तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या वाशीच्या घराच्या बेडरूममधून दिसणारे दृश्य

बेडरूम फार मोठे होते. त्यामुळे एक एक्स्ट्रा बेड या खिडकीला लागून लावला होता. खिडकीचा कट्टा आणि बेड एकाच लेवलला होते. मस्तपैकी बसून, लोळून खिडकीच्या बाहेर बघायचा आनंद लुटायचो. ईथून दिसणारी मागच्या बाजूची गल्लीही अगदी शांत निवांत होती. गाड्यांची वर्दळ शून्य होती. फोटोतल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत.

FB_IMG_1656864664183.jpg

तिथेही खारूताई आणि पक्षी असे एकत्रच दिसायचे. त्यामुळे पोरांचे खाणेपिणेही नेहमी याच बेडच्या कट्ट्यावर बसून व्हायचे.

FB_IMG_1656864653276.jpg

आणि मग एका वादळात ते झाड पडले Sad
अगदी मूळापासून उन्मळून...

FB_IMG_1656864642695.jpg
.
FB_IMG_1656864711701.jpg

हो, दादरची हिंदू कॉलनी आठवायची मला.
बालवाडी ते दहावी किंग जॉर्ज उर्फ राजा शिवाजी विद्यालयात असल्याने त्या एरीयाशीही एक वेगळेच नाते आहे.

अमा, खूप छान फोटो. तुम्ही माझ्या माहेरच्या अगदी जवळ राहता. आईच्या घराच्या बाल्कनीमधून असंच दृश्य दिसत. पूर्वी डोंगरावर एवढी वस्ती नव्हती. जॉन्सनची दर वर्षी रंगवली जाणारी पांढरीशुभ्र बिल्डिंग, दूरवर पसरलेली मेन्टेन केलेली हिरवळ आणि मागे ढगांमध्ये हरवलेले डोंगर. खूप सुंदर दृश्य होतं

मस्त चित्रे...
सिनेमाबद्दल काही शेयर करू का? जरा अवांतर ठरेल पण 'शब्दचित्र' माना की ... Happy

सिनेमाबद्दल म्हणजे समजले नाही..
बाकी करा की शेअर.. ईथे शेअर करावेसे वाटते म्हणजे जरा अवांतर असले तरी जरा धाग्याच्या विषयाशी दूरचे का होईना कनेक्शन असेलच.

"तुमच्या खिडकीतून काय दिसते?" हा तसा निरर्थक आणि भोचक प्रश्न क्रिएटीव्ह लोकांच्या हाती पडला की काहीजणं त्याचे सोने करतात. उडता पंजाब मध्ये आलियाला खिडकीतून गोआ का कुठले तरी व्हेकेशन पोस्टर दिसत असते. केवळ त्या जोरावर ती ड्रग्ज-रेप-मारहाण सर्व सहन करते. तर थ्री इडियट्स मध्ये ड्रोन खिडकीतून बघतो तोवर सहनशक्तीची परिसीमा झालेली असते. लुटेरा ओ हेन्रीच्या दि लास्ट लीफवर आधारित आहे. खिडकीतून दिसणारे शेवटचे पान जगण्याची आशा देत रहाते. ओपन विंडोवर आधारित नुकतीच गुल पनागची 'मनोरंजन' म्हणून शॉर्ट फिल्म आहे. धमाल आहे. गुरू , औरंगजेब, किंवा स्वदेस सारख्या सिनेमात अँबिशीयस हिरो दाखवायचा असला की मोठ्ठी खिडकी असलेलं ऑफिस... एकूणात खिडकीतून काय दिसतं हा प्रश्न क्रिएटीव्ह लोकांना नक्की विचारावा... हे एक छान छान खिडक्यांचे गाणे...

In heavy rain you cannot see the village in the dongaar and the fancy apartments

धुवांधार पावसात फोटो क्लीअर येत नाहीत. पण ते वातावरण खिडकीत बसून अनुभवायला कमाल असते. आमच्या एका बाल्कनीत पाऊस बघायला बसायचे तर भिजायचीही तयारी ठेवावी. कारण ती पुढे आल्याने सगळीकडून वारा येतो. तेच भिजायचे नसल्यास आपण स्वत: ऊबदार घरट्यात राहून पाऊस बघायचा असेल तर सध्या नवीन बाल्कनी वापरतो. वाऱ्याच्या दिशेमुळे आत एक थेंब येत नाही.

अँबिशीयस हिरो दाखवायचा असला की मोठ्ठी खिडकी असलेलं ऑफिस..
>>>>

हे लॉजिक ईंटरेस्टींग आहे.
पण मोठ्या खिडकीची मजा वेगळीच. ऑफिसमध्ये तर हल्ली या टोकापासून त्या टोकापर्यंत पुर्ण भिंतच काचेची असते. पण घरचीही बिल्डरने छोटी खिडकी दिली असेल तर खुशाल पाडावी आणि फ्रेंच विंडो बनवावी.

अश्विनीमामी >>> डोंगराएवढ्या उंचीवरच्या खिडकीतून मुसळधार पाऊस कसा दिसत असेल हीच मला उत्सुकता होती आणि ती तू पूर्ण केलीस. खूप खूप आभार.

सध्या खिडकीतून पाऊस आणि पावसासोबत फूटबॉल खेळणाऱ्या मुलांना बघायचा आनंद लुटतोय.
भर पावसातही खेळ चालूच होता. पण फोटो पाऊस थांबल्यावर काढला आहे.

IMG_20220706_143306.jpg
.
IMG_20220706_143319.jpg

IMG_20200919_085021241_optimized.jpg
आमच्या बिल्डिंग शेजारील प्लाॅट घनदाट वृक्षांची भरलेला आहे. त्यावर कोकीळ , पोपट, भारद्वाज, कबुतरे , साळुंक्या वास्तव्यास आहेत...
सूर्योदय-सूर्यास्ताला खूप आवाज असतो त्यांचा. विषेशतः वसंत ॠतूमधे !

IMG-20220708-WA0012.jpg
Balcony
एकुलती एक आहे.
अजून ऑरगॅनिझिंग बाकी आहे बाल्कनी चे.
जाळी लावून घेतली घाईघाईत फक्त

सगळेच फोटो सुंदर आहेत !
ऋ, पावसात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा अतिशय आवडला आहे. अगदी मुलांच्या रूममध्ये फ्रेम करून लावावा इतका जिवंत व जीवनाने रसरसलेला !

अस्मिता. हो
अगदीच रसरशीत जिवंतपणा.. ते द्रुश्य बघतानाही जाणवते.
शाळा सुटल्यावर मुलांचा गोंधळ आणि रस्त्यावरचा ट्राफिक यांचा कोलाहल अर्ध्या तासात शांत होतो. आणि मग ही मुले मैदानात फूटबॉल खेळायला ऊतरतात.
बिल्डींगची लाईट गेल्यावर आणि आल्यावर जसे मुलांचे उत्स्फुर्त ओरडणे किंचाळणे असते तसे या मुलांच्या एंट्रीला अनुभवायला मिळते. आल्या आल्या त्यांना मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत धावायला सांगतात. वॉर्म अप असावा तो त्यांचा. मुले क्लासरूमच्या चार भिंतीतून मैदानात येत नुसते चेकाळल्यासारखी धावतात. प्रत्येकाचा स्पीड वेगळा. स्टॅमिना वेगळा. त्यामुळे परत येताना त्यांच्यातील अंतर वाढून मुले मैदानभर विखुरलेली दिसतात. तरीही पहिले पाच दहा मिनिटे उत्साह हायेस्ट लेव्हलला असतो. मी माझे काम थांबवून त्यांची ही एंट्री हमखास बघतो. दहा मिनिटांनी पुन्हा कामाला बसताना आपल्यालाच फ्रेश झाल्यासारखे वाटते Happy

गेल्यावर्षीही हिच खिडकी होती, समोर हेच मैदान होते. पण शाळा ऑनलाईन होत्या...
काय मिस केले पोरांनी हे बघताना जाणवते.

ह्या जागेच्या फार छान आठवणी आहेत.. ती समोरची पाथ स्टेशनवरची बिल्डींग तेव्हा नुकतीच बनत होती.. दर विकेंडला कन्स्ट्रक्शनच्या आवाजामुळे सकाळी झोपमोड व्हायची तेव्हा फार शिव्या घालत उठायचे Happy

हाहाहा Happy
मलाही आमचे अपार्टमेन्ट प्रचंड आवडते. नॉर्थईस्ट (ईशान्य) दिशेला ही हवेशीर बाल्कनी आहे. वास्तुशास्त्रामधील सर्वोत्तम दिशा. इथल्या माझ्या आठवणीही फार स्थैर्याच्या व आनंदी आहेत.

हाच तो वॉल्ट व्हिटमनचा वाईड ओपन रोड, हाच!!!!

Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.

- https://www.poetryfoundation.org/poems/48859/song-of-the-open-road
------------------------
आपण एखादी जागा सोडली की नंतर तिची आठवण येते तेव्हा बरोबर, एक सुगंध घेउनच येते. या घरात माझी एक आवडती उदबत्ती लावते मी, रोज सायंकाळी . व इन्स्ट्रुमेन्टल म्युझिक - https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=RDWxDJsMQCSzQ&start_rad...

हे दिवस आठवणारेत पुढे.

Pages