खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे?

Submitted by aschig on 15 September, 2021 - 16:59

लोक फलज्योतिषाकडे धाव का घेतात?

अनेकदा लोक ज्या कारणांसाठी फलज्योतिषाकडे जातात ती कारणं जीवनातल्या नेहमीच्या अनिश्चितीततांमुळे निर्माण झालेली असतात. अनिश्चितता खरंतर सगळ्यांच्या जीवनात असतात; पण काही लोकांना त्यांचा जास्त त्रास होतो किंवा काही लोकांच्या बाबतीत त्या अनिश्चिततांची परिणती काही विशिष्ट घटनांद्वारे जास्त एकांगी वाटते. उदाहरणार्थ, घटस्फोट, कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपंग करणारा एखादा अपघात. हे असं माझ्याच बाबतीत का व्हावं असा विचार आला की आपण अनेकदा सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून नको त्या गोष्टींच्या नादी लागू शकतो. अशावेळी खरं तर लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात तो एक ठपका असल्यामुळे पंचाईत होते. या धर्तीच्या अनेक प्रसंगांमध्ये पुढील घटना टाळण्यासाठी ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास त्यानेही मदत होऊ शकते. अर्थात ते स्वतः अंधविश्वासू नसतील तर.

IGNOUच्या अभ्यासक्रमाबाबत

सरकारने फलज्योतिषावर योग्य असे पर्याय बनवायला हवेत; जेणेकरून लोकांना कठीण परिस्थितीतही मानसिक स्थैर्य मिळवायला मदत होईल. शाळा–कॉलेजेसमधून अशी मदत उपलब्ध हवी. याउलट सरकारी अनुदानाने विद्यापीठांमधून फलज्योतिषाचे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठाने इतक्यातच असाच एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक लोक “काय हरकत आहे” असं म्हणून त्या अभ्यासक्रमाला पाठिंबा देत आहेत. “इतर अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याप्रमाणे हाही एक आणि हा तर विज्ञानशाखेत नसून कलाशाखेत आहे; त्यामुळे असाही दावा नाही की ते एक शास्त्र किंवा विज्ञान आहे” असा त्यांचा युक्तिवाद असतो. कलाशाखेत जरी हा असला तरी अभ्यासक्रमाच्या विवरणात एक वाक्य असं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना त्यांच्या उपजीविकेचे एक साधन या अभ्यासक्रमाद्वारे देऊ करणार आहोत. तसं असल्यामुळे असा अभ्यासक्रम कोण शिकवू शकेल, त्या अभ्यासक्रमामध्ये काय हवं, हे प्रश्न साहजिकच निर्माण होतात. अशा प्रश्नांना एक सरधोपट असं उत्तर नसतं कारण त्यात अनेक मिती असतात. अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक असलेल्या अनेक बाबींचा अंतर्भाव न केल्यामुळे हे अभ्यासक्रम घातक ठरतात. यासंबंधीच्या एक-दोन आवश्यक पण कदाचित अपुऱ्या बाबी पाहूया.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रमात जे शिकवले जाणार आहे त्याविरुद्ध असलेले सिद्धांत आणि मतप्रवाहसुद्धा नमूद केले जायला हवे. तसे नसल्यास जे शिकवले जाणार ते एकांगीच ठरणार. अभ्यासक्रमात जे काही शिकवले जाते त्याबद्दल संख्यात्मक विश्लेषण देता यायला हवे. ज्योतिषाचा अभ्यासक्रम भाकितांबद्दल असल्यामुळे ‘कोणत्या घटकांवर आधारित किती भाकितं केली? केली त्यातील किती खरी ठरली? ती किती अंशी खरी ठरली? किती खोटी ठरली?’ वगैरे या सर्व बाबी यायला हव्यात. हा कलाशाखेत जरी असला तरी कलाशाखेतील इतर अभ्यासक्रमांमध्ये जशा परीक्षा असतात तशा इथे होतील याची काहीच चिन्ह नाहीत. उदाहराणार्थ, रंगचित्राच्या परिक्षेस बसलेला विद्यार्थी रंगचित्रे काढतात. त्या रंगचित्रांना परीक्षक गुण देतात. त्याचा जगात होऊ घातलेल्या घटनांशी संबंध नसतो. फलज्योतिषात तसा असल्याने त्याची तपासणी कशी केली जाणार? वर्ष–दोन वर्ष किंवा भकितात असतील तेवढी वर्षे थांबून?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे अभ्यासक्रम शिकवायला प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक हवेत. म्हणजे जे स्वतः केवळ पुस्तकातून शिकले ते का? तसे असतील तर कोणत्या पुस्तकांमधून? की व्यावसायिक ज्योतिषी हवेत? हे दोन्ही गट तसे कुचकामी. येथे असेच शिक्षक हवेत ज्यांना या प्रकारात कोणतेतरी प्रमाणपत्र मिळाले आहे, पदवी मिळाली आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा पदवी अशा दुसर्‍या एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून नसावी जिथले शिक्षक पदवीधर नव्हते. कोणी म्हणेल की हे तर कोंबडी आधी की अंडे याप्रमाणेच होईल. याचे कारण असे की जर अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार नसेल, अभ्यासक्रम फक्त पदवीधर शिक्षक देऊ शकणार असतील तर ही पदवी ते शिक्षक मिळवतीलच कसे? विज्ञानात किंवा इतर ठिकाणी ते कसे होते ते पाहूया.

एखादं क्षेत्र जेव्हा नवीन असतं तेव्हा आधी त्यातील संशोधनाकरता काही लोक प्रस्तावांद्वारे अनुदान मिळवतात. तो प्रस्ताव एखादी विवक्षित गोष्ट करण्यासाठीचा असतो. संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ अशा प्रस्तावाची तपासणी करतात आणि मग अनुदान द्यायचं की नाही ते ठरवतात. अनुदान ज्या प्रयोगासाठी मिळाले आहे तो जाहीर केल्या जातो आणि प्रयोग झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं ते पण जाहीर केलं जातं. असे काही प्रकल्प जेव्हा यशस्वी होतात तेव्हा यशस्वी गट एकत्र येऊन एखादी संघटना बनवू शकतात. त्या संघटनेद्वारे आधीचे प्रकल्प/प्रमेय जास्त काटेकोरपणे तपासून परिपूर्ण केले जाते. अशा या सर्व अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर जे लोक तयार होतात ते अशा गोष्टी शिकवू शकतात.

फलज्योतिष कशावर आधारित आहे?

पत्रिका मांडणं हे पूर्णपणे गणिती आहे. पंचांगात जी ग्रहस्थिती दिलेली असते ती वापरून खरं तर कोणीही काही मिनिटांमध्ये पत्रिका मांडणं शिकू शकतो. पंचांगातली ग्रहस्थिती ही खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरूनच मिळवलेली असते आणि ते तंत्र इतकं प्रगत आहे की ती स्थिती अचूक असते. पत्रिका ही खऱ्या ग्रहांची स्थिती वापरून मांडली गेली असल्यामुळे त्याचा खगोलाशी संबंध नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.

पत्रिकेतील नवग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह, त्याचप्रमाणे सूर्य हा तारा, चंद्र हा उपग्रह आणि राहू आणि केतू हे पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावल्यांपासून निर्माण झालेले काल्पनिक छेदनबिंदू. यातील मंगळ आणि शनी फलज्योतिषात वाईट समजले जातात. ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाचे ठरावेत ते त्यांचे वस्तुमान आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही फिरतात आणि त्यांची गती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे आपल्यापासूनचे अंतर सदोदीत बदलत असते. त्यामुळे त्यांचा परिणाम हा ते सूर्याशी किती अंशांचा कोन करतात यापेक्षा त्यांचे आपल्यापासून अंतर किती आहे यानुसार ठरायला हवा. भौतिकशास्त्राला ज्ञात चारच बलं आहेत. त्यातील एकच बल अर्थात गुरुत्वाकर्षणशक्ती ही लांब पल्ल्यावर काम करते. म्हणजेच जर शनी, मंगळ, गुरू यांचं एखादं बल आपल्यावर काम करत असेल तर ते गुरुत्वीय बलच असू शकतं. गुरुत्वीय बल हे वस्तुमानाप्रमाणे वाढतं. वस्तुमान दुप्पट झालं तर बलही दुप्पट होतं. त्याउलट अंतर वाढलं की बल कमी होतं आणि तेही वर्गाप्रमाणे. म्हणजेच अंतर जर दुप्पट झालं तर बल चतुर्थांश होतं.

या गणितानुसार जर आपण मंगळाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो हे पाहिलं आणि त्याची तुलना १०० किलोग्राम वजनाच्या, एका मीटरवर असलेल्या एका व्यक्तीच्या बलाशी केली तर ती दोन्ही बले जवळजवळ सारखीच असतात हे दिसतं. मंगळाचे वस्तुमान एकावर २४ शून्य इतके किलोग्राम आहे आणि त्याचं सरासरी अंतर साधारण एकावर ११ शून्य इतके मीटर आहे. म्हणजेच १०० किलोच्या पहलवानापेक्षा एकावर २२ शून्य इतकं बल वजनामुळे जास्त, पण अंतर एकावर ११ शून्य इतकी मीटर कमी असल्यामुळे त्याचा वर्ग अर्थात एकावर २२ शून्य इतक्या प्रमाणात कमी आणि हे दोन घटक सारखेच असल्यामुळे एकमेकांना रद्द करतात. आता जर फक्त ५० किलोग्राम वजनाचा डॉक्टर एखाद्या व्यक्तीपासून अर्ध्या मीटरवर असेल तर वस्तुमान अर्धे झाले म्हणून बल अर्धे होणार पण अंतर अर्धे झाले म्हणून बल चौपट होणार. म्हणजेच मंगळाच्या दुप्पट. या गणितानुसार एका व्यक्तीचं शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर असलेले गुरुत्वीय बल हे दूर असलेल्या मंगळापेक्षा जास्त असतं. यामुळेच मुलाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या डॉक्टरचे किंवा सुईणीचे गुरुत्वीय बल बालकावर जास्त असतं.

या निर्विवाद युक्तिवादामुळेच अनेकदा फलज्योतिषी म्हणतात की पत्रिकेतले ग्रह फक्त त्यांच्यामधील कोनांपुरते. बाकी मात्र त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. क्षणभर ते खरं आहे असं मानलं, तरीदेखील त्यांचे गुणधर्म कोणते हे सांगायला हे फलज्योतिषी तयार नसल्यामुळे पुढे सगळं अडतं. थोडक्यात काय तर, फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे. जादूगार ज्याप्रमाणे पोतडीतून हवं तेव्हा हवं ते काढतो त्याचप्रमाणे फलज्योतिषी वाटेल तेव्हा वाटेल ते गुणधर्म या ग्रहांच्या माथी मारतात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कपाळी काहीबाही थोपतात. खरं तर फलज्योतिषांची हि स्थिती ग्रहांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं‘ अशी केलेली आहे. तरी पण लोक साधारण कोणत्यातरी परिस्थितीमुळे अगतिक झाल्यावरच ज्योतिष्यांकडे जातात. वर दिलेल्या युक्तिवादाची त्यांना माहिती नसते, किंवा त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे काहीही खरं मानण्याची त्यांची मनस्थिती असते, आणि त्यामुळेच फलज्योतिषांचे फावते.

लग्नासारखी नातीसुद्धा सामंजस्यावर, प्रेमावर न बेतता दूरवर असलेल्या निर्जिव आणि त्यामुळे निर्बुद्ध ग्रहांवर सोपवून लोक अजाणता आपल्या (व आपल्या पाल्यांच्या) पायावर कुऱ्हाड मारून घेतात. अनेकदा यातील विजोड लग्न घटस्फोटाच्या दुसऱ्या टॅबूमुळे त्रासदायक संसाराला कारणीभूत होऊ शकतात.

त्यामुळे गरज आहे ती प्रबोधनाची, वरील युक्तिवाद सगळ्यांपर्यंत पोचवण्याची. कार, कंप्युटर वगैरे घेतल्यावर जशी हमी मिळते तशी फलज्योतिषी देऊ लागले तर बहुतांश भाकिते कशी निराधार असतात हे आपसूकच सिद्ध होईल, त्याचा एक संख्याशास्त्रीय पडताळासुद्धा येईल.

खगोलशास्त्राची प्रगती

काही शतकांपूर्वीपर्यंत विजा, वादळे, पूर वगैरे दैवी प्रकोप समजले जायचे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ठरावीक महिन्यांमध्ये ठरावीक नक्षत्रं दिसतात. पावसाळ्यात दिसणाऱ्या नक्षत्रांचा आणि पावसाचा संबंध जोडला जाणे साहजिक होतं. पण ती नक्षत्रं दिसतात तेव्हा पाऊस पडतो याऐवजी त्या नक्षत्रांमुळेच पाऊस पडतो अशी धारणा जुन्या काळी होती. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे रात्री दिसणारे तारे ठरावीक वेगाने त्यांची स्थानं बदलत. याउलट आपल्याच सौरमालेतील ग्रहांचे खगोलातील भ्रमण अनियमित वाटे. त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं. डोळ्यांनी पाच ग्रह दिसत असल्यामुळे त्यांनाच पत्रिकेत डांबलं. सोबतीला सूर्य–चंद्र होतेच. नंतर सापडलेले युरेनस नेपच्यूनसारखे ग्रह लोकांच्या पत्रिकेत फार काही उच्छाद मांडतांना दिसत नाही. पंधराव्या शतकाच्या सुमारास सौरमालेबद्दलच्या विज्ञानाच्या कल्पना नवीन ज्ञानामुळे उत्क्रांत झाल्या. पृथ्वीसकट इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हे लक्षात आलं. तेव्हापासूनच खरंतर खगोलशास्त्राची आणि फलज्योतिषाची फारकत झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या दुर्बिणीच्या शोधामुळे गुरू आणि शनीभोवती अनेक चंद्र आहेत हे कळलं. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लाखो लघुग्रहांबद्दल कळलं. त्याहीपलीकडे असलेल्या आणि धूमकेतूंना जन्म देणाऱ्या ऊर्ट क्लाउडबद्दल कळलं. धूमकेतू विनाशाचे प्रेषित न राहता वैज्ञानिक कुतूहलाचे विषय बनले. विसाव्या शतकात मानव पृथ्वीभोवती उपग्रह स्थापू लागला. मानवाने अवकाशात भरारी घेतली. तो चंद्रावर जाऊन पोचला. मानवनिर्मित याने मंगळावर तर उतरलीच पण दूरच्या एका धुमकेतूवर*, तसेच एका लघुग्रहावर** देखील जाऊन पोचली. व्हॉयेजर*** याने तर सौरमालेच्या वेशीपर्यंत जाऊन पोचली आहेत. हे सर्व आपल्या सौरमालेतील. ह्यापलीकडे देखील अनेक सुरस शोध मानवाने लावले.

भारतानेही अनेक उपग्रह पृथ्वीभोवती स्थापले, चंद्र–मंगळावरील मिशन्स साध्य केल्या, आणि लवकरच भारतीय मानवालापण अवकाशात पाठवणार आहे. असं सर्व असताना भारतीयांनी, भारतीय समाजाने खगोलीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवं कि जुन्या तर्कहीन समजुतींमध्ये अडकून राहून पुढच्या पिढीला अज्ञानात लोटावे हे सुज्ञास सांगणे न लगे. पण अशा सुज्ञ लोकांनी इतरांपर्यंत हे विचार पोहोचवणे अतिशय आवश्यक झाले आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

* https://en.wikipedia.org/wiki/Philae_(spacecraft)
** https://www.nasa.gov/osiris-rex
*** https://voyager.jpl.nasa.gov/

या लेखाचा काही भाग इतक्यातच दिलेल्या दोन भाषणांवर आणि त्यांच्यावर आलेल्या काही प्रतिक्रियांवर तसेच लोकायत ग्रुपवरील काही चर्चांवर आधारित आहे.

नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक प्रकाशन (१ ऑगस्ट २०२१) https://tinyurl.com/6vrhmj42 (मिनीट २७ पासून)
ब्राइट्स सोसायटी (७ मार्च २०२१) https://tinyurl.com/85stfbpd (मिनीट ८ पासून)

लेख सुधारक ऑगस्ट २०२१ अंकात पूर्वप्रकाशीत.

Group content visibility: 
Use group defaults

कोणाला वाहवा द्यायला जावं तर त्याहून तगडा युक्तीवाद घेउन विरोधी पार्टी येते. परत आपण दुसर्‍या बाजूला झुकतो तोवर पहीली पार्टी अधिक भारी समर्थनार्थक युक्तीवाद घेउन हजर होते. आतापर्यंत आपला 'बिन पेंदेका लोटा' झालेलाच असतो Wink निदान झाकली मूठ सव्वालाखाची म्हणुन आपण गप गुमान बसावं तर तेही आपल्यानं होत नाही. Wink

चांगला लेख.
आशिष, तुमचे विचार / लेखन वाचायला आवडते (काही वेळा विषय फार जड वाटला तरीही).
आणखी वारंवार लिहावे, अशी विनंती.

कोण कोणाच्या बाजूने आहे? खूपच कन्फ्युजन होतंय जे ज्योतिषाच्या बाजूने आहेत त्यांनी सुरवातीला ज्योतिष लिहा आणि जे खगोलशास्त्राच्या बाजूने आहेत त्यांनी खगोल लिहा. जे दोघांच्या बाजूने आहेत त्यांनी बोथ लिहा आणि जे कन्फ्युज आहेत त्यांनी Uhoh बाहुला टाका.

फलज्योतिषाचं स्तोम वाढू द्यायचं?

कोण वाढवतात? जाणारे जातात ज्योतिष्यांकडे आणि निर्णय घेतात. न जाणारे स्तोम वाढवतात.

--------------
अभ्यासक्रमात घ्या आणि अमुक अमुकने आमचा अमका कोर्स केलाय असे सर्टिफिकेट द्या. ( फर्स्ट एड'चं सर्टिफिकेट असंच असतं ना? त्यामुळे तो सर्टिफाईड फर्स्ट एड देणारा होतो का? तो मनुष्य हा विषय जाणतो एवढाच अर्थ निघतो.)

कोण वाढवतात? जाणारे जातात ज्योतिष्यांकडे आणि निर्णय घेतात. न जाणारे स्तोम वाढवतात>>>>

हे आवडले. Happy

फलज्योतिष हे पूर्णपणे निराधार आहे >>> हे मत कशाच्या आधारावर आहे हे समजलं नाही. ज्योतिष्यांकडे त्यांनी वर्षानुवर्षे अभ्यासलेल्या कुंडल्या, त्यांचा डेटा, त्याचा अ‍ॅनालिसिस अश्या गोष्टी असतातच की. ठोकताळे त्याच्या आधारावरच मांडले जातात असं मला वाटतं.

Uhoh - धन्यवाद

लेख एकांगी झाला आहे. फलज्योतिषात वापरली जाणारी पद्धत, त्यामागच्या अभ्यासाबाबत असलेली उदासिनता, आणि ओवरऑल कंप्लीट डिसरिगार्ड टु द सब्जेक्ट मॅटर या लेखातुन ध्वनीत होत आहे. असो.

मला फलज्योतिषाचा अजिबात गंध नाहि, पण ते "शास्त्र आहे कि थोतांड" या वादात आंधळी उडी घेण्या आधी ते कसं काम करतं, भविष्य सांगण्याची एकुणांत प्रोसेस (एंड-टु-एंड) काय आहे, याबाबतची माहिती गोळा करण्याची तसदि मी नक्कि घेइन. खरं सांगायचं झालं तर माझी या विषयावर बाबतची माहिती अतिशय तोकडी आहे. परंतु डेटा मॅनेजमेंट/अ‍ॅडवांस अनॅलिटिक्स (एए)/आर्टिफिशियल इंटेलिजंस (एआय) चा विद्यार्थी म्हणुन मी या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन बघतो. कां/कसं, ते सांगतो -

माझ्या माहिती प्रमाणे ज्योतिषी तुमच्या जन्मतारीख, वेळ (स्टॅटिक पॅरामिटर्स) इ. माहितीवरुन कुंडली (चार्ट) बनवतात. कुंडलीत ग्रह/तारे यांची त्यावेळेची स्थिती (कोऑर्डिनेट्स) मांडलेली असते. त्यावरुन तुमची रास (आयडेंटिफायर) निश्चित केली जाते. त्यानंतर येते तुमची समस्या अथवा प्रश्न (क्वेरी) - नोकरी कधी लागेल, लग्न कधी होइल, परदेशगमनाचा योग इ. इ. यावर ज्योतिषी काहि आकडेमोड करुन आडाखे बांधतो ज्याला आपण भविष्य असं म्हणतो. आता असाच काहिसा प्रकार एआय मधे कसा आढळतो, फलज्योतिषाची आणि एआय मधे साम्यस्थळं आहेत कां, ते पाहुया. [खालचे कंसातले प्रश्न र्हिटॉरिकल आहेत. Wink ]

१. एआय चा पाया अजस्त्र डेटावर (स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड) बेतलेला असतो. (फलज्योतिषात असा डेटा असतो का?)
२. एआय एखाद्या घटनेच्या बाबतीतला अंडर्पिनिंग पॅटर्न शोधते, आणि त्यानुसार होउ घातलेल्या संभाव्य घटनेचा अंदाज बांधते. (ज्योतिषी पॅटर्न बघतो/शोधतो का?)
३. अंदाज/आडाखे बांधताना एआय सायंटिफिकली डिफाइन्ड, वेल टेस्टेड अ‍ॅल्गोरिथम लायब्ररीची मदत घेते. (ज्योतिष्याची आकडेंमोड म्हणजे नक्कि काय असते?)
४. एआय च्या इन्पुट पॅरामिटर्स मधे बदल झाला कि त्याचा परिणाम रिझल्ट वर होतो. (जुळ्या मुलांचं भविष्य सारखंच असतं का?)

आता उदाहरणादाखल हे दोन प्रसंग पहा -

रामू.१ ला लहानपणीच ज्योतिषांनी पाण्यापासुन धोका आहे असं सांगितलं होतं. शाळेत असताना रामू.१ हट्टाने पोहायला शिकला, जवळच्याच तरण तलावात. पुढे पंचविशीत मित्रांबरोबर गणपतीपुळ्याच्या समुद्रात पोहताना एका मोठ्या लाटेने रामू.१ला आत ओढुन नेलं. त्याच्या मित्रांनी प्रयत्नांची शिकस्त करुन रामू.१ला बाहेर काढुन त्याचा जीव वाचवला...

रामू.२ मॉडर्न तरुणाईचा प्रतिनिधी. कुठलंहि नविन गॅजेट बाजारात आलं कि त्यावर सर्वांच्या आधी उडी टाकणारा. स्मार्टफोन म्हणजे त्याचा जीव कि प्राण; सतत जवळ बाळगणारा. रामू.२ पंचविशीत मित्रांबरोबर गणपतीपुळ्याला गेला. जुजबी पोहता येत असल्याने मित्रांबरोबर समुद्रात उतरण्याची त्याने तयारी केली. तेव्हढ्यात त्याचा फोन किंचाळायला लागला. रामू.२ने सगळे अलर्ट्स तपासले. त्यात एक अलर्ट होता - अरे बाबा आत्ता समुद्रात उतरु नकोस, लगेच ओहोटि सुरु होणार आहे (वेदर रिपोर्ट), पुढे पाण्यात खिंडि आहेत, बर्‍याच जणांचा त्यात अडकुन जीव गेलेला आहे (जिपिएस, गुगल). तु पट्टीचा पोहोणारा नाहिस, दोन महिन्यांपुर्वि तरणतलावात एकच लॅप मारलास (हेल्थ डेटा), आपला जीव प्यारा असेल तर गपचुप किनार्‍यावरच उभा रहा...

तर मंडळी, रामू.२च्या बाबत घडलेल्या अलर्टला एए/एआय मधे अ‍ॅक्शनेबल इन्साइट म्हणतात. तसंच काहिस रामू.१च्या बाबतीत फलज्योतिषाने केलंय का?..

सध्याच्या अवस्थेतलं फलज्योतिष.१ बर्‍याच कारणांमुळे बदनाम झालेलं आहे. माझं मत असं आहे - उपलब्ध असलेलं सगळं फलज्योतिष.१ चं साहित्य, लिखाण, आर्टिफॅक्ट्स इ. चा डेटा डिलिजंटली गोळा करुन, एए प्लॅटफॉर्मवर त्याचं स्वरुप बदलायला (फलज्योतिष.२) आणण्याची गरज आहे. परदेशात तसे प्रयत्न सुरु आहेत असं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. कुंडली काढण्याचं कंप्युटराय्झेशन झालेलं आहेच, उद्या फलज्योतिष.२ प्रत्यक्षात उतरलं, आणि त्याचे अंदाज खरे ठरायला लागले कि तो चमत्कार बघुन जगातल्या तमाम प्युरिस्टांचा उड्या फलज्योतिष.२ वर पडायला लागतील... Proud

>>>> अ‍ॅक्शनेबल इन्साइट
हे माहीत नव्हते. रोचक आहे.
प्रतिसाद आवडला.
रामू १ चा नेप्च्यून अष्टमात असून विशेषतः केतु महादशेत जेव्हा मंगळ अंतर्दशा येइल म्हणजे ०७/०७/२०२२ चा तीसरा आठवडा - तेव्हा पाण्यापासुन विशेष धोका संभवतो - हे जस्ट उदाहरण झाले. हे खरे आहे की खो टे माहीत नाही पण अशा प्रकारचे अ‍ॅक्शनेबल अ‍ॅलर्टस ज्योतिष देऊ शकत असावे.

नाही.
१. लगेच ओहोटि सुरु होणार आहे (वेदर रिपोर्ट), : हा अलर्ट रामू शामू गणू सगळ्यांना येईल.
२. पुढे पाण्यात खिंडि आहेत, बर्‍याच जणांचा त्यात अडकुन जीव गेलेला आहे (जिपिएस, गुगल).: अगेन हा अलर्ट रामू शामू गणू सगळ्यांना येईल.
३. तु पट्टीचा पोहोणारा नाहिस, दोन महिन्यांपुर्वि तरणतलावात एकच लॅप मारलास (हेल्थ डेटा),: अगेन हा अलर्ट पोहोणे न शिकलेल्या रामू शामू गणू सगळ्यांना येईल.
४. आपला जीव प्यारा असेल तर गपचुप किनार्‍यावरच उभा रहा...: हे पण लोकेशन, वेदर, हेल्थ असे थ्रेशोल्ड पॉईंट मॅच न होणार्‍या सगळ्यांना येईल. पण हे फक्त २३ सप्टेंबरला ४ ते १० वेळात गणपतीपुळ्याला असलात तरच येईल. जन्मभरीचा अलर्ट नाही येणार, आणि तो ट्युनही होत राहील.

रामू१ च्या बाबत फलज्योतिषाने दि. २३ सप्टेंबरला गणपतीपुळ्याला दुपारी ४ ते १० यावेळात पोहोणे शिकले नसलास तर पाण्या पोहू नकोस. तेव्हा
पाण्यापासून धोका आहे असं सांगितलं असलं तर तुलनेला काही अर्थ आहे. ब्लँकेट विधानं ग्रह तार्‍यांवरुन करण्याला काही अर्थ नाही. बाकी स्टॅटिस्टिक्स हे मराठी भाषेहुन लवचिक असतं. तुम्हाला जे हवं ते स्टॅटिस्टिक्स मध्ये दिसतं. त्यातल्या कुठल्या फिल्टरला कसं ट्युन करायचं हे समजलं नाही तर मग अ‍ॅक्शनेबल इनसाईट असा गंडतो.

>>हा अलर्ट रामू शामू गणू सगळ्यांना येईल.<<
म्हणुनच माझं वरचं मत; परत खाली देतोय ज्यांना समजलं नाहि त्यांच्याकरता. थोडक्यात फलज्योतिषाला एआयची जोड दिली गेली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा.

माझं मत असं आहे - उपलब्ध असलेलं सगळं फलज्योतिष.१ चं साहित्य, लिखाण, आर्टिफॅक्ट्स इ. चा डेटा डिलिजंटली गोळा करुन, एए प्लॅटफॉर्मवर त्याचं स्वरुप बदलायला (फलज्योतिष.२) आणण्याची गरज आहे.

आडात नाही तर घागरीत कुठून येणार ? एखाद्या गोष्टीला शास्त्रिय आधार नसेल तर कितिही डेटा गोळा केला तरीही शेणच येणार, दूध नाही.

लाखो लोकांच्य हाताचे ठसे व त्यांचा जीवनात घडलेल्या घटना असा डेटा गोळा करून ए आय करता येइल. पण व्यर्थ ठरेल.

आकाशात अमुक ग्रह तमुक राशीत ढमुक वेळी आहे म्हणून एक वाईट घटना घडली.

आकाशात अमुक ग्रह तमुक राशीत ढमुक वेळी आहे तेव्हा एक वाईट घटना घडली.

दुसरं वाक्य हे निरीक्षण आहे. अशा प्रकारची अनेक निरीक्षणे ( ग्रहांच्या वक्रगती, चंद्र कुठल्या राशीत अशी आकाशातली निरीक्षणे आणि पाऊस कधी पडतो, वारे कधी सुरू होतात, याबरोबरच इतर बऱ्यावाईट घटना, भूकंप, अपघात, उत्तम पीकपाणी, व्यापारात फायदा इत्यादी आपल्या आयुष्यातली निरीक्षणे) आपल्या पूर्वजांनी घेतली. त्यांना यात कार्यकारणभाव दिसला आणि फलज्योतिष निर्माण झालं. (पहिल्या वाक्यासारखी वाक्यं आणि त्यातून बांधलेले आडाखे)

मला वाटतं अस्चिग यांनी लेखात दाखवलेलं आहे की हा कार्यकारणभाव सिद्ध झालेला नाही! पत्रिकेतील ग्रह जर खगोलीय असतील तर त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम का होऊ शकत नाही ते आधी आपण पाहूया की.
याच्या पुढचा भाग.

@srd स्तोम वाढवणे - विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात फलज्योतिष आणणे.

>>पण व्यर्थ ठरेल.<<
रँडम फॉरेस्ट वर थोडं वाचन करा, हे आवर्जुन सुचवेन... Happy

@srd स्तोम वाढवणे - विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात फलज्योतिष आणणे. >> छे छे त्याने काय स्तोम वाढणार... इतके बॅचलर् डिग्री होल्डर्स बिनाउद्योग नोकरी आहेत. त्यात लगेच दरवर्षी ज्योतिषांना काम मिळेल असं असतं तर अ‍ॅमेझॉनने आतापर्यंत त्यात उडी घेतली असती.

स्तोम वाढणे कशाने होते - अजय देवगणने देवगणच्या स्पेलिंग मधला ए खाल्ला. ज्योतिष सल्ल्यानुसार म्हणे... पण आता अजय देवगणला कोण जाऊन सांगणार बाबा रे तू मानसोपचार घे Wink Happy

फिल्म ईंडस्ट्री मध्ये इतके अप डाउन्स असतात. लोक अक्षरक्षः भीकेलाही लागतात. काहीच सर्टन (खात्रीशीर) नसते. तिथे अंधश्रद्धा फोफावतात.

अजय देवगण करतो म्हणजे ते बरोबर असणार असं वाटणारे काहीजण असतील तसे 'विद्यापीठात शिकवतायत म्हणजे ते बरोबरच असणार' असं मानणारेही असतीलच. स्तोम तर वाढतंच. अजय देवगण ज्योतिषाचा सल्ला घेतो हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग झाला. तसे आपल्या आजूबाजूला अनेक जण घेत असतात. आपण काय प्रत्येकाला सांगायला जात नाही, जाऊ शकत नाही.
विद्यापीठात फलज्योतिष शिकवले जाणे ही वेगळी बाब आहे.

मशीन लर्निंग, रँडम फॉरेस्ट वगैरे बहात्तर रोगावरचे अक्सीर उपाय नव्हेत. मुळात डेटा मध्ये कार्यकारण भाव नसेल तर ते निरुपयोगी आहे. गेल्या चाळीस वर्षाचे मुंबई व कल्याण मटक्याचे ओपन व क्लोज आकडे मशीन लर्निंग मध्ये इकडून टाकले कि तिकडून उद्या काय येणर याचे उत्तर येणार नाही.

वावेच्या कॉजल आणि पर्सनल वि. विद्यापीठ दोन्ही पोस्ट्स ना +१. मुद्दा समजायला बरीच चर्चा झाली आहे, एव्हाना तो ध्यानात यायला हवा होता खरंतर! असो.

वावेच्या कॉजल आणि पर्सनल वि. विद्यापीठ दोन्ही पोस्ट्स ना +१. मुद्दा समजायला बरीच चर्चा झाली आहे, एव्हाना तो ध्यानात यायला हवा होता खरंतर! असो.
+२ !

ह्म्म... विद्यापीठात सध्या शिकवत नाहीत तरी स्तोम वाढतेच आहे. विद्यापीठात शिकवल्याने त्या स्तोमाची गती वाढेल असा काही डेटा आहे का? ज्योतिष सांगणे इल्लिगल नाही मग कुणाला विद्यापीठात त्याबद्दल शिकायचे असेल तर विरोध का? त्या इंडस्ट्रीची तशी डिमांड असेल तर विद्यापीठाने का पूर्ण करायची नाही. दारू बद्दल, तंबाखूबद्द्ल विद्यापीठात प्रशिक्षण मिळतेच. वावे, नाही लक्षात येत मुद्दा. मी अज्ञ म्हणून सोडून देऊ...

>>मुळात डेटा मध्ये कार्यकारण भाव नसेल तर ते निरुपयोगी आहे. <<
ओके, माझी थोडी गल्लत झाली ऑडियंस ओळखण्यात. एआयचे बेसीक फंडे माहित नाहि हे आलेल्या प्रतिसादांवरुन स्पष्ट झालंय. शिवाय, डेटा रँगलिंग, फिचर एंजिनियरिंग, मॉडेल ट्रेनिंग इ. एआय्/एमएल चे फंडे माहित नसल्याने तुमचा हा वरचा प्रश्न हि साहजिक आहे. असो...

सीमंतिनी, स्तोमाची गती वाढेल का असा डेटा आहे का ते मला माहिती नाही. पण आहे ते स्तोम कमी व्हावं असं नक्कीच वाटतं.
अमितवचा पहिल्या पानावरचा प्रतिसाद
ज्या वाटा आहेत त्या शिक्षणाने पुसायच्या का नव्या तयार करायच्या?
Submitted by अमितव on 16 September, 2021 - 15:57

हेच मलाही म्हणायचं आहे!

दारू बद्दल, तंबाखूबद्द्ल विद्यापीठात प्रशिक्षण मिळतेच. काय प्रशिक्षण मिळते विद्यापीठात?

Pages