आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

यापुढे भांडण सुरु करणारे, वाढवणारे, समर्थन करणारे सगळ्यांचाच मायबोलीवरचा प्रवेश रद्द करावा लागला तर तो केला जाईल. यात दुर्देवाने नवीन जुने कुणिही मायबोलीकर असले तरी आमचा नाईलाज असेल. जेंव्हा इतर मायबोलीकर आता भांडण बास असे म्हणतील तेंव्हा तरी त्यात सहभागी असणार्‍यानी योग्य तो इशारा ओळखून वैयक्तिक संदेशातून संपर्क साधण्याचा पर्याय स्विकारणे अपेक्षीत आहे.

मायबोली जी काही आहे ती मायबोलीच्या आग्रह करण्याच्या पण सक्ती न करण्याच्या धोरणामुळे आहे. मग तो शुद्धलेखनाचा असो, देवनागरीकरणाचा असो, रतीब न घालण्याचा असो वा दर्जा टिकवण्याचा असो. पण गेल्या काही दिवसात हा आग्रह फारच टोकाला जाऊन धमकी वाटावी अशा प्रतिक्रियांपर्यंत गेला आहे. मायबोलीवरचे वातावरण टिकवण्यासाठी अशा टोकाला जाण्यार्‍या कुणाचा प्रवेश बंद करावा लागला तर नाईलाजाने का होईना ते पाऊल उचलण्यात येईल. हे धोरण कदाचित काही मायबोलीकरांना मान्य नसेल पण ते धोरण म्हणून मायबोलीने स्विकारले आहे.

विषय: 
प्रकार: 

शक्यतो अगदीच डोक्यावरून पाणी गेले तरच अ‍ॅडमिन हस्त्क्षेप करतात असेच दिसून आले आहे. त्याना तेवढा वेळही नसतो आणि मायबोली हेच त्यांचे एकमेव व्यवधान नाही. त्यांनाही वैयक्तिक व्यवसाय, जीवन आहे. त्यामुळे अ‍ॅडमिन जेव्हा रिंगणात उतरतात तेव्हा निश्चितच कुठेतरी मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत हे निश्चित. मायबोली म्हणजे प्रचारी व्यासपीठ नव्हे त्यामुळे एखाद्याला प्रचारापासून रोखणे हे प्रशासकाना भाग आहे. वाद शक्यतो ऐतिहासिक आणि राजकीय, चालू घडामोडीवरच जुंपतात. साहित्याच्या , पाककलेच्या बीबी वर शक्यतो नाही कारण तिथे अभ्यास लागतो. इतिहास आणि राजकारणात कशाही पिंका टाकल्या तरी चालतात. मधुकर सारख्या आयडीचे साहित्यिक लिखाण अप्रतिम आणि दर्जेदार होते पण त्याने अतिरेकी 'प्रचार' सुरू केला आणि त्याला 'बन्द' करावे लागले. त्यामुळे अ‍ॅडमिनचे हस्त्क्षेप करण्याचे व त्याबद्दलची कारणे न देण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.

Pages