"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा . खुपश्या गोष्टी रिलेट झाल्या.

शाळेत जेव्हा पहिल्यादा ज्वालामुखी बद्दल शिकवलेले तेव्हा खूप घाबरलेले मी. गॅलरी तुन समोर ठाण्याचा डोंगर दिसायचा. मी गॅलरीत येऊन बसले आणि खूप रडलेले कि या डोंगरातून ज्वालारस बाहेर आला तर काय करायचे. सगळ्यांनी कुठे आणि कसे पळायचे . खूप दिवस मनात हि भीती होती. मग सगळ्यांनी प्रत्येक डोंगरात ज्वालामुखी नसतो हे सांगून सांगून भीती कमी झाली.

आमच्या शेजारचे दादा (आजोबा) वारले तेव्हा आधी काही कळले नाही . ते माझे खूप लाड करायचे . सगळे रडत होते आणि कुठे तरी हे समजलेले कि ते परत येणार नाहीत आणि काहीतरी वाईट घडले आहे. त्यादिवशी मी घरी तपस्या करायला मांडी घालून बसले आणि जो पर्यंत बाप्पा त्यांना परत पाठवणार नाही तोपर्यंत उठणार नाही हे डिक्लेअर केले. तप केले कि देव प्रसन्न होऊन वर देतो आणि आपली इच्छा पूर्ण करतो असे वाटायचे.

मुलं होण्याबद्दल, लग्न लागताना सात फेरे घेतलेकी च मूल होतात असे वाटायचे

धमाल किस्से!
पाल मेली तर सोन्याची पाल करून काशीला द्यावी लागते.

ललिता सेम पिंच
इंग्लंड = इनलँड लेटर साठी

अतुल , मला नाव आठवत नव्हते.

कोपुत महाद्वार रोड आहे.त्या रस्त्याने गेलो तर अंबाबाई मंदिराचा मुख्य दरवाजा म्हणून ते नाव.
ते मला महादबा रोड असेच वाटायचे.

ओम्नी च्या आधी मॅटाडोर गाड्या जास्त बदनाम

तप करण्यावरून आठवलं. मला अगदी लहानपणी असं वाटायचं की तप करताना श्वास रोखून ठेवायचा असतो Lol म्हणजे ऋषी बारा-बारा वर्षं श्वास रोखून ठेवतात.

आम्ही लहानपणी खेळत असताना एकजण ऋषी झाला होता. त्याला सांगितले होते "तुला याला शाप द्यायचा आहे". पण त्याला बहुतेक शाप कसा देतात माहित नव्हते. गरीब गायीसारखा पोरगा होता. शाप कसा देतात विचारण्याचे त्याच्याकडून झाले नाही. जेंव्हा शाप द्यायची वेळ आली तेंव्हा हा नुसताच गप्प. ध्यान करताना मिटलेले डोळे फक्त उघडले आणि बघत राहिला. मग त्याला आमच्यापैकी कुणी ओरडून हिंट दिली "शाप दे कि रे...".
एखाद्या कामाचे खूप प्रेशर आले आणि काम कसे करायचे ते माहित नसेल तर हातून अंदाजाने काय वाटेल ती निरर्थक कृती होते. तसे त्याचे झाले असावे. त्याने डावा हात वर केला आणि "शाप शाप शाप शाप शाप...." करून जोरात ओरडला Lol Lol हसून हसून पडलो आम्ही सगळे. बिचारा! त्याला नंतर अनेक दिवस आम्ही "शाप शाप शाप शाप" म्हणून चिडवायची.

पुण्याला इंजिनिअरिंग केलेल्यांना एस.एस.कुलकर्णी (एसएसके) हे गणिताचे क्लासेस घेणारे सर माहिती असतील. त्यांच्या सकाळच्या batch मधून कधीकधी मुलं लवकर उठून जायची (कॉलेजची वेळ झाली म्हणून) तेव्हा ते हात वर करून 'शाप' असं म्हणायचे ..गंमत! नंतर नंतर असं कुणी जायला निघालं की बाकीची मुलंच 'शाप..शाप' असं म्हणायला लागायची Lol

काय भारीभारी आठवतंय तुम्हाला.
मला २च गोष्टी आठवतात.
एक म्हणजे रेडिओवर गाणी लागायची तेव्हा वेगवेगळी स्टेशन ही वेगवेगळ्या भागात, गावात असतात हे माहिती होते. पण दुसरीतिसरीत रेकॉर्डिंग प्रकार माहिती नव्हता. तेव्हा सगळे गायक दिवसभर प्रत्येक स्टेशनवर जाऊन जाऊन गाणी म्हणतात वाटायचे. ' कसे वेळेवर पोचत असतील, त्यांची किती धावपळ होत असेल' असेही वाटायचे.

दुसरे म्हणजे आपल्याला सर्वांनाच 'जे ताटात वाढले जाते ते खावे' अशी शिकवण. एकदा एका मोठ्या घरी मी आजीचा निरोप घेऊन गेले होते, बडी असामी होती कोणीतरी बहुतेक कारण प्रशस्त बंगला होता. तेव्हा घरच्या स्त्रीने मला फराळाचे ताट दिले. आता त्यांच्या सवयीनुसार तिने बहुतेक ६ लोकांना पुरेल इतका ऐवज एकाच ताटात घातलेला व मला दिला. मला काय माहिती की हवे तेवढेच खायचे व उरलेले ताटात सोडायचे. वय १०. त्यांनी तरी सांगावे न? पण नाही सांगितले. त्यामुळे मी ताटातले ६ लाडु, ६ करंज्या, ६-७ चकल्या, शंकरपाळ्या, चिवडा... सग्गळं सगळं संपवायच्या मागे लागले. स्वभाव संकोची त्यामुळे हे खूप आहे, जात नाही, त्रास होतोय खाऊन हे काही सांगता येईना. अरे देवा!! हालत खराब झाली. तरी ५० टक्के संपवले कसेबसे. मग जाता जाईना. एकेक घास पाण्याबरोबर जाऊ लागला. तरी ती स्त्री समोर असुन काही बोलेना. मग केव्हातरी तिला जाणवले असावे तेव्हा म्हणाली, राहु दे जात नसेल तर. ताबडतोप उठुन हात धुवुन घरी पळाले. काही वर्षांनी दिलेले सगळे खायचेच असे नसते हे कळलं. Happy

त्यामुळे मी ताटातले ६ लाडु, ६ करंज्या, ६-७ चकल्या, शंकरपाळ्या, चिवडा... सग्गळं सगळं संपवायच्या मागे लागले.<<<< Lol Lol Lol

सुनिधी Lol

असाच प्रसंग माझ्यासोबत झाला होता. काकाचे घर बंद होते म्हणुन त्यांना देण्याची पिशवी शेजारच्या घरी ठेवायला गेलो असता त्या काकूंनी खाण्याचा आग्रह केला. मी नकार दिला तर त्यांनी चहा केला. आणि सोबत एका प्लेट मध्ये एवढी बिस्किटे! मी एवढी नको म्हटले तर हवी तेवढी घे म्हणुन त्यांनी प्लेट माझ्या समोर ठेवली. आणि वाढलेले सगळे संपवायचेच या शिकवणी मुळे चहा संपला तरी बिस्कीट बळजबरीने खात बसलो. फारच विचित्र वाटत होते. काकूंच्या लक्ष्यात आल्यावर त्या नको असतील तर राहु दे म्हणाल्या तेव्हा थांबलो.

तेव्हा ते जुनं वर्षं घरासमोरून असं म्हातार्‍या माणसासारखं काठी टेकत चालत चालत निघून गेलं असं काहीसं वाटलेलं आणि खिडकीतून ते वर्षं जाताना आपण का पाहिलं नाही याची खंत वाटलेली. <<<< ekdam cute Happy

अग्निशामक गाडीला कितीही वेगात जायला परवानगी आहे. जाताना तीन माणसे धडकून मेली तरी ड्रायवरला ते माफ असते.
आम्ही सात माणसे मारली तरी माफ असे ऐकले होते.

सर्वांचेच किस्से मजेदार. अतूल यांनी लिहीलेले बरेचसे माझ्या बाबतीत व्हायचे. माझा आराम-हरामचा समज लोकांना इतका आवडेल असे वाटले नव्हते. चाचा नेहरूंनी आपण लहान असल्यापासूनच बर्‍याचश्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्यात हे मात्र खरे (राजकीय पोस्ट समजू नका).

माझे अजून काही समज व प्रश्न सुद्दा...

लहानपणी रंगीत टिव्ही घरी होता व बरेचसे हिंदी, मराठी जुने चित्रपट B&W असायचे. त्यामुळे त्या काळात रंग अस्तित्वातच नसावेत असे वाटायचे. कधी आजी आजोबा किंवा आई-बाबांनी त्यांच्या लहानपणीचे काही-बाही सांगितले तर ते इमॅजिन पण B&W मध्येच व्हायचे.

एक प्रश्न लहानपणी फार छळायचा. आपला ग्रह पृथ्वी व इतर ग्रह आणि चंद्र यांना आपापले आकर्षण म्हणजे गुरूत्वाकर्षण असते. म्हणजे जवळच्या वस्तू आपल्याकडे ते खेचतात. मग असे असेल तर पृथ्वी व चंद्र एकमेकांवर आपटत का नाहीत? जसे लोहचुंबक एकमेकांना चिकटते तसे? (लोहचुंबकाला आम्ही लहानपणी लवचुंबक म्हणायचो). या प्रश्नाचे अजूनही पुर्ण उत्तर मिळालेले नाही किंवा कारण ते शोधण्याचा फार प्रयत्न केला नाही.

अजून एक लहानपणीचा समज (म्हणजे असा समज करून देण्यात आला होता) की मासिकधर्माच्या काळात बायकांना कावळा शिवतो म्हणून त्या चार दिवस बाजूला बसतात. कधी कोकणात गेलो की तिथल्या कडक वातावरणामुळे कोणी ना कोणी घरातली बाई बाजूला बसलेली असायची. तिला कावळा शिवला असे सांगितले जायचे. त्यामुळे एकदा आम्ही मुले कुठे तरी खेळायला गेलो होतो व आमच्यातल्या एकाला खरोखर कावळा पाय लावून गेला. व त्याला आम्ही नंतर शिवलो म्हणून आम्ही दोघे-तीघे घरी येऊन आम्हाला कावळा शिवला असे सांगत बाजूला बसण्याची तयारी करत होतो. आख्खे घर खुदूखुदू हसत होते. आजोबांच्या चेहर्‍यावरही मिश्किल हास्य दिसत होते. आम्ही सर्व आता चार दिवस बाजूला बसणारच असा हट्ट धरून बसलो होतो. मुलांना एक-दोन तास बसले तर चालते असे काहीतरी मोठ्यांनी आम्हाला समजावले होते. आम्ही ही तो एक तास बसल्यावर कंटाळलो होतो व यातून कसे बाहेर पडावे याचा विचार करत होतो. त्याच वेळी हे कुणीतरी सांगितल्याने लगेच आम्ही मान्य करून परत घरात वावर सुरू केला होता. ह्या धाग्यानिमित्त हे आठवले.

“ कधी आजी आजोबा किंवा आई-बाबांनी त्यांच्या लहानपणीचे काही-बाही सांगितले तर ते इमॅजिन पण B&W मध्येच व्हायचे” - हे माझं अजूनही होतं. Happy

या ब्लॅकअँडव्हाईटवरून आठवलं ..... तेव्हा टिव्ही नवे नवे भारतात आले होते. अर्थात कृष्णधवल होते. त्यानंतर कदाचित ३-४ वर्षांनी (तोवर कृष्णधवल टिव्ही बर्‍यापैकी रुळले होते) एकदा आमच्या ओळखीतल्या एकांकडे रंगीत टिव्ही आल्याची जोरदार बातमी आली. 'अगा नवलचि घडले!' टाईप वातावरण निर्माण झाले. आम्हीही बघायला उत्सुकतेनं गेलो. तर नेहमीच्या कृष्णधवल टिव्ही स्क्रीनवर अजून एक स्क्रीन फिट केला होता. तो स्क्रीन रंगीत होता. म्हणजे काय तर त्यावर रंगीबेरंगी उभे पट्टे होते - निळा, गुलाबी, पिवळा, हिरवा वगैरे. म्हणजे माणसं अर्धी निळी तर अर्धी गुलाबी अशी गंमत होती. आम्ही तो बघून निराश झालो होतो. हे जे काय आहे ते थिएटरमध्ये दिसणार्‍या रंगीत सिनेमासारखं नाही हे लक्षात आलं होतं.

धन्य त्या हौशी लोकांची ज्यांनी असा स्क्रीन लावून घेतला आणि तसेच नेटानं टिव्ही बघत राहिले. डोळ्याला शिक्षाच होती ती खरंतर.

हे जरा अवांतर झालंय खरंतर. 'मोठ्या लोकांच्या निरागस समजुती' या खात्यात घालते.

त्याने डावा हात वर केला आणि "शाप शाप शाप शाप शाप...." करून जोरात ओरडला >>>इमॅजिन करून हसायला आले Happy
आमच्या बिल्डिंग च्या दुसऱ्या विंग मध्ये ख्रिश्चन फॅमिली होती . ते ख्रिस्तमस खूप छान साजरा करायचे. सांताक्लोस रात्री १२ वाजता येतो आणि त्याला बघण्यासाठी मी दरवर्षी रात्री बारा पर्यंत जागे रहायचे . पण तो कधीच दिसला नाही. स्लेज मध्ये बसून शुभ्र दाढीवाला सांता काहीतरी गिफ्ट देईल म्हणून वाट बघायचे . स्वतःच काही गिफ्ट आणून त्याने दिले म्हणून सांगायचे आई बाबाना सुचलंच नाही कधी ( जसे आता मी लेकीसाठी करते Happy

*प्रमुख पाहुणे आणि नारळ वाढवणे*

शाळेत कोणत्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आले तर त्यांच्या हस्ते नारळ वाढवला जाई. एका झटक्यात नारळ वाढवता येणे हे प्रमुख पाहुणे होण्यासाठी आवश्यक असणारा निकष आहे असे वाटायचे. शाळेत असताना घरी नारळ वाढवायचो तेंव्हा मला तो अनेक वेळा आपटावा लागत असे. पण कधीच कोणत्या कार्यक्रमात पाहुण्यांनी नारळ वाढवण्यासाठी तो दोन-तीन वेळा आपटल्याचे आठवत नाही Lol आपण मोठे झाल्यावर कुठे कुणी कार्यक्रमाला बोलवले तर हे स्कील अवगत असणे महत्वाचे आहे असे वाटत असे.

अग्निशामक गाडीला कितीही वेगात जायला परवानगी आहे. जाताना तीन माणसे धडकून मेली तरी ड्रायवरला ते माफ असते.
आम्ही सात माणसे मारली तरी माफ असे ऐकले होते. >> सात आकडाच ऐकलंय पण गाडी वेगळी , अंबुलन्स ला ऐकलं होतं.

लहानपणी पहिल्यांदा पृथ्वीचा ग्लोब पाहिल्यानंतर खालच्या बाजूला जे देश आहेत ती लोक पृथ्वीवरून खाली कशी पडत नाहीत याचं मला भयंकर आश्चर्य वाटलं होत...नंतर आईनी गुरुत्वाकर्षण वगैरे समजावून सांगितलं....

नारळ फोडणे हा सोपा वाकप्रचार सोडून नारळ वाढवणे हा भलताच अर्थ सुचवणारा वाकप्रचार वापरात आणण्यामागे काय कारण असेल ?

"फोडणे", "सांडणे","फुटणे" , "नासणे"," विझणे" अशी क्रियापदे अशुभ मानली गेलेली असल्याने ती शुभ कार्याच्या संदर्भात वापरत नसत.

नारळ वाढवणे , कुंकु वाढलं. ( सांडलं च्या ऐवजी). नारळ पावला ( नासला), निरांजन शांत झाला ( विझला च्या ऐवजी)..

पहिलीला मनपाच्या शाळेत असताना एक मारकुटे बाई होत्या (त्यांचे खरे नाव माहिती नाही). उशिरा आलेल्यांच्या केस धरून डोक्याची धडक करायच्या त्या. डोकंच फोडीन म्हणत. आता हे वाचून त्या डोकं वाढवीन असं म्हणाल्या असत्या.
सातवीला इनामदार सर होते. ते डोक्याला नारळ म्हणायचे. बोट वाकडं करून त्याच्या मागाच्या बाजूने टकटक करून नुसतंच पाणी आहे कि खोब्रं पण असं विचारत. पाणी असेल तर नारळ फोडायचा का ? त्यांना तर वाढवणे म्हणताच आले असते.
सातवीला मराठीच्या पुस्तकात धड्याचे नाव त्या खाली लेखकाचे नाव आणि बाजूला लेखकाचा फोटो दिलेला असायचा.
कुठल्या तरी एका महान लेखकाच्या निबंधातून उतारा घेतलेला होता त्याचं नाव बाळ! या नारळाला धक्का लावू नकोस बरे! असे होते.
पुस्तकाच्या डाव्या पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात अर्ध्या भागात उतार्‍याचे नाव दिलेले असायचे.
मुलं ते नाव ठेवून काही पानं मागच्या मागे दुमडत. त्यामुळे त्या खालच्या पानाखाली असलेल्या चिं विं जोशींच्या धड्याचे नाव झाकले जाऊन फक्त त्यांचा फोटो दिसत असे...

अर्ध्या भागात चिं वि जोशी आणि अर्ध्या भागात " बाळ हा नारळ येथे कुणी ठेवला बरे ?" हे शीर्षक दिसायचे.

Submitted by vijaykulkarni on 5 December, 2022 - 18:45 >>> धन्यवाद.

Pages