कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या गुडांग सिगारेट ला लोक हार्डकोअर सिगारेट मानत नाहीत ना?नुकतेच एका मुलाकडून 'मला काही स्मोकिंग चं व्यसन नाही, मी फक्त टपरीवर गुडांग घेतो' ऐकलं
(याचं लग्न झालंय आधीच Happy )
अवांतर आहे प्रतिसाद,उडण्यापूर्वी वाचा.

माझ्या मामेदिरांच्या मुलीचं, म्हणजे माझ्या भाचीचं लग्न ठरवायचं होतं. आताच्या जमान्यातलं इंटरनेट वगैरे त्यांना जमत नसल्यानं मी पुढाकार घेऊन मदत केली. त्याचेच हे किस्से. नव-याकडे आधी जरा पारंपरिक वातावरण, घूंघट वगैरे होतं, पण आता पुष्कळ सुधारणा झाली आहे. जातीतलाच मुलगा हवा, पण जास्त मागासलेले विचार नकोत वगैरे. भाची इंजिनियर, पुण्यात चांगल्या नोकरीत. आधी आम्ही पेपर मध्ये जाहिरात दिली. त्यात माझा फोन नं देऊन चूक केली. असले असले फोन यायचे आणि इतक्या घाणेरड्या भाषेत लोक बोलायचे की एकदा तर मी तो फोन घेऊन पोलीस स्टेशन वर गेले. तिथल्या बिचा-या हवालदाराला सुद्धा शिवीगाळ ऐकून घ्यावी लागली. पेपर मधल्या जाहिरातीला फारसं यश आलं नाही. सोबतीला जीवनसाथी वर सुद्धा नोंदणी केली होती. तिथून ब-यापैकी रिस्पॉन्स मिळाला. यूपी, बिहार मधून अनेक उत्तरं आली. त्यातले एक होते दरोगा सिंग (मुलाचे वडील). त्या नावानंच आम्हाला भीती घातली.
मग एका काकांचा फोन आला – हम जौनपुर से बोल रहे हैं.
मी सांगितलं – लड़कीकी चाची बोल रही हूँ.
लगेच – क्यूं लड़की को माँ-बाप नहीं है क्या?
म्हटलं – हैं ना. लेकिन मैं उन को हेल्प कर रही हूं.
जौनपुरवाले काका – आप की बेटी का हमने नेटपर फोटो देखा. हमें प्रोफाइल पसंद आया. मेरा बेटा हैदराबाद में आयटी में है. आप अपनी बेटी का बायो डेटा और फोटो हमें भेज दीजिए.
आता नेट वर सगळं लिहिलंच होतं. त्याहून निराळं मी काहीच पाठवणार नव्हते. खरं पाहिलं तर मलाच त्यांच्या मुलाची माहिती हवी होती. ती मिळाली असती आणि पटली असती तर बोलणी पुढे नेण्याचा विचार केला असता. ही लॉजिकल स्टेप. ते त्यांना सांगितल्यावर काय भडकले काका....
हम लड़के वाले हैं. पहले आप जानकारी भेजिए फिर हम भेजेंगे.
मी हो म्हटलं आणि प्रकरण फाईल केलं (पहिल्या कमेंट पासूनच मला जौ.काका आवडले नव्हते. आणि मुलगा अपनेआप रिजेक्ट झाला होता. असो)
परत दोन दिवसांनी जौ.काकांचा फोन – क्या हुआ? आप ने जानकारी भेजी कि नहीं?
म्हटलं – हमारा सब डेटा नेट पर है. आप ही भेजिए अपने बेटे की जानकारी.
जौ.काका – पहले आप भेजिए.
मी शांतपणे हो म्हटलं आणि पाठवलंच नाही.
आणखी दोन दिवसांनी जौ.काकांचा फोन – आप को अपनी बेटी की शादी करनी है के नहीं? आप ऐसे बरताव रखेंगे तो कभी नहीं होगी शादी!
काकांना पोराचं लग्न करायचं तर होतं, पोरगी आवडली तर होती, पण ठसन सोडायची नव्हती.
आमचं तर काय ठरलंच होतं अशा लोकांकडे आपली मुलगी द्यायचीच नाही.
आणखी दोन-तीन दा फोन केला जौ.काकांनी आणि मग नाद सोडला.

काही लोकं, स्पेशली मुलाकडची माणसे इतके आकडू व स्वतःला दिडशहाणे का समजतात कोण जाणे. आम्ही माझ्या बहिणीसाठी एकाकडे पत्रिका दिली होती. त्यांनी ती परत देताना एकदम तुसडेपणाने "जमत नाही ही पत्रिका" असे म्हणून आम्हाला (म्हणजे माझ्या वडीलांकडे) परत दिली. मी त्यावेळी तसा लहान होतो (११ वीला) व मोठ्यांना शक्यतो उलटे बोलायचो नाही. पण लगेच मी उसळून म्हणालो की जमत नाही तर शांतपणे सांगून परत द्या ना? आम्ही काय जबरदस्तीने जुळवा असे सांगतोय का? त्यावर तो माणूस वरमला. पण त्याच्याबरोबर असलेला मात्र माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होता. पण वडील मध्ये पडले व त्यांनी शांतपणे राहु द्या हो, योग नाही असे काही तरी बोलून वातावरण शांत केले.

नंतर एका परिचितांच्या कांपोमधली गोष्ट. आमची बाजू मुलीकडची होती. कार्यक्रम सुरू झाला होता. मुलाचा मामा यायचा बाकी होता. मुलाचे वडील व आई उगाचच मला दोन-तीन वेळा, आता मुलाचा मामा येणार आहे हा, तुम्ही त्यांना घ्यायला बिल्डींगच्या खालती जा वगैरे वगैरे सांगत होते. फार मोठी असामी येणार असे दाखवत होते. मी पण त्या माणसाला घ्यायला गेलो. सरकारी बॅकेत साधा कारकून असणारा माणूस होता. पण उगाचच सर्व जगाचा तारणहार असल्यासारखे त्याचे वागणे होते. घरी आत आल्यावर उगाचच मला दोन तीन कामे लावली (पाणी आणुन दे अश्यासारखी). नंतर ते लग्न ठरले आणि त्या लग्नात तर याने उच्छाद मांडला होता. स्वतःच सगळे काही जुळवून आणल्यासारखे याचे वागणे होते.
(इथे तो कारकून आहे म्हणून मला काही म्हणायचे नाही. पण त्याचे वागणे व तोरा फारच जास्त होता. स्वतःला सगळेच कळते व समोरचे एकदम तुच्छ असे त्याचे वागणे होते).

प्रामाणिक स्थळ होतं माउमैया Lol
>>
हो हे अफरातफर करताना पकडले जाणारे बहुतेक प्रांमाणिक लोक असावेत!
अप्रामाणिक पकडले जात नाहित Happy

प्रामाणिक यासाठी की जे केले ते सांगितले, जे आवडते ते सांगितले. लपवाछपवी केली नाही. आई जी पोझ घेऊन बसलेली तशी पोझ स्वघरातही कुठली स्त्री पाहुण्यांसमोर घेऊन बसणार नाही. आई एकदम लेड बॅक वाटली... कसलेही गंड नसलेली..

मला माणसे माणसे म्हणून आवडली पण स्थळ म्हणून आवडली नसती... त्यांच्यासारखे वागणे मला जमले नाही/पुढे पटले नाही तर..

त्या गुडांग सिगारेट ला लोक हार्डकोअर सिगारेट मानत नाहीत ना?नुकतेच एका मुलाकडून 'मला काही स्मोकिंग चं व्यसन नाही, मी फक्त टपरीवर गुडांग घेतो' ऐकलं>>>>

मसाल्याचा वास असलेली ही सिगरेट जास्त धोकादायक आहे असे वाचले. व्यसन म्हणजे मनात नसतानाही केवळ सवय म्हणून नियमितपणे केली जाणारी कृती असे असेल तर हा पोरगा म्हणतोय की मी गंमत म्हणून सिगरेट ओढतो, व्यसन नाही. म्हणजे नको असेल तर मी लांब राहू शकतो.

खूपच मजेशीर धागा आहे.

मी ४-५ स्थळांना (बाहेरच्या बाहेरच) भेटण्याचा अनुभव घेतला पण इतकं गमतीशीर काहीच नाही घडलं, एकदम नीरस कौटुंबिक भेटी. नाही म्हणायला एका मुलाच्या मावशीला मी आवडले नाही (व मुलगा त्यामुळे दुःखी होता ही जास्तीची माहिती) हे नकाराचे कारण ऐकून मी खूप विचारात पडले होते कारण त्या अर्ध्या तासात मी मावशीकडे नमस्कार झाल्यानंतर जास्त बघितलेही नव्हते, खरंतर त्या हाय कमांड होत्या हे माहीतीच नव्हती

पण लग्नात उगीचच मोठेपणि घेण्यासाठी चढाओढ माझ्या लग्नात ही पाहिली, त्यापुढे त्या मावशी काहीच नाही.

माझे व माझ्या नवर्याचे कांदेपोहे झाले नाहीत, आम्ही भेटलो व फोनवरंच बोललो. आमच्या फक्त दोघांच्या भेटी व बोलणे त्यामानाने uneventful होते .पण फोरमालिटी म्हणून नवर्याचे तथाकथित जवलचे नातलग घेऊन त्याचे वडील बळेच घरी आले (माझी आई आमचे नातलग वारल्याने गावी गेली असून मला पाहुण्यांची उठबस जमणार नाही, नंतर या असे मी स्पष्ट सांगूनही ते ४-५ जणांना घेऊन उगवलेच) मी कुर्ती लेगींग चष्मा व अवतारात होते नेहमीप्रमाणे
त्यानी सांगितले होते की आमचे नातलग येतील त्यांच्यासमोर मुलाच्या पगाराबद्दल विचारू नका , मी ठीक आहे म्हटले. (पण हेच नातलग येईस्तो आमचा साखरपुडा रखडवला!)

त्याहून कहर मुलाची लहान बहीण-वरील formality .वाल्या प्रसंगी मी तिला म्हटले, मी चहा पीत नाही, मला बनवताही येत ना ही , तर तिने आमच्या स्वयंपाकघरात येऊन थांब मी तुला सांगते असं बोलून बाजूला उभं राहून चहा कसा करायंचा यांचं ज्ञान दिलं. तो चहा फक्त नवरा मुलानेच घेतला, इतर जणांचे कप तसेच! माझ्या वडिलांचा सुद्धा (ते अन्न टाकून देण्याच्या विरोधी-पानातलं न आवडणारंसुद्धा खाल्लंच पाहिजे हा कटाक्ष तरीही!).लग्ना नंतर असेच एकदा नवर्याला विचारले (तो चहा पीत नाही) तर समजले की त्याच्या बहीणीला खरंच चहा बनवता येत नाही ! मी कधितरी वडालांसाठी बनवत असल्याने तो अनुभव माझ्याकडे होता पण ती किचन मध्ये हौशी खेलाडू! हे माहीत असूनही मला वाईट वाटू नये म्हणून तो चहा प्यायला!
नंतर मला वाटलं बरंच झालं आई घरी नव्हती ते, एकतर ती रोखठोक बोलणारी! शिवाय ती असती तर मला समजलंच नस्त नवर्याचे नातलंग कसे आहेत आणि तो इतका शांत व समंजस कसा काय !
त्यातच नवर्ययाविषयी कोणी काही जास्त बोलत नसे पण त्याचे बाबा त्याच्या बहिणीचे सारखे गुणगान करित , मुलगाही मितभाषी, (आम्ही बोलत असू एकमेकांशी) पण त्याची बहीण चे फोन व मेसेज जास्त पाहून माझ्या आईने त्याच्या बाबांना विचारलेच की मुलाचं दुसरीकडे काही आहे का? (यावर ते उखडले होते.हे मला नंतर समजले )

माझ्या वडिलांना हे स्थल बिलकुल पसंत नव्हते (कारण त्यांची मुलगी MD व मुलगा यकःक्षित इंजीनियर.व त्याच्या खानदानात कुणी मुलगी डॉक्टर किंवा गेलाबाजार post graduate in any discipline नाहि, त्यामुळे माझ्या शिक्षण ााची व कष्टाची कदर केली जाणार नाही- कुणी क्रुपया वाईट वाटून घेऊ नका हे त्यांचे मत आहे) त्यामुळे त्यांनी नवर्याचे कुणीही नातलग घरी आले की कमीत कमी बोलायंचे व चेहरा मख्खख ठेवण्याचा विडा उचललेला. ते stroke patient असल्याने त्याचे बोलणे तसंही कुणाला समजत नसे. पण ते काहीच बोलत नाही हे पाहून नवर्याचे वडील विचित्रपणे बाबांना बोलले की आम्हाला काही हुंडा नकोय! मग मात्र मी शेंडी तुटो वा पारंबी- चटकन फक्त एवढंच बोलले- हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे. त्यांना मी हे असं तोंडावर कायद्याचं बोललेलं आवडलं नसावं. पण लग्न ठरत असतांना २-३ भेटींमध्ये आमची इतकी इतकी प्रोपर्टी आहे(म्हणजे गावी काही गुंठे ओसाड जमीन), मुलाचा खरा पगार आम्ही कोणाला सांगत नाही नातलग जलतात ई ई सांगून त्यांनी उबग आणला होता.

हे फक्त कांदेपोहे (नातलगांसाठी औपचारिकता म्हणून २-३ भेटी over 2 weeks बिना कांदे/बटाटेपोहे) ची स्टोरी आहे -ट्रेलर म्हणा. साखरपुडा व लग्न चं लिहिण्याईतकी माझ्या कडे शक्ति व वेल नाही नाहीतर सलीम जावेद ला टक्कर दिली असती

>> प्रामाणिक स्थळ होतं माउमैया Lol
Submitted by मानव पृथ्वीकर on 22 March, 2021 - 22:08

+111 इंग्लिश मध्ये Brutally honest असा एक मस्त शब्दप्रयोग आहे अशा लोकांसाठी Lol

>> प्रामाणिक यासाठी की ...... लपवाछपवी केली नाही...
Submitted by साधना on 24 March, 2021 - 06:16

या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. याच्या विरुद्ध वरती एक किस्सा आहे त्या स्थळाने पाहायला आलेल्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी भाड्याने पुस्तके आणून वाचनाची आवड असल्याचा दिखावा केला होता. प्रत्यक्षात मुलाला वाचनाची आवड नव्हती असे त्यात पुढे लिहिले आहे. हि भावनिक फसवणूक फार क्रूर वाटते (माझे वैयक्तिक मत). पण असे असले तरीही त्यांचा संसार गेली वीस बावीस वर्षे सुखेनैव सुरू आहे हि वस्तुस्थिती आहेच Happy
(विसू: हा प्रतिसाद त्यांना वैयक्तिक नाही. पण असेही घडू शकते याचे केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे. Successful marriage is just a complex chemistry that works out)

४००..

माझ्या एका धाग्यावरून हा धागा निघाला होता.. पण तितक्यात माझ्यासाठी मुले बघणे चालू व्हायचे होते. या धाग्यावरील किस्से वाचून कधी एकदा मी इथे लीहते असे झाले होते..
तर finally मी सुद्धा आता इथे माझा पहिला वहिला मुलगा बघायला आल्याचा किस्सा टाकतेय तर अतिशय आनंद होतोय..
तसा आमचा कापो नॉर्मल जसा असतो तसाच झाला पण तरी काही गोष्टी मला फार मजेशीर वाटल्या म्हणून लिहते..
माझा कापो ताई आणि जीजू कडे होता..आम्ही आदल्या दिवशी तिच्याकडे गेलो होतो..खूप दूरचा प्रवास झाल्याने सगळे दुसऱ्या दिवशी आरामात उठले..ताई सुद्धा तिच्या सासरच्या गावी असल्यामुळे आदल्या दिवशी आमच्या सोबतच तिच्या घरी आली होती..घर 10 दिवस बंद असल्यामुळे आम्ही सकाळी मग साफ सफाई चालू केली 11 पर्यंत सफाई आणि बाकीच्या arrangement होईपर्यंत मुलाच्या घरून फोन आला की आम्ही जवळपास आलोय घरचा proper पत्ता पाठवा..हे ऐकून सगळ्यांची तारांबळ उडाली मी तर माझा अर्धा scrub केलेला चेहरा वॉश करून लगेच साडी गुंडाळून बसले.. माझे केस प्रवासामुळे अतिशय खराब झाले होते काही केल्या नीट बसेना मग straightning हाच एक सुटकेचा मार्ग मला दिसला तसे मी कमरे इतके लांब फ्रीझी केस घेऊन भूत बनून बसून राहिली..अथक प्रयत्नानंतर अर्धे केस सरळ झाले तोच बाहेर गाडीचा आवाज आला आता माझ्याकडे अर्धे केस तसेच ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता..मी नेसलेली साडी ताईला अजिबात आवडत नव्हती पण पाहुणे बाहेर हॉल मधे बसले असताना साडी बदलणे मला अजिबात पटत नव्हते..शेवटी ताईला जी साडी माझ्यासाठी आवडत होती ती तिने स्वतः नेसली आणि अचानक ती इतकी सुंदर दिसू लागली की मला ती साडी नेसायचा मोह आवरेना मग मी आधी टापटीप नेसलेली साडी बदलून ताईने गडबडीने मला ती साडी नेसवली..आमचं साडी पुराण संपेपर्यंत पाहुण्यांचा नाश्ता होत आला होता..ताई आता माझ्यावर जाम चिडली होती तीच म्हणणं होत आधीपासून काय तुला जर्मन मधे सांगत होती का ही साडी नेस.. ती आता किचन मधे आई आणि काकूला खिंड लढवायला मदत करू लागली..माझ्या मदतीला काकूंच्या 14 वर्षाच्या मुलीला सोडून गेली जिने बीचारीने आपल्या पोह्याच्या प्लेटवर फुल्ल फोकस ठेऊन दोन वेळा नाश्ता करून घेतला..एक माझ्या नावाची पण फ्रूट डिश गट्टम् केली पण माझ्याकडे काही ढुंकून पाहिले नाही मग मी जमेल तसे तयार होऊन बसली तोच नेमकी त्या दिवशी लाईन गेली घामाने माझे आधीच अतिविचीत्र दिसणारे केस पूर्ण पाठीला चीपकले चेहऱ्यावरून घामाच्या धारा ओघळू लागल्या..कधी नव्हे ते साडी घातली होती त्यात लाईट नाही भयंकर हाल झालेत..नशीब चांगल म्हणून पटकन लाईट आली..पाहुणे माझी वाट पाहून कंटाळून गेले होते..शेवटी माझा भाऊ मला घ्यायला आला..घरी असताना डोक्यावर पदर घ्यायला विरोध करणारा माझा भाऊ माझे केस पाहून स्वतःच म्हंटला बाई डोक्यावर घे पदर.. बाहेर मुलगा त्याचा भाऊ आणि त्याचे वडील शिवाय माझे बाबा भाऊ आणि jiju होते इतके लोक पाहून माझी घाबरगुंडी उडाली एकतर पहिलाच कार्यक्रम त्यात डोक्यावर पदर माझे हात आपोआप चहा देताना थरथरायला लागले.. डोक्यावरचा पदर काही केल्या तिथं टिकेना..सारखा पदर वर करण्याच्या चक्कर मधे भावाच्या हातातला ट्रे मी हवेत भिरकावून दिला नशीब त्यातले चहाचे कप आधीच पाहुन्या पर्यंत पोचले होते नाहीतर बिचारे चहा चे डाग अंगावर घेऊन परत गेले असते..
मग माझा मोर्चा बायकांकडे वळला..तिथे सुद्धा असाच गोंधळ.. इतकी खंडीभर लोक..मुलाच्या दोन्ही वहिन्या आई..दोन्ही वहिन्यांचे प्रत्येकी एक एक बाळ..माझी आई बहीण काकू..काकूंची मुलगी.. आणि या सगळ्या गराड्यात खुर्चीवर बसलेली कावरी बावरी मी.. मी येऊन नुकतीच बसली होती अजून थरथरणारे हात पाय कमी झाले नव्हते तोच अचानक बेडवरून त्यांच्या वहिनीच्या 3 वर्षाच्या मुलीने माझ्या अंगावर मोगली सारखी उडी मारली आणि मासी चलो ना बाहर म्हणून जे मागे लागली की तिला तिच्या आईने धपाटे देईपर्यंत तिने मला सोडल नाही..मग माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली..मी जमेल तशी उत्तरे दिल्यानंतर सगळेजण चिडीचूप होऊन त्या दोन नटखट बालिकांचा गोंधळ पाहत बसले..मला बाहेर बोलवण्यात आले मी मुलाच्या मोठ्या भावाच्या अगदी समोर खुर्चीवर बसले.. त्याने मला नाव काय शिक्षण काय असे बेसिक प्रश्न विचारले आणि मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला स्वयंपाक करता येतो का.. मला आईने सांगितले होते की सगळ खरचं सांगायचं.. त्यामुळे मी हां थोडा बहोत बना लेते है असं सरळ खरखुर उत्तर दिलं..यावर मुलाचा आगाऊ भाऊ म्हणाला थोडा बहोत मतलब रोटिया बना लेती हो और सब्जी मेरे भाई को बनानी पड़ेगी क्या? यावर सगळ्यांचा हास्यकल्लोळ..आणि मी पण आपण कोण आहोत कुठे बसलोय विसरून जोरात हसायला लागली..ताईने इशाऱ्याने मला आठवण करून दिली की जरा दात कमी दाखव..मग मुलाच्या भावाने मुलाला प्रश्न विचारायला सांगितले..तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिले तो बिचारा खाली मान घालून नको नको म्हणत होता.. भाऊ ४ ५ वेळा म्हणे अरे विचार काहीतरी..तो परत..खाली मान आणि नहीं नहीं..मी एकटक त्याच्याकडे बघत..त्याचे वडील मला बघत.. माझी ताई त्याच्या वडिलांना बघत.. मस्तच ड्रामा चालू होता..मग मला परत बायकांकडे पाठवण्यात आले..तिथे गेल्याबरोबर ती लहान मुलगी (३ वर्षे) परत मला चीपकली..माझ्या अंगावर सगळे चॉकलेट चे ओघळ.. तिच्या आईने परत तिला बेडवर बसवून सोप सुपारीचा डब्बा तिच्या हाती दिला..तिने बेडवर सगळा धिंगाणा केला..सोप सुपारीचा डब्बा बाहेरच्या लोकांना द्यायचा होता ती जाम तो सोडेना मग रडून तिने सगळ घर डोक्यावर घेतलं..शेवटी राहू द्या तिच्याजवळ डब्बा म्हणून वातावरण शांत केलं..मग हीचा गोंधळ कमी की काय म्हणून लहानी (१ वर्ष) पण उठली..त्यात ताईचा लहान मुलगा (४ वर्षे) आणि तिघांची एकाच खेळण्यासाठी मारामारी..मला तर हसू आवरेना..एकाला चूप करायचं तर दुसरा गोंधळ करायचा..मुलाच्या वडिलांना अचानक काहीतरी आठवले त्यांनी परत मला बाहेर बोलावले..मी त्यांच्यासमोर बसली असताना ताईच्या लहान मुलाने नवऱ्या मुलासमोर ठेवलेली फ्रूट डिश उचलून ऐटीत माझ्या मांडीवर बसून स्वतः गट्टम् केली..तेव्हा मला हसूच आवरेना..तो बिचारा बसला तसाच..मुलाच्या वडिलांनी मला विचारले की बेटा तू तशी तर आमच्या मुलासोबत नोकरी च्या ठिकाणी राहशील पण सुट्ट्यांमध्ये त्याच्यासोबत गावाकडे येशील ना? मी हो म्हंटले तसा त्यांचा चेहरा एकदम खुलला माझ्या डोक्यावर हात ठेऊन तोंडभरून त्यांनी मला आशीर्वाद दिला..बाहेरगावी नोकरी करणाऱ्या आपल्या आई बाबांपासून दूर राहणाऱ्या आपल्या लेकरांसोबत राहण्यासाठी आई वडील किती अधीर झाले असते हे तेव्हा समजले..मग सगळे प्रश्न उपप्रश्न लहान मुलांचा गोंधळ सगळ आवरतं घेत आम्ही जेवायला हॉटेल ला जायला निघालो..मुलाची आई म्हणे तुला साडी comfortable नसेल तर ड्रेस घालून घे आता त्यांना कुणी सांगावं मी नुसते जीन्स घेऊन आलीये ड्रेस कुठला घालणार.. मी पटकन आत जाऊन साडी नीट केली..केसांमुळे डोक्यावरचा पदर काही सुटला नाही.. तसेच हॉटेल ला गेलो ३.३० वाजत आले होते मला जाम भूक लागली होती एकतर सकाळपासून पोटात काहीच नव्हत..हे लोक कधी जेवण ऑर्डर करतील आणि कधी मी पोटभर खाऊ असं झालं होत तेवढ्यात माझा चेहरा आणि चेहऱ्यावरील एकंदरीत भाव पाहून ताईने मला मेसेज केला की जेवण नीट माणसासारख करशील जास्त अधाशिपणा दाखवू नको.. माझा चेहरा खरकन उतरला..४ वाजता जेवण आल..तोपर्यंत मी washroom च्या बहाण्याने बाहेरची हवा खाऊन आले..ताईचा मुलगा आणि त्याच्या दादाची मुलगी भयंकर धिंगाणा घालत होते पूर्ण हॉटेल मधले लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते..पूर्ण हॉटेल मधे धावणे पकडा पकडी खेळणे इथल्या प्लेट उचलून तिथे ठेवणे खुर्ची इकडची तिकडे सरकवणे तिथली ताट वाटी वापरून घर घर खेळणे..दोघांनी सगळ्या बायकांच्या नाकात दम आणला होता..माणसं मात्र हसत खेळत जेवण करत होती..मुलाच्या मोठ्या भावाने त्यांच्या लहान मुलीला जेवू घातले तीच diper बदलून दिलं हे पाहून बरं वाटल..याचा लहान भाऊ पण असाच असेल असे वाटून मनोमन आनंद झाला.. माझी आजची भूमिका म्हणजे फक्त बघ्याची होती मी काहीही बोलू शकत नव्हती लहान पोरांसोबत खेळू शकत नव्हती जेवताना सुद्धा खूपच शांत हळूहळू जेवली..मला अजिबात तिथे करमत नव्हतं जेवण झाल्यावर मी परत washroom ला पळाली.. मुलाची वहिनी सुद्धा माझ्या मागे आली..आम्हाला दोघींना एकांत मिळताच तिने मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला बाई ग तू असा दिवसभर डोक्यावर पदर घेऊन का मिरवत आहेस..तुला फार आवडत का अगदी असं ट्रॅडिशनल राहायला..मी म्हणायला तर हो म्हणून दिलं पण मला इतकं भयंकर हसू येत होत की सांगू शकत नाही..त्यात ताईचा मुलगा आला पाठीमागे.. सुसू करतो म्हणे..मग त्याला लेडीज toilet मधे नेत होती तर जो रडायला लागला अजिबात गेला नाही..मी बॉय आहे मी गर्ल्स टॉयलेट मधे नाही जात वगैरे आगाऊ शहाणपणाच्या गोष्टी बोलायला लागला..कितीही समजावलं तरी जाम ऐकेना..आम्ही तसेच तिथे उभ्या राहिलो आणि तितक्यात समोरून नवरा मुलगा आला.. जेंट्स toilet अगदी बाजूला होत..त्याच्या वहिनीने त्याला situation सांगितली.. त्याने माझ्याकडे पाहिले..मी त्याच्याकडे पाहिले..पहिल्यांदा आमची नजरानजर झाली.. तो माझ्याकडे पाहून अगदी गोड हसला..आयुष्यात पहिल्यांदा मी लाज लाज लाजली..अगदी फिल्मी वाटतं होत मला तर सगळं.. तो ताईच्या मुलाला आत घेऊन गेला..आम्ही वापस आमच्या जागेवर येऊन बसलो..छान हसत खेळत जेवण झाली आम्हाला कुणालाच वाटले नाही की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत.. five star हॉटेल असल्यामुळे बिल भयंकर आलेलं होत..माझे jiju माझा भाऊ आणि नवरा मुलगा मी देतो मी देतो म्हणून घासाघीस करत बसले होते.. नवरा मुलगा मनापासून पैसे भरायला तयार आहे म्हणजे कंजूस नाही (शॉपिंग चा प्रश्न सुटला Wink ) हा पॉईंट पण माझ्या मनाने नोट करून घेतला.. सगळं आटोपून आम्ही एकदाचे बाहेर पडलो..मी सगळ्यांच्या पाया पडली (की लागली) मुलाच्या आईने मला घट्ट मिठी मारली.. मी पण त्यांना काळजी घ्या वगैरे सांगून सून असल्यासारखं कर्तव्य बजावल Lol जाताना त्यांनी ताईच्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले तर हा दीड शहाणा त्याच्या वहिनीच्या मुलीला ते पैसे देऊन आला आणि म्हणे तू तुझ्यासाठी छान छान खेळणे घे माझे खेळणे मलाच राहू दे आमची हसून हसून पुरेवाट झाली..मग परत नमस्कार चमत्कार झाले आणि पाहुणे गाडीत बसून परत निघाले..मी डोक्यावरचा पदर काढून फेकला आणि हुश्श केलं..
रात्री दहाच्या दरम्यान मुलाच्या वडिलांचा फोन आला की तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली तुम्हाला आमचा मुलगा कसा वाटला?
मला वाटतं दिवसभर माझ्या डोक्यावर असलेला पदर पाहून ते लोक इंप्रेस झाले असतील Wink ( just kidding )

डोक्यावरून पदर किस्सा धम्माल आहे! मस्तच. त्यांना वाटलं असेल (उत्पल दत्तच्या सुरात) 'ऐसे पवित्र विचार! ऐसा पवित्र वातावरण! मुझे बताईये आपकी पवित्र कैसी है, मेरा मतलब है, आपकी तबियत कैसी है?'

हो ना हरचंद..ते लोक खूप कन्फ्युज होते की ही पोरगी इतकी का पदर पदर करतेय..अब वो क्या जाणे Lol

पहिले तर आमचा कापो प्रोग्राम २ ३ वेळा सगळी तयारी झाली असताना postpone झाला होता( कधी आमच्याकडुन तरी कधी त्यांच्याकडून) म्हणून मी यावेळेस काही तयारी केली नव्हती..मग दोन्ही family योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असताना एक महिना वाट पाहिल्यानंतर Finally झाला एकदाचा असा कापो..गोंधळात गोंधळ..

अगदी जुन्या सिनेमात वगैरे दाखवतात तसा झाला की हा कांपो कार्यक्रम. Proud
कुणी ठरवून धमाल स्क्रीप्ट लीहायला घेतली तरी एवढी धमाल सहजी जमणार नाही.

मग फायनल का हे?

मस्त धमाल!!! अभिनंदन.
ते ताईचा मुलगा वेळीच सांभाळा नायतर ताईला कांदेपोहे चान्स न देताच सून आणायचा. Lol

अमृताक्षर, फार डेंजर विनोदी किस्सा झाला हा.4 ला जेवण म्हणजे तुझे हाल झाले असतील मात्र.
पुढच्या वेळी मस्त जीन्स आणि लॉंग कुर्ता घाल.अंगभर भी हो गया और सुटसुटीत भी.
मी खूप हसले.परत वाचणार आहे.
बाय द वे इतकी लहान मुलं घेऊन कांदेपोहे कार्यक्रमाला मुलीकडे कोण जातं Happy Happy

सगळ्यांचे खूप आभार..आज हे लीहताना परत तो दिवस अनुभवल्यासारखा वाटतोय.. माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करून अगदी मस्त वाटलं..

Thank you mi_anu.. हो पुढच्या वेळी छान कुर्ती घालेल.. हा प्रोग्राम ताई कडे असल्यामुळे जास्त ऑप्शन्स नव्हते माझ्याकडे.. घरचे सगळे म्हणत होते नाश्ता करून घे पण मी excitement मधे काहीही खाल्ल नाही..चांगलेच हाल झालेत माझे मग.. पण मुलगा मला आवडला असल्यामुळे छान छान फिलिंग होत..
घरची सगळी मंडळी सोबत आल्यामुळे लहान मुलांना पण आणायला लागले..पण त्या दोघी सुद्धा खूप गोड होत्या..मला सुद्धा लहान बाळ आवडतात खूप त्यामुळे मज्ज्या वाटली..

अभिनंदन अमृताक्षर, एक फुकटचा सल्ला , आता पुन्हा एकदा नवऱ्या मुलाशी बोलून तू बघ . तुम्ही दोघंच.... इतर गप्पा तर माराच पण डोक्यावर तू कायम पदर घेणारी नाहीयेस, का घेतला होता त्याचं कारण, तूला जीन्स ची च सवय आहे वगैरे गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या बऱ्या असं मला वाटतं.

काय असतं ना आपण साधेच असतो पण समोरचा कधी कधी आपल्या बद्दल काही मतं करून घेतो, आपण नंतर त्या मतांपेक्षा वेगळं वागलं तर कायम ऐकून घ्यावं लागतं, त्यापेक्षा खरं आणि स्पष्ट बोललं तर आणखी चांगलं Happy

मी माझ्या नवऱ्याच्या घरच्यांना बघायला गेलं होतं Proud तेंव्हा प्रॉपर ड्रेस घालून पण नेहमीच्या अवतारात गेले होते. शिवाय नवऱ्याला सुद्धा आधीच सांगितलं होतं की मी फोटो मध्ये दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात जास्त सावळी आहे त्यामुळे भेटल्यावर त्यांना फार मोठा अपेक्षाभंगाचा धक्का बसला नाही. त्यांच्या घरी गेलो तेंव्हा मला अति प्रचंड उकडत होतं म्हणून मी स्पष्टच म्हणाले होते की या हवेत गरम फार होतंय त्यावर सासरे म्हणाले वरच्या खोलीत AC लावून बसू आणि मग गप्पा मारू. मी लग्न ठरेपर्यंत किंबहुना त्यानंतरही किती तरी महिने नवऱ्याला पाहिलं नव्हतं, भेटले नव्हतेच पण पहिल्या फोन पासून ते आजपर्यंत प्रत्येक वेळेला जे वाटतंय ते आणि जे आहे ते खरंच आणि स्पष्ट बोलल्यामुळे मला सगळं बरंच सोप्पं गेलं.

सासू सासर्यांना पहिल्यांदा मी पंजाबी ड्रेस मध्ये भेटले
नणंदेला आणि तिच्या नवऱ्याला जीन्स मध्ये भेटले होते.नवऱ्याला भेटले तेंव्हा तर शॉर्टस आणि टी शर्ट घातलं होतं...हे सहज आठवलं म्हणून लिहिलं Proud

हो रिया..पाहून गेल्यानंतर काही दिवसातच दोन्ही कडच्या लोकांची फोना फोनी सुरू झाली..मुलाचे वडील तर एक दिवसा आड माझ्या बाबांना हाल हवाल विचारायला कॉल करतात Lol
मी पण बोलली मुलासोबत.. त्याला मी जशी आहे तशी क्लिअर आयडिया दिली आहे..त्याला सुद्धा फेसबुक वर माझे फोटो आणि पोस्ट पाहून बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल.. लग्नाआधी एकदा दोघांनी भेटाव असं दोघांना वाटतंय पण बघू आता पुढे काय काय होतंय..

Pages