पेज / खिमाट

Submitted by जाई. on 24 April, 2022 - 01:04

पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .

मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असताना खायचा पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करायच्या . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदळासाठी 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची . हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .

कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळयची. .त्यामुळे शनिवारी पेजेच नाव देखील काढायचं नाही . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..

पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण वाचल्यावर हा फोटो !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी वरणभात तूप मिठ लिंबू.

रात्री त्या वरणभातालाच जरा एकत्र करून, थोडं पाणी घालून हाटून मग
पोंगल स्टाईल वरून तुपाची फोडणी काजू कढीपत्ता लाल मिरची काळीमिरी घालून. चवीत पण बदल मिळेल.

छान

किंवा रात्री वरण भात करुन खाणे, सकाळी पोंगल करुन डब्यात नेणे

Pages