दिठी

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

राती म्हणोनि दिवे । पडतीं कीं लावावे ।
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥

म्हणोन अद्न्यान नाहीं । तेथेंचि गेलें द्न्यानही।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥

येर्‍हवीं तर्‍ही द्न्यान अद्न्यानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥

रात्री आपण दिवा लावतो, या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतंसुद्धा, पण सूर्य उगवल्यावर या दिव्याची आवश्यकता नसते. सूर्योदयानंतर दिवा लावणे, हे व्यर्थच. तसंच, जिथे अज्ञान नाही, तिथे ज्ञानाचा उपयोग काय? अज्ञान आहे, हे ज्ञाना सान्निध्यातच कळतं आणि अज्ञान पूर्णपणे नष्ट झाल्यावर जे उरलं आहे, ते ज्ञान आहे, हे कळणं कठीण होतं. म्हणजे दोन्ही एकमेकांत विलीन होतात.

’अमृतानुभवा’तलं ज्ञानखंडन वाचताना मला दर पाच मिनिटांनी पुस्तक बाजूला ठेवून डोळे मिटावे लागतात. मनात अनेक प्रश्न उभे राहत असतात. ’अमृतानुभवा’तली काव्यमयता भलतीच मोहवणारी आहे. त्या काव्यमयतेचा पडदा दूर सारून ओव्यांमधलं मर्म जाणण्याचा प्रयत्न करणंही मला कठीण वाटतं. पण त्या ओव्यांमधली प्रतीकं मला आकर्षित करत राहतात. त्या ओव्या माझ्याशी बोलतायेत, असंही वाटतं. मनात भाविक श्रद्धा उमटत नाही, पण ज्ञानेश्वर मात्र जवळचे वाटू लागतात. आगरकर जसे आणि जितके वाटतात तसे. माझ्या प्रयोगशाळेतल्या सोन्याच्या नॅनोकणांचे लालगुलाबीजांभळे असे सुरेख रंग पाहून मला जितका आनंद होतो, तितकाच आनंद मला ’अमृतानुभवा’तल्या काव्यामुळे होतो. ’अमृतानुभव’ मी हाती घेतलं आहे ते कुठल्याही आध्यात्मिक जिज्ञासेमुळे नव्हे, तर सुमित्रा भावे दिग्दर्शन करत असलेल्या ’दिठी’ या चित्रपटासाठीच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून. दिठी म्हणजे दृष्टी.

SB.jpg

मे महिन्याच्या एका रविवार सकाळी सुमित्रामावशींचा फोन येतो. विनोबा भाव्यांच्या बायोपिकवर आमचं काम सुरू झालेलं असतं. मावशींचा आवाज नेहमीसारखा उत्साही. त्या सांगतात, "आत्ता अमेरिकेहून एक गृहस्थ भेटायला आले होते. ’आमोद सुनासि आले..’वर सिनेमा करायला ते आपल्याला पैसे देतायेत. आपण लगेच काम सुरू करायचंय, तू ताबडतोन इकडे ये ." मावशी भराभर पुढच्या योजना सांगत राहतात. मावशींनी पटकथा आठदहा वर्षांपूर्वीच लिहिली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी त्या, सुनील सर, किशोर कदम आणि छायालेखक संजय मेमाणे गावाच्या शोधात बाहेर पडत. लोकेशन शोधत. पण निर्माते आणि पैसे यांचं गणित काही जुळून आलं नाही. काही निर्मात्यांनी तयारी दाखवून ऐनवेळी माघार घेतली. आता मात्र दि. बा. मोकाशी यांची ’आमोद सुनासि आले...’ ही कथा आपण मोठ्या पडद्यावर आणू शकू, अशी सुमित्रामावशींना खात्री वाटते.
अमेरिकेहून आलेले निर्माते आपल्या देशी परत जायच्या आत सुमित्रामावशींचं काम सुरू झालेलं असतं. एका रात्रीत त्या पुन्हा पटकथेवर हात फिरवतात. त्यांच्या मनात पात्रयोजना पक्की आहे. डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, अंजली पाटील, कैलास वाघमारे, ओंकार गोवर्धन आणि रामजीच्या भूमिकेत किशोर कदम.

’आतां आमोद सुनास जालें’ ही अमृतानुभवा’तल्या जीवन्मुक्त-दशा-कथन या नवव्या अध्यायतली पहिली ओवी. सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा, डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफ्याप्रमाणे सुगंधित होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुलं स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचं स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचं रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचं अद्वैत होतं. ज्याला भोगायचं आहे आणि जे भोगायचं आहे, ते दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचं आहे आणि जे जाणायचं आहे, ते एकरूप होतात आणि हा अमृतानुभव असतो, असा या रचनेचा अर्थ आहे.

जन्म आणि मृत्यू - काहीतरी विलयास जाण्याचं दु:ख आणि नवसृजनाचा आनंद हे चक्र! ’आता आमोद सुनासि आले’ ही सर्वस्व गमावलेला रामजी लोहार आणि नियतीशी झगडून ते हरवलेलं परत मिळवण्यासाठीची त्याची धडपड यांची कथा आहे. ज्याच्यात आपण स्वत:ला पाहायचो अशा हातातोंडाशी आलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाच्या पुरात वाहून जाण्यानं रामजी बधीर झाला आहे. गावातले त्याचे चार वारकरी-माळकरी मित्रही हबकून गेले आहेत. रामजीच्या दु:खाची संगती लावण्यात त्यांची दमछाक होतेय. वर्षानुवर्षं ’अमृतानुभव’ वाचणार्‍या त्या भाबड्या जीवांना रामजीच्या दु:खाशी अद्वैत साधायचं कसं, हा प्रश्न पडलाय. याचवेळी शिवा नेमाणेची गाय अडली आहे. तिची वेदनांतून सुटका करू शकतो तो केवळ रामजी; पण रामजी स्वत:च दु:खानं पार कोसळलाय, विठ्ठलावर रागावलाय.

ही माझी अतिशय आवडती कथा. आणि ही कथा पदद्यावर आणू पाहणार्‍या सुमित्रामावशींचा साहाय्यक असणं, हे खूप आनंद देणारं आणि थोडं दडपण आणणारंही.

मे महिन्याच्या उन्हात माझा सहकारी श्रीराम आणि मी माझ्या स्कूटरवर गायीच्या शोधात निघालो आहोत. गाय गाभण असावी, शिवाय ती देशी हवी. गायीचं बाळंतपण आम्हांला (गायीला अजिबात त्रास न देता) शूट करायचंय. चित्रपटातल्या गायीच्या चित्रीकरणासाठी संदर्भ म्हणून. चित्रपटातही हीच गाय आणि गोठा वापरता आला, तर उत्तम. पण देशी गायीचा शोध महाकठीण. जर्सी गायी दूध भरपूर देतात म्हणून हल्ली सर्व गोठ्यांत त्याच असतात. एखादीच खिल्लार गाय एखाद्या धार्मिक गोपाळानं गोठ्यात राहू दिली तरच दृष्टीस पडणार. कोथरुडातून मुढवा, तिथून फुरसुंगी असा प्रवास करत आम्ही गोठे शोधतो. देशी गायीचं बाळंतपण बेभरवशाचं, हे ज्ञान आम्हांला या दरम्यान मिळतं. एका गोठ्यात सुंदर पांढरी खिल्लार गाय सापडते. गाभण. महिनाभरात ती बाळंत होईल, असा तिच्या मालकाचा अंदाज आहे.

’चारपाच दिवस आधी सांगाल का? आम्ही कॅमेरा घेऊन येऊ,’ मी मालकांना म्हणतो. श्रीराम त्या गायीचे फोटो काढतोय.
’नाही हो, असं नाही सांगता येत. फारतर अर्धा तास आधी आम्हांला कळेल, तुम्हांला सांगतो तेव्हा’, मालक सांगतात.
आम्ही अविश्वासानं माना डोलावतो. गायीच्या बाळंतपणाविषयी यांना काहीच कसं माहीत नाही, असे भाव मालकाच्या चेहर्‍यावर असतात.
पण इतर सहासात गोपाळांकडून हेच ऐकल्यावर आम्हांला गायीच्या बाळंतपणाची धास्ती वाटू लागते. कसं जमवायचं सारं?
एक दिवस पहाटे पाच वाजता मला फोन येतो. सासवडच्या रस्त्यावर आम्ही एक गाय पाहिली होती, तिच्या मालकांचा.
’धा मिन्टात या कॅमेरा घेऊन, आमची चंद्री बाळंत होनाराय.’ कोथरुडहून दहा मिनिटांत कॅमेरा आणि कॅमेरामन यांच्यासह तिथे पोहोचणं शक्य नाही, हे मी त्यांना सांगतो.
’मंग मी माझ्या मोबाईलच्या क्यामेरानं शूटिंग करतू. तुम्ही तेच वापरा तुमच्या शिनेमात’. मी मान डोलावतो. असे अनेक फोन मग पुढच्या काही दिवसांत येतात. गायीचं बाळंतपण काही आमच्या नशिबात नसतं.

मावशींची मनोवस्था ताजी, उत्फुल्ल आहे. चित्रपटनिर्मितीतला, लेखनातला निर्मळ आनंद त्या लुटतात. ताज्या दृष्टीनं भवतालचं नवल पाहतात. त्यांच्याबरोबर उरुळी कांचन, आळंदी, सासवड इथे चित्रीकरणस्थळं किंवा गायी शोधण्यासाठी जाणं हा एक अनुभव असतो. मावशींनी संहितेत पंढरपूरला जाणार्‍या वारीच्या पार्श्वभूमीवर काही प्रसंग लिहिले आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी एकदा आळंदीला गेलो असता एक आजोबा मला थांबवतात. काम संपल्यावर मावशी कारमध्ये बसल्या आहेत. माझा सहकारी सनत आणि चित्रपटाचा संगीतदिग्दर्शक पार्थ एकतारी विकत घेण्यासाठी गेले आहेत. मीही त्यांच्याबरोबर असणं अपेक्षित आहे, पण आता गर्दीत मागे पडलोय. त्यांना फोन लागत नाही. मग आहे तिथेच राहिलो असताना ते वारकरी आजोबा येतात. माझ्या हातात पाण्याची बाटली आहे, ती मागतात. वारी निघायला अजून महिनाभर वेळ आहे, पण ते आत्ताच आले आहेत आळंदीला. कुठून ते माहीत नाही. त्यांनी टीशर्ट आणि पॅण्ट घातली आहे.
’आळंदीला दर्शनाला का?’
मी त्यांना आमच्या चित्रपटाबद्दल सांगतो. फक्त ओव्या असलेली, अर्थ समजवून सांगितलेला नसलेली ’अमृतानुभवा’ची पोथी मी शोधतोय. ती कुठे मिळेल, हे त्यांना विचारतो. त्यांना ते काही माहीत नसतं.
क्षणभर शांत राहून म्हणतात, ’अमृतानुभव म्हणजे स्वत:ला ओळखणं. पण स्वत:ला ओळखण्यासाठी गुरू लागतो. नुसतं पोथी वाचून कसं मिळणार तुम्हांला ज्ञान?’

नाना मुखा मुख दाउनि। अरिसा जाय निघौनि॥
कां निदेलें चेवौनि। चेवितें जैसे॥

ओवी म्हणून आजोबा चालू लागतात.
रात्री घरी आल्यावर अर्थ बघतो - मुखाला मुख दाखवल्यावर आरशाचं काम संपतं, निजलेल्या पुरुषाला जागं करून जागं करणारा निघून जातो. त्याप्रमाने सच्चिदानंद ज्ञात्याला आपलं यथार्थ परमात्मास्वरूप दाखवून आपण मौन स्वीकारतात.

चित्रपटाच्या पूर्वतयारीचं काम आता जोरात सुरू झालंय. मावशींच्या तीनचार चित्रपटांच्या निर्मितिव्यवस्थेची जबाबदारी यापूर्वी मी सांभाळली आहे. पण दिग्दर्शन-साहाय्यक म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मी गोंधळ घालतो, चुका करतो. पण तरी काम करण्यात मजा येते. गायीचा शोध आता संपल्यासारखा वाटतोय. इंदापूरनजीक श्री. मजिद पठाण यांचं फार्म आहे. दोनेकशे खिल्लार गायी त्यांच्याकडे आहेत. ’आमच्या गायींना अजिबात त्रास होता कामा नये, शूटिंगमुळे त्रास होतोय, असं मला दिसलं तर मी लगेच तुम्हांला शूटिंग बंद करायला लावेन’, असं सांगून ते आम्हांला त्यांच्या गायी आणि गोठा बांधण्यासाठी जागा देतात. पठाणभाऊंचं त्यांच्या गायींवर निरतिशय प्रेम आहे.

Dithee - still - 2.jpg

सगळे कलाकार चित्रीकरणासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी कितीही वेळ देण्याची त्यांची तयारी आहे. संहितेची वाचनं होतात, कपडेपट तयार होतोय. आणि मग लक्षात येतं की निर्मात्यांचा आणि आमचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. चर्चेनंतर एकत्र काम न करण्याचं ठरतं आणि एक मोठाच प्रश्न समोर उभा राहतो. चित्रपटनिर्मिती ही अत्यंत खर्चिक बाब आहे. कलेसमोर पैसा मुजोर ठरू नये, असं कितीही वाटत असलं तरी पैशाशिवाय अडतं, हेही खरं. आमच्या चित्रपटाला आता निर्माते नसले तरी आमचं काम सुरूच ठेवण्याचा निर्णय मावशी घेतात. दुसरे निर्माते आपल्याला मदत करतील, अशी त्यांना खात्री आहे. पण आता इंदापूरऐवजी पुण्याजवळच चित्रीकरण करावं, हेही ठरतं.

गाय-गोठा-माळा ही शोधमोहिम पुन्हा सुरू होते आणि आम्हांला श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा भरेकर भेटतात. अण्णांचे अनेक व्यवसाय आहेत आणि मुख्य म्हणजे पुण्याजवळ त्यांचं एक फार्म आहे. या फार्मवर दीडशे देशी गायी आहेत. अण्णा आम्हांला सर्वतोपरी मदत करण्यास तयार होतात. चित्रीकरणासाठी कौलारू घरं, माळा यांच्या शोधात आम्ही असतो. अण्णांच्या भरेकरवाडीत आम्हांला हवा तसा माळा आणि घरं सापडतात. त्यांची राधा ही खूप देखणी गाय आठवडाभरात विणार आहे.

आता पैशाची सोय कशी करायची, ही विवंचनाही आहे. पैसेही थोडके नाहीत, साधारण एक कोटी हवेत. आम्हांला पैसे देऊ शकतील, अशा काही लोकांना मी जाऊन भेटतो. मावशींचे प्रयत्नही सुरू असतात. पण हाती काही लागत नाही.

थोडे दिवस वाट पाहूनही पैशांची सोय होत नाहीसं पाहून मी घाबरतो. मावशी त्यांच्या स्वभावाला अनुसरून शांत आणि उत्साही असतात. चित्रीकरण आता दोन आठवड्यांवर आलंय, आणि जवळ पैसे नाहीत. दहा वर्षं या चित्रपटासाठी मावशी थांबल्या आहेत. त्यांचा हा चित्रपट करण्यातला आनंद आणि अनेक वर्षांचा अनुभव लक्षात न घेता मी त्यांची काळजी करतोय. मग एक दिवस मी त्यांना धीर एकवटून सांगतो, ’आपण हा सिनेमा आत्ता करायला नको, वारीची दृश्यं फारतर शूट करू आणि थांबू. पैसे मिळाले की पुढचं काम करू.’ मावशी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. मी ऐकत नाही. तासभर आम्ही एकमेकांना एकमेकांचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतो. मी त्यांच्यासोबत न राहता माघार घेतोय, याचं त्यांना वाईट वाटतं. ’अमृतानुभवा’त वारंवार भेटणारा बागुलबुवा मी माझ्या मनातून काढू शकत नाही.

दुसर्‍या दिवशी त्या, आमच्या सिनेमाचे छायालेखक धनंजय कुलकर्णी आणि मी डॉ. मोहन आगाशे यांना जाऊन भेटतो. चित्रपटातले ते सर्वांत ज्येष्ठ नट, शिवाय ’अस्तु’ आणि ’कासव’ या भावे - सुकथनकरांच्या दोन चित्रपटांचे निर्माते. त्यांना भेटून आम्ही सर्व परिस्थिती सांगतो. ’आम्ही बरेच प्रयत्न केले, पण पैसे नाहीत. या वर्षी नाही, तर पुढच्या वर्षी होईल सिनेमा. एवीतेवी दहा वर्षं थांबले, अजून एक वर्ष थांबून काही फरक पडणार नाही,’ मावशी सांगतात.

’नाही, हा सिनेमा याच वर्षी आणि याच नटसंचात व्हायला हवा’, डॉक्टर म्हणतात. ’दहा दिवसांवर वारी आली आहे. तिथलं शूटिंग आपण करू, मी पैसे देतो. पुढचे पैसे उभे करण्याचा प्रयत्न करतो’, ते सांगतात.

डॉ. मोहन आगाशे निर्माते म्हणून मावशींना मागे ठामपणे उभे राहतात. काम थांबलेलं नसतंच, ते दुप्पट उत्साहानं सुरू राहतं. पुढे चित्रपट तयार होईपर्यंत डॉक्टर पैशाअभावी काम थांबू देत नाहीत.

आम्ही भरेकरवाडीत आलोय, माळा आणि संतूवाण्याचं दुकान यांची पाहणी करायला. ’आम्हांला जुन्या घराचा माळा हवाय’, असं अण्णा भरेकरांना सांगितल्यावर त्यांनी त्यांचंच जुनं घर आम्हांला वापरायला दिलं आहे. शे-दीडशे वर्षं जुन्या या घराचा माळा सुरेख आहे. या माळ्यावर रामजी, संतूवाणी, जोशी शिंपी, गोविंदा, कैलास दर बुधवारी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव असे ग्रंथ वाचतात. त्यातलं त्यांना किती कळतं, कुणास ठाऊक. पण कळतही असेल. ’अमृतानुभव’ हा आत्मसंवाद आहे. अनुभव आणि जाणिवा यांच्या संयोगातून हा ग्रंथ जन्मास आलाय. ज्ञानेश्वरी लिहून झाली तसं निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, ’ज्ञानेश्वरीत तू गीतेतलंच तत्त्वज्ञान सांगितलं आहेस, तुझ्या स्वत:च्या ज्ञानाचं काय? आता तू तुझं ज्ञान आणि अनुभव लोकांसमोर मांडावेस.’ निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि गुरू. त्यांनी ज्ञानेश्वरांना केलेल्या आज्ञेतून सिद्ध झाला अमृतानुभव हा ग्रंथ.

Dithee - still 1.JPG

अण्णांच्या जुन्या घराजवळ एक पडका वाडा आहे. त्या वाड्याचा गोठा फक्त शाबूत आहे, बाकी घर पार मोडकळीला आलं आहे. हे शिवा - पारूबाईचं घर, असं आम्ही ठरवतो. एक बांबू जरी जागचा हलला, तरी संपूर्ण वाडा कोसळणार, अशी स्थिती. पण त्या लोकेशनचा मोह सोडवत नाही.

एक दिवस आमचं काम सुरू असताना शेजारी राहणारे एक आजोबा येतात. कमरेत वाकलेले. चेहर्‍यावर सुरकुत्या, हातात काठी. अंगात बंडी आणि अर्धी विजार. सुमित्रामावशी वाड्याबाहेर बाहेर उभ्या आहेत.
त्यांना पाहून आजोबा विचारतात, ’हे काय बाप्यावाणी केस कापलेत?’
मावशी म्हणतात, ’बाप्यावाणी कामं करते मी. बाप्यावाणी केस कापले म्हणून काय बिघडलं?’
आजोबा पुढे काही बोलत नाहीत. पुण्याला परत जाताना कोवळी पिकुटलेली आंब्याची फळं आम्ही खातो.

वारीत आम्ही काही प्रसंग चित्रीत करतो. पहिल्या दिवशी काम संपल्यावर मी मावशींना म्हणतो, ’माझं चुकलं. तुम्ही काम थांबवलं नाही, हेच बरोबर होतं.’ मावशी काही न बोलता माझा हात थोपटतात.

आता पुढच्या चित्रीकरणाला दहा दिवस आहेत. एक दिवस सकाळी अण्णांच्या मदतनीसाचा फोन येतो - राधा आज दिवसभरात बाळंत होईल, तुम्ही लगेच या. पंधराव्या मिनिटाला आम्ही कॅमेरा घेऊन बाहेर पडतो. राधाकडे पोहोचायला जेमतेम अर्धा तास लागणार असतो. दहाव्या मिनिटाला पुन्हा फोन येतो - राधाला वासरू झालं.

गावात चित्रीकरण सुरू होतं तेव्हा धोधो पाऊस असतो. कथा पावसाळ्यात घडत असल्यानं मुद्दाम हा ऋतू आम्ही निवडला आहे. गावकर्‍यांना आमच्या चित्रीकरणाबद्दल कुतुहल असण्यापेक्षा धास्ती अधिक आहे. त्यांना आम्ही अगोदरच सांगितलं आहे की, इतर व्यावसायिक चित्रपटसंस्थांसारखी आमची संस्था नाही, आमच्याकडे पैसे नाहीत आणि शूटिंगचा सर्व तामझामही नाही, आमचा सिनेमाही हिरोहिरोईनीचा नव्हे. पण तरीही त्यांचा मनात शंका असतेच. दोनच दिवसांत त्यांना कळतं की, आम्ही गोंधळ घालून गावाची स्वस्थता बिघडवणार्‍यांतले नाही. ते आश्वस्त होतात. आम्हांला हवी ती मदत गावातून मिळत राहते.

आठवडाभरात आमची सवय त्यांना होते. गावातल्या वाट्या चिखलानं भरलेल्या आणि निसरड्या. दोन दिवसांत एक चपलांचा जोड जाणार. निसरड्या वाटांवरून रोज आम्ही घसरून पडणार. एकदा संध्याकाळी मी गावातल्या एका घरातून काथवट आणायला निघालोय. पाऊस पडतोय आणि सारं गाव आपापल्या घरात बंद आहे. सिमेंटच्या एकमेव बारकुड्या वाटेवरून मी सण्णकन घसरून पडतो. आपण पडलो आहोत, हेच मला काही सेकंदांनी कळतं. शेजारच्या घरातून एका आजीचा आवाज येतो - त्ये सिनेमावालं पडलं असेल.

गावातले रस्ते अगदीच लहान. एकावेळी एकच कार जाऊ शकेल इतके अरुंद. गावाच्या मध्यावर एक मंदिर आहे. या मंदिरापलीकडे कच्चा रस्ता असल्यानं आमची वाहनं पहिल्याच दिवशी तिथे अडकून पडतात. पुढे महिनाभर अडकलेल्या गाड्या चिखलातून सोडवणं हा एक उद्योग होऊन बसतो.

एकदा आम्ही जरा पलीकडच्या गावात चित्रीकरण करत असतो. जिथे शूट करायचं ते मंदिर रस्त्यापासून दोन किलोमीटर आत. तिथे वाहन जाणं शक्य नाही. पाय रुतेल इतका चिखल, धो धो पाऊस. डोंगरावरून वाहत येणारं पाणी आणि दुथडी भरून वाहणारी नदी. फोनला रेंज नाही. संध्याकाळी अंधार पडल्यावर काम थांबतं. सनत, मी आणि इतर दोघंचौघं आवरासावरीसाठी मागे राहिलेलो आहोत. कलाकार एका गाडीत व इतर तंत्रज्ञ दुसर्‍या गाडीतून पुण्याकडे निघाले आहेत. एवढ्यात एक गावकरी धावत येतो. ’तुमचा टँकर खड्ड्यात पडला’, तो धापा टाकत सांगतो. ऐनवेळी पाऊस आला नाही, तर शूटिंग थांबायला नको, म्हणून आम्ही रेनमशिन मागवलेलं असतं. त्याचा हा टॅंकर.

आम्ही धावत जातो. शेजारच्या गावातून ट्रॅक्टर आणून तो टॅंकर बाहेर काढतो. शूट संपलं संध्याकाळी सात वाजता, आता रात्रीचे दहा वाजत आलेले असतात. आम्ही आमच्या गाडीकडे वळणार, इतक्यात ते ट्रॅक्टर त्याच खड्ड्यात पडतं. मग दुसरं ट्रॅक्टर येतं. पुन्हा तोच खेळ खेळला जातो. या व्यापात रस्ता अडल्यामुळे लाईटवाल्यांचा ट्रक अडकला आहे. त्या सर्वांची चीडचीड सुरू आहे. रात्रीचे बारा वाजले आहेत. रस्ता एकदाचा मोकळा होतो आणि तो लाईटचा ट्रक खड्ड्यात पडतो.

दुसर्‍या दिवशी कळतं, मावशींची गाडी रस्ता चुकली होती. कलाकारांची गाडी बंद पडली होती. त्या सर्वांनी एका टेम्पोत लिफ्ट मागितली. पुण्यात पोचल्यावर मावशींच्या गाडीचं गिरीशदादाला कळल्यावर त्यानं अनेक फोन करून पर्यायी व्यवस्था तयार ठेवली होती. सर्व गाड्या बाहेर काढून पुण्यात पोहोचायला आम्हांला पहाटेचे दोन होतात.

भरेकरवाडी हे गाव मोठं देखणं आहे. चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं. मुसळधार पाऊस, पाय रुतेल इतका चिखल आणि शेणानं सारवलेली दगडी जमिनीची घरं. अशा वातावरणात शूटिंग करणं कठीण आहे. पण गावात येणारा प्रत्येक कलावंत तिथल्या सौंदर्यानं हरखून जातो. सकाळी सात वाजता आम्ही गावात येतो, कामाला सुरुवात करतो. चित्रीकरण संपवून, मागचं आवरून रात्री बाराच्या सुमारास आम्ही पुण्याच्या वाटेवर निघायचो तेव्हा गाव चिडीचूप झालेलं असतं. इतरांना दिसणारं गावाचं सौंदर्य मला दिसत नाही.

Dithee - working still - 2.jpg

मावशींचा चित्रपट प्रेक्षकाचा भरपूर आदर करणारा असतो. त्यामुळे चित्रपट लिहिताना आणि संहितेचं दिग्दर्शन करताना त्या सतत जागृत असतात. त्यांचं चिंतनशील मन कथेच्या, चित्रपटाच्या आकृतिबंधाच्या पलीकडचं, आशयाला भरीवपणा देणारं असं काही प्रेक्षकाला देऊन जातं. त्यांनी लिहिलेले ’दिठी’चे संवाद म्हणजे गतिमान, छोटी वाक्यं आहेत. त्या शब्दांना उपजत लय आहे. मावशी संहिता लिहितात तेव्हा त्यांची अनेक मनं आणि बुद्धी त्यात सामावली असतात. आता मॉनिटरसमोर बसलेल्या मावशींकडे बघताना कळतं की एकाच वेळी अनेक पातळ्यांवर त्यांचा विचार चालत असतो. मनाचे हे सूक्ष्म पदर एकत्र गुंततात आणि त्यातून पडद्यावर दिसणारं दृश्य तयार होतं.

त्यांचा दिवस पहाटे चारला सुरू होतो. त्या सकाळी एकट्याच बसून दिवसाचं शॉट डिव्हिजन लिहून काढतात. आम्ही सहा वाजता पोचल्यावर मीटिंग होते. साडेसहाला आम्ही लोकेशनकडे निघतो. रात्री बारानंतर पुन्हा मावशी, धनंजय सर आणि मी अशी दिवसाच्या कामाचा आढावा घेणारी मीटिंग.

चित्रीकरण सुरू असताना एका रात्री एका संशोधक-मित्राचा बंगळुरूहून फोन येतो. हा मित्र शंकराचार्यांच्या काव्याचा चाहता. त्याला मी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाबद्दल, आमच्या चित्रपटाबद्दल सांगतो. तो मला भौतिकशास्त्रातल्या ’ग्रॅण्ड युनिफाईड थियरी’ आणि अद्वैत यांच्या संबंधाबद्दल सांगतो. ’विज्ञान आणि अध्यात्म’ असं कोणी म्हटलं की ’विज्ञान किंवा अध्यात्म’ असं म्हणा, असं नेहमी ठासून सांगणारा मी, यावेळी शांत बसतो. दिवसभराच्या थकव्यामुळे असेल बहुतेक. अज्ञानाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय अज्ञान नाही, हे ज्ञानाज्ञान-अभेद प्रकरणाचं सार त्याच्याशी बोलताना मला आठवत राहतं. एक ऋतू संपून दुसरा येतो तेव्हा आकाश बदलतं, जमीन बदलते, भवतालचं वातावरण बदलतं. आपण मात्र आपल्या धारणांना, गरजांना जखडलेले राहतो का?

Dithee - still - 3.jpg

माळ्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली त्याचा आज दुसरा दिवस. माळ्यावरच्या खांबाला टेकून रामजी, म्हणजे किशोरदादा, सुन्न बसले आहेत. डोळे शुन्यात. खांदे वाकलेले. त्यांचं दु:ख मला पाहवत नाही. कामात लक्ष लावण्याचा प्रयत्न करतो, पण किशोरदादांचे चष्म्याआडचे डोळे सतत दिसत राहतात. अण्णांच्या घरामागे एक मोठा ओढा आहे. उत्तराताईंना कधीचं त्या ओढ्याकाठी जायचं आहे. त्या दिवशी जेवणाच्या सुटीत मी मधली शेतं ओलांडून त्या ओढ्याकाठी जातो. दुपार असूनही अंधारून आलंय आणि ओढ्यातल्या पाण्याचा रंग आकाशाच्या काळ्या रंगाशी एकरूप व्हायला बघतोय. त्या ओढ्याचा आवाज एरवी मला एखाद्या न समजणार्‍या मंत्रघोषासारखा वाटत असतो. बहुतेक सुखद. आता मात्र त्या आवाजाची धास्ती वाटते. हा आवाज मला रागवतोय का? तो मला काहीतरी सांगतोय असं वाटतं, पण काय ते कळत नाही. हे अज्ञान मला पुन्हा लहान करून सोडतं. आपण पुन्हा लहान झालो आहोत, या भावनेनं उबदार वाटत असतानाच हा आनंद नाहीसा होतो. आवाज वाढतच जातोय, असं वाटतं आणि पुन्हा या आवाजाची धास्ती वाटू लागते. क्षणभर वाटतं, रामजी शेजारी येऊन बसलाय. भोग भोगून आलेली विरक्ती, संसाराची दु:खं अनुभवून आलेला उबग, देवाच्या भक्तीचा अहंकार असं सारं त्याच्या ठायी आहे. त्याला जवळ घेऊन थोपटावं, असं वाटतं. पाण्याचा आवाज आता खूप वाढलाय. असह्य वाटावा, असा. कानात बोटं घातली तर त्रास कमी होईल का? कळत नाही. मी पाण्याकडे बघत बसतो.

माझ्या मनात अपराधीपण दाटून येतं. माझ्यावर जीव लावणार्‍या आणि आता नसणार्‍या माझ्या आज्या, आत्या, काका यांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात. त्यांच्याशी वागताना मी कधीकधी चुकलो, हे आठवतं. करायला हव्या होत्या, पण केल्या नाहीत, अशा अनेक गोष्टी आठवतात. फुकट घालवलेले दिवस आठवतात. मी नेहमीच न्यायानं वागलो होतो का, हा प्रश्न सतावू लागतो. माझा स्वार्थीपणा मला लख्ख दिसतो.

आता पाऊस कोसळणार आहे, खूप उकडतंय. माळ्यावरच्या धुळीची पुटं अंगावर आहेत.

पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर बरं वाटतं. मी भिजत राहतो. थोडा वेळ पश्चात्तापात बुडलेलं मन आता बाहेर येऊ बघतंय. आपल्या जगण्याचा जड गोळा होता कामा नये, असं त्याला वाटतंय. पाण्याचे तेंब बर्फासारखे गार आणि कडक आहेत. पण तिथून उठावंसं वाटत नाही. शरीर स्वच्छ होतंय, हे कळतं.

पाऊस थांबल्यावर मी उठून अण्णांच्या घराकडे जायला निघतो. आजूबाजूला रोज दिसणारी हिरवी शेतं, समोर ढगांनी झाकलेले हिरवेकंच डोंगर असतात. फार सुंदर गाव असतं ते.

रात्री घरी आल्यावर मी त्या मित्राला मेसेज करतो -

म्हणोनि ज्ञानदेवे म्हणे । अनुभवामृते येणे ।
सणु भोगिचे सण । विश्वाचेनि ॥

***

लेखातली सर्व छायाचित्रे - श्रीराम पत्की

***

या लेखाचा काही भाग 'माहेर'च्या २०१८ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. तो इथे पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सुजाता देशमुख यांचे आभार.

***
प्रकार: 

फारच सुंदर लिहीले आहेस. सुमित्रा भावेंबरोबर इतके वर्ष काम करणे हा पण तुला मिळालेल्या एका वेगळ्याच अनुभवाचा भाग आहे , त्यात आम्हाला थोडे सहभागी करून घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद.

लेख आवडला.
दि. बा. मोकाशींची ही कथा मी नुकतीच वाचली. चित्रपट मात्र पाहिलेला नाही.

चिनूक्स, सुरेख अनुभवकथन! जेव्हा गाभण गायीच्या शोधात होतास त्या वेळी आपलं एकदा फोनवर बोलणं झालं होतं बहुतेक. मला वाचताना आठवलं ते!
बाकी विज्ञान आणि अध्यात्माच्या सीमा धुसर झाल्यासारखं वाटणं हे इकॉलॉजीचा अभ्यास करायला लागल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सामान्यतः विज्ञानाचा अभ्यास करताना/शिकताना त्याच्या strengths वर जितका भर दिला जातो तितका त्याच्या मर्यादांवर दिला जात नाही. परीणामी आपल्याला त्या मर्यादांचा विसर पडतो. जेव्हा त्या मर्यादांचं (अज्ञान) ज्ञान होतं तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात तसं ज्ञान आणि अज्ञान एकरूप होऊन जातं. I find अध्यात्म more rewarding when it is an intellectual exercise than when it is an exercise of utter devotion. डोळस भक्ती म्हणू शकतो.
सुमित्रा भावे यांच्या प्रतिभेची जाणीव लेख वाचताना पुन्हा एकदा झाली आणि आता त्यांच्या नसण्याने केवढी मोठी पोकळी निर्माण झाली असणार याचीही जाणीव झाली. तुला त्यांचा इतक्या जवळून अनेक वर्षं सहवास लाभला ही किती भाग्याची गोष्ट!
दिठी कुठे पाहता येईल?

दिठी बघणार च आहे! By hook or crook!
आजच पेपरात(वर्तमानपत्रात) आलंय की
Sony LIV या OTT platform
वरती बघायला मिळणार आहे Happy

र च्या क,
तुमचा अभ्यास जबरदस्त आहे बुवा चीनुक्स...
बरेच जुने धागे वाचलेत तुमचे.
दोन दिवसांपूर्वी तुमचे LinkedIn चेक केले!
बी. एम. सी. सी. चे प्राध्यापक आहात का सध्या??
( नसाल तर, अरेरे Proud वेगळ्याच चिन्मय दामलेंना पाहिले असेल)

सुरेख अनुभवकथन.
दिठी बघितला नाही पण बघणार आहे. ही कथा अतिशय आवडती आहे. अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर या कथेवर आधारित मालिका/भाग बघितला होता तेव्हा कथा वाचायची उत्सुकता होती आणि मग कथा खूप भावून गेली. ती मालिका/भागही अतिशय सुरेख झाला होता. नाव्/कलाकार काहीच आठवत नाहीत आता.

@चिनूक्स, तुमचे लेख वाचले की अंतर्मुख तर व्हायला तर होतंच पण आपण किती किती अडाणी आहोत हे कळतं. निव्वळ अप्रतिम.

धन्यवाद.
दिठी Sonylivवर पाहता येईल.

किती सुंदर लिहिलंय रे. मला भावेंचे चित्रपट फार आवडतात. दोघी वास्तुपुरुष इ च्या सीडी पण आहेत. दिठी नक्कीच बघेन.

सहज म्हणून खूप दिवसांनी 'मायबोली'वर आलो आणि तुमचा हा लेख नजरेला पडला. लगेच वाचून काढला. किती अप्रतिम लिहिलंय!

'आता आमोद सुनासि आले...' ही दि. बा. मोकाशी ह्यांची कथा मलाही आवडते. फार फार आवडते. त्यातल्या ओवीचा अर्थ बरेच दिवस कळला नाही. तो शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. पण पुस्तकं आवरताना हे हाती आलं की, कथा वाचणं अपरिहार्यपणे ठरलेलं. एका सुंदर कथेवर, तिच्यावरच्या चित्रपटाच्या निर्मितीवर तेवढाच सुंदर झालेला हा लेख.

अंतर्मुख करणाऱ्या ह्या लेखाबद्दल तुमचे मनापासून आभार!

माहेर मध्ये हा लेख वाचला होता.आज तो परत वाचताना अधिक पटला.
Di. बां ची ही कथा अनेक वर्षांपूर्वी वाचली आहे.तेव्हापासून कथेचे शीर्षक छळत आलेय.वर चिकू यांनी म्हटल्याप्रमाणे टी. व्हीवर पाहिली होती.
आजही शीर्षकाचा अर्थ नक्की माहीत नाही.आमोद शून्यवत झाले असा आहे का?

दिठी Sonylivवर पाहता येईल.>>
धन्यवाद चिनूक्स. 'कासव' आणि सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर द्वयीचे इतरही चित्रपट Sonyliv वरच किंवा अन्य कुठल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करता येतील का? सध्या देवराई प्राईमवर आणि संहिता यूट्यूबवर आहे. बहुतेक वास्तुपुरुष हॉटस्टारवर होता पण आता दिसत नाहीये. नितळ, दोघी हेही कुठे दिसले नाहीत. अस्तु प्राईमवर बघितला होता.

अनुभव खूपच सुंदर शब्दात लिहिला आहे तुम्ही. आणि picture पण खुप सुंदर. प्रत्येक फ्रेम उत्तम.

तू तो माझे मी तो तुझे हा अभंग कुठल्या पुस्तकात मिळेल सांगू शकाल का?

सुंदर..!

’विज्ञान आणि अध्यात्म’ असं कोणी म्हटलं की ’विज्ञान किंवा अध्यात्म’ असं म्हणा, असं नेहमी ठासून सांगणारा मी, यावेळी शांत बसतो. दिवसभराच्या थकव्यामुळे असेल बहुतेक.>>>>> थकव्या बरोबरच मित्राच्या फोनमुळे जरा यावर नव्याने विचार करावा असा विचार देखील मनात डोकावून गेला असेल

खुप सुरेख लेखन.हा चित्रपट बघायची उत्सुकता आहे.
नुकताच संहिता पाहिला मी यु ट्युब वर..इतके वर्ष का नाही पाहिला असे वाटले...सुरेख चित्रपट....

Pages