पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:50

पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)

नवीन वर्षाला काहीतरी संकल्प सोडायचा अशी एक पद्धत आहे. आपणही ठरवतो उद्यापासून चालायला जायचं आणि त्याची पूर्वतयारी म्हणून लागणारे कपडे घेऊन येतो. शूज घेऊन येतो. किंवा योगा क्लास जॉईन करायचा. त्याच्यासाठी मॅट आणतो. सकाळी गजर लावून चार दिवस उत्साहाने आपण चालायला जातो किंवा योगासनं करतो. मग पाचव्या दिवसापासून गाडी रूळावरून घसरायला लागते. काल रात्री आपण उशिरा झोपलो, आज रविवार आहे अशा अनेक सबबी सांगून आपण हळूहळू ते काम टाळतो.

अशी शूजची एक नवीन जोडी किंवा योगा मॅट कित्येकाच्या घरात एका कोपर्‍यात दिसेल.☺️

सुनंदाने , एक नवीन पौष्टिक आहार पद्धती वापरायचं ठरवलं. त्यासाठी जाऊन सुकामेवा, ज्वारीच्या, नाचणीच्या पिठाचे पौष्टीक पदार्थ घेऊन आली. तीन-चार दिवस आहाराचे पथ्य पाळलं. मग काय आज सुट्टीचा दिवस म्हणून जास्त खाल्लं. कोणाचा वाढदिवस आहे म्हणून बाहेरच जेवायला गेलो. असं करता करता पुढच्या आठवड्यापासून ती आहाराचं विसरूनही गेली.

आमचा अरुण, सारखा लोळत असतो. नाहीतर टीव्ही बघतो आणि मोबाईलवर गेम खेळतो. तो बाहेर जात नाही खेळ खेळत नाही. त्याला कशाचा उत्साह नाही.

माझे बाबा ना सारखे कामात असतात. घरी असले तरी सारखे ऑफिसच्या कामातच असतात. त्यांना आमच्याशी खेळायला बाहेर यायला, मज्जा करायला वेळचं नसतो.

अशी किती उदाहरणं आपण रोज आपल्या आजूबाजूच्या जीवनात, कुटुंबामध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये पाहत असतो. अतिउत्साह आणि अतिआळस दोन्हीमुळे काम बिघडत. अति खाल्लं तरी त्रास होतो. कडकडीत उपास केला तरी त्रास होतो.

याचाच अर्थ काय? आपले विचार, आपलं काम, आपली इच्छाशक्ती आणि आपला आराम या सगळ्याचं एक संतुलन असलं पाहिजे. दिवसाच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला काम पण करायचं आहे, जेवायचं आहे, आराम करायचा आहे, मनोरंजन करायचं आहे आणि शांत झोप पण घ्यायची आहे. या सगळ्याचं गणित बरोबर जमलं पाहिजे.

आपल्या सगळ्यांमध्ये तीन गुण असतात 'सत्व, रज, तम'

- सत्वगुण सकारात्मक विचार देणारा गुण आहे
- रजोगुण हा क्रियाशीलता देणारा गुण आहे
- तमोगुण हा निद्रा किंवा सुस्तपणा देणारा गुण आहे

सत्व गुणांमुळे आपले विचार स्वच्छ आणि सकारात्मक होतात. मन हलकं आणि प्रसन्न होतं. आपल्याला खूप शांत आणि समाधानी वाटतं.

रजोगुणांमुळे आपल्यातली कार्यक्षमता वाढते. ध्यास आणि निर्धाराने काम पूर्ण करण्याची जिद्द येते. मात्र रजोगुण प्रमाणाबाहेर वाढले तर स्वार्थ, लोभ,हिंसा ही वाढतात.

तमोगुण मुळे आपल्याला आराम आणि झोप मिळते. पण तमोगुण जास्त प्रभावी झाले की आळस, जडत्व, नैराश्य व उदासीनता वाढते

हे सगळे गुण आपल्या सगळ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात असतातच. पण जेव्हा कुठलाही एक गुण खूप जास्त प्रभावी होतो तेव्हा आयुष्य असंतुलित होतं.

काही लोकं खूप वाचन करतात. खूप माहिती गोळा करतात. पण प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात ती कधीच वापरत नाहीत. त्यांच्यात रजोगुण कमी असतो.

काही लोक workoholic असल्यासारखं खूप काम करत राहतात. पण त्याचा आनंद घेत नाहीत किंवा त्या कामातून काही नवीन शिकत नाहीत. त्यांच्यात रजोगुण खूप जास्त असतो. अशी माणसं सतत धावत असतात. त्यांना स्वतःच ध्येय माहिती नसतं. आराम करायचा, विश्रांती घ्यायची, आनंद घ्यायचा आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

काही माणसांना नुसतं लोळायला आवडतं. काम करायचं म्हटलं की जीवावर येतं. चुकून काम हातात घेतलं तर त्यांची चालढकल सुरू होते. सबबी सांगणे सुरू होतं. अशांमध्ये तमोगुण जास्त असतो.

आपण एखादा पदार्थ करतो तेव्हा आपण मसाल्याचे तिखट मिठाचे प्रमाण सांभाळतो की नाही? काय घालायचं? कधी घालायचं? किती घालायचं ? हे कळलं की पदार्थ छान होणारच. आपापल्या आवडीनुसार कधी तिखट-मीठ थोडे कमी जास्त करता येईल. पण तरी एक प्रमाणबद्धता हवी की नाही?

त्याच प्रकारे आयुष्यामध्ये सुद्धा सत्व, रज आणि तम गुणांची प्रमाणबद्धता पाहिजे. आपल्या कामानुसार व्यक्तिमत्त्वानुसार हे गुण थोडे कमी जास्त झाले तरी चालतात. पण त्यातली प्रमाणबद्धता जायला नको. नाहीतर आपल्या कामात वागण्या-बोलण्यात एक असंतुलन येतं.

आपल्यातील सत्व रज तम गुणांच संतुलन कसं साधायचं?

सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं. आपण कसे वागतो बोलतो? कसा निर्णय घेतो? आपण किती आराम करतो? ....

आपणचं आपलं निरीक्षण करून आपल्या मधल्या असंतुलनाची जाणीव करून घ्यायची. अतिशय प्रामाणिकपणे निरीक्षण करायचं.

रोज थोडा वेळ तरी प्राणायम करायचा. प्राणायमाचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शांतपणे बसून आपल्या प्रत्येक उच्छ्वासाकडे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं. अगदी जाणीवपूर्वक पाच-दहा मिनिटे तरी स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्यायचं.

आयुर्वेदात सर्व शारीरिक आणि मानसिक व्याध्यींच मूळ ‘कफ , वात, पित्त’ या त्रिदोषात आहे असं सांगितले आहे. ह्या त्रिदोषांचा संबंध सत्व रज तमोगुणांशी आहे. त्यामुळे सत्व, रज आणि तम या गुणांचं संतुलन साधण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे आहाराकडे लक्ष द्यायचं.

सात्विक राजसी आणि तामसी असे आहाराचं वर्णन आणि महत्त्व गीतेच्या सतराव्या अध्यायात आहे.

सकस ताजं शिजवलेले अन्न खायचं. गळ्याशी येईपर्यंत जेवायचं नाही. आणि मधे मधे उपास करायचा. उपास म्हणजे कडकडीत उपासच करायला पाहिजे असं नाही. उपास म्हणजे पोटाला विश्रांती द्यायची. दोन जेवणांच्या मध्ये तोंडात काही टाकायचं नाही. किंवा किमान एका जेवणामध्ये फक्त कोशिंबिरी, कच्च्या भाज्या, फळं हेच घ्यायचं. यातलं आपल्या व्यक्तिमत्त्वाला झेपेल, आपल्याला आवडेल असं उपासाचं तंत्र स्वीकारायचं.

सम्पूर्ण भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सत्व रज आणि तम गुणांचे महत्त्व आणि अर्थ समजावून सांगितला आहे. चौदाव्या अध्याया मध्ये तर हे सगळं वर्णन अतिशय विस्ताराने आलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात सत्व गुण आपल्याला ज्ञान भक्ती आणि मोक्षाच्या मार्गाकडे नेतात तर तमोगुण आपल्याला अधोगतीला नेतात. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपल्यातील सत्वगुण जास्त वाढीला लागतील रजोगुण मध्यम राहतील आणि तमोगुण कमी होतील.

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा: |
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा:

चला तर मग तसा प्रयत्न करु या.

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults