अभक्ष्य भक्षण आणि माणूस

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40

दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्‍यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्‍या व दुकाने! ह्याच टपर्‍यांमध्ये बोकड, बकर्‍या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्‍या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्‍या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्‍या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्‍या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्‍यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्‍या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्‍याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्‍या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्‍यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्‍या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!

गुलमोहर: 

आम्हाला कधी बोलावताय सांगा की ...>>> गेले ते दिन गेले :(, पंत आता आमी पक्क शेर्‍हातलं झाल्यालं हाव तवा ह्या सगळ्या भानगडी बंद केल्यात.

मांसाहार बंद करणे मरेस्तोवर जमणार नाही. >>>>>>>> आमच १००% अनुमोदन.

२-३ वेळा मांसाहार सोडायच ठरवलं होत, पण एखाद महिन्याच्या आतच संकल्प मोडला.

जसा आहार----> तसे विचार

जसे विचार----> तसे उच्चार

जसे उच्चार----> तसे आचार

आता शेळीसारखं जगायचं, की वाघासारखं हे तुमच्यावर आहे.
मी शिंव्ह आहे!

I can only image what will happen if govt bans Deer hunting here.
>>
हरणे सगळ्या भाज्या खाउन टाकतील मग भाज्या पण नाय हरणे पण नाहित.

मी १९७७ ते १९८१ इराणला होतो तेव्हा ३५ एकर परिसरात चालणार्‍या पोल्ट्री फार्मची यांत्रिक साधने दुरूस्तीचे काम ३ वर्षे केले होते. तिथे तासाला ५०,००० कोंबड्या कापल्या जात असत. त्या कोंबड्यांना रोग होऊ नये म्हणून दिलेली औषधे एका किलोच्या कोंबडीत २०० ग्रॅम होती, हे आकडे त्या फार्मने जाहिर केलेले आकडे होते. ह्याचा परिणाम मानवी शरिरावर व मानसिकतेवर काय झाला असेल व होत आहे हे आपापल्या मताने समजून घ्यावे !!!

ह्या करता वाचा - प्रगती एक कोडे http://vkthink.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%...

अरूंधती,

लेखातील भावनेशी संपूर्ण सहमत!

>>> आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!

लेखाचे सार वरील परिच्छेदात अगदी योग्य आणि समर्पक शब्दात मांडले आहे.

मूळ लेख सुंदर आहेच
आपण विचारल्या नुसार मी संपूर्ण शाकाहारी

शाकाहार उत्तमा आहेच आहे. परंतु मी जरी म्हणत नसलो तरी तज्ञ मंडळी म्हणतातच की, जर मांसाहार नसता तर लोकांना धान्य अपुरे पडले असते. ज्यांना मांसाहार करायचा त्यांना करु द्या. कालांतरानी शाकाहारी लोक हौसे खातर मांस खायला लागली, लागलेली चटक चुटकी सरशी वाढली, ती वाढत जावुन घरात पोचली, बापा बरोबर पोरेही मांसाहारी होत होत आज निदान ९५ टक्केचे वर तर मांसाहारी मिळतील.
मांसाहार करता करता आपण काय खातो कशाचे मांस खातो याचेही भान आजची मंडळी ठेवत नाही.
मांसाहार आरोग्यासाठी अपायकारकच आहे.

त्या कोंबड्यांना रोग होऊ नये म्हणून दिलेली औषधे एका किलोच्या कोंबडीत २०० ग्रॅम होती

धान्य, फळे, भाज्या इतकेच काय बाटलीबंद पाण्यात पण असतात जंतूनाशके. सुनीता नारायण यांना विचारा.

त्या कोंबड्यांना रोग होऊ नये म्हणून दिलेली औषधे एका किलोच्या कोंबडीत २०० ग्रॅम होती

ती एकावेळी नाही तर थोड्या थोड्या काळाने दिली असतील. २०० ग्रॅम असे कुठले औषध माणसलाही देत माहीत. .. तसेच बहुतांश औषध शरीरातून १-२ दिवसात बाहेर जाते.

मांसासाठी ज्या जनावरांची पैदास केली जाते, ती अन्नधान्यांवरच वाढतात. शिवाय त्यांना जास्तीचे पाणी आणि उर्जा लागते. त्याची आकडेवारी, होम या यू ट्यूबवरच्या चित्रपटात दिलेली आहे.
बाकी शाकाहार योग्य कि मांसाहार, हा वाद न संपणारा आहे.
मी कट्टर शाकाहारी, पण मांसाहाराला विरोध करणारा नाही. पृथ्वीवरचे काही भूभाग असे आहेत (ध्रुवीय प्रदेश, वाळवंटे ) जिथे मांसाहाराला पर्याय नाही, कारण तिथे वनस्पती जगू शकणार नाही.

दिनेशदा, मत्स्याहाराला जास्तीचे पाणी लागत नाही की अन्यधान्य.
मीदेखील शाकाहारी बाय चॉइस पण मांसाहार्‍यांच्या बाजूने Happy (सांगून टाकलं एकदाचं)

तब्बल दोन वर्षांनी हा लेख वर आलाय!! Proud
प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.

गेल्या दोन वर्षांमध्ये काय काय झाले ह्याचे थोडक्यात अपडेट्स :

माझ्या घराजवळच्या या खाटीकखान्याच्या आजूबाजूला असलेल्या जुन्या इमारती, घरे पाडली जाऊन तिथे चकचकित, अद्ययावत इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या शेजारी असलेला हा जुनापुराणा खाटीकखाना विशोभित तर आहेच, शिवाय स्वच्छता - टापटीप यांचे संकेत पाळत नसल्यामुळे लोकांच्या नाराजीचा विषय.

स्वाईन फ्लूची साथ आल्यावर जवळपास पाच-सहा महिने खाटीकखान्यावरची वर्दळ थंडावली होती. वस्तुतः स्वाईन फ्लूचा व चिकन - मटण - फिश विक्रीचा अर्थाअर्थी काय संबंध? परंतु एरवी मांसाहाराचे समर्थन करणार्‍या व मांसाहार करणार्‍या मंडळींतही तेव्हा भीतीपोटी मांसाहार करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे वृत्त वाचले होते. आमच्या घराजवळील या दुकानांमध्ये तेव्हा शुकशुकाटच होता.
त्यानंतर कधी बर्ड फ्लू, कधी चिकुनगुनिया, कधी समुद्रातील ऑईल स्पिल, कधी आणखी कोणती साथ इत्यादी इत्यादी कारणांमुळे सध्या कितीतरी महिने या दुकानांचा धंदा तेजीत पाहिलेला नाही. पूर्वीसारख्या शेळ्या, बकर्‍यांचे केविलवाणे टाहो क्वचितच ऐकू येतात.

गेल्या २ वर्षांत माझ्या परिचयातील ८ ते १० कट्टर मांसाहारी व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मांसाहार सोडून शाकाहारावर यावे लागले आहे. हाय कोलेस्टरॉल, बीपी, हृदयाचे विकार, ताण-तणावाची जीवनशैली, अनुवंशिक आजार, पचनसंस्थेचे विकार अशी अनेक कारणे असली तरी त्यांच्या डॉक्टरांचे म्हणणे एकच आहे, की शाकाहार घेतलात तर तुलनेने तब्येतीचे आजार / विकार कमी प्रमाणात जाणवतील व जास्त जगाल. मांसाहाराची जीवनशैली कायम ठेवलीत तर त्याचे दुष्परिणाम (तब्येतीच्या तक्रारी, डॉक्टर- हॉस्पिटलच्या वार्‍या, पैसा खर्च होणे, रजा, घरच्यांना ताण इ. इ.) सहन करायची तयारी असू द्यात. प्लेन अ‍ॅण्ड सिंपल.

परिचितांच्या छोट्या पाच वर्षांच्या मुलीने ''मासे'' हे ''पेट्स'' आहेत (पाळीव प्राणी), म्हणून 'मी मासे खाणार नाही', असे जाहीर केले आहे, आणि आईबाबांचीही मासे खायची पार पंचाईत केली आहे!! Happy शिवाय पुस्ती जोडली आहे : ''गाय, कोंबडी, शेळी, बकरी, पिग्गी (डुक्कर) हेही पाळीव प्राणी आहेत, व पाळीव प्राण्यांवर प्रेम करावे असे टीचरदीदी सांगतात!!!'' तिची वाघ, सिंह, अस्वल इत्यादी खायची तयारी आहे Proud परंतु ते कदाचित अ‍ॅनिमल राईट्स वाल्यांना व खुद्द वाघ, सिंहांना मान्य होणार नाही!!!

माझे गुरु इंडोनेशियन आहेत आणि त्यांना एकदा आम्ही या प्रश्नावर पीड पीड पीडल. विशेष करून ज्यांना अध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यांनी मांसाहार वर्ज्य करावा का? न पायाचे, २ पायाचे, ४ पायाचे ह्या पैकी कुठचे प्राणी खावे. वगैरे वगैरे!

ते स्वतः पूर्ण शाकाहारी आहेत पण लोकांनी काय खाव या प्रश्नावर कधीच लेक्च्चरबाजी करत नाहीत. त्यांनी आमची तोंड बंद केली अस अस सांगून

"तोंडात काय जात या ऐवजी तोंडातून बाहेर काय येत यावर कटाक्षाने लक्ष द्या. शाकाहार करून विषारी शब्दांचे फुत्कार टाकणारे लोक अध्यात्मिक प्रगती साधू शकतील का?"

"तोंडात काय जात या ऐवजी तोंडातून बाहेर काय येत यावर कटाक्षाने लक्ष द्या. शाकाहार करून विषारी शब्दांचे फुत्कार टाकणारे लोक अध्यात्मिक प्रगती साधू शकतील का?"<<<<
+१०००००००००००००

तोंडात काय जात या ऐवजी तोंडातून बाहेर काय येत यावर कटाक्षाने लक्ष द्या. शाकाहार करून विषारी शब्दांचे फुत्कार टाकणारे लोक अध्यात्मिक प्रगती साधू शकतील का?"

+१

हरणे सगळ्या भाज्या खाउन टाकतील मग भाज्या पण नाय हरणे पण नाहित.

थोडीशी दुरुस्ती

हरणे सगळ्या भाज्या खाउन टाकतील मग भाज्या पण नाय आणी त्या भाज्यांवर अवलंबून असणारे प्राणी पण नाहित.

माझ्या नात्यातल्या एका व्यक्तीला डॉक्टरांनी मांसाहार सुरू करण्याबद्दल सांगितले आहे,
त्याचे कारण आहे विटॅमिन बी १२ ची तूट (डेफिशिअन्सी).
शाकाहारी १० व्यक्तींमधे ८ ते ९ लोकांमधे ही तूट दिसुन येते, इति डॉक्टर.
अर्थात मला हे फारसे पटले नाही, कारण मांसाहाराऐवजी दुसरा पण काही उपाय असेलच ना.

विटॅमिन बी१२ - माझ्या माहितीत वेगन ऑप्शन : झुकिनी.. आणखीनही असतीलच

डॉ ऑर्निशांचं हृद्यविकार रिवर्स करणारं डायेट 'नो मीट' आणि कमीतकमी दुग्धजन्य पदार्थ (ते ही स्किम्ड) असं सांगतं (हेच शाकाहारी फॅटी पदार्थांनाही लागू होतं - नो नटस, अ‍ॅवॅकॅडो वगैरे) - अधिक माहितीसाठी गूगल करा

डॉ कॅम्पबेल आणि डॉ काल्डवेल ह्यांच्या रिसर्च नुसार हृद्यविकार, कॅन्सर वगैरेचा धोका मांसाहारानी निर्माण होतो - ह्यावरही मत मतांतरे असतीलच.
वाचा आणि ठरवा.

जीवो जीवस्य जीवनम....!
खाटिक खान्याचे video बघितले तर अंगावर शहारे येतात. पण ज्या देवांना आपण मानतो, ते देखील शिकार करायचे. सीतेला हरिणाचे मास घातलेला भात ( बिर्याणी ) आवडायचे, असं मायबोलीवरच वाचल. खर सांगायचं तर धक्का बसला.
आमच पूर्ण कुटुंब शाकाहारी, पण माझा भाऊ बाहेर सगळं खातो. एकदा कोंबडी मारताना बघितली आणि यापुढे कधी मांसाहार करणार नाही असं म्हणाला. पण समोर चीकेन आलं कि सगळ विसरायला होत असं म्हणतो आणि खातो. गायीच दुध हा सुद्धा मांसाहारच आहे, अस वाचल. त्याचं म्हणण दुध हे वासराच अन्न आहे, माणसासाठी गाय दुध देत नाही., आणि जास्त दुध मिळवण्यासाठी गायींना injections देतातच ना? मग हा दुष्टपणा नाही का ?

वादासाठी असंख्य मुद्दे आहेत , शाकाहारी राहायचं कि मांसाहारी हे ज्याच त्याने ठरवायचं.

गायीच दुध हा सुद्धा मांसाहारच आहे, अस वाचल. त्याचं म्हणण दुध हे वासराच अन्न आहे, माणसासाठी गाय दुध देत नाही., आणि जास्त दुध मिळवण्यासाठी गायींना injections देतातच ना? मग हा दुष्टपणा नाही का ? <<<
अगदी अगदी.
ती injections हा दूध पिणार्‍यांवरही दुष्टपणाच आहे. ते तर असोच.

तसंही दूध मिळत रहावं म्हणून गाय/ म्हैस सतत एकदा गाभण आणि मग बाळंत रहावी लागते. आणि हे घडवलं जातं. नैसर्गिकरित्या नव्हे तर कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारा. हा काय कमी अत्याचार नाहीये.

भारतातल्या बहुतेक आदिवासी जमातींमधे दूध हे बछड्यासाठीच असतं आणि ते माणसाने वापरणं हे ऑलमोस्ट पाप समजलं जातं. लहान बछडं मग गाईचं असो वा शेळीचं त्याचा आधिकार आपल्या आईच्या दुधावर पहिला असतो. माणसांनी पाळलीये म्हणून माणसांचा नाही.

दूध पिणं सोडा सांगण्यासाठी ही पोस्ट नाही. पण आपण जेव्हा दूध, दही इत्यादी गोष्टी ग्रहण करतो तेव्हा त्यामागची ही हिंसा लक्षात राहूदेत म्हणजे मग अरेरे मांसाहार करणारे वाईट असं म्हणायला जीभ धजावणार नाही.

ध्यानधारणा करावी. त्यातून समाधी अवस्था प्राप्त होते. अशा अवस्थेस पोहोचलेल्या साधकास शाकाहार / मांसाहार अशा वादात पडण्याचे कारण उरत नाही. कारण तो निव्वळ हवेवर देखील हजारो वर्षे जगू शकतो.

स्वामी भोजनानंद

Pages