अडकलेली - भाग २ : अपराध..!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 April, 2021 - 09:13

अडकलेली- भाग २ - अपराध
_________________________________________

स्मशानभूमीत लाकडी चिता रचलेली. उषाचा संवेदना विरहित देह चिरनिद्रा घेण्यासाठी त्यावर विसावलेला. चितेवरच्या आपल्या आईचा अचेतन देह पाहून अतिशय दुःखावेगाने आक्रोश करणार्‍या कादंबरीला पाहून तिथे असलेल्या उपस्थितांचं अंतःकरण द्रवलं. तिची काळजी करणारं, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारं, तिच्या रक्ताचं माणूस नियतीने आज तिच्यापासून दूर नेलं होतं... कायमचंच..!!

कादंबरीने अतिशय सुन्न मनाने आपल्या आईच्या चितेला मुखाग्नि दिला. अग्नि फडफडला. चिता भळभळ पेटू लागली. धुराचे लोट आसमंत व्यापू लागले. आपल्या आईचा शेवटचा, अज्ञात दिशेच्या वाटेने होणारा प्रवास पाहून कादंबरीच्या भावनांचा बांध फुटला.

आपल्या आईच्या अनपेक्षित जाण्याने कादंबरीचं सारं आयुष्य शून्यवत झालेलं. एखाद्या पानगळ झालेल्या वृक्षासारखं पुढंच आयुष्य पोरकेपणानं तिला कंठावं लागणार होतं. तक्रार तरी कुणीकडे करावी ? नियतीनेकडे..??? छे ..!.. तिने तर अजूनच नवा क्रूर खेळ मांडायची तयारी केली होती.

"भाऊसाहेब... तुम्हीच सांभाळा आता उषाच्या लेकीला..! आम्हा गरीबांना तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही आधार नाही !" पाणावलेल्या डोळ्यांनी उषाचे शेजारी उत्तमभाऊंना विनवू लागले. आपल्या आईशिवाय कादंबरीला आपल्या आयुष्यात दुसरं कुणीही नव्हतं.

ह्या जगात पोरकेपणासारखी नियतीने दिलेली दुसरी शिक्षा नाही ; आणि ती शिक्षा कादंबरीच्या वाट्याला आलेली.... अनाहूतपणे..!!

दुःखावेगाने अश्रू ढाळणाऱ्या कादंबरीच्या डोक्यावरून सांत्वन करण्याच्या बहाण्याने उत्तमभाऊंनी हात फिरवला. अंगावर एखादी पाल पडावी, तशी किळस त्या स्पर्शाने कादंबरीला आली. इतर लोकांना तो सांत्वनाचा, मायेचा स्पर्श वाटत असला; तरी त्या स्पर्शामागची वासना कादंबरी जाणून होती. उत्तमभाऊंचा कादंबरीच्या डोक्यावरून फिरणारा हात मानेवरून तिच्या पाठीकडे जाऊ लागला आणि त्या हाताच्या अभद्र स्पर्शाने तिच्या मणक्यातून भीतीची शिरशिरी उठली. तिने भेदरलेल्या नजरेनं उत्तमभाऊंकडे पाहिलं. तेच छद्मी हास्य, तीच थंडगार नजर, तोच दांडगट पुरुषी स्पर्श .. आणि त्या स्पर्शात लपलेली रानटी वासना ..!!

तिच्या हृदयाचा थरकाप उडाला. तिला कळून चुकलं की, आता आपण ह्या जनावराच्या तावडीत सापडले आहोत; तिथून आता आपली सुटका होणं अशक्‍य आहे. तिने आपली हार पत्करली.

नुकतंच तर तिचं तारुण्य मोहरु लागलेलं. ज्या वयात मुलींनीं आरश्यात पाहून मुरडावं, तोंडात गाणं गुणगुणावं , त्या मोहरत्या वयात नियतीने कादंबरीला खेळणं बनवलं होतं... उत्तमभाऊ सारख्या पुरुषी वर्चस्ववादी हातात खेळवण्यासाठी आणि राक्षसी वृत्तीचा उत्तमभाऊ आपल्या वाट्याला आलेल्या त्या खेळण्या सोबत मनसोक्त खेळणार होता... हाती आलेल्या खेळण्याचे लचके तोडत..!!!

नशिबाने कादंबरीला भलत्याच वाटेला लावलं होतं. हळू - हळू ती आपल्या वाटेला आलेलं पोरकेपणाचं ओझं सावरायला शिकू लागली. उत्तमभाऊला आता अडविणारं कुणीचं नव्हतं. आपल्या मनाला येईल तसं तो वागू लागला. कादंबरी त्याच्यासाठी खेळण्यातली बाहुली बनली होती. त्याला कुणाचीही भीती वाटत नव्हती. गुन्हेगारी प्रवृत्तीचा उत्तमभाऊ खोट्या समाजसेवेचा आव आणून, आपली काळी कृष्णकृत्ये समाजसेवेच्या नावाखाली झाकत होता. लोकांपुढे त्याने स्वतःची गरीबांचा, दुर्बलांचा तारणहार म्हणून प्रतिमा बनवली होती आणि त्यासाठी त्याने समाजकारण आणि राजकारण या दोहींचा यथासांग वापर केला होता.

काळ गतिमान झालेला. बऱ्याच दिवसांपासून कादंबरीच्या पोटात अन्न ठरत नव्हते. गेल्या चार महिन्यापासून तिची पाळी चुकली होती. तिच्या शरिराला गोलाई प्राप्त होऊ लागलेली. शरीर जड बनत चाललेलं...!!

अजाण पोर..!! अजाणत्या वयामुळे आणि घरात वडीलकीच्या नात्याने लक्ष ठेवणारं कुणीही नसल्याने तिचं त्याकडे नकळत दुर्लक्ष झालं. उत्तमभाऊच्या अत्याचाराखाली ती पूर्णपणे दबली गेली होती. तिची विचारशक्ती संपूर्ण नाहीशी झालेली... !!

ह्या पृथ्वीवर प्रामाणिकपणे जर कोण वागत असेल तर तो फक्त एकटा निसर्गचं...! त्याने आपलं काम चोख पार पाडलं होतं.

एके सकाळी कादंबरी चक्कर येऊन घरात पडली. बराच वेळ घरात हालचाल न दिसल्याने शेजारच्या लताताईंनी कादंबरीच्या घराचा दरवाजा ठोठावला. घरात शक्तिपात होऊन पडलेल्या कादंबरीला धावत-पळत रिक्षात घालून त्या दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टरांनी कादंबरीला तपासलं. त्यांनी तिची सोनोग्राफी केली. तिच्यासोबत असणाऱ्या लताताईंना डॉक्टरांनी कादंबरी गरोदर असल्याची कल्पना दिली. लताताईंना धक्का बसला; पण बाई शहाणी होती. पोरक्या झालेल्या मुलीला कुणीतरी जाळ्यात ओढून तिचा गैरफायदा घेतला असावा याची त्यांना खात्री पटली.

"कादंबरी... सांग.. कोण जबाबदार आहे तुझ्या ह्या अश्या अवस्थेला ?" थकलेल्या कादंबरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवित लताताईंनी विचारलं. लताताईंच्या मायेच्या स्पर्शाने कादंबरीला रडू कोसळलं.

" रडू नकोस बाळा, जो कुणीही ह्याला जबाबदार असेल त्याला आपण विश्वासात घेऊन सगळं सांगू. जे घडायचं ते घडून गेलंय..!!" लताताईंनी तिला समजावलं.

"मला हे बाळ नको ..!" कादंबरी अश्रू पुसत थंडपणे म्हणाली.

"ठीक आहे ....!! उद्या आपण दवाखान्यात जाऊ. तुला खरं नसेल सांगायचं तर नको सांगू, पण निसर्गाच्या विरोधात जाणं तुला महाग पडू शकतं ...कादंबरी..!! मी तुला परत एकदा सांगते , जो कोणी ह्या पोटातल्या बाळाच्या पिता असेल , त्याच्याशी लग्न कर. करून - सवरून, आपला कार्यभाग आटपून तो नामानिराळा राहिल आणि तू गर्भपाताचं पाप आपल्या माथी मारून घेशील.. विचारपूर्वक निर्णय घे!! " लताताईंनी तिची समजूत घातली.

कादंबरी शून्यवत बसली होती. तिच्या आयुष्याची दुर्दशा खऱ्या अर्थाने सुरू झालेली. दिवेलागणीची वेळ झाली; तरी कादंबरी सुन्नपणे बसून राहिली.

"कुमारीमाता ".... किती कटू शब्द आहे हा ?? पण ह्या सगळ्यांत आपला काय दोष?? हे नको असलेलं मातृत्व आपल्यावर अत्याचारातून, अन्यायातून, वर्चस्वातून लादलं गेलंय. शोषण झालंय आपलं...!! हतबल झालेली कादंबरी प्रणितच्या आठवणींनी व्यथित झाली. त्याचा सहवास, त्याच्याशी घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका, त्याचं प्रेमळ बोलणं आठवून तिला दुःखाचे उमाळे येऊ लागले.

प्रणित सोबत विवाह करून सुखी संसाराचं चित्र रंगवलं होतं तिने. खोडलं ते चित्र..! दुष्ट, कपटी, मुजोर, वासनांध नराधमाने खोडून टाकलं. ती चवताळून उठली. त्वेषाने आपल्या पोटावर आपल्याच हातांच्या मूठींनी मारू लागली. त्या नराधमाच्या पापाचा अंश माझ्या पोटात नको... ! ती स्वतःच्या फडाफडा थोबाडीत मारून घेऊ लागली. अजाणतेपणी केलेल्या एका चुकीमुळे तिचं संपूर्ण आयुष्य पणाला लागलं होतं.

तिला आपल्या पोटात वाढणारा नराधमाचा अंकुर खुडून टाकायचा होता. तिची स्वप्नं मिटवू पाहणाऱ्या त्या अंकुराला छिन्नविछीन्न करायचं होतं; परंतु नियतीला हे कदापि मान्य नव्हतं. तसं घडणार नव्हतं. थकल्या शरीराने आणि थकल्या मनाने ती खाली बसली. तिचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलं. किती तरी वेळ ती घरात निश्चलपणे बसून राहिली. अचानक दरवाज्यावर टक् टक् झाली. ती भानावर आली. तिने दिव्याचे बटन चालू केले. दरवाजा उघडला; तर दारात तोच नराधम उभा... उत्तमभाऊ..!!

तिची छाती धडधडू लागली. घरात येत त्याने दरवाजा लावला. त्याला तसं करताना पाहून तिच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. तिच्या अंगाचा तिळपापड झाला.

"काय झालं आमच्या बाहुलीला? आज नाराज दिसतेयं.??" त्याच्या आवाजाने तिचं रक्त सळसळू लागलं. त्याने तिच्या गालाला स्पर्श केला. तो किळसवाणा स्पर्श तिने झटकून टाकला.

" ए... जास्त शहाणपणा नाही करायचा... आपल्या औकातीत राहायचं ..! काय..???" तिचा हात पिरगाळत तो गरजला.

ती वेदनेने कळवळली.

" नीच माणसा, हात सोड माझा.. समाजसेवेचा खोटा बुरखा घालून फिरतोस ना तू जगात??.. तो तुझा बुरखा टराटरा फाडून टाकते मी आता सगळ्यांसमोर.. बघंच तू..!!" दहा हत्तीच बळ तिच्या अंगात संचारलं.

तिच्यावरची आपली पकड सैल करत उत्तमभाऊ खो-खो हसत सुटला.

" अरे वा..!! आमच्या बाहुलीला बोलता सुद्धा येतं तर? माझ्याशी... ह्या उत्तम तोडकरशी वैर घेणार तू..?? पाण्यात राहून माश्याशी वैर..??? " त्याचं हसणं थांबायचं नावचं घेत नव्हतं.

" तुझी खरी जागा कुठे आहे .. माहित आहे का तुला..?? विचार कुठे..?? रेड लाइट एरिया..!! नाव ऐकलं असशीलचं... तसं पण लॉजवरचा चांगलाचं अनुभव तुला आहे... नाही का..??." त्याच्या छद्मी हास्याने तिच्या पोटात भीतीचा गोळा आला.

" पापी.... तुझं पाप वाढतंय माझ्या पोटात... मी जगाला ओरडून सांगेन की, ह्या नराधमाने अत्याचार केलांय माझ्यावर.. तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगायला लावेन मी!!" ती वाघिणीसारखी चवताळली.

क्षणभर उत्तमभाऊ शांत झाला. तारवटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला.

खाssड.....!!

एक खाडकन् तिच्या मुस्कटात बसली. ती जागेवरच धडपडली. जागेवरून उठत अनपेक्षितपणे ती त्याच्या तोंडावर थुंकली. त्याचा राग अनावर झाला. त्याने तिची मान पकडली. एखाद्या सापाने आपल्या तोंडात बेडकी पकडावी आणि त्या बेडकीने सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी निष्फळ धडपड करावी , तशी धडपड ती करू लागली. तिचं अंग थंडगार पडू लागलं. आता आपला श्वास अडकून जीव जातोयं की काय, असं तिला वाटू लागलं.

त्याने आपल्या कमरेला लपवलेली बंदूक काढून तिच्या कपाळावर रोखली.

" ए, भवाने..!! माझ्या अंगावर किटाळ आणू पाहतेसं होय?? जे झालंय ना , ते आता बाहेरच्या बाहेर निस्तरायचं... नाहीतर तुझं काय करायचं ते मला पूर्ण ठाऊक आहे..!" तो जोराने खेकसला.

ती भयकंपित झाली. तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले.

" माझं नाव येता कामा नये ह्यात...जर तू असं केलंस तर... तो तुझा यार... नाव काय त्याचं ..?? आठवलं.... प्रणित.... आता त्याला फक्त गावाबाहेर हाकलंय ... पुढे ह्या पृथ्वी वरूनचं गायब करीन.. काय समजतेस तू ह्या उत्तम भाऊला??..!!" तिच्या कपाळावरची बंदूक खाली घेत उत्तमभाऊ गुरगुरला.

तिला जोरदार धक्का देत तो घरातून तरातरा निघून गेला; आणि त्याच्या पाठीमागे तिचे डोळे आग ओकत होते ... अतिशय द्वेषाने... तिरस्काराने..!!! त्याच्याबद्दलच्या विलक्षण द्वेषाने तिचं मन व्यापलं.

प्रणितच्या आठवणींनी ती कळवळली. उत्तमभाऊच्या धमकीने ती घाबरून गेली. आपल्यामुळे प्रणित वर कुठलंही संकट येऊ म्हणून तिने मनाशी काहीतरी पक्कं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी लताताईना घेऊन ती दवाखान्यात पोहोचली. मोकळीक करून घेण्यासाठी...!!

डॉक्टरांनी तिला तपासलं. कायदेशीररित्या गर्भपात करणं आता अशक्य होतं. तिच्या पोटातला गर्भ वीस आठवड्यांच्या वर होता. तसं पण तिच्या नाजूक देहाला गर्भपात सोसवला गेला नसता. डॉक्टरांनी शंका बोलून दाखविली.

डॉक्टरांनी दोघींना समजावलं की, गर्भपात कायद्यानुसार गर्भार स्त्रीच्या जीवाला धोका, स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर गंभीर परिणामांची शक्यता, जन्माला येणाऱ्या मुलामध्ये असलेलं शारीरिक व्यंग, बलात्कारामुळे राहिलेला गर्भ, किंवा फसलेले कुटुंबनियोजन या पाच कारणांसाठी स्त्रीला विसाव्या आठवड्या पर्यंत गर्भपात करण्यासाठी कायद्याने मुभा देण्यात आली आहे. वीस आठवड्यानंतर केलेला गर्भपात हा बेकायदेशीर असतो. कायद्याने तसं करणं गुन्हा आहे.

तिने परिस्थितीपुढे हार पत्करली. समोर आलेल्या संकटाला कश्या प्रकारे तोंड द्यावं, हा विचार तिचा मेंदू कुरतडवू लागला. औषध घ्यायला जाते, असं सांगून ती लताताईंची नजर चुकवून दवाखान्यातून बाहेर सटकली. ती स्टेशनवर आली. समोर दिसणार्‍या गाडीत विनातिकीट जाऊन बसली. आता तिचा एक नवा प्रवास सुरू झाला. परंतु कुठे उतरायचं ते ठिकाण निश्चित नव्हतं.

काही वेळाने ती एका स्टेशनवर उतरली.. थकलेल्या शरीराने..! तिने फलाटावरच्या सार्वजनिक नळावर तोंड खसाखसा धुतलं. तिच्या पोटात अन्नाचा एक कण ही नव्हता. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. ती स्टेशन बाहेर पडली. पायाखालची वाट चालू लागली. अचानक तिच्या पोटात ढवळलं. केवढी तरी मोठी ओकारी तिला झाली. घश्यातून कोरड्या ओकाऱ्या येतचं राहिल्या; शेवटी तिच्या डोळ्यांपुढे अंधार आला आणि तिची शुद्ध हरपली.

बऱ्याच वेळाने तिने डोळे उघडले; तर ती सरकारी दवाखान्यात होती. तिच्या हाताला सलाईन लावलेलं. ती बेडवर उठून बसू लागली, तेवढ्यात नर्स धावत तिच्याजवळ आली.

"मला इथे कुणी आणलं?" तिने नर्सकडे विचारणा केली.

एका जागरूक नागरिकाने रस्त्यावर तिला पडलेलं पाहून दवाखान्यात दाखल केलं होतं.

नर्सने तिचं नाव विचारलं. तिने तिचं नाव सांगितलं. नर्सने विचारलेली जास्तीची माहिती तिने दिली नाही. काहीही न बोलता ती शांत बसून राहिली. नर्सने पुन्हा तिची एकदा मायेने विचारपूस केली. तिला रडू कोसळलं.

" माझं कुणीही नाही या जगात..!" तिने उत्तर दिलं.

तिला बरं वाटल्यावर नर्सने डॉक्टरांच्या मदतीने तिला एका महिला अनाथ आश्रमात दाखल केलं. तिची पुढची राहण्याची व्यवस्था केली.

कादंबरी महिला आश्रमात दिवस कंठू लागली. आपलं नशीब आता आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, ह्या विचाराने तिच्या रात्री सरू लागल्या. डोळ्यातल्या झोपेनं तिच्याशी वैर पत्करलेलं.. डोक्यात फक्त विचार... विचार... आणि असंख्य वेडेवाकडे विचार...!!

महिला अनाथ आश्रमाच्या प्रमुख ज्योतीताई सगळ्या अनाथ महिलांची प्रेमाने काळजी घेत असत. कादंबरीला ह्या अवस्थेत पाहून त्यांना तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. तिला पाहताच त्यांना त्यांची ' श्वेता' आठवली .. कार अपघातात गेलेली..!!

माणसाचं मन दु:खानं, वेदनेनं पोळलेलं असलं ना की , कुठेतरी आपसूकपणे अदृश्य सुखाचे, निर्मळ आनंदाचे कवडसे शोधू लागतं.

आपल्या लाडक्‍या एकुलत्या एक लेकीच्या अनपेक्षितपणे जाण्याने ज्योतीताई आणि त्यांच्या पतीने अभागी , परिस्थितीला गांजलेल्या दुर्बल स्त्रियांच्या आयुष्यात हिरवाई फुलवायचं काम हाती घेतलं होतं; त्यातून त्यांना मानसिक आनंद , समाधान लाभत होतं. कादंबरी जेव्हाही त्यांच्या नजरेस पडत असे, तेव्हा त्यांच्या 'श्वेताची" प्रतिमा त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहते असे. त्यांनी कादंबरीची खोदून - खोदून चौकशी केली; परंतु तिच्या तोंडून काहीही बाहेर पडलं नाही. ती परिस्थितीला शरण गेली होती. परंतु एक निर्णय तिचा पक्का होता; आणि ती फक्त वाट पाहत होती ... आपला पक्का निर्णय तडीस नेण्याची.. !!

दिवसेंदिवस तिच्या पोटातला गर्भ आकारत होता. तिचे दिवस भरत आलेले. एके सकाळी तिची तब्येत नरमली. तिला दुपारपासून वेणा येऊ लागल्या आणि संध्याकाळी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आश्रमातल्या सगळ्या स्त्रिया आनंदी झाल्या. जणू त्यांच्या गोकुळात कान्हा जन्मला होता. नवनिर्मितीचा सर्वात जास्त आनंद एका स्त्री शिवाय दुसऱ्या कुणाला होऊ शकतो का ??? परंतु कादंबरी त्याला अपवाद होती. जीवघेण्या प्रसववेदना सहन करून ह्या दुनियेत आलेल्या त्या नवजात बालकाला पाहून तिने तोंड फिरवलं. तिने त्याला आपल्या जवळ सुद्धा घेतलं नाही. तिला त्या बाळाला पाहून मायेचा पान्हा फुटतंच नव्हता.

ज्योतीताई तिच्या जवळ आल्या. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटत बाळाला तिच्या हातात दिलं.

तिने डोळे बंद केले.

' कुमारी माता ' !!.धर्म भ्रष्ट केलास .. ...समाजमूल्यावर घाला घातलास तू..... भ्रष्ट स्त्री....!! सगळ्या लोकांच्या नजरा आपल्याकडे रोखून पाहत आहेत असं चित्र तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागलं.

त्या नराधमाचा अंश तिला आपल्या डोळ्यांसमोर नको होता, जरी त्यात तिची शारीरिक गुंतवणूक असली तरीही..!! तिच्या पोटी जन्माला आलेल्या त्या बाळामध्ये तिची भावनिक गुंतवणूक शून्य होती.

" कादंबरी , बाळ कुणाचंही असलं तरी तुझा अंश आहे त्यात... पाज त्याला...!" ज्योतीताई मायेने म्हणाल्या.

तिने नाराजीने बाळाला छातीशी लावलं. भुकेलं बाळ चुरुचुरु दूध पिऊ लागलं.

'स्तनपान ' ... आई - बाळाचं नातं मजबूत करणारं..!! जगात कुठेही न मिळणारी विलक्षण मायेची ऊब फक्त माऊलीच्या कुशीतच मिळते. परंतु इथे परिस्थिती विरुद्धार्थी होती. कादंबरीचे डोळे भावनाशून्य झालेले...!!

ती पहाट होण्याची वाट पाहू लागली. रात्र सरली. पहाटे सगळे साखरझोपेत असताना कादंबरी उठली. कुशीत शांत झोपलेल्या त्या नवजात बाळाला तिने उचलून घेतलं. पावलांचा आवाज न करता ती आश्रमातून निघाली. जवळच असणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या लाटांचा आवाज कानावर पडत होता. आजूबाजूला पाहत ती समुद्राच्या दिशेने चालू झाली. तिचा निर्णय पक्का होता, त्यापासून दूर पळणं तिला कदापि शक्य नव्हतं. हवेतला गारवा तिच्या बाळंतपणाच्या ओलेत्या अंगाला झोंबत होता. कान थंड हवेने फडफडत होते. शरीर थकलेलं, आंबलेलं होतं. बाळंतपणाच्या ओलेत्या अंगाने एकही पाऊल पुढे टाकणं तिला कठीण जात होतं. परंतु तिचं ध्येय निश्चित होतं.. ती चालतच होती. आता थोडं- थोडं उजाडू लागलं होतं. समुद्रकिनाऱ्यावर सकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी काही स्त्री-पुरुष आलेले होते.

ती सगळ्यांपासून नजर चोरून चालत होती. समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या शीतला देवीच्या मंदिरात घंटानाद होत होता. पहाटेच्या देवीच्या आरतीच्या आवाजाने वातावरणात मंगलमयता पसरलेली; पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. ती तिथून जात असताना , समुद्रावर फेरफटका मारणाऱ्या एका बाईच्या नजरेस तिच्या हातातलं बाळ पडलं. बाळाला घेऊन मंदिरात आली असावी ही तरुणी ..असा विचार करत तिने कादंबरी व तिच्या हातातल्या बाळाकडे दुर्लक्ष केलं. कादंबरी समुद्रकिनाऱ्याच्या एका निर्मनुष्य भागात पोहचली. समुद्राला भरती आलेली. पृथ्वीवरल्या सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिठी मारतात, त्याच्यात सामावतात, आपल्यासोबत आणलेली, लोकांनी धुतलेली त्यांची पापं समुद्राच्या उदरात शिरून विसर्जित करतात... आणि आज तिथेच कादंबरी आपलं एक पाप विसर्जित करू पाहत होती.... घोर पाप... अर्भक हत्या.. निसर्गाने वर म्हणून स्त्रीला दिलेल्या मातृत्वाची हत्या..!!!

तिने एकवार बाळाकडे पाहिलं. ते शांत निजलेलं आपल्या जन्मदातीच्या कुशीत... त्या कुशीतली मायेची ऊब शोषित... शांत पहुडलेलं..!!!. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात उगवणारचं नाही... ह्याचा विचारही न करू शकणारं... निष्पाप... निरागस..!!!

प्रणित सोबत भविष्यातलं सुखी संसाराचं चित्र पाहिलं होतं मी... हेच कुशीतलं बाळ जर, माझ्या प्रणितचा अंश असता तर ते आज आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलं असतं. त्याने माझं दूध चुरुचुरु शोषलं असतं, तो जीवनरस त्याने शोषताना माझ्या शरीरात उठणाऱ्या त्या गोड संवेदनानी माझं अस्तित्व, माझं मातृत्व पूर्णत्वास आलं असतं. त्या बाळाला मी कौतुकाने अंगा - खांद्यावर घेऊन चिऊ-काऊच्या गोष्टी सांगत मऊ भाताचा घास भरवला असता, अंगाई गीत म्हणत, झाडामागचा भागलेला चांदोबा दाखवत खांद्यावर झोपवलं असतं; परंतु ते आता शक्य नव्हतं. हे बाळ पापाचं, अत्याचाराचं, अन्यायाचं, वर्चस्वाचं, शोषणाचं प्रतीक होतं. ते उखडून टाकायला हवं. ती ठाम होती आपल्या निर्णयावर... तिने डोळे मिटले. आज अश्रूंना तिने थारा दिला नाही आपल्या डोळ्यांत. बाळाला घेऊन ती खाली वाकली. समुद्राच्या पाण्यात बाळाला धरून तिने त्याचा गळा दाबला. बिच्चारा इवलासा जीव...!!.. जीव जाताना टाहो सुद्धा फोडू शकलं नाही. ' माता तू न वैरिणी' हे तिने खरं करून दाखवलं.

' पापीण, जारिणी, मुलं खाणारी लाव आहे ही.. पकडा... मारा... सोडू नका हिला.. पाप केलंय हिने... स्त्रीत्वाला कलंक लावलायं... धर्म बुडवला हिने... घोर पाप... अर्भक हत्या..!!! एका निष्पाप, चिमुकल्या जीवाला यमसदनी धाडलंय ह्या दुष्ट स्त्रीने....!"

ती सैरावैरा पळू लागली. एक दगड तिच्या कपाळावर बसला. क्षणार्धात ती भानावर आली. दिवसा पाहिलेल्या स्वप्नाने ती शहारली. ती तिथून लगबगीने निघाली. समोरून येणाऱ्या मघासच्या चाणाक्ष बाईची नजर तिच्यावर पडली. जाताना कुशीत असलेलं बाळ आता कादंबरीच्या हातात नाही, हे त्या बाईच्या लक्षात आलं.

" ए पोरी, मघाशी जाताना तुझ्याजवळ बाळ होतं ते कुठे आहे?" त्या स्त्रीने तिला खडसावून विचारलं. ती निर्विकार चेहऱ्याने त्या स्त्रीकडे पाहू लागली.

त्या स्त्री सोबत असणारा पुरुष धावत ती गेलेल्या दिशेने पाण्यात गेला. थोडी शोधाशोध केल्यावर त्याच्या नजरेस पडला...बाळाचा निष्प्राण.. इवलासा देह..!!

पुरुष म्हणे कठोर हृदयाचे असतात, हा समज त्या पुरुषाने खोटा ठरविला. निष्पाप बाळाच्या अचेतन चिमुकल्या देहाला पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने धावतच त्या बाळाला पाण्याबाहेर काढलं. त्या स्त्री- पुरुषांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले. तिला प्रश्न विचारू लागले. भावनाशून्य डोळ्यांनी, कोरड्या चेहऱ्याने ती बसून राहिली. तिला घेऊन सगळे मंदिराच्या परिसरात आले. कुणी तरी पोलिसांना कळवलं.

"देवाच्या दारासमोर पाप केलंस तू..?" मंदिराचा पुजारी उद्विगतेने म्हणाला.

" पाप..???" ती उपरोधिकपणे हसली.

" हो... हो..घोर पाप केलंस तू ? तुला फाशीची शिक्षा मिळायला हवी..!!" घोळक्यातून आवाज येऊ लागले.

" मी तयार आहे शिक्षा भोगायला .. जो अपराध मी केलांय त्याची शिक्षा मी भोगेन.., पण खरा गुन्हेगार मोकाट फिरतोय.. तुमची न्यायव्यवस्था शिक्षा करेल त्याला?? तुमचा देव शिक्षा करेल त्याला??? " ती लोकांकडे, पुजाऱ्याकडे पाहत व्यथित होत प्रश्न विचारू लागली.

"तुझ्या गुन्हेगाराला तू कायद्याने शिक्षा देऊ शकत होतीस. स्वतःच्या पोटच्या बाळाला मारून तू फक्त बदला घेतला आहेस तुझ्या गुन्हेगाराशी... तो उपाय नव्हता; पण तू गुन्हा केलास..!" मघासची बाई त्वेषाने म्हणाली.

" तुला शिक्षा व्हायलाचं पाहीजे..!" घोळक्यातल्या एका स्त्रीने तिच्या पाठीत जोराने गुद्दा मारला. ती शक्तिपात होऊन खाली बसली.

पुजाऱ्यांनी सगळ्यांना शांत केलं. पोलिस आले. सगळ्यांसोबत तिची धिंड निघाली...पोलिस स्टेशनात..!!

"का मारलंस आपल्याचं बाळाला ? " इन्स्पेक्टरने तिला खडसावून विचारलं.

"माहित नाही .... माहित नाही...!!" ती पुटपुटू लागली. तिचं डोकं, कान थंड पडू लागले. शरीर बधीर होऊ लागलं. महिला पोलिस कर्मचारी नीता मॅडमना तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती ध्यानात आली. त्यांना तिची दयनीय स्थिती पाहवली गेली नाही. पोलीस अधिकारी म्हणून जरी त्या कठोरपणे आपलं कर्तव्य बजावत असल्या तरी; त्यांच्यातील एक स्त्री जागी झाली. ओल्या अंगाच्या बाळंतिणीला बाळंत वात होण्याचा धोका असतो, हे त्यांच्या जाणकार नजरेनं ओळखलं. त्यांनी इन्स्पेक्टर साहेबांना सांगून तिला दवाखान्यात दाखल केलं.

काही दिवसांनी कादंबरीची तब्येत सुधारल्या नंतर पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेऊन तिच्यावर अर्भक हत्येचा गुन्हा दाखल केला. तिच्‍या विरुद्ध साक्षी पुरावे गोळा करत न्यायालयात तिच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं.

आता कादंबरीच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळण्यास सुरुवात झाली. कुठे नेणार होता हा नवीन प्रवास तिला...??? काय वाढलं होतं नियतीने तिच्या पुढ्यात..??...

क्रमशः

धन्यवाद..!

रुपाली विशे - पाटील

___________________ XXX__________________

टिप - १) सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील प्रसंग हे वाचनात आलेल्या वृत्तपत्रातल्या सुन्न करणाऱ्या बातम्या, समाजात घडणाऱ्या काही निंदनीय घटना, कधीकधी कानावर पडणाऱ्या कथित कहाण्या यावर आधारीत तसंच कल्पनांती रचलेले असून प्रत्यक्ष जीवनात कुणाचा काहीही संबंध नाही. काही साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसंच कथेत लिहिलेल्या काही प्रसंगांनी मन विचलित होऊ शकतं त्याबद्दल मनस्वी दिलगीर आहे. कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही.

२) कथेत लिहिलेली गर्भपाता विषयीची माहिती वाचनात आलेल्या माहितीच्या आधारे लिहिली आहे. काळानुरूप न्यायालयाने गर्भपात कायद्यात बदल केले असावेत.

__________________ XXX__________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

या भागाचा क्लायमॅक्स धक्कादायक आणि सुन्न करणारा वाटला.
आणि तू एक स्त्री असून हे सगळं लिहीते आहेस.. कणखर आहेस. हॅट्स ऑफ टू यू !

ती बाळासकट आत्महत्या करणार की काय असे वाटले होते. पण वेगळ्या कलाटणीमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.>>> + 1
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

खूप छान !!!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

अज्ञातवासी, मृणाली, रानभुली, मानवजी, प्राचीन, जाई , शब्दवर्षा ..!!

प्रतिसादासाठी खूप धन्यवाद तुम्हांला..!!

पुढचा भाग दोन दिवसांनी टाकेन..

@ रानभुली - धन्यवाद, तुझ्या प्रतिसादासाठी खरंच शब्द नाहीत माझ्याकडे.. !! पण एक मात्र खरं आहे, अज्ञात वाचकांकडून मिळालेल्या कौतुकाचं मोल वेगळंच असतं.

बापरे...मन सुन्न झाले वाचल्यावर.
पण छान सुरू आहे कथा...आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे

राणी, सामो .. प्रतिसादासाठी धन्यवाद..!!

नाही गं रानभुली.. सगळ्यांना मायबोलीवरचं ओळखते. प्रत्यक्ष कुणाचीही ओळख नाही. पण सगळे जवळचेचं वाटतात. प्रत्यक्ष ओळख नसल्याने अज्ञात म्हणाले. आपल्याला जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींपेक्षा जे फक्त आपलं लेखन वाचून आपलं कौतुक करतात ... दाद देतात.. ज्यांच्याशी प्रत्यक्ष भेट नाही झालेली म्हणून अज्ञात वाचक म्हणाले. तुला वाईट वाटलं असेल तर खरंच क्षमस्व... !!

अवांतर - बरं, आता तु मला जवळची गोड मैत्रीण वाटू लागली आहेस.

शापित आयुष्य, दिपक धन्यवाद प्रतिसादासाठी..!!

मामी, धन्यवाद तुमच्या प्रोत्साहनासाठी.!!!

कथेचा genre बघता मी ती वाचणार नव्हते
पण माहिती नाही आपोआप वाचत गेले
दुसरा भाग वाचून तर फारच त्रास झाला
कदाचित मी ह्या सर्व बाबतीत over sensitive आहे

लिखाण छान आहे ते सुरु ठेवा, एवढंच म्हणू शकते Happy

किल्ली - धन्यवाद शुभेच्छांसाठी..!!

दुसरा भाग वाचून तर फारच त्रास झाला
कदाचित मी ह्या सर्व बाबतीत over sensitive आहे>>>
तुझ्या भावनांचा खरंच आदर करते मी. तुझ्या हळव्या मनाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. पण तु कथा वाचत रहा.. तुला शेवट आवडेल अशी अपेक्षा करते...

सामी - धन्यवाद तुम्हांला , प्रोत्साहनासाठी.!!

बाप रे!
असं लिहीताना, लिहिल्यावर किती त्रास झाला असेल रूपाली तुला...
वाचतानाच अस्वस्थ झालं..
तू सकारात्मक शेवट करतेय म्हणून वाचतेय!

लावण्या , गौरी धन्यवाद नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!

@ गौरी - अगदी खरं आहे तुझं म्हणणं.. एक स्त्री म्हणून तर वाईट वाटणं साहजिक आहेच पण एक आई म्हणून कथा लिहताना जास्त वाईट वाटलं.

कथेचा विषय दुःखद आहे, पण दुःख हि जीवनाची काळी बाजू आहेच. लेखकांसाठी हे विषय नविन नाहीत. मी ह्या कथेत जीवनातल्या सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करेन..

धन्यवाद अस्मिता..!
तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!!

Katha avadalich pan balala nako pahije hote marayla .Agadi jeev ghashat ala hota vachtana jasi agadi 0.01 secondane apan accident madhun vachto teva ji avashta hote ti zali hoti maji shevati shevati. Maji mulgi ata 1.5 varshachi ahe patkan ti dolyasamor ali ani dole kadhi vahu lagle kalelech nahi. Sorry prayatna karunhi marathi neet type zale nahi mhanun ase lihile ahe.

वैशालि , तुमच्या भावना मी समजू शकते.. तुम्हांला कथा वाचून झालेल्या त्रासाबद्दल मनस्वी दिलगीर आहे आणि तुमच्यातल्या आईच्या भावना पोहचायला मला भाषेची काहीही अडचण आली नाही.

तुमच्या प्रामाणिक प्रतिसादासाठी धन्यवाद, कारण अश्या प्रतिसादांमुळे पुढच्या भागात काय लिहायला पाहीजे हि प्रेरणा मिळते.