शाहरूख खान भारतीय महिलांना ईतका का आवडतो?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2022 - 13:45

हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.

आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.

त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.

https://www.bbc.com/marathi/india-59472935

या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !

-------------------------------------------------

आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.

आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.

आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.

मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.

माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्‍या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.

हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!

हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अ‍ॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.

का?

एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,

"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)

तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.

हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अ‍ॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्‍या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.

आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.

त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.

त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.

आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.

आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो Happy

-------------------------------

उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल Happy

-------------------------------

अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो

srk.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीबीसी ला इतकं सिरियसली नका घेऊ सर.
>>>>
वीरू, लेख आवडला. लिंक शेअर केली. यात बीबीसी या माध्यमाचा काय संबंध.
आपण मिपा वगैरे संकेतस्थळावरील कुठल्यातरी तिथल्याच एका सर्वसाधारण सदस्याने लिहिलेला लेख आवडला तर शेअर करतो ना. तसेच आहे हे. यात मिपाला सिरीअसली घेऊ नसे असे म्हणण्यात काय अर्थ आहे.

बाकी शाहरूख कित्येकांना आवडतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यासाठी कुठल्या सर्व्हेची गरज नाही Happy

मी स्वतः मन्नत बाहेर उभा राहिलो आहे - त्याने हात केला भूक मिटते... ती एक
वेगळीच
मजा आहे त्या गर्दीत उभे राहण्याची...
पुढचा गटग मन्नत बाहेरच करू आपण सगळे... कोण कोण तयार आहे?

त्याचा एक उत्तम चित्रपट स्वदेस मात्र अजून बघितला नाहीये, तो बघायचा आहे.
>>>>

अन्जू, जरूर बघा
त्याच्याच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा लगान चित्रपट होता. जो ऑस्करलाही गेला होता. बॉक्स ऑफिसलाही चालला होता. हवाही झाली होती. मलाही तो मनोरंजक वाटला होता. मी सुद्धा तो आवडीने पाहिला होता. पण एकदाच. त्यानंतर आजवर लगान पाहिला नाही.

स्वदेश बाबत मी साशंक होतो. चित्रपट स्लो असावा. नेहमीचा शाहरूखपट नाही. आपल्याला आवडेल का हा.
पण पाहिला आणि आवडला. चांगला होता म्हटले. अपेक्षा कमी असल्याने आवडला असावा असेही वाटले.
पण त्यानंतर मात्र कित्येकदा पाहिला आहे तो चित्रपट. एक वेगळेच समाधान, एक वेगळाच आनंद मिळतो तो चित्रपट बघताना.

स्वदेशवरून आठवले - शाहरूखचा ड्रेसिंग सेन्स कमाल कमाल कमाल आहे !

हा एक वेगळ्याच धाग्याचा, वेगळ्याच लेखाचा विषय आहे. राखून ठेवतो Happy

मी स्वतः मन्नत बाहेर उभा राहिलो आहे - त्याने हात केला भूक मिटते...
>>>>>>>>>>
अगदीच
मुळात हा प्रश्न का पडला हेच मला कळले नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लोकं जातात तिथे कोणी रांगेत वडापाव आणून देतात का?
उलट लोकंच देवाला भेटवस्तू देतात.
तर मग चाहते जे स्वतःच्या आनंदासाठी आलेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था शाहरूखने का करावी, मुळात त्यांनाही ते नकोच असेल. नाहीतर उद्या केवळ खायला मिळतेय म्हणून काही लोकं गर्दी वाढवतील Proud
तो काही राजकारणी नेता नाहीये. जे पैसे वाटून गर्दी गोळा करा. लोकं त्याच्या प्रेमापोटी येतात गर्दी करायला.

च्रप्स
आज रात्रि ३ वाजत पुन्हा् बोलू. अजून पर्यंत तरी कुणी बादशहाची आठवण केलेली नाही. "फॅॅन" तर दूरची गोष्ट.

अस्मिता , अगदी अगदी. शिवाय मला त्याच्याबद्दल ही एक गोष्ट आवडते की त्याने स्वतःच स्थान स्वतः कमावलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी त्याचे कोणी नातेवाईक त्याला घेऊन आले नाहीत या इंडस्ट्रीत.

काढा मग बादशाहचा वेगळा धागा
माझीही पारायणे झाली आहेत.
पुर्ण चित्रपटभर शाहरूख कॉमेडीच्या बेअरींगमध्ये आहे .. त्याचा एण्ड तर पुन्हा पुन्हा बघावा असा आहे. काय एक्स्प्रेशन्स आहेत एकेक शाहरूखचे.. क्षणाक्षणाला बदलणारे ... गायत्रीदेवी राखीशी तर डोळ्यांनी बोलतो तो

तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अ‍ॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
ना अजय सारखी त्याची जुबा केसरी होती
lol

पण आता जुबा केसरी आहे ना शाहरूखही. सध्या तो पठाणी कपड्यात छान दिसतो, रुबाबदार वाटतो.

येनीवेज, हे बघा मस्त आहे हे.. बघूनच मूड बनला .. ही जादू आहे शाहरूखची Happy त्याचा प्रेझेन्सच मनाला भावतो, आवडतो.

Dunki | Title Announcement | Shah Rukh Khan
https://www.youtube.com/watch?v=aNxd01VzJsw

शाहरुखचा एक दुबईमधला व्हिडिओ आहे युत्युब्वर. तो अचानक वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसमोर अनपेक्षितपणे आल्यावर माणसांची काय अवस्था होते, मुख्यत्वे बाईमाणसांची, ते फार छान टिपलं आहे. त्यात शेवटी तर एक बाई हाटेलात शाहरुख वेटरच्या रुपात आलेला बघून प्रचंड पाघळते आणि तिच्या नवरा आणि मुलांसमोर शाहरुखचा मुका घेते - तो भाग भन्नाट आहे. शाखाप्रेमी महिलांना नक्कीच आवडेल असा व्हिडिओ आहे हा. दोन गोष्टी मान्य करायलाच पाहिजेत: १. ह्या माणसाला स्टारडम कॅरी करणं उत्तम जमतं आणि २. त्याच्या मुलाखती बघताना त्याच्या उत्तम वाक्चातुर्याची जाणीव होते.

ता. क. धाग्याचा विषय भारतीय महिलांचा आहे आणि ह्या व्हिडिओत काही अभारतीय महिलाही आहेत. त्या अवांतराबद्दल क्षमस्व.

चाहते जे स्वतःच्या आनंदासाठी आलेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था शाहरूखने का करावी >> बरोबर
पण आता जुबा केसरी आहे ना शाहरूखही. सध्या तो पठाणी कपड्यात छान दिसतो, रुबाबदार वाटतो. >> चूक.

वॅाव हपा, काय मस्त विडिओ शेअर केलात.. अंगावर काटा आला.. मलाही कधी शाहरूखला भेटण्याचा योग आला तर असा अचानकच समोर येऊदेत.

हे आहे जे फॅन,चाहते असतात ही लोक मला तरी बिलकुल आवडत नाहीत
उगाचच कोणाच्या तरी घरा समोर गर्दी करायची.रात्र भर वेड्यासारखे तिथे उभे राहायचे..ह्या लोकांचा मला तरी खूप तिटकारा आहे .
ह्या फॅन लोकांची मानसिकता काही तरी विचित्र असते
माझ्या समोर जरी कोणी असा हिरो ,हेरॉईन आली तरी माझा रिस्पॉन्स काहीच नसेल.
जशी बाकी लोक तसाच तो व्यक्ती.

भारी व्हिडिओ.
मरून -५ च्या 'शुगर' गाण्याची आठवण झाली. शुगर बघताना जसं दरवेळी तोंडभरून हसू येतं अगदी तसच तोंड भरून हसू आलं. मस्त केलाय.

मस्त आहे तो व्हिडिओ.

अचानक कुणी सेलिब्रिटी समोर दिसतेय हे अनुभवले आहे.
हैद्राबादला जुन्या विमानतळावर जेट एअरवेज लोंज मध्ये, तर कधी बोर्डिंग वेळी त्यांना एस्कॉर्ट करून घेऊन जाताना आणि बिजिनेस क्लासला अपग्रेड मिळाले असताना क्वचित तिथे.
अशा वेळेस पहिली रिऍक्शन म्हणजे अरे हे कोणीतरी चांगल्याच ओळखीचे समोर आलेय पण पटकन कोण आठवत नाहीये असं होतं काही क्षण मग एकदम डोक्यात फ्लड लाईट पेटतो. दिलीपकुमार सायराबानो, आमिताभ, यांना फारच जवळुन चार पाच फुटावरून अचानक पाहिले, अमिताभशी हस्तालोंदन करता आले अर्धा सेकंदाचे. मी लँड होऊन बस मधून उतरून टर्मिनल मध्ये शिरलो तेवढ्यात अमिताभ आजूबाजुला दोघांसह बोर्डिंगला निघाला होता.
माझ्या मागे तीन चार लोक होते, काहीच गर्दी नव्हती.

दिलीपकुमार आणि सायराबानो बोर्डिंग गेट समोर दिसले पण तिथे जर गर्दी होती, ते सगळ्यांना हात दाखवत/नमस्कार करत होते. एक रो सोडून पुढच्या सीटला एकदा करीना होती, एकदा नागार्जुन आणि आमला.
इतर सेलब्रिटिजना अगदी एवढया जवळून नाही पाहिले, १५-२० फुटांवरून असेल

लॉंज मधली गंमत म्हणजे बाजूने अगदी परिचयाचा आवाज येतोय म्हणुन पाहिले तर एखादा सीनेनट.
एकदा अचानक मागून आवाज "एक्स्क्युज मी, मेरा ये जॅकेट ले लू" बघतो तर परेश रावळ उभा, त्याच्या जॅकेट ठेवलेल्या सोफ्याला माझा सोफा भिडलाय, लगेच तो पूढे ओढून त्याच्याशी काही बोलावे म्हणेस्तो तो अदबीने थँक यु म्हणुन जॅकेट घेऊन निघूनही गेला.

सहीए मानव, नाहीतर माझं नशीब ..आजपर्यंत एकच सेलिब्रिटी असा अचानक दिसलाय आणि तो म्हणजे प्रेम चोप्रा Happy थिएटरमधे कोणता तरी हॅारर मूव्ही बघायला गेलेले आणि खूर्चीला मागून सारख्या लाथा पडत होत्या म्हणून वळून बघितलं तर प्रेम चोप्रा

१. ह्या माणसाला स्टारडम कॅरी करणं उत्तम जमतं आणि २. त्याच्या मुलाखती बघताना त्याच्या उत्तम वाक्चातुर्याची जाणीव होते. >> good observation

सुपरस्टार srk (DDLJ , KKKG , कुछ कुछ होता है वैगेरे ) ऍक्टर srk (स्वदेस , लव्ह जिंदगी ) वर भारी पडला त्यामुळे हिट चित्रपट खूप आठवतात पण चांगले कमी आठवतात , वैयक्तिक मत !

हपा यांनी शेअर केलेला विडिओ माझ्याही फार आवडीचा Happy
शाहरूख दुबई टूरीजमचा ब्रांड अँबेसेडर झाला तेव्हाचा आहे तो.
त्याची महिलांमधील क्रेझ त्यातून दिसते आणि ती का आहे हे देखील दिसते. ती शेवटची बाई त्याला किस करते ते ही किती छान वाटते. हे कमवावे लागते. नुसते चित्रपटात हिरो असल्याने होत नाही. रीअल जंटलमॅन! त्यासारखे हे गुण जरूर असावेत..

माझ्या समोर जरी कोणी असा हिरो ,हेरॉईन आली तरी माझा रिस्पॉन्स काहीच नसेल.
जशी बाकी लोक तसाच तो व्यक्ती.
Submitted by Hemant 33 on 4 November, 2022 - 08:27
>>>>>

हेमंत,
कुठलाही अबक हिरो हिरोईन समोर येणे आणि तुम्ही ज्यांचे फॅन आहात ती सेलेब्रिटी समोर येणे यात फरक आहे ना..

म्हाळसा म्हणते तसे आयुष्यात मलाही शाहरूखला मुद्दाम भेटायची ईच्छा नाही. कधी अचानक समोर आला तार जी धमाल येईल ती अवर्णनीय असेल.
पण हो, या धाग्यातील चर्चा वाचून वाटले की एकदा तो नसताना मन्नत दर्शन जरूर करून यावे. तिथे एक फोटो जरूर काढावा. कोणी असेल तयार सोबत यायला तर मला मेसेज करून ठेवा रे. जमवूया एकदा. आणि मग ईथे येऊन छान वृत्तांतही टाकूया Happy

क... क... क.. किरण .... म्हटलं की, डोळ्यांसमोर ' डर' मधला शाहरूख येतो... जुही चावलावर एकतर्फी प्रेम करणारा माथेफिरू प्रियकर...! ' जादू तेरी नजर.. खुशबू तेरा बदन' ह्या गाण्यात कुठेही न दिसणारा मात्र हे गाणं ऐकताना, बघताना शाहरूख डोळ्यांसमोर येतोच. डर चित्रपटाचा खरा नायक सनी देओल आहे हे लक्षातच न येऊ देता पूर्ण चित्रपट आपल्या अभिनयाने गाजवणारा शाहरूख खान..!!

शाहरूख खान मला पहिल्यांदा आवडला तो ' दिवाना ' चित्रपटामध्ये .! मला आठवते, गावात एका नातेवाईकांकडे पूजा होती आणि तेव्हा व्हीसीआर वर रात्रभर चित्रपट लावले होते. त्यात ' दिवाना' चित्रपट सुद्धा होता..

त्यातलं ' कोई ना कोई चाहीए .. प्यार करनेवाला... हे गाणं त्याकाळी खूपच हिट होतं. मोटरसायकलवर बसून स्टंट करत गाणं म्हणणारा शाहरूख मला आवडू लागला होता. त्यानंतर ' दिल आशना है.' ह्या चित्रपटात सुद्धा तो आवडला होता.

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी दूरदर्शनवर त्या चित्रपटाची मेकींग स्टोरी दाखवली होती. त्यावेळी चित्रपटातली गाणी आणि शाहरूख - काजोलची जोडी .. सगळचं सुपरहिट झालं होतं.. !! त्याकाळी शाळेतल्या सगळ्या मुलींना शाहरूख आणि सलमान ही जोडगोळी खूपच आवडायची. ते दिवसच वेगळे होते.. पुन्हा परतुनी न येणारे..!

'' करण- अर्जुन' चित्रपटातलं 'जाती हूँ मै ' म्हणणारी काजोल आणि ' जल्दी है क्या' असं म्हणत तिला विनवणी करत थांबवणारा शाहरूख ... त्या गाण्यातली दोघांची केमिस्ट्री जबरदस्त होती.

' कभी हा कभी ना ' मध्ये त्याला बिलकूल भाव न देणाऱ्या अॅनाच्या पाठी- पाठी फिरणाऱ्या शाहरूखला पाहून मला त्याच्याविषयी तेव्हा खूप सहानुभूती वाटायची.

त्यातलं 'वो तो है अलबेला... हजारो में अकेला..' तसंच ऐ काश के हम होश में अब आने ना पाए..' ही गाणी मला तेव्हाही आवडायची .. आणि आजही ऐकायला आवडतातच...!

' येस बॉस' मधलं ' मैं कोई ऐसा गीत गाऊँ के आरजू जगाऊँ.. अगर तुम कहो.. ' कित्ती ती प्रेयसीची गोड प्रेम आराधना... !! त्या गाण्यातला शाहरूख पाहून त्याच्यासारखाच आपला प्रियकर असावा असं एखाद्या प्रेमात पडू पाहणाऱ्या नवतरुणीला न वाटणे म्हणजे नवलच..!

बाजीगर मधला ' किताबे बहुतसी पढी होगी तुमने ' मधला शिल्पा शेट्टी सोबत नाचणारा भोळ्या- भाबड्या चेहऱ्याचाच शाहरूख मला आठवतो. आजही ते गाणं मी जीममध्ये मी आवडीने ऐकते.

दहावीची परिक्षा संपल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी ' परदेस' चित्रपट पाहायला पालघरला गेलो होतो. संध्याकाळी पावणे सहाची ट्रेन पकडायला चित्रपट संपायला दहा - पंधरा मिनिटे असताना थेअटरमधून आम्हांला निघावे लागले होते. त्यामुळे चित्रपटाचा शेवट हुकला होता आणि आज मला त्या हुकलेल्या शेवटाची हुरहुर वाटते. ' 'ये दिल दिवाना.. दिवाना..., दिवाना है ये दिल ' ह्या गाण्यात वेगाने कार चालवणारा शाहरूख असो किंवा 'जरा तस्वीरसे तू निकल के सामने आ..' अशी प्रेयसीला व्याकूळ साद घालणारा आणि मग ' जाने कहा से आ गई है वो' म्हटल्यावर फुलणाऱ्या चेहर्‍याचा शाहरूख असो किंवा मग 'दो दिल मिल रहे है चुपके चुपके..' असं गाणारा शाहरूख असो .. फक्त आणि फक्त शाहरुखच डोळ्यासमोर येतो..

'दिल तो पागल है' मधला स्वप्नाळू प्रियकर असो की डुप्लीकेट मधला डबल रोल वाला शाहरूख ..!! शाहरूख नेहमीच आवडलायं..

' कुछ- कुछ होता है' मध्ये अंजलीला मिठीत घेताना टिनाचा हात धरून ठेवणाऱ्या राहुलचा मात्र मला राग आला होता. कोण जाणे.. पण त्या चित्रपटात मला तो स्वार्थी वाटला होता.

'मोहब्बते ' मधला अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीने उभा राहणारा , ' एक लडकी थी दिवानी सी .. एक
लडके पे वो मरती थी..' म्हणणारा त्याचा दुखावलेला प्रियकर मला खूप आवडला होता. शाहरूखची त्या चित्रपटातली वेशभूषा मला खूप आवडली होती.

' कभी अलविदा ना कहना' चित्रपट थेअटर मध्ये पाहिला होता. त्यावेळी लग्नाळू वय असल्यामुळे ते विवाहबाह्य संबंध वगैरे प्रकरण काही झेपलं नव्हतं. चित्रपटातली गाणी बाकी आवडली होती... त्यातलं ' मितवाँ'' हे आवडतं गाणं..!

' वीर- झारा' मधला पाकिस्तानी प्रेयसीसाठी सीमेपार तुरुंगात सडणारा प्रेम 'वीर' आणि चित्रपटातली गाणी सगळचं सुंदर...!

' देवदास ' मधला शाहरूखचा देवदास आवडला होता पण त्या चित्रपटात त्याचा अभिनय अंमळ नाटकी वाटला होता.
देवदास मधल्या माधुरी आणि ऐश्वर्यांना विसरून चालणार नाही. मला ऐश्वर्याची पारो खूप आवडली होती.

' जोश' मधला टपोरी शाहरुख असो, 'चलते-चलते ' मध्ये राणीला मनवताना स्वयंपाक घरात भांडी धुणारा शाहरूख असो ( ह्या चित्रपटात राणी खूपच सुंदर वाटलीयं मला... आणि त्यातली गाणीही खूप छान आहेत ऐकायला) किंवा मग 'ताबीज बना के पहनू उसे... आयत की तरह मिल जाए कही' असे म्हणत ट्रेनच्या छतावर मलायकाच्या सोबतीने ठुमके लगावणारा 'छैय्या छैय्या ' गाण्यातला शाहरूख असो
सगळ्या भूमिका त्याने मनापासून जगल्या आहेत.

' कल हो ना हो' चित्रपटगृहात पाहत असताना चित्रपटाचा शेवट आणि शाहरुखचा अभिनय पाहून अश्रूंचे लोट माझ्या डोळ्यांतून वाहले होते कारण कुटूंबातल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख अगदी ताजे होते त्यावेळी..!!

'ओम शांती ओम' हा चित्रपट मी दिपिका आणि त्यातल्या गाण्यांसाठी चित्रपटगृहात जाऊन पाहिला होता. हा चित्रपट दिपिकामुळे हिट झाला असावा असं वाटते .. जरी शाहरूख खान त्यात असला तरीही..!

' चेन्नई एक्स्प्रेस ' हा त्याचा चित्रपटगृहात मी पाहिलेला शेवटचा चित्रपट..! दिपिका आणि शाहरूख दोघेही अर्थात आवडले होते त्या चित्रपटात..!

मी शाहरूखचा प्रत्येक चित्रपट पाहिलायं किंवा पाहतेच किंवा खूप आतुरतेने त्याच्या चित्रपटाची वाट पाहते एवढी काही मी त्याची अती वेडी चाहती नाही, मात्र त्याचे जे काही चित्रपट पाहिलेत त्या चित्रपटातल्या त्याच्या भूमिका आणि त्याचे अभिनय कौशल्य मला मनापासून आवडलेयं.

प्रत्यक्ष आयुष्यात शाहरूख खानचा आणि माझा दुरान्वये संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही , त्यामुळे व्यक्तीगत आयुष्यात तो शाहरूख खान म्हणून कसाही असला तरीही आपल्या कसदार अभिनयाने , चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेने, त्याच्या चित्रपट गीतांनी माझ्या भूतकाळातल्या आभासी जगातल्या एका कोपर्‍याला जिवंत ठेवणारा शाहरूख खान मला नेहमीच आवडतो.

तसा तो वादांपासून शक्यतो दूर राहत असावा असं वाटते. एक सामान्य मुलगा पाठीशी कुणीही 'गॉडफादर' नसताना चित्रपट सृष्टीतला' बादशहा ' बनतो तेव्हा त्याचा त्या पदापर्यंत पोहचण्याचा प्रवास नक्कीच थक्क करणारा तसाच कौतुकास्पद आहे. त्याच्या ह्या यशात निर्माते आणि दिग्दर्शक असणाऱ्या चोप्रा कुटुंबाचं योगदान मोलाचं आहे हे तो नि:संशयपणे मान्य करेलच. त्याच्यामधलं अभिनयकौशल्य अचूक हेरून त्यांनी दिलेल्या संधीचं त्याने सोनंच केलं.

शाळेत असताना आठवते की, एका स्त्रीने शाहरूख खान हा माझा हरवलेला मुलगा आहे असा दावा केला होता. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजलं होतं. तेव्हा त्याच्या विषयी खूप कुतुहल वाटलं होतं.

अभिनेते सुधीर जोशी यांच्या एका लेखात वाचलेला किस्सा अंधुकसा आठवतो .. एकदा ते नाटकाच्या दौर्‍यासाठी दिल्लीला गेले होते. मुंबईला परतताना ट्रेनमधे एक उत्साही तरुण डब्यात इथे तिथे फिरत होता.. त्यांनी कुणाला तरी विचारले की, हा मुलगा कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की, काल जे नाटक पाहिलं होतं त्यात ह्याचा अमुक- अमुक रोल होता... तोच मुलगा पुढे जाऊन चित्रपट सृष्टीतला ' बादशहा' बनला.

प्रतिसाद अंमळ लांबत चाललायं त्यामुळे आता लिहायचे थांबवते ..नाहीतर 'अति तेथे माती ' व्हायची नाही का..?? ( ऋन्मेष, हे तुम्हांला उद्देशून नाही लिहिलं बरं मी...( ह. घ्या.)

Pages