आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९६९ पासून सलग 53 वर्षे ओमान मध्ये नोकरी केलेल्या अशोक सभरवाल यांनी सांगितलेले अनुभव:
https://timesofoman.com/article/120052-oman-in-the-70s-through-an-expatr...

तेव्हा या लोकांचे पगार लाल रंगाच्या भारतीय नोटांमध्ये होत असत आणि बँकेतले खाते पौंडांमध्ये असे.

1983 मध्ये भारतातील पहिलीवहिली मारुती 800 कार श्री हरपाल सिंग यांना विकली होती. त्या कारचे पुनरुज्जीवन करून ती मारुती उद्योगने आपल्या कंपनीत बघण्यासाठी ठेवली आहे :

https://www-cartoq-com.cdn.ampproject.org/v/s/www.cartoq.com/indias-firs...

वाह! काय आठवण आहे. पुढील अनेक वर्षे या कारची क्रेझ होती. मला या कारची सगळ्यात पहिली आठवण आहे लहानपणीची ती माझ्या मावस भावाने "ती बघ मारुती कार" असे करून दाखवली होती. मला तेंव्हा "मालती" वाटले होते. (कार चे नाव मारुती, हे फिट्ट बसायला वेळ लागला)

5DAF8DD5-AD1E-48A8-95D8-E3695191CB24.jpeg

नुकतेच एका स्नेह्यांनी हे पाठवले. ते आणि त्यांचे पिताश्री दोघे हिंदीतले लेखक. आपण स्वातंत्र्य किती गृहीत धरतो असे त्यांचे शब्द होते.

स्वातंत्र्यपूर्व भारतात जिथे ब्रिटिश कार्यालयात डॉग्स अँड इंडियन्स 'अलाऊड' होते तिथेही भारतीयांना खुर्चीवर बसायची मुभा नव्हतीच, त्यासाठी असा वेगळा परवाना काढावा लागत असे !!!!

कुर्सीनशीन !!!

आपण स्वातंत्र्य किती गृहीत धरतो असे त्यांचे शब्द होते. >> सहमत.
एखादी गोष्ट मिळत नाही किंवा हरवते, तेव्हाच त्याची किंमत कळते.

Not so elementary Dr. Watson...

जगातील पहिला फींगर प्रिंटिंग ब्यूरो, १८९७, कलकत्ता

१८९७ साली कलकत्याचा तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असलेल्या सर एडवर्ड रिचर्ड हेन्री ह्याने अँथ्रोपोमेट्रिक ब्यूरोला पूर्णवेळ फिंगर प्रिंटिंग ब्यूरो मध्ये बदलले. त्याचवेळी त्याने पोलीस उप-निरीक्षक उर्फ पोलीस सब इन्स्पेक्टर असणाऱ्या पीएसआय हेमचंद्र बोस आणि पीएसआय अझिझ उल हक ह्यांना बोटांचे ठसे वर्गीकृत करण्याचे शास्त्र विकसित करायची ऑर्डर दिली होती, ती हुकुमाप्रमाणे बोस व हक ह्यांनी विकसित केली अन् आज जवळपास १२५ वर्षांनी सुद्धा ती हेन्री क्लासिफिकेशन सिस्टम ह्या नावाने फॉरेन्सिक सायन्स मध्ये युज होते आहे.

ही व्यवस्था वापरून पकडला गेलेला (जगातील) पहिला आरोपी म्हणजे ऑगस्ट १८९८ मध्ये उत्तर बंगाल मधील जलपायगुडी येथे एका चहा मळा मॅनेजरचा खून करणारा कंगाली चरण हा आरोपी होता. (कोण कसा प्रसिद्धी पावेल त्याचा काहीच भरवसा नाही)

मला तर हेच सुरस अन् चमत्कारिक वाटले आजच्या वाचनात.

त्या कुर्सी नशीन प्रमाणपत्राचा हा रिमेक वगैरे आहे का?
फॉण्ट्स पाहून वाटले असे.

सुमारे ३२ वर्षांपूर्वीची ही आठवण : ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ चे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांच्या शब्दात :

त्या काळात फोन आणि कन्युनिकेशनच्या पायाभूत सुविधांची स्थिती फारच वाईट होती. साधा फोन मिळायला तीन महिने लागायचे. आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण ९६०० baud rateच्या मॉडेमवर पुण्याहून मुंबईला फोन करण्यापेक्षा, पुण्याहून मुंबईला NCSTमध्ये प्रत्यक्ष जाऊन मेल चेक करणं स्वस्त होतं !!

https://www.aksharnama.com/client/article_detail/6264

हो, हे मी सुध्दा वाचले होते. ९० च्या आसपासचा हा काळ असेल. क्लायंटच्या ईमेल चेक करण्यासाठी ते मुंबईला जात असंत. (मी प्रथम पाहिलेली पर्सिस्टंट सेनापती बापट रस्त्यावर एका टू बी एच के मध्ये होती)

इथे ईमेल चेक करणे म्हणजे कुठल्या प्रोग्रामची atachment, ज्या साठी ती फाईलच हवी असेल, प्रिंट चालणार नाही, असे असावे.

९० च्या दशकात फॅक्सची चलती होती.
प्रिंटेड चालत असेल तर क्लायंटला फॅक्स करायला सांगता आले असते / मुंबईत ईमेल प्रिंट करून फॅक्स करा असे सांगता आले असते.

9600 bps modem असली तरी कनेक्टेड स्पीड फारच कमी असे, 95/96 पर्यंत तर 500 bps download स्पीड मिळाला की चांगला स्पीड मिळाला म्हणायचे.
एकतर डायल अप करून आपली मॉडेम कनेक्ट होणे हे सुध्दा एक दिव्य असे. VSNL च्या सर्व्हर वरील कित्येक modems काम करत नसत. एकूण कनेक्शन्सच्या तुलनेत modems कमी असल्याने बिझी टोन मिळण्याची शक्यता जास्त. रिंग जातेय पण respond करत नाहीय, respond करतेय पण लॉग इन होत नाही, कनेक्ट होतेय पण डेटा ट्रान्स्फर शून्य, झालाच तर अर्ध्या मिनिटात कनेक्शन ड्रॉप. मग रिकनेक्ट करायला परत सगळ्या दिव्यातून जावे लागे. त्यामुळे कनेक्शन मिळून 500 bps speed मिळणे म्हणजे गंगेत घोडे न्हायला सारखे वाटे.
तेव्हा आमच्या कंपनीत सगळा व्यवहार फॅक्स वर चाले. कधीतरी एखाद्या equipment चे firmware upgrade करायचे त्याचे down load detials ईमेल द्वारे येई, आणि तसे ईमेल पाठवले आहे याचा फॅक्स/फोन येई.
तेव्हा रात्री 12 नंतर ऑफिसला येऊन किंवा भल्या पहाटे येऊन download करणे सोपे जाई.

अजून एक म्हणजे VSNL चे अनेक ईमेल servers मेल पाठवण्यास कित्येक तास ते काही दिवस उशीर करत, कधी कधी गायब करत.
तेव्हा स्पॅम अद्याप सुरू न झाल्याने SMTP authentication प्रकार अद्याप सुरूही झाला नव्हता. मग ज्याला ईमेल पाठवायचे त्याच्या ईमेल आयडी वरून MX record चेक करून सरळ तोच सर्व्हर SMTP server म्हणुन वापरायचो, म्हणजे सरळ त्याच सर्वरला ईमेल जाई.
IIT Kharagpur सोबत तेव्हा बरेच delas आणि इतर काही तांत्रिकी देवाण घेवाण चाले. ते मोठ्या शहरात नसल्याने त्यांचा स्वत:चा ईमेल सर्व्हर तेव्हापासून चालवत. त्यातली गंमत म्हणजे संध्याकाळी कॉलेज ऑफिस बंद झाले की आणि विकांताला तो ईमेल सर्व्हरही ते shut down करत. तिकडे ईमेल पाठवायचे तर ते वर्किंग डे ला दिवसाच डायल अप कनेक्शन मिळवून पाठवावे लागे. अन्यथा vsnl mail server च्या भरवशावर राहिले तर मेल तिकडे केव्हा पोचेल, पोचेल की नाही याची काहीच शाश्वती नसे.

अतुल व मानव,
छान सविस्तर आठवणी.

त्याकाळी घरचे इंटरनेट बीएसएनएलच्या लँडलाईन फोनवर चालत असे. त्यामुळे आपण इंटरनेट वापरत असताना दुसऱ्या कोणाला आपल्याला फोन करता येत नसे. मग काही लोकांनी दुसरा लँडलाईन फोन पण घेतला होता

खरोखर सुरस आणि चमत्कारिक !!

.....१९१३ मध्ये एक जानेवारीला अमेरिकन पोस्ट खात्याने डाक पाठवण्यासाठी केलेल्या एका नियमाचा लाभ या पालकांनी उठवला. पूर्वीच्या नियमानुसार केवळ १ किलो ८०० ग्रॅम वजनाचं डाक पाठवता येत होतं. नवीन नियमानुसार ही मर्यादा २३ किलो करण्यात आली. याचा फायदा घेत एका पालकाने आपलं १० पौंड वजनाचं ८ महिन्यांचं बाळ १५ सेंटचं तिकीट लावून आजीच्या घरी पाठवलं.

https://www.esakal.com/saptarang/rahul-hande-writes-postman-child-pjp78

हो, हे मी सुध्दा वाचले होते. ९० च्या आसपासचा हा काळ असेल. क्लायंटच्या ईमेल चेक करण्यासाठी ते मुंबईला जात असंत.
>> आता कळले त्यांनी कंपनीचे नाव "पर्सिस्टंट" का ठेवले ते.

<<याचा फायदा घेत एका पालकाने आपलं १० पौंड वजनाचं ८ महिन्यांचं बाळ १५ सेंटचं तिकीट लावून आजीच्या घरी पाठवलं.<<< वाचावे ते नवलच! Lol

>>>जगातील पहिला फींगर प्रिंटिंग ब्यूरो, १८९७, कलकत्ता>>>
>>>एका पालकाने आपलं १० पौंड वजनाचं ८ महिन्यांचं बाळ १५ सेंटचं तिकीट लावून आजीच्या घरी पाठवलं.>>>
दोन्ही भारीच !

मुंबई दूरदर्शनचे उद्घाटन झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हा रंजक लेख इथे आहे

https://maharashtratimes.com/editorial/samwad/this-is-how-mumbai-doordar...

काय योगाोग. हा लेख नुकताच वाचून इथे आलो Happy
कुणीही सेलिब्रिटीज नव्हते, राज्यपाल सुध्दा ऐनवेळी सांगून आले, एक बोजड कॅमेरा ट्रायपॉड वरून पडला पण सुदैवने जीवितहानी नाही झाली... आणि या सर्वांच्या वर म्हणजे त्या कार्यक्रमाचे कोणतेही ध्वनिचित्र मुद्रण आज उपलब्ध नाही Happy

+१
सध्या शनिवार संध्याकाळी व रविवारी सह्याद्रीवर चांगले सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्यातले मला आवडणारे म्हणजे :
* मैत्र हे ताल / शब्द सुरांचे (दोन प्रकारचे कार्यक्रम)
* विचारांच्या पलीकडे : काहीतरी आगळे वेगळे करणाऱ्या लोकांच्या मुलाखती
* रंगा येई वो : चित्रकारांच्या मुलाखती
...
माझे टीव्ही पाहणे एवढ्या पुरतेच आता मर्यादित झाले आहे. बकबक करणाऱ्या खाजगी वाहिन्या लावत नाही.
(शनिवारी माझा कट्टा हा अपवाद).

छान .
मी पण पाहतोय.
अनेक दिग्गजांमध्ये टॉम अल्तर यांना पाहून छान वाटले. त्यांना हिंदी किंवा इंग्लिश बोलताना ऐकणे हा एक सुंदर अनुभव असतो.

छान .
मी पण पाहतोय.
अनेक दिग्गजांमध्ये टॉम अल्तर यांना पाहून छान वाटले. त्यांना हिंदी किंवा इंग्लिश बोलताना ऐकणे हा एक सुंदर अनुभव असतो.

Pages