सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness, self acceptance)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:53

*सहावी माळ- स्वतःची ओळख, स्वतःचा स्वीकार स्वयंपूर्णता (self awareness,self acceptance)*

आज आपल्या लेख मालेचा सहावा दिवस. गेले पाच दिवस आपण म्हणतोय की सगळ्या शक्ती आपल्या मध्येच आहेत आणि त्या आपल्यालाच जागवायच्या आहेत. किती जणांना हे पटतंय? आपल्यातले कितीजणं हा विचार करता आहेत की मी काय करू शकणार? माझं शिक्षण पुरेसे नाही. माझ्यात काही कलागुण नाहीत. मी गरीब कुटुंबातला आहे. मी अमक्या धर्माचा आहे. मी तमक्या जातीचा आहे. मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे मी सुंदर नाही, मी गोरी नाही.....

जर हे विचार तुमच्या मनात येत असतील तर गरज आहे आधी स्वतःची खरी ओळख करून घेण्याची.

त्यासाठी आधी आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे एक नजर टाकूया.

आपण आपल्या बाजूला किती विविध प्रकारची झाडं बघतो. वड, पिंपळ, आंबा, चिंच, गुलमोहर असे मोठे वृक्ष बघतो. नारळाची, अशोकाची, निलगिरीची सरळसोट वाढणारी उंच झाडं बघतो. चिकू, पेरू, आवळा, प्राजक्त, तगर, जास्वंद अशी मध्यम आकाराची झाडं बघतो. तुळस, तेरडा,गुलाब, अबोली अशी छोटी रोपटी बघतो.

पण एक आंब्याचे झाड दुसऱ्या आंब्याच्या झाडाची स्पर्धा करताना कधी पाहिलंय का ? नारळाचे झाड वडाच्या झाडासारखे वाढायचा हट्ट करताना पाहिलंय का? सगळी झाडं शांतपणे आपापल्या स्वभावानुसार नैसर्गिक रूपानुसार वाढत असतात. तिथे स्पर्धा नाही. तुलना नाही. हेवा दावा नाही.

निसर्गाची आणखीन एक गंमत बघा. सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचा प्रकाश श्रीमंत माणसाच्या घरात शिरतो तसा गरिबाच्या ही घरात शिरतो. ज्या श्वासाशिवाय आपण राहू शकत नाही ती हवा सगळ्या देशातून सगळ्या प्रांतातून अगदी मुक्तपणे संचार करते. पाऊस कधी विचार करून पडतो का की मी मोठ्या शेतकऱ्याच्या शेतावर पडू का छोट्या शेतकऱ्याच्या? उन्हाळ्यामध्ये आंब्याचे झाड बहरून येतं तेव्हा ते हा विचार नाही करत की माझी फळं कोणत्या धर्माची कोणत्या जातीची माणसं खाणार आहेत. निसर्गामध्ये भेदाभेद नाही प्रत्येक घटक आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो.

आता माणसांच्या दुनियेत येऊन बघू या. इथे कोणी धनवान आहे तर कोणी गरीब. कोणी नशीबवान नाही तर कोणी दुर्दैवी. कोणी महान आहे तर कोणी सामान्य. कोणी एका धर्माचा आहे कोणी दुसऱ्या जातीचा आहे. डॉक्टर असेल तर तो खुप प्रतिष्ठित आणि सफाई कामगार असेल तर तो तळागाळातला. स्त्री असली तर तिने असंच वागावं आणि पुरुष असेल तर त्यांनी तसं वागावं. किती हे भेदाभेद आणि कशासाठी?

जर निसर्ग आपल्यात भेद करत नाही तर मग आपणच का आपल्यात भेदभाव करतो? का आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतो?

कारण आपण आपली ओळख सतत आपल्या बाहेर शोधत असतो. धर्म, जात, व्यवसाय, रंग, रूप, प्रदेश, पैसा, यश अशा अनेक बाह्य गोष्टींमध्ये आपण आपली ओळख शोधत राहतो. त्याच्यातही आपली ठरलेली मोजमाप असतात. आणि त्यानुसार आपणच स्वतःला दुबळे-सामर्थ्यवान, हीन-श्रेष्ठ, चांगलं-वाईट, सामान्य - महान अशी वेगवेगळी विशेषणे लावून घेतो.

पण जरा मूलभूत गोष्टींचा विचार करुया. जन्मा बरोबर आपल्या सगळ्यांना शरीर मिळत. प्रत्येक जण श्वास घेतो उच्छवास टाकतो. प्रत्येकाच्या शरीरात एक हृदय आहे जे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. हे रक्त ही सगळ्यांच्या शरीरात लाल रंगाच आहे. सगळ्यांनाच पोट आहे. भूक लागते. तहान लागते. झोप हवी असते. पोट, जठर, यकृत, किडनी, आतडे, पाठीचा मणका अशी सगळ्यांच्या शरीराची अंतर्रचना सारखीच आहे.

मग आपण त्वचेचा रंग, डोळे, केस, उंची, शरीरयष्टी अशा बाह्य भेदांना जास्त महत्त्व द्यायचं की सगळ्यांच्या आंतरिक समानतेला जास्त महत्त्व द्यायचं?

हे झालं शरीराचं. आता आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जी शक्ति/ऊर्जा असते त्या शक्तिकडे /ऊर्जेकडे बघूया.

वेदांमध्ये संत वाड्मयामध्ये, अध्यात्मिक शिकवणुकी मधे स्वच्छ स्पष्ट शब्दात लिहिले आहे देव ही निर्गुण-निराकार शक्ती आहे आणि ती चराचरामध्ये भरून राहिली आहे. ती जितकी आपल्या बाहेर आहे तितकीच आपल्या आतही आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या देवाचा , त्या शक्तिचा अंश आहे. आपणा हा दिव्यतेचा अंश आपल्यात कधी शोधणार?

गणपती अथर्वशीर्ष मध्ये ह्या शक्तिबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. ती कुठे आहे :

*त्वम् मूलाधार स्थितोऽसि नित्यम्*

मूलाधार चक्र हे आपल्या पाठीच्या कण्याच्या मुळाशी असतं. तिथे आपल्यातली शक्ती सुप्त स्वरूपात असते. ही शक्ती कशी आहे ?

*त्वम् शक्तित्रयात्मकः *

इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती या तीनही शक्ती प्रदान करणारी ही शक्ती आहे. ही शक्ती कोणाला कळते ?

*त्वाम् योगिनो ध्यायंति नित्यम्*

जो हया शक्‍तीचा अध्ययन करेल तिला जागवण्याचा प्रयत्न करेल त्याला ती शक्ती नक्की पावते.

जर या शक्तीची प्रचिती घ्यायची असेल तर रोज स्वतःला त्या शक्तीची आठवण करून द्या.

- मी जसा आहे तसा परिपूर्ण आहे.
- मी स्वयंपूर्ण आहे.
- माझ्यात दिव्यतेचा अंश आहे.
- मी कुठलंही काम करण्यासाठी समर्थ आहे
- मी स्वतःचा सांभाळ करण्यासाठी समर्थ आहे
- मी स्वतःची तुलना कोणाशी ही करणार नाही
- मी कोणाशी ही स्पर्धा करणार नाही

रोज रोज स्वतःला अशी आठवण करून देऊन आपण या शक्तीला हाक मारू शकतो. तिला सुप्तावस्थेमधून जागवू शकतो.

मग हळूहळू आपला आत्मविश्वास वाढतो. आपलं स्वावलंबन वाढतं. आपल्यातली शांतता वाढते. प्रेम आणि सद् भावना वाढतात. आणि हळुहळु आपली वाटचाल स्वयंपुर्णते होऊ लागते.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला आपला अनुभव सांगितला आहे

**अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले
तुझा तूंची देव तुझा तूंची भाव
फिटला संदेह अन्य तत्वी**

आपण जर जाणीवपूर्वक सतत प्रयत्न केला तर आपल्याला ही आपल्यातल्या शक्तिचा साक्षात्कार होऊ शकतो. आपल्याला आपल्या खर्‍या स्वरूपाची ओळख होते.

मग करणार का प्रयत्न आजपासून? करणार का स्वतःशी संवाद? करून घेणार का स्वतःची ओळख?

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ
https://www.maayboli.com/node/77109

चौथी माळ-' सुटसुटीतपणा, सोडून देण्याची वृत्ती' (Let go)
https://www.maayboli.com/node/77111

पाचवी माळ- संतुलन , समन्वय (Balance)
https://www.maayboli.com/node/77112

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults