अडकलेली - भाग ६ - (अंतिम भाग) : सुटका आणि पुर्नभेट..!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 5 May, 2021 - 09:16

अडकलेली - भाग ६ - (अंतिम भाग) : सुटका आणि पुर्नभेट..!!
___________________________________________

रेणुका आपल्या गावी परतली. घराच्या अंगणात पाऊल टाकताच आपलं भकास पडलेलं घर, त्या घरापुढलं ओसाड अंगण पाहून ती आतून तुटली.

माणसांशिवाय कुठल्याही वास्तूला , जागेला, चैतन्य, सजीवता, रूप नाही हे अगदी खरं आहे.

गावातल्या लोकांनी रेणुकाला कधी गुन्हेगार मानलं नव्हतंच. तिच्याबद्दल सर्वांना विलक्षण आपुलकी वाटत होती. गावातल्या बऱ्याच जणांनी तिला त्या घरात राहू नये म्हणून सुचवलं, पण तिने त्यास नम्रपणे नकार दिला.

तिच्या मते, कुठलीही जागा, कुठलीही वास्तू ही शापित असूच शकत नाही.

ज्याचं मन असे निर्मळ, ज्याचं वर्तन सरळ...
त्यास कसलं आणि कुणाचं आलंय भय..??

रेणुकाने सरकारकडून मिळालेल्या मदतीतून तसंच आपल्या बचतीतून मिळालेल्या पैश्यांतून घर आणि त्या घरा पुढील अंगणाचा कायापालट केला. मोठ्या मेहनतीने तिने त्या घराला, घरा पुढच्या अंगणाला गतवैभव प्राप्त करून दिलं.

ज्या घराला अवकळा आली होती, ते घर रेणुकाच्या सात्विकतेने, चैतन्यपूर्ण वास्तव्याने उजळून निघालं.

दिवस भराभर उलटत होते. रेणुका आपल्या घरकुलात नेत्राच्या प्रेमळ मैत्रीमुळे, गावकऱ्यांच्या आपुलकीने रमू लागली.

एके दिवशी गावात ग्रामसभा भरली. गावातील ग्रामस्थ, सरपंच, सदस्य आणि गावचे ग्रामसेवक गावामध्ये भेडसावणाऱ्या अडी-अडचणी, गावासाठी असणाऱ्या सरकारी योजना, यावर चर्चा करत असताना ग्रामसभेत एक अतिशय महत्वाचा विषय चर्चेसाठी आला.

गावात एक अडचण होती. गावात प्राथमिक शाळा होती, परंतु पुढचं माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना दहा किलोमीटर लांब तालुक्याच्या गावी जावे लागत होते.

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय जाणून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थेने गावात माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. नवीन शाळेसाठी सरकारकडून ती संस्था रितसर परवानगी घेणार होती. पण त्यांना शाळा बांधण्यासाठी जागेचा प्रश्न पडला.

पण कसं असतं, सोयी- सुविधा, सवलती सगळ्यांना हव्या असतात; पण सढळहस्ते मदत करायची वेळ आली की, सगळे हात झाडून मागे फिरतात.

ग्रामसभेत अडचण मांडली गेली आणि एक हात वर आला.

" शाळा बांधण्यासाठी माझ्या मालकीची जागा देण्यासाठी मी तयार आहे!" सभेत जमलेले ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने पाहू लागले.

रेणुका उठून उभी राहिली.

" माझी जागा घ्या.. शाळा बांधायला..!"

" अग रेणुका, ती जागा तुझ्या उदरनिर्वाहाची सोय आहे. ती जमीन देऊन आपल्या पायावर धोंडा का मारून घेतेस तू?" नेत्राने तिला समजावलं.

" मला त्या जमीनीचा मोह नाही नेत्रा, मला नको ती जमीन.. माझ्यानंतर ती जमीन पडीकचं राहणार आहे...!" निस्वार्थी मनाच्या रेणुकाला कसलाही लोभ नव्हता.

" त्या जमिनीवर शाळा उभी राहिली, तर तिथे मुलं शिकतील, मैदानात खेळतील, त्यांच्या नाचत्या - बागडत्या पावलांच्या संचाराने त्या जागेत चैतन्य फुलेलं .. आणि त्याने मला समाधानचं मिळेल .! " रेणुकाचं बोलणं ऐकून नेत्रा तिच्याकडे भक्तीभावाने पाहू लागली. ती रेणुकाच्या उरात दडून बसलेल्या भावना जाणून होती.

संपूर्ण गावाला रेणुकाचं अतिशय कौतुक वाटलं.

'शुभस्य शीघ्रम' म्हणत गावात शाळेचं बांधकाम सुरू झालं. अल्पावधीत ते पूर्णही झालं.

रेणुकाने जागेचा मोबदला घेतला नाही. तिने सगळ्यांना फक्त एकच आग्रह केला की, गावातल्या नव्या शाळेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नावं द्यावं.

तिचा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाईं फुलेंच्या नावाला असणारा आग्रह , खरंच कुणाला मोडावासा वाटेल का बरं??

'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा' अश्या नावाचा नवीन शाळेवरचा बोर्ड दिमाखात झळकू लागला.

नवीन शाळेत आजूबाजूच्या गावातली, पाड्यावरची मुलं येऊ लागली. शाळेत शिकू लागली. शाळेच्या आवारात मुलांच्या किलबिलाटाने चैतन्य फुललं. शाळेतल्या त्या कोवळ्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून, त्या आनंदाला सुद्धा रेणुकाच्या सात्विक चेहऱ्यावर फुलण्याचा मोह झाला..!!

गावातल्या लोकांनी ग्रामसेवकाच्या सहाय्याने बालवाडीमध्ये रेणुकाची नेमणूक केली, तिचे भविष्यातले पुनर्वसन व्हावे या उद्देशाने..!!

रेणुका बालवाडीमध्ये चिमुकल्यांमध्ये रमू लागली. तिने आपला आनंद, आपल्या जगण्याचं सार शोधलं .. त्या निष्पाप , निरागस मुलांच्या चेहऱ्यांवर..!!

आपल्या अंतरी दडलेल्या निरागस मायेच्या पदराची ऊब ती आता त्या चिमुकल्यांना वाटणार होती.

एके दिवशी तालुक्यावरून एक नवीन विस्तार अधिकारी गावाची माहिती घेण्यासाठी गावात आला. ग्रामसेवकांनी रेणुकाची त्या विस्तार अधिकाऱ्याशी ओळख करून दिली.

___ आणि त्याचं नाव ऐकताच रेणुकाला काहीतरी आठवलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरू लागला.

कादंबरीची कारागृहातून सुटका व्हायची वेळ जवळ येऊन ठेपली होती. तुरुंगातल्या आपल्या चांगल्या
वर्तवणुकीसाठी तिला रेणुकासारखी शिक्षेत सवलत मिळणार होती.

रेणुका तिला नेहमी पत्र पाठवत असे. तिला फोन करत असे आणि जेव्हा जमेल तेव्हा तुरुंगात भेटायलाही येत असे.

एवढ्या वर्षाच्या काळात बऱ्याच जुन्या कैदी स्त्रिया शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडल्या होत्या. नवीन कैदी स्त्रिया शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात आल्या होत्या.

एके दिवशी रोहिणी मॅडमनी कादंबरीला आपल्या केबीनमध्ये बोलावत तिच्या हातात दोन पत्रं टेकवली.

एक पत्र रेणुकाचं होतं, तिची ख्याली- खुशाली विचारणारं आणि दुसरं पत्र..??? कुणी पाठवलं असावं..?? कादंबरी विचारात पडली.

तिने अधीरतेने पत्र हातात घेतलं आणि पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र वाचायला सुरुवात करताच पुन्हा तिच्या अश्रूंनी तिला दगा दिला.

कोणत्या भावना साठल्या होत्या त्या अश्रूंमध्ये..??

डोळे पुसत पुन्हा एकदा तिने पत्र वाचायला सुरुवात केली.

प्रिय कादंबरी,

खरं तर तुला प्रिय म्हणण्याच्या मी लायक उरलोयं की, नाही ते सुद्धा मला माहित नाही. पण तू मला कायम प्रिय होती, आहे आणि कायमचं असशील...!

सुरुवात कशी आणि कुठून करावी तेचं मला समजत नाहीये.

कादंबरी, तू कशी आहेस हे विचारण्याचं माझं खरंच धाडसचं होत नाहीये. पण काही प्रश्नांची उत्तरं तू न मागता सुद्धा मला तुला द्यावीच लागतील.

कधी कधी मनातल्या साचलेल्या भावना फक्त कागदावरच उतरवता येतात .. ज्या मुखावाटे नाही व्यक्त करता येतं.. अश्याच माझ्या मनातल्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करण्यासाठी हा पत्र प्रपंच..!

मला कल्पना आहे की, माझ्या निष्पाप मनाच्या कादंबरीने कुठल्या परिस्थितीला तोंड दिले आहे. किती संकटाचा सामना केला आहे..!!

कादंबरी, तुझ्या आयुष्यात काय - काय घडून गेलंय, ते सगळं समजलंय मला रेणुकाताई कडून..!!

कादंबरी, एक खरं सांगू तुला?? तुझ्या ह्या परिस्थितीला अंशतः मी जबाबदार आहे , असं मला राहून राहून वाटतंय. माझ्या मनात अपराधीपणाची भावना कायम तेवत आहे. त्या दिवशी अजाणतेपणी मी त्या लॉजवर तुला घेऊन गेलो नसतो, तर कदाचित पुढचं एवढं रामायण घडलंही नसतं. त्याचं शल्य आजही माझ्या मनाला बोचत राहतं.

त्या दिवशी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर त्या दुष्ट
उत्तम तोडकरने मला धमकावलं. शहर सोडून जायला आणि तुझ्या आयुष्यातून निघून जायला सुद्धा..!!

मी हॉस्टेल वरून परस्पर गावी परतलो.. तुला एकदाही न भेटता..! पुन्हा नव्या ठिकाणी शिक्षणासाठी गेलो.
तुझी शप्पथ , खूप घाबरलो होतो मी त्या राक्षसाच्या धमकीला. तुझ्या आयुष्यातून जर मी निघून गेलो नाही तर आपल्या दोघांनाही बरबाद करेन अशी धमकी सतत त्याची माणसं मला देऊ लागली होती. नाईलाज झाला माझा...!!

उत्तम तोडकर सारख्या पैश्यानी आणि सत्तेने माजलेल्या राक्षसाला मी समोरून नाही भिडू शकलो. मी प्रांजळपणे कबूल करतो की, माझ्यात तेवढी त्यावेळेस खरंच हिंमत नव्हती. असमर्थ होतो मी...!. आज लाज वाटते मला माझी स्वतःचीच की, त्या नीच माणसाचा मी का सामना नाही करू शकलो...!!

मला माफ कर कादंबरी, मी तुझं रक्षण नाही करू शकलो, पण त्या राक्षसाची इथपर्यंत मजल जाईल असं मला कल्पनेतही वाटलं नव्हतं. पण वास्तव हे नेहमीचं कल्पनेपेक्षा जास्त कटू असते.

कादंबरी, तुझ्या हातून जो गुन्हा घडला तो परिस्थितीला शरण जात घडलायं आणि त्याची शिक्षा सुद्धा तू भोगली आहेस. परंतु तुझं दुर्दैव प्रत्येक ठिकाणी आडवं आलं. तुला त्यावेळेस सावरणारं, समजून घेणारं कुणी जवळचं असतं ना , तर त्या निष्पाप बाळाचा जीव ही तुझ्या हातून गेला नसता. राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की, त्यावेळेस एकदा जरी तू शांतपणे विचार करून त्या बाळास ज्योतीताईंच्या आश्रमात जरी सोडलं असतंस ; तरी त्या महिला आश्रमातल्या स्त्रियांनी, ज्योतीताईंनी त्या बाळाला प्रेमानं सांभाळलं असतं ..!!. ज्योतीताई आणि त्यांच्या पतींनी त्या बाळामध्ये आपल्या गमावलेल्या श्वेताला पाहिलं असतं. कदाचित तुझ्या माथी अर्भक हत्येचं पाप पडलं नसतं.

हे सगळं लिहून तुझ्या जखमेवरची खपली काढून तुला दुखावण्याचा माझा जराही उद्देश नाही .. पण आज मी ठरवलयं की , ज्या भावना इतकी वर्षे माझ्या अंतरी साचल्यात, त्या कागदावर उतरू द्यायच्या. त्या भावनांना शब्दावाटे कागदावर मुक्त होऊ द्यायच्या..!!

जे घडून गेलंय त्यावर काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही, पण तुझ्या हातून नकळत, अजाणतेपणी जो अपराध घडलायं , त्याचं प्रायश्चित मी घेणार आहे.

अहं... त्यामागे तुझ्यावर मी उपकार केल्याची भावना मनात बिल्कूल येऊ देऊ नकोस. मी ठरवलंय एक अनाथ मूल दत्तक घेण्याचं... त्या मुलाला प्रेम, माया देण्याचा प्रयत्न मी करणार आहे; आणि मला खात्री आहे की, तुला हे वाचून आनंदच होईल.

कादंबरी, जगासाठी जरी तू गुन्हेगार ठरली असलीस, तरी माझ्यासाठी तू गुन्हेगार कधीच असणार नाही.

माझ्यासाठी तू तीच माझी निष्पाप, हसऱ्या चेहऱ्याची, निर्मळ, हळव्या मनाची कवियित्री प्रेयसी आहेस. माझ्या नजरेत कायम तुझं तेच रूप वसलेलं आहे. त्या तुझ्या रुपाला माझ्या मनात कधीचं धक्का लागणार नाही.

कादंबरी, तुला आठवतंय; जेव्हा मी कॉलेजला असताना तुला प्रपोज केलं होतं??

एका कागदावर प्रेम कविता लिहून छान पैकी तुझ्या आवडीची 'गारवा' ची कॅसेट धडधडत्या छातीने दिली होती मी तुला..??... आठवतंय..??

__आणि माझी प्रेम कविता वाचून खो-खो हसत सुटली होतीस तू.. अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत ..!!

आणि हे सर्व आठवून तुला पुन्हा एकदा हसू आलं असेल हो..ना..?

नाही जमत मला तुझ्यासारख्या कविता करायला म्हणून एवढं हसायला हवं होतं का..??

त्यानंतर माझं इवलसं झालेलं तोंड पाहून तू म्हणाली होतीस की,

"काही गरज नव्हती रे , एवढं सगळं करण्याची..! माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि पुढच्या आयुष्यात तुला कायम प्रेमळ साथ देईन, एवढं जरी म्हणाला असतास तरी पुरे झालं असतं ..! "

नंतर तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आणि शपथ सांगतो, आनंदाने वेडा व्हायचा बाकी राहिलो होतो मी..!

कादंबरी, खूप अन्याय झालायं गं तुझ्यावर ... आता खूप झालं .. यापुढे नाही होऊ देणार तुझ्यावर मी अन्याय..!!

सगळी नाती सांभाळून तुला पुन्हा एकदा मी आपलंस करणार आहे , कुणाचीही पर्वा न करता ...! तुझा हा प्रणित भविष्यात तुझ्यासोबत कायम राहणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव... कादंबरी..!!

कादंबरी, मला तुझ्यासारख्या कविता नाही करता येत, पण मला माझ्या मनातलं जे तुला सांगायचं आहे त्या भावना मी आज कवितेतून व्यक्त करतोय.. तुझ्या होकाराच्या अपेक्षेने..!!

दूर क्षितिजा वरली चमचमती
जणू द्वितियेची लोभस चंद्रकोर तू ...
त्या चंद्रकोरीची शीतलता जीवनी
माझ्या पेरशील का ..??
सांग ना सखे... माझी होशील का??

नभी उगवत्या रवि किरणांतली
जणू एक सोनेरी किरण तू...
त्या किरणाची ऊब
जीवनी माझ्या देशील का..??
सांग ना सखे ... माझी होशील का ??

कोसळणाऱ्या धुवाँधार वर्षा सरींची
जणू एक निर्मळ सर तू...
ती निर्मळ सर बनूनी
जीवनी माझ्या बरसशील का..??
सांग ना सखे ... माझी होशील का ??

बाभूळ वनाच्या वाटेवरला
जणू एक फुललेला रानचाफा तू..
त्या रानचाफ्याचा गंध होऊनी
जीवनी माझ्या दरवळशील का..??
सांग ना सखे ... माझी होशील का
??

सदैव तुझाच एक असे ध्यास ...
मनी वसती तुझेचं नवे भास...
देईन साथ तुजला ऊरात असेल
माझ्या जोपर्यंत धगधगता श्वास...
सांग ना सखे ... माझी होशील का ??

तुझ्या उत्तराच्या अपेक्षेत ...!!

सदैव तुझाच...
प्रणित...!!

हातातलं पत्र वाचून संपलं.

वेडा..!! तसाचं...अगदी तसाचं आहे. जराही बदलला नाहीये.

डोळ्यांतले अश्रू सुद्धा असे दगाबाज असतात ना की, दुःख असो वा सुख.... पावसाच्या सरींसारखेचं बरसू लागतात.

प्रणितचं पत्र वाचून आपल्या मनात नक्की कुठल्या भावना उमटल्यात तेच तिला उमगत नव्हतं.

रोहिणी मॅडमनी तिच्या खांद्यावर प्रेमानं थोपटलं.

"कादंबरी, खूप भोगलंस तू, नियती तुझ्या पुढ्यात आनंदाचे, सुखाचे ताट आणि पाट देऊ पाहतेयं... नाकारू नकोस ते..! तुला भविष्यात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. प्रणितला होकार दे.. त्याचं प्रेम पुन्हा एकदा स्विकार , मनात कुठलाही किंतु न ठेवता; आणि आता चेहऱ्यावर हसू येऊ दे बरं, सारखं सारखं रडणं बरं नव्हे..!"

डोळ्यातलं पाणी पुसत कादंबरी रडत - रडत हसू लागली.

काळ कुणासाठी थांबत नाही, तो वेगाने मार्गक्रमण करत राहतो.

तुरुंगातून कादंबरीच्या सुटकेचा दिवस उगवला. तुरुंग जरी असला तरी आयुष्यातील सहा ते सात वर्ष तिने तिथे घालवली होती. तिचं जीवन जरी बंदिवासात होतं, तरी त्या जागेबद्दल, तिथल्या कैदी स्त्रियांबद्दल, रोहिणी मॅडमबद्दल तिला विलक्षण माया वाटत होती. त्या सगळ्यांनीसुद्धा तिला प्रेम, माया देण्यात कुठलीही कसर सोडलेली नव्हती.

सुटकेच्या दिवशी तिने सगळ्यांचा निरोप घेतला. तुरुंगातल्या सगळ्या स्त्रियांना आज भरून आलं होतं. त्यांना आपले अश्रू आवरत नव्हते. तुरुंगाबाहेर गेल्यावर सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न मी करेन, असं वचन तिने त्यांना दिलं.

रेश्माने कादंबरीला रडत - रडत मिठी मारली. तुझ्या मुलाला मी नेहमी बाल आश्रमात भेटायला जाईन, त्याची काळजी घेईन असा दिलासा कादंबरीने तिला दिला.

सुटकेच्या वेळी तुरुंगातून तिच्या सगळ्या चीजवस्तू तिला परत दिल्या गेल्या. तुरूंगात तिने केलेल्या कामाचा मोबदला आणि तिच्या भविष्यातल्या पुर्नवसनासाठी सरकारी मदत तिला दिली गेली.

कादंबरी रोहिणी मॅडमच्या केबीनमध्ये आली... रोहिणी मॅडमची भेट घेण्यासाठी...!!

ती खाली वाकली. रोहिणी मॅडमच्या पायावर तिने डोकं ठेवलं. त्या माऊलीची पावलं कादंबरीच्या अश्रूंनी चिंब भिजली. आज त्या कारागृहाच्या भिंती सुद्धा स्तब्धतेने हा सोहळा पाहत मनोमन गहिवरल्या होत्या.

उषा गेल्यानंतर जर कुणी कादंबरीची जास्त काळजी घेतली असेल, तिला योग्य मार्गदर्शन केलं असेल तर त्या रोहिणी मॅडम होत्या. आज तिला आपल्या आईची खूप आठवण आली.

रोहिणी मॅडमनी तिला उठवलं. त्या तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटू लागल्या.

"कादंबरी, ऊठ, आता यापुढे रडायचं नाही. हसत - हसत जगायचं आणि अजून एक, भविष्यात कधीही तुला गरज लागली ; तर मला रोहिणी मॅडम म्हणून नाही, तर तुझी मोठी बहिण या नात्याने कधीही हाक मार ; मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहेन. जा... नवीन सुरुवात कर आयुष्याला, भविष्यात सुखी रहा..!" रोहिणी मॅडमनी तिला आशीर्वाद दिला.

तिने सगळ्यांचा पुन्हा एकदा निरोप घेतला.

कादंबरीने कारागृहाच्या अजस्त्र दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकलं. डोळे बंद करून तिने मोकळा श्वास घेतला. तो श्वास तिने ऊरात साठवला. ती दोन पावले पुढे गेली. पुढे जाऊन एकवार तिने मागे वळून पाहिलं ... आयुष्यातली सहा-सात वर्षे जीवनाचं सार शिकवणाऱ्या तुरुंगाकडे तिने डोळे भरून पाहिलं..!!

रोहिणी मॅडमनी तिला हातानेच पुन्हा वळून पाहू नकोस म्हणून खुणावलं.

बाहेर रेणुका तिची वाट पाहत होती.

रेणुका सोबत उभा असणारा रुबाबदार तरुण माझा प्रणितचं आहे ना ...?? ती विस्मयाने त्या तरुणाकडे पाहू लागली.

किती बदललायं प्रणित...?? ओळखूही येत नाहीये. कित्ती रुबाबदार झालायं.. सरकारी अधिकारी अगदी शोभून दिसतोयं..! ती विचार करत त्याच्या जवळ पोहचली.

दोघांची नजरभेट झाली.

काय होतं दोघांच्या नजरेत..?? ..प्रेम, आकर्षण, अनेक वर्षाचा सोसलेला विरह..??

आता आपल्या मनात उमटलेल्या अलवार भावनांना काय बरं नाव द्यावं??

जगाने भलेही ह्या अलवार भावनांना काहीही म्हणू दे, दोघांनीही त्या मनी उमटलेल्या भावनांना 'प्रेम' हेच एकमेव नाव द्यायचं ठरविलं.

कादंबरी कारच्या मागच्या सीटवर बसू लागली.

" कादंबरी , तुझी जागा पुढे आहे , इथे नाही.!" रेणुका हसत - हसत म्हणाली.

तिने प्रणितकडे पाहिलं. त्याला गालातल्या गालात मिश्कील हसू फुटलं होतं.

' हेच ते ...त्याचं खळीदार, कातिल हसणं, मला त्याच्या प्रेमात शर्करेसारखं विरघळवून टाकणारं...!

कादंबरी धडधडत्या ऊराने पुढच्या सीटवर प्रणित सोबत बसली.

तिचा नवीन प्रवास सुरू झाला, पण ह्या प्रवासात आज तिच्या सोबत प्रणित होता.

गाडी रस्त्याला लागली. रस्त्यात लागणाऱ्या रेणुकाच्या गावी त्यांनी तिला सोडलं. रेणुकाच्या घरी पाहुणचार घेऊन पुढच्या प्रवासाला निघत दोघांनीही तिचे आशीर्वाद घेतले.

" नांदा सौख्यभरे!" आशीर्वाद देत रेणुका हसत - हसत म्हणाली,

" आता लग्नाच्या तयारीला लाग बरं कादंबरी, मी येते पुढच्या महिन्यात दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकायला!"

कादंबरीने चमकून प्रणितकडे पाहिलं. त्याने हळूच खिशामधून कोर्टात लग्नासाठी नोंदणी केल्याची पावती बाहेर काढत , फड-फडवून दाखवित तिच्याकडे पाहत डोळे मिचकावले.

दोघेही रेणुकाच्या घरून तिचा निरोप घेऊन निघाले.

शांत रस्त्याने गाडी निघाली. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात, रस्त्याच्या दुतर्फा सोनमोहोर फुललेले होते. आभाळाच्या निळाईत त्याच्या पिवळ्या धम्मक फुलांच्या बहराने अवघा आसमंत झळाळून निघाला होता. सोनमोहोरांच्या पिवळ्या फुलांचा रस्त्याच्या कडेला पडलेला सडा पाहून मन प्रसन्न होत होते.

कादंबरी आणि प्रणित दोघेही गाडीत निशब्द होते.

तेरा साथ है ..तो मुझे क्या कमी है
अंधेरो से भी मिल रही रोशनी है ...
कुछ भी नहीं है तो... कोई गम नहीं है
हर एक बेबसी बन गयी चांदनी है...!!

लतादिदींच्या सुरेल आवाजात गाडीत गीत वाजत होतं. कादंबरी डोळे मिटून डोकं मागे सीटवर टाकून मंत्रमुग्ध होतं, गाण्याचे बोल आपल्या कानात साठवत राहिली.

प्रणितने कार रस्त्याच्या बाजूला घेतली. गाडी थांबल्याने कादंबरीने आपल्या मिटलेल्या पापण्या उघडल्या.

' तळं'... निळ्याशार पाण्याने तुडुंब वेढलेलं .. तेथील वातावरणात.... आसमंतात धुंद हवा भरलेली.. प्रेमी जीवांना एकमेकांत गुंतवून टाकणारी जणू..!

तळ्याच्या काठावर रानचाफ्याची झाडं पांढऱ्या फुलांनी मोहरलेली , सजलेली...त्या फुलांचा सुगंध हवेत दरवळलेला...!

दोघेही तळ्या जवळच्या एका कातळावर बसले. दोघांच्या मनात खूप काही साठलेलं होतं, पण ते ओठावर येत नव्हतं.

कादंबरीने उगाचच एक लहानसा दगड उचलून पाण्यात मारला. पाण्यातलं दोघांचंही स्तब्ध असलेलं 'प्रतिबिंब' थरारलं.

" कादंबरी, नको दगड मारू पाण्यात !" दोघांचं थरारणारं प्रतिबिंब पाहून तिचा हात धरत प्रणित म्हणाला.

ती बावरली.

"कादंबरी...!"

" हं.. "

"मला तुझ्या तोंडून माझ्या प्रश्नांचं उत्तर ऐकायचं आहे.!"

"अरे , तुला माहित आहे..!" तिच्या गालावर अस्फूट स्त्री- सुलभ लज्जा पसरली.

" पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आणि ते सुद्धा तुझ्या कवितेतून.. तुझ्या सुरेल आवाजात... म्हणशील ना.??. माझ्यासाठी...??"

तिने त्याच्या डोळ्यांत पाहत होकारार्थी मान हलवली.

फिरुनी पुन्हा वळू पाहे
प्रेम वाटेवरी हे पाऊल
ती वाट ओळखीची झाली
जेव्हा लागली तुझी चाहूल..!!

चिंब भावना त्या हळव्या
मनी उगाच दाटती
आज अश्रूंना ही वाटे
नेत्रातून बरसण्याची भीती..!!

कोवळ्या प्रेमाला फुटती
नवे कोवळे धुमारे
निशब्द हे भाव तरंग
होई मन उगीच बावरे..!!

संपला काळाचा विरह
लाभता तुझी प्रेमळ साथ
असाचं राहू दे माझ्या हाती
तुझ्या विश्वासाचा हात..!!

स्पर्श हा तुझा प्रेमाचा
मना संगे काया हि थरारली
जपूनी ठेवेन मर्मबंधी हि ठेव
मी तुझ्यात ...अडकलेली...!!

मी तुझ्यात... अडकलेली..!!

तिची कविता, ते शब्द आत्ममुग्ध होत तो ऐकू लागला. तिच्या मुखातून उमटणारे कवितेचे बोल तो आपल्या कानात साठवू लागला.

कविता संपली.

कादंबरी बोलायची थांबली.

त्याने तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने ती सुखावली. त्या स्पर्शात मायेचा, प्रेमाचा, विश्वासाचा ओलावा ओथंबळत होता. तिने हलकेच आपली मान त्याच्या खाद्यांवर टेकवली.

तिच्या जीवनाला आता नवा लयबद्ध सूर गवसू पाहत होता.

___आणि त्यांच्या मिलनाचं हे दृश्य पाहून तळ्यातलं दोघाचं स्तब्ध 'प्रतिबिंब' शहारून आलं होतं. तळ्या काठच्या मोहरलेल्या रानचाफ्याचा सुगंध सभोवताली अधिकच दरवळू लागला होता. त्या सुगंधाने सभोवतालंच वातावरण अजूनच मोहक बनू पाहत होतं.

__ आणि आज आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर तरळणारं समाधान पाहून, खऱ्या अर्थाने अज्ञात वाटेच्या दिशेला गेलेल्या उषाच्या आत्म्याला समाधान वाटलं असावं. आज तिचा आत्मा तृप्त झाला असावा..!

कादंबरीच्या आयुष्याला पुढे एक नवी कलाटणी, नवी लय प्राप्त होणार होती... तिच्या प्रणितच्या प्रेमळ साथीने ...!!

कादंबरीला भविष्यात सन्मानाने जगण्याचा, प्रणितचं प्रेम मिळविण्याचा पूर्ण हक्क, अधिकार होता ... आणि तिचा तो हक्क कुणीही नाकारू शकलं नसतं ... अगदी नियतीसुद्धा...! कारण नियतीला सुद्धा यावेळेस तिचा हक्क नाकारण्याची , तिच्यावर पुन्हा एकदा अन्याय करण्याची हिंमत झाली नसती..!!

समाप्त..!!

___________________ XXX________________

( मनोगत - नमस्कार, रसिक वाचक मित्र-मैत्रिणीनों,
तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनाने मी एक दीर्घकथा लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न केला ... प्रयत्न कसा जमलायं ते तुमच्यासारखे चोखंदळ आणि रसिक वाचकच ठरवू शकतील.

तुम्ही सर्वांनी नियमितपणे आपला अमूल्य वेळ काढून कथेचे सगळे भाग वाचले, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी सर्व ज्ञात- अज्ञात वाचकांची मनपूर्वक आभारी आहे.

सदर कथेच्या लेखनात काही त्रुटी, सूचना असतील तर मित्रत्वाच्या तसेच रसिक वाचक या नात्याने दर्शवून दिल्यास मी त्या सूचनांचे स्वागतच करेन. पुढील लेखनात त्या त्रुटी मी सुधारण्याचा माझ्या परीने नक्की प्रयत्न करेन...!!)

लोभ असावा..!!

धन्यवाद..!!

रूपाली विशे - पाटील

____________________ XXX_______________

कथेचे सगळे भाग वाचक खालील link वर वाचू शकतात..

https://www.maayboli.com/node/78671
https://www.maayboli.com/node/78699
https://www.maayboli.com/node/78724
https://www.maayboli.com/node/78754
https://www.maayboli.com/node/78786

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अंतिम भाग खरंचच तुझ्या नेहमीच्या कथांसारखा झाला आहे.
शेवट गोड तर सगळं गोड. छान झाली कथा !!!

अत्यंत सुरेख कथा. Happy आधी मी प्रतीसाद नाही दिला, कारण पूर्ण वाचण्याची ईच्छा आणी उत्सुकता होती. शेवट सुखाचा व आशादायक असावा अशी माझी नेहेमीच ईच्छा असते कारण निगेटिव्ह अंताने वाचक पण मनाला लावुन घेतात. एक छानसा एपिसोड होईल यावर . पूर्वी दूरदर्शन वर अश्या लहान लहान गोष्टींच्या सिरीयल असायच्या.

अजाणतेपणाने ओलांडलेली सीमा रेषा माणसाला ( म्हणजे स्त्रीयांना ) किती यातना देते ते कळते या कथेतुन.

छान झाली कथा Happy
तरल भावभावना ह्या भागात सहजपणे उतरल्यात Happy
रेणुकेला न्याय दिलात हे एक बरं झालं Happy

शेवट सुखाचा व आशादायक असावा अशी माझी नेहेमीच ईच्छा असते कारण निगेटिव्ह अंताने वाचक पण मनाला लावुन घेतात+११११
(वाचक म्हणजे मी पण लावून घेते मनाला, त्रास होतो, मीन रास काय करणार )

सुखांत आवडला. मला वाटलेलं , कादंबरीही रेणुकाच्या गावी येउन तिच्यासोबत काम करेल .
पण ठीक आहे . शेवटी तीच आयुश्य ही मार्गी लागलं Happy

छान आहे कथा.

रेणुका आपल्या घरकुलात नेत्राच्या प्रेमळ मैत्रीमुळे >>> या नेत्राचा उल्लेख आधी कुठे आला आहे नेमका? माझ्या नजरेतून सुटला का? हाच एक रेफ लागला नाहीये मला.

छान

रानभुली - धन्यवाद, तू नेहमीचं प्रोत्साहन देतेस..

रश्मीजी - धन्यवाद, तुम्ही माझ्या प्रत्येक कथेवर खूप छान प्रतिसाद दिलायं.. अगदी पूर्ण कथेचं सार तुम्ही तुमच्या प्रतिसादात लिहिता..

किल्ली - धन्यवाद, तू स्वप्नात पाहिलं होतंस ना, रेणुकाला न्याय मिळाला म्हणून , तसंच स्वप्नं मी पण पाहिलं. रेणुकाला न्याय देण्यात तुझा पण वाटा आहे..

स्वस्ति - धन्यवाद, तुम्हांला कथेचा सुखांत आवडल्याबद्दल..!!

सामो - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी...!

जाई - धन्यवाद, नेहमीच छान प्रतिसाद देतेस..!

rmd - धन्यवाद, तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..
नेत्राचा उल्लेख आधी कुठे आला आहे नेमका? >> चौथ्या भागात ती रेणुकाला पत्र पाठवते असा उल्लेख आहे. मूळ कथेत नाही तिचा उल्लेख..!

मानवजी - धन्यवाद, तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी.!.

साधनाताई - धन्यवाद, तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

बन्या - धन्यवाद , तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

मृणाली - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!

लावण्या - धन्यवाद , नेहमी प्रोत्साहन देतेस..!

अज्ञातवासी - धन्यवाद, तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी ...!

छान कथा.
उत्तमरावची हत्या करणारा तो अज्ञात मारेकरी प्रणितच होता असा उलगडा शेवटी केल्यास कथा वेगळ्याच उंचीवर जाईल.

अभिनंदन रूपाली,
पहिलीच मोठी कथा..
खूप छान झालीय!
सकारात्मक शेवट छान वाटला...

मामी - धन्यवाद , तुम्ही नेहमीच प्रोत्साहन दिलंत.!!

हाडळीचा आशिक - धन्यवाद, तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..
तुम्ही पण चांगल सुचवलंय .. कदाचित तशीही कलाटणी देता आली असती कथेला..!!

rmd - धन्यवाद..

योगी९०० - धन्यवाद, तुम्हांला सकारात्मक शेवट आवडल्याबद्दल..!

शापित आयुष्य - धन्यवाद,तुम्हांला कथा आवडल्याबद्दल.!

गौरी - धन्यवाद, नेहमी प्रोत्साहन दिलंस..!

मनिम्याऊ - धन्यवाद, तुम्हाला कथा आवडल्याबद्दल..!

सामी - धन्यवाद, तुझ्या शुभेच्छांसाठी ..!!
जमलं तर नक्की प्रयत्न करेन...

गार्गी - धन्यवाद, तुला कथा आवडल्याबद्दल..!

सुंदर झाली कथा..
सकारात्मक शेवट आवडला..कथेतील कविताही छान होत्या..तुझ्या पुढील लेखनास खूप शुभेच्छा.

शब्दवर्षा - धन्यवाद .. कथा आवडल्याबद्दल..!
राणी - धन्यवाद, नेहमी प्रोत्साहन दिलं तू..!

'अडकलेली ' हि वाचकांनाच अडकवून ठेवणारी , पॉझिटिव्ह शेवट असलेली कथा . दीर्घकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न अतिशय यशस्वी झालाय . वाचकांच्या प्रतिसादावरून ते लक्षात येतय ,

अभिनंदन अन पुलेशु !

बिपिनजी धन्यवाद,

तुमचं नेहमीचं प्रोत्साहन कामी आलंय...
तुमच्या शुभेच्छांसाठी पुनश्च धन्यवाद...!

Pages