पहिली माळ - घटस्थापना

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:34

आजपासून देवीचं नवरात्र सुरू होत आहे. आज घरोघरी घटस्थापना होणार. आम्हाला आठवतंय आमच्या लहानपणी नवरात्रीचा सण म्हंटलं की आमच्या आजीच्या /आईच्या अंगात साक्षात देवी संचारायची. घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असायची.

छोटासा मातीचा डोंगर करून त्यात गहू पेरले जायचे. मग त्यावर कलश ठेवला जायचा, त्यावर ताम्हणं आणि त्यामध्ये थाटामाटात देवीची स्थापना केली जायची.

नऊ दिवसात हळूहळू पेरलेल्या धान्याला अंकुर फुटून मातीच्या डोंगराला हिरवागार शेला चढायचा. खूप मजा वाटायची ते बघायला. रोज घटावर ताज्या झेंडूच्या फुलांची माळ, बाजूला सतत तेवणारा दिवा, देवीच्या प्रसादासाठी बनणाऱ्या दशम्या-पायस. आणि त्याबरोबरच सकाळ-संध्याकाळ घरदार दणाणून सोडणाऱ्या आरत्या. आईबरोबर हळदीकुंकवाला जाणं, भोंडला खेळणं ... खूप खूप मज्जा असायची. अशातही आईचे आणि आजीचे कसले कसले उपास-तापास चालूच असायचे.

आता ह्या सगळ्या गोष्टीकडे वळून बघताना एक वेगळाच अर्थ आपल्याला लक्षात येतो.

नवरात्रीचा अर्थ काय? अगदी शब्दाची फोड करायची म्हटलं तर नऊ -रात्री देवीचा जागर करायचा. देवी हे ‘शक्ती’ च प्रतिक आहे.

देवीला जागवायचं म्हणजे त्या प्रतिकात्मक शक्तीला जागृत करायचं. ह्या सगळ्याची सुरुवात जरी बाह्य रूपातून झाली जसे की मुर्ती पुजा, उपास-तपास, व्रतवैकल्ये, स्तोत्र -मंत्रपठण आणि सतत तेवणारा दिवा तरी हे सगळं प्रतिकात्मक आहे.

खरा दिवा आपल्याला आपल्या अंतर्मनात लावायचा आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो सतत तेवत राहावा त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. देवी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या शक्तींचा वापर करून असुरांचा/ वाईटाचा विनाश करते. तसंच आपणही आपल्या अंतर्मनाचा अभ्यास करून आपल्यामध्ये असलेल्या शक्ती वापरून आपल्यातल्या वाईट विचारांचा वृत्तींचा नाश करायचा आहे.

इथे असुर हे आपल्यातल्या नकारात्मक भावनांचे प्रतिक आहे. असुर आपल्या सगळ्यांमध्ये असतो. तशा वृत्ती असतात म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन, आळस, भय, राग, लोभ, अहंकार, दु :ख, चिंता, मत्सर इत्यादी.

आपल्यामध्ये असुर आहेत ते आपणच मारायचे आणि हा असुर मारण्यासाठी लागणारी शक्ती आपणच आपली जागवायची.

त्याच्यासाठी व्रतं घ्यायचं. व्रतं घ्यायचं म्हणजे काय करायचं ? तर आपल्यातल्या त्रुटींवर मात करण्यासाठी स्वतःच्या ‘आचार , विचार आणि आहारावर’ नियम घालून घ्यायचे आणि त्याचं पालन करायचं.

पण कुठलही व्रतं घेण्याआधी आपल्याला सगळ्यात आधी काम करावे लागेल ते आपल्यातल्या त्रुटी शोधण्यावर. आपल्यातील असुराचा, वाईट वृत्तीचा स्वीकार करण्याची आपली तयारी असली पाहिजे.

आपल्यातल्या कोणत्या त्रुटी, वृत्ती, सवयींचा आपल्याला त्रास होतो आहे ह्याचा विचार करावा लागेल त्याची व्यवस्थित नोंद करावी लागेल.

सायकॉलॉजिकल भाषेत सांगायचं झालं तर self awareness, self acceptance, self discipline, self improvement and ultimately self empowerment .

एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला वेळेचं नियोजन करता येत नाही, तर दुसरा कोणी असेल ज्याला निर्धाराने एखादं काम पूर्ण करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला आपल्या भावनांवर संयम ठेवता येत नाही किंवा मुद्देसूदपणे आपलं मत मांडता येत नाही. अशा एक ना अनेक, लहान - मोठ्या त्रुटी आपल्या सगळ्यांमध्येच असतात.

त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्रुटी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. त्या आपल्याला मान्य करायला पाहिजेत. स्वीकारायला पाहिजे. तरंच आपण त्याच्यावर योग्य तो उपाय करू शकतो.

आज घटस्थापनेचा मंगल दिवस आहे. चला तर आज पासून सुरुवात करुया.

काहींना आपल्या मनातला हा घट आधी निर्माण करावा लागेल आणि मग त्याची स्थापना करावी लागेल. तर काहींचा घट आधीच काही गोष्टींनी भरलेला असेल.त्त्यांना आपल्या घटात काय काय साचलं आहे, काय काय भरलेले आहे, काय काय गोष्टींची कमतरता आहे याचा अभ्यास करावा लागेल.

आपलं रंगरूप जरी आपल्या हातात नसलं तरी आपलं मन, आपले विचार, वृत्ती, आपली वागणूक याच्यावरती पूर्णपणे आपलं नियंत्रण पाहिजे.
या घटाला सुशोभित आकर्षित आणि समृद्ध बनवायचं म्हणजेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ बनवायचं काम हे आपलं आपणचं करायला पाहिजे.

आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला देवी तिच्या अष्टभुजांनी मदत करणार आहे. जसा घट प्रतिकात्मक आहे तसा देवीच्या अष्टभुजा या सुद्धा प्रतिकात्मक आहेत. देवीची विविध रूपे बघितली व देवीने वापरलेल्या शक्ती बघितल्या तर आपल्याला समजून येतं की प्रत्येक वेळी देवी वेगळ्या शस्त्रांचा, वेगळ्या शक्तीचा, वेगळ्या युक्तीचा आणि वृत्तीचा वापर करून असुरावर - वाईटावर विजय मिळते. त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या गुणदोषांवरती काम करण्यासाठी वेगवेगळ्या शक्तींचा वापर करायचा आहे.

जसं एकच औषध सगळ्या रुग्णांना आणि रोगांवर चालत नाही तसेच एकाच प्रकारची शक्ती आपल्याला आपल्या सगळ्या विकारांवर विजय मिळवण्यासाठी उपयोगाची नाही. त्यामुळे विविध शक्तींची माहिती, आढावा आपण येत्या आठ दिवसात घेणार आहोत.

जरी हे व्रत असलं तरी आपण स्वेच्छेने ते स्वीकारलं पाहिजे व आनंदाने केले पाहिजे.

आम्ही आमचे अनुभव आमचे विचार तुमच्या समोर मांडतो आणि तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आणि तुमच्या आजूबाजूला असंच सकारात्मक वातावरण निर्माण करायचा नक्की प्रयत्न करा.

सगळ्यांना घटस्थापनेच्या मन:पुर्वक शुभेच्छा.

उद्या पुन्हा भेटू.

भारती दंडे - पूजा जोशी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults