सातवी माळ- स्मितहास्य, प्रसन्नता, आनंद (Joy, Smile, Happiness)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:58

आपल्या सगळ्यांची जी जगण्याची धडपड चालू आहे ती कशासाठी? आपल्या सगळ्यांना आनंदी व्हायचं आहे म्हणूनचं ना? जगात असा कोण आहे की ज्याला आनंदी व्हायचं नाही?

काही काही चेहरे कायम प्रसन्न असतात आणि त्यांच्याकडे नुसतं बघितलं की आपल्याला पण प्रसन्न वाटतं उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ, सुधा मूर्ती, डॉक्टर आनंद नाडकर्णी. आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा असा एखादा चेहरा नक्कीच असतो.

हसरा चेहरा हा जगातील सगळ्यात सुंदर चेहरा असतो. हसणं, आनंदी राहणं, प्रसन्न असणे ही फार मोठी शक्ती आहे. हीच शक्ती आपल्याला कशी जागवता येईल हे आज आपण बघूया.

आपल्याला कशा कशामुळे आनंद होतो? एखादी मोठी परीक्षा पास झालो, मनासारखा जोडीदार मिळाला, छान नोकरी मिळाली, बाळाचा जन्म, स्वतःचं घर अशा मोठ्या गोष्टीतून तर आनंद मिळतोच पण छोट्या छोट्या गोष्टीतूनही खूप आनंद मिळतो.

एखादी छान बातमी कानावर येणं, एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण अचानक रस्त्यात भेटणं, आपल्या आवडत्या गाण्याची ओळ कुठून तरी ऐकू येणं, कुणीतरी आपली आवड-निवड लक्षात ठेवून छान भेटवस्तू आणणं, कुणीतरी आपल्यासाठी गरम-गरम चहा बनवणे किंवा आपला आवडता पदार्थ आवर्जून खायला घालणं.

ह्याच आनंदाचा एक मोठा खजिना आहे आपल्या आजूबाजूच्या निसर्गामध्ये. रिमझिम पडणार्या पावसातून आनंद मिळतो. एखाद्या छोट्याशा फुलाकडे बघून आनंद मिळतो. ढगांचे आकार बघून आनंद होतो. वाऱ्याची एक छोटी छान झुळूक पण मनाला आनंद देऊन जाते. सकाळच्या वेळी थोडं लक्ष देऊन बाहेर चाललेल्या पाखरांचा किलबिलाट ऐकला की सगळी सकाळ कशी प्रसन्न होते.

आनंदी राहायचं असेल तर आधी आपल्याकडे जे काही आहे त्याचा मनमुराद उपभोग घ्यायला हवा. आपण आजूबाजूला अशी कितीतरी उदाहरणे बघतो. काहीजण खूप कपडे घेतात पण ते वापरत नाहीत. घरात खूप क्रोकरी आहे पण ती फुटेल या भीतीने वापरायची नाही. हातात खूप पैसा आहे तो वापरायचा पण नाही आणि दान पण करायचा नाही, वर सतत काटकसर करत राहायची.

ही सगळी आनंद मिळण्याची कारण असली तरी ती बाह्य कारण आहेत. त्यातून मिळणारा आनंद हा तात्पुरता असू शकतो. आपला आनंद कायम टिकवायचा असेल तर आपल्याला काय करता येईल?

आनंद कायम टिकवायचा असेल तर एक छान सोपा उपाय म्हणजे कृतज्ञ असणं. आपल्या आयुष्यात काय नाही, काय कमी आहे याची तक्रार करण्यापेक्षा आपल्याकडे काय काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्याबद्दल कृतज्ञता ठेवा. Thank You ही सगळ्यात छोटी आणि तरीही सगळ्यात प्रभावी प्रार्थना आहे.

जेव्हा जेव्हा उदास वाटेल, दुःख होईल, राग येईल, तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्या आजूबाजूला बघा आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची स्वतःलाच आठवण करून द्या. Count your blessings.

दुसरी एक गोष्ट म्हणजे - जे काम करायचं असेल ते आनंदाने करा प्रेमाने करा. काम करायचंच आहे ना? मग ते कंटाळून, वैतागून, चिडून करण्यात काय अर्थ आहे? आपण काम करताना आनंदी प्रसन्न राहिलात की त्या कामांचा परिणाम पण खूप छान होतो. आपण काम करताना जी ऊर्जा त्याच्यात टाकतो त्याचे परिणाम तसे होतात.

आईने केलेला पदार्थ आपल्याला कायमच आवडतो. त्याच एक महत्त्वाचं कारण असं आहे की आई मुलांसाठी पदार्थ बनते तेव्हा तिच्या मनामध्ये खूप आनंदाची प्रेमाची भावना असते आणि सहाजिकच त्यामुळे तो पदार्थ आपल्याला खूप आवडतो. त्या पदार्थात, ती आनंदाची भावना, ते प्रेम उतरलेलं असतं.

हाच अनुभव आपल्याला कामाच्या ठिकाणी येतो. जो मनुष्य आनंदाने काम करत नाही त्याच्या कामांमध्ये चुका जास्त होतात.

आनंदी रहायचा आणखीन एक सोपा उपाय आहे ते म्हणजे हसायचं. प्रयत्नपूर्वक हसायचं. विचार करून हसायचं. दिवसात अनेकदा स्वतःला हा प्रश्न विचारत राहायचा ‘मी हसतोय का? मी आनंदी आहे का?’

आपण सकाळी उठल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर चेहऱ्यावर स्मित ठेवून प्रत्येकाला गुड मॉर्निंग असा अभिवादन करतो. पण आपण कधी सकाळी उठल्यानंतर स्वतःला स्माइल देऊन आरशासमोर उभं राहून गुड मॉर्निंग विश करतो का?

जसं आनंद झाला की चेहर्‍यावर हसू येतं, तसंच हसू आलं तर आनंद होतो म्हणजेच काय 'हसणं हि आनंदाची गुरुकिल्ली आहे'

Sometimes your joy is the source of your smile , but sometimes your smile can be the source of your joy.” ― Thich Nhat Hanh.

परत एक उदाहरण आपण एखाद्या अंधार्‍या खोलीत प्रवेश केला तर काय करतो? त्या अंधाराशी लढतो का? त्याला बुक्के मारतो का? त्याला शिव्याशाप देतो का? तसं आपण करत नाही. आपण काय करतो आपण उजेडाचा विचार करतो. आपण मेणबत्ती लावतो, दिवा लावतो, खिडकी शोधून ती उघडतो. जेणेकरून बाहेरचा प्रकाश आत येईल. म्हणजे अंधार कुठे निघून जातो का? नाही तर त्याची तीव्रता कमी होते कारण तिथे प्रकाश येतो.

तसंच आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांच किंवा रागाच.

आपल्याला जेव्हां अति दुःख होतं किंवा आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली तर खूप राग येतो. त्यावेळी जर आपण प्रयत्नपूर्वक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला तर त्या दुःखाची, त्या रागाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते.

बौद्ध भिक्खू Thich Nhat Hanh यांनी एक सोपं तंत्र सांगितलं आहे. जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक भावनेमध्ये खूप गुंतलेले असतो तेव्हा भान ठेवून हे तंत्र वापरुन बघा

'Smile, Breathe, Go-Slow'

SMILE : चेहऱ्यावर एक छोटे का होईना पण स्मितहास्य आणा

BREATHE : दीर्घ उच्छवास सोडा आणि हळूहळू श्वास घ्या. असं दीर्घश्वसन करा

GO SLOW असं केल्याने आपल्या मनात त्या क्षणी खूप प्रबळ असलेल्या नकारात्मक विचारांची गती कमी होते. प्रक्षोभ कमी होतो. मन हलकं होतं.

एका छोट्या स्मितहास्यात सुद्धा इतकी मोठी ताकद असते जी आपल्या दु:खाची, रागाची, काळजीची, भितीची तीव्रता कमी करु शकते.

म्हणूनचं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे

मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ।

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111

पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)
https://www.maayboli.com/node/77112

सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness, self acceptance)
https://www.maayboli.com/node/77113

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults