गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस ६ थानसिंग मुक्काम

Submitted by आशुचँप on 10 June, 2022 - 11:55

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका
https://www.maayboli.com/node/81267
दिवस ३ झोंगरी
https://www.maayboli.com/node/81417
दिवस ४ मुक्काम झोंगरी
https://www.maayboli.com/node/81493
दिवस ५ थानसिंग
================================================================

आतापर्यंतची थंडी काहीच नव्हती असे थानसिंगमधल्या रात्रीचा अनुभव होता. थर्मल, लायनर, जाडजुड स्लिपिंग बॅग सगळ काही अंगावर घेऊनही थंडीचा कहर जाणवत होता. अमेयने मला छानपैकी स्लिपींग बॅगमध्ये कोंबले होते त्यामुळे निभावले.

सकाळी जाग आली ती नेहमीच्या चहाच्या राऊंडच्या हाकेने. आजही आम्ही तब्येतीत झोपलो होतो आणि लोकांच्या असूयेला कारण झालो होतो. चहाच्या आधी पाण्याचा एक घोट प्यावा म्हणून बघितले तर बर्फ. मी रात्री ती बाटली गरम कपड्यात गुंडाळून ठेवायची विसरलो होतो आणि तंबूत आत असूनही पाणी गोठले होते यावरूनच थंडीचा कडाका जाणवत होता.

बाहेर मला बर्फ साचलेला दिसेल असे वाटलेल पण तसे काही नव्हते. मोकळे मैदान तसेच होते पण बाजूने वाहणारा छोटा झरा मात्र पार गोठून गेला होता. एक छोटासा ओघळ वाहत होता. त्यातच आमचा स्टाफ भांडी घासत होता आणि काहीजण ब्रश करत होते. मला ते बघून कसेतरीच झाले, इतक्या थंडीत दात बित घासणे प्रकाराला मी फाटाच दिला होता. दुपारी किंवा संध्याकाळी कँपला पोचल्यावर जर असेल इच्छा तर दात घासण्याचा कार्यक्रम ठेवला होता. पण कित्येकजण असे होते कि ज्यांना तोंड न धुता, ब्रश न करता खाणे जमत नसे. मला आणि अमेयला असला काही प्रॉब्लेम नसायचा. पाणी पिताना एक चुळ भरून टाकली की काम व्हायचे.

यावरून आठवले, असेच ब्रश करण्यावरून कुणाशी तरी बोलत होतो आणि त्यांने मला विचारले ब्रश किये बिना कैसे खाते हो. त्याला म्हणलं हमारे यहां महाराष्ट्र मै एक मुहावरा है. तर म्हणे क्या.

त्याला म्हणलं, "वाघ कधी गवत खात नाही आणि दात घासून शिकारीला जात नाही."

बोले तो, म्हणलं शेर कभी घांस नही खाता आणि ब्रश करके शिकार को नही जाता.

तो यावर इतका हसला की त्याला ठसकाच लागला.

दरम्यान, कँप लीडर आणि बाकी मंडळींची काही धावाधाव दिसेना याचे नवल करतच मेस खोपटाकडे गेलो. तिथे एकेक जण कुडकुड करत येत होते. ब्रेकफास्ट येताच राहूल आणि बुधाभाई पण आले आणि त्यांनी एक शॉर्ट मिटींग घेणार असल्याचे सांगितले. म्हणलं आता काय झालं. आणि मग त्यांनी सांगितले त्याचा थोडक्यात मतितार्थ असा होता.

तो म्हणाला, आपल्या आधीच्या प्लॅननुसार आपण आज ४-५ किमी अंतर पार करून लामुने ला जाणार होतो. तिथे कँप असला तरी रात्री किंवा पहाटे लवकरच आपण समिटला जायला निघतो. सूर्योदय समिटवरून दिसावा यासाठी ही घाई असते. पण आता कालच्या थंडीने बऱ्याच लोकांना त्रास झालाय. आणि आमच्या माहीतीनुसार लामुनेला याहीपेक्षा जास्त थंडी असते कारण समीती लेक जवळच आहे. इथे जर मायनस १२ असेल तर तिथे मायनस १५ किंवा १८ असू शकते. आणि तिकडे लाकडी घरे नाहीत, सगळा मुक्काम टेंटमध्येच होईल. (हे ऐकताच निम्मे खचले, आणि बंगलोरवाले सगळेच :))

तर आमचा प्रस्ताव असा आहे की लामुनेला स्टे करण्याऐवजी इथेच मुक्काम करावा आणि दोन तास आधीच निघावे आणि लामुने क्रॉस करून थेट समिटला जावे. असेही समीट केल्यावर आपण लामुनेला मुक्काम करतच नाही, सामान घेऊन मुक्काम थानसिंगलाच करतो. त्यामुळे आपल्याला फक्त जातानाचे ५ किमी जास्तीचे चालावे लागणार आहे पण त्यात आपल्याला सॅक इथेच ठेऊन जाता येणार आहेत. फक्त खायचे आणि पाणी सोबत घ्या.

हा प्रस्ताव एकदम आकर्षक होता आणि बंगलोरवाल्यांनी तातडीने पाठिंबा दिला. होय नाही करत सगळेच तयार झाले. मला हे जास्तीचे ५ किमी एका दमात मारणे जरा जीवावर आलेले पण सगळेच तयार झाले म्हणल्यावर मग नाट न लावता होकार कळवून टाकला.

आमच्या निर्णयामुळे लीडर आणि स्टाफ पण खुष झाले कारण त्यांचा टेंट, स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी वाहून लामुनेला न्यायचा त्रास वाचला होता. त्यामुळे सकाळची कामे होताच त्यांनी मस्त क्रिकेटचा डाव मांडला. त्यात आमची काही मंडळीपण सामील झाली आणि सगळ्यांनी मिळून फुल ऑन दंगा सुरु केला.

आता काय जायची घाई नसल्याने सगळे निवांत होते आणि छानपैकी उन्हच पडले. मी आणि अमेयने पटापटा आमची जाकीटे, टीशर्ट उलटे करुन टेन्टवर सुकायला टाकले. असेही अंघोळ नव्हतीच म्हणलं घामाचा वास तरी कमी होईल. आमचे बघून सगळ्यांनीच हे सुरु केलं आणि बघता बघता टेन्टला धोबीघाटची कळा आली. मुली सगळ्यात धोरणी असतात हे कळलं कारण त्यांनी दोन टेन्टला दोरी बांधून त्यावर कपडे वाळत घातले. आम्हाला हे करायचे सुचलेच नाही. आम्ही आपले टेन्टवर जसे मावतील तसे टाकून दिलेले.

दरम्यान, काळू आलेला. काळू तिथले भूभू होते आणि त्यांना संवाद साधायला कुठलीही भाषा चालते हे मला कळून चुकलं आहे त्यामुळे मी छानपैकी त्याच्याशी मराठीत गप्पा मारायचो आणि त्या बसायची कमांड पण शिकवलेली.

https://www.youtube.com/shorts/odlODgYOxIo

असेही मी आणि अमेय दोघेही आमच्या वाट्याला येणारी बिस्कीटे साठवून ठेवून त्याला खायला घालायचो त्यामुळे तो आमच्यावर तुडुंब खुष असायचा. आणि आम्ही लवकर नाही आलो तर तंबुपाशी येऊन आम्हाला बघायचा यायचा. फारच गोंडस भुभ्या होता तो.

त्याची का कुणाची माहीती नाही पण एका झोपडीत सांभाळलेली काही पिल्लेही होती.

आणि बेवारस नव्हती कारण आम्ही बघायलो गेलो सगळे तर तिथली बाई ओरडायला लागली. त्यांना त्रास देऊ नका म्हणून. म्हणलं आम्ही त्रास नाही देत, मला फक्त जवळून बघायची आहेत. आणि मग त्यातला एक मउ मउ लोकरीचा गोळा उचलला आणि थंडी वाजत होती त्याला म्हणून छातीशी धरला. शक्य असते तर मी त्याला घेऊनच आलो असतो घरी.

काही खेचरेही प्रेमळ होती आणि त्यांना जवळ यायचे असायचे. पण त्यांची ढुशी जोरात लागली तर काय म्हणून मी थोडा लांबूनच माया करत होतो.

तेवढ्यात अमेय मला हाका मारत आला, म्हणाला तुझ्या आवडीचा विषय आलाय चर्चेत ये लवकर. म्हणलं कुठला तर म्हणे वर्ल्ड वॉर २.

हायला मी कल्पनाही नव्हती केली की या विषयावर इथे कुणी चर्चा करत असेल पण तब्बल ८-१० जण मिळून चर्चा सुरु होती. अमेय म्हणाला तसे माझ्या अत्यंत आवडीचा विषय, आणि यावर भरपूर वाचले आहे, भरपूर सिनेमे, डॉक्युमेंट्री बघितले आहेत. त्यामुळे मी अत्यंत हिरीरीने त्यात भाग घेतला. आणि नंतर नंतर मग वेगवेगळी युद्धे, त्यांचे परिणाम, हे असे झाले असते तर कसे आणि भारतावर त्याचा कसा परिणाम झाला असता असे बरेच मुद्दे मी बोललो. बंगाली बाबू बऱ्यापैकी इम्प्रेस झाले. त्या बाबतीत बंगाली आणि मराठी अगदी सारखे आहेत.

तोवर जेवण आले ते रिचवले. . जेवण म्हणजे काय कसेतरी पोटात ढकलत होतो इतकेच. माझ्यासारखेच अनेकांचे झाले होते. अल्टीट्युड आणि थंडीमुळे जेवायची इच्छाच राहीली नव्हती. पण गरमागरम यायचे जेवण तर थोडेच खाऊन पोट भरल्यासारखे वाटायचे. पण अमेयचे भलतेच काहीतरी सुरु होते. एरवी आमच्या दोघांचा आहार जास्तच आहे. आमच्या पूर्वीच्या लेखमाला वाचलेल्या लोकाना माहीती असेल आमचा भस्मया मोड.

पण इथे लोकांची भूक मंदावत चालली होती तर याची वाढत. म्हणजे, आमचा एक वेळचे होईपर्यंत तो भाताचा ढीग संपवून रोट्या वर रोट्या रिचवत असायचा. इथवरही ठीक होतं पण दोन जेवणाच्या मधल्या वेळातही त्याला भूक लागलेली असायची. चालत असताही आणि पूर्ण विश्रांतीचा दिवस असतानाही. खुडबुड करत तो चिक्की खा, लाडू खा असे काहीतरी करत असायचा.

मला शेवटी काळजी वाटायला लागली. म्हणलं अरे इतकी भूक लागणं चांगलं नाही, जरा दाखवून घे डॉक्टरांना. तुला अल्टीट्युड सिकनेस रिव्हर्स हीट झाला असावा. माझं बोलणे ऐकून तोही थोडा काळजीत पडला पण खाणे - पिणे काही कमी केले नाही. नंतर घरी आल्यावर जेव्हा आम्ही उमेश झिरपेंना हे सांगितले तर ते म्हणाले अरे उलट हे बेस्ट आहे. तुझा भाऊ हाय अल्ट्यीटुडसाठी एकदम फिट असल्याचे लक्षण आहे हे. फार कमी लोकांना इतक्या उंचीवर चांगली झोप आणि भूक असते. त्याला सांग अजून मोठे ट्रेक कर म्हणून.

तिथेच माऊंटेनिरींग इंन्स्टिट्यूचा कोर्स संपवून निघालेली मंडळी दिसली त्यात एक मराठीही होता. मला आणि अमेयला बोलताना बघून तो पुढे आला. झिरपे आणि भगवान चावले यांच्या ओळखतीलचा निघाला.

जेवणे झाल्यावरही काय करायचे आता म्हणत आम्ही जवळच्या झऱ्यावर जाऊन आलो. अमेयने तिथेही एकदा आयफोन पाण्यात बुडवण्याचे प्रात्यक्षिक करत बघणाऱ्यांच्या डोक्यांना मुंग्या आणल्या. थोडी लांब नजर गेली तर बुधाभाई काहीतरी काम करत होता. म्हणलं आता हा इथे काय करतोय. म्हणून बघितले तर त्या झऱ्यात तो दगडी रचत होता मोठाली. म्हणलं ये किसलीये, तर म्हणे रात को जाना है सब को, कोई फिसले ना इसलीये.

बापरे म्हणजे आम्हाला सोयीचे व्हावे म्हणून तो इतक्या थंडीत गारढोण झऱ्यात उतरून दगड रचत होता. मला अगदीच भरून आले. म्हणलं थांब मी पण मदत करतो. मग त्याला जितके जमेल तितका खारीचा वाटा दिला. परत कँपकडे आलो तेव्हा इतक्या थंडीत पण घाम आलेला. दरम्यान, एक दुसऱ्या ट्रेकींग कंपनीचा ग्रुप समीट करून परत येताना दिसला. त्यांना थांबवून रस्त्याची आणि चढाईची माहीती घेतली. पण नसती घेतली तरच बरे होते असे झाले कारण एकाने खूपच घाबरवले. म्हणाला शेवटच्या टप्प्यात फारच वाईट चढाई आहे. पाय उचलत नाही, जाम शॉट लागतो.

अजून एक किस्सा म्हणजे, आमच्या मागे पुढेच अजून एक ट्रेकिंग ग्रुप चालला होता. म्हणजे आमचे मुक्काम सेमच ठिकाणी असायचे पण निघायची वेळ मागे पुढे. त्यांचा म्हणजे एकदम शाही कारभार होता. चार का पाचच जण होते आणि त्यांनी बहुदा कस्टमाईज ट्रेक ठरवला होता. आणि थाट म्हणजे इतका की त्यांच्यासाठी दोन शेर्पा टेबल आणि खुर्च्या पाठीवर वागवत. ते यायच्या आधी टेंट लावून, दारात टेबल खुर्च्या मांडून, गरमागरम सूप करून त्यांची वाट बघत. ते आले की मग एक शेर्पा येऊन त्यांची फर्माईश विचारून त्यानुसार जेवण बनवले जात असे. त्यात मग चायनीज पासून काहीही बनवून देत. एकदा तर पकोडे पण दिलेले तळून गरमागरम.

ट्रेक द हिमालयाजने काय कमी बडदास्त ठेवली नव्हती पण त्यांचा शाही थाट बघून ते संस्थानिक आणि आम्ही गरीब प्रजा असा फिल यायला लागला. आम्ही आपले दगड धोंड्यावर बसून किंवा उभ्या उभ्याच दिलेले जेवण ओरपत असू तर यांची टेबल खुर्ची. मला तर बिचाऱ्या शेर्पांचीच दया येत होती पण त्यासाठी मजबूत पैसे मोजले असणार हे उघडच होते.

थानसिंगला तेही निवांत मोकळे दिसले तेव्हा मला राहवले नाही आणि मी जाऊन ओळख काढली. हाय रे दैवा, ते पुण्याचेच निघाले. आणि कुणालाही अजिबात मराठी येत नव्हते. थोडावेळ बोललो खरे पण पुण्यात राहूनही अजिबात मराठी येत नाही हा माझ्यासाठी फाउल होता. त्यांना मी थोडा संकोच बाजूला ठेवत थेटच विचारले की किती पैसे खर्च केले या सोयी सुविधासाठी तर हसून त्यांनी प्रश्न टाळला आणि म्हणाले नॉर्मल रेटसे चार गुना ज्यादा. मनात म्हणलं फक्त टेबल खुर्चीसाठी इतका खर्च. एकंदरीतच विषयच क्लोज केला मी त्यांचा.

कँपकडे परतलो तर जेवणाच्या खोलीत सगळे गप्पा मारत बसले आहेत असं कळलं म्हणून तिकडे गेलो. तोवर ती चेसवाली मुलगी आलेली भटकून कुठेतरी. म्हणे खेळायचं का, म्हणलं अर्थात. मग आम्ही डाव मांडला आणि आम्हाला रेडीमेड प्रेक्षक मिळाले कारण आज कुणालाच काहीच उद्योग नव्हता आणि संध्याकाळ होऊ लागताच वरून बटन दाबतात आणि टेप्रेचर एकदम फ्रीज लेवल ला जातं हे काल कळलं होतंच. मग सगळे आमचा डाव बघत बसले, मी जिंकल्यावर दुसऱ्या एकाने आव्हान दिले. म्हणलं चालेल. मग एकेक करत सगळेच म्हणू लागले खेळायला. मग असे ठरले की हरेल तो बाहेर पडेल आणि दुसऱ्याला जागा देईल. झालं मी दे दणादण खेळत जिंकत राहीलो आणि पुढचे प्रतिस्पर्धी बदलत राहीले. बंगाली डॉक्टर जे आज माझ्या वर्ल्ड वॉरच्या माहीतीने इम्प्रेस झालेले ते अजून इम्प्रेस झाले आणि इतके की थोड्या वेळाने त्यांनी अमेयला आणि नंतर मलाच माझ्या खेळाची खासियत काय आहे, आणि कसे ते बाकीच्यांना भारी पडते वगैरे सांगायाला सुरुवात केली.

ओळीने अनेक डाव जिंकल्यावर अमेयने शेवटी बास म्हणून खूण केली आणि मी मग माघार घेतली. उगाच डोळ्यावर यायाला नको म्हणून. आणि माज वाटू नये म्हणून पण. खरेतर मी असा काही भारी खेळत नाही पण मी मोबाईलवर ऑनलाईन चेस खेळत असतो बरेचदा आणि ब्लिट्स म्हणजे ५ मिनिटांचे डाव खेळत असल्याने पटापट मूव्ह करायची सवय लागली आहे. समोरचा जर नियमित खेळणारा नसेल, हौशी असेल तर तो इतक्या पटापट मुव्ह्ज होताना बघून गांगरतो आणि चुका करतो. हीच माझी सिंपल स्ट्रॅटेजी होती.

तर अशा रितीने आजचा दिवस फेम मिळवण्याचा होतां जो उद्या मातीत जाणार होता. कसे ते सांगतोच नंतर. कालच्यासारखे आजही सूर्यास्तानंतर शिखरांचा फोटो मिळेल म्हणून आज तयारीत होतो
आणि त्यांनी निराश केले नाही. काहींनी फार सुंदर छायाचित्रे काढली मी आपली गरीबाला जमतील तशी काढली.

हा कुणी काढलाय ते आठवत नाही कारण ग्रुपवर फोटो पडलेले जे मी नंतर क्लिअर केले पण मोस्टली एसएलआर घेऊन आलेल्या डॉक्टरांचा असावा.

निळे टेंट आमचे आणि पिवळे टेंट संस्थानिक लोकांचे Happy

लीडर म्हणाला होता आता गाढ झोपू नका आपल्याला रात्री २ वाजता निघायचे आहे. झोपायच्या आधीच सगळी तयारी करून ठेवा. जॅकेट, हेडलँप, पाण्याची बाटली वगैरे. हो हो म्हणलं आणि टेन्टमध्ये मी आणि अमेय गप्पा मारत बसलो. वाटलेल न झोपताच निघू रात्री पण रोजच्या सवयीने आठ वाजले आणि आम्ही कधी झोपलो आमचे आम्हालाच कळले नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहा!!! किती सुंदर फोटो आलाय त्या शिखरांचा आणि शेवटचा. मस्त फील येतोय.
काळू किती गोड आहे आणि ती पिल्लं पण Happy

गरीब प्रजा, संस्थानिक Lol

मस्त!
गाढ झोपू नका >> म्हणजे काय? असं ठरवून कसं झोपता येईल गाढ किंवा हलकं? एकतर झोप लागणारच नाही, पण लागली झोप, तर जशी लागायची तशीच लागणार ना Lol

असा कसा मुहूर्त शोधला ? तरी मी सांगितलं होतं पिक्चरला जाणार आहे तर इकडे शतकांनंतर नवीन भाग टाकला. बास का ? थोडी कळ काढता नाही आली का ?
पण ही नाराजी दूर करणारा हा भाग आहे.

धन्यवाद सर्वांना

शामा - अहो मला काल होता वेळ म्हणलं बराच गॅप पडलाय तर लिहून टाकू
मला नव्हतं महिईटी तुम्ही मुव्ही ला गेलाय
पुढच्या वेळी मी आधी संगीन टाकण्यापूर्वी Happy

म्हणजे काय? असं ठरवून कसं झोपता येईल गाढ किंवा हलकं? >>>
हो ना, मी तर पार ढाराढुर झोपलेलो

भारी झालाय हा भाग..
तो टेन्टचा फोटू वॉलपेपर म्हणून लावावसा वाटतोय