नातं निसर्गाशी: हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालिचे

Submitted by जिज्ञासा on 15 August, 2021 - 23:58

जंगल परिसंस्थेनंतर जमिनीवरची आपल्या ओळखीची दुसरी परिसंस्था म्हणजे गवताळ प्रदेश. आजच्या भागात आपण केतकीशी गवताळ प्रदेशांविषयी गप्पा मारणार आहोत.

जिज्ञासा: भारतात किंवा महाराष्ट्रात गवताळ प्रदेश कुठे आढळतात? आणि गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्यं कोणती?
केतकी: खरं सांगायचं तर भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला खरे गवताळ प्रदेश (true grasslands) दिसत नाहीत. आपल्याकडे सवाना हा एक झाडीचा प्रकार दिसतो ज्यात गवतं dominant असतात. या सवानांबद्दल आपण पुढे बोलूच पण त्या आधी आपण खरे गवताळ प्रदेश कुठे आहेत आणि कसे असतात ते बघू. शाळेत असताना या गवताळ प्रदेशांची नावं पाठ केल्याचं आपल्याला नक्की आठवेल. अमेरिकेत प्रेअरी (Prairies), युरोपमध्ये स्टेप्स (Steppe), दक्षिण अमेरिकेत पम्पास (Pampas), ऑस्ट्रेलियातले डाउन्स (Downs) अशा विविध नावांनी हे गवताळ प्रदेश ओळखले जातात. हे खरे गवताळ प्रदेश आहेत कारण या भागात आपल्याला फक्त गवतं दिसतात. त्या बरोबरीने थोड्या प्रमाणात झुडुपं किंवा herbs दिसतात पण वृक्षांची दाट कॅनोपी म्हणजेच सावली या भागात दिसत नाही. आता हे असे गवताळ प्रदेश तयार व्हायला लागणारी नैसर्गिक परिस्थिती कशी असते ते आपण बघूया. अर्थात ही सर्वच वैशिष्ट्ये आपल्याला सगळ्या गवताळ प्रदेशांत दिसत नाहीत. पण त्यातली बरीचशी ज्या प्रदेशात दिसतात तिथे गवताळ प्रदेश तयार झालेले दिसतात. ही वैशिष्ट्ये बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की भारतात खऱ्या गवताळ प्रदेशांसाठी अशी अनुकूल नैसर्गिक परिस्थिती कशी नाही ते.
१. यातल्या बऱ्याच ठिकाणी वर्षभर थोडा थोडा पाऊस (drizzling rains) पडतो. त्यामुळे मातीचा वरचा थर कायम ओला राहतो. जसं आपण लॉनमध्ये कृत्रिमरित्या करत असतो. याने गवतांच्या वाढीला चालना मिळते. याउलट जिथे मान्सूनमुळे वर्षातले चारच महिने पाऊस पडतो तिथे woody growth अर्थात वृक्षांना वाढायला अधिक पोषक स्थिती निर्माण होते.
२. वार्षिक सरासरी तपमान कमी असणे (साधारणतः २० डिग्री से. च्या खाली) - हे ही भारतात फार ठिकाणी आढळून येत नाही. शिवाय या गवताळ प्रदेशांत अनेक ठिकाणी बर्फही पडतो. त्यामुळे वाढीचा काळ फार कमी मिळतो. आणि या इतक्या कमी काळात आपले जीवनचक्र पूर्ण करणारी बहुतांश गवतंच असतात.
३. जरी बराच काळ थोडा थोडा पाऊस पडत असला तरी या पावसाच्या कालावधी संपल्यावर एक दुष्काळाचा (draught) काळ असतो - म्हणजे ६- ८ महिने पाऊस आणि मग उरलेले चार महिने दुष्काळ (longer duration of rain followed by draught). आता ही परिस्थिती काही प्रमाणात भारतात देखील असते. पण इतर अनेक घटक अनुकूल नसतात.
४. या प्रदेशातील प्राणीजीवन - गवताळ प्रदेशांत आढळणारे तृणभक्षी प्राणी आणि बिळ करून राहणारे प्राणी हे तिथे कायम गवतच राहील याची नैसर्गिकरित्या सोय करत असतात. उदाहरणार्थ हरणं सतत चराई करत राहतात किंवा झाडांचा पाला खात राहतात त्यामुळे झाडांची वाढ एका मर्यादेत राहते.
५. याच्या बरोबरीने गवताळ प्रदेशात नैसर्गिक वणवे लागतात जे पुन्हा एकदा तिथली गवताळ प्रदेशाची अवस्था कायम ठेवायला मदत करतात. आपण आधी जे succession या प्रक्रिये विषयी बोललो होतो की जंगल तयार होताना आधी शेवाळं, मग गवत, मग छोटी झुडुपं आणि मग मोठी झाडे अशा अवस्था असतात. तर नैसर्गिक वणवे हे गवताळ प्रदेशाला जंगल निर्माण होण्याच्या पुढच्या पायरीवर जाऊ देत नाहीत. यात महत्त्वाची गोष्ट ही की ही आग “नैसर्गिक” असते.
आता हे जे ५ मुख्य मुद्दे आपण पाहिले हे कमी अधिक प्रमाणात जिथे असतील तिथे खरे गवताळ प्रदेश पहायला मिळतात.

जिज्ञासा: मग भारतात गवताळ प्रदेश अजिबातच नाहीत का?
केतकी: असं नाहीये. आपल्याला भारतात काही ठिकाणी अगदी मर्यादित स्वरूपात खऱ्या गवताळ प्रदेशाचे तुकडे दिसतात. जिथे मानवी हस्तक्षेप किंवा कोणताही land use change न घडता हजारो वर्षे गवताळ प्रदेश आहेत. उदाहरणार्थ, हिमालयात अतिउंच प्रदेशात जिथे तपमान कमी असतं आणि बर्फ असल्याने वाढीचा काळ कमी असतो - या प्रदेशात आपल्याला alpine meadows दिसतात ज्यात गवतांच्या जोडीला herbs असतात.
आपल्या महाराष्ट्रात देखील असे गवताळ प्रदेश दिसतात. कुठे तर सह्याद्रीच्या अति पावसाच्या प्रदेशातल्या कातळांवर! यांना rocky outcrops असे म्हणतात - उदाहरणार्थ कासचे पठार जे जांभा खडकावरचे outcrop आहे. किंवा काही basaltic outcrops पण आहेत आपल्याकडे. या कातळांवर succession च्या प्रक्रियेतून जंगल तयार होईल का? तर होईल पण कधी तर ते geological timescale वर बघितले तर त्याला काही शे/हजार वर्षे जातील. पण आत्ता इथे succession च्या नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले गवताळ प्रदेश दिसतात असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात यातही थोडे मतभेद आहेत. काहींचं म्हणणं असं की पूर्वीचं असलेलं जंगल नष्ट झाल्याने हे प्रदेश तयार झाले आहेत. पण बहुतेक अभ्यासकांच्या मते हे नैसर्गिक गवताळ प्रदेश आहेत. अजून एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आपल्याला गवतं दिसतात ती म्हणजे कड्यांवर - इथली काही Tripogon जातीची गवतं ही प्रदेशनिष्ठ आहेत आणि दुसरीकडे कुठेही सापडत नाहीत! त्यामुळे “कडे (cliffs)” हा विशेष असा गवतांचा अधिवास म्हणता येईल. या शिवाय नद्यांच्या काठी किंवा दलदलीच्या प्रदेशात असेच गवतांचे patches दिसतात. इथे रानऊस म्हणजे उसाची एक रानातली जात दिसते - Saccharum spontaneum असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. महाजन सर गमतीने या गवताला त्याच्या स्पेलिंगमुळे, सखाराम म्हणतात! तर मुद्दा हा की पाणथळ जागांमध्येही आपल्याला नैसर्गिकरित्या गवते वाढताना दिसतात.
मात्र काही ठिकाणी जिथे मानवी हस्तक्षेपामुळे जंगल तयार होऊ शकत नाही आणि मग तिथे सेकण्डरी किंवा दुय्यम स्वरूपाचे गवताळ प्रदेश तयार झालेले दिसतात. आणि दुर्दैवाने आपल्याकडे हे क्षेत्रफळ बरंच जास्त आहे.

जिज्ञासा: या दुय्यम स्वरूपाच्या गवताळ प्रदेशांविषयी थोडं अधिक विस्ताराने सांगशील का?
केतकी: हो नक्कीच. भारतात जे कमी पावसाचे (semi arid) प्रदेश आहेत - ज्यात मुख्यत्वे मध्य भारताचा आणि मध्य महाराष्ट्राचा प्रदेश येतो जिथे काही अंशी पानगळीचं जंगल दिसतं. अशा ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणात आग लावली जाते - म्हणजे नैसर्गिक आग नाही, मुद्दामून कोणीतरी “आग लावतं” आणि “चराई” म्हणजे गुरं, शेळ्या, मेंढ्या यांना अनिर्बंध चरू दिलं जातं, तेव्हा या ठिकाणाच्या मूळ woody growth असलेलं नैसर्गिक जंगल तयार होण्याच्या प्रक्रियेला खीळ बसते. शिवाय हा जो मध्य भारत, मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तो सपाट असल्याने पूर्वीपासून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरात आहेच. त्यात मग चराई आणि मानवनिर्मित वणवे यांमुळे इथली जंगलं तितकीशी उरलेली नाहीत. असा जेव्हा एखाद्या जंगलाचा land use इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलतो तेव्हा मग तिथे दुय्यम गवताळ प्रदेश तयार झालेले दिसतात.
आता या दुय्यम गवताळ प्रदेशांचे देखील पाऊसमानानुसार जास्त वा कमी पाऊस असे दोन उपप्रकार सांगता येतात. सहयाद्रीच्या जास्त पावसाच्या प्रदेशात अनेक ठिकाणी मूळ जंगल नष्ट होऊन गवताळ प्रदेश तयार झालेले दिसून येतात. या अशा डिग्रेडेड जागी कुसळी नावाचं गवत अख्ख्या भारतभर वाढताना दिसतं पण त्यातही सह्याद्रीमधलं कुसळी गवत आणि मध्य महाराष्ट्रातलं कुसळी यांच्या जाती वेगवेगळ्या असतात. आता कुसळी गवत हे एक उदाहरण झालं पण या ठिकाणच्या साऱ्याच जाती एका प्रकारे त्या जागच्या मूळ परिसंस्थेचं झालेलं डिग्रेडेशन दर्शवतात.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जिथे कमी पाऊस आहे पण जमिनीचं आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं गेलं आहे - म्हणजे काही अभयारण्यं, राष्ट्रीय उद्यानं किंवा हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, लामकानी अशा गावांच्या जवळ आपल्याला मग मूळ सवाना प्रकारची झाडी तयार झालेली दिसते. आता सवाना आणि गवताळ प्रदेश यात मुख्य फरक असा की सवाना मध्ये गवताच्या जोडीला अधूनमधून झुडुपं, woody shrubs, आणि काही झाडे दिसतात. शिवाय गवतांमध्ये कुसळीच्या बरोबर इतरही काही गवताच्या जाती दिसतात. बाभळीचे काही प्रकार, हिंगणबेट, लळई, तरवड, बोर अशी छोटेखानी झाडे देखील दिसतात. उत्तम सवाना मध्ये आपल्याला गवतांच्या अनेक जाती पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी या गवतांचे असे एकत्र वाढलेले मोठे clumps तयार झालेले दिसतात. इथे ही गवतं भरपूर उंच काही फूट वाढलेली दिसतात. हे सर्व संरक्षित सवाना प्रदेशात दिसून येते. अशा प्रदेशात जर डोंगर आणि घळी असतील तर तिथे मग आपल्याला पानगळीचं जंगल तयार झालेलं दिसतं.
या चराईविषयी एक महत्त्वाचा मुद्दा असा की गुरं आणि तृणभक्षी प्राणी काही संपूर्ण वर्षभर गवत चरत (grazing) नाहीत. गवत पावसाळ्याचे चार पाच महिनेच उपलब्ध असतं. एरवी हे प्राणी browsing करतात. म्हणजे काय तर ती झुडुपांची आणि झाडांची पानं खातात. हा मुद्दा महत्त्वाचा अशासाठी आहे कारण त्यामुळे आपल्या या गृहीतकाला पुष्टी मिळते की इथलं मूळ जंगल हे सवाना प्रकारचं असलं पाहिजे. कारण सवाना मध्ये गवताच्या जोडीने झुडुपं आणि छोटी झाडे असतात. आणि असे असेल तरच मग वर्षभर या प्राण्यांच्या (herbivores) अन्नाची सोय होऊ शकेल. हाच धागा आपण थोडा पुढे नेला की मग अशा प्रदेशांमध्ये होणाऱ्या जंगली प्राणी आणि माणूस यांच्यातल्या संघर्षाची कारणं लक्षात येतात. आपल्याकडे हरणं किंवा नीलगायी शेतात का येतात कारण त्यांना वर्षभर जंगलात जी अन्न मिळण्याची सोय होती ती आपण नष्ट केली आहे. सवाना डिग्रेड झाल्याने झाडे झुडुपे जाऊन केवळ गवत आणि ते ही कसेबसे वर्षातले ४/५ महिने अशी परिस्थिती असेल तर मग अशा घटनांचे कारण लक्षात येते. जर आपण मूळ सवाना जंगलं परत आणू शकलो तर मग गवताळ प्रदेशातल्या तृणभक्षी प्राण्यांच्या अन्नाची वर्षभराची सोय होईल.

जिज्ञासा: म्हणजे आपल्याकडे खरे गवताळ प्रदेश जरी नसले तरी सवानासारखे गवत बहुल प्रदेश आहेत आणि शिवाय अशा अनेक जागा आहेत जिथे नैसर्गिकरित्या गवत उगवतं! आता पुढचा प्रश्न हा की गवत या वनस्पती कुळाची काय वैशिष्ट्ये असतात?
केतकी: गवतं ही एकदलीय वनस्पती वर्गात येतात. या सगळ्याच एकदलीय (monocots) वनस्पती या बऱ्याच हार्डी (चिवट) असतात. त्यातही गवतं तर खूपच जास्ती हार्डी आहेत - आपल्याला माहितीच आहे की ती अक्षरशः कुठेही वाढताना दिसतात - भिंतींवर, दगडाच्या भेगांत, कमी प्रतीच्या मातीत सगळीकडे गवतं उगवून आलेली असतात. याच बरोबरीने गवतं ही दुष्काळ, आगी, आणि चराई यांना फार सक्षमपणे तोंड देऊ शकतात. ही क्षमता आपल्याला द्विदलीय (dicots) वनस्पतींमध्ये दिसत नाही. अजून एक वैशिष्ट्य असं की प्राण्यांनी चरताना गवत जरी मुळापासून तोडून खाल्लं तरी ते पुन्हा जोमानं वाढू शकतं. हे ही dicots मध्ये दिसत नाही - फार कमी झाडं तोडल्यावर पुन्हा तितक्याच जोमाने वाढताना दिसतात. म्हणजे समजा एखादं तुळशीचं रोप जमिनीच्या वर जरी तोडलं तरी ते पुन्हा उगवून येईलच असे नाही. मात्र गवतांचं growing tip हे पानाच्या मुळाशी (base ला) असतं. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा वाढत राहतात. कुसळीसारख्या गवतांचं बी जरी आगीत जळलं तरी ते टिकून राहतं! बाकीची झाडं मात्र एकदा आगीत जळून गेली की त्यांच्या बिया देखील शिल्लक रहात नाहीत.
अनेक गवतं ही मुळांच्या द्वारे वाढतात. बहुतांश गवतं ही seasonal असतात - बहुवर्षीय गवतं तशी कमी आहेत. अशी गवतं मग जसं मौसमी पाऊस/पाणी मिळेल तशी मुळांच्या मधून वाढू शकतात.
गवताचं पान जर आपण पाहिलं तर ते बऱ्यापैकी stiff असतं.कारण गवताच्या पात्यांमध्ये सिलिका असते. त्यामुळे गवतीचहा तोडताना कधी कधी बोटाला काचतं. शिवाय काही गवताची पाती आपल्याला आतल्या बाजूला वळलेली (lengthwise curling) दिसतात. हे कशासाठी तर evapotranspiration म्हणजे फोटोसिन्थेसिसच्या प्रक्रियेत बाहेर पडणारे पाणी वाचवण्यासाठी.
एकदलीय वनस्पतींचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांना तंतुमुळे (fibrous roots) असतात. या मुळांनी वरच्या थरातली माती धरून रहायला मदत होते. त्यामुळे मातीची धूप थांबवायची असेल तर तुम्ही कुठलंही गवत लावलं तरी त्याचा लगेच उपयोग होताना दिसतो. यासाठी आपल्याकडे वाळा लावला जातो कारण माती धरून ठेवण्याबरोबरच त्यातून थोडे उत्पन्न देखील मिळू शकते. किंवा गवतीचहा पण लावला जातो. गवतकुळाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे परागीभवन हे वाऱ्याने होते. सहसा झाडे यासाठी कीटकांवर किंवा पक्ष्यांवर अवलंबून असतात. गवतं मात्र थेट वाऱ्याला आपला दूत बनवून आत्मनिर्भर झालेली दिसतात!
या आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे आज जगावर गवतांचं साम्राज्य आहे! ते कसं? तर आपण जे अन्न खातो ती सर्व मुख्य पिकं ही गवतकुळातली आहेत - तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी, ऊस, नाचणी ही सारी गवतं आहेत! यांच्या ज्या रानटी जाती होत्या त्या माणसाने शेती करायला लागल्यावर प्रयोग करून विकसित करत नेल्या आणि आज त्या संपूर्ण मानवजातीला अन्न पुरवीत आहेत. गमतीचा भाग असा की वरकरणी आपल्याला वाटतं की माणसाने गव्हाला domesticate केले पण खरे पाहीले तर उत्क्रांतीच्या हिशोबानुसार गव्हाने माणसाला domesticate केले असेही म्हणता येईल! या रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘सेल्फिश जीन’ या पुस्तकात मांडलेल्या आर्ग्युमेण्टमागचा विचार असा की कोणताही जीव शेवटी स्वतःची संख्या कशी वाढेल आणि आपण या स्पर्धेत कसे टिकून राहू हे साधायचा प्रयत्न करत असतो. मूळ डार्विनचाच सिद्धांत. त्यातून तो उत्क्रांत होतो. गव्हाने आपली उत्क्रांती मानवाकरवी साधून घेतली आहे आणि आज म्हणूनच पृथ्वीवरती लाखो एकरांवर त्याची लागवड (monoculture) केली जाते. गव्हाने आपली ताकद एवढी वाढवून ठेवली आहे की गव्हाशिवाय आपले मानवी जीवन अशक्य वाटू लागले आहे.

जिज्ञासा: इंटरेस्टिंग आहे हे! असा विचार याआधी केला नव्हता! कोणी कोणाला domesticate केले असा प्रश्न पडला आहे मला आता! पण तूर्तास आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गवताळ प्रदेशात सहसा कोणती गवते, झुडपे आणि प्राणी पक्षी यांचा अधिवास असतो? यातील काही रोचक हितसंबंध सांगता येतील का? आणि त्याला लागून पुढचा प्रश्न - आपल्याकडच्या गवताळ प्रदेशात गेल्यावर काय बघाल?
केतकी: आता या प्रश्नाचे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने उत्तर देते. या आपल्याकडच्या सवाना प्रदेशात काही endangered लिस्ट मधले प्राणी पक्षी आहेत. आणि ते या यादीत येण्याचं मुख्य कारण हेच आहे की हे सवाना प्रदेश अत्यंत डिग्रेडेड अवस्थेत आहेत. यातला महत्त्वाचा पक्षी म्हणजे माळढोक (great Indian bustard). गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रात एक जोडी होती. आता त्यातला नर पक्षी सापडत नाहीये. त्यामुळे आता त्यांची संख्या वाढणं जवळपास अशक्य आहे. याशिवाय काही इंटरेस्टिंग पक्षी आहेत - एक तणमोर (Lesser Florican) नावाचा सुंदर पक्षी आहे. या शिवाय larks, shrikes असे गवताळ प्रदेशात आढळणारे स्पेशल पक्षी आहेत. शिवाय गवताळ प्रदेशांमध्ये कीटकांमध्ये प्रचंड विविधता दिसून येते. जर आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गवताळ प्रदेशात गेलो तर पावलो पावली कीटकांच्या वेगवेगळ्या जाती दिसतात. या परिसंस्थेतला आपल्याकडचा apex predator हा लांडगा आहे. कोल्हा, बिबट्या, सायाळ, pangolin हे ही दिसतात. तृणभक्षी प्राण्यांमध्ये काळवीट, चिंकारा, हरीण अशी भरपूर विविधता दिसते. त्यामुळे छान मोठ्या अन्न साखळ्या तयार झालेल्या दिसतात. गरुडासारखे शिकारी पक्षी दिसतात. आता इथे आढळणाऱ्या परस्पर संबंधांमधला एक मजेशीर संबंध सांगते. खाटीक पक्ष्याचे नाव हे त्याच्या विशिष्ट सवयीमुळे पडले आहे - त्याने शिकार केलेले कीटक तो काटेरी झाडांच्या काट्यांवर टांगून ठेवतो! आता हे एका प्रकारचं coevolutionच आहे - कारण खाटीक पक्षी हा बाभळीसारखी काटेरी झाडे असलेल्या सवाना प्रदेशात आढळतो.
आता गवताळ प्रदेशात काय बघाल तर एक गोष्ट नक्की बघा असं मी सांगेन ती म्हणजे गवतफुले. कारण एरवी या फुलांकडे आपले लक्ष जात नाही. आपल्याकडे गवताळ प्रदेशात जाण्याचा सिझन सप्टेंबर शेवट ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा असतो. यावेळी बहुतेक सगळी गवते फुललेली असतात. तेव्हा भरपूर कीटक, फुलपाखरं आणि मुख्य म्हणजे गवतांची फुलं बघायला मिळतात. जर आपण कुठल्याही गवताचा तुरा एखाद्या भिंगातून पाहिला तर त्यात आपल्याला एक वेगळाच खजिना गवसेल! हे सौंदर्य नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. असं एखादं गवतफुल भिंगातून नक्की बघावं - २ मिमी ते अर्धा सेंटीमीटर इतक्या छोट्याश्या जागेत किती कॉम्प्लेक्सिटी असू शकते याची तुम्हाला कल्पना येईल.

जिज्ञासा: वाह! तुझे हे गवतफुलाचे वर्णन ऐकून मला विल्यम ब्लेकच्या
To see a World in a Grain of Sand
And a Heaven in a Wild Flower
Hold Infinity in the palm of your hand
And Eternity in an hour
या प्रसिद्ध ओळींची आठवण झाली! आता थोडे सवानांच्या सद्यस्थिती आणि त्यावरच्या उपायांविषयी बोलूया. मानवनिर्मित आगी आणि चराई या दोन्ही गोष्टींमुळे महाराष्ट्रातील सवाना प्रदेशांची हानी होऊन तिथे दुय्यम प्रकारचे गवताळ प्रदेश तयार झाले आहेत असं आपण मगाशी बोललो. यावर चराईबंदी सारखे उपाय किती परिणामकारक असतात?
केतकी: चराईबंदीचं महत्त्व निश्चितच आहे आणि याचे चांगले परिणाम बघायला मिळतात. मध्य महाराष्ट्रातून ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना जाणवलं असेलच की तिथला प्रदेश हा अत्यंत उघडाबोडका असा दिसतो. इथली मूळ परिसंस्था सवाना - गवताळ प्रदेश अशी असून सुद्धा जमिनीवर ६ इंचापेक्षा जास्त उंचीचं गवत दिसत नाही कारण सतत चराई सुरु असते. याच भागातल्या धुळे जिल्ह्यातल्या चराईबंदी करणाऱ्या लामकानी गावाच्या केस स्टडीबद्दल तुला थोडे सांगते. हे लामकानीचे मॉडेल भारतासाठी अनुकूल आहे. धुळ्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारे डॉ. नेवाडकर हे मूळचे लामकानीचे. त्यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली. या गावकऱ्यांनी जवळपास ५०० हेक्टर जमिनीवर गवताळ प्रदेश पुनरुज्जीवनाचा उत्तम प्रयोग केला आहे. तिथल्या लोकांना याचा मोठा फायदा झाला आहे. इतर छोट्या गावांप्रमाणेच लामकानी गावातून अनेक तरुण नोकरी उत्पन्नासाठी शहरात स्थलांतर करत होते. ऊसतोडणी कामगार म्हणून बाहेर पडत होते. गावाच्या भूजलाची पातळी कमी झाल्याने लोकांनी शेती सोडून दिली होती. या साऱ्यावर उपाय म्हणून गावाजवळ जे एक वनखात्याच्या मालकीचे टेकाड आणि त्याच्या आजूबाजूची जमीन चराईबंदी करून राखायची आणि या ठिकाणी गवतं पुनरुज्जीवित करायची अशी योजना आखली. त्यासाठी मग ओढ्यांवर बांध घालणे, पाणी मुरण्यासाठी कंटूर ट्रेंचेस तयार करणे असे उपाय तर केलेच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संपूर्ण जागेला संरक्षण दिलं. चराई आणि वणवे दोन्ही थांबवले. या साऱ्या प्रयत्नांमुळे गवतं मोठ्या प्रमाणावर वाढू लागली - आधी भरपूर असणाऱ्या पण निकृष्ट जातीच्या काळ्या कुसळी गवताचं प्रमाण कमी होऊन त्याची जागा अधिक सकस अशा पवन्या, मारवेल अशा गवतांनी घेतली. जर गवताळ प्रदेश उत्तम प्रकारे राखले तर जी गवतं वाढतात ती गुरांना चारा म्हणून उत्कृष्ट असतात. ही खाल्ल्याने गायी म्हशींचे दूध वाढण्यासाठी मदत होते. ही गवतं अत्यंत गुणी आहेत. पूर्वी या भागात एखाद्या पहेलवान माणसाची प्रशंसा करताना “याने पवन्याचं तूप खाल्लं आहे!” असं म्हटलं जात असे. विदर्भात पवन्या गवताला गायीची पुरणपोळी म्हणतात! पण ही गुणी गवतं निकृष्ट गवताळ प्रदेशात वाढत नाहीत.
हा असा चांगला चारा मिळू लागल्याने अनेकांनी आपला दुधाचा धंदा पुन्हा सुरु केला आहे. डॉ. नेवाडकर सांगतात की पूर्वी ज्या गावात सर्व घरांमधून फिरलात तरी १० लिटर दूध गोळा व्हायचं नाही आज त्याच गावातून दररोज ३००० लिटर दूध धुळ्याला जातं! या शिवाय इतरही अनेक फायदे झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने विहिरी आणि बोअरवेल मध्ये पुन्हा पाणी भरले ज्याने शेती सुधारली. त्याने गावाची अर्थव्यवस्था सुधारली.
आता महाराष्ट्रातला बहुतांश भाग हा असाच पूर्वीच्या लामकानी गावासारखा चराई आणि वणव्यांनी ग्रस्त आणि दुष्काळी आहे. जेव्हा आपण गवताळ भागांना संरक्षण पुरवतो तेव्हा सर्वत्र दिसणारे कुसळी गवत कमी होऊन पवन्या, मारवेल सारखी उत्तम प्रतीची गवते वाढीस लागतात. शिवाय जमिनीवर सतत एक मोठा biomass चा थर राहिल्याने जमीनही तापत नाही. जर अशा प्रकारे या भागाचे पुनरुज्जीवन केले तर निसर्ग तर टिकेलच शिवाय स्थानिकांना याचा मोठा फायदा होईल.
आम्ही जेव्हा लामकानीला पहिल्यांदा गेलो तेव्हा लक्षात आलं की गावकऱ्यांनी त्यांना चारा मिळावा म्हणून हा प्रकल्प सुरु केला होता. याच्यातून ecological restoration आणि conservation होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. हे जे घडलं ते खरं तर या प्रकल्पाचं बाय प्रॉडक्ट म्हणता येईल. आपण बरेचदा ecological restoration हा उद्देश ठेवून सुरुवात करतो. पण या ठिकाणी ते आपोपाप झाले! आपण मगाशी ज्या गवताळ प्रदेशातल्या जैवविविधतेविषयी बोललो ती आता या लामकानीच्या आसपास दिसून येते. अनेक जातींचे indicator पक्षी दिसतात. छान अन्नसाखळ्या तयार झाल्या आहेत.

जिज्ञासा: लामकानीमध्ये मूळ सवाना जंगलाची परिसंस्था आता दिसायला लागली आहे का?
केतकी: अगदी अगदी! एकदम छान सवाना प्रकारचे जंगल तिथे तयार झालं आहे.

जिज्ञासा: किती छान विन-विन म्हणतात तशी ही लामकानीची गोष्ट आहे! मला वाटते मध्यंतरी पानी फाऊंडेशनने या विषयी एक व्हिडीओ केला होता. तर आता याला जोडूनच पुढचा प्रश्न हा की गवताळ प्रदेशांच्या इकॉलॉजिकल सेवा कोणत्या?
केतकी: गवताळ प्रदेशांच्या काही इकॉलॉजिकल सेवा आपण या लामकानीच्या गोष्टीत पाहिल्याच आहेत. गुरांना चारा, जमिनीचं तपमान कमी राखणं, मातीची धूप न होऊ देणं, पाणी मातीत मुरण्यासाठी मदत होणे या सेवांचा आपल्या गप्पात उल्लेख झालाच आहे. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे माणसाचे मुख्य अन्नाचे स्रोत ही आहे. शिवाय गवताळ प्रदेशात देखील रानभाज्या उगवतात यात काही काकडीच्या जातीतल्या भाज्या, काही कंदवेल, टाकळ्या सारख्या भाज्या (herb) आहेत. काही झाडांची फळे खाल्ली जातात. हिंगणबेट नावाच्या झाडाची फळे जर फोडली तर त्यातून साबणासारखा द्राव बाहेर पडतो त्याचा स्वच्छतेसाठी उपयोग करता येऊ शकतो. वाळा, पातीचहा अशा गवतांचे आर्थिक मूल्य देखील असते.

जिज्ञासा: आता शेवटचा थोडासा अवांतर प्रश्न. लॉन लावून कृत्रिमरीत्या हिरवळ निर्माण करणं आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. असे गवत राखणे हे बरेच खर्चिक असते. तर याला काही आपल्या भारताच्या इकॉलॉजीला सूट होणारे पर्याय आहेत का?
केतकी: आपण पाहिलं तसं खरे गवताळ प्रदेश तयार व्हायला लागणारे जैवभौगोलिक घटक आपल्याकडे नसल्याने लॉन निर्माण करणं आणि maintain करणं खर्चिक असतं. पण जर लॉन करायचंच असेल तर ते छोट्या प्रमाणावर करावं आणि ते करताना आपल्याकडच्या दुर्वा म्हणजेच हरळी, मंडूकपर्णी अशा विविध वनस्पती लावल्या तर अधिक चांगलं. मात्र या लॉनचा आकार खूप मोठा नसावा कारण जरी स्थानिक गवतं असली तरी आपल्याला वर्षभर कृत्रिमरीत्या मातीचा वरचा थर ओला ठेवायचा तर भरपूर पाणी लागणारच आहे. जर प्रक्रिया केलेलं grey water घालत असतील तर त्यातल्या त्यात बरं पण बहुतांश वेळा लॉनला आपल्याकडे स्वच्छ शुद्ध पाणीच घालतात. माझ्या मते भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात बहुवर्षायु (perennial) वनस्पती लावणंच सगळ्यात श्रेयस्कर आहे.

जिज्ञासा: आपण सुरुवातीला पाहिलं की महाराष्ट्रात सवाना ही सर्वाधिक भूभागावर असलेली प्रमुख परिसंस्था आहे. त्यामुळे मला वाटतं की या परिसंस्थेविषयी आपल्याला प्रत्येकाला माहिती असली पाहिजे. आज या गप्पांमधून आपल्या वाचकांना या परिसंस्थेची तोंडओळख झाली आहे याचा मला आनंद आहे.

लामकानी वरचा पानी फाऊंडेशनचा व्हिडीओ

आधीचे भाग

भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १

भाग ६: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २

भाग ७: नातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी

भाग ८: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग १

भाग ९: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २

भाग १०: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग ३

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे हडपसर ते नीरा लोणंद रेल्वेमार्गालगतचा भाग, गोंदवले परिसर इथे दूरवर क्वचितच मोठे झाड दिसते. बाकी तुरळक गवत. तो गवताळ म्हणता येईल का?

धन्यवाद कुमार सर आणि Srd!
Srd, तुमच्या प्रश्नाला केतकीने दिलेले उत्तर - हो, मिश्र म्हणता येईल - गवताळ + काटेरी झुडूपी पानगळी जंगल.
बाकीच्या लेखांवर आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे केतकीने दिली आहेत. मी लवकरात लवकर ती पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. लेख पूर्ण करणे ही प्राथमिकता असल्याने उत्तरे देणे थोडे मागे पडले आहे.
या लेखमालिकेचा अजून एक भाग लिहिण्याचा विचार आहे. पण कार्यबाहुल्यामुळे तो पुढच्या सोमवारी येईलच असे नाही. पण लवकरात लवकर येईल असा प्रयत्न करेन.

वाचतोय,

माझा असा समज होता की भारतात बर्फापासून वाळवंटापर्यंत सगळ्या प्रकारचे नैसर्गिक अधिवास आहेत. पण भारतात आपल्याला खरे गवताळ प्रदेश सापडत नाहीत म्हणजे असा समज योग्य नाही का?

हिमालयातील पठारं ज्याला बुग्याल म्हणतात त्यावर कुठल्याही प्रकारची झाडे उगवत नाहीत फक्त लॉन सारखे गवतच उगवते. पण त्यांचे क्षेत्रफळ फार मोठे नसते. त्यांनाही गवताळ प्रदेशात गणता येणार नाही का?

या लेखमालिकेचा अजून एक भाग लिहिण्याचा विचार आहे.

ह्यातल्या 'एक भाग'ला माझा विरोध आहे. अजून कितीतरी भाग येऊ शकतात. कृपया लिहित रहा. सवडीने लिही पण अजून खूप भाग येऊ दे.

खुप छान मालिका.

गव्हाने मानवाला गव्हाळले वाचून गंमत वाटली. मांजरांनीही मानवाला असेच मांजराळले आहे.

भुगोलात टुंड्रा वगैरे वाचले होते. आपले ऊत्तराखंडमधली व्हॅली आॅफ फ्लावर कुठल्या प्रकारच् जंगल आहे?

धन्यवाद rmd, फारएण्ड, साधना!

साधना, मला वाटते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स alpine/subalpine meadows प्रकारच्या गवताळ प्रदेशांत मोडते.

हर्पेन, true grasslands म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो पूर्वी एक iconic wallpaper असायचा तसे प्रदेश. ज्यात नजर जाईल तिथवर केवळ गवत आहे आणि एकही झाड नाही अशी जागा. अशा true grasslands साठी आवश्यक ते घटक भारतात नाहीत. पण हिमालयातली पठारं ही एका प्रकारचे गवताळ प्रदेश (alpine/subalpine meadows) म्हणता येतील.

बाकी हा स्वल्प विराम आहे असे म्हणते! विषय, व्यक्ती आणि वेळ यांचे समीकरण जुळले तर अजून लिहायला नक्की आवडेल!