आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल, खरंच रोचक अनुभव !
...........................
1996 साली महाराष्ट्रात ‘गोडबाबा’ नावाच्या एका भोंदूने धुमाकूळ घातला होता. त्याच्या मते त्याच्या शरीरातून गोड पदार्थ बाहेर पडत असतात वगैरे ! त्यामुळे त्याने ओंजळीतून सोडलेले तीर्थ पिण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या !

त्या संदर्भातील हे कात्रण सापडले:

goadbaba (2).jpg

मस्त आहे धागा. गोडबाबा हे नाव आठवतंय.

मला बातम्या आठवत नाहीत पण कोणाकडेतरी लहानपणी रहायला गेले असताना त्यांच्या घरात एका वर्तमानपत्रात (कोणते ते आठवत नाही) 'एलियन' (१९७९) या इंग्रजी चित्रपटाची पूर्ण स्टोरी वाचलेली आठवते. फारच थरारून गेले होते मी. असे काही चित्रपट असतात हेच माहित नव्हतं त्यामुळे हा चित्रपट कधी बघता येईल असं झालेलं.

गोडबाबा :
बारामतीला असताना आमच्या घरमालकांकडे आलेले.
पण ते बोटाला सॅकरीन लावून चलाखी करतात हे उघड झालेल, घरमालकाच्या मुलानेच सांगितल होत

लहानपणी कल्पना चावलाच्या कोलंबिया यानात झालेल्या दुःखद निधनाची बातमी वाचली तेव्हा सुन्न झाले होते. अंतराळ यान अंतराळवीर हे सगळं काही कळत नव्हतं पण त्या बातमीने खूप वाईट वाटलं होतं.

मामी, आसा
गोडबाबा >> +११
सानवी,
कल्पना चावला >>
+१ अगदी हृदयद्रावक.
.................................
..............................
आपले दोन माजी राष्ट्रपती मा. राधाकृष्णन व मा. कलाम आणि आचार्य रजनीश यासंदर्भात मुंबईच्या एका वाचकाने लिहिलेली ही आठवण :

kalaam (2).jpg

कलाम यांनी शब्द पाळला हे आपण जाणतोच.

कुणाला 'श्री' आठवतय का? प्रमोद नवलकरांचे स्पेशल रिपोर्ट असायचे त्यात.
त्यातच गॅन्गवॉरबद्दल बरेच वाचलेले. पोत्या दादा, मन्या सुर्वे वगैरे मंडळी त्यातूनच माहीत झाली.

विनिता,
वर एकदोघांनी श्रीचा उल्लेख केलाय.
नवलकर, बरोबर. ते त्यांचे उमेदीचे दिवस होते.
श्रीकांत सिनकर पण लिहायचे त्यात ? बहुतेक.

हो सिनकर पण होते. पण त्यांचे लेखन मला आठवत नाही.
संप हा शब्द मी त्या काळात पहिल्यांदाच ऐकलेला. दत्ता सामंत आठवतात.

सिनेमाच्या जाहिराती पानभर असायच्या. सिनेमाची कथा थोडक्यात पण रंगवून लिहिलेली. हे १९८० किंवा ८१ चे वृत्तपत्र असेल:
movie_ads_in_marathi_paper.jpg

अतुल, सुंदर. अगदी आठवल्या.
मला एका हिंदी चित्रपटाची अशी जाहिरात केलेली आठवते.

त्यात एका नटीने अगदी तोकड्या कपड्यात दृश्ये दिलेली होती. जाहिरातीत ती म्हणते,
“यात मी जी काही दृश्य दिली आहेत, ती माझ्या घरचे बघू शकणार नाहीत अशी आहेत !”

अशा क्लृप्त्या त्याकाळी लढवल्या गेल्या आहेत.

Lol खरेच आहे कुमार सर.

वरचे चित्र या पानावर छोटे दिसते पण "Open image in new tab" केले कि त्यातली अक्षरे वाचता येतात. "फकिरा" ची जाहिरात अशी आहे:

डोळ्यासमक्ष ४ बेरहम स्मगलरांनी त्याच्या वडिलाना भोकसले आणि घरादारास आग लावली तीच आग ह्रदयात घेऊन ते दोघे भाऊ त्या नराधमाच्या अड्डावर पोहचले तब्बल १५ वर्षानंतर
शशीकपूर - गुंडांच्या दातांच्या कवळ्या ढिल्ल्या करणारा श्रीमंताच्या तिजोऱ्या साफ करणारा - गुन्हेगारांच्या मुंड्या पिरगळणारा व पोलिसाच्या नाकांत दम आणणारा बेनाम मोटर सायकलस्वार! हवेप्रमाणे येणार बिजलीच्या झटक्यात गूल होणार...!

>>> "फकिरा" ची जाहिरात>>>
भारीच.
त्याकाळी मॅटिनीचे पिक्चर खूप जोरात असायचे. कॉलेज तरूणांसाठी तर पर्वणी.
राजेंद्रकुमार आणि राज कपूर यांचे बरेच मॅटिनीमुळे पाहता आले होते

छापील भेटकार्डे हा प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आलाय.
पूर्वी अनेक प्रसंगी अशी भेटकार्डे दिली जायची.
1990 च्या दशकात एका निवृत्त झालेल्या व्यक्तीला मिळालेले हे भेटकार्ड :

greeting card (2).jpg

अजून मिळतात की अर्चीज आणि हॉलमार्क मध्ये.
कॉलेज ला असताना आर्चीज ला कोणासाठी तरी ग्रीटिंग घ्यायला जाणे हा फार प्रीमियम प्रकार होता.तेव्हा कसं परावडायचं काय माहित.आता आर्चीज ला गेलं की प्रत्येक गोष्ट ओव्हर प्राईसड वाटते.

काही वर्षांपूर्वी सकाळच्या सप्तरंगमध्ये आलेला एक विशेष लेख आठवला.

त्या लेखाचे लेखक जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेले गृहस्थ होते. त्यांना ती शिक्षा खुनासाठी झाली होती.

शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर संबंधिताकडे समाजाने निव्वळ एक नागरिक म्हणून पाहावे अशी अपेक्षा असते. वास्तवात तसे होत नाही.

या पार्श्वभूमीवर सदर व्यक्तीस सकाळने लेखनाची संधी दिली हे विशेष.

86 साली हॅले चा धूमकेतू आलेला तेव्हा आयुष्यात एकदाच घडणारी घटना अशी काहीशी बातमी आलेली. मी म्हणालो की मी जर अजून 76 वर्ष जगलो तर पुन्हा हा धूमकेतू आलेला असेल ना मग आयुष्यात एकदाच कसं. छापील बातमी चुकीची ठरवली म्हणून मला खूप आनंद झालेला. मोठ्या बहिणीने "पण तेवढा जगलास तर ना" अशी कुजकट टिप्पणी करून आजीचा ओरडा खाल्लेला Happy

नासाची स्कायलॅब पडणार होती तेव्हा पेपरमधे बातम्या ओसण्डुन वहात होत्या. आम्हा मुलांंमधे दहशत होती तेव्हा. पेपर कटिंग ही काढलेले.. आता सापडणार नाही . Happy

मला लहानपणी एक कीडनॅपर साधूंची गोष्ट सारखी आठवते.ते म्हणे रस्त्यात सोनं टाकायचे आणि ते उचलल्यावर म्हणे माणूस हिप्नॉटाइझ होऊन मागे जायचा.या अफवेची इतकी भीती होती की एक दिवस मुलांच्या आया शाळेतून घेऊन जायला आल्या होत्या.
त्याकाळी व्हॉट्सऍप नव्हतं हे खूपच बरं.

वरील तिन्ही आठवणी छान

*स्कायलॅब पडणार होती तेव्हा पेपरमधे बातम्या >>>
अगदी अगदी !

एक किस्सा आठवतो आहे. आमच्या इकडे एक माणूस कोंबड्या ची पिल्लं विकायला घेऊन आला. मजा म्हणजे पिल्लं एकदम रंगीबेरंगी होते , बऱ्याच लोकांनी घेतल्या विकत कारण त्याने बराच मार्केटिंग केले कि ह्या दुर्मिळ आहे वगैरे आणि जास्त किमतीला विकल्या.
त्या मस्त फिरायच्या कॉलनी मध्ये , पण एक दिवस खूप पाऊस आला आणि सगळ्यांचे रंग निघून गेले पाण्याने धुतले गेले :):)
त्या माणसाला खूप शिव्या घातलेल्या लोकांनी Happy

मस्त धागा!

माझ्या आठवणीतले:

१. हाकामारीचं प्रस्थः ही म्हणे रात्री दाराबाहेर येउन हाक मारायची. ओ दिली तर ती व्यक्ती भारली जायची. आम्हा मुलांना ते खरंच वाटायचं आणि ते जवळजवळ ६-७ महिने चाललं होतं.
२. राजीव गांधी हत्या: तमिळ इलमचं नाव तेव्हाच ऐकलं. Frontline मासिकात त्या धनू, शिवरायणचे मोठेमोठे रंगीत फोटो छापले होते. त्या फोटोंसाठी लायब्ररीतून ते मासिक आणलं होतं. धनूने वापरलेला suicide belt denimचा होता. त्यावेळी denim हा माझ्यासाठी नवीनच शब्द होता.
३. बाबरी मशीद पाडणे: त्यावेळी दूरदर्शनवर शेवटपर्यंत मशीद पडली सांगत नव्हते, बांधकामास थोडा धक्का बसला आहे असं सांगत होते. नंतर टीव्ही वर चाललेले कार्यक्रम रद्द करून एक मुलांचं 'ईश्वर एक अल्ला एक' असं समूहगान लावलं तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली.
४. खून भरी मांगः मला वाटतं या नंतरच कधीतरी दूरदर्शन वर रेखाचा खून भरी मांग लावला होता. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा BJP मधे होता तर चित्रपटातील त्याच्या सर्व scenes ना कात्री लावण्यात आली. चित्रपट बघताना खूपच गोंधळल्यासारखं झालं होतं.

अजून आता नंतर आठवतील तसे Happy

नक्की कधी ते आठवत नाही पण ही बातमी खूप गाजली होती.
इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी असे विधान केले होते की गेल्या ६० वर्षांत जगाला हलवून टाकेल असे एकही संशोधन भारताने केलेले नाही.
नंतर एकदा अशी चर्चा होती की मूर्तींचा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार आहे. पण पुढे काही झाले नाही.

लहानपणी फारसं न समजलेलं, पण तेव्हा बातम्यांमध्ये खूप गाजलेलं प्रकरण म्हणजे जळगावचं वासनाकांड (हाच शब्द असायचा. किंवा सेक्स स्कँडल). खूप लहान नसल्याने काही तरी किळसवाणं, भयानक प्रकरण आहे एवढं कळलं होतं, पण अधिक विचारायची सोय नव्हती.
गो. रा. खैरनारांच्या बातम्याही आठवतायत.

कोंबड्या ची पिल्लं, हाकामारीचं प्रस्थः, नारायण मूर्ती आणि जळगावचं वासनाकांड >>>
सर्व आठवणी वाचल्या.
धन्यवाद

अन्य काही वासनाकांडे ही झाली होती.
मानवत हत्याकांड तर भीषण.

२० वर्षापूर्वीचं सिनेमा म्हणजे ह्रितिकने डेब्यू केलं!! करिना कोण ते माहिती नव्हते पण तिने ह्रितिकबरोबर कहो ना प्यार है सिनेमा नाकारला असे पेपरात वाचल्याचे अगदी ठळक आठवते Happy

छान.

हे बघा जुने पुणे. कोथरुडचे वर्णन कसे आहे !

IMG-20201125-WA0001.jpg

>> हाकामारीचं प्रस्थः

हे आठवतेय. मागून हाक ऐकू येते पण मागे पहायचे नाही अन्यथा आपला मृत्यू होतो. असे काहीसे जोरदार पसरले होते तेंव्हा.

>> अन्य काही वासनाकांडे ही झाली होती.

एका भोंदूबाबाची (मांत्रिक) वृत्तपत्रातून फारच चर्चा झालेली आठवतेय. त्याकाळी हे प्रकरण अत्यंत गाजले होते. अतिशय संवेदनशील विषय. पण आता मात्र त्याबाबत कुठेच काही तपशील आढळत नाहीत त्यामुळे अंदाजाने काही बोलणे योग्य होणार नाही.

Pages