अडकलेली भाग-५ : रेश्मा, देवदासी आणि रेणुकाची सुटका..!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 May, 2021 - 09:46

अडकलेली भाग-५ : रेश्मा, देवदासी आणि रेणुकाची सुटका..!!
__________________________________________

" जा.. कही जा के मर जा... पैदा होते ही, अपने बाप को खा गया.. अब मुझे खा..!" भयंकर संतापलेली रेश्मा आपल्या पाच वर्षाच्या मुलावर खेकसत, त्याच्या पाठीत रागारागाने रट्टे घालत होती. तिला आपल्या मुलाला असं मारताना पाहून कादंबरी धावत तिच्याजवळ गेली. तिचा हात पकडून म्हणाली.

" रेश्मा, का मारतेस गं त्याला..??"

"फिर क्या करू मैं ?? मेरा तो नसीब ही फुटा हुआ है! इसके पैदा होते ही, इसका बाप मर गया और अब मुझे परेशान कर के रखा है इसने..!" रेश्मा रडू लागली. आपल्या आईला असं रडताना पाहून तो चिमुकला अजूनच कावराबावरा झाला.

तो लहानगा कुठल्यातरी गोष्टीसाठी आपल्या आईकडे हट्ट धरून बसला होता ; आणि तो हट्ट पुरवायला त्याची आई असमर्थ होती. त्या असमर्थतेतून येणारी चिड, हतबलता, वैफल्य ती आपल्या मुलाला मारून, त्याच्यावर रागावून व्यक्त करीत , आपला राग शांत करू पाहत होती; आणि तो चिमुकला त्याला बसणार्‍या आईच्या हातच्या माराने आणि भीतीने जोर-जोराने किंचाळत होता.

कादंबरीने त्या लहानग्याला रेश्माच्या हातून सोडवून तिच्यापासून दूर नेलं. त्याला तुरुंगात कैद्यांसाठी असलेल्या उपहारगृहातून खाऊ घेऊन दिला. त्या लहानग्याच्या निरागस चेहर्‍यावर निष्पाप हसू पसरलं; ते पाहून कादंबरीला विलक्षण समाधान वाटलं.

" स्वतःच्या पोटच्या लेकराचा गळा घोटलायं आणि परक्याच्या मुलाला जीव लावतेयं... काय बाई रित असते एकेकाची..!! " एका कैदी स्त्रीने सूचकपणे तिला ऐकू जाईल असा टोमणा मारला. तो तिच्या जिव्हारी लागला. पण तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिला त्याची सवय झाली होती.

तुरुंगात राहणाऱ्या स्त्री कैद्यांना आपलं मुलं सहा वर्षांचे होईपर्यंत तुरुंगात स्वतः जवळ ठेवण्याची परवानगी कायद्याने दिलेली असते. त्यामुळे बऱ्याच कैदी स्त्रिया त्यांच्या जवळ त्यांची लहान मुलं बाळगत असत. रेश्मा त्यातलीच एक ...लेकुरवाळी कैदी स्त्री....!!

रेश्मा एक बारबाला होती. ती मुळची पश्चिम बंगालची. एका अपघातात अचानक तिचा नवरा गेला आणि रेश्माचा संसार उघड्यावर पडला. घरचं दारिद्रय तिच्या पाचवीला पुजलेलं. पदरात एक लहान बाळ !!... पोटातली आग माणसाला काहीही करायला लावते.. अगदी मनाविरुद्ध..!!

नवरा गेल्यानंतर पोटापाण्यासाठी ती नाईलाजाने
कोलकाताच्या सोनागाच्छी रेड लाइट एरियात वेश्या व्यवसाय करू लागली. तिथे तिला भेटला गौरांग दास ..!

गौरांग दास एक दलाल होता. रेश्माला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याने तिला वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढून नोकरी लावण्याचं आमिष दाखवित मुंबईला आणून डान्सबारमध्ये जबरदस्तीने बारबाला बनण्यास भाग पाडलं. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी तिची अवस्था झाली. शेवटी तिच्या हातून हत्या घडली , तिला फसवून आणणाऱ्या , तिचं शारीरिक , मानसिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या ...... एका भाडखाऊ दलालाची...! आणि त्या गुन्ह्याची दोषी म्हणून ती खितपत पडली होती तुरुंगात.. आपल्या चिमुकल्यासह..!

कादंबरीचे तुरुंगातले दिवस पुढे पुढे सरकत होते.

"सोडा मला ...सोडा मला .. मला हात नका लावू ...! " अश्या आरोळ्यांनी तुरुंगाचा परिसर एके दिवशी दणाणून उठला. चोरी केल्याच्या आरोपाखाली एक स्त्री कैदी त्या दिवशी तुरुंगात दाखल झाली होती.

ती स्त्री अल्प मुदतीची कैदी होती. तिचा एकंदरीत अवतार भयानक दिसत होता. केसांच्या जटा वाढलेल्या, अंगावर मळाची आवरणं चढलेली, दात काळे - पिवळे पडलेले. तिच्या अंगातून भयंकर दुर्गंधी येत होती. ती कदाचित वेडी असावी , असं तुरुंगात सगळ्यांना वाटलं.

ती स्त्री कुणालाही जुमानत नव्हती. दोन्ही हातांनी डोक्यात खराखरा खाजवत; चेकाळल्यासारखी इथून - तिथून पळत होती.

" इथे ये माझ्याजवळ, शांत बस पाहू ..इथे.. !!" रोहिणी मॅडम खर्जातल्या कडक आवाजात तिला म्हणाल्या.

ती त्यांच्याकडे एकटक पाहत राहिली. पुन्हा डोक्याला, अंगाला दोन्ही हातांनी खाजवत, ती शांतपणे येऊन त्यांच्या टेबलजवळ बसली.

कोण जाणे !.. पण रोहिणी मॅडमच्या आवाजात ,शब्दांत जबरदस्त ताकद होती, हे कोणीही अमान्य करू शकलं नसतं. त्यांनी तिचं पूर्ण निरीक्षण केलं. पहिल्यांदा त्यांनी इतर स्त्री कैद्यांच्या मदतीने तिच्या केसांच्या जटा कापायला घेतल्या. पहिल्यांदा तर ती स्त्री केसांना हातच लावू देत नव्हती.

" कोप होईल... देवीचा कोप होईल... !!" असं म्हणत हात जोडत रडू - ओरडू लागलेली. पण रोहिणी मॅडमनी सगळ्या स्त्रियांच्या मदतीने तिला पकडून तिच्या केसांच्या जटा कापल्या. तिच्या जटाधारी केसांत उवा आणि लिखांचे ढिगाने वास्तव्य होतं. डोक्यात त्यामुळे खाजवून जखमा झालेल्या. त्या जखमा औषध टाकून स्वच्छ करून, अंग घासून तिला स्वच्छ आंघोळ घातली. तिला नवे कपडे घातले. नंतर तिला गरमागरम जेवण खाऊ घातलं. ताजं अन्न पोटात गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर तरतरी आली. डोक्यावरचं ओझं हलकं झाल्याने तिला मोकळं वाटू लागलं. ती शांत झाली.

नंतर तिला पाहून मघाशी आरडा-ओरडा करणारी स्त्री हिचं आहे असं आता कुणाला सांगूनही पटलं नसतं. ती शांतपणे आपल्या जागेवर बसली. प्रौढ साक्षरता वर्गात बसून पाटीवर अक्षरं गिरवू लागली ..कुणाशीही एक शब्दही न बोलता..!!

एके दिवशी न राहवून कादंबरीने तिची विचारपूस केली.

"देवाला सोडलेली देवदासी आहे मी!!" एवढंच बोलून ती गप्प बसली. कादंबरीने तिच्या हातावर मायेने हात ठेवला.

" घेतलेला नवस फेडायला म्हणून आई - बापाने देवाच्या पायरीवर सोडलं मला देवाची दासी म्हणून, देवाची दासी बनली जगासाठी... पण मला भोगदासी बनवली हैवानांनी.... त्यांना भोगण्यासाठी..!!" ती भेसूर हसली.

तिचं बोलणं ऐकून कादंबरीच्या हृदयात कालवाकालव झाली.

तुरुंगात विविध वृत्तीच्या , वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या विचारांच्या , अनेक प्रकारच्या गुन्ह्यात कळत-नकळत अडकलेल्या, कुणी जाणून-बुजून अडकवलेल्या तरीही ; सगळ्याजणींच्या हृदयातल्या भावना , जीवनातल्या व्यथा एक सारख्याच होत्या... गुन्हेगार असल्या तरीही..!!

तीन महिने शिक्षा भोगल्यानंतर त्या देवदासी असलेल्या स्त्रीची रोहिणी मॅडमनी निराधार महिलांसाठी असलेल्या स्वयंसेवी संस्थेत रवानगी केली. तिच्या पुढच्या भविष्याची सोय करून रोहिणी मॅडमनी आपल्या खात्यात अजून एक पुण्याईचं काम जमा केलं.

कादंबरीला वाचन आणि लेखनाची मुळातच खूप आवड होती. तिची ती आवड तिने तुरुंगातही जोपासलेली.

वाचन आणि लेखनाची आवड असलेल्या कादंबरीला तिची आवड लक्षात घेत रोहिणी मॅडम स्वतःच्या पैश्यांनी तिला विकत पुस्तक आणून देत असत.

फावल्या वेळेत कादंबरीने तुरुंगात एक कवितासंग्रह लिहिला. ' नातं' नावाचा..!!

एका कैदी स्त्रीने तुरुंगात राहून मोठ्या जिद्दीने, आपल्या जवळच्या कलागुणांचा विकास करत' कविता संग्रह ' लिहिल्याने सगळ्यांना तिचं अपार कौतुक वाटलं. बाल आणि महिला विकास खात्याच्या मंत्री श्रीमती नीरजा नाईक यांच्या हस्ते तुरूंगात त्याचं प्रकाशन झालं. राज्य शासनाने तिच्या कविता संग्रहाला पुरस्कृत केलं.

__ त्या दिवशी रोहिणी मॅडमनी तुरुंगात सगळ्यांना अत्यानंदाने मिठाई वाटली. तो आनंद सगळ्या कैदी स्त्रियांनी आपापसांत वाटला.

नातं____

नातं... कसं असावं...?
असावं ...त्या खळाळत्या मुग्धप्रपातासारखं
कितीही वेगाने धावलं
तरीही तोयाचं नितळ तळ गाठणारं...!

नातं ....कसं असावं...?
असावं... त्या अफाट सागरासारखं
ओहोटीने आत ओढल्यावर
भरती संगे येवून शांत किनाऱ्याच्या मिठीत सामावणारं..!

नातं.... कसं असावं...?
असावं ...त्या निश्चल बांधावरल्या तरुसारखं
कितीही घाव पडले हिरव्या तनावर
तरीही थकल्या जीवाला सावली देणारं...!

नातं... कसं असावं...?
असावं... त्या शीतल शशीच्या चांदण्यासारखं
दिनभर उन्हाच्या झळा सोसल्यावर
शांत निशेच्या अंतरी शीतलता पेरणारं...!

नातं ....कसं असावं...?
असावं... त्या नभी भिर-भिरणाऱ्या विहंगासारखं
कितीही उंच झेपावलं तरी घरटाच्या ओढीने परतणारं...!

नातं कसं असावं...?
असावं... त्या मेघातून कोसळणाऱ्या वर्षा धारांसारखं
चिंब भिजवूनी तप्त वसुंधरेला
मृदेचा मोहक सुगंध पसरवणारं...!

___ कादंबरी

कादंबरीचा ' नातं' हा कविता संग्रह आणि त्यातली ही कविता कुणीतरी आत्मियतेने वाचत होतं. वाचता - वाचता त्याचं मन भरून येत होतं.... कुणाच्या तरी आठवणींनी....!!

"कादंबरी ..इथे ये, माझ्या ऑफिसमध्ये..!" रोहिणी मॅडमनी कादंबरीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावत तिच्यासमोर ताजं वृत्तपत्र धरत, तिला पहिल्याच पानावर असलेली बातमी वाचण्यास सांगितलं.

" तारघरचे नगराध्यक्ष आणि जनसेना पक्षाचे शहरप्रमुख श्री. उत्तम तोडकर यांची राजकीय वैमनस्यातून मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या !!"

राजकारण आणि गुन्हेगारी जगातल्या रक्तरंजित काटशहाच्या खेळात माहिर असलेल्या एका मोहऱ्याचं पृथ्वीवरचं अस्तित्व अश्या रितीने संपुष्टात आलं होतं.

कादंबरीने शांतपणे बातमी वाचली. तिच्या चेहर्‍यावर कोरडेपणा होता.

" नियतीने तुला न्याय दिला, कादंबरी..!" रोहिणी मॅडम तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या.

" हो, नक्कीच मॅडम...पण मी समर्थन नाही करणार त्या नराधमाच्या हत्येचं... कुणाचीही हत्या करणं हे पापंच आहे. मात्र एक आहे, जे पेरलंय तेचं उगवलंय मॅडम, ज्याचं जसं कर्म तसंच फळ त्याला मिळणार..!" कादंबरी शांतपणे उद्‌गारली.

परंतु आतून कुठेतरी तिला समाधान जाणवत होतं. जो न्याय आंधळी न्यायदेवता देऊ शकली नसती, तो न्याय-निवाडा उघड्या डोळ्यांच्या कठोर नियतीने केला होता.

रेश्मा आज सकाळपासून उदास चेहऱ्याने तुरुंगात बसली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागलेल्या. तिचा मुलगा सहा वर्षाचा झाल्यामुळे कायद्यानुसार तिला आता तिच्यासोबत त्याला तुरुंगात ठेवता येणार नव्हता. तिची आपल्या मुलापासून ताटातूट व्हायची वेळ जवळ आलेली. तिच्या मुलाची रवानगी आता बाल आश्रमात केली जाणार होती. कादंबरी आणि रेणुकाने रेश्माच्या भावना समजून घेत तिला प्रेमाने समजाविले.

"तुझ्या मुलाची बाल - आश्रमात योग्य काळजी घेतली जाईल. तू अजिबात चिंता नको करू.!!."

दोघींच्या समजविण्याने रेश्माला मानसिक आधार मिळाला. आपल्या पोटच्या गोळ्यापासून दूर राहायची तिने मनाची तयारी केली. ... खंबीर होऊन..!!

तुरुंगातल्या चांगल्या वर्तवणुकीसाठी रेणुकाला आपल्या न केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये सवलत मिळाली.

आयुष्यात घडणाऱ्या काही घटना, प्रसंग हे विधिलिखितच असतात. रेणुकाने न केलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगली. तिच्या सुटकेची वेळ जवळ आली. एवढी वर्षे तुरुंगात सोबतीने काढल्यामुळे तुरुंगातल्या सर्व कैदी स्त्रियांच्या, रोहिणी मॅडमच्या, कादंबरीच्या हृदयात रेणुकाने आदराचं स्थान मिळवलं होतं.. आपल्या सात्विक, सोज्वळ स्वभावाने तसंच अंगभूत चांगल्या वर्तवणुकीने..!!

तुरुंगात असताना जे काम रेणुकाने केलं होतं , त्याचा मोबदला तुरुंग प्रशासनाकडून तिला सुटकेच्या वेळी देण्यात आला. कैद्याला सुटकेनंतर समाजात मानाने जगता यावं, त्याचं पुर्नवसन योग्यप्रकारे व्हावं म्हणून तुरुंगात कैद्याला विविध प्रकारचं रोजगार निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येतं.

सरकारच्या बाल आणि महिला विकास खात्याकडून महिला कैद्याला त्याच्या सुटकेवेळी भविष्यातल्या त्याच्या उदरनिर्वाहाची सोय व्हावी तसंच त्या कैद्याला समाजात सुखा-समाधानाने, सन्मानाने जगता यावं म्हणून अर्थसाहाय्य देण्यात येतं. ती सगळी सरकारी मदत राज्य सरकारच्या " बंदी कल्याण निधी" मधून रेणुकाला देण्यात आली.

रेणुकाच्या सुटकेचा दिवस उजाडला. आज सगळ्यांना ती आपल्याला सोडून जाणार म्हणून हुरहुर वाटत होती.. परंतु तिची तुरुंगातून सुटका होऊन तिला भविष्यात मोकळेपणानं जगता येणार होतं; म्हणून मनातून समाधानही वाटतं होतं.

रेणुकाला सगळ्यांनी भरल्या डोळयांनी निरोप दिला. कादंबरीने रेणुकाला गदगदत्या अंतःकरणाने मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यांत अश्रू होते.. पण आजचे ते अश्रू आनंदाचे होते.

दोघींनी एकमेकींना वचन दिलं.. पुन्हा भेटण्याचं.. !!

रेणुकाने सर्वांचा निरोप घेतला. ती आपल्या गावच्या वाटेने निघाली... आपल्या पुढल्या जीवनात उभारी घेण्यासाठी..!!

पुढे नियतीने तिची भेट एका व्यक्तीशी घडवून आणण्याचं ठरविलं होतं...!! कोण होती ती व्यक्ती..?? काय दडलं होतं नियतीच्या मनात.???...

क्रमशः

धन्यवाद..!

रुपाली विशे - पाटील
___________________________________________

( टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. काही साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

( कथेत लिहिलेले तुरुंग जीवनातले संदर्भ, प्रसंग हे वाचनात आलेल्या वृत्तपत्रातल्या बातम्या, लेख यांच्यावर आधारीत आहेत. तसंच कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही.)

__________________ XXX__________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.......

मामी, लावण्या, रानभुली, उनाडटप्पू, मनिम्याऊ, गार्गी, मानवजी, मृणाली, अज्ञातवासी..!!

कथा आवडल्याबद्दल खूप धन्यवाद..!!

कथेचा अंतिम भाग दोन दिवसांनी टाकेन..!!

छान

कादंबरी , उत्तम तोडकर चा बदला घेईल असे कथानक असेल असे वाटलेले. पण हि कथा हि छान चालू आहे.
कथेचा अंतिम भाग दोन दिवसांनी टाकेन..!! >>> एवढ्या लवकर नका संपवू Happy

वर्णिता, सामी , धन्यवाद..!

सामी, तुमचा प्रतिसाद मला खूप आनंद देणारा आहे.

कादंबरी उत्तमभाऊंचा बदला घेऊन पुढे तुरुंगात जाते अशीच कथा लिहायचं आधी ठरवलं होतं, पण पुढे वेगळ्या वाटेने गेली कथा..!

तुम्ही ही कथा वाचताना कथेत जश्या गुंतल्या आहात , तसंच मी पण कथा लिहताना गुंतत गेले. मलाही कथा संपवावी असं नाही वाटत. पण कथा ५ ते ६ भागात संपवायची हे आधीच ठरवलं होतं. त्यामुळे आता कथा ओढून- ताणून वाढवण्यात काही अर्थ नाही. पण पुढे कधी जमलं तर अजून मोठी कथा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.

मस्त भाग हा देखील
अन कविता -
सुरेख !
कविता सुटी देखील तुम्ही कुठं पेश करू शकता . इतकी छान !

सामो, राणी, बिपिनजी..!
धन्यवाद..!
तुमचं प्रोत्साहन हुरूप आणणारं आहे..

दिपक - धन्यवाद.. प्रतिसादासाठी..!

गौरी - धन्यवाद, तु केलेल्या कौतुकासाठी..!

धन्यवाद किल्ली, देवदासीची सुटका झाली तुरुंगातून...
तुझा प्रतिसाद मला पुढे लिहायला भाग पाडतो. पुढे काही जमलं तर लिहेन..!