गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस ७ हुकलेला समीट

Submitted by आशुचँप on 27 June, 2022 - 15:18

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका
https://www.maayboli.com/node/81267
दिवस ३ झोंगरी
https://www.maayboli.com/node/81417
दिवस ४ मुक्काम झोंगरी
https://www.maayboli.com/node/81493
दिवस ५ थानसिंग
https://www.maayboli.com/node/81771
दिवस ६ थानसिंग मुक्काम
================================================================

“दादा, उठ उठ”
अमेयने मला गदागदा हलवले, मी आपला नेहमीप्रमाणेच, हो हो उठतोच पाच मिनिटांत म्हणत कुशीवर वळून परत झोपलो. तो म्हणाला, अरे बाकीचे सगळे तयार झालेत आपणच राहीलोय.
तेव्हा मला कुठं क्लिक झालं की आपल्याला आता रात्रीचे ट्रेकला निघायचे आहे आणि हेही एकदम आठवलं की आपण काहीच तयारी केली नाही झोपताना. मग जी काही धांदल उडाली सांगता येत नाही. ट्रेक लीडरने आम्हाला निक्षून सांगितले होते की उशीर केलात तर आम्ही तुम्हाला सोडून जाऊ, कारण त्या समीटवरून सूर्योदय बघणे ही फार भारी गोष्ट असते आणि सूर्य कोणासाठी थांबून राहत नाही त्यामुळे उशीरा करणाऱ्यांसाठी बाकीच्यांना शिक्षा नाही.
हे बरोबरच होते आणि त्यामुळे माझी जाम चिडचिड झाली की नेमके डिफॉल्टरमध्ये आपण आलो. त्यात त्या अंधारात माझी कानटोपी सापडेना, मोजे पायातच होते पण ग्लोव्हज कुठं सांडले होते ते कळेना, अक्षरश: आग लागल्यासारखी धांदल करून कसातरी एक ग्लोव्ह हातात एक काखेत, बूट कसेतरी चढवत पळत मी रॅली पॉईंटला गेलो. तोवर सगळे व्यवस्थीत गोल करून उभे होते आणि काऊंटींग सुरु होते. मी पटकन कुठतरी घुसलो आणि पटकन माझा नंबर म्हणून टाकला. तोवर बुधाभाई गरम पाण्याची किटली घेऊन आले आणि प्रत्येकाला गरम पाण्याने भरलेला थर्मास दिला.
आणि त्यावेळी एकदम जाणवलं की कसली भयानक थंडी होती ते. तोवर मी आटपून जाण्याच्या प्रयत्नात इतका व्यग्र होतो की थंडीचा विचारच आला नाही. पण आता एकदम हाडापर्यंत गेली शिरशीरी. मिट्ट काळोख, तापमान खात्रीने शून्याखाली कित्येक खाली असणार आणि सगळ्यांच्या हेडलँपमधून येणाऱ्या प्रकाशात एकदम कुठल्यातरी भारी एक्सपीडीशनला निघाल्याचा फिल येत होता.

सगळ्यांचे काऊंटींग झाले आणि लीडरने निघण्याचा इशारा दिला. मला त्यावेळी लक्षात आले की माझी वॉकींग पोल नीट बसत नाहीये. थंडीने मी इतका हैराण झालो होतो की मला काही सुचतच नव्हते. माझी चाललेली झटपट बघून बुधाभाईने पटकन मला ती फिक्स करून दिली. त्याला थंँक्स म्हणून मी पुढे सटकलो.
मिट्ट काळोख आणि वरती पाहिले तर मिणमिणत्या चांदण्या आणि वाट एकच त्यामुळे सगळे जण एकापाठोपाठ एक शिस्तीत चालू लागले. काही पावले चालल्यावर मला एकेक गोष्टी अंगावर येऊ लागल्या. एकतर अर्धवट झोप झालेली, आणि झोपेतून नीट जागे होण्यापूर्वीच चालू लागल्याने डोके सपाटून दुखत होते, थंडीने सगळी गात्रे बधीर झालेली आणि वॉशरुमला जायला वेळच मिळाला नव्हता त्यामुळे तेही प्रेशर सतावत होते. सगळ्यात वाईट म्हणजे माझी कफाची सर्दी. याच सर्दीने मला ट्रेक सुरु होण्यापूर्वी छळले होते. त्यावेळी गोळ्या बिळ्या घेऊन मी तात्पुरता आराम मिळवला होता पण इथल्या कडाक्याच्या थंडीत ती जुन्या दुखण्यासाठी जोमाने परतली होती. आणि नाक चांगलेच चोंदले होते त्यामुळे मी कसातरी तोंडाने श्वास घेत होतो. पण कफ घशातही जाणवत होता आणि बुच मारल्यासारखं वाटत होतं. एरवी मी नाक शिंकरून खाकरून कसा तरी कफ काढला तरी असता पण या थंडीत मला स्नायूच हलवता येत नव्हते. ग्लोव्ह घातलेल्या हातानी मी कसेतरी नाक पुसत हलवत चालत राहीलो. दोन्ही हातात पोल असल्याने हातही मोकळे नव्हते त्यामुळे मनगटावर नाक घासत राहीलो.
आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर केल्याने लीडरने जरा वेग पकडला होता आणि तो न थांबता सुटलाच होता. त्यापाठोपाठ आमची रांग फरफटत चालली होती. म्हणजे मी एकटाच नाही तर बाकी पण हैराण झाले होते. कुणीतरी माझ्यामागे होते ते म्हणत चाललं होतं आस्ते आस्ते चलो ना भाई. एकतर त्या अंधारात पायाखाली काय आहे ते कळत नव्हतं. हेडलँप लावला होता पण मी खाली पाहिलं की डोक्यात कळ जात होती त्यामुळे काय जे असेल ते देवाचे नाव घेऊन पार करत होतो. मधेच बुधाभाई आणि मी दगडे टाकून सुरक्षित केलेला झरा लागला. म्हणजे तोच असावा असे मला वाटलं. असेच दोन तीन झरे क्रॉस केले. पाणी वाहत होतं पण कडेला सगळे बर्फ, आणि गवतावरही बर्फाचे कण होते. त्यामुळे पाय घसरू नये यासाठी काळजी घेत चालावे लागत होते.
शेवटी अर्ध्या पाऊण तासाने लीडरने एकदाचा थांबून पाच मिनिटे विश्रांतीला दिली. मला कुठेतरी बसून दम घ्यावा वाटत होते पण सगळीकडे ओलसर जमीन आणि बर्फ होता. परत बसल्यावर उठता येणार नाही याची खात्री वाटल्याने उभ्या उभ्याच विश्रांती घेतली. बाकीपण हाफ हुफ करत होते मला तर तोंडाने श्वास घेतल्याने चांगलाच दम लागला होता. आपल्याला जमेल का नाही ही शंकाही मनात येत होती. मी तिथेच कुणालातरी बहुदा त्रिपाठीला म्हणालो तर म्हणे, “कुछ नई मेरा भी वही हाल है, आराम से जायेंगे. “
तोवर विश्रांतीची वेळ संपली, मी पटकन गरम पाण्याचा एक घोट घेतला, त्यानेही बरेच बरे वाटले आणि पुढे चालू लागलो. पण ते थोडाच वेळ राहीले परत मला श्वास घेताना त्रास व्हायला लागला आणि नको नको ते चालणे असे व्हायला लागले. पण नेटाने रेटून नेत राहीलो शरीराला. मनाचा आणि शरीराचा संपर्कच तुटल्यासारखे झाले होते. नुसते यंत्रवत पावले टाकत होतो.
नंतर तर छोटे छोटे चढ लागायला लागले. इतका वेळ तो त्रास तरी नव्हता. चढावर म्हणजे मी अगदीच ढेपाळलो. आता आपण पडतो का काय असे वाटायला लागेपर्यंत ते लामुने आले. इथेच आम्ही मुक्काम करणार होतो. म्हणजे आपण इतक्या फास्ट चार पाच किमी चालून आलो पण असे झाले. लीडरने इथे मोठ्या उदार मनाने दहा मिनिटे दिली. त्याने सांगितल्याप्रमाणे लामुनेला काहीही नव्हते. नुसती मोकळी जागा आणि एक बारीक लाकडी खोपटे. त्याच्या दारातच मी बसकण मारली आणि खिशातून एनर्जी बार काढला. तो खावा म्हणून प्रयत्न करू लागलो तर हात इतके गोठले होते की मला काही केल्या त्याचा रॅपरच काढता येईना. दाताने फाडूनही काही होईना. बरं कुणाला तरी मला हे उघडून द्या असे म्हणायला पण रेटेना. मरु दे म्हणत मी तसाच तो परत खिशात कोंबला. आणि थोडे पाणीच प्यायलो. थंडीने सगळंच इतकं सुन्न व्हायला झालं होतं की बसल्या जागीच मुटकुळे करून झोपावं वाटत होतं.
तोवर लीडरने चलण्याचा इशारा केलाच. मी कसातरी उठलो आणि चालू लागलो. पण आता माझी अवस्था अजूनच बिकट झाली होती. कफ इतका घट्ट होऊन साचला होता की तोंडाने श्वास घेतानाही त्रास होत होता. नाक तोंड कुणीतरी दाबून धरले असावे असं काहीतरी वाटायला लागलं. थोड्या वेळाने तर मला पावलेही नीट टाकता येईना. झिंगत चालल्यासारखे कसेतरी चालायला लागलो इतपत. सुदैवाने मेंदू थोडासा ताळ्यावर होता. मला जाणवले की ही लक्षणे ठिक नाहीत आणि कुठंतरी थांबायला हवं. मी थांबलो, मागच्या लोकांना पुढे जाऊ दिले. सगळ्यात मागून आमचा अजून एक शेर्पा येत होता. त्याला मी थांबवून विचारले की अजून किती आहे. तो बोलला समीती लेक अभी ३ किमी पे और उसके आगे समीट ३ कीमी, म्हणजे अजून ६ किमी. आणि आता चढ लागणार हे उघडच होते. मी विचारले की आगे रुकने के लीये कोई सेफ जगह है क्या. तर म्हणे नाही, लास्ट स्टॉप लामुनेही है.
मग मी जास्त वेळ घालवला नाही, “मी म्हणलं मै जा रहा वापीस लामुने, मुझे तकलीफ हो रही है.” त्यावर तो एकदम गडबडला आणि त्याने वॉकी टॉकीवरून लीडरशी संपर्क साधला. त्याने तातडीने सगळ्यांची आगगाडी थांबवली आणि ओलांडत माझ्यापर्यंत आला.
मला विचारले त्याने काय त्रास होतोय. म्हणलं मला नीट कळत नाहीये पण मला श्वास घेताना त्रास होतोय. नाक घसा चोंदलाय. पावलं पण टाकता येत नाहीयेत नीट. त्याला पहिली शंका हाय अल्टीट्युड सिकनेस ची आली आणि त्याने टॉर्चच्या उजेडात माझे डोळे, तोंड, हात नीट तपासले आणि बहुदा अनुभवाने त्याला कळलं असावं की हे ते नाहीये मग तो म्हणाला कुठं थानसिंगला जाणार ना. म्हणलं नाही, मी लामुनेला थांबतो, तुम्ही येताना मला बरोबर घेऊन जा. कारण इतकं अंतर चालण्याचीही ताकद नाहीये आता. त्याने मग शेर्पाशी विचार विनिमय केला आणि मला त्याच्यासोबत पाठवले. खरेतर आम्ही फार लांब नव्हतो आलो पण त्याने रिस्क घेतलीच नाही.
मी शेर्पासोबत माघारी चालू लागलो तेव्हा शरीरापप्रमाणे मनही सुन्न झाले होते. इतकी धडपड कष्ट सोसून इथवर आलो ते असे माघारी जायला. पण त्यावेळी काहीही करता येण्यासारखे नव्हते. पुढे जाऊन अजून त्रास झाला असता तर किंवा चालताना धडपडून हात पाय मोडून घेतले असते तर (अर्थात त्यावेळी हे विचार नाही आले, पण आता पुढे नको जायला इतकंच वाटलं). तर त्या शेर्पाने मला नीट सांभाळून त्या खोपटापर्यंत पोचवले जिथे मी बसलो होतो. त्याने दार ठोठावून कुणाला तरी उठवले. आत एक पोरसवदा तरुण होता. शेर्पाने मला त्याच्या हवाली केले म्हणाला “तकलीफ हो रही है, आराम करने दो.”
मला त्या पोराने आत नेले, आत विझू विझू आलेली एक शेकोटी होती. त्याच्या बाजूला एक लाकडी प्लॅटफॉर्म सारखे होते. तिकडे पांघरुणे, स्लिपिंग बॅग वैगैरे होती. त्याने त्यातलीच एक मला दिली. मी जास्त विचार केलाच नाही. शूज काढून पटकन त्या बॅगेत शिरलो, सॅक डोक्याशी घेतली आणि लाकडी ओंडक्यासारख्या झालेल्या शरीराला जवळ आणून झोपायचा प्रयत्न केला.
कितीतरी वेळ असाच पडून होतो ते माहीती नाही पण कधीतरी झोप लागून गेली असावी. एकदम जाग आली तो त्या पोराच्या गदागदा हलवून जागे केल्याने. मी डोकं उचलून त्याच्याकडे पाहिले, तो विचारत होता अजून त्रास होतोय का वगैरे. म्हणलं नाही. मला विचारलं सिग्रेट चाहीये? म्हणलं नको. मग ठिक म्हणत स्वत:च पेटवली एक, झुरके मारायला बाहेर गेला. ते एक बरे झाले कारण मला सिगरेटच्या वासाची जाम तिडीक जाते. (पण नंतर कधीतरी भाऊ म्हणाला दोन तिन झुरके मारले असतेस तर कदाचित कफ हलका झाला असता).
आता झोप उडाली होती आणि मी बघीतले तर इतका वेळ झोपडीत जो मिट्ट काळोख होता तो आता कमी झाला होता. थोडं थोडं दिसत होतं म्हणजे उजाडू लागलं होतं. त्या झोपडीतल्या शेकोटीच्या धुराने किंवा त्या उबेने असेल पण मला थोडं बरे वाटत होतं आणि श्वास घेता येत होता. तोवर तो पोरगा परत आत आला आणि झोपला. पण मला आता पडून राहवे ना. मी उठलो आणि बॅगबाहेर आलो तर परत थंडीने शिरशीरी आली. पण म्हणलं निदान मोकळं होऊन यावं म्हणून शूज घातले आणि बाहेर आलो. अहाहा बाहेर इतकं भारी वाटत होतं. मी तिथल्याच एका दगडामागे जाऊन मोकळा झालो आणि त्याचवेळी शिंकरून खाकरून साचलेला कफ पण मोकळा केला. इतका वेळ मला त्याने छळलं होतं आणि तो बाहेर पडताच डोकं जे जड वाटत होतं ते हलकं हलकं वाटू लागलं आणि एक उत्साह अंगी आला. मी पटकन आत जाऊन कॅमेरा घेऊन आलो आणि आजूबाजूचा नजारा टिपण्याचा प्रयत्न चालवला.


-


-

आता येवेळी सगळे वरती पोचले असतील. मी सोडून बाकी सगळे, हा विचार येताच मनात परत एक कळ आली. पण आता हळहळ करून उपयोग नव्हता. मग एक विचार आला की आपण त्यांना गाठू तर शकणार नाही पण समीती लेक तर मध्यावर आहे. म्हणजे त्यांना उतरुन तिथे यायला जितका वेळ लागेल तेवढ्याच वेळेत आपण तिथे पोचू शकतो. हा विचार केल्यावर मग मी वेळ घालवला नाही. मी पटकन आत जाऊन त्या पोराला सांगितले की मी समीती लेकला चाललोय. तोवर तो झोपलाच होता. त्याला कळलं का नाही हेही न बघता मी सॅक पाठीशी मारली आणि निघालो.
रस्ता तोच होता, आणि मीही तोच होतो. पण काल रात्री कसा तडफडत, झिंगत चाललो होतो ते आठवून मला लक्षात आलं की आपण फिटनेसमध्ये नाही कमी पडलो तर अतिशय चुकीच्या वेळी मला कफाचा जोरदार अटॅक आलेला. इतक्या उंचीवर श्वास घेतानाच त्रास होत होता त्यामुळे माझा नाईलाजच झाला होता. आपण अजूनही ट्रेक करू शकतोय म्हणल्यावर मला अजूनच उत्साह आला.

आणि लामुने ते समिती लेक हा प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वांत संस्मरणीय ठरला. अगदी पुस्तकात मोरपीस जपून ठेवावा असा. आजूबाजूने बर्फाच्छिदत डोंगराच्या रांगा, त्यातून अशी लांबवर जाणारी दरी आणि त्याच्यामधोमध जाणारा हा एकाकी रस्ता आणि त्या एकाकी रस्त्यावर एकाकी मी. अक्षरश: कुठे कोणी माणूस नाही, प्राणी नाही, पक्षी नाही. नीरव अशी शांतता. इतकी की पायाखाली बर्फ चुरडलेला आवाज सोडला तर बाकी आवाजच नाही. नंतर गवताळ जागा आल्यावर तोही आवाज येईना. फक्त श्वासावर लक्ष, आत घ्या सोडा आणि त्याचा जो काही आवाज येईल तितकाच. मन, मेंदू, शरीर इतकं विरक्त झालेलं की मनात कसलाही विचार नव्हता. विचारविहीन अवस्था अशी म्हणतो ना ती. म्हणजे मी नंतर अमेयला भेटल्यावर म्हणालोही की मी पूर्णपणे वेगळ्याच झोन मध्ये गेलो होतो.

साधु ऋषी वगैरे साधना करायला हिमालयात, निसर्गात का जात असत याची त्यावेळी जाणीव झाली. आणि अशाच प्रफुल्लीत मनाने आणि शरीराने बघता बघता समिती लेकला पोहचलो देखील. चढावरून मला पुढे पसरलेला भलामोठा तलाव दिसत होता आणि आमच्या मंडळींचा कुठेही पत्ता नव्हता. लांब कुठेतरी दोघे जण असावेत असं वाटलं पण कळत नव्हतं. विचार आला पुढे जावं का पण तिथून दोन रस्ते जात होते. इतकावेळ एकच रस्ता किंवा पायवाट होती. म्हणलं रिस्क नको, भलतीच वाट असली आणि हे लोकं भलत्याच वाटेने आले तर काय घ्या. म्हणून मग तलावापाशीच थांबण्याचे नक्की केले.

तलावाकडे जाण्याच्या रस्त्यावर चक्क एक लाकडी ओंडका टाकलेला. तो पार करून वाटेत काही भग्न अवशेषसारखे दिसत होते ते पार करून तलावाच्या काठाशी पोचलो तर धक्काच. अख्खा तलाव बर्फाने गोठलेला. नशिबाने उन्ह आलेलं त्यामुळे ते बघायला मज्जा येत होती. फोटो काढले पण फोटोत प्रत्यक्षात दिसताना जी ग्लेअर होती ती येतच नव्हती. त्यामुळे कॅमेरा ठेवला बाजूला आणि काठाशी बसून त्या निसर्गसौदर्याचा आनंद घेऊ लागलो.

-

भूक लागली तसा बॅगेतून पॅकलंच काढला. तीच उकडलेली अंडी, एक उकडलेला बटाटा, गारढोण पडलेले जॅम सॅडविच आणि फ्रुटी. पण त्यावेळी ते खायला काही वाटत नव्हते. तोवर समोरच्या डोंगरावरून उतरत असलेली रांग दिसलीच.
लीडर सगळ्यात पुढेच होता, मला तिथे निवांत बसून खाताना पाहून उडालाच एकदम. “म्हणे, अरे आप यहॉं पे कैसे? ठीक हो गये.?”
म्हणे मला वाटलेलं तुम्हाला आता थानसिंग किंवा त्याही खालच्या उंचीवर न्यावं लागतं का काय, पण अल्टीट्यूड सिकनेस सारखं वाटल नाही काही म्हणून फार स्ट्रेस घेतला नाही आणि दिलाही नाही. मग मागोमाग अमेय आलाच. तो म्हणे मी निघालो होतो तुला सोबत म्हणून परत जायला. पण लीडर म्हणाला तु दमल्यामुळे येऊ शकत नाहीये. मग मी त्याला सांगितली कालची अवस्था. म्हणे मला सांगायचे ना, मी नेलं असतं तुला बरोबर. वरती सगळ्यांनी खूप आठवण काढली तुझी, बाबाजी होने चाहीये यहां पे म्हणत. सगळ्यांनाच हळहळ झाली तु नसल्याने.

मला ते ऐकून बरे वाटलं, म्हणलं चढ किती होता, म्हणे खतरनाक. शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचीच जाम वाट लागली. मलाही दमून पडल्यासारखं वाटलं, पण एनर्जी ड्रींक एकदमात प्यायलो थांबून आणि जादू झाल्याासारखा वरती गेलो. मग त्याच्या कॅमेरावर समीटचे फोटो पाहिले ते पाहून जाम जळजळ झाली.

बाकी मग तसे काही नव्हतेच. सगळेच समीट करून आल्याने अफाट दमले होते. काही मुली तर लामुनेला येऊन आडव्याच झाल्या पार. त्यामुळे सगळेच जण वेगवेगळ्या वेळी थानसिंगला पोचलो. कधी नव्हे ते मी आणि अमेय एकत्र होतो. आणि त्यानंतर ट्रेक संपेपर्यंत एकत्रच राहीलो. कारण उतरताना मी एकदम रिलॅक्स होतो आणि झपाझप सुसाट ग्रुपच्या स्पीडने उतरू शकत होतो.

नंतर ती चेस वाली मुलगी मला म्हणाली ते ऐकल्यावर थोडी हळहळ झाली परत. ती म्हणे, तु समीती लेकपर्यत आला होतास, फ्रेश होतास, लीडरला सांगितले असते तर त्याने एखादा शेर्पा दिला असता सोबतीला आणि तु करून आला असतास. सुर्योदय बुडला हे ठिक पण ट्रेक तरी पूर्ण झाला असता. मी म्हणलं मला त्यावेळी हे डोक्यातच आले नाही. मला आता बरे वाटत आहे याच आनंदात होतो मी.
आधी ते खोकल्यामुळे झोंगरी टॉप हुकला आणि आता कफाने हाही. ट्रेक संपेपर्यंत मी या दोन गोष्टींसाठी हळहळत होतो.
पण ट्रेक संपून जेव्हा युकसुमला फोन केला तेव्हा उमेश झिरपेंनी जो मला पेप टॉक दिला त्याने मग खूपच बरे वाटले.
मी जेव्हा त्यांना म्हणालो, असे असे झाल्यामुळे मी ट्रेक पूर्ण नाही करू शकलो. तर म्हणाले अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा हा हिमालयतला पहिलाच ट्रेक होता. अनेक अनुभवी ट्रेकर आणि अगदी शेर्पा देखील नाही वाटलं तर एव्हरेस्ट आवाक्यात असतानाही माघार घेतात. परत येणे म्हणजे पराभूत होऊन येणे ही फिलींग डोक्यातून काढून टाक. हिमालयात जिंकणे हरणे असे काही नसते. तु उगाच इरेला पेटून पुढे चालत राहीला असतास आणि अजून त्रास होऊन रेस्क्यू करावं लागलं असतं तर उमेदच घालवून बसला असतास किंवा भिती बसली असती. ९० किमी च्या ट्रेकमधले शेवटचे ३ किमी राहीले पण बाकी ८७ किमी तर व्यवस्थितपणे केलेस ना. आता हे राहीलेले ३ किमी तुला अजून चांगली तयारी करून अजून मोठा ट्रेक करायला मोटीव्हेट करत राहतील बघ.
आणि त्यांचे खरेच होते, आता मला मनापासून एखादा मोठा ट्रेक करायचा आहे. पूर्वीच्या सगळ्या चुका टाळून मस्तपैकी यशस्वी होऊन यायचं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सी+१
उगाच जिवावर उदार होऊन चढत राहण्यात काही अर्थ नाही.
संपली का लेखमाला? मला वाटलं येतानाचे पण अजून एकदोन भाग असतील.

खूप सुंदर हा भागही ! एका वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडले तुमच्यामुळे. मी तर कधी जाऊ शकेन असे वाटत नाही. पण ही लेखमाला वाचून सुध्दा बरे वाटले

थरार वाटला या भागात. हॅको किंवा हॅपो चा अ‍ॅटॅक येणे कॉमन गोष्ट आहे अशा ठिकाणी. नशीबच कि तसं काहीही नव्हतं. शेवटचा पॅरा खूप खास आहे. मस्त झाली मालिका.

धन्यवाद सर्वांना

संपली का लेखमाला? मला वाटलं येतानाचे पण अजून एकदोन भाग असतील.>>>

आहे आहे, अजून एक भाग तर नक्की आहे Happy

सीमांतनी त्यांच्या प्रतिसादावरून खरे तर मोह झालेला इथंच संपवण्याचा पण येतानाची पण थोडी गंमत बाकी आहे

छान झाली लेखमाला. काही वाचायचे राहिले असेल तरी पण फोटो सगळे पाहिले.
हुकलेला शेवटच तुम्हाला नवीन प्रेरणा देवो या शुभेच्छा

बाकी तुम्हाला माहीत असेलच,
जब एण्ड ठिक ना हो तो समझो वो दि एण्ड नही... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त Happy

मस्तच झालीय लेखमालिका. फोटो सुद्धा एकदम मस्तच.
प्रत्तेक भाग मी गुगल मॅप समोर ठेवून अनुभवला
माघारी फिरण्याचा निर्णय घेतलास ते एकदम बरोबर, जीवाकडे लक्ष देणे महत्वाचे

असे असे झाल्यामुळे मी ट्रेक पूर्ण नाही करू शकलो. << अश्या मोठया ट्रेक चा योग जुळवून येणासाठी अथक परिश्रम घेतलेले असतात आणि ते थोडक्यात हुकल्यावर वाईट वाटतेच.

पुढच्या हिमालयीन ट्रेक साठी शुभेच्छा !!

खुप मस्त झालाय हा पण भाग.... मस्तच एकदम..
बाकी तुम्ही एकट्याने लेक पर्यंत चालुन इतका मस्त अनुभव घेतलाय त्यापुढे "समीट वगैरे सब मोहमाया है" असं एक वाक्य लिहुन टाका... तसही लोक तुम्हाला बाबाजी म्हणतच होते ना Wink

खरे तर मोह झालेला इथंच संपवण्याचा पण येतानाची पण थोडी गंमत बाकी आहे >> बरे वाटले हे वाचुन... असं एकदम भसकन संपलं असतं तर वाईट वाटलं असतं... खुप मनापासुन आवडली ही लेखमाला.. त्यामुळे शेवट खास च असणार..

तुम्ही योग्य वेळी तो निर्णय घेतला हे बरं केलं . शरीराचं ऐकावं म्हणतात.
फोटो नेहेमीप्रमाणेच सुंदर.

युज्वली प्रवासवर्णनं (मलातरी) बोर होतात. की तिथे न जाता नुसतं वाचून मी रिलेट नाही करु शकत.
पण तुमची ही लेखमाला अपवाद आहे. Happy

विचारविहीन अवस्था>>>> किती छान फिलिंग असेल हे. नाहीतर सतत डोक्यात विचारांचे किडे वळवळतच असतात.

धन्यवाद सर्वांना

शेवटचा पॅरा खूप खास आहे. मस्त झाली मालिका.>>>
हो ना, झिरपेचें शब्द अगदी उभारी देऊन गेले

मोठया ट्रेक चा योग जुळवून येणासाठी अथक परिश्रम घेतलेले असतात आणि ते थोडक्यात हुकल्यावर वाईट वाटतेच.>>>
सुरुवातीला वाटलं पण आता ठिके, आता डोक्यात नवीन ट्रेक चा विषय आहे, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे

छान झाली लेखमाला. काही वाचायचे राहिले असेल तरी पण फोटो सगळे पाहिले.>>>>
धन्यवाद Happy

समीट वगैरे सब मोहमाया है" असं एक वाक्य लिहुन टाका... तसही लोक तुम्हाला बाबाजी म्हणतच होते ना>>>>

हा हा हा, होय की हे लक्षातच आले नाही Happy

त्यामुळे शेवट खास च असणार..>>>> नई हो खास असा काही नाही पण येताना वेगळी वाट होती एक, तेव्हाचे फोटो, गंमती जमती, ट्रेक संपल्यावर केलेली धमाल हे एक भागात लिहावं असं म्हणतोय

किती छान फिलिंग असेल हे.>>>खूपच
नंतरही मी प्रयत्न केला तसे समाधी अवस्थेत जाण्याचा पण नाही होत
काही सेकंद जेमतेम

युज्वली प्रवासवर्णनं (मलातरी) बोर होतात. की तिथे न जाता नुसतं वाचून मी रिलेट नाही करु शकत.
पण तुमची ही लेखमाला अपवाद आहे. >>>>खूप खूप धन्यवाद Happy

छान झालाय हा ही भाग!
इतक्या जवळ पोहचून समीट हुकल्याची हळहळ पोचली पण समिती लेकपर्यंतचा जादुई ट्रेल अनुभवायला नसता मिळाला तुम्हाला. ते वर्णन फार छान आहे! पुभाप्र.

समिट हुकलं खरं पण त्या अजस्र हिमालयात एकटं असण्याचा अगदी दुर्मीळ योग आणि अनुभव गाठीशी बांधता आला हे केव्हढं मोठं भाग्य. आयुष्यभराचा ठेवा मिळाला ना!
सर्व फोटो उत्तम आणि लेखमालाही सुंदर.

धन्यवाद सर्वांना

अजस्र हिमालयात एकटं असण्याचा अगदी दुर्मीळ योग आणि अनुभव गाठीशी बांधता आला हे केव्हढं मोठं भाग्य. आयुष्यभराचा ठेवा मिळाला ना!>>>>
अगदी खरंय
फारच सुंदर आणि दैवी अनुभव होता तो माझ्यासाठी

आज सगळे भाग परत वाचले.

शेवटचा पॅरा खूप खास आहे. +१

आहे आहे, अजून एक भाग तर नक्की आहे पुढचा भाग कुठे आहे आशु.