"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लहान असताना एकदा आईने मला सहजच प्रश्न विचारला, " तू मोठेपणी कोण होणार? " तर मी तिला उत्तर दिले की, "मी मोठेपणी आई होणार.." आई तेव्हा खूप हसली होती पण ती का हसतेय ते समजलंच नव्हतं...आता आई हा किस्सा पुन्हा सांगते तेव्हा मलाच हसू येतं Lol

बसमध्ये लिहीलेले असे की - यहां सिगारेट पिना मना है|
मला हे कळत नसे की वाक्य होकारार्थी कसे? नकारार्थी कसे नाही म्हणजे 'नाही' असा शब्द हवा असे काहीसे वाटे.

कोणीतरी सांगीतलेले की अमक्या अमक्या आरशात आपण उलटे दिसतो. मला वाटे म्हणजे वर पाय-खाली डोके - असे असेल.

लहानपणी (५ वीत) इंग्रजीच्या पेपरात वाक्य होते निगेट करा - शी इज फॅट.
मी लिहीलेले शी इज नॉट थिन.
मग पेपर कसा गेला डिस्कस करताना ऐकले की सर्वांनी लिहीलय शी इज नॉट फॅट.

चवथी 'अ' मध्ये, माझ्या २ मैत्रिणी (देसाई व पटवर्धन) नावे आठवता. उत्साहाने संपूर्ण पुस्तकाला अंडरलाईन (अधोरेखित) करत होत्या का तर परीक्षेत महत्वाचे कळावे म्हणुन. मला त्या वयातही हे कळत होते की सर्व अंडरलाइन केले तर महत्वाचे कळणार कसे? मोजकेच केले पाहीजे. मला काही पटवुन देता आले नाही व मी त्यांच्यासारखे करत नाही म्हणुन त्यांनी कट्टी केली.

लहान असताना, मी व हेमांगी (नाव आठवते) कैर्‍या पाडत होतो. आम्ही बोदले. ती चपळ. ओचाभरुन कैर्‍या ती घेउन गेली. मी हात हलवत परत.

५वी त पोमण नावाची खूप गरीब स्वभावाची मैत्रिण होती. तिची आई काय सुरेख आख्ख्या मसूरीची ऊसळ बनवायची. अरे बाप रे! घमघमाट. नंतर मी तिला फेसबुकवर खूप शोधले पण मला ती दिसली नाही.

३री त पवार म्हणुन एकदम मानी स्वभावाची मैत्रिण होती. तिचं अक्षरही सरळ म्हणजे सरळ. अजिबात गोलाई नाही. माझं आताचं अक्षर म्हणजे एकमेकांच्या पायात पायात गोळे गोळे आहे. मला वाटतं अक्षरावरुन स्वभाव कळतो.

ठोंबरेने मला सांगीतलेले त्यांच्याकडे पोपट आहे व तो चट्ट्यापट्ट्याची पँट घालतो. मरणापूर्वी जर मी असा पोपट पाहीला नाही तर या जन्मी मला मोक्ष नाही Wink इतका पगडा आहे त्या कथेचा माझ्यावरती.

अवधानी ने सांगीतलेले मुंग्यांचे वारुळ अलगद फुंकरीने उडवले तर खाली मुंग्यांची अ‍ॅक्च्युअल वसाहत दिसते म्हणजे बिल्डिंग्ज , बसेस सकट. Happy अजुनही वारुळ पाहीले की आधी बसेस व बिल्डिंग्जच दिसायला लागतात Happy

छान धागा छान किस्से

सामो तुमचे व्हरायटी ऑफ किस्से ईंटरेस्टींग आहेत..

अमक्या अमक्या आरशात आपण उलटे दिसतो. मला वाटे म्हणजे वर पाय-खाली डोके - असे असेल.,>>>>
यावरून आठवले... भुताचे पाय उलटे असतात म्हणजे मला वाटायचे की डाव्या पायाला उजवे पाऊल आणि उजव्याला डावे. तर माझी मैत्रीण म्हणायची की.. छे छे उलटे म्हणजे तळवे वर ...

आईचा वाढदिवस ७ जुलै. आज्जीचा ८ जुलै.
आजीने माझी हुषारी पहायला विचारलेले की असे असताना आज्जी आईपेक्षा मोठी कशी पण मी इतकी लहान होते की अर्थात ७ < ८ आहे की मग ती असे का विचारते, असा काहीसा विचार आला होता.
म्हणजे मायनस मायनस = प्लस त्याप्रमाणे मला ते कसे का होइना पटत होते.

पेप्सिकोला ... म्हणजे पॉपसिकल्स... गटाराच्या पाण्याने बनवतात.
यावर माझा आत्ताआत्ता पर्यंत विश्वास होता. पोरांना आणताना पहिल्यांदा तेच मनात आलेलं. Lol

>>>>>>>छे छे उलटे म्हणजे तळवे वर ...
नाही हो!!! माझ्या तर मते टाच पुढे व चवडा मागे. Happy माझ्या मनात हेच पक्के चित्र आहे

बाकी एका बुद्धिस्ट पुस्तकानुसार डोके मोठे व नरडे प्रचंड चिंचोळे अशी असतात भूते. त्यामुळे त्यांची तहान भूक ना भागते ना कधी समाधान मिळत. सदा वखवखलेली अशी ती रील्म आहे. म्हणजे असे प्रतल आहे ते.

भन्नाट धागा आहे. सगळेच किस्से मस्त आहेत

आराम-हराम Rofl

"रेडिओच्या आत माणसे" हे अगदी अगदी झाले वाचताना. त्या एवढ्या छोट्या बॉक्समध्ये माणसे कशी बसत असतील असे वाटायचे. खोललेला रेडिओ पाहुनही हे कुतूहल शमले नव्हते. पुढे जेंव्हा रेडिओ स्टेशन बाबत पहिल्यांदा ऐकले तेंव्हा ते कसे असेल याविषयी कल्पना मनात यायच्या. गावात रस्त्याकडेला एक छोटे बस स्थानक होते. एका सिमेंटने बांधलेल्या बाक-वजा-कट्ट्यावर माणसे एसटीची वाट पहात बसायची. रेडिओ स्टेशन म्हणजे सुद्धा असेच काहीसे स्टेशन असेल, आणि हि निवेदक मंडळी तिथे एकाशेजारी एक अशी बाकावर बसून राहत असतील असे वाटत असे. "रेडिओवर गाणे सुरु असते त्या वेळात मागे निवेदक काय करत असतील?" असे प्रश्न मनात येत.

पुढे टीव्ही बाबत ऐकले तेंव्हा रेडिओवरचेच कार्यक्रम तिथे असतील असे वाटे. हेच निवेदक तिथे दिसत असतील अशी समजूत होती. एकदा 'विज्ञानयुग' मासिकात 'टीव्हीचे चित्र ठिपक्यांनी बनलेले असते' अशी माहिती वाचली. तेंव्हा टीव्ही बघणे फार चांगला अनुभव नसेल असे वाटले होते. ठिपक्या ठिपक्यांनी बनलेली रांगोळी असते तसे काहीसे असेल असे वाटे. पण एकदा मुंबईला जायचा योग आला तेंव्हा ज्यांच्याकडे गेलो तिथे आयुष्यात पहिल्यांदा टीव्ही चे दर्शन झाले. कृष्णधवल टीव्ही वर आमची माती आमची माणसे सुरु होते. त्यात दिसलेली माणसे, शेतं, वांगी बटाटे भाज्या यांचे हुबेहूब क्लोजअप आ वासून पहातच राहिलो. टीव्ही बाबतच्या कल्पनांचा पार धुव्वा उडाला होता.

या काही माझ्या लहानपणीच्या समजुती...

फोटो
एकदा माझे मामा आम्हा भाचे मंडळीना घेऊन फिरायला गेले. तिथे बरेच फोटो काढले. पण मामा ते फोटो दाखवत का नाही असे वाटून मी मामाच्या मागे लागलो. तर 'अरे ते डेव्हलप करायला लागतात' असे त्रोटक उत्तर मामानी दिले. 'डेवलप करा कि नंतर, आधी दाखव ना आम्हाला' अशी माझी चिडचिड झाली होती.

आभारी आहोत
'आभारी आहोत' ही पाटी पहिल्यांदा आजोळी एका चपलांच्या दुकानात वाचली होती. त्यामुळे 'आभारी' म्हणजे चर्मकार अशी मनाची समजूत झाली. कारण बरोबरच आहे, ती पाटी दुसऱ्या कोणत्याच दुकानात दिसली नव्हती. पुढे मात्र एक दिवस आईसोबत एकदा दवाखान्यात गेलो तेंव्हा तिथेही 'आभारी आहोत' लिहिलेले दिसले. मला कळेना. म्हणून न राहवून सगळ्या पेशंट्स समोर आईला विचारले, 'माई, डॉक्टर चपला सुद्धा बनवून देतात का?' मग तिने समजावून सांगितले.

नवरा-नवरी
लहानपणी कोणत्याही लग्नात गेलो कि मुंडावळ्या बांधलेले नवरा-नवरी दिसायचे. हल्ली बांधतात तितक्या नाजूक मुंडावळ्या तेंव्हा नसायच्या. जाडजूड व चेहरा पूर्ण झाकला जाई अशा तगड्या मुंडावळ्या असंत. चेहराच दिसत नसे. त्यामुळे लग्न कोणतेही असो नवरा-नवरी तेच असतात अशी समजूत झाली होती. म्हणजे जसे वाजंत्रीवाले, वाढपी, लाउडस्पीकर वाले, अक्षता गाणारे इत्यादी असतात तसेच नवरा-नवरीचे काम करणारे सुद्धा असतात असे वाटे. लग्न म्हणजे हे सगळे येऊन धिंगाणा घालून जातात अशी समजूत होती. त्यामुळे लग्नाला जाऊन आलं कि 'नवरा नवरी बघितलास का?' असे कुणी विचारल्यावर त्यांनाच का बघायचे? त्यांना इतके का महत्व हे कळत नसे.

गाव आणि घर
आजोळी जायचे म्हणजे अर्थातच त्या गावाच्या नावाने आजोळचा उल्लेख व्हायचा. आणि आजोळहून घरी परत येताना आमच्या गावच्या नावाचा. त्यामुळे गावांची नावे ही "त्या त्या घरांची नावे आहेत" अशी समजूत झाली होती. एकदा आजोळी गेल्यावर शेजारच्या दुकानात गेलो. त्यांनी प्रेमाने विचारले "अरे कधी आलास? आजोबा कुठे आहेत?" मी त्याच गावाचे नाव घेतले. कारण बरोबरच आहे, आजोबा घरी होते Lol तेंव्हा ते जोरजोरात हसत म्हणाले अरे ते तर हेच गाव आहे. मला मात्र काहीही कळले नव्हते Lol

कोळसा, तांदूळ, गहू इत्यादी
हि मोठी माणसे बोलताना "कोळसा मिळत नाही", "तांदूळ महागलाय", "यंदा खराब गहू बाजारात आलाय" असे गंभीरपणे बोलंत तेंव्हा काहीही कळायचे नाही. एका कोळश्याबाबत, एका तांदळाबाबत, एका गव्हाबाबत इतके काय बोलतात असे वाटायचे. बरोबरच तर होते. नीट बोलायचे ना त्यांनी. तांदूळ महागलेत, कोळसे मिळत नाहीत इत्यादी Lol

विनोद
मोठ्या माणसांचे विनोद सुद्धा निरर्थक वाटत. मोठी माणसे कुणाचेतरी नाव घेऊन किंवा एखादा साधाच नेहमीचा शब्द बोलून उगीचच ह ह ह ह करून मोठ्याने हसत. त्यात हसण्यासारखे काय? असे वाटे. त्यापेक्षा आपल्या लहान मुलांचे विनोद किती भारी, असे विचार मनात येत.

महाराष्ट्र
या नावाची फोड, महा-राष्ट्र. राष्ट्र म्हणजे देश. म्हणजे "मोठा देश". पण मग जर तसे असेल तर भारत या देशात हा अजून एक देश? हे कसे काय? आणि पुढे त्याला राज्य सुद्धा म्हणतात. "महाराष्ट्र राज्य" म्हणजे नक्की काय? देश कि राज्य? असा प्रचंड गोंधळ व्हायचा Lol

काही कॉमन समजुती किंवा ऐकीव मिथके:
१. आकाशात ढगांच्या पलीकडे देव असतो
२. पृथ्वीच्या पलीकडे अमेरिका आहे. म्हणजे आपल्या घराच्या अंगणात जर आपण खड्डा खणत राहिलो तर थोड्या वेळात आपण अमेरिकेत (पाय वर करून) बाहेर पडू.
३. रेल्वेच्या रुळावर छोटे नाणे जरी ठेवले तरी रेल्वे रुळावरून घसरून प्रचंड मोठा अपघात होऊ शकतो
४. टाटा इतके श्रीमंत आहेत कि आपल्या देशावरचे कर्ज ते सहज फेडू शकतात. फक्त त्यांची एकच मागणी आहे कि देशाचे नाव "टाटा इंडिया" असे करावे.
५. अग्निशामक गाडीला कितीही वेगात जायला परवानगी आहे. जाताना तीन माणसे धडकून मेली तरी ड्रायवरला ते माफ असते.

पेप्सिकोला ... म्हणजे पॉपसिकल्स... गटाराच्या पाण्याने बनवतात.
यावर माझा आत्ताआत्ता पर्यंत विश्वास होता. पोरांना आणताना पहिल्यांदा तेच मनात आलेलं.>>> अगदी अगदी!

१)कुठल्याही फळाची बी गिळली की पोटात झाड उगवत यावर गाढ विश्वास होता एकदा चुकुन सिताफळाची बी गिळल्यावर भावाने निटच गिर्हाइक केल होत, इतक सिरियसली सान्गितल की मी रडुन गोन्धळ घातला होता. त्यानतर किती दिवस मी सिताफळ खाल्ल नव्हत.
२)खोट बोलल की जिभ काळी पडते आणी वाढत जाते मग काली मातेसारखी बाहेर येते अस एका ताइने सान्गितल होत.
३)कलर टिव्ही जवळ मॅग्नेट नेल तर तो ब्लॅक व्हाइट होतो असही सान्गितल होत.
४)अमेरीकेत लोक रोज आन्घोळ करत नाहीत तर त्यानी आन्घोलीची गोळी इन्व्हेन्ट केलिये असही साग्नितल होत, यावर विश्वास बसलाही होता...मोठ झाल्यावर त्या गोळिचा शोध आपल्यालाही लागला आहे हेही कळल.

हि मोठी माणसे बोलताना "कोळसा मिळत नाही", "तांदूळ महागलाय", "यंदा खराब गहू बाजारात आलाय" असे गंभीरपणे बोलंत तेंव्हा काहीही कळायचे नाही.>> हे माझं गप्पांच्या बाबतीत व्हायचं.. मला वाटायचं की ही मोठी माणसं ज्या गप्पा मारतात त्या ते शाळेत शिकून आले असावेत .. मग मला त्या कोणत्या स्टॅंडर्डमधे गेल्यावर शिकाव्या लागणार ह्याचा विचार करायचे Happy

अतुल Lol भारी लिस्ट आहे!

पेप्सिकोला ... म्हणजे पॉपसिकल्स... गटाराच्या पाण्याने बनवतात.
यावर माझा आत्ताआत्ता पर्यंत विश्वास होता >>> माझाही Proud

आम्हाला तर लहानपणी बॉबीमधे प्लॅस्टिक असतं असंही सांगितलं जायचं Sad
तसंच टिव्ही जवळून पाहिल्यावर चष्मा लागतो अशीही एक ठाम समजूत होती.

संध्याकाळच्या वेळी सुगंधी वास आला तर 'कृष्ण कृष्ण' म्हणावं असं आजीने सांगितलं होतं. लॉजिक असं की दुष्ट आत्मे वगैरे असा सुगंधी वास पसरवून भूल घालतात ते देवाचं नाव घेतल्याने पळून जातात. अजूनही कधीकधी नकळत माझ्याकडून तसं म्हटलं जातं Happy

माझ्या लहानपणी सरदारजी लोक लहान मुलांना पगडीत बांधून पळवून नेतात असा पक्का समज होता. त्यामुळे कॉलनीत सरदारजी दिसले की जिवाच्या आकांताने घरी पळत सुटायचे हे नक्की होते. तर एकदा असे पळतांना आमच्यातला एक मुलगा बांधकाम चालू असलेल्या एका बंगल्याच्या पाण्याच्या हौदात पडला. तिथे काम करणार्‍या मजुरांनी त्याला पटकन बाहेर काढले म्हणून वाचला.

लग्नाच्या अक्षता मंतरलेल्या असतात आणि त्या डोक्यावर पडल्यावर मुलींना बाळे होतात असा समज फिट्टं होता त्यामुळे 'शुभमंगल सावधान' म्हणायला लागले की स्टेजच्या ऊलट्या बाजुला पळायचे असा आम्हा मावस मामे बहिणींचा नेहमीचा पवित्रा होता. एकदा एका बहिणीच्या डोक्यात अडकलेल्या अक्षतेवरून तिला आता तुला बाळ होणार आणि मग तुला ते शाळेत घेऊन जावे लागणार वगैरे म्हणत तिने स्टेजवरच भोकाड पसरेपर्यंत पिच्छा पुरवला होता.

लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात नेहमी उल्लेख यायचा की अमूक-अमुक लोक देशासाठी लढले. हा "लढले" शब्द फार गोंधळून टाकायचा की, म्हणजे नक्की काय केलं. मग मी माझ्यापुरता अर्थ काढला की "लढले" म्हणजेच "रडले" असावे . ते रडले म्हणून स्वातंत्र्य मिळाल. जस घरी आपण रडलो कि पहिजे असेल ते मिळते. Happy

----
आमच्या गावाच्या बाहेर मोठ-मोठे डोंगर आहेत, आमचा ठाम विश्वास होता की डोंगरांच्या पलीकडे पृथ्वी संपते.

----
निवडणुकीत आपण ज्या चिन्हाला मत दिले, जर ते जिंकले तर आपणच जिंकलो असे वाटायचे. मग घरी येउन आईला विचारायचे तु का नाही अमूक-अमूक चिन्हाला मत दिलं.

----
सिनेमा पाहातांना असे वाटे की त्यात गाणी आणि डांस केल्यानंतर हिरोच्या अंगात ताकत येते आणि तो गुंडाना मारू शकतो. याचा कारण म्हणजे सहसा सिनेमात प्रथम हिरोईन सोबत रोमान्स, मग फायटींग सिक्वेण्स यायच्या.

छान धाग... Happy
अनेक मजेदार किस्से वाचायला मिळत आहेत.

शोले मधे गेलेला अमिताभ पुढे दुसर्‍या चित्रपटांत जिवंत कसा होतो ?

एकेक किस्से भारी.

लहानपणी एरियात एकच टीव्ही होता, तिथे छायागीत बघायला जायचो, तेव्हा मला वाटायचं सगळे हीरो हिरॉईन केवढे सुंदर गातात, एक ताई सांगायची अग ते फक्त तोंड हलवतात, गाणारे दुसरे असतात. माझा विश्वासच बसायचा नाही तेव्हा.

खूप छान किस्से येत आहेत.
बर्याच ठिकाणी वाचताना सेम पिंच म्हणालो.

अमिताभ बच्चन ह्यांची आम्हा लहान मुलांच्या मनात इतकी मोठी इमेज की बच्चन एखाद्या पिक्चर मध्ये मरतो असं कुणी सांगितलं तरी आम्ही त्याला वेड्यात काढायचो.

शोले मधे गेलेला अमिताभ पुढे दुसर्‍या चित्रपटांत जिवंत कसा होतो? >>> चित्रपट वा मालिकांमध्ये खोटं - खोटं मरतात असे मला माझ्या शेजारच्या दादा व ताईंमुळे माहीत होते. पण माझ्या वर्गातल्या एका मुलाला ते काही पटतच नव्हतं. आम्ही दुसरी-तिसरीत असतांना अलका कुबलच्या चित्रपटांची लाट आली होती. त्यापूर्वी ती माहेरची साडीमध्ये शेवटी मरते. त्यामुळे जर माहेरच्या साडीमध्ये अलका कुबल मेल्यानंतर तिला सरणावर जाळूनही ती जिवंत होत असेल, तर माझी आई का नाही असा भाबडा प्रश्न त्याला होता, कारण नुकतीच त्याचीही आई देवाघरी गेली होती. शेवटी आमच्या वर्गशिक्षिकांनी त्याला नीट समजावून सांगितले होते.

१. Ambassador गाडी ही अपहरण करण्यासाठीच असते असा लहानपणी समज होता (सौजन्य: हिंदी चित्रपट)
२. वेण्या बांधल्या नाहीत तर केसांची वाढ होत नाही
३. केसांना शाई लागली की केस पांढरे होतात.
४. बी ए अभ्यासक्रम फक्त सिनेमातच असतो ( ही समजूत घराच्यानी करून दिलेली :D)

भारी किस्से आहेत.
कम्पलसरी कॅम्पस डान्स, आराम-हराम, आभारी आहोत, प्रत्येक लग्नात तेच नवरा-नवरी - याला खूप हसले. Biggrin

-----

पूर्वी दूरदर्शनवर दोन कार्यक्रमांच्या मधला वेळ भरून काढायला 'समूहगीत' दाखवायचे. ५-७ बायका, ५-७ पुरूष एकसारख्या वेषातले, स्टुडिओत उभं राहून गायचे. पुढे वादक वगैरे बसलेले असायचे. (शतकानंतर आज पाहिली, पहिली रम्य पहाट - हे अगदी कॉमन गाणं असायचं.)
तर, मला ते गायक बाया-पुरूष म्हणजे लग्न झालेल्या नवरा-बायकोच्या जोड्या वाटायचे कायम Lol

१. Ambassador गाडी ही अपहरण करण्यासाठीच असते असा लहानपणी समज होता (सौजन्य: हिंदी चित्रपट)

नाही, तो मान मारुती ओमनी चा Happy

ओमनी फक्त अपहरण करणारेच वापरतात असा माझा समज होता, अजूनही पूर्णपणे गेलेला नाही Happy

पुढील कार्यक्रम

लहानपणी टिव्हीवर बालचित्रवाणी लागायच्या आधी 'पुढील कार्यक्रम' असं लिहिलेली एक पाटी यायची. त्यात ते 'पुढील' काय प्रकरण आहे ते माहीत नव्हतं. मला वाटायचं की तेच त्या कार्यक्रमाचं नाव आहे. मी एकदा माझ्या मित्राला म्हणालो देखील होतो, की 'मला पुढील कार्यक्रम बघायला खूप आवडतो'. त्यांच्या घरी अभ्यास करायला आलेला एक दादा चावटपणे हसल्याचं आठवतंय.

लहानपणी झुंज या चित्रपटात वस्तीला आग लावताना आगपेटी आणि काडी झूम करून दाखवलेली पडद्यावर पाहिली. तेव्हा घराला आग लावायला खास मोठीच्या मोठी आगपेटी बनवतात असे वाटले. अशी मोठ्ठी आग पेटी कुणाकडे दिसली तर लगेच पोलिसांना सांगितले पाहिजे असे मी शाळेतील सवंगड्यांना सांगितले होते.

Lol मस्त किस्से आहेत!
आमच्या गावाजवळ एका ठिकाणी एका आंब्याच्या बागेच्या बाहेरच्या गेटवर एक जाहिरात खूप दिवस लिहिलेली होती. जाहिरात म्हणजे हाताने रंगवलेला मजकूर होता फक्त. चित्रं वगैरे नाही. कसली जाहिरात काय ते आता आठवत नाही, पण त्यात 'त्रिभुवन' हा शब्द मोठा आणि ठळक अक्षरात होता. बहुतेक ते कुणाचं तरी नाव असावं. पण मला ते त्या जागेचं (बागेचं) नाव वाटायचं.
आम्ही शाळेत 'केशवा माधवा' हे गाणं प्रार्थना म्हणून कधीकधी म्हणायचो. त्यात 'त्रिभुवन सारे घेई जिंकून' अशी ओळ आहे. मला वाटायचं की कृष्ण ती बाग जिंकून घेतो. Lol

Pages