गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस ४ मुक्काम झोंगरी

Submitted by आशुचँप on 8 April, 2022 - 06:10

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका
https://www.maayboli.com/node/81267
दिवस ३ झोंगरी

================================================================

झोंगरीमधली पहाट झाली ती आमच्या सहकार्यांच्या आरडाओरडीनेच. "अरे उठो भाई, कितना सोओगे??"
मी डोळे चोळत बाहेर आलो, घड्याळात पाहिले तर चक्क आठ वाजलेले. हायला म्हणजे आम्ही काल रात्री जे आठला झोपलो ते थेट १२ तास गुडुप???.
बाकीचे लोक पण हैराण, की हे झोपतात का चेष्टा करतात. कारण बहुसंख्य जणांना कडाक्याच्या थंडीमुळे अजिबात झोपा लागल्या नव्हत्या, काहींचे डोके दुखत होते तर काहीची झोप आणि भूक दोन्ही मंदावली होती. त्यामुळे आम्ही ढाराढूर घोरत १२ तास झोपलो याचेच सगळ्यांना कौतुक (आणि बहुदा असुयाही) वाटत होते.
आम्ही उठलो त्यावेळी झक्क उन्ह पडले होते पण आजूबाजूला बघितले तर डोंगराच्या उतारावर, दगडांवर बर्फ कण दिसत होते. थोडेसे आमच्या टेंटवरही होते.

वॉकिंग स्टीकवर जमलेले बर्फ

म्हणजे रात्री चांगली थंडी होती तर. आणि कहर म्हणजे आम्ही अद्यापही जे लायनर थंडीसाठी दिले होते ते अद्याप वापरायला काढलेच नव्हते. त्याची गुंडाळी करून डोक्याखाली उशी म्हणूनच वापरत होतो. तब्येतीत खात-पीत होतो, डबे टाकत होतो आणि एन्जॉय करत होतो. मी अमेयला म्हणलं बहुदा आपण झालोय अक्लटमाईज.
मग नाष्ट्याला जमलो आणि झोंगरी टॉप करून आलेल्यांच्या मोबाईल, कॅमेरात फोटो बघीतले आणि थोडी हळहळ झाली.

=

=

फारच भारी सिन होता तिकडून बघायला. उगाचच आपल्याला जाऊ दिले नाही असं वाटलं.
आज तसे निवांतच नाष्टा करत बसलो कारण आवरून कुठेही जायचं नव्हतं. मग कोणी कोणी कुठले कुठले ट्रेक केले असा विषय निघाला. तसे आम्ही सांगितले की आम्ही काय हिमालयात ट्रेक केले नाहीत. पण सह्याद्रीत भरपूर ट्रेक केलेत. मग ज्यांना अजिबातच काही माहीती नव्हतं त्यांना सह्याद्री, तिथले किल्ले, जंगल अशी थोडीफार माहीती दिली.
म्हणलं आमच्या इथे उंची फार नसली तरी एक्पोजर असते, चढही एकदम तीव्र असतात. आणि इथल्यासारखी वरती गावे नसतात. त्यामुळे आम्ही जातानाच सगळा शिधा घेऊन जातो. वरच्या गुहांमध्ये मुक्काम करतो, लाकुडफाटा वगैरे गोळा करून स्वयंपाक करतो आणि तिथेच झोपतो. गाईड वगैरे पण नसतो, आमचे आम्हीच ट्रेक प्लॅन करतो. असे आमचे १०० च्या वर किल्ले झालेत वगैरे.
झालं, याचा परिणाम असला भलताच झाला. दोन तीन बंगाली बाबूंना आमची कहाणी अद्भुत वाटली आणि त्यांनी अख्ख्या कँपभर आम्ही कसले भारी कसलेले ट्रेकर आहोत हे सांगायला सुरवात केली. इतकेच काय आमच्या लीडरलाही त्यांनी सांगितले, ये बहोत ही पहुंचे हुवे ट्रेकर है, खुद ट्रेक प्लॅन करके, रुट ढुंडते हुवे जाते है, केव्ह मै रेहते है, खाना भी खुद बनाते है....
हे ऐकल्यावर मला नर्मदा परिक्रमेत कसे साधू एकमेकांची ओळख करून देताना हे बहोत ही पहुंचे हुवे बाबा है म्हणातत त्याची आठवण झाली. असेही माझ्या वयामुळे आणि भरघोस पांढऱ्या दाढीमुळे मला बाबाजी हे टोपणनाव पडलं होतंच. नंतर कळलं की अमेयनेच हा शब्द कॉइन केला होता.

बाबाजी Happy

आता इतकी हवा झाल्यावर मला काहीतरी लाज राखणे आवश्यक होते कारण माझा आताचा चालण्याचा वेग आणि फिटनेस आणि आमची कसलेले ट्रेकर अशी पसरत जाणारी ख्याती हे समीकरण काय जुळेना. त्यामुळे ये सब बहोत साल पेहले की बात है, अभी बिलकूल ट्रेक नही करता (जे खरेच आहे) वगैरे सांगायला सुरुवात केली.
दरम्यान, असे कळलं की आज बंगलोरवरून आलेल्या कपलची अॅनिव्हर्सरी आहे. ते सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत बसले होतेच. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणलं, चांगलेच धाडसी आहात. लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला असल्या थंडीत, इतक्या उंचीवर, अवघड ट्रेकला घेऊन आलाय. मानलं पाहिजे. तर हसायला लागले, म्हणे ट्रेक झाल्यावर आम्ही जाणार आहोत सिक्कीम वगैरे फिरायला, तेव्हा करणार सेलिब्रेशन. मग त्यांनी पार्टी म्हणून काहीतरी स्पेशल करायचे ठरवले आणि आमचा सपोर्ट स्टाफ आणि बाकी लोकांना हाताशी धरुन मस्त. काहीतरी चाट पकोडी आयटम बनवला. वाह म्हणलं असा उत्साह पाहिजे. त्याबद्दल मग त्यांच्या आधीच्या किरकीरीबद्दल माफ केले.
दरम्यान, अजून एक अजब प्रसंग घडला तो म्हणजे माऊंटन कपलमध्ये झाला बेबनाव. यांच्याबद्दल मी पहिल्या का तिसऱ्या भागात लिहीले होते. नुसते प्रेमळ जोडपे आणि सदा एकमेकांच्या अंगचटीला. त्यामुळे आता एका टोकापासून एकदम दुसऱ्या टोकाला गेले. इतके की कँपवरच्या एकूण एक व्यक्तीला कळलं की यांचं वाजलं आहे म्हणून. एकमेकांपासून वेगळे न होणारे दोघे आता एकमेकांकडे बघायलाही तयार होईनात. एकजण नाष्ट्याला, जेवणाला आला की दुसरा निघून जाणार. टेन्टही बदलून घेतले. म्हणल अवघड आहे राव. असाही आमच्याशी ते कधी बोलायला आले नाहीतच त्यामुळे आम्हीही काय झालं याबद्दल अनभिद्ज्ञ होतो. जाऊ दे म्हणलं आपल्याला काय करायचं, गोंधळ का घालेनात म्हणत मग आम्ही त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
आज दिवसभर मोकळाच वेळ असल्याने काही जण मोकाट हिंडत होते, फोटोग्राफी करत होते, टाईमपास सुरु होता नुसताच.

अमेयच्या फोनवर झोंगरी कँपचा अप्रतिम फोटो मिळाला

आधी मी जेव्हा ट्रेक प्लॅन वाचला होता त्यात त्यांनी स्पष्ट लिहलं होतं की झोंगरीला एक दिवस रेस्ट आणि नंतर थानसिंग किंवा लामुनेला एक दिवस रेस्ट. त्यावेळी वाटलेल, अरे यार दोन दिवस नुसते बसून काढायचे, वाया घालवतोय हे दिवस वगैरे.
आणि तिथे बसून काहीही न करताना हेच मनात आलं आणि असं एक क्षण वाटलं की का आपण हा दिवस वाया चालला आहे म्हणून खंतावतोय. आपण रोजच्या धावपळीला, रोजचा दिवस प्रॉडक्टिव्ह असावा याला इतके आधीन झालोय का, की एक संपूर्ण दिवस काहीही न करता नुसता बसून काढणे आपल्याला वाया घालवणे वाटत आहे. इतका सुंदर निसर्ग आजूबाजूला आहे, क्षणोक्षणी हवा बदलते आहे, कधी उन्हे कधी ढग सगळं व्पापून टाकत आहेत, दूरवर बर्फाच्छदित शिखरे आहेत, समव्यसनी समविचारी लोकं आजूबाजूला आहेत. तरीही आपल्याला हा दिवस वाया घालवतोय असं वाटत असेल काहीतरी चुकतय हे नक्की

-

मग बाकी ट्रेकर मंडळीशी गप्पाटप्पा मारत बसलो. काहींना चादर ट्रेक केला होता तर काहीनी अजून काही आव्हानात्मक ट्रेक केले होते. त्यासाठी मग तयारी कशी केली, काय अनुभव आला, किती अवघड वाटलं वगैरे ज्ञान संपादन केले. बरीच माहीती पोतडीत जमा झाली.

दरम्यान, चेस वाली ट्रेकर तिचा चेसबोर्ड घेऊन आली आणि आम्ही कँटिनसमोरच मोकळ्यात एक लाकडी बाकडे होते त्यावर बसून खेळायला सुरुवात केली. बघता बघता खेळ इतका रंगला की आजूबाजूला आता अंधार पडायला लागला आहे हे ही उशीरा समजले आणि अंधार पडू लागताच थंडीचा कडाका कमालीचा वाढला. पण ती मात्र खेळ सोडून उठायला तयार नव्हती. त्यामुळे तसेच हुहु हिही कुडकुड करत खेळत राहीलो.

आता तर साफ अंधार झालेला, पण आमचा चेसबद्दलचा इतका उत्साह बघून प्रत्यक्ष लीडर आणि बुधाभाई त्यांचे हेडलँप लावून आमच्या दोन्ही बाजूला उभे राहीले, जय विजय सारखे. मग त्या प्रकाशात खेळत राहीलो. जेवणाची वेळ झाली तरी आमचा डाव काय संपेना म्हणल्यावर त्याने व्हेटो वापरत डाव गुंडाळून ठेवायला लावला. मग आम्ही बोर्ड आणि सोंगट्यांचा फोटो काढून घेतला आणि उरलेला जेवल्यावर किंवा उद्या खेळू म्हणत जेवायला पळालो.

हा भाग तसा लहानसाच झालाय. एकदा विचार आलेला नंतरच्या ट्रेकला जोडून एकच भाग बनवावा, पण मग तो खूप लांबलचक झाला असता. त्यामुळे आजचा दिवस विश्रांतीचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली Happy
फोटो सुंदर.. छोटा असला तरी छान भाग!
पहुंचे हुवे ट्रेकर है>>>>> Lol

हा ही मस्तं झालाय भाग. खुसखुशीत शैलीमुळे वाचायला मजा येतेय.
( पत्रकारितेमुळे असेल पण लेखणी खूपच भारी आहे राव)
फोटो सगळेच आवडले. टॉपला जायला पाहीजे होतं असं मलाही वाटलं.
चष्म्यावाल्याच्या (कोण ते माहिती नाही त्याबद्दल क्षमस्व) हातात ते हूक सारखे काय आहे ? माझ्या लक्षात नाही. बर्फात चालताना शूजला बांधायचं आहे का ?
#गेण्डरलेस# कपलचे तपशील मस्तच आहेत. त्यांच्यावर एक स्टोरी वेगळीच होईल.
(## शब्द सरांकडून उधार घेतला आहे)

धन्यवाद सर्वांना

शा मा - ती कवटी ची हाडे होती कुठल्या तरी प्राण्याची
बकरी किंवा तत्सम

मस्त खुसखुशीत लेख,
काही लोकांना थँडी, गरमी,आवाज गोंधळ,उजेड,मिट्ट काळोख,नवीन जागा ,दुपारची 3 तास झोप कशानेही फरक पडत नाही ,अंथरुणावर पडलं की झोप येते,माझा नवराही असाच, मला खूप खूप हेवा वाटतो अशा लोकांचा,

सगळे भाग एकत्र वाचुन काढले.. मजा आली.. मस्त लिहिलेय..

४० मिनिटात ५ किमि वाचुन ह्या स्पेक्ट्रमवर आपण आता कुठपर्यन्त ढासळलो आहोत हे तपासावेसे वाटले. असा एखादा ट्रेक करावा ही इच्छा बकेट लिस्टीत कुठेतरी अडगळीत पडुन आहे. तिची पुर्ती करण्यसाठी फिट्नेस हवाच ह्याची आठवण ह्या लेखान्नी झाली. फिटनेसवर काम सुरु करते परत. मनापासुन आभार.

काही लोकांना थँडी, गरमी,आवाज गोंधळ,उजेड,मिट्ट काळोख,नवीन जागा ,दुपारची 3 तास झोप कशानेही फरक पडत नाही ,अंथरुणावर पडलं की झोप येते>>>>
माझं सगळीकडे असं होतं नाही, पण ट्रेक आणि सायकल एक्सपीडिशन वर मात्र हमखास गाढ झोप लागते, फक्त शारीरिक पातळीवर दमणे आणि मानसिक पातळीवर शांतता हे कोम्बो फार साहिये

४० मिनिटात ५ किमि वाचुन ह्या स्पेक्ट्रमवर आपण आता कुठपर्यन्त ढासळलो आहोत हे तपासावेसे वाटले>>>
पाहिले का मग? काल मी लोकमत मॅरेथॉन ला गेलो होतो पण मी कव्हरेज ला गेल्याने धावलो नाही, सगळ्यांना पळताना खूप इच्छा झालेली मग उगाच थोडेसे अंतर सगळ्यासोबत धावून आलो

आपण productivity च्या आधीन असतो हे विधान फारच पटलं.>>> आणि अनेकदा टीव्ही, मोबाईल च्या नादात आपण किती वेळ घालवतो हे जाणवत नाही पण ते नसताना नुसतेच बसून राहणे हे वेळ वाया घालवणे वाटतं
निदान मला तरी असंच झालं

हा ही मस्तं झालाय भाग. खुसखुशीत शैलीमुळे वाचायला मजा येतेय.>>>>+१ , आशुचँप, मस्तच!

पहुंचे हुवे ट्रेकर है>>>>> Rofl

पूरक माहिती देऊ की नको याचा जरा विचार केला पण देतेच. अवांतर वाटलं तर सांगा काढून टाकीन Happy चष्मामंडिताने हातात धरले आहे ते बहुतेक गाईचे पेल्व्हीक बोन आहे. (पेल्व्हिक बोन म्हणजे मराठीत बहुतेक माकडहाड किंवा जे काही ढुं** चे हाड असते ते आहे. लिंक मधले शेवटाचे चित्र बघा.) गाईचे पेल्व्हिक बोन साधारणपणे माणसाचे पूर्ण तोंड झाकून टाकते. याचा उपयोग ट्रायबल जमाती "मास्क" तयार करण्यासाठी करत असत. हल्ली असे मास्क भिंतीवर शोपीस म्हणून वापरतात. घोडा किंवा बकरी यांचे पेल्व्हिक बोन असेच दिसते पण हे त्यामानाने जरा मोठे वाटते आहे. फॉरेस्ट रेंजर्स किंवा तत्सम जे अधिकारी असतील ते सहसा अशी हाडे सापडली की तपासतात - प्राण्याची शिकार झाली होती का.

घोडा किंवा बकरी यांचे पेल्व्हिक बोन असेच दिसते पण हे त्यामानाने जरा मोठे वाटते आहे>>>>

खेचराचे असू शकेल....???
बाकी माहीतीबद्दल धन्यवाद, अवांतर नाही काही