तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:43

तिसरी माळ- जतन,संवर्धन,सांभाळ

कालच्या लेखात आपण सृजनशीलता कशी विकसित करता येईल याचा मागोवा घेतला. आता त्याच्या पुढचं पाऊल काय असेल? सहाजिकच जे आपण निर्माण केले आहे त्याचं जतन, संवर्धन आणि सांभाळ करणे.

वर्तमानपत्रात रोज एक तरी बातमी असते - काही ना काही तरी वाचवण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे सतत निदर्शनं, प्रदर्शनं चाललेली असतात. कधी सेव्ह टायगर तर कधी एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी लोकं रस्त्यावर येतात.

थोडक्यात काय तर निसर्गनिर्मित असो किंवा मानवनिर्मित, प्रत्येक गोष्टीचा सांभाळ करण्याची गरज आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली हवा,पाणी, खनिजं ओरबाडून गरजेपेक्षा जास्त वापरल्यामुळे आज ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आ वासून उभ्या आहेत. आपली भारतीय संस्कृती विस्मृतीत चालली आहे. मराठी - संस्कृत यासारख्या भाषा लोप पावत आहेत. शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग आजही ताठ मानेने उभे आहेत पण त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केलं गेलं नाही तर येणाऱ्या पिढीला फक्त त्यांच्या छायाचित्रांवरच समाधान मानावे लागेल.

आता तुम्ही म्हणाल की ह्या समस्या सामाजिक पातळीवरच्या आहेत. त्याला तुम्ही आम्ही काय करणार? पण असं नाहीये.

ह्या जरी सामाजिक समस्या असल्या तरी आपण आपल्यापरीने त्यामध्ये योगदान देऊच शकतो. जसं की प्रदूषण कमी करण्यासाठी सुका आणि ओला कचरा वेगळा करायचा, झाडं लावायची, प्लास्टिकचा वापर टाळायचा. हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आपण कटाक्षाने करतो का?

मराठी भाषा उपेक्षित आहे म्हणून नुसताच तक्रारीचा सूर लावून नाही चालणार, कारण आपणंच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेले आहे. तेव्हां ही भाषा जपण्यासाठी आपण आपल्या मुलांबरोबर मराठी भाषेतून शब्दसंपदा वाढण्यासाठी खेळ खेळू शकतो. त्यांना वाचनाची गोडी लावू शकतो. मराठी भाषेचे सौंदर्य, त्यातल्या गमतीजमती त्यांना दाखवून देऊ शकतो.

ह्या सगळ्या झाल्या सामाजिक गोष्टी पण वैयक्तिक पातळीवर पण अनेक गोष्टींचा आपल्याला सांभाळ करायचा आहे.

मूल जन्माला घातल्यानंतर आई-वडिलांच काम संपत का? त्याचं पालन पोषण संगोपन हे करायलाच हवं. रोप नुसतं लावून चालत नाही त्याला खत पाणी घालावं लागतं.

म्हणजे बघा आपण कार घेतली की त्याचं रेगुलर सर्विसिंग करणं गरजेचे आहे तरच ती चालत राहू शकेल. तसंच ओट्यावरची शेगडी रोज घासून-पुसून स्वच्छ करावीत लागते नाहीतर ती खराब होण्याची शक्यता असते. कुटुंबाचा सांभाळ, घराची साफसफाई, घराची डागडुजी आपण करत असलेली नोकरी एवढंच काय तर कामाला येणार्या बाईंना सुद्धा आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं.

या सगळ्या झाल्या बाह्य गोष्टी आणि थोड्याफार प्रमाणात आपण त्याची काळजी - सांभाळ करत असतो. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले आपण, आपण स्वतःची काळजी घेतो का ? स्वतःचा सांभाळ करतो का? स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या मनाची विचारपूस करतो का?
आपल्याला निसर्गाने दिलेलं पाणी असेल किंवा आपलं शरीर, आपलं मन, आपल्याला वंशपरंपरेने मिळालेले संस्कार किंवा विचार असतील.
आपला आनंदा, आपले कलागुण, आपले छंद ह्यांचे जतन ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे.

‘सिर सलामत तो पगडी पचास’ किंवा ‘Health is wealth ’ हे माहीती असून ही आपण आपल्या शरीरावर प्रेम करतो का? जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त आपलं शरीरचं आपल्याला साथ करत असतं. मग आपण त्याचं जतन संगोपन प्रेमाने करतो का?

आपण आपल्या शरीराचं ऐकतो का? बीपी डायबेटिस अशी मोठी नावं ऐकली की मग आपण जागे होतो. पण आपलं शरीर आपल्याला आधीपासून खूप संकेत देत असतं.
आपल्याला खळखळून भूक लागते का? जेवल्यावर सुस्ती येते का? झोप शांत लागते का? सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटतं का? थोडं जास्त काम पडलं तर आपण गळून जातो का? आपण हसतमुख असतो का? हे सगळे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आहेत. आणि याचे उत्तर ‘नाही’ असेल तर आपण आपल्या शरीराची
काळजी घेत नाही हे नक्की.

शरीराची काळजी घ्या. सकस आहार घ्या. भूक लागेल तेव्हांच जेवा. शांतपणे बसून जेवा. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. त्याचाकडे पुर्ण लक्ष द्या. We are what we eat. केवळ आहारात बदल करून आपण आपल्या शारीरिक समस्यांवर मात करू शकतो.
ही उपचारपद्धती मालती कारवार सारखे अनेक आहारतज्ञ सुचवतात.

योगासन, स्विमिंग, बॅडमिंटन, डान्स जिम असा रोज वीस ते पंचवीस मिनिटं व्यायाम करा. आपल्याला आवडेल तो पर्याय निवडा. पुरेशी झोप घ्या. सूर्यप्रकाश अंगावर पडूद्यात. भारतासारख्या देशात अनेकांना ‘विटामिन डी डेफिशियन्सी’ असावी ही अचंबित करणारी गोष्ट आहे.

शारीरिक स्वास्थ्य सुधारलं की मानसिक स्वास्थ्य आपोआप सुधारतं. म्हणतात नं ‘Healthy mind in healthy body’

शरीर सुदृढ असेल तर आपली चिडचिड कमी होते. तक्रारी किंवा टीका करायची वृत्ती कमी होते. कामातील आळस व कामातील चाल ढकल कमी होते.

दुसरं म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य. या विषयी आज काही वेगळं लिहिणार नाही कारण आपण या लेखमालिकेत अनेक प्रकारे आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती प्रकाश टाकणार आहोत. पण एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे विचारांचा सांभाळ करणं गरजेचे आहे. आपल्याला चांगला आणि वाईट विचार यातला फरक कळला पाहिजे. कोणत्या विचारांनी आपल्याला आनंद मिळतो? समोरच्याला आनंद मिळतो? त्या विचारांचा जास्तीत जास्त सांभाळ करण्याची गरज आहे.

आणखीन एक गोष्ट आपल्याला सांभाळली पाहिजे ती म्हणजे नातेसंबंध. मग ते नातेवाईक असोत किंवा मित्र-मैत्रिणी. शेजारी-पाजारी किंवा ऑफिसमधले सहकारी. ही सगळीच नाती आपल्याला सांभाळता आली पाहिजेत. किंबहुना ती सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, नाही तर त्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आपल्या आजूबाजूला याची अनेक उदाहरणे दिसतात.नातेसंबंध सांभाळायचे जपायचे म्हणजे कायम आपल्याकडे झुकतं माप घ्यायचं , कायम त्याग करायचा असा त्याचा अर्थ नाहीये.

नाती ही काळाप्रमाणे बदलत जाणारी आहेत. पूर्वी आपण एकत्र कुटुंब पद्धतीत होतो तर आता विभक्त कुटुंबात राहतो आहोत.त्यामुळेच असेल कदाचित आपल्याला नातेसंबंध टिकवण्यासाठी आता विशेष प्रयत्न करायचे आहेत. आपल्या मुलांशी आपण आजकाल मैत्रीपूर्ण संबंध ठेवतोच जेणेकरुन त्यांना आपला धाक वाटण्यापेक्षा आधार वाटला पाहीजे.
तसंच इतर नातेवाईकांमध्ये संवाद वाढवण्यासाठी व्हॉट्सऍप, फेसबूक झूम मीटिंग यासारख्या गोष्टींचा ही वापर करण्याला हरकत नाही. आपल्यापैकी अनेक जण हे करतातही. पण त्याचे निमित्त करून social media चे व्यसन लागणार नाही याची काळजी घ्या.

आता थोडंसं वैयक्तिक कला - छंद या विषयाबद्दल. लहानपणी आपल्याला हे छंद किंवा कला जोपासण्यासाठी वेळ असतो. पण जसजसे आपण नोकरी,व्यवसाय, कुटुंब यामध्ये अडकत जातो तसतसं या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर त्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनातून वेळ काढणं अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही ठरवून आठवड्यातून अर्धा तास, महिन्यातून दोन तास नक्कीच तुमच्या स्वतःसाठी; स्वतःच्या कलागुणांना पुर्नजीवन देण्यासाठी काढूच शकता.

आजच्या काळात मोबाईल लॅपटाॅप
ही जणू आपली लाईफलाइन झाली आहे. लॉकडाउनच्या काळाच तर नक्कीच. जसा आज मोबाईल लॅपटॉप आपण न विसरतां, तत्परतेने चार्ज करतो. तसंच आपल्याला आपल्या आयुष्याची बॅटरी चार्ज करतो का? आयुष्याची बॅटरी चार्ज करायची आहे. ती आपल्यालाच करायची आहे आणि periodically करतच राहायची आहे. हे कधीही न संपणार काम आहे आणि जर ही बॅटरी आपण रिचार्ज करत राहिलो तरंच आपले शरीर,मन, बुद्धी, आपल्या कला कायम आपल्याबरोबर राहतील आणि आपलं जीवन अतिशय उत्साही आनंदी होऊ शकेल. अगदी शेवटपर्यंत.

आपण प्रयत्न केला तरंच हे सगळं सांभाळता येईल. चला सुरुवात तर करूया

केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहिजे
य़त्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)
https://www.maayboli.com/node/77108

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults