विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :
१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! (https://www.maayboli.com/node/79138)
२. एका आईचा सूडाग्नी (https://www.maayboli.com/node/79258)
………………………………………………….
वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते. या लेखात चेकॉव्ह यांच्या एका कथेचा परिचय करून देत आहे.
सुरुवातीस थोडेसे लेखकाबद्दल.
डॉ. चेकॉव्ह हे मुळात एक वैद्यकीय व्यावसायिक होते. त्यांनी हा व्यवसाय आणि साहित्यलेखन अशा दुहेरी आघाडीवर काम केले - दोन्ही क्षेत्रात अगदी मन लावून. ते गमतीने म्हणायचे,
“वैद्यकी ही माझी बायको आहे, तर साहित्य हे माझ्या रखेलीसमान आहे !”.
त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कथा आणि नाटके लिहिली. त्यांच्या कथांची इंग्लिश भाषांतरेही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे इंग्लंडमध्येही त्यांना चांगली लोकप्रियता लाभली. काही वर्षांपूर्वी भारतीय दूरदर्शनवर ‘कथासागर’ सारख्या हिंदी कार्यक्रमात त्यांच्या रुपांतरीत कथा दाखविल्या होत्या. या नामवंत साहित्यिकाला जेमतेम ४४ वर्षांचे आयुष्य लाभले. क्षयरोगाने त्यांचा अकाली मृत्यू झाला.
आता त्यांच्या या कथेबद्दल.
ही १८८६ मध्ये प्रकाशित झालेली कथा आहे.
या कथेचे शीर्षक Misery असे असून त्याला पुढे असेही उपशीर्षक जोडलेले आहे :
"To whom shall I tell my grief?"
ही आयोना नावाच्या एका म्हाताऱ्या बग्गीचालकाची कथा आणि व्यथा आहे. तो गरीब असून पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतोय. बग्गीला एक छानशी घोडी जोडलेली आहे. नुकतीच त्याच्या घरी मोठी दुर्घटना घडली आहे. त्याचा तरुण मुलगा तापाच्या आजाराने मरण पावला आहे. त्यामुळे तो अगदी शोकाकुल आहे. परंतु हातावर पोट असल्याने त्याला रोज उठून त्याचा हा धंदा करणे भागच आहे.
असाच एके दिवशी आयोना धंद्याला बाहेर पडला आहे. खूप वेळ झाला तरी अजून गिऱ्हाईक काही मिळालेले नाही. त्यामुळे तो पेंगुळलाय. तेवढ्यात लांबून एक हाक ऐकू येते, “ओ, बग्गीवाले !” मग लष्करी पोशाखातील एक अधिकारी बग्गीत येऊन बसतो. ती चालू लागते. पण आज ती काहीशी रखडतच असते. त्यावर अधिकारी त्याच्यावर खेकसतो. बग्गी पुढे चालू लागते. आज आयोनाला अगदी भडभडून येतंय. त्याला त्याच्या अंतरीचे दुःख मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगावसं वाटतंय. तो हळूच मान मागे करून त्या अधिकाऱ्याकडे पाहतो. त्यावर तो गुरकावतो, “काय रे?”.
“काही नाही”, आयोनाला बोलायचेय पण कंठ फुटत नाही. शेवटी धीर करून तो म्हणतो,
“सर, काय सांगू, माझा तरणाताठा मुलगा वारला हो !” “कशाने ?”
“काय माहित, तापामुळे गेला असावा”
या संवादात गुरफटल्याने आयोनाचे घोडीवरील नियंत्रण कमी होते. ते पाहून अधिकारी पुन्हा खडसावतो,
“ ए गधड्या, नीट चालव. कुठे बघतोयस ?”
पुढच्या प्रवासात तर अधिकारी त्याचे ठिकाण येईपर्यंत डोळेच मिटून पडून राहतो. आयोनाला बोलायचे असूनही त्याचा नाईलाज होतो.
आयोनाचे पुढचे गिऱ्हाईक तीन तरुण असतात. ते कमी भाड्याच्या बोलीत त्याच्या गाडीत बसतात. ते बहकल्यासारखे वागत असतात आणि त्यांची भाषाही असभ्य असते. तेही त्या बिचार्याला एकीकडे दरडावत त्यांच्यात खिदळत असतात. जरा वेळाने तो हळूच त्याची दुःखद बातमी त्यांना चाचरत सांगतो. त्यावर त्यातला एक तरुण, “असं होय, आपण सगळे कधीतरी मरणारच असतो की”, अशी त्याची खिल्ली उडवतो. नंतर त्यांचे ठिकाण येते. आयोनाचे दुःख अजूनही मोकळे न होता त्याच्या मनातच राहते.
आता पुन्हा एकदा आयोना गिऱ्हाइकांची वाट पाहत एकटाच पडलाय. तो रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांकडे आशेने पाहतोय. या हजारो लोकांपैकी आपले दुःख ऐकून घ्यायला एकही जण का मिळू नये या विचाराने तो अधिकच दुःखी होतोय. तेवढ्यात त्याला एक हमाल दिसतो. हा तरी आपल्याशी सहानुभूतीने बोलेल अशा आशेने तो त्याच्याशी बोलायला जातो. पण तो हमाल त्याला कसनुसे बोलून कटवतो आणि पुन्हा निराशाच पदरी पडते. आता आयोना व्यथित मनाने घरी परतायचे ठरवतो. आज पुरेशी कमाई न करताच तो घरी येतो. घोडीला बाहेर सोडतो आणि मग शांतपणे विचार करत आतमध्ये लवंडतो. मनात त्याच्या गेलेल्या मुलासंबंधी त्रस्त करणारे विचार येत राहतात. मग मनाशी तो म्हणतो, “हे सगळे मला सविस्तर कोणाला तरी सांगायचंय, भडभडून बोलायचंय, तरच मला मोकळे वाटेल. माझे बोलणे ऐकायला जर एखादी स्त्री मिळाली तर किती बरे होईल !”
त्याला एकदम घोडीची आठवण येते आणि तो बाहेर तबेल्यात येतो. ती बिचारी शांतपणे गवत खात असते. आता तो तिच्याशीच बोलू लागतो,
“काय ग, गवत खातेस ना, खा भरपूर. आज आपल्याला ओट्स आणण्याइतके पैसे नाही मिळाले. काय करू, आता मी आता म्हातारा झालो बघ. खरेतर माझ्या जागी माझ्या मुलानेच ही बग्गी चालवायला हवी होती. त्याने खूप छान चालवली असती. आता हे बघ, माझ्याप्रमाणेच तुलाही जर एक शिंगरू असते आणि अचानक ते मरण पावले असते, तर तुला पण किती दुःख झाले असते. नाही का ? खूप अवघड असते बघ असा अपत्यमृत्यू सहन करणे”.

असं बोलून तो तिच्याकडे बघतो. घोडी गवत खाताखाता त्याच्या हातावर हळूवार श्वास सोडते. आयोनाला आता अगदी मोकळे व शांत वाटते. मग तो त्याच्या मुलाची अथपासून इतिपर्यंत सर्व कथा तिला सांगत राहतो.
विवेचन
कथा साध्यासोप्या भाषेत असून ती निवेदन पद्धतीने पुढे सरकते. अधूनमधून काव्यमय भाषेत काही वर्णने येतात. कथेचा पूर्वार्ध म्हाताऱ्याच्या व्यक्तिगत दुःखाभोवती (grief) केंद्रित आहे. ते खरे तर मोकळे व्हायची गरज आहे. परंतु तशी संधीच न मिळाल्याने ते साचत जाते. कथेच्या उत्तरार्धात ती दुःखाची भावना मनोवेदनेपर्यंत (misery) पोचते. या वेदनेवर उपाय असतो तो म्हणजे साचलेले बोलून मोकळे करणे. परंतु ते घडण्यासाठी दखल घेणारा कनवाळू श्रोताच मिळत नाही. शेवटी पुरता निराश होऊन म्हातारा घोडीजवळच आपले दुःख मोकळे करतो. माणसांच्या आत्मकेंद्रित आणि भावनाहीन प्रवृत्तींवर कथेत चांगला प्रकाश टाकलेला आहे. शोकमग्न असलेल्या म्हाताऱ्या चालकाशी देखील त्याची गिर्हाईके ज्या तुसडेपणाने वागतात ते पाहून म्हाताऱ्याचे दुःख वाचकांपर्यंत पोचते.
मानवी संवादांची गरज अधोरेखित करणारी अशी ही कथा आहे. कथेतील घटनांपेक्षाही त्यातील मुख्य पात्राच्या मनातील खळबळ व्यक्त करण्यावर लेखकाने अधिक भर दिलेला आहे.
…………………………………………………………………………………..
चित्र विकीतून साभार !
सुरेख आहे कथा... माणसाला
सुरेख आहे कथा... माणसाला कोणाशी तरी मोकळं होऊन बोलण्याची गरज असते हे अधोरेखित करणारी...
Chekhov हे उत्तम नाटककार
Chekhov हे उत्तम नाटककार होते. नाटकातील कथेसंदर्भात त्यांनी एक मूलभूत तत्व सांगितले होते जे पुढे Chekhov’s gun या नावाने प्रसिद्ध झाले आणि तो एक प्रकारे लघुवाक्प्रचार झाला.
त्याचा अर्थ असा आहे :
जर नाटकात पहिल्या अंकात भिंतीवर लटकलेली बंदूक दाखवली असेल तर नाटकाच्या उत्तरार्धात त्या बंदुकीचा वापर झालेला दाखवलाच पाहिजे. असे न केल्यास प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होतो.
म्हणजेच, कथानकात ज्या ज्या गोष्टींचा (elements) सुरुवातीस परिचय करून दिला जातो त्या प्रत्येक गोष्टीला कथेच्या ओघात पुढे महत्त्व असलेच पाहिजे.
सुंदर कथेचा सुंदर परिचय.
सुंदर कथेचा सुंदर परिचय.
प्रतिसाद पण छान.
सुंदर कथेचा सुंदर परिचय.
सुंदर कथेचा सुंदर परिचय.
प्रतिसाद पण छान.
बंदुकीचा वापर झालेला दाखवलाच
बंदुकीचा वापर झालेला दाखवलाच पाहिजे. >> भिंतीवर बंदुकीऐवजी फोटोफ्रेम, घड्याळ किंवा कॅलेंडर असेल तर?
आज 15 जुलै, Anton Chekhov
आज 15 जुलै, Anton Chekhov यांचा स्मृतिदिन.
त्यांच्या 'Ward No 6' या लघुकादंबरीचा वेधक परिचय वाचला. https://thewire.in/books/anton-chekhovs-ward-no-6-is-a-dystopian-nightmare
त्या काळी रशियातील कैद्यांसाठी असलेल्या एका रुग्णालयात रुग्णाना ज्या काही नरकयातना भोगाव्या लागत होत्या त्या अनुभवावर आधारित हे पुस्तक.
हे पुस्तक वाचताना कुठल्याही सहृदय वाचकाचे मन पिळवटले जाते. या पुस्तकाच्या वाचनातूनच लेनिनना क्रांतिकारक होण्याची प्रेरणा मिळाली होती.
मी ह्या काही दिवसांपूर्वी
मी काही दिवसांपूर्वी असेच वाचून कादंबरी न वाचायचे ठरवले. नोंद केली व काढून टाकली.
लेनिनने घेतलेली प्रेरणा मात्र इंटरेस्टिंग माहिती आहे.
छान परिचय व कथा. धन्यवाद.
छान परिचय व कथा. धन्यवाद.
लघुकथा हा खूपच आवडीचा साहित्यप्रकार !
Pages