नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

Submitted by जिज्ञासा on 4 June, 2021 - 23:45

असंबाधमं बध्यतो मानवानां यस्या उद्वतः प्रवतः समं बहु।
नानावीर्या ओषधीर्या बिभर्ति पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः।। अथर्ववेद

अर्थ: ही धरा जी आपल्या पर्वत, दऱ्या आणि पठारांच्या माध्यमातून मनुष्यांना आणि सर्व जीवांना आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारचे अनिर्बंध स्वातंत्र्य प्रदान करते. जी अनेक गुणांनी संपन्न अशा औषधी वनस्पतींना जन्म देते आणि त्यांचे पोषण करते. अशी पृथ्वी आम्हाला समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो.

प्रस्तावना

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या दिवसाचे निमित्त साधून या गप्पांच्या मालिकेचा पहिला भाग तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपण सर्वजण पर्यावरणऱ्हासाविषयी, हवामानबदल, प्रदूषण, तपमानवाढ या सार्‍याविषयी ऐकून असतो आणि आपल्या परीने शक्य तितके उपायही करत असतो. मायबोलीवर याविषयी काही छान धागे देखील आहेत. तरी एक सामान्य नागरिक म्हणून जर आपल्याला कोणाला नदीच्या परिसंस्थेबद्दल किंवा वाळवंटाच्या परिसंस्थेबद्दल चार गोष्टी सांगा असं विचारलं तर आपल्याला त्या माहिती असतीलच असं नाही. आपल्यापैकी काही जणांना पक्षीनिरीक्षण, ट्रेकिंग, अभयारण्याच्या भेटी या साऱ्या गोष्टींची आवड असेल पण हवामान, जमीन, वनस्पती, प्राणी-पक्षी व इतर जीवजंतू यांचा साकल्याने विचार आपण क्वचितच करतो. म्हणजे कोणत्या प्रदेशात कोणती परिसंस्था असते, ती का असते आणि ती कशी काम करते याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते आणि सहाजिक आहे जे माहिती नाही त्या विषयी आत्मीयता किंवा प्रेम वाटत नाही. शेजारच्या बिल्डिंगमधल्या कुठल्या तरी मुलाचं/मुलीचं लग्न आणि आपल्या कुटुंबातल्या आपल्या सख्ख्या भावाचं/बहिणीचं लग्न यात फरक असतोच ना! शिवाय ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांना हा अनुभव असेलच की एकदा या प्राण्यांचा लळा लागला की आपली त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते! या लेखमालेचा मुख्य उद्देश आपल्या सर्वांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणे आहे. आपल्याला निसर्गात असलेल्या घटकांची जितकी जास्त ओळख होईल तितका आपला निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आपल्याला निसर्ग अनेक गोष्टी अक्षरशः फुकट देत असतो. त्याची आपल्याला अगदीच जाणीव नसते असं नाही पण मनुष्य स्वभाव असा आहे की आपण गोष्टी फार गृहीत धरतो. या मालिकेतून आपल्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या अनेक सबसिडी आणि त्यांचे अप्रत्यक्ष फायदे लक्षात येतील आणि त्यातून निसर्गसंवर्धनाचं महत्त्व आपल्याला नव्याने पटेल अशी आशा आहे.
या लेखमालेचा दुसरा उद्देश निसर्ग संवर्धनाविषयीचे काही गैरसमज दूर करणे किंवा होणाऱ्या काही सार्वत्रिक चुका टाळता येतील का असा प्रयत्न करणे हाही आहे. बरेचदा आपण चांगल्या भावनेने काहीतरी निसर्गसंवर्धन करायला जातो मात्र त्याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात याची जाणीव आपल्याला नसते. जर आपल्याला एखादी परिसंस्था कशी मुळात कशी काम करते याची थोडीबहुत माहिती असेल तर आपण उचललेली पावले ही योग्य आहेत की नाही याची एक जुजबी चाचणी आपल्याला स्वतःलाही करता येऊ शकते. या प्रकारची माहिती देणे हा या लेखमालेचा दुसरा हेतू आहे. जसे जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा आपल्यापैकी अनेकांना त्याविषयी काहीच माहिती नव्हती. पण आता विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीमुळे आपण सगळे अधिक सजग आणि जागरूक झालो आहोत. तसेच काहीसे आपल्या पर्यावरणाच्या बाबतीतही घडायला हवे आहे. त्यासाठी पर्यावरणाविषयीची शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत पोहोचवण्याचा या लेखमालेचा अजून एक उद्देश आहे.
पृथ्वीवर प्रचंड नैसर्गिक विविधता आहे तेव्हा आपल्याला या साऱ्यांची ओळख शक्य नाही. मात्र जगाच्या भूगोलाची आणि नैसर्गिक प्रदेशांची तोंडओळख आणि आपल्याला तुलनेने अधिक जवळ असलेल्या निसर्गाची म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातील निसर्गाची अधिक जवळून नीट ओळख असावी हे शक्य आहे. हीच ओळख आपण ऑयकॉस (Oikos - https://oikos.in/) या संस्थेची सह- संस्थापिका केतकी घाटे हिच्याशी गप्पा मारत करून घेणार आहोत. केतकी गेली जवळपास वीस वर्षे पर्यावरण पुनरुज्जीवन आणि संरक्षण या क्षेत्रात काम करीत आहे. आपल्या मायबोलीकर मंजूताई यांनी घेतलेली तिची मुलाखत तुम्ही वाचली नसेल तर नक्की वाचा. (दुवा: https://www.maayboli.com/node/53868)
ही मालिका वाचताना वाचक जर कोणत्याही दोन नैसर्गिक (जैविक अथवा अजैविक) गोष्टींमधले नातेसंबंध जोडायला शिकले आणि निसर्गाकडे साकल्याने, एका holistic दृष्टीने पाहू लागले तर ते या मालिकेचं मोठं यश असेल.
या पहिल्या भागात आपण इकॉलॉजी म्हणजे काय, तिचा अभ्यास कसा करायचा आणि पृथ्वीवरील महत्त्वाच्या biomes विषयी माहिती घेणार आहोत.

जिज्ञासा: केतकी, सर्वप्रथम या लेखमालेसाठी तू जो वेळ देते आहेस त्यासाठी तुझे आभार! सुरुवातीचा माझा प्रश्न हा की इकॉलॉजी म्हणजे काय?
केतकी: मला देखील या लेखमालेत सहभागी होताना आणि या माध्यमातून मायबोलीच्या सदस्यांशी संवाद साधताना आनंद होत आहे. तर इकॉलॉजी या शब्दाची उत्पत्ती oikos या ग्रीक शब्दापासून झाली आहे ज्याचा अर्थ होतो घर. आणि लॉजी म्हणजे अभ्यास. म्हणजे इकॉलॉजीच्या अनुषंगाने पृथ्वी हे घर आणि या घराचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी. मराठी प्रतिशब्द सांगायचा तर पारिस्थितिकी. पण आपण इकॉलॉजी शब्द वापरू. इकॉलॉजीची ही इतकी साधी सोपी व्याख्या आहे. आता आपल्या घरामध्ये आपले आई बाबा, नवरा/बायको, मुले, भावंडे, आजी आजोबा असे सदस्य असतात आणि त्या बरोबरीने काही वस्तू देखील असतात. म्हणजे जैविक आणि अजैविक अशा दोन्ही घटकांनी आपलं घर बनतं. आणि घरामध्ये कुटुंबातल्या सदस्यांचा एकमेकांशी संबंध असतो तसाच घरातल्या वस्तूंशी देखील संबंध असतो उदाहरणार्थ कपडे, भांडीकुंडी. तसंच पृथ्वीवर देखील काही अजैविक आणि जैविक घटक आहेत जे एकमेकांवर परिणाम करत असतात आणि दोन्ही घटकांचा परस्परांशी संबंध असतो. उदाहरणार्थ माती, दगड, पाणी, हवा हे सगळे झाले अजैविक घटक आणि प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, वनस्पती हे झाले जैविक घटक. हे पृथ्वीच्या पातळीवरही घडत असतं आणि विविध परिसंस्थांच्या पातळीवरही घडत असतं. या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास.

जिज्ञासा: तर मग पुढचा प्रश्न असा की इकॉलॉजीचा अभ्यास का करायचा?
केतकी: चांगला प्रश्न आहे. असू देत ना ती काय झाडे, सूक्ष्मजीव, माती, दगड वगैरे पृथ्वीवर. ते असल्याने किंवा नसल्याने आपल्याला काय फरक पडतो? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. तर फरक पडतो. याचं मुख्य कारण म्हणजे ही पृथ्वीवरची इकॉलॉजी म्हणजे माणसांसाठी सप्लाय डेपो आहे! आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या सर्व गोष्टींचा स्रोत हा निसर्ग आहे. आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर कुठलीही वस्तू घ्या ती निसर्गातूनच येते आणि ती निर्माण करण्यासाठी लागणारी ऊर्जा देखील निसर्गातूनच येते. तेव्हा या कारणासाठी नैसर्गिक परिसंस्था कशा काम करतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ जर आपण जर दुकानातून स्टीलचे भांडे आणले तर स्टील हे खाणीतून प्रक्रिया होऊन आले आहे, त्याच्यावर असलेले प्लास्टिक देखील कुठल्याशा तेल विहिरीतून प्रक्रिया होऊन आले आहे, बॉक्सचा पुठ्ठा कुठल्यातरी लाकडाच्या लगद्यापासून आला आहे आणि हे सर्व बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि ऊर्जा देखील निसर्गातूनच मिळाली आहे. याला वस्तूचे life cycle analysis म्हणतात. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचं असं ऍनॅलिसिस करतो तेव्हा आपण निसर्गातल्या कुठल्यातरी स्रोतापाशी जाऊन थांबतो. स्रोतापासून आपल्यापर्यंत अनेक टप्पे असतात. जितके टप्पे जास्त तितका ऊर्जेचा वापर अधिक आणि तितकी प्रदूषणात वाढ ! थोडक्यात काय आपण जितक्या अधिक वस्तू वापरू तितकी प्रदूषण वाढ आणि निसर्गात बदल होणार. आणि आपल्या रोजच्या आयुष्यात आपण भरपूर गोष्टी वापरत असतो. यात केवळ consumption हा मुद्दा नसून किती प्रमाणात आणि काय स्वरूपाचे हे देखील महत्त्वाचे आहे. म्हणजे घराशेजारच्या जंगलातून फळे तोडून खाणारा आदिवासी आणि काश्मीरची सफरचंदे पुण्यात बसून खाणारे आपण - या दोन्ही फळे खाण्यात फरक आहे. आपण शहरी जीवनशैलीमुळे अधिक नैसर्गिक स्रोतांचा, वस्तूंचा, आणि ऊर्जेचा वापर करतो. यामुळे आपण निसर्गावरचा ताण खूप वाढवतो आहोत. शिवाय आपण वापरत असलेल्या बहुतेक वस्तू या आता आपल्या गरजेच्या वस्तू होत चालल्या आहेत आणि या सगळ्या गरजांसाठी आपण निसर्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. विचार करा जर उद्या स्टील आणि प्लास्टिक आपल्या आयुष्यातून नाहीसे झाले तर आपल्याला फार मोठ्या अडचणींना सामना करावा लागेल. त्यामुळे इकॉलॉजीचा विचार का करायचा तर आपल्याला लागणारी सर्व संसाधनं ही निसर्गातून येतात.
या अजैविक संसाधनांच्या बरोबरीने बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता ही देखील महत्वाची आहे. आपण जैवविविधतेवर देखील तेवढेच अवलंबून आहोत. उदाहरणार्थ, जर आपल्या शेतीमधली विविधता नष्ट झाली तर आपल्यासाठी अन्नाचा तुटवडा निर्माण होईल. औषधांसाठी देखील आपण या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. समुद्रासारख्या मोठया परिसंस्था मोठया प्रमाणात अन्न पुरवत आहेत. याखेरीज जैवविविधतेपासून आपल्याला अनेक इकॉलॉजिकल सर्विसेस मिळतात ज्याविषयी आपण पुढील काही भागात बोलूच पण या सर्व सर्विसेस मुळे माणसाचं जीवन अत्यंत सुकर झालं आहे. तेव्हा निसर्गातील जैविक आणि अजैविक या दोन्ही घटकांवर मानव जातीचं संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे तेव्हा त्यांचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे ओघाने आलंच.
आत्ताच्या काळात माणसाने केलेल्या प्रगतीमुळे निसर्गात अतिशय वेगाने बदल होत आहेत आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर होत आहे. अशावेळी इकॉलॉजीच्या अभ्यासाचे महत्त्व अधिकच वाढते. सध्याची कोरोनाची महामारी ही निसर्गात झालेल्या ढवळाढवळीमुळेच उद्भवलेली आहे. माणसांमध्ये नवीन व्हायरस शिरणे हे तेव्हाच घडते जेव्हा स्पिलओव्हर होतो. स्पिलओव्हर म्हणजे एका ठिकाणची इकॉलॉजीची एकसंधता नष्ट होते आणि तेव्हा तिथल्या वन्य प्राण्यांमध्ये असणारे विषाणू हे इतर पाळीव प्राण्यांमध्ये किंवा माणसांमध्ये संक्रमित होतात. इकॉलॉजीची एकसंधता नष्ट होण्याचे एक कारण अनिर्बंध जंगलतोड आणि खाणकाम हे आहे. आणि हे कशासाठी तर आपल्याला अधिकाधिक वस्तू वापरायला मिळाव्यात म्हणून.
जरी आपण आकडेवारीत शिरलो नाही तरी पृथ्वी हा एकच ग्रह आपल्याला सध्या उपलब्ध आहे हे तर उघड आहे. मग प्रश्न येतो की ज्या गोष्टीवर आपलं जीवनमान अवलंबून आहे आणि जी गोष्ट आपल्याला मर्यादित स्वरूपातच उपलब्ध आहे ती गोष्ट आपण काटकसरीने वापरायला नको का? या मर्यादित साधनांमधून आपण अमर्याद विकास किंवा अमर्यादित वस्तुंचा वापर करू शकत नाही. निसर्गाचा वापर किती प्रमाणात करायचा हा विवेक आपल्याला ठेवावाच लागणार आहे. कारण अमर्यादित वापरामुळे होणारे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. हवामान बदल किंवा रोगराई किंवा अनियमित पावसाच्या रूपात. तेव्हा अत्यंत स्वार्थी मानवकेंद्री दृष्टिकोनातून विचार केला तरीही इकॉलॉजीचा अभ्यास आणि त्याचे व्यवस्थापन आपल्याला गरजेचे आहे.

जिज्ञासा: बऱ्याचदा काही लोकांचे असे म्हणणे असते की हवामान बदल हा नैसर्गिक आहे आणि हा पूर्वीही घडलेला आहे मग यात काय विशेष?
केतकी: तर एका दृष्टीने त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पृथ्वीचं ४५० कोटी वर्षांचे आयुष्य बघितलं तर ह्या पूर्वीदेखील पृथ्वीच्या हवामानात अतिशय मोठे बदल घडून आलेले आहेत. म्हणजे हिमयुग असेल किंवा आज आहे यापेक्षाही अधिक पृथ्वीच तपमान राहिलेलं आहे. परंतु जर आपण काळाचा आणि गतीचा विचार केला तर पूर्वी हे सर्व बदल ज्या वेगाने घडले तो वेग आणि आत्ताचे जे बदल घडत आहेत त्या बदलांचा वेग यातला फरक लक्षणीय आहे. आणि हा बदल केवळ एका प्रजातीने घडवून आणला आहे, हे पुर्वी झालेले नाही. प्रत्येक प्रजाती ही निसर्गात थोडेबहुत बदल करून जगत असते पण त्याने इतर प्रजातींना किंवा व जैविक घटकांना इतकी हानी पोहोचत नाही जितकी आज माणसाच्या जगण्यामुळे पोहोचते आहे. शिवाय ज्या प्रमाणात आणि ज्या वेगाने हे बदल होत आहेत त्याने माणसालाच धोका पोचतो आहे.
खरंतर यासाठी हवामानबदल हा इतका मोठा मुद्दा बघायची देखील गरज नाही. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या निसर्गातील बदलांकडे बघितलं तरी हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, आपल्या शहरातील नद्यांमधले पाणी पिण्याच्या लायकीचे राहिलेले नाही आणि आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्र, घरांमध्ये RO water filter या साऱ्याची गरज पडते आहे. आता हा निसर्गात झालेला एक बदल आहे जो माणसांनी घडवून आणला आहे. त्यामुळे हवामान बदल हा आपण लोकल टू ग्लोबल असा बघितला तरी इकॉलॉजीच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात येते.

जिज्ञासा: मला सांग इकॉलॉजीचा अभ्यास नेमका कसा करतात? आणि तो करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला लागतो?
केतकी: जर एखाद्या जागेच्या इकॉलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर तिथल्या जैविक आणि अजैविक या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. अजैविक गोष्टी म्हणजे तुमच्या इथे हवामान कसं आहे - सम आहे की विषम; पाऊस किती पडतो; माती कशी आहे; जागेचं भौगोलिक स्थान काय आहे म्हणजे किती रेखांश/अक्षांश; वर्षभरात तपमान किती बदलतं इत्यादी. आता अजैविक घटकांमध्ये माती, दगड, पाणी, हवा, तपमान, पर्जन्यमान हे सगळं कशावर ठरतं तर तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे जिओलॉजी कशी आहे, geomorphology कशी आहे यावर. या साऱ्यावरून तिथे कुठल्या प्रकारची झाडी तयार झाली आहे यावर पुढचे जैविक घटक अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जर आपण वाळवंटाचा प्रदेश घेतला तर तिथे काटेरी झुडपे अशा प्रकारची झाडी आढळते याउलट जर आपण सह्याद्रीतील एखादं जंगल घेतलं तर तिथे सदाहरित वृक्षांची दाटी आढळते. आता हा फरक का तर दोन्ही ठिकाणचे अजैविक घटक वेगवेगळे आहेत - पाऊस किती, माती/वाळू कशी आहे, हवा कशी इत्यादी इत्यादी.
मग जैविक घटकांकडे बघताना झाडांच्या जाती कुठल्या आहेत हेही महत्त्वाचे आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची झाडी आहे? वृक्ष आहेत, झुडपं आहेत की गवतं आहेत? त्यानंतर मग त्या झाडीवर अवलंबून असणारे प्राणी कुठले आहेत याचा अभ्यास केला जातो. आता या प्राण्यांमध्येही बरेच प्रकार आहेत म्हणजे आपण शाळेत शिकतो तसे vertebrates म्हणजे सपृष्ठवंशीय प्राणी जे आपल्याला माहीत असतात - यात सस्तन प्राणी (ससा, हरीण, वाघ, उंट वगैरे), विविध जातींचे मासे, पक्षी, सरपटणारे प्राणी हे येतात. हे सगळे पटकन दिसणारे प्राणी आहेत आणि म्हणून आपल्या माहिती असतात. पण या प्राण्यांइतकेच अपृष्ठवंशीय प्राणी (invertebrates) देखील महत्त्वाचे आहेत. ज्यांच्यामध्ये कीटक येतात उदाहरणार्थ फुलपाखरं, गांडूळासारखे काही कृमी (worms) आहेत, खेकड्यासारखे crustaceans, काही गोगलगायीसारखे molluscs असतात. ही सगळी विविधता आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. याचबरोबरीने बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. जे हवेत, मातीत, पाण्यात सगळीकडे असतात. त्यांच्या बरोबरीने कवक म्हणजे fungi हे सूक्ष्मजीव एखाद्या जागेच्या इकॉलॉजीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
या साऱ्यांच्या बरोबरीने हेही पाहणे आवश्यक आहे की हे सर्व घटक एकमेकांची कसे इंटरॅक्ट करतात - त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत. खरं तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसत्या एखाद्या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींच्या व प्राण्यांच्या जातीच्या याद्या केल्या म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास झाला असे होत नाही. एखाद्याने समजा झाडांची यादी केली तर ती फक्त टॅक्सॉनॉमी होते पण यातून त्या ठिकाणी आढळणाऱ्या झाडांचा आणि तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांचा परस्परसंबंध काय आहे याचा अभ्यास त्यात होत नाही जो इकॉलॉजीमध्ये अपेक्षित आहे. तिथल्या मातीमध्ये तिथल्या जैविक अजैविक घटकांमुळे काय बदल होत आहेत? त्याने मातीची गुणवत्ता वाढते आहे की टॉप सॉईल कमी होते आहे? हे बघणं म्हणजे इकॉलॉजी. आणि हे सोप्या उदाहरणातून जाणून घ्यायचं असेल तर आपण आपलंच उदाहरण घेऊ शकतो - जशी माणसं आपापल्या हवामानाशी जुळवून घेतात. म्हणजे महाबळेश्वर सारख्या ठिकाणी माणसं दिवसभर उन्हात काम करू शकतात पण दिल्लीतला किंवा राजस्थानमधला माणूस उन्हाळयात आपली बाहेरची कामं सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा करेल. आपण आपले कपडे ऋतूंप्रमाणे वेगवेगळे वापरतो. आपण थंडीत आवडीने खातो पितो ते मसालेदार जेवण किंवा गरमागरम आल्याचा चहा उन्हाळ्यात अगदी नकोसा होतो. तेंव्हा ताक, सरबतं, शीतपेयं हवी असतात. म्हणजे आपण आपली lifestyle जशी हवामानानुसार बदलतो तसेच इतर जीव देखील आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यांची जगण्याची पद्धत घडवतात. त्या त्या ठिकाणाची जैवविविधता त्या ठिकाणच्या हवामानाशी कसं जुळवून घेते याचा अभ्यासदेखील इकॉलॉजीत केला जातो.

जिज्ञासा: हे सगळं फारच रोचक आहे! मला आता हे जाणून घ्यायला आवडेल की पृथ्वीची इकॉलॉजीच्या दृष्टीने काही विभागणी होते का? ती कशी होते आणि या विभागणीला अनुरूप असलेली जैवविविधता ही कशी तयार होते?
केतकी: तर इकॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं तर पृथ्वीचे जे विभाग आपण माणसांनी पाडले आहेत त्यांना बायोम्स (biomes) असं म्हणतात. ह्या बायोम्सची विभागणी कशी होते आणि त्यातली जैवविविधता या दोन्ही प्रश्नांचं मिळून मला वाटतं एकच उत्तर होईल आपलं. तर हे बायोम्स तयार होण्यामागचं मुख्य कारण पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर पडणारा सूर्यप्रकाश. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्याच वेळी ती सूर्याभोवती पण फिरत असते. शिवाय ती २३.५ अंशांनी कललेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश विविध प्रकारे विभागाला जातो. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असल्याने आपल्या सर्व परिसंस्था (ecosystems) या त्याच्या अनुषंगाने तयार झाल्या आहेत. त्या बरोबरीने तिथली स्थानिक जिऑलॉजी आणि पर्जन्यमान काय आहे हे पण महत्वाचे आहे.
पृथ्वीवर ६ मुख्य बायोम्स आहेत - सगळ्यात ओळखीचा म्हणजे जंगलं - ही बरीचशी जंगलं ही विषुववृतीय प्रदेशातली एका प्रकारची (बहुतांश सदाहरित), समशीतोष्ण भागातली पानगळीची किंवा मिश्र अशी आहेत. म्हणजे पृथ्वीवर जंगल हे कुठे आहे - उत्तर गोलार्ध की दक्षिण गोलार्ध आणि काय रेखांश अक्षांश त्यावर त्यांचे प्रकार ठरतात.
दुसरा बायोम म्हणजे गवताळ प्रदेश - इथे जंगलं तयार होत नाहीत कारण एक तर पावसाचे प्रमाण आणि दुसरे इथले इथली माती - हे दोन्ही जंगले तयार होण्यासाठी अनुकूल नसतं पण तिथे उत्तम गवताळ प्रदेश आणि त्यात असणारी जीवसृष्टी दिसून येते.
तिसरा बायोम म्हणजे वाळवंट - जिथे माती नाहीच आहे - वाळू आहे जी पाणी धरून ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे तिथलं वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन फार मर्यादित आणि वेगळ्या पद्धतीचं आहे. आता वाळवंटांमध्ये देखील दोन प्रकार आहेत - एक उष्ण वाळवंट म्हणजे सहारा किंवा थार जे आपल्याला अधिक परिचित आहे आणि दुसरं शीत वाळवंट - लडाख सारखे प्रदेश जिथे बहुतांश दिवस शून्याच्या खाली तापमान असतं. आता अशा थंड वाळवंटात अजूनच वेगळ्या प्रकारची जैवविविधता आढळते.
चौथा बायोम म्हणजे टुंड्रा प्रदेश जो दोन्ही ध्रुवांच्या जवळचा थंड प्रदेश आहे आणि बहुतेक काळ बर्फाच्छादीत असतो. पाचवा आणि सहावा बायोम म्हणजे समुद्र आणि गोड्या पाण्याचे प्रदेश (नद्या, तळी इत्यादी) - या दोन पाणी असलेल्या बायोम्समध्ये प्रचंड जैवविविधता आढळून येते.
आता हे बायोम्स समजून का घ्यायचे? यांचं महत्त्व काय? तर हे बायोम्स जसे आहेत तसेच राहणे अपेक्षित आहे, (जिऑलॉजिकल टाइम स्केलमध्ये बदल होत असतातच ते बाजूला ठेऊ.) त्यांची स्थिती टिकवून ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जंगल असेल तर तिथे जंगल कायम राखलं पाहिजे आणि वाळवंट असेल तर तिथे वाळवंट राखलं गेलं पाहिजे. कारण वाळवंटातून परिवर्तित होणारा उष्मा गरजेचा आहे. तिथे जर आपण खूप उकडतंय म्हणून आपण जर मोठ्या प्रमाणावर झाडं लावायला लागलो तर जी ग्लोबल सायकल आहे त्यात या वाळवंटाचा रोल आहे तोच आपण बदलून टाकतो. अनेक वाळवंटांमधून अगदी बारीक वाळूचे कण उडतात ते हवेतून समुद्रात जातात. ज्यावर अनेक समुद्री जीव शैवाल अवलंबून असतात. पृथ्वीवरील बराचसा ऑक्सिजन त्यामुळे तयार होतो. थोडक्यात ही ग्लोबल सायकल टिकायला वाळवंटामुळे मोठी मदत होते. या प्रक्रियांना धक्का पोहोचणं माणसाच्या हिताचं नाही. तेव्हा या बायोम्सचे स्थैर्य अबाधित राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते संपूर्ण पृथ्वीच्या हवामानाचा, तिच्या सूर्यमालेतील स्थानाचा सर्वात सुयोग्य वापर दर्शवतात आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. म्हणजे अति उत्साहाच्या भरात वाळवंटाचे हरितीकरण करणे हे इकॉलॉजीच्या दृष्टीने चुकीचे आहे.
आता या प्रत्येक बायोममध्ये जी जैवविविधता दिसते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथले अजैविक घटक संरक्षित राहिले ज्यावर आधारित प्रजातींचा तिथे विकास होत गेला, उत्क्रांती होत राहिली आणि विविधता निर्माण झाली. त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे आपल्याला पश्चिम घाटात सदाहरित जंगलं दिसतात किंवा गवताळ प्रदेशात विविध गवतांच्या जाती आणि तृणभक्षी प्राण्यांची विविधता दिसते. आता जर कोणतीही परिसंस्था ही विनाव्यत्यय अबाधित राहिली तर ती एका शिखर स्थितीला (climax or mature stage) पोहोचते. जी तिथल्या भौगोलिक आणि अजैविक घटकांच्या सगळ्यात उत्तम समन्वयातून तयार होणारी एक स्वाभाविक स्थिती असते. प्रत्येक ठिकाणची शिखर अवस्था वेगळी असते - उदाहरणार्थ, मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, खानदेश हे सगळे जे भाग आहेत तिथे पानगळी प्रकारचं जंगल किंवा सव्हाना प्रकारचे प्रदेश आहेत. इथे आपल्याला शिखर स्थितीला गेल्यावर देखील सदाहरित जंगल दिसणार नाही. पण महाबळेश्वर किंवा भीमाशंकर इथली शिखर स्थिती ही सदाहरित जंगलाची असेल. आता ही महाराष्ट्रातच दोन वेगळ्या शिखर स्थितीची उदाहरणं आहेत. आणि पुन्हा जर आपण या शिखर स्थिती मागची कारणं बघितली तर ती आहेत - पावसाचं प्रमाण आणि माती. पुन्हा या ठिकाणी अजैविक घटकांचं महत्त्व लक्षात येतं. यातही पाणी हा अजैविक घटक अत्यंत महत्वाचा ठरतो कारण तो बरेचदा लिमिटिंग फॅक्टर असतो. त्यामुळे जमिनीवरच्या परिसंस्थांची शिखर स्थिती ही पर्जन्यमान आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता यावर ठरत असते.

जिज्ञासा: या तुझ्या उत्तराने मला नक्कीच विचार करायला भाग पाडलं आहे की “पर्यावरण रक्षण” म्हणजे नक्की काय! आत्तापर्यंतच्या आपल्या गप्पा फार छान झाल्या आहेत. आपण इकॉलॉजीचा अभ्यास का करायचा, कसा करायचा हे पाहिलं. शिवाय पृथ्वीवरच्या मुख्य बायोम्सची थोडी माहिती घेतली. भवभूतीने पृथ्वीला विपुला म्हटलं आहे. तर अशा पृथ्वीची ओळख एका भागात शक्य नाही. त्यामुळे आज आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया.
या गप्पांचा पुढचा भाग पुढच्या सोमवारी म्हणजे १४ जूनला प्रसिद्ध होईल.

पुढील भागाची लिंक:
भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

(आभार: या लेखमालिकेच्या संपादनात केलेल्या मदतीसाठी गौरी बर्गी हिचे मनापासून आभार!)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.... बायोम्स बद्दल काही नवी माहिती मिळाली.

मी एव्हढा खोलवर विचार केलेला नव्हता. माझ्या छोट्याशा राज्यात, दरवर्षी १८००० रस्ते अपघातात प्राण्यांना (wildlife collission) इजा होते, बहुतेक वेळा ते दगावतात. यात प्रामुख्याने हरिण, अगडबंब मुझ ( moose ) यांचा समावेश आहे. आपण त्यांच्या रहाण्याच्या ठिकाणी अतिक्रमण करत आहोत हे जाणवते.

उत्तम लिखाण
पुढील भागांच्या प्रतिक्षेत

छान सुरुवात. ईंटरेस्टींग वाटेल असे लिहीत आहात. स्वतंत्र धागा काढलात हे छान केले.

त्या मांसाहाराच्या धाग्यावर एका प्रतिसादात तुम्ही समोरच्याला म्हटलेले,
"तुमचा दृष्टिकोन मानवकेंद्रित (anthropocentric) आहे आणि माझा निसर्गकेंद्रित"
माझ्याही मते मानवकेंद्रीत दृष्टीकोन प्रॅक्टीकल असल्याने आज आपल्या जागी योग्यही वाटत असेल, पण निसर्गकेंद्रीत दृष्टीकोन येत्या काळाची गरज आहे. तोच शाश्वत आहे. त्यामुळे शक्य तितके त्याच दिशेने प्रयत्न हवेत. काहींना परीस्थितीची गंभीरता ठाऊक नाही, काहींना ठाऊक आहे पण आपण एकट्यापासून काय सुरुवात करू शकतो याची कल्पना नाही, समोरच्याला ते समजवायची वेळ आली तर सोप्या भाषेत कसे समजवावे याची माहिती नसते.. या लेखमालेचे नमूद केलेले उद्देश पाहता ती यादृष्टीने फायदेशीर ठरेल असे वाटते.

@ उदय
दरवर्षी १८००० रस्ते अपघातात प्राण्यांना (wildlife collission) इजा होते, बहुतेक वेळा ते दगावतात.
>>>
हो, खरेय. स्पेशली प्राण्यांच्या पाणवठ्यावर जायच्या मार्गावर आपला रस्ता आला की असे अपघात खूप होतात असे मागे वाचलेले.

काही ही समजून घेण्याची गरज नाही.
अशी वेळ येईल की लोक गूगल search करून पर्यावरण वाचवण्यासाठी मजबूर होतील.
सर्व गुर्मी उतरून जाईल.
Corona नी अर्धी मस्ती उतरवली आहे
AI, तंत्र ज्ञान,डॉक्टर,संशोधक कोणी कामाला आले नाही.
सकाळी मरण येते आहे की दुपारी अशी अवस्था झाली होती.
वातावरण,पर्यावरण बिघडले की ह्या मिनिटाला मरण येतेय की दोन मिनिटांनी मरण येतेय अशी वेळ येईल
काही कामाला येणार नाही.
निसर्ग समोर माणूस आणि त्याची बुद्धी अतिशय निम्न दर्जा ची आहे

चांगली मालिका.

एक विनंती तुम्ही टुकार धाग्यांवर माहितीपूर्ण प्रतिसाद देता ते ही संकलित करून नवा धागा बनवा.