मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>हिलबिली एलेजी बद्दल मी लिहिलं होतं >>ते आठवलं पण सापडेना.

(विवेक रामस्वामी अगोदर चर्चेत होता त्याचा ट्रम्पने उल्लेख केला नाही यावेळी)

इथेच पुर्वी दुर्गा भागवतांच्या 'आठवले तसे'विषयी वाचले होते. किंडल अनलिमिटेडच्या कृपेने ते वाचले आणि कसेतरीच वाटले. एवढ्या मोठ्या विदुषीच्या आठवणी ह्या असल्या? ओसरीवर वाती वळताना नाही तर गवार निवडताना शेजारपाजार्‍यांची उणीदुणी काढणार्‍या आणि कुणाविषयीच चांगलं न बोलता नुसती खुसपटं काढणार्‍या म्हातार्‍या असतात त्या जातीचे लिखाण वाटले. त्यातला स्वतःला ग्लोरिफाय करणारा आणि मी सोडून बाकीचे सगळे तत्वहीन असा टोन आवडला नाही.

हिलबिली एलेजी पूर्ण वाचले. चांगले आहे. एकतीस वयाला आत्मकथन लिहायला लावणारे प्रोफेसर अमी चुई ग्रेटच. जेडीवान्स आपल्या घडणीचे श्रेय आईच्या आईवडिलांना देतो. ( ओबामांचा संभाळही आजोळीच झाला होता. तेही आणि त्यांची अगोदरची पुस्तके वाचनीय आहेत. ) अमेरिकेतील white poor याबद्दल प्रथमच वाचायला मिळाले. Black poor यासंबंधी बरेच लेखन वाचायला मिळते.

>>अमेरिकेतील white poor याबद्दल प्रथमच वाचायला मिळाले>> आमच्या गावात या गटात मोडणारी बरीच लोकं आहेत, उलट जे काही मोजके कृष्णवर्णीय आहेत ते शिकले सवरलेले मध्यमवर्गीय आहेत.

न्यूयॉर्क टाइम्स ने पाचशेच्यावर लेखक /कवी इ लोकांकडून मते मागवून या शतकातल्या आतापर्यंतच्या १०० बेस्ट पुस्त्कांची यादी जाहीर केली अलिकडेच. त्यातली फारच थोडी पुस्तके वाचली आहेत. अनेक पुस्तक / लेखकांची त्या यादीत पहिल्यांदा ओळख झाली. आता त्यातली काही वाचायचा/ ऐकायचा मानस आहे

मराठी पुस्तकांची अशी काही यादी आहे का ? इथल्या लोकांनी इ स २०००पासून प्रकाशित झालेली अनेक मराठी पुस्तके वाचली असतील.
तुमची टॉप १० किंवा २५ पुस्तके कोणती आहेत ?

यावरून आठवलं. १९९७ मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुंबई आकाशवाणीने असा उपक्रम घेतला होता. गेल्या पन्नास वर्षांमधली मराठीतली कुठली १० पुस्तकं तुम्हाला सर्वोत्तम वाटतात, ती त्यांना कळवायची होती. शिवाय त्यांचीही एक समिती होती, जी १० पुस्तकं निवडणार होती. ज्या श्रोत्यांची निवड जास्तीत जास्त प्रमाणात आकाशवाणीच्या निवडीशी जुळली, त्यांना काही तरी पारितोषिक दिलं होतं. आमच्या जवळच्या दिवेआगरचे एक बापट आजोबा होते, त्यांनाही हे पारितोषिक मिळालं होतं.
आता सगळी पुस्तकं आठवत नाहीत, पण रथचक्र, झाडाझडती, अपूर्वाई, व्यक्ती आणि वल्ली, कोसला ही तरी होती.
२००० नंतरची टॉप १० किंवा २५ >> विचार केला पाहिजे. Happy प्रयत्न करते. २५ कठीण आहे. १० सुचतील.

>> मराठी पुस्तकांची अशी काही यादी आहे का ? >> आहे.
लोकसत्ता विविध लोकांकडून त्यांना आवडणाऱ्या पाच पुस्तकांची {नवीन}नावे मागवते. त्याची लिंक इथेच येऊन गेली आहे. वर्ष २२,२३. पण ती लिंक ( archive) उघडत नाही.

ही पाहा
लोकसत्ता पुस्तक यादी.txt (36.66 KB)लोकसत्ता पुस्तक यादी.txt (36.66 KB)

आणि ही लिंक मेधा यांचीच https://www.maayboli.com/node/1289. ( मेधा , मायबोली)

July 30, 1935: अ‍ॅलन लेनने पेंग्विन हि पेपरबॅक पुस्तकांची लाईन आज सुरू केली. हारड कव्हर पुस्तकांच्या १/५ पटीने स्वस्त असलेली हि पुस्तके होती. पेंग्विन हा लोगो त्यांच्या “dignified flippancy” साठी घेतला होता Happy साहजिकच तत्कालीन लेखक, विक्रेते नि प्रकाशकांनी ह्यावर बोंबाबोंब केली होती. पण सुरुवातीच्या आवृत्ती दोन दिवसांमधे संपल्या नि वर्षभरामधे तब्बल १० मिलीयन्स प्रती. पुढचा सगळा इतिहास अजूनही उलगडतोच आहे.

साहजिकच तत्कालीन लेखक, विक्रेते नि प्रकाशकांनी ह्यावर बोंबाबोंब केली होती. >> अच्छा, म्हणजे वाचकांच्या हिताचे काही असेल, तर त्याच्याविरुद्ध बोंबा मारण्याची त्यांची प्रथा बरीच जुनी आहे तर.

म्हणजे वाचकांच्या हिताचे काही असेल, तर त्याच्याविरुद्ध बोंबा मारण्याची त्यांची प्रथा बरीच जुनी आहे तर. >> Lol जॉर्ज ऑरवेल त्यात आघाडीवर होता हि आय्रनी म्हणायची का ? Wink

पुस्तक परीक्षण दिले जाते परंतू ते समजून वाचून ते पुस्तक मिळवून वाचणे शक्य नसेल तर त्याचा उपयोग काय?

१) मराठी पुस्तके उपलब्ध करून देणारी नगरातील पालिकेने चालवलेली जाणारी वाचनालये हवीत. ती काही नगरांत /उपनगरांत आहेत परंतू नगरंच इतकी पसरली की पाच दहा किमी दूर जावे लागते. खाजगी वाचनालये '९० नंतर बंद होऊ लागली.
२) अमेझोन अनलिमिटेडची किंवा अशाच प्रकारच्या इतर काही सोयी असतील तर महिना वर्गणी भरून त्यांच्या पटावर असतील तीच फक्त पुस्तकं वाचता येतात. छापील किंवा डिजिटल हा मुद्दा आता चर्चेचा राहिलेला नाही. सुचवलेले पुस्तक त्यांच्याकडे नसेल तर उपाय केवळ विकत घेण्याचाच उरतो.
३) विकत घेऊन (३०० किंवा अधिकच रु) पुस्तके वाचणे आतबट्ट्याचा व्यवहार आहे. प्रत्येकाने अशी पुस्तके जमा करून ठेवणे शक्य नाही, ती नंतर रद्दीच्या भावात जातात.
४) एक ठराविक काळ पुस्तक काही फी देऊन नेऊन वाचण्याची सोय असलेले पुस्तक विक्रेते थोडे आहेत. ती सोय बरी होती पण ते कमीच झाले किंवा त्यांच्याकडे आपल्याला हवे असलेले पुस्तक नसते. ( काही आस्थापनांत काही कर्मचाऱ्यांना वाचन भत्ता मिळतो ते नवीन पुस्तके विकत घेतात आणि ती एका महिन्यांत जुन्या बाजारात येतात. मुंबई, ठाणे,पुणे,आग्रा, नाशिक वगैरे अशी ठिकाणी ती मिळतात. शोधले तर सापडतात.)

एकूण काय पुस्तक परीक्षण देण्याचा काही उपयोग नाही.

बाकी आजपासून माझ्याकडून इथे खरडी बंद करत आहे. कुणी सुचवलेले पुस्तक सापडले तर वाचेन.

Srd, पुस्तक परीक्षण वाचून नेहमीच ते पुस्तक वाचलं गेलं पाहिजे असं नाही. एक ओळख होते. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीबद्दलची थोडक्यात ओळख वाचतो, जी आपल्याला त्यापूर्वी माहिती नसते. त्यानंतर आपण प्रत्येक वेळी प्रत्येकच व्यक्तीची अगदी समग्र माहिती मिळवतो असं नाही. पण एका व्यक्तीची, तिच्या कामाची, आपल्याला तोंडओळख तर होते. तसंच पुस्तक परिचयाचं. नेहमीच ते ते पुस्तक वाचू असं नाही, वाचलं पाहिजे असं नाही, पण डोक्यात कुठे तरी नोंद होते.
वाचनालयाच्या बाबतीत सहमत आहे. वाचनालयं हवीतच. नेहमीच पुस्तकं विकत घेणं महाग पडतं, पण मी हल्ली असा विचार करते की एरवी बाहेर खाण्यावर, कपड्यांवर आपण सहज खर्च करतो, मग पुस्तकांवरही करायचा. एक तोटा असा होतो की पुस्तक विकत घेतलं आणि ते फारसं आवडलं नाही तर उगाचच कपाटाची भर होते.

जाता येता - सुहास शिरवळकर. स्टोरीटेलवर अभिवाचन- सौरभ गोगटे
अत्यंत टाईमपास, निकृष्ट कादंबरी आहे. केवळ ऐकायला सुरुवात केली होती म्हणून पूर्ण केली, एवढंच. याआधी मी याच आवाजात सुहास शिरवळकरांचीच 'बरसात चांदण्याची' ऐकली होती. ती तशी बरी वाटली होती या मानाने.
सुहास शिरवळकर हे सुप्रसिद्ध लेखक असूनही मी त्यांची कुठली पुस्तकं वाचलेली नव्हती, एक रहस्य कादंबरी वगळता.
चार मित्र दोन मोटरसायकल्सवर पुण्याहून लोणावळ्याला सहलीला जातात. वाटेत एका कुटुंबाशी त्यांची गाठ पडते, ज्यात दोन सुंदर, तरुण मुली असतात. योगायोगाने लोणावळ्याला तेही यांच्याच रिसॉर्टमधे उतरलेले असतात आणि अर्थातच पूर्ण वेळ हे मित्र त्या दोघींना गटवण्याचा प्रयत्न करतात. गटवण्याचाच. केवळ टाईमपास, फालतूपणा. बरं, यातला एक मित्र विवाहित आहे, तरीही. त्या मुली यांना अद्दल घडवतात, पण तरी येताना त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर झाल्यावर हे त्यांना मदत करतात! आणि पुण्यात परत आल्यावर आपापल्या बायकोच्या/प्रेयसीच्या मिठीत असताना यांना त्या दोन मुलीच आठवत असतात. हे कादंबरीचे नायक? असायलाही हरकत नाही, पण निदान ते विश्वसनीयरीत्या उभे तरी करावेत, तेही नाही. लहान मुलांना शोभतील अशा कल्पना लढवून त्या मुलींवर इंप्रेशन काय टाकतात, अशाच बालिश कथांना बळी काय पडतात! शिवाय पुण्यात यांचे स्वतःचे चांगले चाललेले व्यवसाय असतात. 'सुसंगती' नावाचा काही प्रकारच नाही!
अभिवाचनही ठीकठाकच!

{पुस्तक विकत घेतलं आणि ते फारसं आवडलं नाही तर उगाचच कपाटाची भर होते}
वाचनालयाला देणगी म्हणून द्यावं.

आमच्या मुंमग्रंसं शाखेत हल्ली त्यांनी विकत घेतलेल्या पुस्तकांपेक्षा देणगी म्हणून मिळालेली पुस्तकं जास्त दिसतात. यातली अनेक पुस्तकं अशी आहेत की मी आणि वाचनालय, दोघेही विकत घेण्याची शक्यता कमी.
या देणगी देणाऱ्या़ची नावंही छापील रूपात दिसतात, एवढी ती मोठी माणसं आहेत .
( वाचनालयांचा निकष वाचकांची आवड, डिस्काउंट हे असावेत)
दुसरीकडे जुनी , जीर्ण झालेली धार्मिक , आध्यात्मिक , इ. पुस्तकं ही देणगी म्हणून आलेली दिसली आहेत.

शिरवळकरांचं एकही पुस्तक वाचणं सोडा, मी त्याला हातही लावलेला नाही.
दुनियादारीच्या वेळी हे नाव ठळकपणे कळलं.
वाचनालयात नवीन सभासदांना कर्मचारी यांची पुस्तकं सुचवताना पाहिलं आहे.

वाचनालयाला देणगी म्हणून द्यावं. >> हो, तसंच करणार आहे आता.
शिरवळकरांचं एकही पुस्तक वाचणं सोडा, मी त्याला हातही लावलेला नाही. >> याच प्रकारची सगळी पुस्तकं असतील तर मीही लावणार नाही यापुढे. पण ते इतके प्रसिद्ध लेखक होते तर याहून चांगली पुस्तकं असतील त्यांची असं वाटतंय.

माझे दोन सहकारी होते ते सतत इंग्रजी कादंबऱ्या वाचताना दिसत. मी त्यावेळी ही पुस्तकं वाचत नव्हतो.(१९९०) त्यांना म्हटलं की मला काही खास लेखक आणि त्यांची दोन दोन पुस्तकं सुचवा मिळेल तसं वाचेन. त्यांनी ताबडतोब यादी दिली पंचवीस लेखकांची. Reading charge २५ ते ५० रुपये घेऊन महिनाभर पुस्तक वाचायला देणारा एक बुक स्टॉल ठाण्यात सापडला होता. तिथून आणून वाचली. कोणते लेखक वाचायचे कोणते नाही हे कळलं. साधारणपणे १९७० पर्यंतची प्रकाशने होती. पण पुढे त्यांची गंमत संपली. टाइम्स किंवा इंडिया टुडे (आणि इतर काही पत्रे/नियतकालिके )रविवारी पुस्तक समिक्षणं देत असतात. मला वाटतं २०१२ च्या आसपास जयपूर लिट् फेस्टिवल आणि संयोजक विल्यम डर्लिंपल यांचे नाव टाईम्स पेपरातील लेखामुळे कळले. योगायोगाने त्याची दोन पुस्तके (white Mughals, Last Mughal) रस्त्यावरच शंभर रुपयांत विकत मिळाली. नवीन प्रकाशने आहेत. खूप छान आहेत.
२०२० मध्ये करोना काळात वाचन कुचंबणा . पण दोन साईट्स सापडल्या तिथून इंग्रजी पुस्तके मिळू लागली.
थोडक्यात सांगायचे तर आवडेल असे पुस्तक वाचायला मिळाले पाहिजे.

white Mughals, Last Mughal)..... मी याचा अनुवाद वाचला होता.

मागच्या आठवड्यात दोन छान पुस्तके वाचली. एक पॉला हॉकिंस यांचं The girl on the train ही कादंबरी आणि डफ्ने द्यू मॉरियर यांचा ब्रेकिंग पॉइंट हा कथा संग्रह.हे दोन्ही अनुवाद वाचले.

The girl on the train मध्ये एक प्रवासी स्त्री आपल्या ट्रेन प्रवासामध्ये जे काही दररोज बघत जाते त्यावरून अंदाज बांधत जाते त्याची गोष्ट आहे. नंतर झालेल्या खुनाची उकल कशी होत जाते ते खूप छान आहे.शेवटच्या प्रकरणापर्यंत नेमकी खूनी व्यक्ती कोण हे कळत नाही.

दफ्ने ड्यू मॉरियरच्या सशक्त कथा कळायला जरा कठीण पण वाचनीय आहेत.

द गर्ल ऑन ट्रेन वर नेफ्ली शो आहे का? ट्रेन मधून गुन्हा प्लॉट वर एक शो बघितलेला आठवतो. >> सिनेमा होता एमिली ब्लंटचा. त्यावर एक मस्त स्पूफ पण आहे क्रिस्टीन बेलचा 'द वूमन अ‍ॅक्रॉस द स्ट्रीट फ्रॉम द गर्ल इन द विंडो'. अशा प्रकारच्या सिनेमांवर बनवलेल पॅरोडी.

पुण्यात वाचनालय तुमच्या दारी असा काहितरी उपक्रम चालतो म्हणे. कुणाला काही कल्पना आहे का?.

मी नुकतच शीला मुखर्जी यांचे What's in the name हे पुस्तक वाचले. १९६० ते आतापर्यंत इंग्लंड व भारतातील त्यांच्या अनुभवावर व त्यांच्या विविध पार्श्वभूमीतील पूर्वज असलेल्या ओळखीच्या मैत्रीच्या लोंकांच्या अनुभवार आधारीत आहे. ज्यु, आफ्रिकन जमेकन ज्यांचे पूर्वज गुलामगिरीच्या भयानक अनुभवातून गेलेले, भारतीय मुसलमान व फाळणीमुळे विस्कटलेले त्यांचे जीवन त्यांचा व त्यांच्या पूर्वजांचा मायभूमीपासून इंग्लंडपर्यंतचा प्रवास व त्याची कारण मिमांसा, या अशा सर्वांनी शाळेपासून अनुभवलेली दुय्यम नागरीकत्वाची जाणीव अस्वस्थ करून सोडते.

आपल्याकडे विशेषतः परदेशातील भारतीयांमधे पहिल्या ओळखीतच नाव / आडनाव विचारायची पद्धत पाहिलेली आहे. त्याचा काय उद्देश असतो हे तुम्ही जाणताच. "What's in my name" defines that.

इंग्लंडमधल्या सध्या घडणार्‍या घटनांमुळे पुनः एकदा आठवण झाली.

Jhumpa lahiri हिचं namsake चांगलं आहे. ( archive dot org वर फ्री वाचता येईल.)

पुण्यात वाचनालय तुमच्या दारी असा काहितरी उपक्रम चालतो म्हणे. कुणाला काही कल्पना आहे का?.>> होय पण कोणत्या वाचनालयातर्फे चालतो? नाव ? संपर्क वगैरे मला विचारावे लागेल .. कालच माझी आत्तेबहीण म्हणाली की आत्याला तो वाचनालयवाला मुलगा दर १५ दिवसांनी पुस्तके बदलून देतो .. पोतं भरून पुस्तके आणतो आपल्याला हवी ती ८ पुस्तके घ्यायची .. आपल्याकडची वाचून झालेली परत द्यायची. व्हाटस ऍप्प वर कळवता येते कि आज माही मुलीकडे म्हणजे अमुक ठिकाणी आहोत पुन्हा मुलाकडे गेले की आज आम्ही ढमुक ऍड्रेसवर आहोत etc

वाचनालय आपल्या घरी हा उपक्रम माहीत नाही . पण माझ्या आईची रसिक लायब्ररीची घरपोच लायब्ररी आहे . महिन्यातून एकदा पुस्तकांची गाडी येते. ५ पुस्तके घेता येतात . ३०० रू.महिना.

डफ्ने द्यू मॉरियर यांचा ब्रेकिंग पॉइंट हा कथा संग्रह. <<<>>>>> हा वाचल्यासारखं वाटत आहे., माझ्या लिस्टमध्ये नाव नाहीये पण. ह्यात एक गोष्ट अशी होती का - एक माणूस मी चित्रकार आहे म्हणून एका साध्याश्या वस्तीतलं घर / एक खोली भाड्याने घेतो. तिथे आधीच एक स्त्री आणि तिचा छोटा मुलगा राहात असतात आणि पुढे कोणाचातरी म्रुत्यू होतो आणि ह्या माणसाला अटक होते वगैरे ?
हेच असेल तर बाकीच्या कथांची हिंट द्या ना. आठवेल. नाहीतर वाचावे लागेल.

पै लायब्ररीची मी अनेक वर्षांपासूनची मेंबर आहे. गेलं एक दिड वर्ष मी ३/४ महीने पुस्तकं घेते मग २/३ महीने बंद ठेवते. तेवढ्यात तिथे नविन पुस्तकं जमतात, लोक ती वाचून घेतात म्हणजे मग सहज उपलब्ध होतात, नाहीतर नविन आलेली पुस्तकं अजिबात मिळत नाहीत.
मागे मी श्री पै ह्यांना फोन करुन इ बुक्स आणता येतात का ते पहा अशी विनंती केली होती तेव्हा, मला इ बुक्स हा प्रकारच पसंत नाही असं म्हणून त्यांनी माझं म्हणणं धुडकावून लावलं.
शिवाय त्यांच्या वेबसाईटवर काही प्रॉब्लेम येतात जसे की पुस्तक उपलब्ध आहे की नाही ते क्लिक केल्याशिवाय कळत नाही ह्यात फार वेळ जातो. ते ही त्यांना सांगितलं होतं त्यावर काही सोल्यूशन काढा. ते काही अजून झालेलं दिसत नाहीये.
तरी बरचं वाचता येतं त्यांच्यामुळे.

भारतात इ बुक्स ( किंडल फॉरमॅट मधली ) लायब्ररीज अजिबात नाहीयेत का ?

एक माणूस मी चित्रकार आहे म्हणून एका साध्याश्या वस्तीतलं घर / एक खोली भाड्याने ....... तोच कथा संग्रह आहे.तुमची स्मरणशक्ती मस्त आहे.

Pages