नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

Submitted by जिज्ञासा on 20 June, 2021 - 23:19

पहिल्या दोन भागांत आपण पृथ्वीवरील इकॉलॉजीची अगदी थोडक्यात ओळख करून घेतली. या वेळी गप्पांचा विषय आहे भारताचा भूगोल आणि त्यातील महत्वाच्या परिसंस्था असलेले प्रदेश (ecological regions) आणि जैवभौगोलिक (biogeographic regions) प्रदेशांची ओळख.

जिज्ञासा: भारत आणि निसर्ग असं म्हटलं की आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे विविधता! वसंत बापटांच्या शब्दांत सांगायचं तर
काश्मिरापासून विहंगम सिंधू संगमा जावा
नेत्रांपुढती शत चित्रांचा सुंदर साज सजावा!
कधी पर्वतराजी विशाला कधी अफाट हिरवी राने
कधी झुळझुळत्या गिरीबाला कधी रेतींची मैदाने!
असा भौगोलिक विविधतेने समृद्ध भारत देश आहे. तर इकॉलॉजीच्या दृष्टीने या अशा वैविध्यपूर्ण भारतीय उपखंडाची कोणती वैशिष्ट्ये सांगशील?
केतकी: अर्थात विविधता हा आपला USP आहे! भारत हा जगातल्या mega diversity nations पैकी एक आहे. कारण आपल्याकडे जगाच्या एकूण भूप्रदेशाच्या २% भूप्रदेश आहे आणि त्यात जगातली ८% जैवविविधता आहे. जगातले तीन जैवविविधतेचे हॉटस्पॉट आपल्या एका देशात आहेत - पश्चिम घाट, पूर्व घाट, आणि ईशान्य भारत. आता ही जैवविविधता कशामुळे निर्माण होते तर त्यात अनेक घटक येतात - सर्वात प्रमुख म्हणजे कवितेत वर्णन केलेली भौगोलिक विविधता - landscape diversity. त्यात मग आपल्याकडे पर्वतरांगा, दऱ्या, वाळवंट, नद्यांची खोरी, डेक्कन ट्रॅप, मोठा समुद्र किनारा इतकी विविधता आहे. त्यातही वेगवेगळ्या उपसागर, सागर, आणि महासागरांच्या किनारी आपण आहोत. शिवाय बेटं आहेत, उत्तरेकडे हिमालयासारखा अत्यंत नवीन, उंच शिखरं असलेला नगाधिराज आहे. भारतात एकूण ११ प्रमुख जैव भौगोलिक प्रदेश (biogeographic zones) आहेत. याविषयी गुगल वर माहिती मिळेलच पण या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याकडे इतकी प्रचंड जैवविविधता आहे. आणि मग अर्थातच त्यामुळे आपल्याकडच्या वेशभूषा, आहारविहार, आचार, सण सगळ्यात विविधता आली आहे. हेच भारतीय उपखंडाचं मुख्य वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.

जिज्ञासा: आपला भारत देश पृथ्वीच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात मध्ये येतो? आणि भारतात कोणकोणते प्रमुख ecological regions आढळतात?
केतकी: जर आपण जगाच्या नकाशात भारताचं स्थान पाहिलं तर आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला म्हणजे उत्तर गोलार्धात येतो. कर्कवृत्त जे २३.५ अंशांवर आहे ते भारतातून जातं - साधारण राजस्थान ते मिझोराम असं. या वृत्ताच्या खालचा प्रदेश हा tropical region तर वरचा प्रदेश हा subtropical region म्हणून ओळखला जातो. आता यात हिमालयाच्या उंचीमुळे तिथल्या काही भागात समशीतोष्ण (Temperate region) हवामान आढळते पण तो भाग अत्यंत थोडा आहे. या खालच्या नकाशात आपल्याला ते दिसून येईल.
नकाशा क्र. १ (By KVDP - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=27385077 )
1280px-World_map_indicating_tropics_and_subtropics.png

आपण जे आधीच्या भागात मुख्य बायोम बघितले, त्यातला भारतात प्रामुख्याने आढळणारा बायोम म्हणजे जंगल आणि जंगलांचे विविध प्रकार. आता जर आपण अगदी सखोल अभ्यास केला तर भारतात जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक झाडीचे प्रकार नोंदवलेले आहेत.
पण आपण अगदी ढोबळमानाने आणि लक्षात राहायला सोप्या पद्धतीने विभाजन करायचं म्हटलं तर पर्जन्यमानानुसार करता येईल. कारण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर तिथल्या झाडीचं स्वरूप ठरतं आणि त्या अनुसार मग पुढे तिथलं प्राणिजीवन देखील ठरतं. तर या प्रमाणे आपल्याला भारतात ५ प्रकारचे प्रदेश दिसतात. ह्या सोबतच्या नकाशामध्ये आपल्याला भारताच्या विविध भागात किती पाऊस पडतो हे कळून येईल. आता हे आपण वार्षिक सरासरी पर्जन्यमान (average annual rainfall) बघतो आहोत.

नकाशा क्र. २ (w:user:Planemad, CC BY-SA 3.0 , via Wikimedia Commons https://commons.wikimedia.org/wiki/File:India_annual_rainfall_map_en.svg)
906px-India_annual_rainfall_map_en.svg_.png५००० मिमी आणि त्याहून जास्त पावसाचे प्रदेश: हे म्हणजे सगळ्यात गडद निळे प्रदेश - दक्षिण पश्चिम घाट, ईशान्य भारत, हिमालयाचे काही भाग, आणि सर्व बेटं इथे भारतातला सर्वाधिक पाऊस पडतो. आता अशा प्रदेशात सदाहरित वर्षावनं (tropical rain forests) तयार झालेली दिसतात. पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस पडतो. या वनांतली जमीन हे नेहमी ओलसर असते कारण इथे जवळपास सर्व महिने थोडा तरी पाऊस असतो. इथली झाडे अतिशयच उंच म्हणजे जवळपास ४० मीटर पर्यंत वाढतात. Dipterocarpus या जातीची झाडे या जंगलात मोठ्या प्रमाणात आहेत. इथे वर्षभर जवळपास सम तपमान (२५-२६ अंश सेल्सिअस) असते. जरी आपल्याकडे वेगवेगळे ऋतू असले तरी या जंगलांत मात्र वर्षभर एकसारखं हवामान असतं. या वनांमधला इंडिकेटर प्राणी म्हणजे जळवा! म्हणजे जिथे उत्तम जंगल असेल तिथे या जळवा बऱ्यापैकी प्रमाणात आढळतात. याशिवाय उभयचर प्राणी जसे बेडूक आणि सरपटणारे प्राणी सापांच्या विविध जाती इथे मोठ्या प्रमाणात असतात. यातील अनेक जाती या प्रदेशनिष्ठ (endemic) असतात. ह्या ठिकाणी विपुल जैवविविधता आढळते. आता आपण बघायला गेलो तर भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या खूप कमी टक्के (८%) भागावर ही सदाहरित वर्षावनं आहेत त्यामुळे ती जपणं फार आवश्यक आहे.

३००० ते ५००० मिमी पावसाचे प्रदेश: आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काही रेषा आखून पाडलेले भाग नाहीत. या पाऊसमानाच्या सीमारेषेवरची जंगलं ही मिश्र स्वरूपाची असतात. या प्रदेशात आपल्याला evergreen (सदाहरित) आणि semi-evergreen (निम्न-सदाहरित) प्रकारची जंगलं दिसतात. आता हा भाग म्हणजे आपला पश्चिम घाटाचा प्रदेश - सह्याद्रीच्या कड्यावरून खाली कोकणात जाताना एक semi-evergreen जंगलाचा पट्टा लागतो आणि यातच जे खूप उंचीवरती जे सुरक्षित भाग आहेत तिथे सदाहरित (evergreen) जंगल दिसतं, ही बहुतेक सदाहरित जंगलं देवरायांच्या रूपात उरली आहेत. यात झाडांच्या हिरडा, अंजनी, आंबा , जांभूळ अशा जाती सहज आढळतात तर इतर रान जायफळ, फणसडा, गारंबी, इत्यादी वैशिठ्यपूर्ण जाती देखील कुठेतरी कानाकोपऱ्यात आढळतात. त्यांचा अधिवास तसा दुर्मिळ आहे.

१००० ते ३००० मिमी पावसाचे प्रदेश: हा म्हणजे कोकणात जेवढा पाऊस पडतो तेवढ्या पावसाचा प्रदेश. इथे प्रामुख्याने आर्द्र पानगळी (moist deciduous) प्रकारचं जंगल दिसून येतं. या झाडांची उन्हाळ्यात पानगळ होते. ही जंगले पश्चिम घाटाचा काही भाग, शिवालिक रेंजच्या भागात तराईचा भाग, मिझोराम, मणिपूर, मध्यप्रदेशचा पूर्वभाग, छत्तीसगढ, छोटा नागपूर पठार, ओडिशाचा काही भाग, प. बंगालचा भाग इथे दिसते. म्हणजे जवळपास ३७% भागावर हे जंगल आहे. या ठिकाणी आपल्याला Terminalia genus ची झाडं दिसतात - म्हणजे ऐन, हिरडा, बेहडा, किंजळ ही झाडे. या जंगलात भरपूर सस्तन प्राणी दिसतात हरणं, वाघ वगैरे.

५०० ते १००० मिमी पावसाचे प्रदेश: या प्रदेशात आपल्याला शुष्क पानगळी जंगल (dry deciduous) आढळून येते. हे भारतात भरपूर भागांत दिसतं. संपूर्ण मध्य भारत जो डेक्कन पठाराचा भाग आहे - कान्हा, ताडोबा यासारख्या अभयारण्यात मुख्यत्वे हे जंगल आहे. आता या जंगलाचा राजा कोण तर वाघ! याच बरोबरीने इतर सस्तन प्राणी देखील इथे मोठ्या प्रमाणात दिसतात. बऱ्याच ठिकाणी या जंगलांचं degradation होऊन thorny forests ही तयार झाली आहेत. या जंगलांत आपल्याला बरेचदा एकाच प्रकारची झाडं दिसतात - म्हणजे उत्तरेच्या जंगलात प्रामुख्याने साल वृक्ष आणि दक्षिणेकडच्या जंगलात सागाची झाडे बहुसंख्य दिसतात. यामागे लाकडांसाठी ब्रिटिशांनी केलेली लागवड हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे इथल्या जंगलातली आधीची जैवविविधता आता फारशी दिसत नाही. तरी आपण जर कोणत्याही प्रदेशातल्या संरक्षित वनक्षेत्रात (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान) गेलो तर तिथली मूळ जैवविविधता बऱ्यापैकी टिकलेली दिसते. त्यात मग धावडा, अंजन, मोई, सालई, पळस, भिरा इत्यादी वृक्ष आढळतात.

५०० मिमी पेक्षा कमी पावसाचे प्रदेश: आता इतका कमी पाऊस पडतो तेव्हा झाडीचा प्रकार बदलतो - यात मुख्यत्वे thorny scrub forests दिसतात. यात भरपूर उपप्रकार दिसतात - वाळवंट, arid, semi-arid इत्यादी. इथे सवाना (savannah) प्रकारचे गवताळ प्रदेश दिसतात. मध्य महाराष्ट्र - खानदेश, मराठवाडा, विदर्भाचा पश्चिम भाग यातल्या काही ठिकाणी जिथे खूप कमी पाऊस पडतो तिथे ही झाडी दिसते. सवाना म्हणजे असे प्रदेश जिथे गवतं मोठ्या प्रमाणात असतात पण त्याच्या बरोबरीने कमी प्रमाणात woody trees/woody shrubs पण विखुरलेली दिसतात. जंगलात सापडणारी झाडांची दाट सावली या ठिकाणी असत नाही. पण विखुरलेले वृक्ष आणि झुडपं नक्की असतात. पण वर्षानुवर्षे गुरे चारणे, आगी/वणवे या सगळ्यांमुळे आता केवळ गवतच उरलेलं दिसतं. म्हणजे यातल्या woody species जवळपास नाहीश्या झाल्या आहेत. आणि चांगली सकस गवते जाऊन केवळ निकृष्ट गवते शिल्लक राहिली आहेत.

आता आपण काही विशेष प्रकारच्या परिसंस्था पाहू. त्यातला अत्यंत महत्त्वाचा एक प्रकार म्हणजे खारफुटीची जंगलं - जिथे नदी समुद्राला मिळते अशा खाडीच्या भागात अथवा त्रिभुज प्रदेशात ही जंगलं दिसतात. भारताच्या दोन्ही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर ही परिसंस्था दिसते. इकॉलॉजीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे (स्पेशल) असे हे भाग आहेत. आपल्याकडे कोकणात, मुंबई ठाणे भागात खाडीच्या ठिकाणी ही जंगलं मोठ्या प्रमाणावर होती. आजही थोडीफार आहेत. शिवाय गंगा ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात ही जंगलं आहेत, उदाहरणार्थ, सुंदरबन अभयारण्य. या विषयी अधिक माहिती पुढच्या भागांत येईलच.
दुसरा एक विशेष भाग म्हणजे temperate किंवा conifer forests - ही हिमालयात काही भागांत आढळतात यात सूचिपर्णी आणि broad leaves अशी दोन्ही प्रकारची झाडी दिसते. मग आपण हिमालयात जसे वरती जाऊ तशी treeline दिसते. या treeline च्या वर वृक्ष दिसत नाहीत. या treeline च्या वरच्या प्रदेशात आपल्याला खरे गवताळ प्रदेश - ज्यात गवतं आणि थोडी shrubs असतात ते दिसतात.याला alpine/subalpine meadows म्हणतात. आता खारफुटी वगळता या सगळ्या जमिनीवरच्या परिसंस्था झाल्या. त्याशिवाय नद्या, तळी, समुद्र अशा विविध जल परिसंस्था भारतात सापडतात. त्यांची आपण नंतरच्या भागात सविस्तर ओळख करून घेऊच. त्यामुळे मी आत्ता इथे खूप तपशिलात जात नाही.

जिज्ञासा: इतक्या प्रकारची जंगलं आपल्याकडे आहेत म्हणजे आपण सगळे जंगलातच राहतो असं म्हटलं पाहिजे खरंतर! आता जगात अनेक ठिकाणी वर्षभर थोडा थोडा पाऊस पडत असतो. पण आपल्या भारतात मात्र मान्सूनमुळे पावसाळा हा एक वेगळा ऋतू आहे तर त्यामुळे आपल्याकडच्या परिसंस्थांमध्ये काही वैशिष्ट्ये आढळतात का?
केतकी: आता मान्सूनचा सगळ्यात दृश्य परिणाम हा भारतातल्या शेतीवर होत असतो. जरी काही टक्के जमीन सिंचनाखाली असली तरी आजही भारतात बहुतांश शेती ही पावसाळी पाण्यावर होते. शेतीवर आपली ६०% जनता थेट किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे आणि भारताचा जवळपास १६% जीडीपी शेतीतून पर्यायाने मान्सूनमधून येतो. तेव्हा मान्सून आपल्यासाठी अगदी महत्त्वाचा! आता इकॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं तर मान्सून हा वैश्विक घटकांवर अवलंबून असतो. अत्यंत क्लिष्ट अशी मॉडेल्स मान्सूनच्या अंदाजासाठी वापरली जातात. याचाच अर्थ असा की जर आपण मान्सूनवर इतके अवलंबून आहोत आणि मान्सून हा इतर जगात घडणाऱ्या वातावरणातील बदलांवर अवलंबून आहे तर मग जगात कुठेही जर हवामानात काही बरे वाईट बदल घडत असतील तर त्यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम भारतीयांना भोगायला लागणार आहे. म्हणजे ऍमेझॉनच्या जंगलतोडीशी किंवा ध्रुवांवरच्या वितळणाऱ्या बर्फाच्या थराशी आपला काही संबंध नाही असं आपण समजू नये. या बदलांनी विविध महासागरातील उष्ण व शीतप्रवाहांमध्ये बदल होऊन त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांवर पाणीकपातीची वेळ येऊ शकते! त्यामुळे ज्या काही global cycles आहेत त्या स्थिर राहण्यात भारतीयांचा फायदा आहे. आणि जर आपण सजगपणे पाहत असू तर गेल्या काही वर्षांत मान्सून किती बेभावशाचा झाला आहे हे आपण अनुभवतो आहोतच.
मान्सूनचा अजून एक पटकन न कळून येणारा परिणाम म्हणजे मान्सूनमुळे भारतात प्रामुख्याने वृक्ष किंवा जंगलं वाढायला मदत होते. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की भारतातला मुख्य बायोम जंगल हा आहे. तर मान्सूनमुळे काय होतं तर झाडांच्या woody growth ला चालना मिळते. ती कशी ते पाहू. जर तुम्हाला वर्षभर पाणी मिळणार नसेल आणि काही ठराविक महिनेच पाणी मिळणार असेल तर ते पाणी साठवून ठेवले पाहिजे. मग झाडे ते आपल्या बुंध्यांमध्ये साठवतात. यातून woody अशा झाडांच्या म्हणजेच वृक्षांच्या वाढीला अनुकूल अशी स्थिती तयार होते. अशा परिस्थितीत herbal/ seasonal वाढ फारशी घडून येऊ शकत नाही. इतर अनेक देशांमध्ये वर्षभर थोडा थोडा पाऊस पडतो - जवळपास ६ किंवा ८ महिने. तिथे जमीन ओलसर राहते आणि गवतांच्या वाढीसाठी पोषक होते. जिथे वर्षभर खूप जास्ती पडतो तिथे अर्थातच वर्षावनांची निर्मिती होते. पण भारतात मान्सूनमुळे (आणि बाकीचे अजैविक घटक अनुकूल असतील तर) बहुतेक ठिकाणी पानगळीचे ‘वृक्ष’ ” दिसतात. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात. इतर वेळी विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ही झाडे आपली पानं गाळून टाकतात. म्हणजे भारतात ही अशी जंगलं का आहेत याचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे पडणारा मान्सूनचा पाऊस.

जिज्ञासा: मान्सून आणि जंगलांचा असा संबंध या आधी लक्षातच आला नव्हता! आता मान्सून नंतर भारत ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो ती गोष्ट म्हणजे नगाधिराज हिमालय! तर भारताच्या इकॉलॉजीच्या दृष्टीने हिमालयाचे महत्त्व काय आहे?
केतकी: हिमालय ही पर्वतरांग, जिचा बराचसा भाग भारतात येतो, पृथ्वीच्या उत्पत्तीचा काळ पाहिला तर त्यामानाने खूप नवीन आहे. भारतासाठी भौगोलिकदृष्ट्या हिमालयाचे स्थान अत्यंत कळीचे आहे. म्हणजे हिमालयातील उंच शिखरांमुळे एकीकडे उत्तरेला सायबेरियातून किंवा एकूणच उत्तर आशिया खंडातून येणारे थंड वारे थोपवले जातात. तर दुसरीकडे आपल्यासाठी जीवनदायी असा नैऋत्य मौसमी पाऊस आणणारे मान्सूनचे वारे अडवले जातात. त्यामुळे भारतीय उपखंडाला पावसाचा संपूर्ण लाभ मिळतो. म्हणजे जर हिमालय नसता तर भारताची इकॉलॉजी ही फार वेगळी दिसली असती हे निश्चित!
अर्थात नवीन असल्याने हिमालयातील बरेच भाग हे physically fragile आहेत. अशा संवेदनशील भागाचे रक्षण करणे, तेथील topography, इकॉलॉजी राखणे हे अत्यंत क्रिटिकल आहे. याची practical कारणे सांगायची तर हिमालयात खूप मोठ्या प्रमाणात खनिजांचे साठे आहेत, संपूर्ण भारताला अनेक औषधी वनस्पतींचा पुरवठा हिमालयातून होतो. जशी पश्चिम घाट आणि पूर्व घाटात उपखंडातील नद्यांची उगमस्थाने आहेत तशाच उत्तर भारतातल्या काही प्रमुख नद्यांचे उगमस्थान हिमालयात आहे. गंगा आणि ब्रम्हपुत्रेच्या पाण्यावर भारतातली मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. हिमालयाच्या प्रदेशात राहणारे लोक तर याच पाण्यावर जगतात. तेव्हा हिमालयाच्या इकॉलॉजीचे संरक्षण या अशा अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरते.
हिमालयातील बर्फाचे प्रमाण हे दोन्ही ध्रुवांच्या खालोखाल आहे त्यामुळे त्याला तिसरा ध्रुव असेही संबोधले जाते. गेल्या काही वर्षांत हवामानबदल आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे हिमालयातील इकॉलॉजी धोक्यात आली आहे. उत्तरांचलमधल्या पुराच्या वाढत्या घटना,हिमनद्यांची मागे सरकणारी मुखं यावरून आपल्याला या धोक्यांची कल्पना येते. तेव्हा यापुढे हिमालयातील मानवी हस्तक्षेप कमी करणे ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे.

जिज्ञासा: आता पुन्हा जरा विकी स्वरूपाचे प्रश्न! इकॉलॉजीच्या दृष्टीने भारतातील कोणत्याही दोन/तीन वैशिष्टय़पूर्ण जागा सांगशील का?
केतकी: खरंतर खूप जागा आहेत. सुरुवात आपण जंगलांपासून करूया! आपण ज्या सदाहरित वर्षावनांविषयी आधी बोललो तसे जंगल असणारी जागा म्हणजे अगुंबे, जे कर्नाटकात आहे. दक्षिण पश्चिम घाटातील इतरही काही जंगलं अशीच पाहण्यासारखी आहेत - उदाहरणार्थ, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. दुसरी जागा म्हणजे लडाखमधलं सोमोरिरी लेक (Tsomoriri Lake). आपल्याकडे दिसणाऱ्या अनेक स्थलांतर करणारे पक्षी या तळ्यात breeding साठी येतात. आता लडाख हा एक विशेष बायोम आहे कारण ते एक शीत वाळवंट आहे. जगात फार कमी ठिकाणी शीत वाळवंट आहेत. आता या ठिकाणी आपल्याला झाडी फारशी आढळत नाही. त्यामुळे इथे खूप जास्ती प्राणीजीवन नसलं तरी snow leopard हा अत्यंत elusive, पटकन न दिसणारा असा प्राणी, Ibex मेंढया, जंगली गाढव असे इथले काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत.
जर तुम्ही लडाखला गेला असाल तर तुम्हाला प्रवासात तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे दगडांचे प्रकार (rock compositions/sediments) दिसले असतील आणि दर दोन तीन दऱ्या पुढे गेलं की ते बदलत राहतात. ही पण एक लडाखमधली बघण्यासारखी गोष्ट आहे. आपण आधीच्या भागात म्हणालो तसं सर्व जागी घनदाट जंगल असणे म्हणजे निसर्ग संवर्धन नाही. आता लडाखसारख्या शीत वाळवंटात मोठ्या प्रमाणावर वनीकरण होणे हे इकॉलॉजीच्या दृष्टीने योग्य नाही कारण ते नैसर्गिक नाही.
तिसरी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे रण ऑफ कच्छ - ही मार्श प्रकारची पाणथळ जागा आहे. आपण पाणथळ जागांविषयी पुढच्या एखाद्या भागात बोलूच. मार्श म्हणजे एक मोकळ्या जागेवरचा, उथळ खाऱ्या पाण्याचा प्रदेश जिथे रीड्स म्हणजे एका प्रकारची गवतं जास्ती दिसतात. आता या ठिकाणी वर्षभर उथळ पाणी असल्याने भरपूर शैवाल (algae), zooplanktons, त्यांना खाणारे कीटक वाढतात. या अन्नाच्या मुबलकतेमुळे ह्या जागी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत पक्षी येतात. त्यामुळे ही पक्षी निरीक्षकांची आवडती जागा आहे.

जिज्ञासा: भारतात बायोडायव्हर्सिटी किंवा इकॉलॉजी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था कोणत्या?
केतकी: काही मला पटकन आठवलेल्या संस्था सांगते. ही यादी काही exhaustive नाही. डेहराडूनमध्ये Forest Research Institute, Wildlife Institute of India या दोन आणि आणखी काही संस्था आहेत ज्या forest research मध्ये काम करतात. शिवाय WWF-India आहे. दक्षिणेत Indian Institute of Sciences आणि Ashoka Trust for Research in Ecology and the Environment (ATREE) या दोन संस्था बंगळुरू मध्ये आहेत. Indian Institute of Science Education and Research (IISER) च्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्येही इकॉलॉजी विषयात संशोधन/अभ्यास चालू असते.

जिज्ञासा: या विषयावरची भारताच्या संदर्भातली माहिती देणारी कोणती पुस्तकं, आर्टिकल्स, फिल्म्स, डॉक्युमेंटरीज सुचवशील?
केतकी: आपण जे झाडीचे अनेक प्रकार बघितले त्याविषयी सखोल माहिती देणारं Revised Survey Of The Forest Types Of India हे Champion आणि Seth यांचं पुस्तक एक अतिशय उत्तम reference book आहे. या अशा विषयांची प्राथमिक माहिती मिळवायची असेल तर मी बरेचदा लोकांना पाठ्यपुस्तकं बघायला सांगते. शाळा कॉलेजमध्ये आपण ती केवळ परीक्षार्थी म्हणून वाचतो. पण आता ती वाचताना अधिक चांगली समजू शकतात. त्यात एक Ecology and Environment नावाचं P. D. Sharma यांचं पुस्तक चांगलं आहे. प्रणय लाल यांचं Indica: A deep natural history of the Indian subcontinent हे एक अत्यंत सुरेख, भरपूर चित्रे असलेलं उत्तम popular science प्रकारातलं पुस्तक मी जरूर सुचवेन. याशिवाय Man and Environment: The Ecological History of India by Irfan Habib आणि This Fissured Land: An Ecological History of India by Madhav Gadgil and Ramachandra Guha ही दोन्ही पुस्तके माहितीपूर्ण आहेत.
या शिवाय काही वेबसाईट्स आहेत जिथून आपल्याला काही विशिष्ट प्राणी अथवा वनस्पतींविषयी माहिती मिळू शकते किंवा नोंदवता येते. या वेबसाईट्स आपण आवर्जून वापराव्यात.
१. India Biodiversity Portal (https://indiabiodiversity.org/)
२. eBird India (https://ebird.org/india/home )
३. I found butterflies (https://www.ifoundbutterflies.org/website-team%20old%20old)

जिज्ञासा: मी जेव्हा या विषयी इंटरनेटवर शोधत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की हा म्हणजे भारताचं पर्यावरण MPSC/UPSC परीक्षांसाठी एक विषय असतो. त्यामुळे या विषयावरचे बरेच व्हिडीओ युट्युब वर आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगशील?
केतकी: तसे व्हिडीओ बघायला हरकत नाही पण कधी कधी त्यात चुका असू शकतात. ती शक्यता वगळता पटकन आणि सोप्या पद्धतीने भारतातले forest types, इतर परिसंस्था, भौगोलिक वैशिष्ट्ये याबद्दल एक बेसिक माहिती या व्हिडीओज मधून मिळू शकते.

जिज्ञासा: हा आजचा भाग आपण इथे संपवू. भारतीय उपखंडाची नैसर्गिक श्रीमंती बघता आजचा हा भाग हा केवळ झलक किंवा तोंडओळख असाच आहे. आजचा भाग वाचून आपल्यापैकी अनेकांना पुन्हा एकदा शाळेतली भूगोलाची पुस्तके उघडून बघावीशी वाटतील असं वाटतं. तसं वाटलं तर नक्की बघा! पुस्तके, लेख, फिल्म, किंवा डॉक्युमेंटरीज यांच्या यादीत ही जरूर भर घाला. या मालिकेचा पुढचा भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होईल.

पुढील भागाची लिंक:
भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

आधीच्या भागांच्या लिंक्स
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जे आधीच्या भागात मुख्य बायोम बघितले, त्यातला भारतात प्रामुख्याने आढळणारा बायोम म्हणजे जंगल आणि जंगलांचे विविध प्रकार. आता जर आपण अगदी सखोल अभ्यास केला तर भारतात जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक झाडीचे प्रकार नोंदवलेले आहेत. >>>

ह्यातला झाडींचे प्रकार म्हणजेच काय? सदाहरित, पानगळीचे वगैरे का
ह्याची यादी वाचायला आवडेल.

धन्यवाद मनिम्याऊ, हर्पेन, मंजूताई!
हर्पेन, झाडी म्हणजे vegetation या अर्थाने. पण मी केतकीला विचारून याबद्दल थोडं अधिक सविस्तर लिहिते.

जिज्ञासा, खूप मस्त माहिती. आपल्या इकॉलॉजि च्या क्लास मध्ये हे सर्व सांगितले होते पण सगळे वाचले आणि परत रिफ्रेश झाले.

धन्यवाद साद आणि वावे!
हर्पेन, हो, हा नाते निसर्गाशी मालिकेचा तिसरा भाग आहे पण या मालिकेतले बरेचसे भाग हे तसे स्वतंत्र आहेत त्यामुळे मालिका शीर्षक आणि भागाचे नाव असे देतेय. पृथ्वीविषयी गप्पांचे दोन भाग झाले. म्हणून त्यांना १, २ असे क्रमांक दिले. प्रत्येक भागाच्या शेवटी आधीच्या भागांच्या लिंक्स देईन म्हणजे शोधायला सोपे जाईल.
हेमंत, येस आपण शिकलो तेच आहे बरंचसं Happy So glad to see you here!

ह्यातला झाडींचे प्रकार म्हणजेच काय? सदाहरित, पानगळीचे वगैरे का
ह्याची यादी वाचायला आवडेल. >>
हर्पेन, तुमच्या या प्रश्नाचे केतकीने दिलेले उत्तर Happy
केतकी: याची यादी बरीच मोठी आहे. Champion आणि Seth यांच्या Revised Survey Of The Forest Types Of India या पुस्तकात सर्व प्रकार विस्ताराने दिले आहेत.
पण हे झाडीचे प्रकार कसे पडतात हे थोडक्यात सांगायचे तर आपण सह्याद्रीचं उदाहरण घेऊया. सह्याद्रीत आपल्याकडे सदाहरित आणि निम्न सदाहरित हे दोन मुख्य जंगलांचे (झाडीचे) प्रकार दिसतात. सदाहरित म्हणजे ज्यांना साधारण वर्षभर हिरवी पाने असतात अशा जाती. आता मग सदाहरित मध्ये पण वेगवेगळे प्रकार दिसतात - म्हणजे सह्याद्रीच्या अगदी घाटमाथ्यावर (crestline वर) म्हणजे महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जिथे ५ ते ७ हजार मिमी एवढा पाऊस पडतो इथली जी सदाहरित जंगलं आहेत त्यात रानजायफ़ळ किंवा फणसाडा अशा specialist जाती दिसतात. किंवा सातवीण, आंबा, जांभूळ अशी खूप मोठ्या घेराची वर्षभर हिरवी राहणारी झाडं आहेत. सदाहरित प्रकारचं दुसरं जंगल आपल्याला नदीच्या काठाने दिसतं - तिथल्या जाती थोड्या वेगळ्या असतात उदाहरणार्थ जांभूळ, उंबर. किंवा तिसरा प्रकार म्हणजे सदाहरित scrub किंवा झुडूपी जंगल. यात मग करवंदाच्या जाळ्या ज्या सदाहरित असतात येतात. करवंद यात बरेचदा डॉमिनंट असते पण तिच्या बरोबरीने काही पानगळी झाडं असू शकतात. मधूनमधून आळू, कोंबळ सारखी दुसरी सदाहरित झाडं पण असू शकतात. हे सगळे सदाहरित झाडीचेच वेगवेगळे प्रकार झाले.
आता सह्याद्रीत जे आपल्याला निम्न सदाहरित जंगल दिसतं त्यात पुन्हा दरीत (valley) आणि घाटमाथ्यावर वेगळं वेगळं जंगल दिसतं. म्हणजे महाबळेश्वर आणि भीमाशंकर ही दोन्ही ठिकाणं lateritic म्हणजे जांभा दगडाच्या कॅपवर आहेत. इथली जंगलं dwarf growth forests आहेत - म्हणजे या ठिकाणी झाडांची खोडं फार उंच जात नाहीत. पण साधारण सगळी त्याच जातीची झाडं जेव्हा दरीत वाढताना दिसतात तेव्हा ती झाडं उंच वाढलेली दिसतात.
म्हणजे भौगोलिक स्थान किंवा पावसाचं प्रमाण किंवा मातीचा प्रकार अशा बाकीच्या घटकांमुळे जरी सदाहरित झाडी असली तरी तिचे विविध प्रकार पाहायला मिळतात. अजून एक उदाहरण द्यायचं झालंच तर महाराष्ट्रातली आर्द्र पानगळी जंगलं आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेली आर्द्र पानगळी जंगलं. जरी दोन्ही आर्द्र पानगळी प्रकराची जंगलं असली दोन्ही वेगळी असतात कारण दोन्हीची भौगोलिक स्थाने वेगळी असल्याने तपमान आणि पाऊसमान यात फरक आहे. यातल्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या आर्द्र पानगळी जंगलाला montane moist deciduous forest असं नाव आहे. अशी प्रत्येक झाडीच्या प्रकाराला वेगेवेगळी शास्त्रीय नावे दिलेली आहेत.

माणसाची गरज अन्न ,वस्त्र,निवारा आणि आरोग्य हीच आहेत.
पण मूर्ख माणसांनी त्या मध्ये ऐश ,आराम,ह्या फालतू गोष्टी चा संबंध जोडला आणि .
आता पूर्ण मानव जात संकटात आहे.
फक्त उत्तम हवामान,उत्तम प्रतीचे अन्न धान्य,उत्तम प्रतीचे हवामान ,उत्तम प्रतीचे आरोग्य.
हेच ध्येय ठेवले असते तर आज माणूस सर्वात सुखी असता.
सर्वात हुशार ते सर्वात मूर्ख असतात.
त्या मधील एक जात संशोधक.
ह्यांनी मानव जाती चे वाटोळे केले.
ऐश आराम म्हणजे प्रगती असले मूर्ख विचार माणसाच्या डोक्यात आला.
आणि आज तो विनाशाच्या टोकावर उभा आहे.
त्याला वाचवण्याची ताकत कोणाध्ये नाही.
२२ वे शतक पण माणूस बघू शकणार नाही.