अडकलेली - भाग १ : कादंबरी

Submitted by रूपाली विशे - पाटील on 25 April, 2021 - 09:41

अडकलेली - भाग १ - कादंबरी
_________________________________________

"येऊन.. येऊन ...येणार कोण...?
" उत्तमभाऊ शिवाय आहे तरी कोण...?"

"उत्तमभाऊंचा.... विजय असो..!"

" आला रे ss आला .. जनसेनेचा वाघ आला ss ..!"

उत्तमभाऊंच्या विजयी घोषणांनी सारा आसमंत दणाणून चालला होता. उघड्या जीपमधून उत्तमभाऊंच्या विजयाची मिरवणूक निघालेली. उत्तमभाऊंचे समर्थक, जनसेना पक्षाचे हौशी कार्यकर्ते अगदी जोशात डिजेच्या तालावर नाचत होते. सगळीकडे एक उत्साह संचारलेला..!!! रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल व फुलांची उधळण सुरू होती.

उत्तमभाऊ तोडकर म्हणजे जनसेना पक्षाचा धडाडीचा नेता. तो शहरातील नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यामुळे, त्याच्या विजयाप्रित्यर्थ शहरातल्या मुख्य चौकातून त्याची मिरवणूक निघालेली.

ग्रामपंचायत असलेल्या गावाचे शहरीकरण होत पुढे नगरपालिकेमध्ये रूपांतर झाले. गावच्या ग्रामपंचायतीचा साधा सदस्य असलेला उत्तमभाऊ पुढे गावचा सरपंच बनला. पुढे ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यावर आधी नगरसेवक आणि पुढे शहराचा नगराध्यक्ष असा उत्तमभाऊचा राजकीय प्रवास सुरू झाला.

धाडसी, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा उत्तमभाऊ कार्यकर्त्यांच्या गळ्यातला ताईत होता. शहरात त्याचा मोठा दरारा होता ; आणि का असणार नाही? .... नव्यानेचं विकसित होणाऱ्या त्या शहरातलं उत्तमभाऊ मोठं प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं ..!! प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा , दुर्बल , गरीब जनतेच्या अडी-अडचणी सोडविणारा उत्तमभाऊ जनतेचा तारणहार बनला होता.

उत्तमभाऊच्या दारात दहा-बारा मोठे मालवाहू ट्रक उभे होते. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात पहिलं पाऊल टाकणाऱ्या उत्तमभाऊने आपल्या व्यवसायाद्वारे कित्येक गरीब घरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. आता शहरात नव्यानेच जोम धरलेल्या बांधकाम व्यवसायातसुद्धा तो उतरू लागलेला. !!

' जिथे अडचण .. तिथे उत्तमभाऊ.!!' असं समीकरण होतं. तर, अशा या कनवाळू व्यक्तिमत्वाला लोकांनी पूजलं, तर त्यात नवल ते काय? उत्तमभाऊंच्या कार्यालयात मदत मागणारे दिवस उजाडल्यापासून गर्दी करत. उत्तमभाऊनेही कधी कुणाला नाराज केलं नाही. कुणाला कुठलीही अडचण असू दे, उत्तमभाऊ ती सोडविणार नाही, मदत करणार नाही असं शक्यंच नव्हतं.

" जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा "

हे ब्रीदवाक्य त्याच्या कार्यालया वरच्या पाटीवर ठळक अक्षरात झळकत होतं.

__________________ XXX______________

"लाज सोडली का रे तुम्ही सगळ्यांनी? कॉलेजला जाता असं घरून सांगून निघता आणि तिथे लॉजमध्ये जाऊन भलतेचं रंग उधळता..! शिकायच्या वयात फालतू उद्योग कसे काय सुचतात रे तुम्हांला?" इन्स्पेक्टर प्रकाश पोलीस स्टेशनमध्ये रांगेत तोंड
लपवून बसलेल्या तरुण-तरुणींवर शब्दांचे आसूड ओढत होते.

" देसले, सगळ्यांच्या पालकांना ताबडतोब बोलावून घ्या पोलिस स्टेशनमध्ये!" इन्स्पेक्टर साहेबांनी देसले हवालदारांना फर्मावलं.

" चला नंबर द्या सर्वांनी आपापल्या घरच्यांचे...!" देसले हवालदारांनी लॉजमधून पकडून पोलिस स्टेशनात आणलेल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना दरडावले.

शहरातल्या एका बदनाम लॉजची तक्रार इन्स्पेक्टर प्रकाश यांच्यापर्यंत पोहचली होती. त्या लॉजमध्ये अवैध देहव्यापार चालत असल्याची तक्रार होती. पोलिसांनी टिप मिळाल्याबरोबर बोगस गिऱ्हाईक पाठवून त्या लॉजवर छापा मारला. अवैध देहव्यापाराचा छडा लावतानाच एकमेकांच्या प्रेमात पडलेले, एकांत शोधत, अजाणतेपणी त्या लॉजमध्ये आलेले महाविद्यालयीन तरुण-तरुणी अलगद पोलिसांनी पेरलेल्या जाळ्यात अडकले.

"ए, फोन लाव घरी. आता रडून काय उपयोग?" गुडघ्यात डोकं खूपसून स्कुंदत बसलेल्या त्या तरुणीला महिला पोलिसाने खडसावलं.

ती तरुणी त्या आवाजाने दचकली. तिने गुडघ्यात खुपसलेलं आपलं डोकं हळूच वर उचललं. तिने घाबरून महिला पोलिसाकडे पाहिलं. गरीब भेदरलेल्या कोकरासारखा केविलवाणी नजर होती त्या तरुणीची.. !!

" नाव सांग..!"

" कादंबरी...!!" ती अस्पष्ट पुटपुटली.

" घरी फोन लाव !" तोच खडसावणारा आवाज.

ती भरलेल्या डोळ्यांनी महिला पोलिसाकडे पाहू लागली.

"ऐकायला येत नाही का, मी काय म्हटलं ते?" त्या आवाजाला धार आलेली.

थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाईल काढला.
तिने घाबरतच आपल्या आईला फोन लावला. समोरून फोन उचलला गेला; पण तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तिच्या सर्वांगाला थरथर सुटलेली. पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या कोपऱ्यात तो उभा होता, तिला लॉजवर घेऊन येणारा.. ' प्रणित ' ..तिचा मित्र, तिचा प्रियकर...!! अजाणत्या, नकळत्या वयात हातून घडलेली मोठी चूक आता दोघांनाही गोत्यात आणणार होती.

तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर ही भांबावलेली. एकमेकांवर नजर पडताच दोघांच्याही डोळ्यांत अश्रू आले. आपण किती मोठी चूक करून बसलो आहोत हे त्यांच्या ध्यानात आलं. पण आता समोरच्या परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांना समजून चुकलं.

"काय रे.. ए मजनू, कॉलेजला शिकायला जातो ना आई- बापाच्या कष्टाने.. असं पांग फेडतोस का रे त्यांचे ? ह्या तुझ्या लैलाने तिच्या घरच्यांच्या दबावाखाली येऊन जबाब फिरवला ना , तर जाशील ना बाराच्या भावात ... जायचंय का तुला खडी फोडायला तुरुंगात ? " इन्स्पेक्टर प्रकाश त्या तरुणावर कडाडले. त्याने घाबरून तिच्याकडे पाहिलं. तिला त्याच्याकडे पाहून पुन्हा एकदा रडू कोसळलं. गुडघ्यात मान घालून ती परत स्फुंदू लागली.

" प्रेम आहे आमचं एकमेकांवर..!" तो अडखळत, कापऱ्या आवाजात म्हणाला.

एक सणसणीत त्याच्या थोबाडीत बसली. ते पाहून तिच्या काळजात कळ उठली. तिला जास्तच रडू कोसळलं.

" प्रेम नाही .. शारीरिक आकर्षण आहे ते ..! कमवायची अक्कल नाही आणि निघाले प्रेम करायला.. त्या लॉजवाल्या शेट्टीचा गल्ला आणि बँकेचं खातं फुगत चाललंय ह्या आजकालच्या मूर्ख मुलांमुळे..!" इन्स्पेक्टर प्रकाश जरी असं कठोरपणे म्हणाले असले , तरी त्यामागे अजाणत्या वयात मुला-मुलींचं चुकीच्या मार्गावर पडणारं पाऊल आणि त्यातून घडणारे गुन्हे ह्याविषयी तळमळ जाणवत होती.

__________________ XXX______________

आपल्या लेकीचा फोन आलेला पाहून घाईघाईने उषाने फोन उचलला. पण समोरून लेकीचे शब्दच ऐकायला येत नसल्याने उषाचे प्राण कंठाशी आले.

" कादंबरी... अग, बोल काय झालं ? सांग ना..? " उषा घाबरून फोनवर म्हणू लागली.

महिला पोलिसाने कादंबरीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि उषाला तातडीने पोलिस स्टेशनमध्ये यायची वर्दी दिली. लेकीला काय झालं असावं, ह्या भीतीने उषा गारठून गेली.

उषा एका औषध बनवणार्‍या कंपनीत कामाला होती. तिथे अर्धा दिवसाची सुट्टी टाकत ती धावत पळत उत्तमभाऊंच्या कार्यालयात पोहचली. घामाघूम होऊन धापा टाकत आलेल्या उषाला पाहून उत्तमभाऊ चमकले. तिने पोलीस स्टेशनमधून आलेल्या फोनची व तिला तातडीने तिथे बोलाविले असल्याची खबर त्यांना दिली.

" भाऊ, तुम्ही चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला..! मला भीती वाटते हो, मला मदत करा !" उषा गयावया करू लागली.

" ठीक आहे .. उषाताई..! मी येतो तुमच्या सोबत... घाबरायची काही गरज नाही .!" असा दिलासा देत उत्तम भाऊ उषा सोबत पोलीस स्टेशनला पोहचले.

आता उत्तमभाऊ सारखे समाजोभिमुख व्यक्तिमत्व पोलीस स्टेशनची पायरी चढतेयं, हे पाहून पोलिसांनी दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. पोलिसांनी त्यांचे आदरतिथ्य योग्य प्रकारे केलं. उत्तमभाऊंनी पोलिसांकडून प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली.

"जाऊ द्या हो इन्स्पेक्टर साहेब , तरुण सळसळतं रक्त आहे .. चुका त्यांच्या हातून नाही घडणार तर कुणाच्या हातून..? सोडा.. जाऊ द्या त्यांना घरी..!" गरमागरम भजी आपल्या तोंडात टाकत उत्तमभाऊ म्हणाले.

" हो भाऊ, पण परत अशी चूक घडता कामा नये त्यांच्या हातून..!" इन्स्पेक्टर प्रकाश म्हणाले.

" नाही घडणार पुन्हा, मी हमी देतो ..!" उत्तमभाऊ हसत - हसत म्हणाले.

इन्स्पेक्टर साहेबांनी तंबी देऊन प्रणित आणि कादंबरीला उत्तमभाऊंच्या सांगण्यावरून सोडून दिलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच उषा उत्तमभाऊंच्या पायावर कोसळली; त्यांचे चरण वंदण्यासाठी ..! आज तिची लाज उत्तमभाऊंनी राखली होती. ती रडू लागली. लेकीमुळे आज तिला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली होती.

कादंबरीची मान शरमेने झुकलेली. उत्तमभाऊने उषाची समजूत घातली. उषाने जळजळत्या नजरेनं लेकीकडे पाहिलं. त्या नजरेत अंगार फुललेला. कावऱ्याबावऱ्या झालेल्या कादंबरीने मान खाली घातली. क्षणभरासाठी तिने हळूच आजूबाजूला नजर फिरवली. तिची नजर प्रणितचा शोध घेऊ लागली. तो एका कोपर्‍यात खालमानेने उभा होता. खालमानेनेचं तो उत्तमभाऊंशी बोलत होता. उत्तमभाऊ त्याला समजावित होते की, दरडावित होते..?. ती व्यथित झाली.

कादंबरी आपल्या आईच्या मागोमाग खालमानेने घराच्या दिशेने निघाली. चालता- चालता तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून चोरून प्रणितकडे पाहिलं. दोघांची नजरभेट झाली. काय होतं त्या नजरेत..??? प्रेम, आकर्षण, विरह, विवशता...! तिच्या डोळ्यांतून दोन अश्रू ओघळले.

आपण करतोय ते प्रेम आहे की निव्वळ आकर्षण..?? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तसं निव्वळ शारिरीक आकर्षण आहे का हे..??? पण मग, आता ज्या भावना आपल्या मनात प्रणितबद्दल उंचबळूंन आल्यात त्याला काय नाव द्यावं.??. तो आपल्यापासून दुरावेल ह्याची भीती वाटणं , त्याच्या काळजीने आता आपल्या हृदयाचे ठोके वाढलेतं ... काय आहे हे सारं..?? नाही..हे निश्चितच शारिरीक आकर्षण नाही. जगाने ह्या अलवार भावनांना काहीही म्हणू दे, पण मी ह्या भावनांना 'प्रेम' हेच एकमेव नाव देईन..! कादंबरी आपल्याच विचारात खालमानेने आपल्या आईच्या पाठी चालत होती.

आपल्या आईसोबत कादंबरी घरी पोहचली. आज तिला आपलं घर, आपली आई परकी वाटू लागलेली. उषा रस्त्यातून येताना शांत होती. एका चकार शब्दानेही तिने आपल्या लेकीला टोकलं नव्हतं. दोघींनीही घरात प्रवेश केल्याबरोबर उषाने घराच्या सगळ्या खिडक्या , पडदे लावून दरवाजा बंद करून घेतला. तिचं लक्ष घरातल्या कोपऱ्यात गेलं. तिचे डोळे संतापाने पेटून उठले. कोपर्‍यातली लाकडी काठी तिने उचलली. विषण्ण मनाने खुर्चीवर बसू पाहणाऱ्या कादंबरीच्या पायावर तिने हातातल्या काठीने एक जबरदस्त फटका मारला. त्या काठीच्या माराने होणाऱ्या वेदनेने कादंबरी विव्हळली.

"नको आई .. नको मारू गं ...! माफ कर मला. मी परत नाही असं वागणार .. !" रडत - विव्हळत कादंबरी आपल्या आईच्या पायावर कोसळली.

" माफ करू तुला...?? कुठल्या तोंडाने म्हणतेस माफ करायला.. ? काळ्या केलेल्या तोंडाने...???" संतापाने बेभान झालेल्या उषाने दुसरा फटका तिच्या खांद्यावर दिला.

हातातली काठी फेकून उषाने आपल्या लेकीला हाताने थपडा द्यायला सुरुवात केली. ती कादंबरीला मारत
सुटली...अगदी तिच्या हाताला मुंग्या येईपर्यंत ..!!

कादंबरी रडत - भेकत राहिली; पण आज उषाला आपल्या लाडक्या लेकीवर जराही दया दाखवायची नव्हती. लेकीला मारून थकलेली उषा जमिनीवर मटकन बसली. तिला मानसिक ग्लानी आली. तिच्या भावनांचा बांध फुटला.

"आजचा दिवस पाहण्यासाठी जन्म दिला का मी तुला? चार वर्षाची होतीस बाप मेला तेव्हा. आठवतो तरी का आपल्या बापाचा चेहरा..? तेव्हापासून रक्ताचं पाणी करून वाढवली आणि आज त्या लॉजमध्ये जाऊन तोंड काळं केलंस तू?"" उषा आपलं डोकं बडवू लागली.

आपल्या आईचा जमदग्नीचा अवतार पाहून कादंबरी एखाद्या हरवलेल्या मांजरीच्या पिल्लासारखी अंग मुडपून कोपऱ्यात बसून थरथर कापत रडू लागली.

" किती मोहाचे क्षण आले असतील माझ्या आयुष्यात, विचार केलायं का कधी आपल्या आईचा?? कंपनीतला तो सुपरवायझर राऊत , तुझ्यासकट स्वीकारायला तयार होता मला ; पण तुला सावत्रपणाचा जाच नको म्हणून नकार दिला मी त्याला. नवरा गेल्यानंतर एखाद्या कुमारीकेसारखं आयुष्य काढलंय मी आणि तू कलंक लावलास माझ्या नावाला ..! " उषा संतापाने बोलू लागली. ती थकली. बराच वेळ घरात दोघींच्या अस्फूट हुंदक्याचे आवाज घुमत राहिले.

बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला.. धरतीवर पावसाच्या सरी कोसळू लागल्या आणि घरात उषा आणि कादंबरीच्या डोळ्यांना अश्रूंच्या सरी लागलेल्या..! दिवेलागणीची वेळ झाली तरी, आज घरात अंधार भरून राहिलेला ... तो जणू दोघींच्याही आयुष्यात प्रवेश करण्यासाठी दबा धरून बसलेला..!!

दुसऱ्या दिवशी पहाटे उषा कामाला निघून गेली, कादंबरीशी एक शब्दही न बोलता..! कादंबरीचं मन उदास झालेलं. तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. घराबाहेर पाऊल टाकण्याची तिची हिंमत झाली नाही. उषा पोटासाठी जरी बाहेर जात असली , तरी तिचीही मनस्थिती आपल्या लेकीपेक्षा वेगळी नव्हती. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे रोखून पाहत आहेत, असा भास दोघींना होऊ लागलेला.

आज उषाचं कामात जराही लक्ष लागत नव्हतं. तिचं डोकं मनस्तापाने ठणकू लागलेलं. वेड्या-वाकड्या विचारांची असंख्य गर्दी डोक्यात जमलेली. तिने सुट्टी घेतली. दोन दिवसांपासून घरातलं वातावरण धीरगंभीर बनलेलं होतं. कादंबरीने आपल्या आईशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला; पण उषाच्या मनात लेकीबद्दल भयंकर तिरस्कार भरून राहिलेला. ह्या साऱ्या मागे आपलंच काहीतरी चुकलंय अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात रुजू लागली. नवरा गेल्यानंतर बापाची उणीव जाणवू न देता वाढवलेल्या लेकीने दिवसा तारे दाखवल्यामुळे चारित्र्यवान आणि सोज्वळ मनाची उषा मानसिकरित्या खचून गेली. उभ्या आयुष्यात कधीही पोलीस स्टेशनची पायरी न चढलेल्या उषाला लेकीपायी पोलिसांचे चार अपमानकारक शब्द ऐकावे लागले होते. अख्खं आयुष्य स्वाभिमानाने जगणाऱ्या उषाला लाचारीने उत्तमभाऊच्या पायावर लोळण घ्यावी लागली होती.. आणि हे सारं घडलं होतं लेकीच्या निव्वळ शरम आणणाऱ्या कृत्यामुळे ! तिला भयंकर संताप आलेला आपल्या लाडक्या लेकीचा..!

ती घरातल्या खिडकीजवळ विमनस्क अवस्थेत बसून राहिली. अचानक खिडकीबाहेर तिची नजर गेली. घरासमोरच्या गल्लीतून एक मोठी गाडी येताना तिच्या नजरेस पडली. गाडी तिच्या घराच्या दिशेने येत होती. भर दुपारी गाडी तिच्या दारात थांबली. कामगारांची वस्ती असल्याने आजूबाजूचे रहिवासी दिवसभर पोटापाण्यासाठी बाहेर गेलेले. सगळ्या घराचे दरवाजे बंद. ती दारात आली. गाडीतून खुद्द शहराचे नगराध्यक्ष उत्तमभाऊ उतरले. ती अचंबित झाली. आपल्याकडे येण्याचं काय बरं प्रयोजन असावं त्यांचं??? ती विचारात पडली. पळतच ती घराच्या पायऱ्या उतरून त्यांच्या गाडी जवळ पोहचली.

"भाऊ, नमस्कार ! तुम्ही इथे?" तिने उत्साहाने त्यांना विचारलं.

" इथूनच जात होतो.. रस्त्यात तुमचं घर दिसलं, म्हटलं अनायासे इथून जातोयं तर तुम्हाला भेटून जावं !!" उत्तमभाऊ अतिशय नम्रपणे उद्‌गारले.

" या .. या .. भाऊ, त्यानिमित्ताने आमच्या गरीबाच्या घराला तुमचे पाय तरी लागतील..!" उषा अजीजीने म्हणाली.

" कुठे आहे कादंबरी..? " घरभर नजर फिरवत उत्तमभाऊने उषाकडे विचारणा केली.

" घरातच आहे ती..!" त्यांच्यासमोर खुर्ची धरत उषाने उत्तर दिलं.

" अभ्यासात लक्ष घालते ना ती....?"

" काय सांगायचं भाऊ ? तुम्हीचं समजावा तिला आता.. वडीलांच्या पश्चात पोरकी झालेली माझी लेक...! वडीलकीच्या नात्याने चार चांगले शब्द समजावून सांगा तिला तुम्ही आता..!" उषाने डोळ्यांना पदर लावला.

उषाने कादंबरीला बाहेर बोलाविले. खाली मान घालूनच कादंबरी समोर आली. तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत उत्तमभाऊ उषाकडे नजर फिरवित म्हणाले,

" बरं उषाताई, आमच्यासाठी काही चहा-पाण्याचं पाहाल की नाही..?"

" हो.. हो.. आणते ना ..! " अजून आपण घरात आलेल्या उत्तमभाऊंना पाणीसुद्धा न विचारल्याने उषा शरमली.

" एक मिनिटं, उषाताई... मला आता सिगारेटची तलफ आलीयं... मला दुकानातून सिगारेट आणून द्या बरं..!" उत्तमभाऊने जवळ-जवळ उषाला हुकूम केला.

उषाने भेदरून उत्तमभाऊंकडे पाहिलं. प्रचंड दरारा, पोटात भीतीने गोळा आणणारी जरब असलेले ते डोळे उषाताईकडे रोखून पाहत होते.

" तुम्हांला ऐकायला आलं नाही का, मी काय म्हटलं ते? जा ...बाहेर जाऊन मला सिगारेट आणून द्या.. आणि तासाभराने परत या.... क्काय..??!! मी समजावतो चांगल्या रितीने कांदबरीला .. जा तुम्ही!" उत्तमभाऊंचा छातीत धडकी भरवणारा आवाज आणि गालातल्या गालात उमटणाऱ्या छद्मी हास्याने उषा भानावर आली.

तिच्या छातीत धडधड वाढली. उत्तमभाऊंचं एक वेगळंच रूप तिच्या डोळ्यासमोर साकारू लागलं. तिने घराबाहेर पाऊल टाकलं आणि उत्तमभाऊने उषाच्या पाठीमागे घराचा दरवाजा खाडकन् लावून घेतला. आतल्या लावलेल्या कडीच्या आवाजाने उषाच्या हृदयाला चरा पडल्या. एखाद्या खरखरीत भिंतीवर नखांनी ओरखडे मारल्यावर जसा काटा अंगावर उभा राहतो , तसाच काटा तिच्या अंगावर उभा राहिला. तिने पदराचा बोळा तोंडात कोंबून दबक्या आवाजात हुंदका दिला.

समाजात लोकनेता म्हणून उजळ माथ्याने फिरणारा हा एक वासनांध सैतान आहे. काळ्या कातळाला शेंदूर फासून देव बनवलं आहे लोकांनी...! मनात उत्तमभाऊला असंख्य शिव्याशाप देत उषा घराच्या पायऱ्या उतरून रस्त्याने यंत्रवत चालू लागली. तिला कळून चुकलं की, समाजसेवेचा खोटा आव आणून जनतेमध्ये लोकप्रिय असलेला हा एक धूर्त भामटा आहे. त्याने आपल्याला जी मदत केली आहे त्या मदतीचा मोबदला तो पूरेपूर वसूल करेल ... आपल्या लेकीच्या अब्रूचे लचके तोडून..! तिच्या काळजात कळ उठली.

" नालायक कार्टी, एक घोडचूक करून कुठल्या दलदलीत फसलीयं.!" तिच्या हातापायाला कंप सुटला. डोक्याला हात लावत ती मटकन रस्त्याच्या कडेला बसली. तिच्या डोळ्यांतून टिपं गळू लागली.

अचानक तिच्या समोरून एक मांजर आपल्या तोंडात आपलं पिल्लू घेऊन तिला पळताना दिसली. मांजरीमागे एक काळा कुत्रा लागलेला, तिच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी..! कुत्र्यापासून आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी मांजर अक्षरशः जीव तोडून धावत होती. धावून दमलेली मांजर क्षणभरासाठी जागेवर थांबली. तिने आपल्या तोंडातलं पिल्लू जमिनीवर ठेवलं आणि अतिशय त्वेषाने ती पाठीमागून येणाऱ्या कुत्र्याच्या अंगावर धावून गेली. कुत्रा क्षणभर गांगरला. मांजरीचा बदललेला होरा पाहून तो मागे फिरला.

उषा हे सारं चमत्कारिक नजरेनं पाहत होती. मनात काहीतरी ठरवित ती चवताळून उठली.

"वाचवायला हवं...वाचवायला हवं... आपल्या लाडक्या लेकीला त्या हैवानाच्या तावडीतून सोडवायला हवं..!"

ती निर्धाराने उठून घराच्या दिशेने धावू लागली ... आणि अचानक समोरून वेगाने येणार्‍या प्रचंड ट्रकचा करकचून ब्रेक लागला. ट्रकच्या चाकांना खीळ लागून ती रस्त्यावर रुतली. एखादा चेंडू हवेत फेकला जावा, तशी क्षणार्धात उषा वर हवेत फेकली गेली. तिच्या तोंडातून अस्फूट किंकाळी फुटली आणि तिचा इवलासा मनुष्यजीव झटकन देवाच्या दारात पोहोचला.

आपल्या लाडक्‍या लेकीची इज्जत वाचविण्याचा तिचा प्रयत्न अधांतरीच राहिला. तिच्या मनात चाललेला भावकल्लोळ क्षणात थांबला. उषाचा आत्मा शांत झाला ... कायमचाच..!!

क्रमशः

धन्यवाद.!

रूपाली विशे - पाटील
__________________________________________

( टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साध्यर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप्रे ! भयानक आहे. वेगवान शैली आहे.
मागच्या कथाही अशाच विषयांवर होत्या. टॅबू विषयावर झगझगीत झोत टाकण्याची धमक आहे लेखणीत .
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

जबराट!!.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

शेवट थरारक....
नेहमीप्रमाणे छान सुरुवात....

सामो, रानभुली, मानवजी, वर्णिता, मामी , प्राचीन, मृणाली, अज्ञातवासी, जाई, लावण्या..!!

तुमच्या प्रतिसादासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही वेळ काढून माझी कथा वाचता त्यावर प्रतिसाद देता... खूप छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद वाचून. ..!!

कथेचा पुढचा भाग दोन दिवसांनी टाकेन..!
यावेळेस मायबोलीवर मिळालेल्या रसिक वाचकांच्या प्रोत्साहनाने भारावून दिर्घकथा लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न केलायं.

मस्त लिहलंय... अगदी खिळवून ठेवलं.तुझ्या कथा छान असतात.आवडतात वाचायला.आता पुढील भागाची प्रतीक्षा आहे.

कथा छान म्हणता येत नाहीय कारण एवढं गुंतायला झालं कि शेवटी जीव हळहळला (तुमच्या लिखाणाची ताकद) .
प्लिज शोकांतिका दाखवू नका.

दिपक - धन्यवाद, कथा आवडल्याबद्दल..!!

अतुलजी - धन्यवाद.. छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून..!

बिपिनजी - धन्यवाद, तुमचा प्रतिसाद नेहमीचं हुरुप आणतो लेखनासाठी..!

राणी - धन्यवाद, खूप छान वाटलं तुझा प्रतिसाद वाचून..

आनंद - धन्यवाद.. तुमच्या शुभेच्छांसाठी...

गौरी - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!!

शापित आयुष्य - धन्यवाद... कथेवरच्या प्रतिसादासाठी..!

वीरुजी - धन्यवाद, तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!

किल्ली - धन्यवाद , तुझ्या प्रोत्साहनासाठी..!

स्वातीताई, - धन्यवाद, तुमचा प्रतिसाद माझा नेहमीच हुरुप वाढवतो.

भाग्यश्री - धन्यवाद , तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी ..!!

सामी - धन्यवाद , तुमच्या प्रतिसादासाठी.. तुमचा प्रतिसाद मनाला भावला!

तुम्हां सर्वांचा प्रतिसाद एखाद्या हौशी नवोदित लेखकासाठी लेखन केल्याचं समाधान देणारा आहे. एखाद्या वाचकाने कथेत गुंतून कथेबद्दल पुढचा विचार करावा .. हेच त्या लेखकाला पुढचं लेखन करण्यासाठी हुरुप आणणारं आहे. सदर कथा बीज जरी दुःखद असलं तरी कथेचा शेवट हा सकारात्मकचं असेल.