कोसळणारा ‘पाऊस’ : १०० वर्षांपूर्वी !

Submitted by कुमार१ on 30 May, 2021 - 21:36

नुकतेच आपल्याकडे चक्रीवादळाच्या प्रभावाने काही जोरदार पाऊस झाले. किनारपट्टीच्या भागातले असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते. त्या तुलनेत माझ्या भागात झालेला पाऊस तसा मध्यमच होता. असाच एक पाऊस खिडकीतून पहात मी खुर्चीवर बसलो होतो. पावसाच्या पडण्याचा आवाज बऱ्यापैकी होता. पाऊस पाहताना मला काहीशी तंद्री लागली आणि मनाने मी कित्येक वर्षे मागे पोचलो. तेव्हाची एक आठवण अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली.

तेव्हा मी वयाची पंचविशी पूर्ण केली होती आणि तो माझा वाढदिवस होता. तेव्हा सहज काकांकडे गेलो होतो. त्यांनी मला शुभेच्छा देत एक इंग्लिश पुस्तक भेट दिले. विख्यात इंग्लिश साहित्यिक सॉमरसेट मॉम यांचा तो कथासंग्रह होता – ‘पेंग्विन’ने प्रकाशित केलेला. तोपर्यंत मी मॉम यांची काही पुस्तके ब्रिटिश लायब्ररीतून आणून वाचली होती. वैद्यकीय पदवीधर असलेल्या मॉम यांनी एक दोन वर्षेच वैद्यकीय सेवा करुन डॉक्टरकीला कायमचा रामराम केला होता ! पुढे निव्वळ लेखनावरच आपली उपजीविका करीत हा माणूस तत्कालीन कोट्याधीश झाला. तेव्हा त्यांच्याबद्दल मला विलक्षण कुतूहल होते, आजही आहे. त्यांचा कथासंग्रह माझ्या पंचविशीची भेट म्हणून मिळणे हे माझ्यासाठी कमालीचे आनंददायी होते. ही भेट खरंच आयुष्यातील अविस्मरणीय ठरली.

तो कथासंग्रह चाळून पाहिला आणि त्यात असे दिसले की पहिलीच कथा अतिदीर्घ आहे. त्यानंतरच्या सर्व कथा लघुकथा म्हणाव्यात इतक्या सामान्य लांबीच्या होत्या. तर ही दीर्घकथा म्हणजे ‘Rain’. यथावकाश मोठ्या उत्सुकतेने ती वाचली - अगदी एका बैठकीत. नंतर पुनर्वाचन करताना त्यातील काही निवडक भाग वाचला. कथा संपताना जेव्हा त्यातली ‘तसली’ बाई अखिल पुरुष जातीचा ‘गलीच्छ ओंगळ डुकरे’ म्हणून उद्धार करते ते विसरणे शक्य नव्हते. तिचे ते तिरस्कारयुक्त वाक्य आणि त्यानंतरचे लेखकाचे समाप्तीचे वाक्य ही दोन्ही माझी आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली.

आताचा हा पाऊस बघत असताना पुन्हा भानावर आलो - भूतकाळातून पुन्हा वर्तमानात. आणि एक विचार उचंबळून आला. आता पुन्हा एकदा ‘Rain’ वाचली पाहिजे आणि तिच्यावर एक परिचय लेख लिहावासा वाटला. ही कथा सर्वप्रथम एका अमेरिकी मासिकात 1921 ला प्रसिद्ध झालेली होती. म्हणजे यंदा तिला शंभर वर्षे पूर्ण झाली ! हा योगायोग मला विलक्षण वाटला. म्हणूनच निर्धार केला आणि ही कथा पुन्हा वाचायचे ठरवले. आता माझ्याजवळ ते जुने पुस्तक नव्हते. म्हणून सहज जालावर शोध घेतला आणि ती मिळाली. मग अधाशासारखी वाचून काढली. तिच्या जन्मशताब्दी निमित्ताने तिचा परिचय वाचकांना करून देतो.

ही कथा १०० वर्षे जुनी आहे. मॉम यांची एक अभिजात कलाकृती म्हणून ती नावाजलेली आहे. इंग्लिश भाषेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ती समाविष्ट असते. गेल्या शंभर वर्षात तिच्यावर असंख्य चर्चा, वाद-विवाद व काथ्याकूट भरपूर झालेले असून ते सर्व जालावर वाचायला उपलब्ध आहेत. आपल्यातील चोखंदळ वाचकांनी ही कथा वाचलेली सुद्धा असेल. या कथेचे पुढे नाट्य, मूकपट आणि चित्रपट रूपांतरही झालेले आहे. हे सर्व पाहता स्वतःवर निवेदनाचा कुठलाही निर्बंध न ठेवता मी तिच्यावर लिहिणार आहे. (तरीसुद्धा जर कोणाला ती आधी मुळातूनच वाचायची असेल तर अशा वाचकाने इथेच निवृत्ती घ्यावी ! ) Bw
….
….

‘रेन’ सर्वप्रथम 1921 साली ‘Miss Thompson’ या नावाने “द स्मार्ट सेट’ या अमेरिकी साहित्य मासिकात प्रसिद्ध झाली. तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावर तिची लघुकादंबरी अशी जाहिरात केलेली दिसते (चित्र पहा):

Smart-Set-April-1921-FC.jpg

कालांतराने कथासंग्रहात समाविष्ट करताना तिचे ‘रेन’ नामकरण झालेले दिसते.

_Rain_and_other_Stories,_1921_-_BEIC_2649401.jpg

प्रत्यक्ष कथेकडे येण्यापूर्वी मॉमना ही कथा कोणत्या परिस्थितीत सुचली ते पाहू. सन 1916 मध्ये मॉम व त्यांचे सचिव (वाफेवर चालणाऱ्या) बोटीतून पॅसिफिक सफरीसाठी चालले होते. तेव्हा त्यांनी अमेरिकन समोआ या बेटाला भेट दिली होती. त्याच वेळी गोवराची जोरदार साथ पसरली होती. बोटीवरील एकाला त्याची बाधा झाल्याने विलग केले होते. आता इतरांना कोणाला संसर्ग झाला आहे का ते पाहण्यासाठी त्यांचेही विलगीकरण करून बोट प्रवासात मध्येच रोखून ठेवली होती. हे विलगीकरण सहा आठवडे असल्याने बोटीवरील प्रवाशांना मधल्या ठिकाणी एका अतिथीगृहात मुक्काम करावा लागला होता.
त्यांच्या बोटीवरील सहकार्‍यांमध्ये एक धर्मप्रचारक व त्याची पत्नी आणि थॉम्पसन ही तरुणी यांचा समावेश होता. या सर्वांना मॉमनी त्यांच्या कथेतील पात्रे बनवून टाकले.

कथानक
वरील सत्य घटनेनुसार गोवराची जीवघेणी साथ चालू आहे. त्यानुसार या बोटीवरील प्रवासी मधल्याच एका ठिकाणी उतरवून तिथल्या अतिथीगृहात दाखल झालेले आहेत. त्यांचा तिथे काही काळ मुक्काम असणार आहे. संपूर्ण कथाभर सतत धोधो कोसळणारा पाऊस सोबतीस आहे.

कथेतील मुख्य पात्रे :
• डॉ. मॅकफेल (वैद्यकीय डॉक्टर) व त्यांची पत्नी.
• डेव्हिडसन व त्यांची पत्नी. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक आहेत.
• मिस थॉम्पसन उर्फ सॅडी ही वेश्या. ती तिच्या जुन्या ठिकाणी पडलेल्या पोलिसांच्या धाडीमुळे पळालेली आहे.

एका अर्थाने वरील दोन्ही जोडपी ही अभिजन वर्गातली आहेत. ती सभ्यता व सार्वजनिक शिष्टाचार पाळून एकमेकांशी गप्पा मारत आहेत. तर सॅडी ही ‘धंदेवाईक’च असल्याने तिचे ‘गिर्‍हाइकांशी’ बोलणेवागणे त्याला अनुरूप आहे. तिच्या खोलीतून कायम मोठ्याने ग्रामोफोन लावल्याचा आवाज येत असतो व त्या तबकडीवरील गाणी अश्लील असतात. डेव्हिडसन मुळातच धर्मप्रचारक व त्याच कामासाठी देश-विदेश फिरणारे. त्यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणच्या मागास लोकांना पापपुण्य इत्यादी कल्पना शिकवून सभ्यतेने राहायला शिकविलेले असते. आताच्या मुक्कामात सॅडीचा तिच्या गिर्‍हाइकांसोबत चाललेला धुडगूस पाहून ते कमालीचे अस्वस्थ होतात. डॉक्टर व त्यांच्या बायकोलाही तिचे वागणे आवडलेले नाही पण ते तितकेसे अस्वस्थ होत नाहीत. डेव्हिडसन मात्र तिच्या तिथल्या वास्तव्याने अक्षरशः त्रस्त झालेत. ही असली बया आपल्या मुक्कामी असता कामा नये हे त्यांनी मनात पक्के ठरवले आहे. सुरुवातीस ते तिच्या खोलीत जाऊन निषेध व्यक्त करतात. पण ती निर्ढावलेली असल्याने त्यांचा अपमान करते.

डेव्हिडसन यांचा दबदबा असल्याने त्यांची त्या प्रदेशाच्या गव्हर्नरपर्यंत ओळख आहे. त्याचा फायदा उठवून ते गव्हर्नरना पटवतात. त्यानुसार गव्हर्नर आदेश काढतात की आठवड्याने येणाऱ्या अन्य एका बोटीतून सॅडीची रवानगी सॅनफ्रान्सिस्कोला करण्यात यावी. तिला तिथे पाठवल्यावर तिथल्या कायद्यानुसार तिला तिच्या गैरकृत्यांसाठी तीन वर्षे तुरुंगवास घडणार असतो. हे ऐकल्यावर सुरुवातीस सॅडी डेव्हिडसनवर क्रुद्ध होते. ती नंतर डॉक्टरना त्यांचे मन वळवण्यासाठी मध्यस्थी करायला सांगते. पण नंतर या प्रकरणाला कलाटणी मिळते. डेव्हिडसन तिने पापाचे प्रायश्चित्त घेणेच कसे तिच्या कल्याणाचे आहे हे तिला बिंबवतात. तिच्यासाठी रोज प्रार्थना करू लागतात. मग तिच्या वागण्यात सुधारणा होऊ लागते. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर शरणागतीचे भाव देखील येतात. ती हा मुक्काम सोडून सॅनफ्रान्सिस्कोला जायचे कबुल करते. त्यापूर्वी तीन-चार दिवस डेव्हिडसन यांचा तिच्या खोलीतील एकट्याचा ‘वावर’ बराच वाढतो.

दरम्यान डॉक्टरना डेव्हिडसनच्या अंतस्थ हेतूबद्दल शंका येऊ लागते. हा माणूस तिच्या ‘आत्म्याच्या शुद्धीकरणा’ऐवजी तिच्यावर प्रेमाचे जाळे तर टाकत नाहीयेना असे त्यांना वाटू लागते. अखेर सॅडीची रवानगी करण्याचा दिवस येऊन ठेपतो. त्याच्या आदल्या रात्री डेव्हिडसन तिच्या खोलीतून रात्री दोन वाजता बाहेर पडतात.

सकाळ होते. डॉक्टरना जाग येते ती तिथल्या अतिथीगृहाचा मालक त्यांना जागा करायला येतो त्यामुळे. तो घाबरलेला आहे आणि तो घाईने डॉक्टरांना बरोबर घेऊन निघतो. दोघे वेगाने समुद्र किनार्‍यावर पोचतात. तिथल्या गर्दीला दूर सारल्यावर जे दृष्य दिसते ते भयानक असते. तिथे डेव्हिडसनचा मृतदेह पडलेला असतो. डॉक्टर तो वळवून पाहतात. मृताच्या गळ्यावर वस्तऱ्याने चिरल्याची भली मोठी जखम असते व त्याच्या हातात तो वस्तरा देखील. मग पुढे पोलीस वगैरे सोपस्कार होतात. आता डॉक्टरांच्या बायकोद्वारा ही बातमी डेव्हिडसनच्या बायकोला पोचवली जाते. ती अजिबात रडत नाही. उलट करारी मुद्रेने त्यांचा मृतदेह बघायला जाते. तिच्या चेहऱ्यावरचे तटस्थ खंबीर भाव पाहून डॉक्टर स्तिमित होतात. त्यांना राहून आश्चर्य वाटते.

ही सर्व मंडळी आता अतिथीगृहाकडे परततात. वाटेत सॅडीची खोली लागते. ती उघडी असते. आता तिच्या खोलीतून मोठ्या आवाजात लावलेली अश्लील गाणी ऐकू येतात. ती दारातच तिच्या पूर्वीच्या धंदेवाईक देहबोलीत उभी आहे. डेव्हिडसनबाई जवळ येताच ती अगदी गडगडा हसते आणि पचकन थुंकते. मग ती स्वतःचे तोंड हाताने झाकून वरच्या मजल्यावर पळते. त्यावर डॉक्टर संतापतात. ते तिच्या मागे धावत खोलीत घुसतात. रागाने ते अश्लील संगीत बंद करतात. त्यावर ती उद्धटपणे त्यांना म्हणते, “इथे खोलीत कशाला आलात, डॉक्टर ? तुम्हालाही ‘तेच’ हवे आहे का ?” यावर डॉक्टर भडकतात. पुढे ती अत्यंत तिरस्कारयुक्त चेहऱ्याने म्हणते,
“तुम्ही सर्व पुरुष गलिच्छ ओंगळ डुकरे आहात, अगदी सर्वजण एकाच माळेचे मणी आहात !” त्यावर डॉक्टर अवाक होतात. त्या एका वाक्याने त्यांना सर्वकाही समजून चुकते.

कथेतील अनुत्तरीत रहस्यमय प्रश्न

१. डेव्हिडसन यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला ?
२. जर आत्महत्या असेल तर ती सॅडीसोबत केलेल्या संभोगानंतरची पश्चात्तापबुद्धी सुचवते.
३. मात्र जर खून झाला असेल, तर तो सॅडीने केला की त्यांच्याच बायकोने ?
लेखकाने मोठ्या खुबीने याची उत्तरे न देता वाचकांवर सोडून दिली आहेत ! यावर अभ्यासकांत बरीच चर्चा झालेली आहे. आपणही इथे करायला हरकत नाही.

कथेतील सौंदर्यस्थळे
१.सर्व पात्रांची मार्मिक व बारकाईने केलेली वर्णने. यात मॉम यांचा हातखंडा आहे. एखाद्या पात्राच्या वर्णनातून ते आपल्यासमोर त्याची मूर्तिमंत प्रतिमा उभी करतात.
सॅडीची जी दोन्ही भिन्न रुपे रंगवलीत त्याला तोड नाही. तिचा कथांतातील तिरस्कारयुक्त भाव तर अंगावर चालून येतो (इथे विजय तेंडूलकर आठवतात). तसेच आदिवासींची ढंगदार वर्णनेही छान.

२. डेव्हिडसनच्या धर्माच्या बुरख्याआड दडलेला विषयासक्त पुरुष हे तर कथेचे बीज व बलस्थान आहे.
त्याने पूर्वी कितीही पुण्यकर्मे केलेली असली तरी संधी येताच तो स्खलनशील ठरला.
३. डॉक्टर व डेव्हिडसनच्या बायका आणि सॅडी यांच्यातील सामाजिक भिन्नता व दुरावाही छान दाखवला आहे.

४. वेश्याव्यवसाय व समाज : ‘हा व्यवसाय अजिबात चालू देता कामा नये’ हे धर्मगुरूंचे मत तर तो अटळ आहे हे पोलिसांचे मत ! “पोलिसांना वेळच्यावेळी हप्ते मिळाल्यावर ते दुसरे काय म्हणणार ?” हा संवाद जबरदस्त. हे सनातन प्रश्न व त्यांची ठरलेली उत्तरे.
५. वाचकाला हलवून टाकणारा व अस्वस्थ करणारा हृदयद्रावक शेवट.

कथेतील पावसाचा प्रतीकात्मक वापर

संपूर्ण कथेमध्ये ‘रेन’ हा शब्द तब्बल 26 वेळा आलाय ! कथाबीज व पावसाचा संबंध काय, यावर विद्वानांत बराच खल झालेला आहे. त्यानुसार लेखकाच्या मनात हे हेतू असू शकतील:

१. पाऊस ही निसर्गाची मूलभूत ताकद आहे पण तोच जेव्हा आभाळ फाटल्यागत अविरत कोसळतो तेव्हा तो मृत्यूचे प्रतीक बनतो.
२. बायबलनुसार पावसाचे असे कोसळणे म्हणजे देवाची शिक्षा असते.

३. पाऊस हे पश्चातापाचे अश्रू आहेत. ते पाप ‘धुऊन’ काढतात.
४. जसा कथेचा कळसबिंदू जवळ येतो तसे पावसाचे वर्णन अधिकाधिक येऊ लागते आणि त्याची वर्णनेही अलंकारिक होतात. त्यापैकी malignant हे विशेषण सर्वोत्तम आहे !
५. सारांश : या कथेत पाऊस हा क्रमाने क्रोध, शिक्षा आणि पश्चात्ताप यांचे प्रतीक बनून येत राहतो. त्याची साद्यंत वर्णने वाचकाच्या मनात खळबळ व चिंता उत्पन्न करतात.

कथेबद्दलची कुजबुज :
ती ‘द स्मार्ट सेट’ मध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी जवळपास पंचवीस-तीस प्रकाशकांनी नाकारली होती म्हणे ! ( पुढे तिने कथाविश्वात इतिहास घडवला).

तर अशी ही अस्वस्थ करणारी व मनात खळबळ उडवणारी ‘रेन’. उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि नैतिकता यांचा बुरखा अलगदपणे फाडून दाखवणारी. मॉम यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली. परिणामकारक शेवट हे तिचे मर्मस्थान. काही अभ्यासकांच्या मते शंभर वर्षानंतर आजही ही कथा ‘जुनी’ झालेली नाही; तिची ताकद टिकून आहे. त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यांमुळेच ती माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिली आहे. तीच मूळ दोन वाक्ये उद्धृत करून हा परिचय संपवतो :

She answered, “You men! You filthy, dirty pigs! You`re all the same, all of you. Pigs! Pigs!”
Dr. Macphail gasped. He understood.

...........................

1. ‘रेन’ येथे वाचता येईल : https://www.lonestar.edu/departments/english/maugham_rain.pdf
2. लेखातील प्रकाशचित्रे विकीमधून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिचय आवडला. पूर्वी ऐकले होते याबद्दल.

>>>१. डेव्हिडसन यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला ?>>
बहुतेक आत्महत्या वाटते.

माझ्याकडे पुस्तक आहे आणि तसेच ही दीर्घकथा मी वाचली आहे. आपले रसग्र हण उत्तमच.... त्या काळात देखील ही कथा ऑफबीट म्हणायला हवी

वरील सर्वांचे आभार !
* देखील ही कथा ऑफबीट म्हणायला हवी >>> अगदी !

** पुस्तक परिचय आवडला.
>>>
हा फक्त एका कथेचा परिचय आहे ! Bw

इंटरेस्टिंग !
पुन्हा एकदा हा लेख वाचणार.

ल-प्रि,
धन्यवाद.
तुम्ही जर मूळ कथा वाचली नसेल तर जरुर वाचा असे सुचवतो.

छान ओळख! लेख आवडला.
मूळ कथेची लिंक दिलीत हे बरे झाले. मूळ कथा वाचते आता

छान रसग्रहण! क्लासिक साहित्य हे कसं कालातीत असतं ते जाणवलं! आजच्या काळात एखाद्या वेबसिरीजचा एपिसोड होऊ शकतो या कथानकावर!

छान परिचय.
(फार साम्य नाही पण) पिंजरा ची आठवण आली.

वरील सर्वांचे आभार !

• जे वाचक मूळ कथा वेळ काढून वाचतील त्यांनी नंतर डेव्हिडसनची आत्महत्या का खून यावर मत द्यायला हरकत नाही ! चर्चा रोचक असेल.

वेबसिरीजचा एपिसोड >>> अगदी !

पिंजरा >>> हा चित्रपट पार विसरूनच गेलो होतो. मुळात तो 1905 च्या Professor Unrat या परदेशी कादंबरीवर आधारित आहे (इति विकिपीडिया )

असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते.
>>>
कालचा पुण्यातील पाऊस खरोखर भयानक होता. १२ किमी उंचीचा ढग... बाप रे ...
अनेक भागात वीज गायब झाली आहे....