नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

Submitted by जिज्ञासा on 13 June, 2021 - 23:43

या आपल्या गप्पांच्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण केतकीकडून इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या अभ्यासात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याविषयी ऐकलं. शिवाय पृथ्वीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करताना पृथ्वीची विविध बायोम्स मध्ये कशी विभागणी होते ते देखील पाहिलं. या भागात आपण या गप्पा पुढे चालू ठेवू.

जिज्ञासा: केतकी, आता मी जो तुला प्रश्न विचारणार आहे तो उत्क्रांतीविषयी आहे. आपण आत्ता पृथ्वीवर जैवविविधता ही कशी आहे या विषयी बोललो पण पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली आणि ती कशी उत्क्रांत होत गेली याविषयी अगदी थोडक्यात सांगशील का?
केतकी: या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे पृथ्वीचा काहीशे कोटी वर्षांचा इतिहास पहायला लागेल. अर्थात आपण तो थोडक्यात पाहू - आपल्या पृथ्वीचा जन्म ४५० कोटी वर्षांपूर्वी झाला आणि साधारण ३५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जी पाण्याची डबकी होती किंवा काही प्रमाणात जे आजचे समुद्र होते त्या पाण्यात वीज पडल्याने काही रासायनिक क्रिया घडल्या ज्यातून अमिनो ऍसिड्स तयार झाली. पृथ्वीवर जीवन सुरु होण्याची ही पहिली रासायनिक क्रिया मानली जाते. या सिद्धांताला बळ देणारा प्रयोग युरे आणि मिलर या दोन शास्त्रज्ञांनी केला - त्यांनी त्या वेळेचे वातावरण आणि पाणी एका बंद नळीत तयार केले आणि त्यातून वीज सोडली तेव्हा त्यांना अमिनो ऍसिड सदृश्य रसायनं तयार झालेली आढळली. याला primordial soup असंही म्हटलं जातं. त्यातूनच पुढे पहिला जीव तयार झाला जो एकपेशीय होता. मग पुढची बरीच कोटी वर्षं हे एकपेशीय जीवच होते आणि हे पाण्यातच होते. मग हळूहळू हे एकपेशीय जीव एकमेकांच्या शेजारी यायला लागले, चिकटून राहायला लागले, त्यांचे थर (बॅक्टिरियल मॅट्स) तयार झाले जे आपल्याला जीवाश्मांच्या स्वरूपात सापडतात. मग नंतर हळूहळू या एकपेशीय जीवांमध्ये धाग्यासदृश्य काही भाग (flagella) निर्माण झाले ज्यामुळे हे एकपेशीय जीव जे एकाच जागी वाढत होते आता चल झाले - पोहायला लागले.
ह्या उत्क्रांतीमध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे क्लोरोफिल तयार झालं ज्यामुळे हे एकपेशीय जीव प्रकाश संश्लेषण करू लागले - सूर्याची ऊर्जा आणि हवेतील कार्बन वायूच्या साहाय्याने साखर आणि प्राणवायू ची निर्मिती करू लागले. आता आपण हे एका वाक्यात सांगतो आहोत पण हे सर्व घडून यायला लाखो वर्षे लागली! ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुरु झाल्यावर पृथ्वीवरच्या वातावरणात हळूहळू एक महत्त्वाचा बदल घडून आला तो म्हणजे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढू लागले. मग एक काळ असा आला की या प्राणवायूचं वातावरणातलं प्रमाण इतकं वाढलं की तो प्रदूषक/विषारी ठरायला लागला - त्याआधी अमोनिया गॅस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि जेव्हा हे प्राणवायूचे प्रमाण वाढले तेव्हा बरीचशी जीवसृष्टी नष्ट झाली. कारण हा प्राणवायू त्यावेळेच्या जीवसृष्टीसाठी विषारी ठरला! हे साधारणपणे २५० कोटी वर्षांपूर्वी घडले. आता यानंतर जी जीवसृष्टी तग धरून राहिली तिने नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली.
आता यापुढचा चमत्कार नाही पण उत्क्रांतीमधली महत्त्वाची घडामोड म्हणजे बहुपेशीय जीवांची उत्क्रांती. आता कुठलेही असे बदल हे खरंतर चुकांमधून घडतात - जेव्हा एका पेशीपासून दोन पेशी तयार होत असतात तेव्हा डीएनएची एक प्रत तयार होत असते जी आधीच्या डीएनएची हुबेहूब नक्कल असते. पण कधी कधी या कॉपी करण्याच्या प्रक्रियेत चुका होतात. त्याला आपण म्युटेशन (mutation) म्हणतो. हा बदल एकदा झाला की पुन्हा दुरुस्त करता येत नाही. म्हणजे आत्ता कोरोनाच्या विषाणू मध्ये जे वेगवेगळे variants दिसत आहेत ते या अशा म्युटेशन मधूनच तयार झालेले आहेत. आता प्रत्येक पिढी तयार होताना काही म्युटेशन्स/बदल होतच असतात. जर या होणाऱ्या बदलांचा पुढल्या पिढीला जगण्यासाठी फायदा झाला तर ते बदल टिकून राहतात आणि त्याच्या पुढच्या पिढीत संक्रमित होतात आणि हा बदल अधिक मोठ्या प्रमाणावर पुढच्या पिढ्यांमध्ये दिसायला लागतो. म्हणजे उपयोगी बदल टिकून राहतात. अशी उत्क्रांती होत असते. अशीच एक फायद्याची चूक घडली आणि एकपेशीय जीव बहुपेशीय झाले. पुढे या बहुपेशीय जीवांमध्ये दोन विरुद्ध लिंग तयार झाली आणि त्यातून लैंगिक पुनरुत्पादन - sexual reproduction होऊ लागले. याने उत्क्रांतीला अजून चालना मिळाली. कारण पृथ्वीवरचे अजैविक घटक बदलतच होते - त्यातून तयार होणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये तगून राहण्यासाठी sexual reproduction हे महत्त्वाचं ठरलं कारण जेव्हा दोन जीवांची जनुकं एकत्र येऊन नवा जीव तयार होतो तेव्हा त्यात चुका होण्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे त्यातून फलदायी बदल घडण्याची संधी देखील वाढते.
इथून पुढे जसं sexual reproduction सुरु झालं मोठ्या प्रमाणावर जैवविविधता वाढली. हे साधारण ५४ कोटी वर्षांपूर्वी घडलं. आणि आज आपल्याला जे प्राण्यांचे वेगवेगळे क्लास दिसतात ते त्या काही लाख वर्षांमध्ये उत्क्रांत झाले. आपल्याला त्या काळातले जीवाश्म सर्वात जास्त सापडतात. मग अगदी अलीकडे म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी फुलणारी झाडं उत्क्रांत झाली - मग त्यातून वृक्ष तयार झाले त्यातही आधी gymnosperm आले म्हणजे हिमालयात दिसतात तसे सूचिपर्णी वृक्ष तयार झाले. त्याच सुमाराला डायनोसॉर सारखे काही सरपटणारे प्राणी (reptiles) उदयाला आले. बरोबरीने अनेक माशांच्या जाती, पक्षांच्या जाती निर्माण झाल्या. मग अगदी अलीकडे म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर नष्ट झाले. आता डायनासोर का नष्ट झाले याचं कारण लक्षात घेण्याजोगं आहे आहे - डायनॉसॉर्सनी स्वतः काही असं केलं नाही ज्यामुळे ते नष्ट झाले. ते नैसर्गिकरित्या नष्ट झाले. पृथ्वीवर कुठली तरी उल्का आपटली आणि ती आपटल्यामुळे सगळीकडे मोठया प्रमाणावर ज्वालामुखी तयार झाले ज्यातून मोठ्या प्रमाणावर लाव्हा बाहेर पडला. आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पण त्याच वेळी निर्माण व्हायला सुरवात झाली. अर्थात या उद्रेकांमुळे वातावरणात पुन्हा मोठे बदल झाले - धूळ/धुर प्रचंड प्रमाणात निर्माण झाली आणि या वातावरणात डायनोसॉर टिकू शकले नाहीत. त्यामुळे हवामानबदल तेव्हाही झालाच पण तो नैसर्गिक कारणांमुळे झाला. डायनोसॉरने नाही केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

जिज्ञासा: हे म्हणजे एखाद्या सिनेमासारखं थरारक आहे! या साऱ्या उत्क्रांतीच्या प्रवासात आपली म्हणजे मानवाची एंट्री कधी झाली?
केतकी: जर संपूर्ण काळाचा विचार केला आपण अक्षरशः नुकतेच आलो आहोत या प्रवासात. अगदी अलीकडे म्हणजे साधारण २५ लाख वर्षांपूर्वी होमो जातीच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली. त्यावेळी मानवाच्या वेगवेगळ्या जाती होत्या - होमो इरेक्टस वगैरे नावं आपल्याला ऐकून माहिती असतात. पण त्या सर्व माणसांच्या प्रजातींपैकी फक्त होमो सेपियन ही जात जी अडीच लाख ते दोन लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि आत्तापर्यंत टिकून राहिली. बाकीच्या सगळ्या जाती नष्ट झाल्या. हळू हळू हा शिकार आणि कंदमुळावर जगणारा होमो सेपियन modern झाला - ज्याने शेती केली, कारखाने उभारले, आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने “विकास” केला. हे बाकीच्या कुठल्याच प्राण्याने केलं नाही. आता ह्याला होमो सेपियन सेपियन असे संबोधले जाते.
आता या उत्क्रांतीच्या प्रवासाकडे बघायचं कसं आणि याचा जैवविविधतेशी काय संबंध आहे? तर ही उत्क्रांती आहे म्हणूनच ही जैवविविधता तयार होत राहिली आहे आणि उत्क्रांती ही आजही चालूच आहे आणि ती घडतच राहणार आहे. आता आपण बघितलं तर या एवढ्या ४५० कोटी वर्षांच्या जीवसृष्टीच्या प्रवासात माणूस अगदी अलीकडे आला आहे फक्त २ लाख वर्षांपूर्वी आणि जो तंत्रज्ञान वापरणारा modern human being म्हणतो तो तर गेल्या काही शे वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला आहे. आणि आपण काय करतो आहोत तर गेल्या काही हजार वर्षांमध्ये त्या आधीची जी काहीशे कोटी वर्ष घेऊन तयार झालेली जी जीवसृष्टी आहे ती नष्ट करायला निघालो आहोत. तर हे इतिहासात पहिल्यांदाच घडतंय - एका काही हजार वर्षे अस्तित्व असलेल्या प्राण्याने साडेतीनशे कोटी वर्षांच्या उत्क्रांती मधून निर्माण झालेला निसर्ग एकहाती wipe out करायला घेतला आहे. जर यापूर्वीच्या प्रत्येक जातीने हे असं काही केल्याचे पुरावे असते - की प्रदूषण केलं, स्वतःही नष्ट झाले आणि इतरही जीवांना नष्ट केलं, हा असा इतिहास असता तर मग हे नैसर्गिक आहे असं म्हणता आलं असतं. पण हे ही बाकीच्या कोणत्याही प्राण्याने केलेलं नाही. आपण आधी म्हणलं तसं प्रत्येक प्राणी निसर्गात बदल करूनच जगत असतो पण आपण करत असलेला हा बदल मानवनिर्मित कृत्रिम ऱ्हास आहे. ही भीषण गोष्ट आहे. कारण विकासाचे दुष्परिणाम इतर जीवसृष्टीबरोबरीने माणसाला पण भोगावे लागत आहेत. त्यामुळे या साऱ्या उत्क्रांतीकडे आपण कसं बघतो हे खूप महत्त्वाचं आहे.

जिज्ञासा: तुझ्याकडून हा संक्षिप्त इतिहास इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून ऐकताना मला खरंच काही मूलभूत प्रश्न पडायला लागले आहेत! म्हणजे विकास कशाला म्हणायचं? प्रगती म्हणजे काय वगैरे वगैरे.
पण आत्ता मला तुला जो पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे. पृथ्वीवर यापूर्वी नैसर्गिक कारणांमुळे पाच वेळा mass extinctions झालेली आहेत - मग ते हिमयुग असेल किंवा उल्कापात आणि याचे बरेचसे पुरावे आपल्याला केवळ जीवाश्मांच्या अभ्यासातून सापडलेले आहेत. पण असं काही घडल्याची नोंद मानवी इतिहासात आहे का की एखाद्या ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे जीवसृष्टी नष्ट झाली आणि पुन्हा तिथे हळूहळू जीवसृष्टी निर्माण झाली?
केतकी: छान प्रश्न आहे हा. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी mass extinctions झाली त्यानंतर दर वेळी जैवविविधता निर्माण झाली. त्यामागे adaptation म्हणजे जुळवून घेणे आणि succession म्हणजे एखाद्या जागेतली जैवविविधता कशी वाढते याचा अनुक्रम या दोन प्रक्रियांचा मोठा वाटा आहे. या प्रक्रिया काळाच्या पट्टीवर अतिशय हळूहळू घडतात त्यामुळे माणसाच्या इतिहासात म्हणजे माणसाच्या ‘एका पिढीत’ हे असं घडल्याची काही थोडीच उदाहरणं आहेत ज्यात असलेली जीवसृष्टी संपूर्णपणे नष्ट झाली आणि मग तिथे पुन्हा जीवसृष्टी निर्माण झाली. त्यातली क्रॅकाटोआ बेटाची गोष्ट अगदीच ऐकण्यासारखी आहे! हे बेट जावा आणि सुमात्रा बेटांच्या अगदी मधोमध आहे. २७ ऑगस्ट १८८३ या दिवशी या बेटावर ज्वालामुखीचा प्रचंड मोठा उद्रेक झाला. इतका मोठा की त्याचा आवाज साडेतीन हजार किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियापर्यंत ऐकू गेला. आणि त्या उद्रेकातून जी राख बाहेर पडली ती जवळपास ऐंशी किलोमीटर वर आकाशात फेकली गेली. या राखेमुळे दिवसा मध्यरात्रीसारखा अंधार पडला असं हा उद्रेक बोटीवरून पाहणाऱ्या एका खलाशाने लिहून ठेवलं आहे. त्यातून जी सुनामी तयार झाली तिच्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. स्वाभाविकपणे ह्या उद्रेकानंतर त्या बेटावरचं जीवन पूर्णपणे नष्ट झालं.
या घटनेनंतर शास्त्रज्ञांना याचा इकॉलॉजीच्या दृष्टीने अभ्यास करण्याची संधी मिळाली. की आता या बेटावर यापुढे काय घडेल? मग तिथे succession कसं होतंय याचा अभ्यास केला गेला. त्यावेळी क्रॅकाटोआ फ्रेंच लोकांकडे होतं. त्यामुळे १८८४ साली फ्रेंच लोकांनी एक शोधमोहीम हाती घेतली. या पहिल्या भेटीत त्यांना तिथे एक बारीकसा कोळी तिथल्या किनाऱ्यावर सापडला. हा कोळी aeolian debris म्हणजे वाऱ्याने उडून आलेल्या अवशेषांत होता आणि त्या हवेतल्या अन्नावर जगला होता. बाकीचं बेट निर्जन होतंच शिवाय त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टेफ्रा (tephra) म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर शिल्लक राहिलेले सर्व अवशेष (दगड धूळ वगैरे) पडलेले होते. मग त्यांना दरवर्षी येऊन नोंदी ठेवायला सुरुवात केली. पुढच्या वर्षी त्यांना तिथे बरेच खेकडे आढळले. आता गंमत म्हणजे क्रॅकाटोआ या शब्दाचा अर्थ ‘खेकडा’ आहे आणि त्याचा मूळ शब्द संस्कृत आहे कर्कट. आता हे खेकडे इतर बेटांवरून समुद्रातून पोहत/वाहून असे आले. मग जावा सुमात्रा बेटांवर दिसणारा अजगर (reticulated python) दिसला. या शिवाय monitor lizard सारखे काही मोठे सरपटणारे प्राणी जे पोहून येऊ शकत होते ते हळूहळू दिसायला लागले - ते का आले तर त्यांचं खाद्य खेकडे तिथे होते म्हणून. मग काही वर्षांनी त्या बेटावर बरेच गवताळ प्रदेश आणि थोडे थोडे जंगलांचे पट्टे तयार झालेले आढळले. तीसेक प्रकारचे पक्षी बेटावर आले - अर्थात दुसऱ्या बेटांवरून. जे ओंडके त्या बेटावर वाहून आले त्यातून शेवाळं, किडे, मश्रूम, गोगलगाय, बेडूक यासारखे प्राणी आले. अशा प्रकारे क्रॅकाटोआ वरच्या जीवसृष्टीत भरपूर भर पडत गेली. मग जवळजवळ १०० वर्षानंतर असं दिसलं की गवताळ प्रदेश कमी झाले, जंगलं भरपूर वाढली, आणि भरपूर विविधता असलेलं प्राणी जीवन दिसायला लागलं. ही जंगलासारखी परिसंस्था पुन्हा उभी राहायला शंभर वर्षं लागली. अर्थात यात कुठेही माणसाचा हस्तक्षेप नव्हता. इथे कोणीही जाऊन झाडं लावली नाहीत. हे सारं आपोआप नैसर्गिक रीतीने घडून आलं.
आता महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे जंगल तयार झालं ते मूळच्या जंगलाशी अजिबात साधर्म्य सांगणारं नव्हतं. किंवा जावा सुमात्रा बेटावर जी मूळ जंगलं आहेत त्यांच्या सारखं देखील नाहीये. मग ही क्रॅकाटोआ ची गोष्ट आपल्याला काय सांगते? तर एकदा जर का आपण जंगल नष्ट केलं तर पुन्हा तसंच्या तसं जंगल मिळवणं कठीण आहे. त्याच्या जवळ जाणारं जंगल तयार होऊ शकतं. म्हणजे जी सध्या अस्तित्वात असलेली मूळ जंगलं (primary forest) आहेत - म्हणजे अशी जंगलं जिथे हजारो लाखो वर्षं जंगलच आहे आणि त्यामुळे आता ती जंगलं आपल्या शिखर किंवा स्थितीला (climax or mature stage) पोचली आहेत ती जंगलं वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर हे जंगल एकदा डिस्टर्ब झालं तर ते पुन्हा मूळ स्वरूपात येणं कठीण असतं. त्यामुळे जिथे अशा प्रकारची जंगलं अस्तित्वात आहेत त्यांचं महत्त्व प्रचंड आहे. का तर तिथे असणाऱ्या जाती ज्या आहेत त्या अत्यंत स्पेशल आहेत त्या तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाहीत. क्रॅकाटोआ वर ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी दिसणारे जे उभयचर प्राणी किंवा पक्षी होते त्या जाती नवीन जंगलात आता नाहीयेत. कारण हे जे दुसऱ्या स्थितीचं जंगल (secondary forest) आहे ते त्यांचं वसतिस्थान किंवा आसरा (habitat) नाहीये. या जातींना specialist species म्हणतात कारण त्या दुसरीकडे किंवा नव्याने झालेल्या जंगलामध्ये वाढू शकत नाहीत. उदाहरण द्यायचं तर आपल्या सह्याद्रीमध्ये जी शेकरू नावाची मोठी खार आढळते ती फक्त अति विशाल आणि पुरातन वृक्ष (old growth trees) ज्या जंगलात आहेत तिथेच राहू शकते. नवीन जंगलात किंवा सह्याद्रीत जे मोकळे, उघडे प्रदेश आहेत तिथे तिचा वावर नसतो. त्यामुळे शेकरू ही सहयाद्रीत सापडणारी एक specialist जात आहे. या ज्या specialist जाती असतात त्या नवीन जंगलांमध्ये किंवा जिथे मुद्दाम वृक्ष लागवड केली जाते तिथे लगेच येऊन राहू शकत नाहीत कारण तिथे त्यांचे आसरे तयार झालेले नसतात. कदाचित काही दोनशे पाचशे वर्षांनी जर ते जंगल तसंच सुरक्षित राहिलं तर तिथे या specialist जाती येऊ शकतील. पण हा दीर्घ काळ पहिला तर आज जे असे अधिवास already अस्तित्वात आहेत ते सुरक्षित ठेवणं हे सर्वात हिताचं आहे.
थोडक्यात जाती extinct व्हायला वेळ लागत नाही पण एखादी जात उत्क्रांत व्हायला हजारो/लाखो वर्षं लागतात. त्यामुळे ecological conservation हे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व जातींसाठी गरजेचं आहे. आणि जिथे माणसाचं संपूर्ण जीवन हे मोठ्या प्रमाणावर जर जैवविविधतेवर अवलंबून आहे तर ही विविधता राखणं या इतकं महत्त्वाचं दुसरं काय असू शकतं?

जिज्ञासा: आता जरा विकी स्वरूपाचे प्रश्न विचारते! इकॉलॉजीच्या दृष्टीने तुला जगातील कोणत्याही दोन/तीन वैशिष्टय़पूर्ण वाटणाऱ्या जागा सांगशील का?
केतकी: इकॉलॉजीच्या दृष्टीने मला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाटणाऱ्या मला excite करणाऱ्या जागा म्हणजे तिथे primary forests म्हणजे मूळ स्वरूपातली जंगलं आहेत त्या! कारण मला personally जंगलं इतर बायोम्स पेक्षा अधिक जवळची वाटतात. आता अशी जंगलं कुठे आहेत तर बऱ्याच ठिकाणी. भारतातल्या काही देवराया तर अगदी पाय निघत नाही अशा आहेत. इथले महावेल (Lianas) वेड लावतात. आणि इतरही खूप गोष्टी आहेत. जगात अशी जंगलं अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यातलं एक स्पेशल ठिकाण म्हणजे Papua New Guinea ह्या बेटांवर जिथे बहुतेक अजून केवळ आदिवासी राहतात आणि एकूणच माणसं अगदी कमी आहेत किंवा नाहीच आहेत. इथला काही भाग हेलिकॉप्टर ने जावं लागतं इतका तो भाग दुर्गम आहे. अर्थात आता हळूहळू तिथेही बरे वाईट बदल होत आहेत. पण ही बेटं स्पेशल का तर तिथे birds of paradise आहेत. David Attenborough यांच्या काही माहितीपटात हे पक्षी दाखवले आहेत. माणूस नाचायला या पक्षांकडून शिकला असं म्हणता येईल इतके ते सुंदर नाचतात! माणसाला वाटत असेल interior decoration आपणच शोधलं पण हे पक्षी त्यांच्या घरांचं interior डेकोरेशन कितीतरी पूर्वीपासून करत आहेत. ते फार देखणं पाहत राहावं असं असते. त्यातला एक पक्षी एक स्क्वेअर मीटर जागेची आपल्या चोचीने सफाई करून ती लख्ख करतो आणि मग त्यात सुंदर bright रंगाची फुलं आणून ठेवतो, कुठल्या एका प्राण्याची गोल गोल दिसणारी विष्ठा आणून ठेवतो त्यावर विशिष्ट असे कवक आलेले असतात. मग या जागी तो सुंदर नाच करतो - हे सगळं त्याच्या भावी जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी! तर या अशा पक्ष्यांमुळे मला ही जागा स्पेशल वाटते!
दुसरी एक जागा म्हणजे एक बेटांचा समूह आहे Ascension Island, St. helena आणि tristan da cunha म्हणून अटलांटिक महासागरात - ही बेटं तिथे सापडणाऱ्या समुद्री या पक्षांसाठी प्रसिद्ध आहेत. इथल्या काही पक्षांच्या जाती endangered species मध्ये मोडतात. अनेक प्रदेशनिष्ठ (endemic) जाती तिथे आहेत. म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने पाहिलं तर कोणत्याही बेटासारख्या जागेचं महत्त्व जरा अधिकच असतं कारण तिथली जीवसृष्टी ही कोणत्याही जमिनीशी जोडलेली नसते. त्यामुळे तिथली परिसंस्था ही अत्यंत स्वतंत्र आणि एकुलती एक असते. या बेटांवर एक ट्रिस्टन अल्बाट्रॉस नावाचा प्रदेशनिष्ठ पक्षी आढळतो.या व्यतिरिक्त जी विषुववृत्तीय वर्षावनं आहेत म्हणजे ऍमेझॉनचं जंगल ही देखील वैशिट्यपूर्ण जागा आहे. त्यांना आपण पृथ्वीची फुफ्फुसं असं म्हणतो इतकी ही जंगलं महत्त्वाची आहेत.

जिज्ञासा: या क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या?
केतकी: महत्त्वाच्या संस्थांमध्ये मी International Union for Conservation of Nature (IUCN), world wide fund for nature (WWF), United Nations च्या काही संस्था (bodies), Convention on biological diversity (CBD) या मुख्य संस्थांची नावं घेईन.

जिज्ञासा: आपल्या वाचकांसाठी कोणती पुस्तके, लेख, फिल्म, किंवा डॉक्युमेंटरीज सुचवशील?
केतकी: आता ज्यांना या इकॉलॉजीच्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांच्यासाठी Fundamentals of Ecology हे Eugene Odum यांचं पुस्तक अगदी मस्ट रीड आहे.पण ते बरंच टेक्निकल पुस्तक आहे. बाकी Yuval Noah Harari यांचं Sapiens - a brief history of humankind हे पुस्तक जरूर सुचवेन. यातून माणसाने पृथ्वीवर काय बदल घडवले आहेत याची कल्पना नक्की येईल. Gerald Diamond चं Guns, germs, and steel, Richard Dawkins यांचं The Selfish gene, E. O. Wilson यांचं Diversity of life ही उत्तम पुस्तकं आहेत.
माहितीपटांमध्ये बीबीसीचे अनेक माहितीपट आहेत David Attenborough यांचं नरेशन असलेले. विविध बायोम्स आणि परिसंस्थांचा त्यात उत्तम आढावा घेतला आहे. नेटफ्लिक्सची Our Planet ही मालिका नेटफ्लिक्सच्या युट्युब चॅनलवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. ती सर्वांनी जरूर बघावी असं सुचवेन.
आपल्या जगात चाललेल्या बेकायदेशीर व्यापाराबद्दल सांगणारे दोन माहितीपट Seaspiracy (Netflix), Racing extinction (YouTube) देखील माहितीपूर्ण आहेत.

जिज्ञासा: केतकी, आजच्या भागात आपण मारलेल्या गप्पांनी मला पृथ्वीवरची जीवसृष्टी, तिची उत्क्रांती या विषयी खूप काही नवीन शिकवलं आहे. वाचकांनी पुस्तके, लेख, फिल्म, किंवा डॉक्युमेंटरीज यांच्या यादीत जरूर भर घालावी. आपल्या पुढच्या भागात या गप्पा अशाच चालू ठेवूया! या मालिकेचा पुढचा भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होईल.

आधीच्या भागाची लिंक:
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

पुढील भागाची लिंक:
भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, 'seaspiracy' या माहितीपटाचं नाव सुचवल्याबद्दल केतकी घाटे यांचे आणि पर्यायाने तुझे मनापासून आभार! मी आजच ही डॉक्युमेंटरी बघून संपवली. आहे दीड तासाचीच, पण रोज अर्धा तास बघितली. अनिल अवचटांच्या 'प्रश्न आणि प्रश्न' पुस्तकातले लेख वाचून जसा माणूस या प्राण्याच्या लोभाबद्दल, निष्काळजी हावरटपणाबद्दल तिरस्कार वाटतो, लाजही वाटते, तशी ही डॉक्युमेंटरी बघून वाटली. व्यावसायिक पातळीवरची मासेमारी ही इतकी प्रचंड नुकसानकारक आहे, की त्यापुढे आपल्याला एरवी दिसणारे पर्यावरणविषयक प्रश्न लिंबूटिंबू आहेत अशी आकडेवारी त्यात दाखवलेली आहे. Our planet या सीरिजमधे ऐकलं होतं की दरवर्षी १०० मिलियन म्हणजे १० कोटी शार्क हे मारले जातात. कशासाठी, तर शार्क फिन सूपसाठी! हा माणसाचा सरळसरळ उद्धटपणा आहे निसर्गासमोरचा, असं तेव्हाही वाटलं होतं. शार्कसारखा, अन्नसाखळीतला सर्वात वरचा प्राणी आपण असा कत्तल केल्यासारखा मारतो. याचे केवढेतरी दूरगामी वाईट परिणाम समुद्राच्या परिसंस्थेवर होतात. ही डॉक्युमेंटरी बघून तर अजून सविस्तर कळलं! खाली सजेशन्समधे cowspiracy नावाचा माहितीपट आलाय. तोही पाहते.

धन्यवाद वावे इथे आवर्जून documentary पाहिल्याचं कळवल्याबद्दल! आपल्याला कल्पना ही नसते की किती मोठ्या प्रमाणावर आपण निसर्गाला ओरबाडतो आहोत Sad या अशा documentaries मधून किमान ही जाणीव नक्की होते.

दुसऱ्या धाग्यावरील प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट करत आहे.

<< आपल्या पुढच्या पिढ्यांना येणाऱ्या ecological collapse चे कमीत कमी फटके बसावेत यासाठी सारे प्रयत्न आहेत. >>

पर्यावरणप्रेमींची मला नेहमी गंमत वाटते. आपली सुंदर पृथ्वी वाचवा, तिचा ऱ्हास वाचवा, पर्यावरण वाचवा असा विचार नेहमी पुढे येत असतो. यात चुकीचे काही नाही, पण महत्वाची बाब म्हणजे यात निसर्गाबद्दलचे प्रेम खरं तर दुय्यम असते, खरी चिंता असते की पुढच्या पिढीचं काय होईल, मानव जातीचं काय होईल, आपण नष्ट तर होणार नाही ना? स्पष्ट सांगायचे तर निसर्ग सुप्रीम आहे आणि आपण मानव समाज त्याला ओरबाडत आहोत. We are children of the nature, but pests on this planet. योग्य वेळ आली निसर्ग ताकद दाखवेलच, आपण नष्ट होऊ, पण ही पृथ्वी तशीच आनंदात राहील.

@जिज्ञासा, तूर्तास हा व्हिडीओ बघा.