Submitted by आर्त on 27 August, 2021 - 04:17
अचानक त्वचेवर प्रलयपात झाले,
बटांचे तुझ्या रेशमी घात झाले.
सखे ठेव ताब्यात ती लांब वेणी,
किती ठार प्रत्येक झोक्यात झाले.
कसे तरसलेले खुळे हे दिवाणे,
तुझा गंध धरण्या पुढे हात झाले.
परम भाग्य तू माळल्या मोगऱ्याचे,
अमोदित तुझ्या पुष्पगंधात झाले.
तुझ्या अस्मितेचाच ताऱ्यांस हेवा,
जळजळून ते उजळ गगनात झाले.
निघालीस बाहेर या निग्रहाने,
जुने पुरुषप्राधान्य हे मात झाले.
जरी काल हरलीस तू ती लढाई,
तुझे शौर्य विश्वात विख्यात झाले.
गुलामी लथडलीस तू कुंडलीची,
क्षणी त्याच नक्षत्र कक्षात झाले.
२५.०८.२०२१
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे.
मस्त आहे.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो