कुणास सांगू ?

Submitted by कुमार१ on 21 June, 2021 - 06:52

विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :
१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! (https://www.maayboli.com/node/79138)
२. एका आईचा सूडाग्नी (https://www.maayboli.com/node/79258)
………………………………………………….

वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते. या लेखात चेकॉव्ह यांच्या एका कथेचा परिचय करून देत आहे.

सुरुवातीस थोडेसे लेखकाबद्दल.
डॉ. चेकॉव्ह हे मुळात एक वैद्यकीय व्यावसायिक होते. त्यांनी हा व्यवसाय आणि साहित्यलेखन अशा दुहेरी आघाडीवर काम केले - दोन्ही क्षेत्रात अगदी मन लावून. ते गमतीने म्हणायचे,

“वैद्यकी ही माझी बायको आहे, तर साहित्य हे माझ्या रखेलीसमान आहे !”.

त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कथा आणि नाटके लिहिली. त्यांच्या कथांची इंग्लिश भाषांतरेही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे इंग्लंडमध्येही त्यांना चांगली लोकप्रियता लाभली. काही वर्षांपूर्वी भारतीय दूरदर्शनवर ‘कथासागर’ सारख्या हिंदी कार्यक्रमात त्यांच्या रुपांतरीत कथा दाखविल्या होत्या. या नामवंत साहित्यिकाला जेमतेम ४४ वर्षांचे आयुष्य लाभले. क्षयरोगाने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

आता त्यांच्या या कथेबद्दल.
ही १८८६ मध्ये प्रकाशित झालेली कथा आहे.
या कथेचे शीर्षक Misery असे असून त्याला पुढे असेही उपशीर्षक जोडलेले आहे :
"To whom shall I tell my grief?"

ही आयोना नावाच्या एका म्हाताऱ्या बग्गीचालकाची कथा आणि व्यथा आहे. तो गरीब असून पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतोय. बग्गीला एक छानशी घोडी जोडलेली आहे. नुकतीच त्याच्या घरी मोठी दुर्घटना घडली आहे. त्याचा तरुण मुलगा तापाच्या आजाराने मरण पावला आहे. त्यामुळे तो अगदी शोकाकुल आहे. परंतु हातावर पोट असल्याने त्याला रोज उठून त्याचा हा धंदा करणे भागच आहे.

असाच एके दिवशी आयोना धंद्याला बाहेर पडला आहे. खूप वेळ झाला तरी अजून गिऱ्हाईक काही मिळालेले नाही. त्यामुळे तो पेंगुळलाय. तेवढ्यात लांबून एक हाक ऐकू येते, “ओ, बग्गीवाले !” मग लष्करी पोशाखातील एक अधिकारी बग्गीत येऊन बसतो. ती चालू लागते. पण आज ती काहीशी रखडतच असते. त्यावर अधिकारी त्याच्यावर खेकसतो. बग्गी पुढे चालू लागते. आज आयोनाला अगदी भडभडून येतंय. त्याला त्याच्या अंतरीचे दुःख मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगावसं वाटतंय. तो हळूच मान मागे करून त्या अधिकाऱ्याकडे पाहतो. त्यावर तो गुरकावतो, “काय रे?”.
“काही नाही”, आयोनाला बोलायचेय पण कंठ फुटत नाही. शेवटी धीर करून तो म्हणतो,
“सर, काय सांगू, माझा तरणाताठा मुलगा वारला हो !” “कशाने ?”
“काय माहित, तापामुळे गेला असावा”
या संवादात गुरफटल्याने आयोनाचे घोडीवरील नियंत्रण कमी होते. ते पाहून अधिकारी पुन्हा खडसावतो,
“ ए गधड्या, नीट चालव. कुठे बघतोयस ?”
पुढच्या प्रवासात तर अधिकारी त्याचे ठिकाण येईपर्यंत डोळेच मिटून पडून राहतो. आयोनाला बोलायचे असूनही त्याचा नाईलाज होतो.

आयोनाचे पुढचे गिऱ्हाईक तीन तरुण असतात. ते कमी भाड्याच्या बोलीत त्याच्या गाडीत बसतात. ते बहकल्यासारखे वागत असतात आणि त्यांची भाषाही असभ्य असते. तेही त्या बिचार्‍याला एकीकडे दरडावत त्यांच्यात खिदळत असतात. जरा वेळाने तो हळूच त्याची दुःखद बातमी त्यांना चाचरत सांगतो. त्यावर त्यातला एक तरुण, “असं होय, आपण सगळे कधीतरी मरणारच असतो की”, अशी त्याची खिल्ली उडवतो. नंतर त्यांचे ठिकाण येते. आयोनाचे दुःख अजूनही मोकळे न होता त्याच्या मनातच राहते.

आता पुन्हा एकदा आयोना गिऱ्हाइकांची वाट पाहत एकटाच पडलाय. तो रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांकडे आशेने पाहतोय. या हजारो लोकांपैकी आपले दुःख ऐकून घ्यायला एकही जण का मिळू नये या विचाराने तो अधिकच दुःखी होतोय. तेवढ्यात त्याला एक हमाल दिसतो. हा तरी आपल्याशी सहानुभूतीने बोलेल अशा आशेने तो त्याच्याशी बोलायला जातो. पण तो हमाल त्याला कसनुसे बोलून कटवतो आणि पुन्हा निराशाच पदरी पडते. आता आयोना व्यथित मनाने घरी परतायचे ठरवतो. आज पुरेशी कमाई न करताच तो घरी येतो. घोडीला बाहेर सोडतो आणि मग शांतपणे विचार करत आतमध्ये लवंडतो. मनात त्याच्या गेलेल्या मुलासंबंधी त्रस्त करणारे विचार येत राहतात. मग मनाशी तो म्हणतो, “हे सगळे मला सविस्तर कोणाला तरी सांगायचंय, भडभडून बोलायचंय, तरच मला मोकळे वाटेल. माझे बोलणे ऐकायला जर एखादी स्त्री मिळाली तर किती बरे होईल !”

त्याला एकदम घोडीची आठवण येते आणि तो बाहेर तबेल्यात येतो. ती बिचारी शांतपणे गवत खात असते. आता तो तिच्याशीच बोलू लागतो,
“काय ग, गवत खातेस ना, खा भरपूर. आज आपल्याला ओट्स आणण्याइतके पैसे नाही मिळाले. काय करू, आता मी आता म्हातारा झालो बघ. खरेतर माझ्या जागी माझ्या मुलानेच ही बग्गी चालवायला हवी होती. त्याने खूप छान चालवली असती. आता हे बघ, माझ्याप्रमाणेच तुलाही जर एक शिंगरू असते आणि अचानक ते मरण पावले असते, तर तुला पण किती दुःख झाले असते. नाही का ? खूप अवघड असते बघ असा अपत्यमृत्यू सहन करणे”.

Misery_1903_illustration.jpg

असं बोलून तो तिच्याकडे बघतो. घोडी गवत खाताखाता त्याच्या हातावर हळूवार श्वास सोडते. आयोनाला आता अगदी मोकळे व शांत वाटते. मग तो त्याच्या मुलाची अथपासून इतिपर्यंत सर्व कथा तिला सांगत राहतो.

विवेचन
कथा साध्यासोप्या भाषेत असून ती निवेदन पद्धतीने पुढे सरकते. अधूनमधून काव्यमय भाषेत काही वर्णने येतात. कथेचा पूर्वार्ध म्हाताऱ्याच्या व्यक्तिगत दुःखाभोवती (grief) केंद्रित आहे. ते खरे तर मोकळे व्हायची गरज आहे. परंतु तशी संधीच न मिळाल्याने ते साचत जाते. कथेच्या उत्तरार्धात ती दुःखाची भावना मनोवेदनेपर्यंत (misery) पोचते. या वेदनेवर उपाय असतो तो म्हणजे साचलेले बोलून मोकळे करणे. परंतु ते घडण्यासाठी दखल घेणारा कनवाळू श्रोताच मिळत नाही. शेवटी पुरता निराश होऊन म्हातारा घोडीजवळच आपले दुःख मोकळे करतो. माणसांच्या आत्मकेंद्रित आणि भावनाहीन प्रवृत्तींवर कथेत चांगला प्रकाश टाकलेला आहे. शोकमग्न असलेल्या म्हाताऱ्या चालकाशी देखील त्याची गिर्‍हाईके ज्या तुसडेपणाने वागतात ते पाहून म्हाताऱ्याचे दुःख वाचकांपर्यंत पोचते.
मानवी संवादांची गरज अधोरेखित करणारी अशी ही कथा आहे. कथेतील घटनांपेक्षाही त्यातील मुख्य पात्राच्या मनातील खळबळ व्यक्त करण्यावर लेखकाने अधिक भर दिलेला आहे.
…………………………………………………………………………………..
चित्र विकीतून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.
कल्पना करून वाईट वाटलं.
आज सोशल मीडियावर व्यक्त होताना डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींची अवस्था त्या आयोना सारखीच होत असावी.

सर, मागच्या कथेत जेंव्हा चेकॉव्ह यांचा उल्लेख आला होता तेंव्हा मला हीच कथा आठवली होती. चेकॉव्ह यांची हि कथा खरेच अत्यंत ह्रदयस्पर्शी व गाजलेली कथा आहे. आपण कथेचा परिचय खूपच छान तपशीलवार परिचय करून दिलात. व्यंकटेश माडगुळकर यांनीसुद्धा त्यांच्या एका कथासंग्रहात त्यांनी या कथेचा संक्षेपात परिचय करून दिला आहे. तो वाचल्यापासून माझ्या मनात या कथेने अगदी घर केले होते. त्यामुळे माबो वरचे माझे पहिले लिखाण सुद्धा याच कथेवर आधारित होते.

खरेच, व्याकुळ करणारी कथा आहे. दु:ख असण्याचे शल्य एक. पण ते व्यक्तच करता आले नाही तर ते शल्य अनेक पटीने तीव्र असते.

वरील सर्व नियमित व साहित्यप्रेमी प्रतिसादकांचे आभार !
* कोणाशी तरी बोलायचयं या ग्रुपचे महत्व,
* डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींची अवस्था >>>
अगदी !

**अतुल,
तुमच्या मनातील विचार आणि माझा हा लेख यांचा योगायोग विलक्षण आहे !
तुमची कविता छानच आहे.

डॉ कुमार, खुप छान लिहिलं आहेत. तुमचं विविध विषयांवरचं सगळंच लेखन मला आवडतं ( प्रत्येक वेळेस प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे सगळे लेख आवर्जुन वाचते)

खरेच, व्याकुळ करणारी कथा आहे. दु:ख असण्याचे शल्य एक. पण ते व्यक्तच करता आले नाही तर ते शल्य अनेक पटीने तीव्र असते. >>> अतुल अगदी खरं

डॉ कुमार, खुप छान लिहिलं आहेत. तुमचं विविध विषयांवरचं सगळंच लेखन मला आवडतं, तुमचे सगळे लेख आवर्जुन वाचते+१११११
Happy

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

मीरा, किल्ली ,
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्यासारखे सुजाण वाचक लाभल्यामुळेच लेखन करण्यास हुरूप येतो.

डॉ कुमार, खुप छान लिहिलं आहेत. तुमचं विविध विषयांवरचं सगळंच लेखन मला आवडतं ( प्रत्येक वेळेस प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे सगळे लेख आवर्जुन वाचते) +++१११

सर,
"विदेशी कथा परिचयमाला" - कथा व कथाकार परिचय सादर करण्याची ही लेखमाला अप्रतीम !
कमी वाचन केलेल्या मझ्यासार्खयांना तर पर्वणीच !!!!

"विवेचन" आजही लागू ...

"मानवी संवादांची गरज "===> ह्याचे महत्व अनेकदा माहित असूनही दुर्लक्षीत होते.

खरेच, व्याकुळ करणारी कथा आहे. दु:ख असण्याचे शल्य एक. पण ते व्यक्तच करता आले नाही तर ते शल्य अनेक पटीने तीव्र असते. ==> ++
तुमच्या लेखावरचे प्रतीसाद वाचनीय व उच्च दर्जाचे....

सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !

संवादांचे महत्व अनेकदा माहित असूनही दुर्लक्षीत होते.
>> +१११

छान कथाकल्पना आणि विचार आहे

मायबोलीवर कोणाशी तरी बोलायचयं या ग्रुपचे महत्व इथे अधोरेखीत होते. >> माझ्याही डोक्यात पहिले हेच आले. म्हणून तिथे एखादा डुआयडी टाईमपास करतोय वाटले तरी आपल्या परीने प्रतिसाद द्यावा.

यावरून आणखी एक आठवले, मागे एका मित्राने मला सुखी संसाराचा एक कानमंत्र सांगितलेला. बायको जेव्हा आपल्याला तिचे प्रॉब्लेम सांगत असेल तेव्हा ते शांतपणे मन लाऊन ऐकून घ्यावेत. ९० टक्के प्रॉब्लेममध्ये तिला आपल्याकडून काही सोल्युशन अपेक्षित नसतेच. फक्त ऐकून घेणारा एक कान हवा असतो. मन मोकळे करायला कोणीतरी असणे फार गरजेचे.

ऋ,
९० टक्के प्रॉब्लेममध्ये तिला आपल्याकडून काही सोल्युशन अपेक्षित नसतेच. फक्त ऐकून घेणारा एक कान हवा असतो.
>>> छान मुद्दा.
Bw
धन्यवाद

छान लिहिले आहे. अँटन चेकॉव्ह हे माझेही आवडते लेखक आहेत. त्यांच्या काही काही कथा तर सुरवातीला साध्यासरळ, सामान्य, कधीतरी तर सवंग सुद्धा वाटून हळूहळू एक वेगळीच उंची गाठायच्या , शेवट तर अवाक करणारा असायचा. ही त्यांची शैली इतरांपेक्षा वेगळी वाटायची व फार आवडायची.
(दूरदर्शन वर 'चेकॉव्ह की दुनिया' ही मालिका लागायची, फार मस्त होती, युट्यूब वर उपलब्ध आहे.)

अतुल यांची कविता ही छान , चपखल, नवीनच प्रयोग !!
ऋन्मेष , प्रतिसाद आवडला.

खुपच छान!
"कोणास सांगु" हा प्रश्ण असलेले अनेक वृद्ध आजुनही आपल्या आसपास आहेत.
त्यांचे प्रश्ण इतके गंभीर नसतीलही, पण त्याना द्ययला वेळ कोणाकडेही नाही.

अस्मिता, नीलिमा
धन्यवाद व सहमती.

पूरक माहिती आणि चांगल्या चर्चेबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार !

९० टक्के प्रॉब्लेममध्ये तिला आपल्याकडून काही सोल्युशन अपेक्षित नसतेच. फक्त ऐकून घेणारा एक कान हवा असतो ===>
ऋन्मेष , एकदम बरोबर !!!
बायको ( / नवरा) ह्यांच्याबरोबर हा नियम सर्व आपल्या जवळ्च्या व्यक्तींना लागू होतो.... मझ्या मुलीला तिचे सर्व अनुभव मला सांगायचे असतात... Happy

(दूरदर्शन वर 'चेकॉव्ह की दुनिया' ही मालिका लागायची, फार मस्त होती, युट्यूब वर उपलब्ध आहे.) ===> अस्मिता धन्यावाद !!

https://www.youtube.com/watch?v=3VhePMakCUQ

सतीश, हो खरेय, सर्वांनाच हे लागू होते.
तरी मुलांबाबत आपल्याला याची कल्पना असते. म्हणजे मुलांचे बोलणे ऐकायला पाहिजे, त्यांना वेळ द्यायला हवे याबाबत आपण बरेचदा जागरूक असतो कारण ती लहान असतात. पण मोठ्यांबाबत मात्र याचा विसर पडतो. वर बायकोचे उदाहरण यासाठी महत्वाचे की तिचे लग्नानंतर बरेचसे आयुष्य बदलून गेले असते जे पुरुषांबाबत तुलनेत फार कमी बदललेले असते. त्यामुळे तिच्याकडे सांगण्यासारखे व्यक्त करण्यासारखे बरेच असते. याऊलट घरच्या वयोवृद्धांकडे सांगण्यासारखे फारसे नसेल पण हे आपण गृहीत धरून त्यांना आणखी कमी वेळ देतो.

सुंदर कथेचा अतिशय सुंदर परिचय. संवादाची आवश्यकता ही अतिशय महत्वाची बाब अधोरेखित करणारी.. बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं

.... बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं......
हजारदा अनुमोदन!!

कुमार, परिचय आवडला, चेकोव्ह मेडिकल डॉक्टर होते हा मुद्दा विशेष:-)

ससु, अनिं.,
धन्यवाद.

बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं......
हजारदा अनुमोदन!!
>>> माझेही , अजून १००० वेळा !

बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं>>> १००% सत्य. कथा खूप छान आहे. वाचता वाचता कितीतरी न सांगितलेल्या गोष्टी भराभर डोळ्यांसमोर आल्या आणि वाहून गेल्या. ऐकायला कोणी नाही म्हणून.

कुमार सर,
"विदेशी कथा परिचयमाला" - कथा व कथाकार परिचय सादर करण्याची ही लेखमाला अप्रतीम !>>> +12345

कोणाजवळ मनातील भावना व्यक्त करता नाही आल्या त्यामुळे एका मुक्या जनावराशी बोलून मन मोकळे केले ही नुसती कल्पना करुन सुद्धा वाईट वाटते.

थोडे अवांतर:
माझ्या ओळखीतील आमच्या जुन्या सोसायटीतील एक वृद्ध गृहस्थ आहेत . आम्ही लहान असताना त्यांच्या मुलांबरोबर खेळायचो. तेव्हा ते काका स्वभावाने खूप कडक आणि मोजके बोलणारे होते. त्यांच्या कुजकट टोमणे मारण्याच्या स्वभावामुळे कोणी त्यान्च्या घरी जात नसत. या उलट त्यांची बायको. खूप बोलकी आणि माणसांची पाहुण्याची आवड असणारी. पण काकुंचे नवर्याच्या स्वभावापुढे काही चालत नसे.त्या काकुंना जाऊन आता 5वर्षे झाली.

एकदा रस्त्यात त्यांची सून भेटली सहज चौकशी केली तेव्हा समजले की ते काका हॉस्पिटल मध्ये भरती केले आहेत. सुन आणि मुलगा दोघे नोकरीला आहेत त्यामुळे दिवसभर बाहेर असतात. तिचा आग्रह म्हणून त्या काकांना भेटले. ते अगदी लहान मुलासारखे अखंड बडबड करत होते. मला खरेच वाटत नव्हते की जे कधी शेजारच्या लोकांना विचारत पण नव्हते ते काका आज माझ्याशी तासभर बोलत होते.
माझ्या आईवडिलांनी ती सोसायटी सोडून 7-8वर्षे झाली आणि दुसरीकडे राहतात. माझ्या लग्नानंतर मी सुद्धा क्वचित एखाद वेळी गेले असेन.
पण त्या काकांना भेटले तेव्हा ते इतके बोलत होते जसे खूप मनात साचले असावे आणि जुन्या ओळखीतील कोणी भेटावे. काकू गेल्यानंतर खुपच एकटे पडले असावेत.

चिन्मयी, सियोना,
धन्यवाद. प्रतिसाद आवडले.
...
लेखमालेच्या आतापर्यंतच्या ५ भागांत प्रस्तुत भाग सर्वाधिक वाचकप्रिय ठरलाय.
या पुढील भागातील कथाही छान आहे.
त्याचा दुवा : https://www.maayboli.com/node/79468

सुंदर कथेचा अतिशय सुंदर परिचय. संवादाची आवश्यकता ही अतिशय महत्वाची बाब अधोरेखित करणारी.. बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं

सुंदर कथेचा अतिशय सुंदर परिचय. संवादाची आवश्यकता ही अतिशय महत्वाची बाब अधोरेखित करणारी.. बोलणारं तोंड सर्वांकडेच असतं, ऐकण्याचा कान असणं गरजेचं

Pages