नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग ३

Submitted by जिज्ञासा on 9 August, 2021 - 00:02

आधीच्या भागात आपण माणसं आणि जंगलं यांच्यातल्या संबंधांबद्दल अगदी थोडक्यात बोललो. त्यात देवरायांचं महत्त्व आणि राखण्याविषयी बोललो. मग महाराष्ट्रातली जंगलाची इकोसिस्टिम जास्तीत जास्त अबाधित राखत मानवी विकास करणं शक्य कसे करता येईल याबद्दल थोडे बोललो. आता या भागात जंगलांविषयी थोडं अधिक जाणून घेऊयात.

जिज्ञासा: जेव्हा वृक्ष लागवडीचा विषय येतो तेव्हा आपण सगळे जण आता देशी वृक्ष किंवा झाडांच्या जाती लावण्याचा आग्रह धरतो. या मागे काय कारणं आहेत आणि अशा कुठल्या जागा आहेत का जिथे हा आग्रह बाजूला ठेवता येईल?
केतकी: आता या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी थोडीशी सुधारणा सुचवते. देशी झाडांचा आग्रह असे म्हणण्यापेक्षा ‘स्थानिक’ झाडांचा आग्रह असे म्हणणे अधिक योग्य आहे. आता भारत देश किंवा महाराष्ट्र यात इतकी भौगोलिक विविधता आहे की जरी झाड देशी असले तरी ते काहीच ठिकाणी स्थानिक असेल. त्यामुळे देशीच्या बरोबरीने स्थानिकता हाही निकष महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ कडुनीम जरी देशी असला तरी तो सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या जंगलात परदेशी ठरतो. कारण तिथल्या परिसंस्थेत तो वाढू शकत नाही, एवढा जास्त पाऊस त्याला सहनच होत नाही. तसंच इथलं अंजनी खानदेशातल्या माळांवर उन्हात करपून जातं. अजून सोपं उदाहरण म्हणजे हापूस आंबा. कोकणातल्या आंब्याला आपण चांगली किंमत देतो. मराठवाड्यात त्याच्या बागा तयार होऊ शकत नाही कारण परत तेच. त्या त्या ठिकाणचं हवामान, सूक्ष्म हवामान त्या त्या ठिकाणची स्थानिक विविधता घेऊन तयार झालंय. त्याचा आदर करायला हवा.
आणि अजून एक सांगावेसे वाटते की देशी झाडांचा आग्रह म्हणजे विदेशी झाडांना सरसकट खलनायक ठरवणे नाही. कारण विदेशी झाड हे जगात कुठेतरी देशी/स्थानिक असतेच ना. हा आग्रह इकॉलॉजीच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरतो एवढंच.
तर देशी/स्थानिक झाडे का? याचं उत्तर आपल्याला आपण केलेल्या फॉरेस्ट शब्दाच्या व्याख्येत सापडतं. त्यात आपण जी झाडांभोवतालची विविधता associations पाहीली ती सगळी केवळ स्थानिक झाडांच्या विविधतेमुळे तयार होणाऱ्या अधिवासाच्या भोवती आहे. म्हणजे करंज जरी स्थानिक असलं तरी तुम्ही जर फक्त करंजाचीच झाडं लावलीत तरी सुद्धा चालणार नाही. जंगलांचं संवर्धन करायचं असेल तर झाडांची ‘स्थानिकता’ आणि ‘विविधता’ दोन्ही गरजेचे घटक आहेत. याचं मुख्य कारण असं की आपल्याकडचं सर्व स्थानिक प्राणीजीवन हे या स्थानिक झाडांच्या विविधतेवर अवलंबून आहे.
आता विदेशी झाडांवर पण बरेचदा स्थानिक पशु, पक्षी, कीटक दिसतात. हे सत्य नाकारण्यासारखं नक्कीच नाही. पण परदेशी वनस्पती लावल्या तर त्या पसरण्याचा धोका फार असतो. आणि हे झालेलं आहे - सुबाभूळ, कॉसमॉस, जलपर्णी, टणटणी/घाणेरी या साऱ्या परदेशी जाती आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत की त्यामुळे मग आपली स्थानिक विविधता नष्ट झालेली दिसते. हे घडू नये म्हणून लागवड करताना देशी स्थानिक जाती लावायच्या. आणि आपण या बाबतीत प्रचंड श्रीमंत आहोत! पूर्वी या झाडांची रोपं नर्सरी मध्ये सहज उपलब्ध नसायची पण गेल्या दहा वर्षांत हे चित्र झपाट्याने बदललं आहे. आणि जर पर्याय उपलब्ध असेल तर मग देशी जातींना प्राधान्य दिलं पाहिजे.

जिज्ञासा: तुझ्या एका लेखात मी वाचलं होतं की या स्थानिकतेचा आग्रह काही बाबतीत बाजूला ठेवता येतो. किंवा ठेवावा लागतो. तर त्या विषयी थोडं सांगशील का?
केतकी: हं .. तो लेख जरूर सर्वांनी वाचावा कारण त्यात नेटिव्ह - नॉन नेटिव्ह हा मुद्दा अगदी खोलात जाऊन लिहिला आहे. तर तुझा प्रश्न की त्यातल्या त्यात हा आग्रह कुठे बाजूला ठेवता येईल तर जर आपण शहरात आपल्या घराच्या अंगणात झाड लावणार असू तर - आता चाफा किंवा गुलमोहर देशी नाहीत पण जर हौस असेल एखादे झाड लावण्याची तर या ठिकाणी लावता येईल. पण मला विचारशील तर आपण ऑलरेडी भरपूर विदेशी झाडं लावली आहेत त्यामुळे खरंतर आता जास्तीत जास्त स्थानिक झाडं लावण्याचीच गरज आहे. पण विदेशी झाडं लावण्याची हौस असेलच तर शहरात भागवावी. त्यासाठी जंगलं किंवा नैसर्गिक प्रदेश नक्की वापरू नयेत. या शिवाय जर शहरात टेकडी, नदी असे काही नैसर्गिक अधिवास असतील तर तिथे देखील अजिबातच विदेशी झाडं लावू नयेत. इथे (शहरात) ही झाडं गरजेची नाहीत पण चालू शकतील कारण शहरात अनेक ठिकाणी काँक्रीट असल्याने पसरण्याचा धोका कमी असतो. अर्थात शहरात देखील झाडं लावताना non-invasive अशाच जाती लावा. सुबाभूळसारखी झाडं लावूच नका. पण जर न पसरणारी चाफा, अशोक, गुलमोहोर अशी झाडं लावणारच असाल तर हरकत नाही.
हे वनस्पतींच्या लागवडीमधलं सपाटीकरण अजून कुठे चालू शकतं तर शेतीमध्ये. म्हणजे आता आपण हे स्वीकारलं आहेच. कारण आपण ज्या भाज्या, धान्य, आणि फळे खातो त्यातली बरीचशी झाडे ही परदेशी आहेत. त्यामुळे तत्त्वाला चिकटून बसलो तर आपल्याला फारसे काही खाता येणार नाही! तेव्हा इथे थोडा मानवकेंद्री विचार करायला हरकत नाही. पण याला हरकत का नाही तर आपण जे उत्पादन घेतो ते सगळे शेतातून काढून घेतो आणि खाऊन संपवतो. त्यामुळे त्या वनस्पती निसर्गातच वर्षानुवर्षे राहून त्या पसरण्याचा धोका तसा कमी असतो. This plantation is okay because it is managed and it is harvested. त्यामुळे ही लागवड डोळसपणे करायला हरकत नाही. पण जंगल तयार करण्यासाठी मात्र निश्चितच स्थानिक जाती वापरायला हव्यात.

जिज्ञासा: तुझ्या या उत्तरातून मला देशी (native) आणि स्थानिक (local) असा सूक्ष्मभेद नव्याने कळला! आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जंगल निरीक्षणाची साधने कोणती? मी एखाद्या जंगलात गेल्यावर काय पाहू?
केतकी: माझा मित्र मंदार दातार याने दोन ओळींमध्ये हे समर्पकपणे मांडलं आहे -
उघडे डोळे, चालणारे पाय,
आणिक तुम्हाला हवंय काय?
सुट्टीतही कशाला घरात बसता?
चला उठा आता पकडा रस्ता!
उघडे डोळे आणि चालणारे पाय या दोन प्राथमिक गोष्टी असल्या तरी पुरेसे असते. पण त्याबरोबरीने काही इतरही साधनं असतील तर जंगल निरीक्षण अधिक आनंददायी होतं. किंवा तुम्हाला जंगलातल्या अधिक चार गोष्टी कळतात. यात मग नुसते उघडे डोळे असण्यापेक्षा तीक्ष्ण नजर किंवा ती दृष्टी तयार व्हायला लागते. म्हणजे जर आपण पक्षी बघायला लागलो तर सुरुवातीला तो पक्षी कुठे बघायचा त्यासाठी आपली नजर तयार व्हावी लागते. दुर्बीण हे एक मुख्य साधन आहे पण ती वापरण्यासाठी जी दृष्टी लागते ती आधी तयार व्हायला पाहिजे.
शिवाय कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर (terrain) चालण्याची मनाची तयारी लागते कारण जंगलात वेगवेगळी surprises पण असतात. अशी शारीरिक आणि मानसिक तयारी असेल तर मग तुमची आणि जंगलाची लय जुळायला लागते. मग अजून कोणती साधनं वापरू शकता तुम्ही? तर आधी म्हटलं तसं दुर्बीण, एक चांगलं भिंग (magnifying lens) त्याच्यातून फुलांचे, गवतांचे वेगवेगळे भाग नीट बघता येतात. हे संशोधनासाठी जास्त उपयोगी असतं पण काही बारीक किडे, फुलांचे भाग भिंगातून छान दिसतात. लेन्समधून त्यांच्यावरचे पॅटर्न अधिक चांगले कळतात. कॅमेरा documentation साठी असलेला चांगला. शिवाय वही आणि पेन.
आता या साधनांनी जंगलात बघायचं काय? अगदी बेसिक गोष्टी सांगायच्या तर आपण झाडांपासून सुरु करू - कारण ती स्थिर असतात. कोणती, कशाप्रकारची झाडं आहेत - त्यांची पानं सदाहरित आहेत की पानगळी आहेत, झाडांची काही असोसिएशन्स दिसताहेत का? म्हणजे झाडांवर घरटी केलेली आहेत का? कुठली आहेत, मधमाशांची पोळी आहेत का? किती उंचीवर आहेत? जर एखाद्या झाडावर घरटं असेल तर मग त्या झाडाशेजारी एक अर्धा तास बसून आपण निरीक्षण करू शकतो - पक्षी किती वेळा ये जा करतोय, पिल्लांना काय खाऊ घालतोय? पिल्लं कशी खात आहेत? हे सगळं बघण्यात मजा येते. आणि हे सगळं आपल्याला एका झाडाच्या बाजूला उभं राहून कळू शकतं. याला आम्ही पॉईंट काउन्ट म्हणतो. म्हणजे एका ठिकाणी बसायचं आणि किती प्रकारचे प्राणी, पक्षी दिसत आहेत त्याची नोंद करायची. आणि त्यांच्या वर्तनाची (behavior) देखील नोंद ठेवायची. मग झाडांकडे बघताना त्यांना फुलं, फळं आली आहेत का? मग फुलं आणि फळं आहेत म्हणून त्या झाडाच्या associations मध्ये काही फरक पडतोय का? याचीही नोंद करायची. आणि हे जर आपण प्रत्येक ऋतूत केलं तर मग त्या जंगलाचं/भागाचं कॅलेण्डरच तयार होतं आपल्याकडे. त्याच वाटेवरून तुम्ही वर्षभर जात राहिलात तर तुम्हाला खूपच चांगली निरीक्षणं नोंदवता येतात. म्हणजे जर आपण त्याच वाटेवर पावसाळ्यात गेलो तर तिथे वेगळी गवतं आणि herbs उगवलेली दिसू शकतात. त्यांची एक वेगळीच मजा असते. तिथे मग त्यांच्याशी associated वेगळे कीटक आणि प्राणी आपल्याला पहायला मिळतात.
प्राणी आणि पक्ष्यांची निरीक्षणं करताना त्यांच्या विष्ठेवरून बरीच माहिती मिळू शकते. त्यांनी कोणते प्राणी किंवा फळं खाल्ली आहेत याची माहिती मिळते - तो पक्षी/प्राणी शाकाहारी आहे की मांसाहारी हे ठरवता येतं. बरेचदा या विष्ठेतून पडलेल्या बिया या पावसाळ्यात चांगल्या रुजून येतात. जर रोपे करायची असतील तर मग अशा बिया गोळा करणं चांगलं असतं. उदाहरणार्थ आपल्याकडे Gnetum या प्रजातीचा एक महावेल आहे जो gymnosperm आहे. त्याची फळं रानडुकराला खूप आवडतात. त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडलेलय बिया पटकन रुजतात आणि रोपं तयार होतात. काही पक्षांचे अधिवास खूप विशिष्ठ असतात. तरी त्यांच्या त्या niche मध्ये देखील कधी कधी त्यांना हुडकून काढणं सोपं नसतं. अशावेळी त्या पक्षाची droppings उपयोगी पडतात. आपल्याकडे श्रुंगी घुबड नावाचं जे घुबड आहे ते बरेचदा खडकाळ भागात एखाद्या खाणीच्या आसपास बसलेलं असतं. आणि ते त्या दगडात इतकं छान camouflage होऊन जातं की पटकन दिसत नाही. पण ते रोज ज्या जागी बसतं त्याखाली त्याच्या विष्ठेमुळे एक पांढरा पट्टा तयार झालेला दिसतो. तो पट्टा पटकन दिसतो आणि मग त्यावरून घुबड कुठे आहे ते सापडायला सोपे जाते.
मराठीत व्यंकटेश माडगूळकर, मारुती चित्तमपल्ली यांची काही छान जंगल वाचनावरची पुस्तकं आहेत. त्यात मग वाटेवरून वाघ गेला आहे हे कसं ओळखायचं, ठशांवरून, विष्ठेवरून प्राणी कसा ओळखायचा अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. जे तज्ज्ञ असतात ते ठशांवरून मादी आहे का, असल्यास गरोदर आहे का असे तपशील देखील सांगू शकतात.
आता जंगलात जाताना पाळायचे नियम कोणते तर भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत, विटके, मातकट रंगाचे, camouflaging कपडे घालावेत, कोणतेही उग्र वासाचे सेंट, अत्तर लावू नये. शक्य तितके उग्र वास टाळावेत. जंगलात वावरताना शांतता पाळावी, मोठ्याने आवाज करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जंगलातून परत जाताना फक्त अनुभव घेऊन जावे. झाडाचे पान, फळ, फुलं, दगड असे काहीही नेऊ नये. तुम्ही अभ्यासक म्हणून नमुने नेणार असाल तर गोष्ट वेगळी. हिमालयात ट्रेकला गेल्यावर मी सूचिपर्णी वृक्षाचा एखादा कोन उचलला तर काय कुठे बिघडलं असं वाटू शकतं. पण जर प्रत्येकानेच असा विचार केला तर त्या परिसंस्थेला धक्का बसतो. आणि हे असं घडल्याची उदाहरणे आहेत. जसे जंगलातून काही घेऊन जाऊ नये तसेच जंगलात कोणताही कचरा सोडून जाऊ नये. हे काही नियम पाळले तर जंगल वाचन हा एक सुंदर अनुभव ठरतो.

जिज्ञासा: मस्तच! तू सांगितलेली साधनं वापरून पाहायला जंगलातच गेलं पाहिजे असं नाही. अनेकजण रोज टेकडीवर फिरायला किंवा वीकेंडला एखाद्या ट्रेलवर जातात तेव्हाही ही सारी निरीक्षणं नक्कीच करता येतील. यातून आपली बघण्याची नजर तयार होत जाईल.
आता पुढचा प्रश्न - सध्या अनेक जण मियावाकी पद्धतीने जंगल लावत/वाढवत आहेत. या पद्धतीविषयी काय सांगशील? याचे काय फायदे-तोटे आहेत?
केतकी: आता पहिली गोष्ट ही की मियावाकी ही जपानी पद्धत आहे. त्यामुळे ती आपल्याकडे वापरताना जशीच्या तशी वापरली जाणं हे इकॉलॉजिकली योग्य नाही. शिवाय आपल्याकडे ही पद्धत वापरणं इकॉलॉजिकली पूर्णपणे appropriate नाहीये त्यामुळे ती मर्यादित स्वरूपात वापरली जावी असं आम्ही म्हणतो. आता ही पद्धत कुठे वापरली तर चालेल? तर शहरात लॉन्स किंवा बाग करण्याऐवजी मियावाकी जंगल करायला हरकत नाही. कुठे करू नये - तर जिथे तुम्हाला खरोखर मोठ्या प्रमाणावर जंगल तयार करायचं आहे, जैवविविधता वाढवायची आहे अशा ठिकाणी आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने जंगलाची लागवड करावी. इथे मियावाकी पद्धत वापरू नये. का? तर या पद्धतीत अशा काही गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक जंगलात नसतात - उदाहरणार्थ दर ६० सेंटीमीटरवर झाड लावणे. आता जंगलात हे असं इतक्या काटेकोरपणे नसतं बरंच रँडम असतं - काही ठिकाणी दोन झाडांतलं अंतर ६० सेंमी असेल पण सहसा ती दोन झाडं मोठे वृक्ष नसतात. जंगलात काही झाडं एकमेकांपासून दोन फुटावर, काही ६ फुटावर तर काही अगदी दहा वीस फुटांवर पण असू शकतात. पण मियावाकी मध्ये एक uniformity राखलेली असते. त्यात परत वरचा अख्खा मातीचा १ मीटरचा थर काढून सगळं सुंदर खत घालून माती तयार केली जाते. यात एक बरं आहे की ते सगळं सेंद्रिय खत असतं आणि झाडं देखील देशी असतात. त्यामुळे खूप वाईट परिणाम होत नाहीत. पण एखाद्या जंगलासाठी तुम्ही खूप manicured (कृत्रिम) स्थिती तयार करता. इतकं खत, पाणी असं सगळं झाडांना आयतं दिल्यावर झाडं छान वाढणारच आहेत. जशी एखाद्या रोपवाटिकेत झाडं ६ इंचावर ठेवलेली असतात आणि त्यांची उत्तम निगा राखल्याने ती छानच वाढतात. So, this is almost like a nursery on the ground. ह्या साऱ्या गोष्टी नीट करायच्या तर मग याचा खर्च खूप असतो. शिवाय या साऱ्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर बाहेरची ऊर्जा वापरतो. बहुतेक वेळा मातीचा थर काढायला जेसीबी वापरला जातो. इतरही गोष्टींसाठी mechanized energy वापरली जाते. त्यामुळे या जंगलाचा फूटप्रिंट वाढतो. अर्थात हा खूप purist approach आहे. त्यामुळे मियावाकी पद्धत कुठे नाही वापरायची हे जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावर इकॉलॉजिकल रिस्टोरेशन साठी लागवड करायची असते तेव्हा ही पद्धत खूप खर्चिक ठरते. त्यापेक्षा आपल्या पारंपरिक पद्धती अधिक योग्य ठरतात.
दुसरा एक मुद्दा म्हणजे नेहमीच्या जंगलांमध्ये सर्व प्रकारची जैवविविधता पहायला मिळते. मियावाकी जंगलात जरी प्राणी पक्षी दिसत असले तरी त्यांच्या जाती कोणत्या हेही पाहणे आवश्यक आहे. यात काही प्रश्न देखील निर्माण होताना दिसतात. कधी कधी हे जंगल इतकं दाट होतं की मोठे सस्तन प्राणी यात वावरू शकत नाहीत. त्यामुळे हे जंगल त्यांच्यासाठी अधिवास ठरू शकत नाही. याने झालंय असं की काही ठिकाणी या जंगलांमध्ये सापांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. कारण हा सापांसाठी उत्तम आसरा होतो. पण या सापांना खाणारे मोठ्या आकाराचे प्राणी (predators) मात्र या जंगलात शिरू शकत नाहीत. असेच उंदीर किंवा इतर छोट्या प्राण्यांच्या बाबतीत दिसून येतं. कदाचित उंदरांमुळे सापांची संख्या वाढत असेल. पण ही अन्न साखळी पुढे सुरु राहू शकत नाही. त्यामुळे जरी काही प्राणी आणि पक्षांना मियावाकी जंगल आसरा देत असलं तरी त्यात सर्व प्रकारची जैवविविधता दिसून येत नाही जी एका पारंपरिक जंगलात दिसते. त्यामुळे एक परिपूर्ण जंगल परिसंस्था यातून विकसित होईलच असं नाही.
शिवाय हे जंगल इतर नैसर्गिक ताण/संकटं कसे सहन करेल हे ही बघितले पाहिजे. आपल्याकडे ही जंगलं लावायला लागून अजून १०-१२ वर्षेच झाली आहेत त्यामुळे ५०-१०० वर्षांच्या काळात ती कशी टिकतील हे आपल्याला अजून माहिती नाही. जर का ती टिकली तर उत्तमच आहे. कारण जंगल परिसंस्थेचे बरेचसे फायदे या जंगलांमधूनही मिळतातच. पण आपली पारंपरिक पद्धत चांगली time-tested असताना सगळीकडे ही वापरण्याची गरज नाही. त्यापेक्षा जी आपल्या आजूबाजूला जंगलं दिसत आहेत, ज्या देवराया आहेत त्यांचे अनुकरण करणं अधिक श्रेयस्कर असं आम्हाला वाटतं. ऑयकॉसच्या वेबसाईटवर या विषयीचा एक लेख आहे. त्यात या साऱ्याचा आढावा घेतला आहे.

जिज्ञासा: मियावाकी जंगल पद्धतीवरच्या लेखाची लिंक मी या भागाच्या शेवटी देते. थोडक्यात काय तर जसे विदेशी वृक्ष लागवडीबद्दल आहे तसेच काहीसे धोरण मियावाकी पद्धतीबद्दल असावे. आता जंगलांवरचा शेवटचा प्रश्न - जंगलाच्या इकॉलॉजिकल सेवा कोणत्या?
केतकी: जंगलांच्या बऱ्याच सेवा सांगता येतील. आपण या इकॉलॉजिकल सेवांचे दोन प्रकार पाडू शकतो - सेवा (services) आणि वस्तू/उत्पादनं (goods/products). आपल्याला जंगलातून भरपूर वस्तू मिळतात - मोठ्या प्रमाणावर लाकूड मिळतं - तुम्ही आत्ता बसल्या जागी नजर फिरवून पाहिलंत तर जे जे लाकडी फर्निचर दिसेल ते जंगलातूनच आलेलं असतं. यात बांबूच्या वस्तू देखील आल्या. बऱ्याच औषधांसाठी लागणारे घटक हे वनस्पतींमधून शोधलेले आहेत. नंतर त्यातील काही कृत्रिमरीत्या तयार करायला सुरुवात झाली असेल पण अनेक घटक हे आजही झाडांपासून मिळवले जातात. आयुर्वेदिक औषधे ही तर बरीचशी जंगलातून मिळणाऱ्या साहित्यामधून तयार केली जातात. अन्नाच्या बाबतीत ग्रामीण आणि आदिवासी भाग हा जास्त जंगलांवर अवलंबून आहे जो भारताचा बहुसंख्य भाग आहे. त्यामुळे अन्नासाठी देखील आपण काही प्रमाणात जंगलांवर अवलंबून आहोत. आता याला सुदैव म्हणायचं की दुर्दैव ते माहिती नाही पण अन्नाच्या बाबतीत आपण जंगलांपासून दूर जातो आहोत. दुर्दैवाने अशासाठी की यातील अन्नघटक हे अत्यंत पोषक आणि वैविध्यपूर्ण असायचे ज्याने प्रतिकारशक्ती आणि पर्यायाने आरोग्य उत्तम राहायला मदत होत होती - उदाहरणार्थ रानभाज्या.
शिवाय आपल्याकडे जंगलातल्या काही वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो - तेंदूच्या पानांचा व्यापारात दरवर्षी काही कोटींची उलाढाल होते. किंवा धावडा, पळस, बाभूळ या झाडांपासून मिळणारा डिंक, तमालपत्र, शिकेकाई, मध, विविध फळं, बिब्बा किंवा गोडंबीच्या माळा आणि तेल, मोहाची फुलं या साऱ्याचा व्यापार होतो. विदर्भात मोहाच्या फुलांचा आहारात मुख्य घटक (staple food) म्हणून समावेश असतो - ती वाळवून तिच्यापासून भाकऱ्या केल्या जातात. नुसती खाल्ली जातात, त्यांची दारू केली जाते. या फुलांमध्ये भरपूर पोषणमूल्य असतं. ही आपण जरा लोकप्रिय गोष्टींची यादी पाहीली. पण अशा अनेक वस्तू आपल्याला जंगलांमधून मिळतात.
जंगलाच्या सेवा (services) कोणत्या तर मुख्य म्हणजे जंगलं आहेत म्हणून आपल्या global cycles चालू आहेत. म्हणजे पाण्याच्या चक्रामध्ये पाऊस पडण्यासाठी जंगलं आवश्यक असतात हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. जे पाणी झाडं वाफेच्या रूपात (evapotranspiration) बाहेर टाकतात त्याने हवेत गारवा येतो आणि त्यामुळे ढगांमधून पाऊस पडायला मदत होते. आणि पूर्वी जेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे जंगलं होती तेव्हा अगदी मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस वर्षभर थोडा थोडा पडल्याच्या नोंदी आहेत. आता पाऊस म्हटला की अनियमितता गृहीत धरावी लागते. पण तरीही यातला जंगलांचा रोल महत्त्वाचा आहे. दुसरी सेवा म्हणजे जंगल हे स्पंज सारखं काम करतं आणि भरपूर पाणी जिरवतं. एरवी नुसता खडक असेल त्यावरून पडणारं सगळं पाणी वाहून जातं. पण जर त्याजागी जंगल असेल तर झाडांच्या मुळांमुळे weathering profile निर्माण होते म्हणजे काय तर खडक फोडण्याचं, कुजवण्याचं काम होतं. त्यामुळे पाणी जमिनीत मुरायला मदत होते.
सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक सेवा म्हणजे जंगलं हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात याने तपमानवाढीला आळा बसू शकतो. नदीकाठी असलेल्या जंगलांमुळे पुराचा धोका काही अंशी कमी होतो. त्यानंतर मातीची गुणवत्ता सुधारण्यामध्ये जंगलांचा मोठा वाटा असतो. म्हणजे जर पाणलोट क्षेत्रात जंगल असेल आणि खाली उतारावर शेती करत असाल तर त्या शेतीला फारशी खतं लागत नाहीत कारण जंगलातून येणाऱ्या माती/पाण्यातून भरपूर पोषकद्रव्य त्या शेतीला मिळतात. हे मी थोडं अशक्य कोटीतलं विधान करतेय पण जर एक हेक्टर शेतीच्या आजूबाजूला १६ हेक्टर जंगल असेल तर ती शेती आपोआप शाश्वत होते. अर्थात हे भारतात शक्य नाही! मात्र शेतात जे परागीभवन होतं त्यासाठी जंगलांची मदत होते - शेतीच्या आजूबाजूला जंगल असेल तर त्याने परागीभवन सुकर होतं आणि शेतीतील उत्पन्न वाढायला मदत होते. नंतर अजून एक सेवा म्हणजे जंगलांमुळे nutrient cycles पूर्ण होतात. जंगलात जे काही झाडांचे, प्राण्यांचे मृत अवशेष असतात ते decompose करून त्यातील पोषकद्रव्ये मातीत पुन्हा वापरण्याजोग्या फॉर्म मध्ये मिसळली जातात.
एक वेगळी सेवा म्हणजे जंगलांचे मानवी संस्कृतीत असलेले महत्त्व - जंगले ही नेहमीच आध्यात्मिक/ spiritual पातळीवर महत्त्वाची मानली गेली आहेत. आणि जंगलात काही healing properties असतात असं संशोधनाने सिद्ध देखील झालं आहे. जंगलं तशी शहरांपासून लांब असल्याने तिथली हवा शुद्ध असते. आणि जंगलाच्या सान्निध्यात तुम्हाला कायमच एक उत्तम अनुभूती मिळते. You are uplifted. जंगलात हिंडणाऱ्या माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. डिप्रेशन सारखे आजार होण्याचे प्रमाण फार कमी असते. जपानी लोकांमध्ये forest bathing ची संकल्पना आहे - म्हणजे जंगलात रोज एक फेरफटका मारणे. याने तुम्ही आनंदी आणि निरोगी राहता.

जिज्ञासा: वाह! या सगळ्या जंगलाच्या इकॉलॉजिकल सेवा जाणून घेतल्यावर आपले या भागाचे शीर्षक किती समर्पक आहे असे वाटले! ही झाडं, जंगलं खरोखरीच आपली सोयरी आहेत. आपण त्यांचे सखे सोयरे आहोत का असा खरा प्रश्न आहे!
या भागात आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात एका नवीन परिसंस्थेविषयी जाणून घेऊ.

स्थानिक झाडांच्या लागवडीविषयी लेख

मियावाकी पद्धतीविषयी लेख

आधीचे भाग

भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १

भाग ६: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २

भाग ७: नातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी

भाग ८: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग १

भाग ९: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जि, फार सुरेख आहे ही मुलाखत. मी वाचतेय. आधीच्या भागांसाठीही खरंतर लगेच प्रतिक्रिया द्यायला हवी पण राहून गेली. सर्व मुद्दे, पैलू इतके स्पष्ट होत आहेत. आधीचा पाणथळीचा भागही मस्त होता. वृक्षांच्या सान्निद्ध्यात फार शांत वाटतं हा अगदी स्वानुभव आहे.

हे असं जंगलवाचन, परीसर निरीक्षण खरंतर अगदी लहान वयापासून शाळांतून शिकवलं जावं. निसर्ग आणि पर्यावरण साक्षरता फार गरजेची आहे.

जि, तू फार मोलाचं काम करत आहेस. शुभेच्छा.

जिज्ञासा, तुमचे लेख आवर्जुन वाचतो आणि ते बर्‍याचदा आवडतातही. खालील मुद्दे तुम्ही पॉझीटीव्हली घ्याल अशी आशा आहे.

या लेखामध्ये मियावाकी पद्धतीवरचे आक्षेप वाचुन मी अस्वस्थ झालो. ज्याला लेखात purist approach म्हटले गेले आहे त्याला मी extremist किंवा अतिरेकी (ज्यात purist विचारांचा अतिरेक होतोय) अ‍ॅप्रोच म्हणेन. शिवाय बरेच आक्षेप हे स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट प्रकाराचे वाटले. कसे ते बघुयात.

लेखानुसार जिथे मोठ्या प्रमाणावर जंगल तयार करायचं आहे, जैवविविधता वाढवायची आहे तिथे मियावाकी पद्धत योग्य नाही. हे स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट अशासाठी की मियावाकी पद्धत लहान जागांसाठीच आहे. मोठ्या प्रमाणासाठी ही पद्धत वापरता येते हा दावाही कोणी केलेला नाही. प्रत्यक्षात बहुतेक मियावाकी जंगले फक्त काही गुंठे क्षेत्रफळाची असतात. भारतातलं सगळ्यात मोठं मियावाकी जंगल पाच एकरांपेक्षा कमी आहे.

>मोठे सस्तन प्राणी यात वावरू शकत नाहीत
हा मुद्दा उपस्थित करणे हेच अतिरेकी विचारांचे दर्शक आहे. मोठे सस्तन प्राणी वावरु शकतील एव्हढे मोठे जंगल बनवणे हा उद्देशच नाही मियावाकी पद्धतीचा.

>पण आपली पारंपरिक पद्धत चांगली time-tested असताना सगळीकडे ही वापरण्याची गरज नाही.
जपानी असल्यामुळे ही पद्धत आपल्याकडे योग्य नाही आणि आपली पारंपरिक पद्धत() चांगली हा गर्व बरा नव्हे. असा विचार करणे हे इनोवेशन साठी घातक आहे.

> इतरही गोष्टींसाठी mechanized energy वापरली जाते. त्यामुळे या जंगलाचा फूटप्रिंट वाढतो.
या वाक्यावर तर हसु की रडु अशी अवस्था झाली माझी. मग काय फक्त लाकडाच्या काठ्यांनी खड्डे खणायचे काय? कारण कुदळ्/फावडी/घमेलं बनवण्यात mechanized energy लागली असते ना. तुम्हाला स्केलेबिलिटी हवी असेल तर mechanized energy ला पर्याय नाही. आणि हे जे जंगल आपण लावणार आहोत त्यामुळे कित्येक पटीने जास्त परतावा मिळणार आहे याकडे दुर्लक्ष होउ नये.

मियावाकी पद्धतीत सेन्द्रीय खतांचा आग्रह धरला जातो, स्थानिक वेगवेगळ्या झाडांचा आग्रह धरला जातो, या पद्धतीने झाडे झपाट्याने वाढतात हे सगळे मुख्य चांगले मुद्दे दुर्लक्षुन तुमची झाडं रॅंडम अंतरावर नाहीत, ती manicured स्थितीत आयती वाढली आहेत, तुम्ही mechanized energy वापरता, इथे मोठे सस्तन प्राणी नाही वावरु शकत, इथे उंदीर/साप वाढतात, ही जंगलं टिकतील की नाही माहीत नाही, यात सर्व प्रकारची जैवविविधता दिसून येत नाही, खर्च खुप होतो इ. इ. प्रमाणाबाहेर नाकं मुरडली आहेत.

सध्या अनेक जण मियावाकी पद्धतीने जंगल लावत/वाढवत आहेत. हे बहुतेक प्रयत्न अर्ध्या-एक एकराच्या किंवा अजुनही लहान जागेत होत आहेत. आणि हे सर्व प्रयत्न स्तुत्य आहेत. पाहुण्यांना अर्धाच पेला पाणी देणे आणि दुधाच्या पिशवीचा कोपरा पुर्ण न कापणे इत्यादी करुन पर्यावरण वाचवण्यात खारीचा वाटा काही जण उचलत असतात. तेव्हा स्वतःच्या खिशाला चाट लावुन फास्ट ट्रॅक मायक्रो/नॅनो फॉरेस्ट बनवणार्‍या लोकांना प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी मियावाकी पद्धतीवरच अकारण अवास्तव शंका उपस्थित करणे अस्थानी व अयोग्य वाटले. आणि पर्यावरणवाद्यांकडुन हे मुद्दे उपस्थित केले गेल्याबद्दल खेद वाटला.

ऑयकॉसच्या वेबसाईटवर या विषयीचा एक लेख आहे. त्यात या साऱ्याचा आढावा घेतला आहे.
>>>
हे अजून वाचायचे आहे म्हणून प्रतिसाद देत नव्हतो.

पण तरीही व्यत्यय यांच्या वरील प्रतिसादातील भावनेशी पुर्णतः सहमत.
माझ्यामते ह्यामागे ऑयकॉसच्या व्यवसायाची पाठराखण करण्याचा भाग असू शकतो. त्यामुळे 'ये भी ठीक है' म्हणून थांबतो.

धन्यवाद मंजूताई, निरू, मामी! ही गप्पांची लेखमाला आवडते आहे आणि उपयोगी वाटते आहे याचा आनंद आहे.

हरचंद पालव, धन्यवाद! मी ही थोडी हिरमुसले होते चाफा देशी नाही हे कळल्यावर!

व्यत्यय, या प्रतिसादात मी माझे मत मांडते. माझ्या मते purist approach कितीही extremist वाटला तरी तो संपूर्णपणे समजून घेतल्याशिवाय त्यात बदल करणे धोक्याचे असते. This knowledge makes us aware and better prepared for the consequences if and when we decide to cut corners. नीम हकीम खतरे जान!
मियावाकी पद्धत इकॉलॉजिकल टाइम स्केल वर अत्यंत नवीन प्रयोग आहे. तो यशस्वी होईल की नाही हे कळायला आपल्याला १००-१५० वर्षे वेळ द्यावा लागेल. तोपर्यंत त्याचे संभाव्य फायदे आणि तोटे विचारात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत.
केतकीच्या उत्तरात म्हणूनच मियावाकी पद्धत कुठे चालेल तर शहरात बागा किंवा लॉन्स यांच्या ऐवजी चालेल असे स्पष्ट केले आहे. मात्र जास्त भर हा कुठे करू नये यावर दिला आहे. कारण भारतात एखाद्या गोष्टीची लोकप्रियता वाढून त्याची लाट तयार होते तेव्हा त्यात मग उत्साहाच्या भरात half-baked प्रयोग केले जातात. असे मियावाकी जंगल पद्धती विषयी घडू नये असे वाटते. पाकिस्तानमध्ये ऑलरेडी जगातले सर्वात मोठे मियावाकी जंगल (१२.५ एकर जमिनीवर) तयार करायला सुरुवात झाली आहे. यातून मियावाकी पद्धत लहान जागांसाठीच आहे हे गृहीतक मोडीत काढण्याची ईर्षा दिसते.
Pakistan: PM Imran Khan to inaugurate world’s biggest Miyawaki forest in Lahore

1.25 lakh trees planted in 27 days in the world’s largest Miyawaki dense forest in Gujarat
ही दुसरी बातमी बघा. गुजराथच्या किनाऱ्यावरच्या गावात हे मियावाकी जंगल तयार केले जात आहे ज्यात घनदाट जंगलाचा वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा दावा आहे. यात सुमारे ६० जातींची देशी झाडे लावली आहेत. ही झाडे तिथल्या समुद्रकिनारी वाढणारी स्थानिक झाडे आहेत की नाहीत हे माहिती नाही. देशी आणि स्थानिक यातला भेद आणि त्याचे महत्त्व याच भागात मांडले आहे. तिथल्या समुद्रकिनारी इतके घनदाट जंगल, जे खारफुटीचे नाही, तयार झाल्याचे काय दीर्घकालीन फायदे तोटे काय असतील याचा अभ्यास न करता असे प्रकल्प पुढे नेऊ नयेत खरंतर. पण असा काही अभ्यास करण्याची योजना बातमीत तरी दिसली नाही.

मोठे सस्तन प्राणी यात वावरू शकत नाहीत >> या आक्षेपामागे जंगलाचा आकार अभिप्रेत नसून झाडांची घनता अभिप्रेत आहे. जपानमध्ये मोठे सस्तन प्राणी जवळपास नाहीतच. जे आहेत ते छोटे सस्तन प्राणी आहेत. त्यामुळे तिथल्या जंगलांची घनता वाढली तरी तिथल्या अन्नसाखळीला फारसा धक्का लागत नसावा. याउलट भारतासारख्या स्वतःचे Big Five मिरवणाऱ्या उष्णकटिबंधीय देशात मात्र मोठे सस्तन प्राणी हे कोणत्याही अन्न साखळीचा एक महत्त्वाचा घटक असतात. जर एखाद्या जागी त्यांचा वावर कमी झाला तर त्यांचे जे भक्ष्य प्राणी आहेत त्यांची संख्या वाढण्याचा धोका असतो. याच कारणाने शहरी भागात मियावाकी पद्धतीने लागवड करणे सेफ आहे कारण तिथे मोठे सस्तन प्राणी तसेही फारसे आढळून येत नाहीत.

आपले निसर्गाचे सिस्टिमिक लेव्हलचे ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कोणताही सूक्ष्मसा देखील बदल करताना त्याचे दूरगामी परिणाम माहिती नाहीत ही जाणीव ठेवूनच तो केला गेला पाहिजे. येथे innovation ला इतकी मोकळीक देता कामा नये. आपल्याकडे हे प्रयोग फसल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. सध्या आपली एकूण इकॉलॉजी मरणासन्न अवस्थेत असताना कोणता प्रयोग हा उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरेल हे माहिती नाही.
मियावाकी पद्धतीने लागवड जरूर व्हावी. पण तो प्रयोग आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत याची सखोल जाणीव प्रयोग करणाऱ्यांना हवी. तरच अशा प्रयोगांमधल्या निरीक्षणांमधून आपल्याला या पद्धतीचे अधिक चांगले ज्ञान प्राप्त होईल.
कार्बन आणि ऊर्जेच्या फूटप्रिंटबद्दल सांगायचे तर त्यासाठी सखोल अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मियावाकी जंगलांचा नेट कार्बन आणि energy फूटप्रिंट negative आहे असे अभ्यासाने सिद्ध झाले असल्यास त्या विषयी वाचायला आवडेल.

हर्पेन, तुमचे “माझ्यामते ह्यामागे ऑयकॉसच्या व्यवसायाची पाठराखण करण्याचा भाग असू शकतो.” हे विधान पटले नाही. रादर वाईट वाटले की you were quick to judge Ketaki’s views as colluded by her own conflict of interest as the cofounder of Oikos. In my opinion, there is no conflict of interest here. The target landscape for Miyawaki method and traditional method of tree plantation has zero overlap so they both can and will coexist. तेव्हा माझी अशी विनंती आहे की केतकीचे मत हे केवळ एका तज्ज्ञ इकॉलॉजिस्टचे purist मत म्हणून वाचावे. इतर तज्ज्ञ मंडळी ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध यात गुंतलेले नाहीत त्यांना जर purist approach काय असे विचारले तर फार वेगळे उत्तर येईल असे वाटत नाही.
आंतरजालावर हे दोन लेख सापडले. यात एकात तर मियावाकी लागवडीला जंगल न म्हणता woody lot म्हणावे असे मत मांडले आहे.
१. Why the Miyawaki Method Is Not a Suitable Way to Afforest Chennai
२. Miyawaki forests are no substitute for natural ones: Experts

जपानी असल्यामुळे ही पद्धत आपल्याकडे योग्य नाही आणि आपली पारंपरिक पद्धत(च) चांगली हा गर्व बरा नव्हे. असा विचार करणे हे इनोवेशन साठी घातक आहे. >> व्यत्यय, तुमच्या या वाक्यावर मी कालपासून विचार करते आहे. सध्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण असे आहे की प्रत्येक विदेशी गोष्टीला नाक मुरडले नाही आणि प्रत्येक भारतीय गोष्टीचा अभिमान (गर्वच खरंतर) बाळगला नाही तर तुमच्यावर पटकन देशद्रोही असा शिक्का बसतो! कदाचित तुम्हाला अशा काहीशा regressive आणि संकुचित विचारांमधून पारंपरिक पद्धतीचा पुरस्कार झाल्याचे वाटले असेल. पण ते तसे बिलकुलच नाही. पारंपरिक पद्धत “भारतीय” आहे म्हणून चांगली आहे असं नाही किंवा मियावाकी पद्धत “जपानी” आहे म्हणून वाईट आहे असं नाही. पारंपरिक पद्धत म्हणजेच तिथली स्थानिक पद्धत ही ९९% वेळा निसर्गस्नेही असते; एखादवेळा नसतेही पण तो नियम सिद्ध करणारा अपवाद मानू. जेव्हा तुम्ही इकॉलॉजीचा अभ्यास करता तेव्हा स्थानिकतेचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. कारण स्थानिकतेचा संबंध त्या जागी काही कोटी वर्षांपासून सुरु असलेल्या उत्क्रांतीशी आहे.
तुम्ही पारंपरिक पद्धतीचा गर्व म्हणताय पण मला innovation च्या नावाखाली निसर्ग संवर्धनाचे प्रयोग करणे हे गर्वाचे वाटते. कारण त्यात तुम्हाला असे वाटत असते की काही कोटी वर्षे चाललेल्या उत्क्रांतीच्या प्रयोगातून तयार झालेल्या परिसंस्थांपेक्षा काही हजार वर्षे उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या ज्ञानामधून सुचलेली परिसंस्थेची innovative कल्पना ही अधिक सरस आहे! हा मला गर्व वाटतो. निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत अशा स्थानिक पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवणे हे मला गर्वाचे लक्षण न वाटता शहाणीव असल्याचे लक्षण वाटते. It actually shows the wisdom to recognize the success of 2.5 billion years of incessant evolution.

वाचतो आहे.

वने नष्ट होत आहेत. वन निर्माण करणे हा हेतू आहे. पण अगदी नैसर्गिक वनांइतके झाले नाही तरी प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे.

जिज्ञासा, पहिली गोष्ट म्हणजे मी 'असू शकतो' असे जे म्हटले आहे ते शक्यता व्यक्त करणे ह्या प्रकारात मोडते. मी जज करत नाहीये 'ये भी ठीक है' म्हणून थांबलोय. कृपया नोंद घेणे.

traditional method of tree plantation म्हणजे मानवाने केलेली लागवडच ना !
खरेतर 'purist approach' प्रमाणे मानवाने झाडांची लागवडच करायला नको.
आहेत त्या झाडांवर फुले फुलतील, मधमाश्या येतील, परागीभवन घडेल, फळे येतील, पिकतील, खाली पडतील किंवा पक्षी खातील आणि मग त्यांच्या विष्ठेमार्फत बिया रुजतील. उगवतील झाडे आपोआप...... यायची तेव्हा आणि तितकीच.

मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करताना मानवी हस्तक्षेप करून परिस्थिती का पालटायची नाही.

मियावाकी पद्धतीनुसार १ चौ मी. क्षेत्रात तीन झाडे लावायची असतात. लागवड करताना स्थानिक झाडे लावणेच अपेक्षित असते. मोठा विस्तार होणारी झाडे जवळ जवळ तर सोडाच पण शेजार शेजारच्या चौरसातही लावू नका असे सांगीतले जाते. वृक्ष, झाडे, झुडुपे, वेली आणि स्थानिक रित्या आढ्ळ णार्‍या विविध प्रजातींची लागवड करताना मधे मधे पायवाटांसारख्या नागमोडी प्रकारे जागा सोडण्यास ही सांगीतले जाते.

मियावाकी पद्धतीने जवळ जवळ झाडे लावली तरी सगळीच्या सगळी झाडे जगतील असे नाही. survival of the fittest हा निसर्ग नियम लागू होईलच. आणि जगली वाढली सगळीच्या सगळी झाडे तर तो problem of plenty होईल. मनुष्याला अजूनही लाकुड लागतेच आहे त्याकरता काही झाडे तोडून जंगल विरळ करता येऊ शकेल ना (सस्तन प्राण्यांना वावरता यावे अशा रितीने).  

आणि माझा एक प्रश्न आहे की पुर्वीच्या काळी, मानवी हस्तक्षेपाच्याही आधी इतर सस्तन प्राण्यांना वावरता येणार नाहीत अशी निबीड घनदाट अरण्ये आपल्याकडे कधीच नव्हतीच का?

खरेतर 'purist approach' प्रमाणे मानवाने झाडांची लागवडच करायला नको >> पॉईंट आहे! पण मानवही निसर्गाचाच भाग आहे. त्यामुळे मानवाने केलेला निसर्गाचा ऱ्हास किंवा मानवनिर्मित जंगले ही दोन्ही नैसर्गिकच म्हणायची का?

मियावाकी पद्धती मधे झाडे जवळ जवळ लावल्याने सुर्यप्रकाशाकरता compete करतात आणि त्यामुळे त्यांच्या वाढीचा वेग वाढतो.
वेगवेगळ्या प्रजातीची लावल्याने जमीनीतून घ्यायच्या पोषणाकरता ती एकमेकांना compliment करतात.

हा एक मोठाच फायदा आहे की फक्त 'ठराविक' 'लवकर वाढणारी' झाडे न वापरता, सगळीच झाडे लवकर वाढतात.

जिज्ञासा, पहिली गोष्ट म्हणजे मी 'असू शकतो' असे जे म्हटले आहे ते शक्यता व्यक्त करणे ह्या प्रकारात मोडते. मी जज करत नाहीये 'ये भी ठीक है' म्हणून थांबलोय. कृपया नोंद घेणे. > ओके Happy

आणि माझा एक प्रश्न आहे की पुर्वीच्या काळी, मानवी हस्तक्षेपाच्याही आधी इतर सस्तन प्राण्यांना वावरता येणार नाहीत अशी निबीड घनदाट अरण्ये आपल्याकडे कधीच नव्हतीच का? > अशी जंगले होती आणि आहेत पण अशी जंगले निर्माण व्हायला जी इकॉलॉजी आवश्यक आहे ती भारतात फार कमी ठिकाणी आहे. ही अशी जंगले आपल्याला विषुवतीय सदाहरित वर्षावने जिथे असतात तिथे आढळतात. आपण भारताच्या इकॉलॉजीच्या भागात पाहिलंय की अशी वर्षावने भारतात दक्षिण पश्चिम घाट आणि नैऋत्य भारतात काही ठिकाणी दिसतात. महाराष्ट्रात केवळ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सदाहरित/निम्न सदाहरित प्रकारची जंगले आहेत जी कदाचित इतकी निबिड असू शकतील. पण महाराष्ट्राच्या बहुतांश भागाची इकॉलॉजी सवाना किंवा शुष्क पानगळी जंगल अशी आहे. म्हणजे लामकानी सारख्या ठिकाणी मियावाकी जंगलापेक्षा सवाना प्रकारचे जंगल तयार करणे अधिक श्रेयस्कर असेल.
वृक्ष असलेली (woody growth) जंगले जशी पाऊस पडायला मदत करतात त्याच जोडीला ती खूप पाणी साठवून देखील ठेवतात. त्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात अशी dense woody growth तयार करायला आणि जगवायला जे पाणी लागेल त्याचाही विचार करायला हवा.

प्युरिस्ट अप्रोच घेऊन केवळ जमिनीला संरक्षण देऊन निसर्ग संवर्धन करण्याचे प्रयोग झाले आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसतात पण माणसांना जसे सगळे इन्स्टंट तयार होण्याची सवय लागली आहे तसे इन्स्टंट जंगल किंवा जी काही मूळ परिसंस्था असेल ती तयार होत नाही. इकॉलॉजिकल time scale आणि आपली time scale यांची गती वेगळी असल्याने आपल्याला ते प्रोग्रेशन कळणे अवघड असते.
सध्याच्या climate crisis च्या काळात जिथे काही ठिकाणी पटकन बदल घडवून आणण्याची गरज आहे तिथे मियावाकी सारख्या पद्धती (उदा. शहरातील हीट आयलंड्स चा परिणाम कमी करण्यासाठी) किंवा assisted ecological restoration (उदा. अभयारण्यं, राष्ट्रीय उद्यानं, देवराया) या दोन्हीचा वापर केला पाहिजे.

हर्पेन, धन्यवाद लिंकसाठी! गेल्या वर्षीची चर्चासत्रांची मालिका पण छान झाली होती. ते सगळे व्हिडीओ इकॉलॉजिकल सोसायटीच्या युट्युब चॅनलवर आहेत. या वर्षीचे हे दुसरे चर्चा सत्र आहे. पहिले सत्र फार छान झाले! प्रदीप कृष्णन यांचे राजस्थानमधल्या जागेचे रेस्टोरेशन केल्याची गोष्ट नक्की ऐका! Simply amazing! ज्यांना लाईव्ह ऐकणे शक्य नसेल त्यांच्यासाठी हे व्हिडीओ नंतर इकॉलॉजिकल सोसायटीच्या युट्युब चॅनलवर बघता येतील.