पेज / खिमाट

Submitted by जाई. on 24 April, 2022 - 01:04

पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .

मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असताना खायचा पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करायच्या . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदळासाठी 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची . हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .

कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळयची. .त्यामुळे शनिवारी पेजेच नाव देखील काढायचं नाही . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..

पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण वाचल्यावर हा फोटो !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. आम्ही खिमट म्हणतो आणि ते आमच्याकडे तान्ह्या बाळाला दिलं जातं. माझी आजी न्याहारीसाठी असे कणी तांदूळ शिजवून अगदी पातळ ताकात घालून मग तूपजिरे कढीपत्ता फोडणीत तो भात घालायची नि सरसरीत करायची. एखादा बारीक कढ काढून मग ताटलीत आम्हाला वाढायची. ती गेल्यानंतर प्रयत्न करूनही तसा भात करता आला नाहीये.
पेज व कणेरी (की कण्हेरी?) मध्ये फरक आहे का?

छान लेख! पेज आणि जोडीला भाजलेला सुका बोंबिल किंवा पेज आणि लिंबाचे गोड लोणचे अशी न्याहारी बरेचदा सुट्टीत आजोळी असे. घरची भातशेती होती त्यामुळे भातापासून तांदूळ काढताना ज्या तांदळाच्या कण्या होत त्या पेजेसाठी वापरत.

छान लेख जाई.
इकडं कंजी म्हणतात ..एकदा मी आजारी असताना शेजारणीने करून दिलेली.आवडलेली.मी कधी बनवली नाही.

>>कण्या ज्वारीच्या करतात>>त्या वेगळ्या.
वरच्या पिवळ्या आवरणासकट जे तांदळाचे दाणे असतात त्यालाही आम्ही भात म्हणतो, ती पोती भात गिरणीत द्यावी लागतात. तिथे प्रक्रियेत काही प्रमाणात तांदूळ तुटतो, त्या कण्या आणि आख्खा तांदूळ असे वेगवेगळे करुन पोती परत येत असत. फोलपट्/भुसाही येत असे. काही फुकट घालवायचे नाही या न्यायाने यातील आख्खा तांदूळ भात करायला, कण्या पेजेसाठी आणि जोडीला कण्या-सोडे घालून मेथीची पळीवाढ भाजीसाठी वापरत. कण्या आकाराने लहान असल्याने शिजतही लवकर. भुसा/फोलपट शेणाच्या गवर्‍या करताना त्यात घालत.
आमच्याकडे पोहेही घरच्या भाताचे असत.

हो, आमच्या गावालाही तांदळाच्या कण्यांचाच मऊभात. 'ब्रोकन राईस' नावाने बंगलोरला दुकानात कण्या मिळतात!

जाई खुप छान लेख. पेजेपेक्षा वेगळा पण असाच सकाळी न्याहारी करायचा प्रकार आजी कडे असायचा तो म्हणजे कण्या. ज्वारी थोडी पाणि लावून कुठुन घ्यायची आणि शिजवून मीठ घाघालायचे.नंतर ताक मिक्स करून, एक मोठा बाउल पिला कि एक भाकरी खाल्यासारखे.
गव्हाचेही तसेच , खपली गहू वापरा म्हणे , जगातील सगळे गहू खपलीतूनच तयार होतात ना ?>>
ब्लॅकी, अहो खपली गहु-elmer wheat असे सर्च केलेत तर माहिती मिळेल भरपुर. आम्ही वापर्तोय सध्या याचे पीठ. डायबेटिससाठी. आणि खरोखरच खुप इफेक्टीव्ह वाटला शुगर लेव्हल कमी करण्यासाठी.

मिक्सरात घालून आपणच त्याला ब्रोक केला तर?
करून पहा आणि आम्हाला सांगा. Happy पण पीठपण होईल तांदळाचं. चाळून घ्यावं लागेल.

मिक्सर पेक्षा फुड प्रोसेसर मधे कण्या निट होतिल किवा थोडा तान्दूळ भिजत घाला (एक अर्धा तास) मग निथळुन रुमालावर पसरा, जरा ओलसर असताना हाताने सुधा तुकडा मोडेल पण पिठ होणार नाही.

धागा भातासंबंधी असल्याने अवांतर लिहितो.
परवा इंग्लिश शब्दकोड्यात माझे pilaf असे उत्तर आले. शब्द कधीच ऐकला नव्हता. मग कोशात बघितला.
तेव्हा तो टर्किश शब्द असल्याचे लक्षात आले. (भात अधिक मांस इ. असा पदार्थ ).
त्यावरूनच आपण हिंदी व मराठीत पुलाव केलेला आहे.!

>>>>>
मी आणि माझी एक बहीण आधी पापड ताटात ठेवायचो आणि वर मऊभात घ्यायचो, सोबत लोणचं वगैरे. मग सगळा भात संपला, की शेवटी तो मऊ झालेला पापड खायला मस्त लागायचा!! आहाहा..>>>> ए वावे, हे सेम माझी मैत्रीण करायची, आणि मला तिने अनेक वेळा सांगितलय, त्यामुळे हे वाचल्यावर मला तीच आठवली. मी पण पापड खायचे मऊभातासोबत पण ह्या पद्धतीने नाही. तुझी बहीण आणि माझी मैत्रीण एकच तर नसेल. Happy

तिच्या आईचं माहेर कोकणातलं आहेत. ( माझ्या मैत्रिणीचं नाव वर्षा काटदरे) मला गंमत वाटली कारण ह्याच सेम पद्धतीने ती मऊभात खायची.

पेज व कणेरी (की कण्हेरी?) मध्ये फरक आहे का?>> मला महित असलेली कण्हेरी म्हणजे तुपावर कणीक भाजून गूळ घालून सरसरीत करणे. माझ्या आजीकडे असायची सकाळच्या वेळेला सगळ्या मुलांकरीता.

छान .
पेज म्हणलं की आजरी पडलेलीच आठवण येते.
पेजेच्या चवीच्या जवळपास जाणाऱ्या तांदळाच्या कण्या करते मी अधूनमधून. तांदूळ भिजत घालायचा अर्धा तास. मग तो मिक्सरमधून अर्धाबोबडा वाटून घ्यायचा थोडं पाणी घालून. पुरेसं पाणी पातेल्यात मीठ, जीरं घालून उकळवायचं. उकळलं की त्यात मिक्सर मधलं द्रावण ओतायचं. सारखं हलवायचं नाहीतर गुठळी होते. जरासच घट्ट झालं की गॅस बंद करून वाडग्यात ओतायचं , सढळ हातानं तूप घालून प्यायचं.
इकडे इंद्रायणी, घनसाळ तांदूळ मिळतो त्याच छान होतं.

भात मऊ होत आला कि त्यात दुध घालून अगदी खिरीसारखे शिजवून शेवटी मीठ घातले कि मस्त होतो एकदम. खीर नाही म्हणता येणार कारण दुध सगळे आटलेले असते. दुध घालून मऊ भात म्हणता येईल. अल्टीमेट लागते.

भात व डाळ ( वरण) यांची अशी कोणती कृती आहे का , की जी एकदाच करून दोन्ही वेळेला थोडी थोडी खाता येईल.

वरण भात एक कृती आहे , हळद घालून केलेले वरण

कळलं नाही. आम्ही दुपारी कुकरला वरण भात लावून दोन्ही वेळा खातो. रात्री फक्त वरण गरम करतो.

जेव्हा घन पदार्थ खायला सुरवात करतात लहान मुलं तेव्हा आम्ही त्याना कण्हेरी च देतो. तांदूळ धुवून भाजून मग मिक्सरवर त्याच्या कण्या करायच्या म्हणजे ते अर्धवट बारीक करायचे.
कुकर मध्ये किंवा बाहेर ही थोडं जास्त पाणी घालून मऊसर शिजवायचे. हल्ली मुलांना सवय व्हावी म्हणून ह्यातच थोडी डाळ , भाजीचा एखादा तुकडा घालतात . शिजताना एक आल्याचा तुकडा ( बारीक न करता ) किंवा एखादा मिरीचा अक्खा दाणा घालायचा. आलं मिरी काढून टाकायचं शिजल्यावर. भरवताना त्यात तूप ,मीठ ,मेतकूट घालायचं. सरसरीत च ठेवायचं.
अप्रतिम लागत चवीला . मुलं गपागप खातात आवडीने आणि पोट पण मस्त भरतं

दोन्ही वेळा खातो.

सेम तेच

पण जेवण पहाटे बनवून पुन्हा रात्री तेच खायचे , तर इतका वेळ ते टिकेल का

पेज व कणेरी (की कण्हेरी?) मध्ये फरक आहे का >>> आमच्याकडे कणेरी म्हणजे रव्याची अगदी पातळ खीर , पेल्यात घालून पिता येईल अशी.

पेज अजूनही गावात काही घरी होते.
त्यासाठी वेगळे लाल तांदूळ मुद्दाम लावले जातात पण त्याचा यिल्ड कमी असल्याने अलीकडे फार कमी जण लावतात
हा भात ( त्याच्या कव्हर सहित ) अर्धवट उकडायचा आणि उपसून सावलीत वाळत घालायचा. वाळला की मग गिरणीत सालं काढून आणायचा. हा तांदूळ थोडा लालसर दिसतो
अशा तांदळाची पेज हलकी आणि चविष्ठ होते.
पेज बराच वेळ हळूहळू शिजवली पाहिजे.
पण तरीही ती मऊ शिजणार की दाणे दाणे वेगळे राहणार हे पहिली उकड कशी काढली आहे त्यावर अवलंबून आहे.

अलीकडे डायरेक्ट कोकणातून ( रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आंबे आणून जे लोक आंब्याचे दुकान लावतात त्यांच्याकडे हे पेजेचे उकडे तांदूळ आणि कोकम ही हमखास असतात.

जाई आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते पेज. माझ्या मोठ्या मुलीला कधीतरी लहर येते मग सांगते आई भात करशील तेव्हा पेज कर मग मुद्दाम जास्तीच पाणी घालून पेज करते.

भात व डाळ ( वरण) यांची अशी कोणती कृती आहे का , की जी एकदाच करून दोन्ही वेळेला थोडी थोडी खाता येईल.>> हाय बिसी भेले भात कर. एक बॅच केली तर एकदा गरम खायची व मग फ्रिज मध्ये नीट सेव्ह करायची. रात्री किंवा नेक्स्ट डे खाता येते. मला पण हा प्रषन येतो कितीही कमी केले तरी दोन वेळचे होतेच. माझ्याकडे मावे पण नाही. अजून फ्रिज आहे. बिसी बेले मध्ये डाळ भाज्या फोडणी सर्व असते.

नाही तर सरळ भात आमटी ; आमटी वेगळी फोडणी करून व्यवस्थित. मग मिक्स करायचे. गरम असताना एक चमचा तूप घालुन खायचे. पोट भरी चे होते. व रात्री आल्यावर दोन चमचे दह्या बरोबर रूम टेंपरेचर ला आणून खायचे.

टोमाटो/ चिंचेचे रसम करून पण भातात मिक्स करून बोल मध्ये ठेवता येते फ्रिज मध्ये. रात्री तव्यात ओतून गरम करून घेता येते. हे माझे रोजचे आहे.

Pages