गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी - पूर्वार्ध २

Submitted by आशुचँप on 2 February, 2022 - 12:42

मुंबईला मामा-मामी कडे पोचलो तर वेगळाच प्रश्न समोर उभा होता. आमच्या आज्जी - आजोबांना आम्ही ट्रेकला चाललोय हे सांगितले होतो पण कधी ते नव्हतेच सांगितले. आणि ६ नोव्हेंबरला युकसुमला पोचायचे तर ट्रेनचा प्रवास लक्षात घेऊन आम्हाला ऐन दिवाळीतच बाहेर पडावे लागणार होते. ते कळताच आज्जीने मोडता घातला. काय कसलं सोन्यासारखी दिवाळी करायची आपल्या लोकांच्यात तर घर दार नसल्यासारखे बाहेर कसले जाता, डोंगरात. अजिबात जायचं नाही दिवाळी संपेपर्यंत. अरे देवा, तिची समजूत काढेपर्यंत नाकी नऊ आले. शेवटी आम्ही मित्राच्या घरी दिवाळी करणार आहोत ते खूप वर्षे बोलावत आहेत असे काहीतरी सांगून आम्ही तिला मनवले.

दरम्यान, ती दळभद्री आरपीसीटीआर टेस्ट केली. कारण ट्रेकच्या वेबसाईटवर आणि त्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये पुणे मुंबईवरून येणाऱ्यांना ती अनिवार्य असे लिहीले होते. उगाच त्यावरून राडा नको म्हणून बळच केल्या आणि त्या शेवटपर्यंत कुणी विचारल्या पण नाहीत. आम्हीच उगाच त्या टेस्टच्या प्रिंट काढून कुठे द्यायच्या ते विचारत होतो. आता आणल्याच आहेत तर ठेवा म्हणाले. त्या दरम्यान मला लक्षात आले की मी माझ्या एसएलआरची बॅटरी घरीच विसरुन आलोय. हाय रे दैवा हा काय घोळ झाला. आता काही करणेही शक्य नव्हते. नविन बॅटरी विकत आणणे किवा कॅमेरा घरी ठेऊन जाणे. बरे त्यांच्या बॅटर्याही स्वस्तात येत नाहीत. बरे घेऊन ती डबल बॅटरी बळच घरी पडून राहणार. नसता वैताग झाला. मग इकडे तिकडे कुणाकडे आहे का तात्पुरती घेऊन जायला बॅटरी अशी शोधाशोध केली तर आपल्या मायबोलीकर जिप्स्याने धक्काच दिला. मला म्हणाला, माझ्याकडे नाहीय तुझ्या कॅमेराची पण तुला हवा असेल तर माझा कॅमेरा घेऊन जा. बापरे त्याचा नवा कोरा लाखभराचा कॅमेरा तो इतक्या विश्वासाने मला हिमालयात घेऊन जा सांगत होता. मला त्या विचाराचेच दडपण आले. मी म्हणलं मी नसतो देऊ शकलो इतक्या सहजपणे कुणाला. तर म्हणे, मला विश्वास आहे तु नीट वापरशील, एरवी कुणाला नसता दिला. मला असले बावनकशी मित्र जोडल्याबद्दल खरेच खूप बरे वाटले.

बावनकशी वरून आठवले. ट्रेकची तयारी सुरु असताना कुशलने त्याचे एक हिवाळी जॅकेट आणून दिले, एकदम जाडजूड. त्याचे वजन बघूनच मी ते न्यावं का न न्यावं असा विचार करत होतो. पण मुंबईपर्यंत नेलं आणि तिकडे जाऊन अमेयला विचारले हे घेऊ का रे सोबत. तो एकदम उडालाच, म्हणाला अरे हे मामुट चे जॅकेट आहे, कुणी दिले, म्हणलं मित्राने. मला म्हणाला उच्च दर्जा. इथल्या मार्केट मध्ये १०-१२ हजारला असेल हे आरामात. हायला मी उडालोच. मग कुशलला फोन केला म्हणलं भावा अरे सांगशील का नाही, महागातले आहे जॅकेट म्हणून, तर म्हणे त्यात काय सांगायचे. तोच प्रकार आपल्या हर्पेनचा - त्याच्या चादर ट्रेक दरम्यान त्याला पोंचो चे महत्व कळले होते त्यामुळे त्याने मला आधीच बजावून ठेवले होते की त्याच्याकडचे पोंचो घेऊन जा म्हणून आणि मी आळस करीन अशी खात्री वाटल्याने मित्रासोबत तो पोंचो, हेडलँप, आणि अँटी फंगल पावडरचा अक्खा डबा पाठवून दिला घरी. म्हणाला तिथे १२ दिवस हीच अंघोळ, भरपूर पावडर लाव सगळीकडे. आणि त्याची सूचना शिरोधार्ध मानून रोज पावडरने अंघोळ करत होतो आणि एरवी ट्रेक दरम्याने जे रॅशेस येत यायचे ते अजिबातच आले नाहीत. आणि या सगळ्या मित्रांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच रहायला आवडेल मला.

आता पुढचा धक्का होता प्रवासाचा. आम्हाला दोघांनाही प्रवासाची आणि त्यातूनही ट्रेन प्रवासाची विलक्षण आवड आहे. त्यामुळे आम्ही विमानाचे न करता मुद्दाम इतका लांब प्रवास डुरांतोने करायचे ठरवले. मस्त खायचे प्यायचे, ब्लॅंकेट घेऊन पडून रहायचे अशी सुखस्वप्ने बघत स्टेशनवर पोचलो तेव्हा शॉक. कोविड मुले आता गाडीत खायला प्यायला, चादर ब्लॅंकेट उशी काहीही देत नाहीत आणि हे तसे बुकींग करताना मेसेज केलेला होता म्हणे, आम्ही दोघांनीही तो पाहिला नाही आणि हा प्रवास एन्जॉय करायला म्हणून रेल्वे निवडलेली तिकडेच असा पचका झाला तयामुळे बेक्कार मूड ऑफ झाला. सगळी मज्जाच गेली राव. भयानक चिडचिड आणि स्वताचच राग येत होता की असा कसा बावळटपणा केला आपण. कितीतरी वेळ कोणाशी बोलू नये असे वाटत होते. आता रात्री अंगावर काय हा प्रश्न होताच. मला झोपताना पातळ का होईना चादर लागते अंगावर त्याशिवाय विचित्र वाटते. आणि त्या एसी डब्यात चांगलेच गार झालेले. त्यात दरवाजाला लागूनचा साईड बर्थ माझ्या वाट्याला. सतत कोणीतरी खडाड करून दार उघडून यायचे किंवा जायचे. त्यात एक भक्कम बाईने झोपेच्या अंमलात इलेक्ट्रिक पॅनेल का काहीतरी होते तेच दार जोर लावून उघडले. त्याच्या खिट्टीसकट ते खाली आले. मग मी आणि अजून एकाने ते कसेतरी खटपट करून जागेवर बसवले पण गाडीच्या हेलकाव्याने ते मधेच खाली यायचे आणि मला त्या आवाजाने जाग यायची. एकूणात फारच वैताग झाला.

शेवटी सॅकमधले गरम कपडे अंगावर घालून तसाच गुरफटून कसा तरी वेळ काढला. रात्री एक स्टेशन वर जेवण मिळाले पण दुसऱ्या दिवशीचा प्रश्न होताच. तो दिवस होता नरकचर्तुदशीचा. अभ्यंगस्नान वगैरे विषयच नव्हता पण भल्या पहाटे उठून मस्त ब्रश वगैरे करून फराळ करायला घेतला. आई आणि माझ्या मामीने आम्हाला बॅग भरेल इतका फराळ दिला होता, तो असा उपयोगी पडला, चकल्या, करंजी, लाडू, चिवडा - वाह वा, घरापासून दुर असूनही घरी असल्याचा फिल आला.

आणि त्या अख्ख्या दिवसभर आम्हाला काहीही मिळाले नाही दुसरे. एका सहप्रवाशाने सांगितल्यानुसार अॅप डाऊनलोड करून त्यावर जेवण ऑर्डर केले. ते आपल्या डब्यात, जागेवर आणून देतात म्हणे. कुणीही आले नाही. नशिबाने पैसे भरले नव्हते. दिवसभर फक्त फराळ खात राहीलो, आणि अधून मधून चहा कॉफी वाले फिरत होते त्यांच्याकडची कॉफी रिचवत राहीलो.

अशाच अंबलेल्या चिंबलेल्या अंगाने कोलकाता गाठले. रुमवर बॅगा टाकून तडक जेवायला गेलो.

माझी एक मैत्रीण कोलकतावासी आहे, तिने सजेस्ट केलेले हॉटेल अर्सलान जवळच होते आणि खूप प्रसिद्ध होते म्हणे. बरेचदा ही अशी ठीकाणी ओव्हरहाईप्ड असतात असा अनुभव, पण हे अपवाद निघाले. अक्षरक्ष जिभ आणि पोट तृप्त झाले इतके सुंदर चिकन, बिर्याणी आणि वरती फिरनी. तुडुंब पोटाने रुमवर आलो तर वेगळा वैताग. बेसिन तुंबलेले. मग मॅनेजर ला कळवले तर त्याने माणूस पाठवला. त्याने खिटपिट करूनही काही जमेना तासभर, तेव्हा म्हणाला रुम बदलून देतो. मग त्या अजस्त्र सॅक घेऊन गेलो दोन मजले उतरून तर त्या खोलीची कळा आधीच्या खोलीपेक्षा वाईट, कसला तरी वास मारत होता. म्हणलं आधीची चालेल निदान झोपायला बेड तरी चांगला होता. मग परत त्या खोलीत. मग कळलं गरम पाणी येत नाहीये . परत खटपट किटकीट, मग मॅनेजर म्हणाला परत रूम वेगळी देतो, आता अमेय जाऊन बघून आला दोन तीन रूम पण सगळ्या भयानक आहेत म्हणाला. यात साडेबारा वाजून गेले म्हणलं एक एके बादली गरम पाणी आणून दे कसेतरी. हो हो म्हणत त्याने शेवटी रात्री एक वाजता कोमट पाणी आणून दिले त्यात केल्या कशातरी अंघोळी आणि झोपलो.

दुसरा दिवस काही विशेष नाही. रहायला पार्क स्ट्रीटला होतो, तिथे फिरलो चालत, खादाडी केली, व्हिक्टोरिया मेमोरियल, प्रिन्सेप घाट असं काहीबाही पाहिलं.

माझी मैत्रीण भेटायला आलेली, ती काही काळ पुण्याला राहीली होती आणि तीला मग सांभाळून आणलेली चितळे बाकरवाडी दिली, जाम खुष. जेवायला गेलो, भरपूर गप्पा आणि बियर आणि जेवणाच्या नादात किती वाजलेत लक्षातच नाही, 10 वाजता ट्रेन होती आणि 9.30 ला आमची जेवणे सुरू होती. घडाळ्याकडे नजर गेली तर हबकलोच. पटापट पुढचं जेवण पार्सल केलं आणि टॅक्सी शोधायला धावत सुटलो. कसेतरी एकाला पटवला, वाटेत आमची रूम होती तिथून बॅगा उचलल्या टॅक्सीत टाकून स्टेशन गाठायचं आटापिटा. आता तुफान वेळेची शर्यत. एकेक मिनिटं इतका महत्वाचा होता, ही ट्रेन मिस झाली असती तर ट्रेकच बोंबल्ला असता. आपण इतके कसे निवांत बसलो म्हणून चिडचिड होत होती. अक्षरशः गाडी सुटायला एक मिनिटं बाकी असताना स्टेशन मध्ये आलो आणि फुल्ल स्पीड ने सॅक पाठीवर घेऊन दौड मारली. वाटेत सरको खिसको असा आरडाओरडा सुरुच होता. वाटेत येणाऱ्या लोकांना ढकलत कसेतरी गाडीपर्यंत आलो तर ती सुटलीच होती. अमेय माझ्यापेक्षा फास्ट, तो पळत गेला स्पीडने आणि गाडीत चढला आणि त्याला मी ओरडून म्हणलं हात दे. माझा श्वास पार गेला होता, ते वजन घेऊन मी अजून पाच पावले पळू शकलो असतो जास्तीतजास्त. मग तो दारातून बाहेर आला अर्धा आणि हात पुढे केला आणि तो धरुन मी कसाबसा आत घुसलो. डीडीएलजे चा सिन झाला पार, फक्त काजोल ऐवजी दाढीवला मी. आणि त्यावर बेक्कार हसलो. Happy

या गाडीत पण तोच वैताग होता, ना ब्लँकेट ना काही, पण यावेळी मानसिक तयारी होती. कशीतरी रात्र काढली. म्हणजे माझ्या मते कशीतरी कारण अमेय म्हणाला तु छानपैकी घोरत होतास. म्हणलं असेल बाबा. सकाळी न्यु जैपैगुरीला पोचलो. तिथेच आम्हाला ट्रेक वाल्यांच्या गाड्या न्यायला येणार होत्या. पण नंतर कळलं की त्यानी हे काम स्थानिक जीपचालकांना आऊटसोर्स केलं होतं त्यामुळे सगळेच इथे जमून मग युकसुम ला जाणार नव्हते तर काही थेट युकसुमला पोचणार होते. मग त्या प्रचंड गर्दीत आणि बाहेर पार्किंगमध्ये त्या जीपवाल्यांना शोधायची खटपट. समोरच आमच्यासारखी भली थोरली सॅक घेऊन जाणारी मुलगी दिसली. म्हणलं तिला फॉलो करू तर ती फोन लावत होती आणि माझाच फोन वाजला. आयोजकांनी येणाऱ्या सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप केला होता. त्यात बहुदा आशिष म्हणून माझं पहिलं नाव असाव. तिने मलाच विचारलं ये कहा पै जाना ना गाडी के लिये. मला त्यावेळी अक्षरश फिल्मी डायलॉग मारायाची प्रचंड उबळ आलेली. की पलट म्हणून. पण ओळख ना पाळख, उगाच आपदा, म्हणून म्हणलं आम्ही इथे इथे उभे आहोत. हो ना भलतीच कुणीतरी असली तर काय घ्या. पण तीच निघाली.

मग अजूनही बाकीचे इकडे तिकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने उभे ट्रेकर दिसले. त्यांना सगळ्यांना जमा करून आणि जीपवाल्याला शोधून आम्ही निघालो. न्यु जैपैगुरी ते युकसुम अंतर आहे २५० किमी. पण हिमालयात अंतरावर कधीच ठरवता येत नाही. आणि अपेक्षीत होते तसेच झाले. या प्रवासात अक्षरश अख्खा दिवस गेला.

वाटेत कुठल्यातरी ठेल्यावर मोमो, आणि महास्फोटक चवीची चटणी खाल्ली. लेमन टी प्यायलो आणि जीपमध्ये कोंबुन प्रवास संपायची वाट बघू लागलो. सहप्रवासी ट्रेकर सगळे बंगाली होते आणि त्यांची अखंड टकळी सुरु होती. टकळी थांबली की पेंगायचे, उठले की परत बडबड सुरुच.

मला ओड्याची आठवण येत होतीच. एके ठिकाणी थांबलो होतो तिथे हा भुभ्या होता, त्याला ये म्हणलं जवळ तर येउन चिटकलाच. मलाही इतकं बरं वाटलं आणि त्यालाही

युकसुमला पोचलो तो पार अंधार झालेला. तिथे आमच्या स्वागताला एकजण उभा होता. त्यांना विचारलो ट्रेक लीडर किधर है, तर म्हणे मै ही हू, मेरा नाम है राहुल, नाम तो सुना ही होगा..... च्या मायला या शारुखच्या सगळीकडे फिल्मीपणा करत पोचलाय. कालपासून त्याला नुसत्या उचक्या लागत असणार.

असो, तर गेल्या गेल्या रुमचे वाटप झाले. चार पाच जणांना मिळून एक खोली दिली होती. त्यामुळे चार्जिंगसाठी जोरदार मारामारी झाली. एक बंगलोर वरुन आलेला त्याने पार आयोजकांना धारेवरच धरले. म्हणे साधे चार्जिंग नाही देता येत. त्यावर ट्रेक लीडर म्हणाला, ट्रेकला आलाय पिकनीकला नाही, इथे गैरसोय होणारच. तर म्हणे, ट्रेक उद्यापासून सुरु आहे, आज मला चार्जिंग मिळालंच पाहिजे. यावर ट्रेक लिडर हरलाच. मग जेवणाच्या वेळी ओळख परेड झाली. टोटल २४ जणांचा ग्रुप होता आणि बहुसंख्य २०-३० वयोगटातले होते. चाळीशी पार केलेले आम्ही तिघेच. त्यातले दोन डॉक्टर होते. बऱ्याच लोकांनी या आधी हिमालायातले ट्रेक केले होते. आमच्यासारखे पहिल्यांदाच उठून गोएचला करणारे अगदी कमी होते. ट्रेकसाठी कुणी काय काय तयारी केली हे पण सांगा असे लीडर म्हणल्यावर एकीने सांगितले मला कामातून जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मी बॉडीला रेस्ट देण्यासाठी भरपूर झोपले. यावर लीडर ने बहुदा मनात डोक्यावर हात मारुन घेतला असावा. मी मात्र खुष झालो, असाच वल्ली ग्रुप हवा ट्रेक करायला, तर धमाल येते. थंडी होती तशी बऱ्यापैकी पण लीडर म्हणाला हे ट्रेकमधले सर्वात उबदार ठिकाण आहे. जसेजसे आपण जाऊ वरती तशी थंडी वाढत जाणार आहे. झोंगरीला मायनस ८ आहे तापमान आत्ता. ते ऐकून पोटात गोळाच आला. पण म्हणलं आता आलोय तर जायचं. इतके लांब आलोय तर माघार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचे म्हणून सगळी आवराआवरी केली आणि रुममधल्या उबदार रजाया घेऊन गपगार झोपलो.

बेस कँप ट्रेकची कहाणी - पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80987

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेकचे वर्णन वाचण्यासाठी इच्छुकांची निराशा होईल. पण हे कुठंतरी लिहून ठेवायचे होते मला, पुढचा भाग नक्की ट्रेकचा असणार आहे. Happy

उत्कंटा वाढत चालली आहे.
नाम तो सुना ही होगा >>> Lol
दिवाळी >>> Lol
जिप्सीला सॅल्युट !! डीएक्सएलआर आहे ना ?
ट्रेन चे फोटो पाहून आत्ता निघावेसे वाटतेय.

हा भाग भारी आहे. एकसे एक किस्से घडले की.

जिप्सीच्या दिलदारपणाचं खरंच कौतुक. भारीच काम.

मस्त चाललय वर्णन, मधे भुभ्याचा फोटो पाहिल्या पाहिल्या म्हटल ओड्याची आठवण तुम्हाला स्वस्थ बसु देत नसेल.

बाप रे पहिलेच २ दिवस चांगलेच खडतर झाले की.
राहुल नाम तो सुना होगा >>>> तुम्हाला तुमच्या लाडक्या त्या ह्यांची आठवण झाली का मग Lol

ट्रेन पकडण्याचा अनुभव डेंजर आहे!! आम्ही चक्राता कँपसाठी दिल्लीहून ट्रेन पकडली होती तेव्हाची आठवण झाली. अगदी धावती गाडी नव्हती पकडली, पण थोडा जरी अजून उशीर झाला असता तर गाडी चुकलीच असती शंभर टक्के.
पुभाप्र.

कसलं भारी लिहिताय.... समोरासमोर बसुन मांडा ठोकुन कोणीतरी गप्पा मारतय आपल्याशी असा फील आला......
आज्जी एकदम भारी टिपिकल डायलॉग... "काय कसलं सोन्यासारखी दिवाळी करायची आपल्या लोकांच्यात तर घर दार नसल्यासारखे बाहेर कसले जाता, डोंगरात." हा हा हा....
मामुट चे जॅकेट >> म्हणजे काय ? कंपनी आहे का ही कसली तरी भारी ?
दाढिवाली काजोल .. ही ही ही....
एकीने सांगितले मला कामातून जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मी बॉडीला रेस्ट देण्यासाठी भरपूर झोपले. >> यांनी केला का पूर्ण ट्रेक ? या हिशोबाने मला पण जमेल का काय ट्रेक मग ? Wink

धन्यवाद सर्वांना

डीएक्सएलआर आहे ना ?>>>
हो त्याच्याकडे 80डी आहे बहुदा, मला तो न्यावा लागला नाही कारण दुसरीकडे बॅटरी मिळाली माझ्या कॅमेराची. मला ते बरेच झालं की जिप्सी ला जेवढा माझ्यावर विश्वास होता त्याच्या दहा टक्के पण माझा माझ्यावर नाही Happy

ओड्याची आठवण तुम्हाला स्वस्थ बसु देत नसेल.>>>
नाही ना, मी तर न राहवून तीन चार वेळा व्हीडिओ कॉल केला त्याला बघायचं म्हणून
बायको म्हणे स्वतःच्या मुलाला तरी इतके फोन केले का कधी, बायको तर सोडूनच द्या Happy

तुम्हाला तुमच्या लाडक्या त्या ह्यांची आठवण झाली का मग>>>
फारच, त्यानाही उचक्या लागल्या असणार जोरदार Happy

ट्रेन पकडण्याचा अनुभव डेंजर आहे!! >>>
माझाही पहिलाच अनुभव कारण मला स्टेशन, रेल्वे इतकी आवडते की मी गाडीच्या वेळेच्या खूप आधीच जातो स्टेशनला
पुलं म्हणतात तसे ते एक स्वतंत्र विश्व आहे आणि मला जाम आवडतं ते. असला प्रकार पहिल्यांदाच

यांनी केला का पूर्ण ट्रेक ? >>>
हो हो सगळ्यांनी केला, सगळ्या दमदार चालणाऱ्या होत्या
म्हणजे थोडी रडारड, हशहुश झालं पण एरवी पिकनिक छाप पब्लिक असतं तसला कोणी नव्हतं, अर्थात ते असल्या ट्रेक च्या वाट्याला जात नाहीत ही गोष्ट वेगळी

कंपनी आहे का ही कसली तरी भारी ?
हो मामुट हा स्विस ब्रँड आहे, गिर्यारोहण क्षेत्रात एकदम नावाजलेली
त्यांची जॅकेट्स खूप प्रसिद्ध असतात म्हणे, मलाही नव्हतं माहिती
पण अमेय म्हणाला युरोपात खूप मागणी असते मामुट ला

भारीच.
पहिल्याच फोटोतल्या "पोटर्‍या" ओरडुन ओरडुन सांगत आहेत की त्या सायकलपटुच्या आणी ट्रेकरच्या आहेत.

दोन्ही भाग वाचले. एकदम चित्रदर्शी वर्णन. मस्तच लिहिता.
ओडिन मिस करत असेल या वेळेत तुम्हाला

ओडिन मिस करत असेल या वेळेत तुम्हाला>>>
खूपच आणि त्याच्यापेक्षा मीच जास्त
जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा व्हीडिओ कॉल करायचो
बायको म्हणाली कधी आम्हाला नाही इतके कॉल केले आजतागायत Happy

पहिल्याच फोटोतल्या "पोटर्‍या" ओरडुन ओरडुन सांगत आहेत की त्या सायकलपटुच्या आणी ट्रेकरच्या आहेत>>>>

Happy तो अमेय आहे, पण तोही पट्टीचा ट्रेकर आणि सायकलिंग करणारा आहे त्यामुळे निरीक्षण अगदी परफेक्ट

<<एकीने सांगितले मला कामातून जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मी बॉडीला रेस्ट देण्यासाठी भरपूर झोपले.>> Lol

<<जिप्सीच्या दिलदारपणाचं खरंच कौतुक. भारीच काम.>> +1.

Pages