आजची शिकवणी

Submitted by ध्येयवेडा on 23 June, 2021 - 10:10

काळी आरुषचा फोन आला - "हॅलो मामा, आजी आहे का रे ? दे ना तिला, मला तिला काहीतरी सांगायचंय तिला", त्यानं एकदम गोड आवाजात सुरुवात केली.
"आजी नाहीये इथे, माझ्याशी बोल की" मी
"नाही, तू आsधी आजीला फोsन दे..य ..."
"हम्म घ्या, लाडक्या नातवाचा फोन आलाय. फक्त आजी सोबतच बोलायचं आहे म्हणे" मी आईच्या हातात फोन देत तिला म्हणालो.

पुढची पाच मिनिटं आजी आणि नातवाचं फोनवर काय खुसुरफुसुर चालू होतं कोणास ठाऊक.
"काय म्हणाले साहेब ?" फोन झाल्यावर मी आईला विचारलं,

"मला म्हणाला, अगं आजी; मी आणि आई आत्ता जेवायला येतोय थोड्या वेळानं. तू पनीरची भाजी कर हा माझ्यासाठी"
"शेजारच्या डेअरीत मिळेल का रे पनीर ?"

हे ऐकून माझी चिडचीड चालू झाली. मी एकदम चिडून आईवर ओरडा आरडा सुरू केला
"बरोबर आहे, नातवानं सांगितलं करायला, आता लगेच करशील.. पनीर काय, अगदी पंचपक्वान्न पण करशील .."
"अरे काहीपण काय बोलतोयस, तू सांगितल्यावर कधी काही केलं नाहीये का?"
"हम्म , असू दे असू दे. मी कधी काही छान खायला कर म्हणालो, तर लगेच 'अरे आता होत नाही मला ' असं म्हणत बसतेस. मी तुला काही बनवायला सांगणंच सोडून दिलंय. तुझ्या लक्षात आलं नाही वाटतं अजून.. लहानपणापासून आमचे लाड कधी झालेच नाहीत. काही मागितलं की नेहमी ओरडा आणि फटकेच मिळत आले."

"काय मूर्खासारखा बोलतोयस रे, त्या वेळेला होती का आपली परिस्थिती फाजील लाड पुरवायची ? आज तू कमावता आहेस, हे सगळं तुझ्याच पैशयातून चाललंय ना? म्हणून हे शक्य होतंय ना?
तू जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट कर, असं म्हणालास , तेव्हा तेव्हा सगळं करून खायला घातलं आहे. कामावरून रात्री उशिरा आलास, म्हणालास तांदळाची भाकरी कर. त्या दिवशी तांदळाच पीठ नव्हतं घरी. रात्री दहा वाजता कुठे कुठे हिंडून पीठ घेऊन आले आणि तुला भाकरी करून खायला घातली. इडली, डोसा , पाणीपुरी सारखं होतंय आपल्याकडे. तरीसुद्घा असं म्हणतोयस?"
"आणि काय रे .. स्वतः:ची तुलना तू त्या पाच वर्षांच्या मुलाशी करतोस ?"

"हे बघ आई, त्याचे लाड करायचे नाहीत असं मी म्हणतंच नाहीये, आमचे कधी असले लाड झाले नाहीत ही खंत सांगतोय. समजा आत्ता मी जर तुला काहीतरी बनवायला सांगितलं असतं, तर सरळ नाही म्हणून मोकळी झाली असतीस..ठरलेलं वाक्य- 'आता होत नाही पहील्या सारखं' .. (तुझ्यासाठी)"
"काय वाट्टेल ते बोलतोयस .. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला मागेल तेव्हा मिळाली आहे. इतके दिवस काय हवा खाऊन मोठे नाही झालायस..
आणि इतकं शिकलास ते शिक्षण काय फुकटात झालं का रे? कसे दिवस काढलेत ते माहितीये मला. एकटी होते मी.. आणि मी होते म्हणून इतकं तरी झालं तुमचं.. तुझा बाप जिवंत असता तर किती हाल झाले असते .. कल्पना तरी आहे का?"
मला ह्यापुढे काही ऐकायची इच्छाच राहिली नव्हती. तडतडा मी वरच्या खोलीत निघून गेलो. खुर्चीत डोळे मिटून शांत बसलो.

दोन तीन मिनिटांनी डोकं हळू हळू ठिकाणावर यायला लागलं.

आपण का चिडतो? आपण का ओरडतो? आईनं किती कष्ट केलेत आणि काय काय सोसलं आहे हे माहितीये ना? बघितलय ना?.
"आईला आयुष्यात कधीही दुखवायचं नाही." ठरवलेलं ना? आणि आज पुन्हा असं मूर्खासारखं वागायचं काय कारण?

सहा वर्षांवरून आज पंचविशीतला घोडा झालो. खूप शिकलो.. उंहू .. आईने शिकविलं.. चांगल्या ठिकाणी कामाला लागलो. काही वर्षांपूर्वी जे 'वार्षिक उत्पन्न' होतं, ते आज 'मासिक उत्पन्न' झालं.
स्वतः:ला 'मोठे' समजायला लागलो.
ह्या धावपळीत आईसुद्धा साठीला पोचली हे आजपर्यंत कधी दिसलंच नाही.. आई सुद्धा म्हातारी झाली ह्यावर विश्वास तरी कसा ठेवावा? ती नेहमी चाळिशी मधलीच राहिली.
ती त्याच तन्मयतेनं आमच्यासाठी झटत राहिली. सगळं इतकं सहज चालू आहे की समजलंच नाही.
डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आपण काय घोडचूक केली ते लक्षात आलं. त्या 'बागबान' मधल्या अमिताभच्या मुलांमध्ये आणि आपल्यात काही फरक राहिला नाही असं एक क्षण वाटून गेलं.

चूक तर समजली होती. पण आता माफी कशी मागणार ? -- "'आई' मला माफ कर, चुकलो मी, उगाच बोललो तुला काय वाटेल ते.. परत नाही करणार ..."
छे छे.. हे जरा फॅन्सि होतंय हा... पण चूक व्यक्त करून माफी तर मागायलाच पाहिजे!
मनात म्हटलं बघू, आधी इथून खालच्या खोलीत तर जाऊ. मग पुढचं पुढे बघू.

हळूच पायऱ्या उतरत खालच्या खोलीत आलो. ती केर काढत होती. अचानक समोर जाऊन तिला नमस्कार केला आणि हसत हसत लाडात येऊन तिचा गालगुच्चा घेतला.
'आय एम शोल्ली आई .. ...'
माझे पाणावलेले डोळे तिच्या नजरेतून सुटले नाहीत.

"हम्म, निघा आता, ऑफिसला उशीर होतोय."
मी फक्त "हो" म्हणालो, चावी आणि हेल्मेट घेतलं आणि जाता जाता म्हणालो "शेजारच्या डेअरीमध्ये पनीर नाही मिळणार, गणपतीच्या मंदिराशेजारी जे दुकान आहे तिथे मिळेल".

- भूषण करमरकर
मनोगतवर पूर्वप्रकाशित

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलयं...
कळत- नकळतपणे आपलं चुकलं तर माफी मागण्यात कुठलाच कमीपणा येत नाही..!