पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 7 *क्षणोक्षणी चुका घडतात *

Submitted by नादिशा on 9 October, 2020 - 12:14

पालक म्हणून मुलांना घडवताना त्यांच्याबरोबर आपणही वाढत असतो. चुकत असतो, शिकत असतो आणि पालक म्हणून वाढत असतो. सगळेजण नक्कीच सहमत होतील याच्याशी.
आमच्या पालकत्वातील या काही चुका -

स्वयम 2 वर्षांचा असतानाची ही गोष्ट . त्या काळात त्याला प्राण्यांचे खूप वेड होते . त्यामुळे डोरा -डिएगो हे त्याचे आवडते कार्टून्स होते . तेव्हाचा त्याचा आवडता खेळ म्हणजे पप्पानी एक प्राणी बनून "बचाओ, मुझे बचाओ "असे ओरडायचे आणि स्वयमने डोरा - डिएगो प्रमाणे अडथळे पार करत त्याला वाचवायचे . इतका चालू असायचा हा खेळ आमच्या घरी , की दूध पिण्याच्या माझ्या जबरदस्तीपासून स्वतः ला वाचवण्यासाठी "बचाओ , बचाओ "करून स्वयम पपांना मदतीसाठी बोलवायचा , तर कधी अमित त्याच्या पप्प्या घ्यायला लागला तर त्यापासून वाचण्यासाठी "बचाओ , बचाओ "करून मला मदतीसाठी बोलवायचा . त्याच्या चातुर्याचे आम्हाला कौतुक वाटायचे आणि आमच्या नजरेतले कौतुक पाहून तो पदोपदी "बचाओ , बचाओ "चा गजर संधी मिळाली , की करतच राहायचा .

एक दिवस मात्र गंमतच झाली . माझी कामांसाठी city मध्ये गेलो होतो . एके ठिकाणी लेडी शॉपी मध्ये मी खरेदीसाठी गेले . अमित पार्किंग मध्ये स्वयमला घेऊन थांबला . दुकानात गर्दी असल्याने मला थोडा वेळच लागला . मी खरेदी आटोपून या दोघांजवळ आले , तर अमितचा चेहरा थोडा केविलवाणा , काहीसा संतापलेला , काहीसा असहाय्य्य असा दिसत होता . मी दिसल्याबरोबर रागाने त्याने स्वयमला माझ्या कडेवर आदळले . मी विचारले काय झाले आणि कारण समजल्यावर मला हसू आवरता आवरता नको झाले .

झाले होते असे , की स्वयमलाही माझ्याबरोबर दुकानात यायचे होते . अमित त्याला जाऊ देत नव्हता . काही वेळ हट्ट केल्यावर स्वयमने "बचाओ , कोई तो बचाओ ", असे मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली . तो एरिया खूप गर्दीचा असल्याने अमितने त्याला कडेवर घट्ट पकडले होते आणि याचे कडेवरून , अमितच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत , रडत "बचाओ , बचाओ "चालूच होते. आजूबाजूचे लोक आता संशयाने पहायला लागले होते . हा चांगले कपडे घातलेला माणूस बहुधा या मुलाला पळवून घेऊन चाललाय की काय , अशी शंका त्यांच्या नजरेत दिसू लागली होती . मी बाहेर यांच्याजवळ आले , तेव्हा काहींच्या विचित्र नजरा मला जाणवल्या होत्या . त्यामागचे कारण हे होते तर !

अमित म्हणाला, "जर तू थोडा उशिर केला असतास , तर लोकांनी मला बदडलेच असते आत्ता !"हसून हसून मुरकुंडी वळली माझी . पण स्वयमच्या खेळाने अनावस्था प्रसंग आणला होता खरा ! पुढची सगळी कामे सोडून आम्ही घरी परतलो . 2 दिवस त्याला हरतऱ्हेने समजावून सांगितले , त्यादिवशी काय झाले असते, हे पटवून दिले आणि मग हळूहळू तो खेळच बंद केला.

नंतरच्या काळात पौराणिक , ऐतिहासिक सिरिअल्स , कार्टून्स च त्याला मनापासून आवडायला लागल्या . मग एका नवीन खेळाचा जन्म झाला . तेव्हाचा त्याचा आवडता खेळ म्हणजे पप्पा राक्षस , हा देव नाहीतर पप्पा मोगल , हा शिवाजीराजे /त्यांचा सरदार . त्यामुळे राक्षस विराट हास्य करत धावून येणार, मग देव राक्षसाची मनसोक्त पिटाई करणार , शिवराय मोगलांचा पराभव करणार , हे ओघानेच आले. अक्षरशः धुडगूस चालायचा दोघांचा .

मी कितीही ओरडले , तरी यांचे खेळणे थांबले नाही कधी .पण प्रॉब्लेम असा व्हायचा , की खेळाव्यतिरिक्त सुद्धा इतरवेळी मनाविरुद्ध काहीही झाले , की स्वयम हात उचलायचा अमितवर . अमित हसण्यावारी न्यायचा . मी सांगायचा प्रयत्न करायचे , पण अमितला वाटायचे , मी उगाचच बाऊ करतेय .

पण मग एक दिवस काय झाले , काहीतरी मनाविरुद्ध झाले स्वयमच्या आणि त्याने खाडकन एक कानाखाली मारली अमितच्या . अमितचा जणू स्वाभिमान दुखावला . हे कानाखाली खाणे मात्र सहन करू शकला नाही तो आणि त्याने अगदी प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे संतापून स्वयमला जोरदार रपाटा मारला ."आता काय कानाखाली मारशील का माझ्या ? कळते का काही तुला ?बापाला मारतोस? "असे म्हणत.

दोघांपैकी कुणी एक जण स्वयमला बोलत - रागवत असताना दुसऱ्याने मध्ये पडायचे नाही , असा आमचा अलिखित नियम असल्याने मी तेव्हा काहीच बोलले नाही . बराच वेळ अमित तावातावाने बडबडत होता आणि स्वयम रडत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव होते . स्वयम रडत रडत " सॉरी" म्हणाला आणि तात्पुरते वातावरण शांत झाले . पण "एरवी पण मी मारतो पप्पाना , तर पप्पा हसत असतात . मग आत्ताच का एवढे चिडले ? का मारले त्यांनी मला? " हा प्रश्न मला त्याच्या डोळ्यात दिसत होता .

स्वयम झोपल्यावर रात्री मी अमितला म्हटले , " स्वयमचे कनफ्युजन लक्षात घे ना तू. एरव्ही तो मारतो , तू हसतोस , खेळ चालू असतो तो तुमचा . मग आज कानाखाली मारले , म्हणून एवढे का चिडले पप्पा , कानाखाली मारल्याचा significance काय एवढा ? हे त्याला कसे कळेल रे ? तो लहान आहे अजून. मग अमितच्या लक्षात आली त्याची चूक . मग दुसऱ्या दिवशी तो स्वयमला जवळ घेऊन "सॉरी "म्हटला .

त्यानंतर आम्ही दोघांनी त्याला समजावून सांगितले , की "अरे , तुम्ही खेळता , तेव्हा पप्पा तुझा partner असतो . तेव्हा तुम्ही मस्ती केली , तरी चालते. पण एरव्ही ते तुझे पप्पा आहेत , तुझ्यापेक्षा मोठे आहेत किनई आणि कुणाही मोठ्या माणसांवर हात उचलायचा नसतो , कानाखाली मारणे म्हणजे तर अपमान असतो . एकवेळ इतर कुठे मारले , तर एवढे काही नसते वाटले पप्पाना . पण एखाद्या माणसाने खूप मोठी काही चूक केली , तर कानाखाली मारतात , कळाले बेटा? "त्याने होकारार्थी मान हलवली . मग त्यानंतर कधी तक्रारीची संधी नाही दिली आम्हाला .

असाच तिसरा एक आम्हाला शिकवणारा प्रसंग . सकाळी मी घरी थांबून स्वयमला सांभाळायचे आणि अमित ऑफिस मधून संध्याकाळी परतला, की त्याच्या ताब्यात स्वयमला देऊन मी opd ला जायचे , असे आमचे रुटीन होते . स्वयमलाही ते माहित होते . पण रोज मी opd मधून घरी परतले , की स्वयम मला चिकटायचा . तोवर शहाण्यासारखा वागणारा तो मग हट्टी बाळ व्हायचा . मग सगळ्या गोष्टींना मीच हवी असणार . खूप बडबड करणार माझ्याशी , असे चालायचे .

पण असे करता करता नंतर तो सारखाच मला चिकटायला लागला. मी रोज पंजाबी ड्रेस वापरत असले , तरी सणवाराला , कार्यक्रमाला आवर्जून साडीच नेसते . स्वयमला मी साडी नेसलेली आवडते , हे मला माहिती होते . पण हा सारखाच मला साडी नेसण्याचा आग्रह करू लागला . जीन्स वगैरे कधी घालायला काढली , तर छान नाही दिसत तुला , असे म्हणून परावृत्त करायचा . बाहेर जाताना मी केस मोकळे सोडायचे की बांधायचे , याच्याही सूचना करायला लागला . मी अमितला म्हणायचे , "बाई, हा तर सासराच झाला की माझा !"आणि ऐकायचे त्याचे म्हणणे .

पण हळूहळू हे वाढतच गेले . काही खरेदी करताना आम्ही एकमेकांना विचारतोच , घेऊ ना , कसे दिसतेय मला , असे . पण फायनल decision ज्याला घ्यायचेय , त्याचाच असतो . पण स्वयम मला त्याने सुचवलेल्या गोष्टींशिवाय घेऊच देईना. हट्टच करायचा . मी जीन्स टॉप घेत होते एकदा , ट्राय केल्यावर कशी दिसतेय , या दोघांना बाहेर दाखवायला आले , तर "नको घेऊ ", असे म्हणाला . मी "का रे ? "असे विचारले , तर म्हणाला, " तू कॉलेज च्या मुलीसारखी दिसतेयस. "
मी म्हटले , "मग दिसू दे की.काय झाले मग? "
अमित पण म्हणाला, "घे गं , छान आहे. "
तर हा म्हणाला "अगं पण तू मम्मा झालीय ना आता , तू कुठे कॉलेज ची मुलगी आहेस.. "
इतका रुसला , फुंदला , की आम्ही परत आलो घरी न घेताच .
माझी छोटी बहीण वैतागायची त्याच्यावर , म्हणायची "बाई , नवऱ्याचे नसले तरी याची केवढी बंधने तुझ्यावर ! तू कशाला ऐकतेस त्याचे एवढे ? "

अमितच्या बाबतीत पण हेच करू लागला . सुरुवातीला तो सारखा यायचा मध्येच कधीही खेळता खेळता , अभ्यास करताना, "माझी मम्मा , माझी मम्मा " म्हणून मिठी मारायचा , लाडात यायचा, पप्पी घ्यायचा आणि जायचा . नंतर नंतर अमित माझ्याशी काही बोलायला आला , की लगेच पळत यायचा "माझी मम्मा आहे, " म्हणत गळ्यात पडायचा माझ्या . आम्ही हसायचो. मी म्हणायचे, "हो रे, तुझीच मम्मा आहे मी. "
अमित म्हणायचा ," तुझा बॉडीगार्डच आहे की हा ! सॉरी बाबा, तुझीच मम्मा आहे. "मग तो जायचा तिथून .

या वयातील मुलांना असतो नैसर्गिक पझेसिव्हनेस आईबद्दल , असे म्हणून आम्ही दुर्लक्ष केले . शिवाय दुसऱ्या एखाद्या लहान मुलाला आपण उचलून घेतले , आणि गमतीने म्हटले "हे माझे आहे " की आपले बाळ नाही का रडायला लागत , तसेच आहे हे !आमच्याकडे दुसरे बाळ नसल्याने हा अमितशी असे वागत असेल , असेही वाटले आम्हाला . आम्ही शक्यतो लांबच राहायचो एकमेकांपासून .

काही दिवसांनी असे झाले , अमित माझ्याशी काही बोलत असला , चुकून जरी हात माझ्या खांद्यावर ठेवला , कधी मला ताप आलाय का , एवढे जरी हात लावून पहिले , एवढासा जरी मला स्पर्श केला त्याने , तरी बॅट , गदा.. स्वयमच्या खेळण्यांत जे काही असेल , ते घेऊन यायचा तो आणि अमितला बदडायचा .
तो "सॉरी बाबा , नाही हात लावत तुझ्या मम्माला, "असे म्हणेपर्यंत .

मग मात्र मी विचारात पडले . ठरवले, आता याला समजावलेच पाहिजे . मग मी जाणीवपूर्वक अमितशी जास्त बोलायला लागले , तो ऑफिसला जाताना शेकहॅन्ड करून "गुड डे" म्हणायचे , आवर्जून बायबाय करायचे , "डब्यात किती पोळ्या देऊ आज" , असे जरी साधे विचारायचे असले , तरी त्याला हात धरून विचारायचे . तोही जाताना मला खांद्याला धरून सांगायचा , "दिवसभर काम करत राहू नको , जरा आराम पण कर बरंका ! "
घरी परतल्यावर पण जवळ येऊन मला विचारायचा , "थकलीस का गं ? "

जाणीवपूर्वक आम्ही असे वागत राहिलो . अपेक्षेनुसार स्वयमचे लक्ष होतेच , नाराज झालाच तो . पण आता त्याची लाडकी मम्माच अशी वेड्यासारखी वागत होती ना ! त्यामुळे पप्पाना मारायला नाही आला . रुसून बसायचा . आम्ही दुर्लक्ष करायचो . आम्हाला काही कळालेच नाही , असे वागायचो . त्याची नाराजी वाढत वाढत जाऊन एक दिवस रडायलाच लागला .

तेव्हा मग आम्ही त्याला जवळ घेऊन सांगितले , "बेटू , आपल्या घरात 3 माणसे आहेत किनई . आपले सगळ्यांचेच प्रेम आहे एकमेकांवर . मला तू पण आवडतोस , पपा पण आवडतात . आम्हाला दोघांनाही तू खूप आवडतोस , पण आम्हाला एकमेकांची पण काळजी घेतली पाहिजे किनई , आणि तुझी पण . तू पण आमची काळजी घेतली पाहिजेस . आपली तिघांची टीम आहे ना !"वगैरे, वगैरे.
मग एकदाचे त्याला ते पटले आणि तेव्हापासून तो शहाण्यासारखा वागायला लागला.

मग मुद्दाम काही दिवस त्याला न आवडणारेच कपडे त्याला रोज घातले , काही ना काहीतरी करणे सांगून.
मग काही दिवसांनी त्याला आवडणारेच कपडे , पण रोज तेच घातले . त्याचा वैताग वाढेपर्यंत हे चालूच ठेवले .

शेवटी तो वैतागला. म्हणाला, " अगं मम्मा , मला आवडतो हा ड्रेस , पण किती वेळा घालायचा तोच तोच ? आणि तो ड्रेस मला आवडत नाही , तरी तू घालतेस फक्त तुला आवडतो म्हणून ! पण मला नाही आवडत ना ! माझे मी घालतो ना मम्मा , मला हवे ते ! तू नको सांगू मला, जा तू... "

मग मी त्याला म्हटले, "मग तू पण तर मला सारखी साडी नेस म्हणतोस . आवडते मला साडी , पण रोज रोज सगळ्या कामात नाही जमत सावरायला ! तरी तू हट्ट करतोस मी साडी नेसावी म्हणून ! आणि मग आता मला आवडणारा ड्रेस तू स्वतः घालतो आहेस का ?
मग मला पण वाटतं ना , मला आवडतील ते कपडे घ्यावे, मला आवडतील ते कपडे घालावे , तू का नाही तेव्हा ऐकत माझे ? "

स्वयम जरा विचारात पडला . मग पटले त्याला . म्हणाला , "सॉरी मम्मा , यापुढे नाही म्हणणार मी तुला काही . कळली माझी चूक मला."
त्याच्या माऊला पण फोन करून सांगितले हे त्याने आणि तेव्हापासून नाही त्याने तसे केले पुन्हा कधी.
पण या दोन्ही गोष्टींसाठी सुरुवातीला बालिशपणा म्हणून आम्हीच दुर्लक्ष केले होते , अज्ञानापोटी त्याचे कौतुक केले गेले होते , ही गोष्ट विसरून चालणार नाही.

कळत नकळत आपल्याकडून घडलेल्या , ऐकलेल्या गोष्टींचा खुप खोलवर परिणाम मुलांवर होत असतो . आमच्या डोळ्यात अंजन घालणारा असाच एक प्रसंग .

स्वयम अभ्यासात तल्लख चित्रकला , नृत्यामध्ये हुशार , स्वभावाने शांत . त्यामुळे शाळेतही सर्वांचा लाडका आहे . एक दिवस दुपारी मला शाळेतून फोन आला , स्वयमच्या पोटात खूप दुखतेय . मी लगेच गेले आणि त्याला घरी घेऊन आले . घरी येऊन औषध दिले , तो ठीक झाला . फार काही सिरीयस वाटले नाही मला . दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवले , पुन्हा दुपारी तसाच फोन , पुन्हा मी जाऊन घेऊन आले , नीट तपासले , काहीच प्रॉब्लेम नाही वाटला , तरीही औषध दिले . शांत झाला स्वयम . तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच . पण मी त्याच्या बॅग मध्ये आज एक गोळी ठेवली होती , मॅडम ना सांगितले मी तसे. त्यांनी गोळी दिली , मी बोलले स्वयमशी मॅडमच्या फोन वर . थांबले पोटात दुखायचे .

चौथ्या दिवशी पुन्हा दुपारी रडायला लागला पोटात दुखतेय म्हणून . मॅडमच्या लक्षात आले , काहीतरी गडबड आहे . एवढा हुशार मुलगा , असे का करतोय ? त्यांनी जवळ घेऊन , प्रेमाने खोदूनखोदून विचारले , तेव्हा स्वयमने रडत रडत सांगितले , "माझी मम्मा मरणार आहे . "
मॅडम चक्रावल्या . त्यांनी मला फोन करून सांगितले , "अहो , तो असे असे म्हणतोय . "

मी तडक शाळेत गेले , जाताना विचार करतच होते , का म्हणत असेल असे स्वयम ? मला काहीच नाही कळाले , असा काही संदर्भ पण आठवेना .

त्याला घेऊन घरी परतताना मी त्याला विचारले , "मी नाही मरणार . तुला का वाटतेय असे ? कोण म्हणाले तुला असे? "
तर मुसमुसत म्हणाला , "तूच म्हणालीस ना पप्पांना ! "
मी दचकलेच . म्हटले , "मी म्हणाले ? कधी रे ? "
स्वयम म्हणाला , "त्यादिवशी नाही का तू रात्री पप्पाना म्हणालीस.. "
आणि रडायला लागला !
आत्ताशी माझ्या डोक्यात प्रकाश पडला .

झाले होते असे , माझे आणि अमितचे कडाक्याचे भांडण झाले होते ,स्वयम समोर भांडायचे नाही , या नियमामुळे तो झोपल्यानंतर चालू होते आमचे भांडण .

पण नेमके " वैतागलेय मी आता , एकदाचे मी मेले म्हणजे सगळे प्रश्न संपतील ," या माझ्या भरतवाक्यावर भांडण संपले , तेव्हाच हा जागा झाला होता. त्याने तेवढेच ऐकले होते . आणि त्याच्या मनात बसले होते बिचाऱ्याच्या.

मग त्याला समजावले . "अरे , नाही मरणार मी . रागाने तसे म्हणत होते मी पप्पाना . आणि मुळात असे आपण कुणी ठरवले म्हणून मरू शकतच नाही. देवाने जेवढे प्रत्येकाचे आयुष्य ठरवलेय , तेवढे जगावेच लागते आपल्याला . तू नाही का पाहिलेस महाभारत मध्ये , तो श्रीकृष्ण सांगतो किनई अर्जुनाला.. . (मनःपूर्वक धन्यवाद पौराणिक मालिकांचे. मला स्वयमच्या बाबतीत खूप मदत झालीय त्यांची. )स्वयमला आठवले ते सारे . पटले त्याला . आणि मग यथावकाश डोक्यातून गेले त्याच्या सारे . पण तेव्हापासून अजूनच काळजी घेऊ लागलो आम्ही बोलता - वागताना .

प्रत्येक पालक आपल्या मुलाला घडवण्यासाठी धडपडतात , चांगलेच संस्कार करतात . मूल त्याप्रमाणे घडले , तर त्यासारखा आनंद नाही . कृतकृत्य वाटते अगदी , जेव्हा आपल्या मुलाचे इतरांकडून कौतुक होते . पण या कौतुकाची नशा चढली तर ? आपण आदर्श पालक आहोत , अशी झिंग चढली तर ! विचित्र वाटतेय ना ऐकायला ? पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत असा प्रसंग घडला खरा .

:स्वयम पावणेदोन वर्षांचा असतानाची गोष्ट आहे . आमच्या दुधवाल्यांच्या मुलीचा - श्रावणीचा त्याच्यावर खूप जीव आहे . स्वयमच्याच्या वयाचा तिचा भाऊ आहे , त्याला सोडून ही रोज दुपारी स्वयमशी खेळायला घरी यायची . त्या दिवशी रविवार होता . शेजारची पण एक मुलगी त्याच्याशी खेळायला आली . चांगले खेळत होते तिघे . म्हणून मी वाचत बसले , अमित लॅपटॉप वर काहीतरी करत होता . थोड्या वेळाने ही शेजारची मुलगी मला म्हटली , "जाते मी घरी ".

मी "ok , bye bye ", म्हटले आणि दार लावले.
5 च मिनिटात तिचे आईवडील आम्हाला हाका मारत , स्वयमच्या नावाने ओरडत आले . ती मुलगी त्यांच्या पाठीमागे रडत रडत . आम्हाला काही कळेना .

ते स्वयम वर ओरडायला लागले ," का रे , तुला काही अक्कल आहे का ? नालायक, बदडायला पाहिजे चांगले . कसल्या सवयी लावल्यात पोराला.. "वगैरे , लिहिता न येण्यासारखं सुद्धा बरंच काही बोलले . आम्ही हतबुद्धच झालो .
विचारले , "अहो , काय झाले , का एवढे बोलताय? "
तर झाले होते असे , की स्वयम त्या मुलीला चावला होता खेळताना . पण ती ना तर ओरडली , ना तिने आम्हाला त्याबद्दल सांगितले . घरी गेल्यावर तिने आईवडिलांना सांगितले आणि ते डायरेक्ट आमच्याशी भांडायला आले होते . त्यांना वाटत होते , आमच्या देखत झाले हे आणि तरी आम्ही शांत राहिलो .

मी स्वयमला विचारले , "चावला का तू दीदीला? "
त्याने मान खाली घातली . मग मी तिचा हात पाहिला , दात उमटले होते स्वयमचे. मलम लावले त्यावर , औषधं दिली .
तरी इकडे त्या दोघांचे वाक्ताडन चालूच होते .
"सॉरी , माफ करा ", म्हणूनही ऐकत नव्हते.

"आमची काय चूक ? आम्ही सांगितले का त्याला चावायला ? तुमच्या मुलीने आम्हाला सांगितलेच नाही , तर कसे कळेल आम्हाला? "असे म्हणायला तोंड शिवशिवत होते , पण हिंमत नाही झाली त्यांचा तोफगोळा पाहून.

मला खूप अपमानास्पद वाटत होते . "कित्ती गुणी बाळ आहे ! कित्ती छान सवयी लावल्यात तुम्ही त्याला.. " या सगळ्या होणाऱ्या आमच्या कौतुकाला तडा गेला होता . आज अचानक आम्हाला मान खाली घालायला लावली होती स्वयमने .

मी सटासट 2-3 फटके मारले त्याला . City मध्ये राहणाऱ्या माझ्या मधल्या बहिणीला फोन केला , "तू आत्ताच्या आत्ता ये आणि स्वयमला घेऊन जा , हा बघ आत्ता दीदीला चावला , मला नको असलं बाळ . "असे सांगितले तिला . ती येते म्हणाली थोड्या वेळात . मी स्वयमची बॅग भरली . तेव्हा कुठे यांचे जरा समाधान झाले आणि मुलीला घेऊन बडबड करत ते गेले .स्वयम भेदरून आवाज न करता रडत होता . श्रावणी चिडीचूप होती एका कोपऱ्यात . अमित तिला तिच्या घरी सोडून आला .

थोड्या वेळात माझी बहीण आली, मघाशी फोन वर बोललेलेच dilogue पुन्हा बोलून मी स्वयमकडे प्रेमाने एक कटाक्ष सुद्धा न टाकता त्याला तिच्याबरोबर पाठवले . आईला फोन करून सगळे सविस्तर सांगितले आणि स्वयमला नीट जाणीव व्हावी स्वतः च्या चुकीची , म्हणून कठोरपणे तिकडे पाठवलेय, त्याला समजावून सांग , असे सांगितले . सुन्न मनाने नित्यकर्मे करत राहिलो दोघे .

संध्याकाळी श्रावणी बरोबर तिची आई आली . ती म्हणाली , श्रावणीने सांगितले आम्हाला , ती मुलगी सारखी स्वयमला जवळ घेत होती , त्याचे गाल ओढत होती , त्याच्या पप्प्या घेत होती . स्वयमने 2-3 वेळा तिला हाताने दूर ढकलले . तरीही ती ऐकेना , मग शेवटी तो चावला तिला .

मी श्रावणीला विचारले , "तू तेव्हाच का नाही सांगितलेस मला? "
श्रावणी म्हणाली , "ते काकाकाकू एवढे चिडले होते , मला भीती वाटली . "
थोडा वेळ आमच्याशी बोलून त्या दोघी गेल्या .

मग मला आठवले , खरेच या आधी पण असे कितीदा घडलेय , ती स्वयमला सतत जवळ घेत राहायची , त्याच्या गालांना हात लावायची सारखे आणि मग तो रडायचा . मी , अमितने पण 4-5 वेळा तिला समजून सांगितले होते , की त्याला नाही आवडत असे केलेले , तरी ती ऐकायचीच नाही .

मग मगाशी आपण एकदाही स्वयमला का नाही विचारले , की तू का चावलास दिदीला ? बाजू मांडायची संधीच न देता त्याला शिक्षा सुनावली आपण . बिचाऱ्याने स्वसंरक्षणासाठी केलेली कृती होती ती . आणि आपण मात्र...
बहिणीबरोबर घराबाहेर पडताना माझ्याकडे आशेने पाहणारा स्वयमचा चेहरा , त्याची जखमी नजर माझा पाठलाग करत राहिली . झोप नाही लागली रात्रभर . तळमळत, रडत राहिले . कशीबशी रात्र उजाडली . आयुष्यात पहिल्यांदाच तो मला सोडून रात्रभर राहणार होता . खूप रडला असेल का ? झोपला असेल ना ? प्रश्नांचे मोहोळ च उठलेले डोक्यात .

सकाळी लवकर उठून मी आईकडे पोचले . मी दिसताच स्वयम पळत येऊन मला बिलगला .
"मम्मा , सॉरी. आता मी कधीच नाही चावणार कुणाला ."

मीही रडत रडत त्याला म्हटले , "सॉरी , यापुढे नाही मारणार मी तुला . आणि कुणीच तुला त्रास नाही देणार हं यापुढे , मी लक्ष देईन . आणि तरीही कुणी दिलाच त्रास , तर मम्मापप्पाना सांगायचे हं , चावायचे नाही कुणाला , प्रॉमिस ? दीदीचे मम्मापप्पा कित्ती रागावले ना तुझ्या मम्मापप्पाना ,(तो होकारार्थी मान हलवत होता. ) चालेल का तुला असे? "

स्वयम माझे अश्रू पुसत म्हणाला , "तू नको रडू मम्मा , मी कधीच नाही चावणार यापुढे कुणाला , प्रॉमिस !"

मग आम्ही घरी परतलो . स्वयमला घेऊन तिच्या घरी गेलो , तिला कॅडबरी देऊन तो "सॉरी" म्हणाला .
तरीही त्यांनी त्या कारणावरून आमच्याशी संबंध तोडले ते तोडलेच .

त्यानंतर खरेच स्वयम पण कधी कुणाला चावला नाही , पण मलाही कायमसाठी धडा मिळाला .

नंतरची घटना आहे , स्वयम पाहिलीत असतानाची . सकाळी सकाळी कामांची माझी नुसती हातघाई चालू असायची. तोपर्यंत आम्ही opd च्याच गावात शिफ्ट झालो होतो . आता सकाळी 9 ते रात्री 9 असे opd timing ठेवले होते , ते आजही तसेच आहे. त्यामुळे 9 ला opd उघडायच्या आत सगळी कामे आवरायची माझी गडबड असायची . स्वयमला शाळेसाठी आवरून अमितबरोबर पाठवणे हे त्यातलेच एक . स्वयमला शाळेत सोडून मग अमित स्वतःच्या ऑफिस ला जाई.

स्वयमसाठी मी गजर लावलेला होता . गजर झाला , की त्याने पटकन उठावे , टाईमपास न करता पटापट सगळे आवरावे (शहाणा मुलगा होता ना तो !), चटकन नाश्ता करावा , बॅग घेऊन शाळेत निघावे , अशी माझी अपेक्षा असे . तो बेडरूम मध्ये आणि मी किचन मधून , अशी आमची जुगलबंदी चालू होई .

"स्वयम उठलास का , अरे, लोळत पडू नको , उठ अंथरुणातून , चल , उशिर होतोय , एकेक दात घासतोयस का , कित्ती वेळ लावतोस, अरे, खा ना पटापट , आता काय एकेक घास 320 वेळा चावणार आहेस का ? "इ. इ.

यातल्या कोणत्याही टप्प्याला त्याने वेळ लावला , की माझे टाइमटेबल कोलमडायचे . (आदर्श स्त्री व्हायचे होते ना मला ! सर्वांच्या नजरेत कौतुक झेलायची सवय लागलेली !) त्यामुळे त्याला वयानुरुपच्या नैसर्गिक लाडात येण्याच्या इच्छेची संधीही न देता मी वेळेत सर्व आटोपायचे , त्याने अळंटळं करण्याचा , रेंगाळण्याचा प्रयत्न केला , तर दुर्लक्ष करायचे . जाताना स्वयमची एक पप्पी घ्यायचे कर्तव्य केल्याप्रमाणे आणि बाय बाय म्हणून पाठवून द्यायचे.

एक दिवस नेहमीप्रमाणे त्याची पप्पी घ्यायला गेले , तर त्याने मान फिरवली . चेहरा फुरंगटलेला .
मी म्हटले, "असे नको करू ना रे , दिवसभर करमणार नाही मग मला. "
तरीही तो त्यादिवशी मला पप्पी न देताच निघून गेला पप्पांसोबत.

मी घरात आले . काहीबाही करत राहिले , पण खरेच कशात लक्ष लागेना . विचार करत बसले . आणि एका क्षणी चमकलेच . म्हटले, आपले नक्की काय चाललेय? आपण सगळे स्वतः ला हवे तसे , हव्या त्या पद्धतीने करतोय . स्वयम ची पप्पी घ्यायची , तीही आपल्याला हवी म्हणून !आज त्याने नाही दिली , तर किती लागले मनाला ! आणि रोज आपण तो उठल्यापासून त्याच्या मागे फक्त धावपळ करत असतो , साधे good morning म्हणून त्याला प्रेमाने उठवत नाही की त्याची झोप कशी झाली , काही स्वप्न पडले का , चौकशी करत नाही . त्याचे लाड करत नाही . साधे जवळ सुद्धा घेत नाही .

तो बालवाडीत असताना त्याला एकटे वाटू नये , मम्मा इथेच आहे, याचा विश्वास वाटावा, म्हणून माझी opd बंद ठेवून बालवाडीजवळच्या लायब्ररी मध्ये बसून राहायचे मी त्याची शाळा संपेपर्यंत . आणि आता तो पाहिलीत गेला, तर मी अचानक त्याला mature कशी समजायला लागले , त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा कशा करायला लागले , त्याच्या मनाचा विचारच कसा नाही आला मनात माझ्या , मला अपराधी वाटायला लागले.

एवढ्या दिवसांत का नाही लक्षात आले , माझेच मन मला खायला लागले. ते काही नाही, यापुढे असे नाही होणार . 5.30 ला उठते रोज , ती आता उद्यापासून 5 ला उठेन. पण माझा 1/2 तास फक्त स्वयमसाठी च हक्काचा ठेवेन . मी ठरवले आणि अमितला फोन केला .

त्याच्याशी बोलल्यावर तो म्हणाला , "गुड . मी सांगणारच होतो तुला . अग, साधे 2 मिनिट आमच्याशी बोलायला फुरसत नसते तुला . "

मी म्हणाले , "म्हणजे तुला कळत होते , मी चुकतेय , मग तू का नाही बोललास आधीच मला? "

तो म्हणाला , " तुझे तुझ्याच लक्षात येईल , याचा विश्वास होता मला . "
माझे डोळेच भरून आले .

संध्याकाळी स्वयमची शाळा सुटायच्या वेळी आम्हा दोघांनाही गेटजवळ उभे पाहून तो उड्याच मारायला लागला . मग त्याला पार्क मध्ये मनसोक्त खेळायला देऊन माझा पश्चाताप सेलेब्रेट केला आम्ही . पण तेव्हापासून आजपर्यंत कधीही पश्चातापाची वेळ येऊ दिली नाही स्वतः वर.

तर अशा या आमच्या चुका . या चुकांतून आम्ही बरेच शिकलो , तिघेही एकमेकांच्या जवळ आलो . घट्ट झाले आमचे नाते अजूनच . पावलोपावली परीक्षा देणे चालू आहे आणि असेच चालू राहील .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुका मान्य करून त्या प्रामाणिकपणे लेखात मांडणे खरचं कौतुकास्पद आहे.
नेहमीप्रमाणे छान लेख...

चांगला लेख!!
पहील्या अपत्याला बरेच सहन करावे लागते असे म्हणतात, कारण आईबाबा पण शिकत असतात Happy

मग मगाशी आपण एकदाही स्वयमला का नाही विचारले , >> मला पण हे अजिबात नाही पटले. दोन माणसे समोर असतांना एकाचीच बाजू ऐकून निर्णय घेतलात? किमान एकदा दुसर्‍याला त्याची बाजू, जी काही असेल, ती मांडू द्यावी ना!
मला पण रागच आलाय, आपले मूल कसे आहे, आपल्याला माहीत नसते का?

मुलांनी शहाणे बाळ व्हावे, पण मग आपण पण शहाणे आईबाबा नको का व्हायला?

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.

तुमचे अगदी खरे आहे विनिता. विचारायला हवी होती त्याची बाजू. पण एकतर पहिल्यांदाच असे झालेले, की त्याची कुणीतरी तक्रार केलेली... त्यामुळे आम्ही दोघे पण भांबावलो होतो.. अक्षरशः shocked होतो.
आणि दुसरे म्हणजे त्या मुलीच्या आईपपानी सुशिक्षित असूनसुद्धा एवढ्या वाईट शब्दांत भांडण केले ना, की आम्हाला दोघांनाही सुसंगत विचार करणे सुचलेच नाही.
त्यामुळे "का चावलास तू, हे विचारायचे खरेच डोक्यात नाही आले आमच्या. "

छान लिहलं आहे
पालक म्हणून अनेकदा आपल्याकडून नकळतपणे चुका होत असतात आणि आपण कामाचा स्ट्रेस, जबाबदारी असे बहाणे करून त्यावर पांघरूण घालत असतो
पण त्या छोट्या गोष्टींचा त्या छोट्या जीवावर किती खोलवर परीणाम होत असेल याची कल्पना करवत नाही

खरी गोष्ट आहे आशुचॅम्प. मुळात त्यांचे मन दुखावेल, त्यांचे पण काही मत असू शकेल , त्यांचे पण काही विचार चालू असतील डोक्यामध्ये, हेच ध्यानात येत नाही आपल्या.

नेहमीसारखं अगदी सहजपणे रोजच्या रोज घरात घडतंय असंच लिहलंय... नादिशा.
तुमच्या लेखातून मुलांशी कस बोलावं, कस वागावं खूप शिकण्यासारखं असत.
रोजचे आपले अनुभव शेअर करत असल्याबद्दल धन्यवाद

छानच संगोपन अनुभव. साग्रसंगीत लिहिले आहे. वाचताना नकळत बालपणातील आठवणी जागृत झाल्या. पहिला प्रसंग भारीच गमतीदार होता.

थँक्स अथेना. तुम्हाला खरेच आवडला असेल लेख, तर या आधीचे 6 किस्सेही वाचून पहा.आवडतील तुम्हाला आणि फायदेशीर ठरतील तुमच्या पालकत्वासाठी.
किस्सा 1-
https://www.maayboli.com/node/76195
किस्सा २-
https://www.maayboli.com/node/76297
किस्सा ३-
https://www.maayboli.com/node/76425
किस्सा ४ -
https://www.maayboli.com/node/76533
किस्सा ५ -
https://www.maayboli.com/node/76657
किस्सा ६ -
https://www.maayboli.com/node/76837

लहान मुलांच्या मेंदूची वाढ - माहिती असावे असे काही. https://www.maayboli.com/node/76764

शब्दांशी मैत्री
https://www.maayboli.com/node/76167

स्वयमला घेऊन तिच्या घरी गेलो , तिला कॅडबरी देऊन तो "सॉरी" म्हणाला . तरीही त्यांनी त्या कारणावरून आमच्याशी संबंध तोडले ते तोडलेच . >>>> तुम्ही त्या मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना मुलीची चूक सांगितलीत का? चावणं चुकीचच पण स्वयम नको सांगत असताना त्या मुलीने येऊन पाप्या घेत रहाणं हे ही तेव्हडच चुकीचं ना? तुम्ही वाईट वाटून घेतलत आणि मुलाला शिक्षा केलीत पण मुलीचं काय, तिच्या आई वडिलांना काहीच वाटलं नाही ह्याचं ?

बरोबर आहे पराग तुमचे. पण संवाद तेव्हाच होऊ शकतो ना, जेव्हा समोरचा माणूस आपले शांतपणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत असतो. त्यांना काही ऐकून घ्यायचेच नव्हते, पतिपत्नी दोघेही सुशिक्षित असूनही बोलण्याची भाषा पण समजूतदारीची नव्हती, भांडणाचा आणि आक्रस्ताळेपणाचाच सूर होता. "तुम्ही कसे लाडावून ठेवलेय त्याला.. etc "आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, की काल नेमके असे असे झाले होते, आम्हाला श्रावणीने सांगितले (ती 3rd पर्सन होती ना तिथे ), हवे तर तुम्ही तिला विचारा..पण त्यांच्या मुलीने काही केले असेल, तिचे काही चुकले असेल, हे त्यांना मान्य च नव्हते. आम्हाला आमच्या घरी तिने काही सांगितलेच नव्हते, हेच मुळात त्यांना पटत नव्हते. त्यांचे म्हणणे असे होते, की आमच्या डोळ्यासमोर सारे घडले, तरी आम्ही शांत बसलो आणि स्वतः च्या मुलाच्या चुका लपवायला कांगारावा करतोय, सारवासारव करतोय..

झोपलेल्या माणसाला जागे करू शकतो आपण, झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? शेवटी आम्ही नाद सोडून दिला समजावण्याचा.आणि अशा कोत्या मनाच्या माणसांनी स्वतः च संबंध तोडले, हे चांगलेच झाले, असे म्हणून शांत राहिलो.