अभक्ष्य भक्षण आणि माणूस

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 May, 2009 - 18:40

दर रविवारची सकाळ म्हणजे मस्त आराम, वर्तमानपत्र व पुरवण्यांचे मनसोक्त ऐसपैस वाचन, चहा नाश्त्याच्या वेळेला घरातल्यांशी दिलखुलास गप्पा आणि दिवसभरात काय काय कामे निपटायची आहेत याचा थोडासा आढावा हा कार्यक्रम हमखास ठरलेला असतो! त्याला पुन्हा टी.व्ही.वरील मनपसंत मालिकेची फोडणी ही तर अगदी गृहित असते. पण या नव्या ठिकाणी रहायला आल्यापासून दर रविवारची माझी सकाळ एका जीवघेण्या आक्रोशाच्या छायेत उगवते!
आमची ही नवी जागा 'गावठाण' भागात आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या येथील माणसे एकमेकांना ओळखतात. त्यांचे व्यवसायही बर्‍यापैकी पारंपारिक. आणि माझ्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावरच्या, अशाच व्यवसायांचा अविभाज्य भाग असलेल्या खाटीकांच्या टपर्‍या व दुकाने! ह्याच टपर्‍यांमध्ये बोकड, बकर्‍या, शेळ्या, कोंबड्या इत्यादींची रोज लोकांच्या मागणीनुसार कत्तल होत असते. आयुष्यातील ते एक वास्तव आहे! पूर्वी म्हणे ठराविक काळातच मांसाला भरपूर मागणी असे. पण सध्याच्या काळात सुट्ट्या, सण, निवडणुका, साप्ताहिक सुट्ट्या अशी कोणतीही निमित्ते लोकांची गर्दी ह्या दुकानांकडे खेचण्यास पुरेशी ठरतात. मग त्यासाठी दर रविवारी सकाळी अगदी माझ्या दारासमोर दोन-तीन ट्रक टेंपो थांबतात... आतमधील शेळ्या, बकर्‍या व त्यांची पिल्ले जणू मृत्यूची चाहूल लागल्याप्रमाणे इतकी करुण आवाजात आक्रंदत असतात की कोणाच्याही ह्रदयाला पीळ पडेल! त्यांना परमेश्वराने जर वाणी दिली असती तर त्यांचा हा आवाज नक्कीच म्हणाला असता, "देवा, वाचव रे बाबा आमच्या लेकरांना! कोणीतरी दया करा रे आमच्यावर! असे निर्घृणपणे नका ठार मारू आम्हाला! देवाने आम्हाला पण जगायचा हक्क दिलाय्...तो असा हिरावून नका घेऊ आमच्याकडून... आमचे प्राण घेऊन तुम्हाला काही क्षणांचे सुख मिळेल, तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील... पण आमच्या प्राणांची, आमच्या बछड्यांच्या प्राणांची किंमत देऊन... आम्ही तुमचा असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्ही आमची हत्या करून परतफेड करणार आहात.... दया करा रे आमच्यावर, जगू द्या आम्हालाही....!!"
त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः कधीकधी मला स्वतःचे विचारही ऐकू येत नाहीत! जेव्हा त्यांना पाय बांधलेल्या अवस्थेत खाटीकखान्याकडे नेले जाते तेव्हा तर त्यांच्या किंकाळ्या मन पोखरत राहतात.
कधी काळी मीदेखील मधूनच मांसाहार करायचे. मोठ्या चवीने खायचे. पण नंतर मांसाहारातून उद्भवणार्‍या समस्या, मानवी शरीरावर त्याचे होणारे अनिष्ट परिणाम यांविषयी ऐकले, वाचले, अनुभवले आणि माझा मांसाहार आपोआप संपुष्टात आला. चवीच्या दृष्टीने म्हणाल तर त्यांत वापरले जाणारे मसाले आपल्या नेहमीच्या भाज्या, रस्से वगैरेंमध्ये वापरले की जिभेचे 'ते' चोचले पण पुरविले जातात. भीतीने गळाठलेल्या, आक्रोशणार्‍या प्राण्यांच्या मांसामध्ये त्यांनी मृत्यूसमयी अनुभवलेली भीती, धक्का, संताप, दु:ख, आक्रंदन यांमुळे त्यांच्या शरीरात जे रासायनिक बदल, हार्मोनल चेंजेस घडून येतात त्यांचाही समावेश असतो! मग पैसे फेकून त्याबदल्यात अशी विकतची भीती, दु:ख कशाला घ्या! आपल्याकडे सुदैवाने व निसर्गाच्या कृपेने भरपूर भाज्या, फळे, धान्ये पिकतात. त्यांच्या किंमतीही मांसाच्या तुलनेत पहायला गेलो तर खूपच कमी आहेत. पण तरीही 'वशाट' खाण्याचा हा अट्टाहास का?
माझी काही मांसाहार करणारी स्नेहीमंडळी आमच्यात हा विषय निघाला की हटकून मला मांसाहार आरोग्यासाठी किती चांगला आहे, त्यांतून शरीराला किती उपयुक्त घटक मिळतात, अगदी आयुर्वेदातही मांसाहाराविषयी सांगितले आहे, पुरातन काळापासून मांसाहार चालू आहे ह्याचे दाखले देतात. पण मग सवाल असा उठतो की तो जर इतका चांगला आहे तर त्याचे एवढे दुष्परिणाम का आढळून येतात?
उत्तर काहीसे सोपे आहे... आजची जीवनशैली मुळातच तणावपूर्ण आहे. शहरांमध्ये तर आयुष्याची वेगवान गती, बैठे काम, अपुरा व्यायाम व इतर अनेक हानीकारक बाबी, जसे प्रदूषण, अनारोग्यकारक वातावरण, चढाओढ ह्यांची चढती भांजणी दिसते. त्यांत मांसाहार करणारे अनेकजण ते मांस कोठून येते, तिथे स्वच्छता किती असते, आरोग्याचे नियम पाळले जातात का यांविषयी बेपर्वा दिसतात. ज्या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते त्या प्राण्याच्या शरीरात काही मानवी शरीरास अपायकारक कृत्रिम संप्रेरके, खाद्य, जंतु यांचा समावेश होता का याबद्द्लही त्यांना फिकीर नसते. आयुर्वेदात जरी मांसाहार सांगितला असला तरी तो विशिष्ट ॠतूंमध्ये, विशिष्ट प्रकारे व ठराविक प्रमाणात करावयास सांगितले आहे. शिवाय तो कोणास लाभदायक आहे व कोणास कुपथ्यकारक त्याचीही सूची आढळते. मात्र त्या सर्वाशी मांसाहार करणार्‍या माणसाला सहसा देणेघेणे नसते. आपल्या आतड्यांची लांबी, दातांची व जबड्यांची रचना ही शाकाहारास अनुकूल आहे. परंतु हे वास्तव मांसाहारी मंडळी नजरेआड करताना दिसतात.
आज माझ्या घराजवळील खाटीकखान्यातून पंचक्रोशीतील हॉटेलवाले मांस खरेदी करतात. पण त्या हॉटेलांच्या एअरकंडिशन्ड वातावरणात बसून समोरच्या नॉनव्हेजवर ताव मारणार्‍यांना ते मांस जिथे विक्रीस ठेवले होते तिथल्या घोंगावणार्‍या माशा, घुटमळणारी भटकी कुत्री, झेपावणारे कावळे, खुडबुडणारे उंदीर घुशी, जवळच महापालिकेच्या कचर्‍याचा ओसंडून वाहणारा कंटेनर आणि सांडपाण्याच्या जोडीला दुकानासमोरून वाहणारे रक्ताचे पाट दिसत नाहीत. की त्यांना खाटीकाच्या दुकानात काम करणारे मळक्या कळकट गलिच्छ अवतारातील नोकर दिसत नाहीत.
आज शहराच्या तथाकथित सुसंस्कृत, सभ्य, पर्यावरणाविषयी जागरूक भागातील खाटीक खान्याची ही अवस्था आहे, तर मग इतर दुर्लक्षित भागांची कल्पनाच न केलेली परवडली!
परंतु सर्वात शेवटी मला मांसाहार करणार्‍या लोकांमधील 'माणसा'ला साद घालावीशी वाटते. तुम्ही एकदा तरी आयुष्यात खाटीक खान्याला अवश्य भेट द्या. आज त्या अश्राप शेळ्या, बकर्‍यांची बछडी जेव्हा केविलवाण्या आवाजात टाहो फोडतात तेव्हा तिथे तुम्ही एकदा तरी स्वतःची मुलेबाळे कल्पून पहा... त्या आर्त स्वरांमध्ये सार्‍या विश्वातील असहायता एकवटलेली असते... आईपासून विलग होण्याच्या दु:खाबरोबरच प्राणांची भीती असते. आपण जंगलांतील हिंस्र श्वापदे नाही की उपासमारीने व्याकुळ नाही.... असे असताना या निरपराध जीवांच्या हत्येला कारणभूत होऊन तुम्हाला त्यांत कसला आनंद मिळणार आहे? त्यांनाही जगू द्या.... त्यांना आपल्या खाद्यचक्राचा भाग बनवू नका... तुम्हाला जसा जगायचा हक्क आहे तसा त्यांनाही आहे... कृपया त्यांचा हा हक्क हिरावून घेऊ नका!
माझ्या घराजवळचा खाटीक खाना बंद होईल की नाही हे मला माहीत नाही, पण हा लेख वाचून जर तुम्ही मांसाहार बंद अथवा कमी करण्याचे ठरवलेत तर माझी खात्री आहे की त्या प्राण वाचलेल्या निरपराध जीवाचे तुम्हांला अनंत दुवा मिळतील!

गुलमोहर: 

जसा आहार----> तसे विचार

जसे विचार----> तसे उच्चार

जसे उच्चार----> तसे आचार

हे लॉजीक / तर्क कोणालाही नोबेल न देता सिद्ध झालेले आहेच.

८३९९९९९ जन्मांनंतर रिरिरिफाईन्ड झालेली मानवाची पचनसंस्था जरी काहीही पचवण्यास 'समर्थ' आहे. तरीही मानव जन्मात फक्त "जीव टिकवण्यास अपरिहार्य" असताना अभक्ष्यभक्षण अपवादात्मक तेवढ्यापुरते क्षम्य असले तरीही नंतर प्रायश्चित्त घ्यावेच असेच सांगून ठेवले असणार.

एक हितचिंतक या नात्याने तुम्हाला विनंती : स्मशानभूमी जवळ घर न घेणारी माणसे खाटीक खान्या जवळ आनंदाने कशी राहू शकतात?
पंचेंद्रियांतून अनेक विविध प्रकारची माहिती आपल्या न कळत सरतेशेवटी आपल्या अंतर्मनात जात असते.
कळूनसवरून, खाटीक खान्यातून येणारी माहीती जसे, गंध, दृश्य, शब्द [ आवाज] , रस, वाहणार्‍या वार्‍यांमार्फत होणारा स्पर्श हे सर्व कोणाच्याही अंतर्मनात जाऊन कोणते विचार, उच्चार, व आचार प्रसवतील? याचा अंदाज लवकरात लवकर घ्यावा.

धन्यवाद !

भावना पोचल्या.. विचार चांगले मांडले आहेत.
माझ्याही माहितीत अनेक मित्र, नातेवाईक आहेत जे आधी मांसाहार थोड्याफार प्रमाणात करत होते पण त्याचे दुष्परिणाम अधिक दिसल्याने त्यांन्नी कायम शाकाहार स्विकारला आहे.
माझ्याकडे एका डॉक्टरने लिहीलेली एक छान लेखमालिका होती, ज्यात रोजच्या वापरातील शाकाहारी घटकांची तुलनात्मक माहिती देवून प्रथिने, जीवनसत्वे वगैरे ही मांहारापेक्षाही अधिक मुबलक व सहज पचनशील प्रमाणात (esily digestable proteins, carbs, calories, fats) कशी उपलब्ध आहेत याचे छान स्पष्टीकरण दिले होते. शोधून मिळाली तर इथे अपलोड करीन. अर्थात त्या लेखमालिकेचा उद्देश हा मूळ जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून होता. मांसाहार न केल्याने जीवनावश्यक प्रथिने वा जीवनसत्वे मिळत नाहीत अशा काहीशा चुकीच्या गैरसमजूतीला अनुसरून तो लेख लिहीलेला होता. certainly was an "eye opener" for many of non-veg proclaimers.
बाकी तत्वज्ञान आणि विज्ञान सुध्धा आजकाल बरेच वेळा सोयिस्कररीत्या वापरले जाते तेव्हा ज्याचा जसा अनुभव तसा तो अर्थ काढत रहातो वा सोयिनुसार घेत रहातो. शिवाय भावनिक भागही ज्याचा त्याचा प्रश्ण आहे. फळे तोडणे म्हणजे देखिल "हत्त्या" असे म्हणणारे महाभागही आहेत. आता बोला Happy

__________________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे

भावना पोचल्या! Happy
या हिन्दूभू वर शाकाहार पुरेशा प्रमाणात उपलब्ध अस्ताना मान्साहार करणे चुकीचेच आहे! अर्थात खाणार्‍यान्ना जरी असे वाटत असते की पापाचा धनी तो "कसाई" होईल, आम्ही काय? पोट भरणार केवळ, तर तसे नाही! पापाचे धनी व्हावेच लागते
अर्थातच, अन दुर्दैवाने, नास्तिकता वाढीस लागल्याने, खाण्यापिण्याचे विधिनिषेध शहरातील बहुसन्ख्य सुशिक्षीत(?) "ब्राह्मणच" पाळीत नसल्याने, त्यांचें "याबाबतीत मात्र" "अनुकरण" करायचे इतर समाज कसा सोडेल?
पण हे देखिल बदलेल!

>>>> पंचेंद्रियांतून अनेक विविध प्रकारची माहिती आपल्या न कळत सरतेशेवटी आपल्या अंतर्मनात जात असते. >>>>>
ही बाब देखिल तेवढीच महत्वाची आहे!
सत्सन्गाची महती त्यामुळेच वर्णिली आहे!
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

माझ्या १००% शाकाहारी असण्या मागे अश्याच घटना आहेत!

मी नगरला ५ वीला असताना आमच्या वर्गाच्या खिडकीतून एका झाडाखालचे देऊळ दिसायचे.
त्या छोट्याश्या देवळात काही दगड शेंदूर लावून ठेवलेले होते. आषाढ महीण्यात दर शुक्रवारी येथे पद्मसाळी ( तेलगू ) समाज कोंबड्या बकरे आणून बळी देत.. दिवसभरात हजारो कोंबड्यांची फडफड आणि ५-५० बकर्‍यांची आर्तता कानी पडायची,,, आणि शाळा सुटल्यावर घरी जाताना त्या देवळा समोरील खड्यात रक्ताचे तळे आणि सभोवती कोंबड्यांच्या शिराचा खच असायचा!

हे इतके मना बिंबले की माझी कधी मांसाहाराची इच्छाच नाही झाली! पुढे नोकरीला लागल्यावर एकदा मित्रांच्या आग्रहा खातर हॉटेल मध्ये चिकन खाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पहिला घास ओठाशी नेताच त्या फडफडणार्‍या कोंबड्या डोळ्यापुढे आल्या आणि मी खास तसाच पानात टाकून उठलो!
आजही तुम्ही वर म्हटलयं त्या प्रमाणे खाटकाच्य दुकानापुढे बांधलेल्या त्या बकरीच्या कोकरांच्या मनात काय येत असेल हा विचार नेहमीच डोकावतो! समोर हुकला उलटे टांगलेले बकरू काल पर्यन्त त्यच्या समवेत घास घास खाताना एकमेकांच्या तोंडातील घासाची काडी मान हलवीत ओढत होते......

आपले विचार वाचले, आवडलेपण, समजलेमात्र नाहीत. आक्षेप नक्की कशाला? खाटिकखान्याला, तिथल्या अस्वच्छततेला, होत असलेल्या मानसिक त्रासाला का मासाहाराला? कशालाही असो, माणसाच्या सर्व त्रासान्ची उत्तरे त्याच्या आतच असतात.

कोणतीही गोष्ट वाईट नसते. त्याचा वाईटपणा वापरावर असतो.

माणसाने आवडेल ते जरुर करावे फक्त त्याचा ईतराना त्रास होऊ देवू नये. आणि कोणत्याही गोष्टीची अति वाईटच. शाकाहाराचीही.

आपले विचार वाचले, आवडलेपण, समजलेमात्र नाहीत. आक्षेप नक्की कशाला? खाटिकखान्याला, तिथल्या अस्वच्छततेला, होत असलेल्या मानसिक त्रासाला का मासाहाराला? कशालाही असो, माणसाच्या सर्व त्रासान्ची उत्तरे त्याच्या आतच असतात.

कोणतीही गोष्ट वाईट नसते. त्याचा वाईटपणा वापरावर असतो.

माणसाने आवडेल ते जरुर करावे फक्त त्याचा ईतराना त्रास होऊ देवू नये. आणि कोणत्याही गोष्टीची अति वाईटच. शाकाहाराचीही.

तुम्ही अत्यंत कळकळीने लिहीलेले विचार समजले व काही अंशी पटले सुध्दा.

माझा याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. कल्पना करा उद्या सर्वजण शाकाहारी झाले तर या भरपूर भाज्या, धान्य, फळे पूरक आहेत का? त्याला मागणी वाढेल व पर्यायाने किंमती पण वाढतील. त्यामधे भर म्हणजे मांसाहार न केल्याने प्राण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल. त्यांना परत अन्न म्हणुन गवत, भाज्या लागतीलच. मग त्यांच्या संख्येवर आळा घालण्यात वेळ, पैसा खर्च करावा लागेल. या सगळ्याचा निसर्गाच्या चक्रावर परीणाम होऊन त्याचा समतोल बिघडेल. त्यामुळे मांसाहार करुन एक प्रकारे निसर्गाचा समतोलच राखला जातो आहे.

बघा या बाजुचा विचार करुन.

kp,
आता कोंबडीच्याही (ऊदाहरणा दाखल फक्त. बाकी ईतरही प्राणी आहेत. त्यांचा अनुल्लेख करायचा अजीबात हेतू नाही.) बाजूने याचा विचार करून बघायचा का:

माझा (कोंबडीचा) याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. कल्पना करा उद्या सर्वजण मांसाहारी झाले तर या सर्व कोंबड्या पुरेशा आहेत का? त्यांना मागणी वाढेल व पर्यायाने किमती पण वाढतील (कोंबड्यांच्या). त्यामधे भर म्हणजे शाकाहार न केल्याने झाडांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल (खर तर हा दुष्टतर्क कोंबडीलाही न पटण्यासारखा आहे. उगाच झाडे लावा समित्या अन चळवळी राबवतात लोकं). त्यांन्ना अन्न म्हणून खत, पाणी, जमिन हे लागलेच. मग त्यांच्या वाढीवर वा संख्येवर आळा घालण्यात वेळ, पैसा खर्च करावा लागेल. या सगळ्याचा निसर्गाच्या चक्रावर (पुन्हा कोंबडीला हा तर्क पटत नाहीये. पैसा अन वेळेचा निसर्गाशी कसा काय संबंध? आर्थिक परिस्थितीशी म्हणा हवं तर) परीणाम होवून त्याचा समतोल बिघडेल. त्यामुळे शाकाहार करून एक प्रकारे निसर्गाचा(?) समतोलच राखला जातोय.

बघा विचार करून.
~D Happy
___________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

योग बघ नाण्याच्या दोन बाजु सारख्या नसतात हेच तू तुझ्या पोस्टवरुन सिध्द केले आहेस. Proud आपल्या दोघांच्या पोष्ट वाचल्यास की समतोलाचा अर्थ पण समजेल.

BTW मी शाकाहार करुच नका असेही म्हणत नाहीये.

केप्या,
प्रथम नाणे कशाचे आहे ते पहावे लागेल त्यावरून ते कशात तोलायचे हे ठरवावे लागेल. तेव्हा "समतोल" चे रसग्रहण आवश्यक आहे. जाणकार करतीलच Happy
तूर्तास "समजले अन काही अंशी पटले" या प्रतिक्रीयेसाठी तुला अडीच तारे बक्षिस!
___________________
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

कान्द्या, सध्या मारल्या जात असलेल्या कोम्बड्या, डुक्करे इत्यादी बाबि नैसर्गिकरित्या वाढत नसून, मुद्दामहून पोल्ट्रीफार्म मधे वाढविले जाऊन, मग मारुन खाल्ले जातात हे उघड सत्य, यस्जीरोडवर वेन्कटेश्वराचे ऑफिस असतानाही तू कसे काय विसरतोस?
अशाप्रकारे कोम्बड्या/डुक्करे/गायी इत्यादी जनावरे वाढवण्यासाठि जेवढे धान्य वापरले जाते, तेवढ्या धान्यात या जगातील यच्चयावत गरिबान्च्या तोन्डि दोन वेळचे "शाकाहारी" घास पडतील, हे नजरेआड करुन कसे चालेल?
अर्थात अशा मान्साहारी लोकान्ना बर्डफ्ल्यु, सध्या स्वाईनफ्ल्यु वगैरेला तोन्ड द्यावे लागेलच हा भाग निराळा
दुर्दैवाची गोष्ट कीस्वाईन फ्ल्यु श्वासावाटे देखिल पसरतो अशी बातमी आहे!
आजवर, कोणत्या शाकाहाराकरताच्या वनस्पतीच्या रोगामुळे मनुष्यजातीस धोका झाला असे दिसले?
असो
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

बाबि नैसर्गिकरित्या वाढत नसून>>>
दोन वेळचे "शाकाहारी" घास पडतील>>>
वादच घालायचा असेल तर हे दोन मुद्दे दळायला घेता येतील. पण असुदे. चालुदे तुमचे.

का वाद घालताय रे? शाकाहार असो वा मांसाहार, चव चांगली असावी अस मला वाटतं.

जाऊ द्या हो. शाकाहार/मांसाहार, आपला बुवा/ दुसर्‍याचा बुवा, आपला धर्म/दुसर्‍याचा धर्म, देव असणे/नसणे, हे सनातन विषय आहेत. त्यावरील चर्चा कधीच निष्कर्षाप्रत जाणार नाही. मुळात एकच बाजू पूर्ण योग्य आणि दुसरी बाजू संपूर्ण चूक अशी भूमिका घेणार्‍यांशी कुठलीच चर्चा करू नये. त्यातून फक्त वाद होतात. ज्याचा बुवा त्याने सांभाळावा हेच खरे.

>>शाकाहार असो वा मांसाहार, चव चांगली असावी अस मला वाटतं.
अमित तुम्हाला याबद्दल मोदक (तो शाकाहार असल्याने दोन्ही बाजूना चालावा).

<<<तो शाकाहार असल्याने दोन्ही बाजूना चालावा<<<>>>

हा शाकाहाराचा अधिक बिंदू (प्लस पॉईंट).

आजवर, कोणत्या शाकाहाराकरताच्या वनस्पतीच्या रोगामुळे मनुष्यजातीस धोका झाला असे दिसले?
>> कोबी ही शाकाहारी भाजी आहे आणि त्याच्यामुळे आजार झालेले आहेत.. लिएंडर पेसला जो आजार झालेला होता त्याचा विषाणू हा कोबीत अर्धा आणि डुकरात अर्धा वाढणारा असतो...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

अरुंधती,
चांगला प्रयत्न आहे, जैन लोकांनी सुद्धा या विषयावर छान पुस्तके शास्रीय दृष्टीकोनातून लिहीली आहेत.

>>>>> लिएंडर पेसला जो आजार झालेला होता त्याचा विषाणू हा कोबीत अर्धा आणि डुकरात अर्धा वाढणारा असतो... Lol
हिम्या, लेका असुदे, पण नुस्ती कोबी खाऊन अर्ध्या वाढलेल्या विषाणूमुळे काही होत नसणार, त्याची पूर्ण वाढ होण्यास, आधी डुक्कराने कोबी खायला हवी, मग त्या डुक्कराला पेसने खायला हवे! Proud
बर तर बर, कोबी काय डुक्करास खात नाही, सबब विषाणू आधी डुक्करात पोसला गेला नि नन्तर बादरायणसम्बन्ध जुळल्यामुळे कोबीत शिरला नि पूर्ण वाढला असे होण्याची सूतराम शक्यता मला तरी दिसत नाही
तेव्हा, पुन्हा या वाक्यातूनच हे देखिल नक्की सिद्ध होतय की, कोबी खाल्ल्यामुळे नाही तर डुक्कर चापल्यामुळे पेसला पूर्ण वाढलेल्या विषाणूचा त्रास झाला

पटल तर हो म्हण, नाहीतर (कोबी खाण) सोडून दे! Proud Lol

दूसर अस की मी विचारलय, "मनुष्यजातीस धोका" एकटा दुकटा लिअ‍ॅण्डर पेस म्हणजे आख्खी मनुष्यजात नव्हे! Happy

तसच, उद्या, सिझन आहे म्हणून कोणी खा खा करुन डझनावरी हापुसचे आम्बे खाल्ले अन अतीखाण्यामुळे पोटदुखीने/उष्णतेच्या विकाराने आजारी पडला तर तो दोष आम्ब्यान्चा की खादाडणार्‍याचा? हा मुद्दा देखिल आहेच!

लिंबू,
तुरीच्या डाळीत भेसळ असणारी कुठली तरी डाळ आहे त्याने कितीतरी माणसं आजारी पडतात/ दगावतात. ( दुर्गाबाईंच्या पुस्तकात उल्लेख आहे याचा )
बुरशी आलेलं धान्य सरकारी साठ्यातून दिलं गेल्याने आजारी पडलेल्यांचे किस्से वर्तमानपत्रातून वाचले नाहीत का ?
तेलातल्या भेसळीने सुद्धा तब्येतीवर दुष्परिणाम होतात.

योग - कैच्याकैच पोष्ट Happy

मूळ पोस्ट्मधे मला दोन मुद्द्यांची गल्लत वाटते - मासांहार कसा वाईट हा एक, अन इतर लोक मांसाहार करतात त्याचा खाटिकखान्याच्या जवळ रहाणार्‍या लोकांना कसा त्रास होतो हा दुसरा.

साखर कारखान्याचा वास, कागद कारखान्याचे पर्यावरणावर दुष्परिणाम हे कोणाला माहित नाहीत का ? तरी सुद्धा कोणी तेव्हढ्याकरता साखर खाऊ नका, कागद वापरू नका म्हणत नाहीत . मग खाटिकखान्याशेजारी रहाणार्‍यांना त्रास म्हणून मांसाहार करू नये हे कसं काय ?

>>>>>>> तुरीच्या डाळीत भेसळ असणारी कुठली तरी डाळ आहे त्याने कितीतरी माणसं आजारी पडतात/ दगावतात. ( दुर्गाबाईंच्या पुस्तकात उल्लेख आहे याचा )
बुरशी आलेलं धान्य सरकारी साठ्यातून दिलं गेल्याने आजारी पडलेल्यांचे किस्से वर्तमानपत्रातून वाचले नाहीत का ?
तेलातल्या भेसळीने सुद्धा तब्येतीवर दुष्परिणाम होतात.

शोनू, वरील प्रत्येक उदाहरणास "माणूस" भेसळीकरता अथवा बेमूर्वतखोरीकरता जबाबदार आहे, ते ते जिन्नस जबाबदार नाहीत! Happy
अन, तसही, ज्या ज्या विषारी वनस्पती आहेत, त्या शाकाहारासाठी निषिद्धच मानल्या गेल्या आहेत!
त्यान्चा मुद्दामहून वा चूकुन वापर, त्या वनस्पतीन्ना दोषी कस काय ठरवतो? वापरणारा दोषी की वनस्पती दोषी?
मला नाही वाटत, कोणत्या विषारी वनस्पती स्वतःहून चालत जाऊन माणसास म्हणत अस्तील की मला खा! Proud

मान्साहारचे तब्बेतीवर होणारे वाईट परिणाम कोणते? ते बर्डफ्लू वगैरे अशा रोगी प्राण्यान्च्या सम्पर्कात आल्यानेसुद्धा होतात. निरोगी प्राणी खाल्ल्याने नाही.

लिंबू
अन स्वाइन फ्लू अन बर्ड फ्लू च्या प्रसाराकरता ते प्राणीच जबाबदार आहेत , माणूस नाही असं म्हणायचंय का? ते प्राणी तरी कुठे म्हणतात मला खा ? रोगी / निरोगी कुठलेही प्राणी असं म्हणत नसणार ...

दुषित/ ह्युमन कंझम्पशनला अयोग्य अन्न सेवन करण्यातले धोके मासांहारी अन शाकाहारी दोन्ही गटांना असतात. फक्त मासांहारी लोकांनाच याचा धोका असतो असं कुठेय ?

मीही मुक्या प्राण्यांचा(चालनार्‍या, उडणार्‍या आणि पोहणार्‍या) चाहता आहे !
फार चविष्ट लागतात ते ! Proud

मला शाकाहारी लोकांविषयीही नितांत आदर आहे !
कारण त्यांच्यामुळेच मांसाहाराच्या किंमती आटोक्यात आहेत !

वरचा लेख छान आहे. विचार करायला पाहीजे सगळ्यांनी
मी केला होता बर्‍याचदा..... नाही जमलं( जीभेला सवय जडली आता! :D)
आणि आमच्यात म्हसोबाला नैवेद्य दाखवावा लागतो! आपणही खावा लगतो .नाहीतर माय रागावते.

दूसर अस की मी विचारलय, "मनुष्यजातीस धोका" एकटा दुकटा लिअ‍ॅण्डर पेस म्हणजे आख्खी मनुष्यजात नव्हे!>>>>
लिंब्या, मी लिएंडर पेसचे नाव फक्त उदाहरणादाखल नमूद केले आहे.. पेस सारखाच आजार झालेले ४-५ सामान्य नागरिक माझ्या ओळखीचे आहेत.. आणि त्यातील १ सोडल्यास बाकीचे शुद्ध शाकाहारीच आहेत.. तरीही त्यांना हा आजार झालेला आहे.. अर्थात हा आजार पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.. फक्त तो बरा व्हायला जवळपास दिड ते दोन वर्षांचा कालावधी जातो..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

प्राण्यांना खाण्यासाठी आपण वाढवतो आणि मग मारुन खातो, त्यांच्या मधून वेगवेगळी रसायने, विषाणू पसरतात, त्यांच्या मनातल्या मृत्यूसमयीच्या नकारात्मक भावना असतात त्या हानीकारक - हा वरती बर्‍याच जणांनी मांडलेला - झाला शाकाहारी माणसांचा युक्तीवाद!

आता मांसाहारींचा युक्तीवाद पहा -
१. धान्य - भाज्या - फळे - सगळं संकरीत बियाणे वापरून उत्पन्न करतात, म्हणजे त्यात आपल्या स्वार्थासाठी जनुकीय बदल करण्यात आले आहेत जे नैसर्गिक नाहीत तर मनुष्य निर्मीत आहेत.

२. भारतात तरी सर्वत्र रासायनिक खते, किटकनाशके वापरली जातात. ती देखिल ह्या शाकाहारी अन्नपदार्थातून आपल्या पोटात जात नसतील का? बहुसंख्य शहरांमध्ये पालेभाजी सांडपाण्यावर होते.. त्याचे काही दुष्परिणाम नसतील का?

३. प्राणी मारताना निदान त्यांना पळून जाण्याची थोडी तरी (०.०००००००००१ %) संधी असते. झाडे तर एकाच जागी असतात. म्हणजे आपण निशस्त्रावर शस्त्र चालवतो नाही का? प्राणी ओरडतात, म्हणून त्यांचे दु:ख जाणवते. पण वनस्पतींना देखिल जीव असतो, भावना असतात हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यांचे आवाज नाही ऐकू आले तरी - वाटणारी भिती आणि त्याचे परिणाम वै. सगळे सारखेच असणार ना?

४. गाईचे दूध जे आपण वापरतो ते तिच्या बछड्यांना न देता आपल्याला दिले जाते. स्वतःच्या मुलांना अधिकाधिक स्तनपान मिळावे म्हणून प्रयत्नशील असलेल्या माणसाचे हे विरोधी वागणे नाही का? प्रत्येक दुधाची पिशवी/पॅक उघडताना गाईच्या/म्हशीच्या डोळ्यातून आपल्या बछड्याला पुरेसे पाजता न आल्याने ओघळणारे अश्रू आठवतात का?

५. दही, चीझ, मद्य हे जैविक प्रक्रियेमुळे बनते. त्यात अनेक सुक्ष्म जीव असतात. हे पदार्थ शाकाहरी कसे?
(मद्य नव्हे - पण बरेच शाकाहारी मद्यपान करतात)

ह्या दोन्ही बाजू ऐकल्या तर उपाशीच रहायची वेळ येईल, नाही का?

मला वाटते, ज्याला जे आवडते ते त्याने खावे.. आवडेनासे/पचेनासे झाले तर सोडावे. त्यात इतरांनी उपदेश करु नये. मी माझ्यापुरती ही समस्या "चिनीकम" स्टाईलने सोडवली आहे. नवरा "घास-पुस" आणि मी "तंगडी कबाब". मी नवर्‍याला "मासे खा" म्हणत नाही की तो मला "उकड खा" म्हणत नाही.

अरुंधतीबाईंच्या अंगावर येतेय ती मांसाहारामुळे होणारी "हिंसा"! जर त्या तिथे रहायला गेल्या नसत्या तर कदाचित पूर्ण शाकाहारी झाल्या नसत्या कारण मग ती दृष्टी आडची सृष्टी झाली असती. त्यांनी त्यांचा प्रासंगिक दृष्टीकोन मांडलाय एवढेच.

BTW - राघव, "मोदकं" नावाचे मासेही असतात त्यामुळे असेही मोदकं चालतील. Wink

जाजु, मस्त लिहीले आहेस ! १०० % अनुमोदन !

नवरा "घास-पुस" आणि मी "तंगडी कबाब". मी नवर्‍याला "मासे खा" म्हणत नाही की तो मला "उकड खा" म्हणत नाही.>>> आमच्याकडे हे समिकरण उलटे आहे. Happy

>>वनस्पतींना देखिल जीव असतो, भावना असतात

वनस्पतीना भावना नसतात. त्याना nervous system नस्ते. मेन्दू नसतो. त्यामुळे जाणीव नसते.
बाकी प्रत्येकाची खाण्याची, न खाण्याची कारणे वेगळी. ज्याला जे खायचे ते खावू द्यावे झाले. हे मात्र खरे.

झिंगर, अगदी बरोबर!

माझ्या मिश्रआहारी [आजी व माजी] मित्र / मैत्रीणींनो,

सहज एक प्रश्न पडला म्हणून विचारतोय, वस्तुनिष्ठ उत्तराची अपेक्षा करतो.

असे म्हणतात की, "मानवाला" भूतदया असावी.

मग मिश्रआहारींना भूतदया असते किंवा कसे?

आगाऊ धन्यवाद !

जाजु, मस्त लिहीले आहेस ! १०० % अनुमोदन !
मला वाटतं कोणत्याही खाण्यात तारतम्य हवं. शरीर शास्त्रानुसार आपले सुळे, स्वदुपींड, वापरात नसलेले अपेंडिक्स, डोळ्याची रचना या आणि अशा अनेक गोष्टी दर्शवतात की माणूस मूलतः मांसाहारीपण आहे. आता त्याच्या आजुबाजूच्या वातावरणानुरूप कोठे तो शाकाहारी झाला, कोठे तो मांसाहारपण राहिला, तर कोठे तो दोन्ही खाणारा झाला. त्यामुळे ज्याला ले आवडेल त्याने ते खावे, हेच वादात न पडण्यासाठी बरे नाही का?
आणि प्रश्न भूतदया, हिंसाचार आणि आहार-विचार-उच्चार याचा असेल तर अनेक पूर्ण शाकाहारी खूनी दाखवता येतीलच की अन पूर्ण मांसाहारी शांत सदविचारीही दिसतात नाही का? तेव्हा हा काही वादाचा मुद्दा असूच नये. हा फक्त आवडी- निवडीचाच राहावा, हे बरे Happy

Pages