायचा उपक्रम आहे. यात चार प्रकारे आपण आपल्या भाषेसाठी दान करु शकतो - 'सुनो इंडीया', 'बोलो इंडीया', 'लिखो इंडीया', 'देखो इंडीया'. एआय जनरेटेड ट्रांसलेशन बरोबर आहे की नाही ते चेक करायचं काम आहे.

फावल्या वेळात आवड असेल तर मराठी (किंवा इतर भारतीय भाषा येत असल्यास) भाषादानाचं काम स्वयंसेवक म्हणून करु शकता.

https://bhashini.gov.in/bhashadaan/en/suno-india
>>>

“द्ध” या अक्षराबाबतची अनास्था अनेक वर्षांपासून कायम आहे. आता तर अशी रुपे त्याचे अपभ्रंश म्हणून स्वीकारावी लागतील असे दिसते :

ashuddh lekhn.jpg

मराठी लेखनात “खूप साऱ्या” गोष्टी आठवतात असे लिहितात अनेकजण. हिंदीत “बहुत सारी बातें” चे भ्रष्ट रूप असावे. अन्यथा “साऱ्या” चा अर्थ लागत नाही.

>> मराठी लेखनात “खूप साऱ्या” गोष्टी आठवतात असे लिहितात अनेकजण. हिंदीत “बहुत सारी बातें” चे भ्रष्ट रूप असावे. अन्यथा “साऱ्या” चा अर्थ लागत नाही.>> हो, आता हे असं लिहिणं मराठीच समजायला हवं. लोकं सर्रास लिहितात.

Pages