गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस ५ थानसिंग

Submitted by आशुचँप on 22 April, 2022 - 15:05

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका
https://www.maayboli.com/node/81267
दिवस ३ झोंगरी
https://www.maayboli.com/node/81417
दिवस ४ मुक्काम झोंगरी
================================================================

झोंगरीमधली दुसरी रात्र चांगलीच गारठवून टाकणारी होती. कधी नव्हे ते मला रात्री जाग आली आणि अजून एक लेयर घ्यावा असे मनात आले. पण त्यासाठी करावा लागणाऱ्या व्पाप लक्षात घेता मरू देत, म्हणत अंगाचे मुटकुळे करून झोपून गेलो.

गंमत म्हणजे, एक रात्र थंडीत काढण्यावर बंगलोरच्या ट्रेकरची अवस्था बिकट झाली होती. त्यांना अजिबात सवय आणि कल्पना नसावी बहुदा. त्यांनी हे लीडरला सांगताच तो म्हणाला, इथले लोकल त्यांच्या लाकडी खोपटात भुश्शाचे बोर्ड करून झोपतात. आम्हीही आपल्या डायनींग रुमच्या बाजूला अशा दोन रुम्स ठेवल्या आहेत पण त्यासाठी वेगळा चार्ज लागतो कारण हे संस्थेतर्फे नाही तर इथल्या स्थानिक लोकांकडून चालवले जाते. यावर बंगलोरचे ट्रेकर बिनाशर्त तयार झाले आणि टेंटमधून चंबुगबाळे उचलून खोल्यांमध्ये शिफ्ट झाले. ते गेले म्हणल्यावर अजून दोघे मग अजून एक. शेवटी खोल्या आणि बेड संपले सांगितल्यावर परत तंबुत आले.
मला आणि अमेयला कुतुहल होतं ते भुश्शाचे बोर्ड काय आहेत म्हणून स्पेशली ते बघायला गेलो तर चक्क लाकडी चौकटी आणि त्यात आपला काथ्थ्या दाबून बसवलेला. ते बघूनच खूप अनकंफर्टेबल आहे असं जाणवत होतं, बसल्यावर खात्रीच पटली.

निव्वळ या बोर्डसाठी जास्तीची रक्कम भरून हे लोकं राहत आहेत याबद्दल मनोमन त्यांना दंडवत घातला. आणि आपला टेन्ट बरा म्हणत गेलो. आणि खरोखरच ट्रेक द हिमालयाज ने कसलीही कसूर ठेवली नव्हती क्वालीटीमध्ये. टेन्ट, स्लिपींग बॅग, लायनर सगळं ए-वन क्वालीटीचे होते. त्यामुळे माझी आणि अमेयची कशाच बद्दल काहीच तक्रार नव्हती. माझ्यासाठी तर हे सगळं रॉयल ट्रेक असल्यासारखंच होतं. पण लोकांना कुरकुर करायला काहीही कारण लागतं हे कळलं आणि अशा लोकांकडे मग साफ दुर्लक्ष केलं.

कालचा दिवस आरामात घालवल्यावर सगळेच आता चार्ज झाले होते. मग लीडर आला आणि त्याने आजच्या वाटचालीची माहीती दिली. आम्ही होतो झोंगरीला १३ हजार फुटांवर आणि जाणार होतो थानसिंगला, तेवढ्याच उंचीवर. पण वाटेत कोकचुरंगला दरीत उतरावे लागणार होते. ते होते १२ हजार फुटांवर, म्हणजे एक हजार फुट उतरून तेवढेच परत चढायचे होते.
लीडरने सांगितले, “ज्यादा कुछ नही, बस एक पहाडी उतरने के बाद एक थोडीसी पहाडी चढने को है.”
ते ऐकून मला वाऱ्यावरची वरात आठवली.
“एक डोंगर चढायचा, एक उतरायचा, की पायथ्याशी गावडेवाडी” (वाटेत एक ओढा पण आहे हो )
आज आपण लवकर पोहचू असा लीडरने विश्वास दिला आणि त्यामुळे पॅक लंच नव्हते, जेवायच्या वेळेपर्यंत आपण थानसिंगला असू असे मोठ्या खात्रीने त्याने सांगितले आणि प्रत्येकाला एकेक पर्क कॅडबरी, एक बिस्किटाचा पुडा दिला. त्यावेळी मी काही बोललो नाही पण असे वाटले की चॉकलेट, बिस्किटे, कॅडबरी देण्याच्या ऐवजी स्थानिक फळे किंवा तत्सम हेल्दी काही दिले असते तर जास्त चांगले. पण कदाचित शहरी लोकांना हेच आवडत असेल अशी त्यांची इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर धारणा झाली असावी. कितीही म्हणले तरी शेवटी हा धंदा आहे. त्यामुळे मग मुकाट सॅकमध्ये टाकलं आणि चालू पडलो.

झोंगरीहून निघालो तो एकदम डोंगरावरच चढाई करायला. झोंगरी हे तसे चारीबाजूने डोंगराने वेढलेले ठिकाणी, बशीसारखे खोलगट. त्यामुळे पहिल्या दहा पावलात डोंगर सुरु झाला आणि संपेचना. वळणे वळणे घेत वाट चाललीच आहे वर वर. आम्ही चार्ज होऊन मारे निघालो होतो पण रेडमी सॅमसँगची बॅटरी कशी एका क्षणाला १०० टक्के आणि दहा मिनिटांनी ५० टक्के दाखवते तसा प्रकार झाला. पहिल्याच चढाने चांगलाच जीव काढला...


-

-

त्यात मी गाढवपणा म्हणजे रात्री थर्मल घातलेलं अंगात आणि ते न काढताच वरती अजून दोन लेयर घातले. त्यामुळे वरून थंडी आणि आतून घामाने भिजलेलो. म्हणजे जो बावळटपणा करायचा नाही हे आम्हाला लीडरने निक्षून सांगितले होते तोच मी केला होता. आता पर्याय नव्हता, कारण हे असेच अंगात घालून गेलो असतो तर स्वत:ची अजूनच वाट लावून घेतली असती. त्यामुळे कसातरी चढ संपवला आणि वरती थोडी सपाटी लागताच थांबलो आणि महिला मंडळ पुढे जाण्याची वाट पाहू लागलो. ते पुढे जाताच पटकन जॅकेट आणि वरचे लेयर काढले, थर्मल काढले आणि तेवढ्यात लीडर आलाच.

“अरे क्या कर रहे हो??”...त्याने लांबूनच आरडाओरडा केला.

मी मनाशी ठरवून ठेवलेल्या निरागसपणाने उत्तर दिले, “वो मै थर्मल्स निकालना भूल गया”

“अरे ऐसा नही करते, वो नीचेही निकाल देते ना, अभी उपर हवा चल रही है, फटाकसे बीमार हो जाओगे...”

यावर मी खाली कशी थंडी वाजत होती, मग चढ कसा होता, आणि पुरेसा वॉर्मअप न करता एकदम चढायला सुरुवात केली, ग्रॅडीयन्ट आणि वरती आल्यावर आता लक्षात आले आहे पण आता कंटिन्यू करू शकत नाही हे सगळं माझ्या दिव्य हिंदीत त्याला सांगितले. त्या सात आठ हिंदीसारख्या वाटणाऱ्या वाक्यांनी तो जेरीस आला आणी म्हणाला “अच्छा अच्छा जल्दी करो.”
आता डोंगर चढून आल्यावर मस्त सपाटी होती आणि एका रिजवरून पायवाट सरळसोट भलेमोठे पठार तुडवत क्षितीजापर्यंत चालली होती. झोंगरीच्या खोलगट बशीतून एकदम गच्चीत आल्यासारखे वाटावे असा सीन. तीन्ही बाजूनी बर्फाच्छदित डोंगर दिसत होते पण ते असे लांबवर एकदम आणि आश्वासक प्रेमळ वाटत होते.

सकाळची कोवळी उन्हे, थंडगार बेताची आल्हाददायक हवा आणि कालची भरपूर विश्रांती यामुळे सगळेच एकदम खुषीत होते. पहिला डोंगर चढताना जी काय हाफहुफ झाली ती पण या सपाटीवरून चालायला सगळ्यांना धमाल येत होती आणि मग फोटोंना उत आला नसता तरच नवल.

सगळ्यांचे पटापट कॅमेरे क्लिकक्लिकत होते. ग्रुप फोटो, सोलो फोटो, वेगवेगळ्या पोझेज मधले फोटो असं सगळं सुरु होतं. मी आणि अमेय कधी नव्हे ते एकत्र होतो नैतर तो कायम पहिल्या सुसाट लोकांसोबत चालायचा आणि मी मागच्या मधल्या मध्यमगती गटात. जिथे थांबलेले असू तिथेच भेट व्हायची आणि परत पुढे चालू लागायचो.

मग आज आम्ही काही एकत्र फोटो काढून घेतले. एक मुलगी माझ्यासोबत फोटो काढते म्हणाली. म्हणल काढायचा तर नीट जवळ उभी रहा म्हणजे मला तो फोटो बायकोला दाखवून तीला जळवता येईल. यावर ती खळखळून हसली आणि छान फोटो काढून घेतला.

आता लीडर ओरडायला लागला, चला आटपा म्हणून. त्याचेही बरोबर होते, आम्हाला मोकाट सोडले असते तर आम्ही दिवसभर टाईमपास केला असता. मग चालत चालत काही जण फोटो काढत निघालो तोच त्याने दम भरला. आता म्हणाला आपल्याला चांगला उतार लागणार आहे. हा उतार सोपा नाहीये, फोटो काढण्याच्या नादात काहीही होऊ शकते त्यामुळे खाली कोकचुरंगला गेल्यावर मगच कॅमेरा, मोबाईल बाहेर काढा. त्या आधी मला दिसला तर जप्त होईल.
हायला हे काय नवीन म्हणत आम्ही मोबाईल सॅकमध्ये टाकून दिले. आणि कोकचुरंग येईपर्यंत काढलेच नाहीत. अर्थात लीडरचे बरोबर होते. ती वाट होतीच अवघड. एकतर तीव्र उतार, बाजूने महामूर झाडी, बर्फाचे वितळलेले पाणी दगडावरून, झाडातून वाहत होते त्यामुळे निसरडे झाले होते. त्यामुळे जरा लक्ष इकडे तिकडे झालं तर घसरगुंडी निश्चित. त्यामुळे सगळे गपगुमान पायाखाली लक्ष देत चालत होते. पण ती वाट काही संपेना.

सह्याद्रीमधली एखादी नाळ उतरावी असाच तो सीन होता. म्हणजे लांबवर नदीचा खळखळाट ऐकू येत होता पण दिसत काही नव्हती. एरवी बडबड करणारे बंगाली पण आज त्यामानाने कमी बडबड करत होते. आज बुधाभाई लीड करत होते आणि लीडर सगळ्यांच्या मागून येत होता म्हणूनही असेल कदाचित.

तो तीव्र उतार पार करताना सगळ्यांच्या पायात पेटके आले, कंबरेचे टाके ढिले झाले, एकेक पाऊल नको वाटायला लागले तरी वाट काही संपेना. त्यात काही जण अति सावधगिरीने चालत होते त्यामुळे मागची मंडळी खोळंबत होती. पण ती वाटच अशी होती की कुणी कुणाला ओव्हरटेक पण करू शकत नव्हते. त्यामुळे गपगुमान पुढचा सरकला की मग एकेक पाऊल टाकत होते. त्यामुळेही वाट ही अंतहीन वाटू लागली. वाट इतकी खोल चालली होती की जणू पाताळात उतरतोय. तब्बल एक तासाहून अधिक काळ उतरत राहील्यावर अखेर नदीचे दर्शन झाले. पण तरी तिथवर पोचायला अजून अर्धा तास लागला.

नदीपाशीच एक लाकडांचा साकव होता आणि एक लाकडी बांधकाम केलेली झोपडी. रहायला अतिशय रम्य ठिकाण. समोरच खळाळत फेसाळत चाललेली नदी

तो सिन बघून मला पुन्हा एकदा तिथेच मुक्काम करायची इच्छा बळावली. मी कधीतरी एक सिनेमा पाहिला होता त्यासारखेच दृश्य होते. समोर अशी खळाळती नदी, त्याच्या बाजूला कँप फायर, त्यावर चहाची किटली उकळत ठेवलीय, आडव्या तुळईला अडकावून, सोबत मित्र आहेत, धमाल सुरु आहे. काहीजण त्या फायरवर मस्त मासे बिसे भाजून खात आहेत, त्याचा असा खमंग वास दरवळतोय.

https://www.youtube.com/watch?v=XW3L1hfVtCo

असलं काहीतरी व्हायला पाहिजे अशी स्वप्ने रंगवतच मी तिथे टेकून बसलो असतानाच बंगलोरच्या जोडप्यापैकी बायकोने मुक्त कंठाने अश्रू ढाळायला सुरु केले. मी काय सगळेच दचकले. हे काय झालं, कुठ पडली वगैरे का काय. पण चौकशी केली असता कळलं की त्यांना हा ट्रेकचा स्ट्रेस आला होता. चालून चालून भयंकर दमत होत्या आणि आता फिजिकली त्यांना हे सगळं असह्य होत चाललं होतं. बापरे, म्हणलं ही माझीच स्थिती असली असती, थोडा सराव केला नसता तर. त्यामुळे माझी पूर्ण सहानुभुती होती त्यांना.

मग नवरा आणि त्याची बहीण यांनी मिळून कसे तरी समजावले. तोवर अमेयचे इकडे फोटोग्राफीचे प्रयोग सुरु होते. आयफोनवर जास्तीत जास्त भारी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी. आणि ते करताना एकदा त्याने चक्क त्या लाकडी ब्रीजवरून खाली वाकून आयफोन पाण्यात बुडवला. ते बघून त्याच्या मागे एक ट्रेकर होती ती मानसिक धक्क्याने अक्षरश: कोलमडली म्हणे.
थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे चालू लागलो. आता तर वाट अजूनच बिकट होती कारण ही प्रेकचू नदी पार करून आम्हाला पुढे जायचे होते. पुढे अंतरावर अजून एक लाकडी ब्रिज दिसत होता पण तिथवर जायला काही अंतर नदीपात्राच्या कडेकडेने जायचे होते आणि तिथे पांढरेशुभ्र गुळगुळीत गोटे पसरले होते. नदीने वरून वाहत आणलेले असणार. आणि त्यावर पाय तर सोडाच हात टेकवला तर सुळकन घसरत होता इतके स्मुद होते. त्यामुळे मधल्या बेचक्यात सांभाळून पाय ठेवत, पाण्याचे छोटे छोटे ओढे पार करत आणि त्यातल्या त्यात सपाट दगड बघून बेताने पावले टाकत एकेक जण पुढे जाऊ लागलो. त्यात सगळ्यात पुढे जे एक बंगाली डॉ होते त्यांनी सेफ रस्ता म्हणून जो निवडला तो भलताच निघाला आणि पाच दहा मिनिटांनी लक्षात आले की ही वाट पुढे कुठेच जात नाही. मग परत माघारी आलो. तोवर बाकीचे पुढे निघून गेले होते आणि जे आम्ही मेंढरागत डॉ च्या मागून जात राहीलो तितकेच मागे राहीलो.

ह्या म्हणलं यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही करत मी पुढे निघालो. त्या ब्रीजपाशी थोडे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि नदी पार करून चढणीवर लागलो.

https://www.youtube.com/shorts/RqGkC35As8g

एक डोंगर उतरून संपला होता आणि आता हा डोंगर चढला की थानसिंग. लीडरच्या मते आता इथून कँप फक्त २ किमीवर होता. पण इथले दोन किमी पण रग्गड असतात हे आता चांगलेच कळल्याने मी जास्त विचार केला नाही. पोचू तेव्हा पोचू करत चालायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मागे वळून पाहिले तर डॉ ट्रेकर विविध अँगलने फोटोग्राफी करत होते. त्यांना तिथे एक पक्षीही दिसला म्हणे. आणि नंतर कळले की ब्लड फेजंट हा सिक्कीमचा राज्यपक्षी इथेच जास्त दिसतो.

हायला, म्हणलं लोकं कसला अभ्यास वगैरे करून येतात. मी फक्त अंतर किती आणि चढ उतार किती असणार आहेत इतकचं बघून आलो होतो. अर्थात तेही काही चूक नव्हते म्हणा. सगळंच माहीती करून आल्यावर अनपेक्षीतपणे मिळणारा आनंद हरवल्यासारखा वाटतो मला. म्हणजे इथे आल्यावर समोर दिसणारा डोंगर हाच कांचनगंगा आहे हा आनंद किती छान होता. नैतर सगळं नीट अभ्यास करून आल्यावर अरे आला का कांचनगंगा, वा वा छान छान, असे म्हणतं पुढे गेलो असतो.
अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
असो, तर पुढे चालत राहीलो. आता झाले असे की पुढचे एकदम पुढे निघून गेले होते. मागचे फोटोग्राफीच्या नादात बरेच मागे राहीले होते आणि त्या वाटेवर मी आता एकटाच होतो. झोंगरीपर्यंत खेचरांची याकची रांग, ज्याला हे म्यूल ट्रेन म्हणत असत ती वारंवार दिसत असे, जाताना येताना आणि त्यांना बाजूला सरकून जागा करून द्यावी लागत असे. पण झोंगरीनंतर अद्याप एकही म्यूल ट्रेन दिसली नव्हती. पोर्टरही जास्त दिसले नव्हते. त्यामुळे त्या वाटेवर फक्त निसर्गाचा आवाज होता. आता नदीचा खळखळाट लांबवर गेलो होता. आता वाऱ्याची सळसळ, क्वचित ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज इतकाच काय तो राहीला होता. आणि त्या शांततेत मी मनाशीच गाणी गुणगुणत चालू राहीलो. दम लागला की थांबायचे, दोन दीर्घ श्वास घ्यायचे आणि पुन्हा चालू पडायचे.

पण एका टप्प्याला असे झाले की इतका वेळ जी अशी मळलेली वाट होती ती आता एकदम दगडधोंड्यात घुसली आणि वाट असे काही दिसेच ना. डेडएन्ड आल्यासारखा. पुढे नुसताच लांबवर चढ होता, झाडे होती, दगडांचा पसारा होता पण वाट काही नव्हती.
आता माझ्यापुढे प्रश्न पडला होता. काय करावं मागून येत आहेत त्यांच्यासाठी थांबून रहावं का आपलं आपण चालत रहाव. मी मग दुसरा पर्याय स्वीकारला. असेही भटकायची सवय असेल तर आपल्याला दिशा, वाटा यांचा एक बेसिक अंदाज यायला लागतो. कसा ते माहीती नाही, पण बरेचदा अंदाज बरोबर ठरतो. त्याला अनुसरून मी बिनधास्त पुढे जायला सुरु केले. खरेतर हिमालयात अजिबात करू नये अशी ही गोष्ट आहे. सह्याद्रीत एक वेळ चालू शकते कारण वाट चुकली तरी कुठून तरी कुठंतरी पोचतोच आपण. पण ही वाट पुढे कुठतरी असणार याची खात्री वाटत होती त्यामुळे त्या दगडधोंड्यातून उड्या मारत मी पुढे जायला सुरुवात केली. साधारण १० - १५ मिनिटांनी तो जंगल आणि दगडांचा भाग संपून पुन्हा पायवाट एका ओढ्याच्या दिशेने जाताना दिसली. भले शाबास असे स्वत:लाच म्हणून टाकलं.
तो ओढा होता चांगलाच रोरावणारा आणि त्यातल्या दगडांवर अगदी काळजीपूर्वक पाय टाकत मी आरामात पलिकडे गेलो. त्यावेळी मला वाटलंही नाही हे फार डेंजरस आहे वगैरे. पण जेव्हा आम्ही येत होतो परत तेव्हा लीडर, बुधाभाई आणि अजून एकजण यांनी पार साखळी वगैरे करून प्रत्येकाला पलिकडे पोचवले. त्याबद्दल विचारणा केली असती कळलं हा ओढा पुढे एकदम खाली दरीत कोसळतो. त्यामुळे इथं जर कोणी गेला वाहून तर गेलाच म्हणजे. हायला, म्हणलं अज्ञानात सुख असतं ते असं.
ओढा ओलांडताच एक चांगलाच अंगावर येणारा चढ होता. बाजूने अशी दगडाची कातळभिंत होती. त्याला लगटून वाट वर वर चढत होती. मी धापा टाकत त्या वाटेने वर चढलो तर तिथे मस्त मोकळी जागा. जिना चढून गच्चीत यावं तसाच प्रकार परत एकदा. तिकडे पुढे गेलेली सगळी मंडळी निवांत बसलेली. मला तर वाटलेलं की हे लोकं आता कँपला पोचले असतील. त्यामुळे त्यांना थांबलेले बघून दचकलोच.

तिकडे अजून एक गंमत म्हणजे, फेमस जोडपे पण बसलेलं आणि तेही एकत्र. म्हणलं हे कधी झालं. नंतर मग अमेयकडून तपशील कळला रात्री. बंगलोरच्या ट्रेकरनी आपल्या वयाचा आणि अॅनिव्हर्सरी असल्याचा वापर करत दोघांचे कॉन्सेलिंग केले, काय जी कुरबूर होती ती संपवली म्हणे. लोकांना काय अफाट उरका असतो राव. पण असो पुन्हा एकदा जोडपे एकत्र आलेले आणि खुषीत होते. त्याच खुशीत बाब्याने मला चक्क आपणहून पुढे येऊन मूठभर सुकामेवा दिला. एरवी कधीच कुणात न मिसळणाऱ्या बाब्याला इतका प्रेमळ झालेला बघून मला तर गहीवरूनच आले.

आणि त्यावेळी तो सुकामेवा अगदी पंचपक्वानासारखा लागला. तो खाताना मला जाणवले की सकाळी नाष्टा केल्यानंतर आपण काही खाल्लंच नाहीये. एक ती कॅडबरी पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात गडप झाली होती देव जाणे. बिस्कीटाने जाम तहान लागते आणि तोंड कोरडे पडते त्यामुळे मी ती खाल्लीच नव्हती. अमेय पण बसलेला निवांत. पण यावेळी मी त्याला काही बोललो नाही.

कोकचुरंगपासून कँप २ च किमी होता म्हणे. पण आतापर्यंत माझ्यामते किमान ४-५ किमी चालून झालेलं होतं आणि अजूनही कँप काही यायची चिन्हे दिसत नव्हती. कदाचित म्हणूनच कंटाळून हे लोकं निवांत आराम करत बसलेले. मग सगळे एकत्रितच निघालो. आता खरे तर सहनशक्तीचा मीटर पडला होता. मानसिकतेचा किती फरक पडतो आपल्यावर हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.
हे अंतर ६ किमी आहे सांगितले असते तर त्याप्रमाणे बापरे अजून इतकं जायचं आहे असे मनात आले असते पण किरकीर न करता चालत राहीलो असतो. पण दोनच किमी जायचं आहे हे एकदा मनाने घेतल्यावर दोन किमीनंतर शरीर नाही म्हणायला लागलं. पाय उचलेच ना. वाटेत दोन तीन पोर्टर दिसले त्यांनाही अजून किती लांब आहे असे भंडावून झालं.
आता नशिबाने चढ नव्हता पण वाट वर खाली, वळणे घेत लांबवर जाताना दिसत होती. कँप दिसत सुद्धा नाहीये म्हणल्यावर अजूनच वैताग येत होता. असेच अंतहीन कितीतरी वेळ फरफट झाल्यावर अखेरीस लांबून झोपडीसारखे दिसायला लागले काहीतरी. आणि खरेच आम्ही आलो थानसिंगला.

मी तर इतका दमलो होतो की तिथल्याच दगडावर पसरलो. तोवर लीडर पळापळी करत आलाच. चला म्हणे पटापट टेन्ट लावू, मग गरमागरम जेवुया. म्हणलं हे लोकं दमत कसे नाहीत. सतत कसा हा माणूस इतका फ्रेश असतो. मनातल्या मनात त्याला दोन तीन शिव्या दिल्या. पण त्याने काय होणार. मग चरफडत उठलो आणि कँपच्या साईटवर गेलो. ती इतकी लांब होती की विचारू नका. जवळपास पाव किलोमीटर अंतरावर आणि वाटेत एक बारका ओढा पार करून गेल्यावर भलेमोठे सपाट मैदान होते. थानसिंग हे थोडेफार झोंगरीसारखेच होते. पण झोंगरी सगळ्या बाजूने वेढलेले होते. इथे हे मैदान एका दरीच्या काठावर होते. खालून रोरावत नदी चालली होती. पश्चिमेला मैदान नजर जाईल तिथवर क्षितीजाला जाऊन टेकले होते आणि त्याच्या सीमारेषेवर शुभ्र पर्वतांची रांग दिसत होती. मागच्या बाजूने फक्त एक डोंगररांग होती. तोच पंडीम पर्वत आणि त्याच्या जवळपास पायथ्याशीच आम्ही वसलो होतो. ते सगळीकडे मोकळे विस्तिर्ण मैदान पाहून लक्षात आले, आज थंडीने शॉट लागणारे. आणि त्याची प्रचिती लवकरच आली.


-

पटापट टेंट लावले आणि जेवायला पळालो. जेवण करून मग तसा आरामच होता.

https://www.youtube.com/shorts/eo8CIS--RgI

टेन्ट लावतानाचा टाईम लॅप्स

इथेही आता तब्बल एक दिवस विश्रांती असल्यासारखीच होती. उद्या आता लामुने ला जायचे होते, ते अंतर आहे ४ किमी. त्यामुळे निवांत निघूनही चालणार होते. पण रात्री सगळी समीकरणे बदलली.

त्याचं झालं काय, सूर्यास्त होताच वातावरण एकदम झपाट्याने बदलले. एकदम फ्रिजरचा दरवाजा उघडून आत ढकलले तर कसे होईल तसे. इतका वेळ अशी फार थंडी वाटत नव्हती पण संध्याकाळी जे गारढोण वारे आले त्यांनी पार हाडं गोठवली. पटापटा सगळेजण गरम कपड्यात गुरफुटले. मी वुलन सॉक्स, थर्मल्स, वरती जॅकेट, कानटोपी, मफलर, ग्लोव्ज सगळं घालूनही कुडकुडत होतो. त्या मानाने अमेय निवांत होता.

बाहेर पडलो त्या थंडीने मला काही सुचेना. कसेतरी सुप प्यायला म्हणून वाटेतला ओढा ओलांडून पलिकडे डायनिंग रुमपाशी गेलो. जाताना मागे पाहिले तर आभाळ खाली उतरून आलेले. त्या धुक्यात समोरचे काही दिसेना.

आणि सूप पिऊन पुन्हा ज्यावेळी बाहेर आलो तेव्हा एक सीन ट्रान्सफर आणि सगळी थंडी विसरायला झाली. आमच्या इथे आता काळोख पसरला होता पण दूरवरची बर्फशिखरे अद्याप सांयप्रकाशात झगमगत होती. तो सृष्टीचा अद्भुत नजारा निव्वळ खिळवून ठेवणारा होता. ते जे काही दिसत होते ते वर्णन करायाला माझ्याकडे शब्द नाहीत आणि चांगले फोटोही नाहीत. कारण आता फोटो मिळेल असे काही नव्हतेच त्यामुळे एसएलआर टेंटमध्येच ठेऊन आलो होतो आणि त्यामुळे मोबाईलवर जे काही मिळतील ते फोटो काढले.

झोंगरी प्रमाणेच इथेही बंगलोर आणि अन्य ट्रेकरनी जास्तीचे पैसे देऊन खोल्या पटकावल्या होत्या. पण इथे ते एकदम नशीबवान ठरले कारण या खोल्या अगदी डायनिंग रुमला लागूनच होत्या. त्यामुळे टेंटमधून बाहेर पडून अर्धा किमी चालत येण्याचा व्याप त्यांना करावा लागणार नव्हता. जेवले की गुडूप जाऊन झोपू शकत होते.

मग तिथेच आमचा सगळ्यांचा अड्डा जमला. चहानंतर एका तासाने सूप आणि त्यानंतर एक तासाने जेवण हे टाईमटेबल तेच होते मग मधल्या वेळात आम्ही जे बाहेर हिंडायचो ते आता नकोसे झाले होते. थंडीचा असा काही हबका बसला होता की काही सुचतच नव्हते. डायनिंग रुममध्येही जेव्हा बसलो तेव्हा सगळे दाटीवाटीने. म्हणजे तिथे मुलगा मुलगी काही भेद नव्हताच. मी सुप झाल्यावर मधल्या काळात कुठे बसावं हे बघत होतो तर एका मुलीच्या शेजारी जागा दिसली. तिला विचारून त्या जागेत खेटून बसलो. तिथे शून्य रोमँटीसिजम होता, गात्रे इतकी गोठली होती की फक्त कुणीतरी शेजारी बसावं इतकंच डोक्यात येत होतं.

त्यावेळी हे शिखरे चढणारे ट्रेकर यांना मनोमन सलाम ठोकला. इथे उणे ९ किंवा १० तापमानात आमची अशी दांडी उडाली होती. तिकडे त्या शिखरावर काय अवस्था होत असेल. ते कशाला आपला मायबोलीकर हार्पेन त्या कडाक्याच्या थंडीत चादर ट्रेक करून आलेला तेही अफाट. त्यालाही मनोमन नमस्कार ठोकला..

समोर आलेले जेवण कसेतरी पुढ्यात ढकलले, कोमट पाणी प्यायलो आणि जाऊन टेंटमध्ये पहूडलो. त्याआधी आज लायनर घेऊन झोपणे हा एक दिव्य प्रकार बाकी होताच. मला काही केल्या ते प्रकरण झेपेना. शेवटी अमेय मदतीला आला आणि त्याने मला लहान बाळाला कसे गुरफटतात तसे त्या लायनर आणि स्लिपींग बॅगमध्ये कोंबले आणि वरून चेन आणि घट्ट दोरी लावून पॅक करून टाकले. म्हणलं माझी ममी झालीये असं वाटतंय.

पण लाकडी ओंडका होण्यापेक्षा ममी परवडली म्हणत कसातरी झोपी गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हा भाग . एकदम चित्रदर्शी वर्णन .

त्या सात आठ हिंदीसारख्या वाटणाऱ्या वाक्यांनी तो जेरीस आला >>>>> Proud Biggrin जाम हसले इमॅजिन करून. मायबोलीवरचाच मराठी लोकांचे हिंदी हा बाफ आठवला

कसला सुंदर भाग झालाय हा. नेहमीपेक्षा मोठा आहे तरी वेड्यासारखाआ, अधाशासारखा वाचतच सुटलो. संपला तरी समाधान होईना.
फोटो नेहमीप्रमाणेच सगळे मस्त आले आहेत. मोबाईलने काढला असला तरी शिखराचा फोटो भन्नाट आला आहे. किमान तुमचा लीडर फोटोसाठी रेंगाळू देत होता त्याबद्दल धन्यवादच मानायला पाहीजेत.
एकट्याने ओढा ओलांडला आणि तो दरीत कोसळत होता हे वाचून धस्स झालं. संपूच नये असे वाटतेय ही मालिका वाचतांना.
(रात्री टाकल्याने पहिला यायचा मान हुकला या वेळी पण )

तुमचे टेन्ट्स मस्त आहेत. किसान आंदोलनाची आठवण करुन देणारे..
दाढी का वाढवली होती पण ? ( न राहवून विचारलेच Lol )

भारी ट्रेक.
इतकं चालायचं म्हणजे सोप्पं नाही.

वाह.. जबरदस्त लिहिलंय..
मागे पण एकदा मी लिहिलेलं तसं,तुमची लिहिण्याची शैली एकदम गप्पा मारल्यासारखी आहे.. या ट्रेक चे फोटो आणि त्याच्या मागे तुमच्या आवाजात या लेखाचं अभिवाचन/वाचन असा काहीतरी प्रयोग करून बघा.. मस्त वाटेल ते फार.. लेखात आलेले एक्सप्रेशन्स जसं की "हायला".., हे ऐकायला जास्त मजा येईल.. Happy

एक्सप्रेशन्स जसं की "हायला".., हे ऐकायला जास्त मजा येईल >>> तेव्हढा शब्द सचिन तेंडुलकर कडून डब करून घ्यावा. Happy

कसलं मस्त आणि मजेशीर लिहिता..वाचता वाचता मधेच हसू पण येतं..सुकामेव्याचा किस्सा>>> Lol
फोटोज सुरेख..
पुढील लेखणास शुभेच्छा!!

मला पण उत्साह आला आहे. आताशी एक फोटो स्कॅन करून झाला आहे. माऊंट नंदादेवी च्या बरोब्बर समोरच्या औली माउंटेनिअरिंग इन्स्टीट्यूट मधून घेतलेला हा फोटो. इथेच मी कोर्स केला आहे. चांगले पिदवून घेतले. शक्य झाले तर वेगळ्या धाग्यावर टाकतो. या धाग्यावर ट्रायल घेतल्याबद्दल क्षमा असावी. Happy
Auli_1.jpgAuli2.jpg

धन्यवाद सर्वाना

मायबोलीवरचाच मराठी लोकांचे हिंदी हा बाफ आठवला>>>>>

हो ना, तसाच काहीसा होता तो प्रकार

शांमा - अहो तुमच्याच प्रतिसादाची वाट बघत होतो, मला वाटलं मधल्या धुमश्चक्रीत उडाला काय तुमचा आयडी, सुखरुप आहात हे पाहून बरे वाटले

दाढी का वाढवली होती पण ?
- काही विशेष कारण नाही, कंटाळा हे प्रमुख, आणि वेगळा लुक हे दुय्यम
मला असे दाढी वगैरे वाढवून हिमालयात जाताना बघून बायको म्हणाली येणार आहेस ना परत

आता परत एकदम वेगळा लूक आहे, आता केस लांब वाढवून पोनीटेल स्वरुप आणि बुल्गानीन दाढी असे

स्मिता श्रीपाद - भन्नाट कल्पना आहे पण माझा आवाज मला स्वतलाच ऐकवत नाही. काही व्हिडीओमध्ये आहेत ते. पण हरकत नाही, जे वाचत नाहीत त्यांच्यासाठी एक व्हिडीओ काढून त्यात फोटो व्हिडीओ आणि मागे नॅरेशन असे करता येईल. विचार करतो यावर

तेव्हढा शब्द सचिन तेंडुलकर कडून डब करून घ्यावा >>>> Happy

सुकामेव्याचा किस्सा>>>>>

बायको प्रेमात आली की सारे जग प्रेमळ वाटू लागते, तसे झालं असणार त्याला Happy

या धाग्यावर ट्रायल घेतल्याबद्दल क्षमा असावी>>>>>

बस काय, केव्हापासून मी म्हणतोय तुम्हाला की टाका तुमचे अनुभव तर, सविस्तर आठवून लिहा एकेक भाग. माऊंटेनिरींगचा कोर्स म्हणजे चेष्टा नाही, आमचे काय पोराटोरांचे ट्रेक. कोर्स हा खरा चॅलेज.

आज सकाळी सकाळी सगळे भाग एका दमात वाचून काढले.
खूप छान आणि ओघवती शैली आहे. समोर बसून गप्पा मारल्यासारखे वाटले.
असा ट्रेक करणे ही काही साधी गोष्ट नाही.
पुभाप्र Happy

हॅट्स ऑफ... अवघड ट्रेक आहे... हडसर चढलो होतो तेंव्हाच फाटली होती- हे कधीच जमणे शक्य नाही...
लिहिलेही मस्त आहे आणि फोटोज पण सुरेख... पुलेशु...

भन्नाट चाललीये लेखमाला, अधाशासारखी वाचून काढली, यूट्यूब व्हिडिओ मात्र सगळे प्रायव्हेट आहेत असं दिसतंय, बघता आले नाहीत.
तो शिखराचा फोटो दैवी आलाय अक्षरशः !

हो आशु.. खुंटीने... आधी जाम फाटली होती पण जमले नंतर...
गावकर्यांनी मस्त खुंट्या ठोकल्या आहेत ( गावकर्यांनीच ना? )

खुपच छान. काही फोटो पाहुन तर प्रत्यक्ष पहातोय अस वाटलं. फोटो अप्रतिम आहेत. तो सुवर्ण शिखराचा तर मोबाईलला स्क्रीनवर लावण्याजोगा आहे.
हे सगळं माझ्या दिव्य हिंदीत त्याला सांगितले. त्या सात आठ हिंदीसारख्या वाटणाऱ्या वाक्यांनी तो जेरीस आला आणी म्हणाला “अच्छा अच्छा जल्दी करो.”
खी खी खी......आय्याम द लीडर मेंढे पाटील, व्हाट डुयिंग? थर्मल डाउनलोडिंग ? गुड गुड फास्ट डु!

धन्यवाद सर्वांना

यूट्यूब व्हिडिओ मात्र सगळे प्रायव्हेट आहेत असं दिसतंय>>>>

तुम्ही म्हणल्यावर चेक केलं तर मी ते ड्राफ्टमध्येच ठेवले होते, मला वाटलं अपलोड झालेत पण अजून दोन स्टेप्स बाकी होत्या. आता केलं आहे, बघा दिसत आहेत का

च्रप्स - जबराट वाट आहे ती, आम्हाला एका स्थानिक पोरानेच दाखवली होती. आणि म्हणाला तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार, मग देवाचे नाव घेऊन ती वाट चढून आलो. मी आणि अमेय आणि अजून एक मित्र होता सोबत.

सुरेख ! सगळे भाग शॉलिड्ड आहेत. वाचनीय, बघणीय आणी रमणीय पण आहेत. तो वरुन आठवा दगडी भिंतीलगतचा फोटो काय भारी आहे ! असे वाटते की ते अजस्त्र झाड म्हण॑जे एखादे मोठे जंगली जनावर असावे. त्यात मागे चक्क पक्षाच्या पंज्यासारखे अणकुचीदार काहीतरी आहे.

बाकी सुकामेवा भारी हं ! आता दाढी काढुन टाक.

शां मा फोटोतले तुम्हीच आहात का? कटीवरी ठेऊनी कर उभा तोची राहे !

जबरी वर्णन... काय सुंदरता भरली आहे सगळीकडे. एकदम ये हसी वादियां आठवले.
शिखर बघितल्यावर किती भारी वाटलं असेल. इथे बसल्या बसल्या आम्हाला साग्रसंगीत दर्शन घडवताय साठी खूप खूप धन्यवाद! तुमची मेहेनत भरपूरच आहे.

बाकी हिंदीसारखी वाक्यं, ओंडका, ममी वाचून भरपूर हसले.

त्या मुलीसोबतचा फोटो नाही टाकलात Wink बायको आहे का माबोवर Wink दिवे घ्याच

धन्यवाद सर्वांना

असे वाटते की ते अजस्त्र झाड म्हण॑जे एखादे मोठे जंगली जनावर असावे. त्यात मागे चक्क पक्षाच्या पंज्यासारखे अणकुचीदार काहीतरी आहे.>>>>>

वाह, कसलं मस्त वर्णन केलं आहे, हे वाचून मी पण वेगळ्या अंगलने तो फोटो पाहिला...तसाच वाटला

त्या मुलीसोबतचा फोटो नाही टाकलात बायको आहे का माबोवर>>>>>

बायकोला दाखवला, पण सोशल फोरमवर महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय टाकू नये हा संकेत पाळायचा म्हणून नाही टाकला. काटाक्षाने सगळ्याच महिला ट्रेकरचे फोटो टाकायचे टाळले आहेत.

बाकी टोणगे आहेत सगळे Happy

Pages