पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा चार "मम्मा, कुणी मरते म्हणजे काय होते? "

Submitted by नादिशा on 4 September, 2020 - 00:38

आजची ही जनरेशन खूप हुशार आणि चौकस आहे , असा माझा सार्वत्रिक अनुभव आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे खूप बारीक लक्ष असते त्यांचे आणि खूप कुतूहल असते त्यांच्या नजरेत. मग ते शमवण्यासाठी मुले आपल्याला सतत प्रश्न विचारत राहतात.
मुले प्रश्न विचारतात, हे त्यांच्या हुशारीचे , त्यांची विचारप्रक्रिया सतत चालू असल्याचे द्योतक असते. पण त्यांच्या ह्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे पालकांची खरोखर कसोटी असते.
असाच आमची कसोटी पाहणारा हा किस्सा आहे.
स्वयम साडेतीन वर्षांचा असताना माझ्या आजेसासूबाई वारल्या . लांब असल्याने आम्ही लगेच अंत्यविधीला उपस्थित नाही राहू शकलो . मग दहावा , तेरावा वगैरे विधींसाठी आम्ही नाशिकला गेलो .
आमच्या फॅमिली मधल्या त्या सर्वात वयोवृद्ध होत्या, त्यामुळे सगळे नातेवाईक आवर्जून आलेले होते. हे घरी आलेले पाहुणे , घरात चाललेली चर्चा , दहाव्याचा - तेराव्याचा विधी सगळे स्वयम पाहत - ऐकत होता . त्याच्या चेहऱ्यावरून मला समजत होते , की याच्या मनात खूप सारे प्रश्न उमटत आहेत . तो आता त्याची प्रश्नमंजुषा चालू करणार , त्याच्या आतच मी त्याला समजावून सांगितले ," इथे सारखी पूजा चालू आहे किनई , आत्ता घरी खूप पाहुणे आहेत आणि मी पण सतत कामात असते , तू पाहतो आहेस किनई..इथली पूजा वगैरे झाली , की आपण जाणार आपल्या आपल्या घरी, तेव्हा तू मला विचार हं . "त्याला पटले आणि तो शांत बसला .
सगळे उरकून आम्ही घरी परतत असताना गाडीमध्येच स्वयमने प्रश्नांना सुरुवात केली . "आपण कशासाठी आलो होतो नाशिकला ? एवढे सगळे पाहुणे का आले होते ? आणि त्या नेहमी घरात असायच्या , त्या तुमच्या आजी मला दिसल्याच नाहीत . "
अमित म्हणाला, "अरे त्या पणजीआजी होत्या ना , त्या वारल्या . म्हणून तर आपण आलो होतो . त्यासाठीच इतर नातेवाईक पण आले होते . "
स्वयमने विचारले , "वारल्या म्हणजे? "
मी सांगितले , "वारल्या म्हणजे मरून गेल्या. "
स्वयम -"मम्मा , मरते म्हणजे काय होते? "
अमित -"अरे , माणसाच्या शरीरातून जीव निघून जातो . तो काही हलत नाही , बोलत नाही ,खातपीत नाही , काहीच नाही . "
स्वयम -"मग? "
मी -" नुसता पडून राहतो..एखाद्या वस्तूसारखा . "
स्वयम -"मग? "
अमित -"मग सगळे नातेवाईक येतात . आणि त्या मेलेल्या माणसाला घेऊन जातात . मग जाळून टाकतात ."
(कधीच कोणत्याच प्रश्नांची खोटी उत्तरे द्यायची नाहीत , थातुरमातुर काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची नाही . कारण त्याचे कुतूहल शमले नाही , तर तो दुसऱ्या कुणाला तरी विचारणार . आणि त्या व्यक्तीने जर चुकीचे काही सांगितले , तर मोठा गुंता होऊन बसतो . त्यामुळे नेहमी खरी उत्तरे द्यायची , प्रश्न आपल्याला कितीही अडचणीत आणणारा असला तरीही.. फक्त स्वयमला समजेल अशा भाषेत , असे आम्ही दोघांनी सुरुवातीलाच ठरवले होते आणि नेहमी तसेच वागायचो . आताही त्याला समजेल अशा पद्धतीने आम्ही त्याला सत्य सांगायचे ठरवले . )
स्वयम म्हणाला -"पण मग जाळल्यावर त्याला भाजत नाही का? "
अमित -"नाही , कारण त्यात जीवच नसतो ना.. आपण जर तुझी पट्टी जाळून टाकली , तर तिला दुखेल का? (स्वयम ने नकारार्थी मान हलवली. )मग तसेच पणजीआजीला पण नाही भाजले , नाही दुखले. "
स्वयम -"अच्छा ."
काही वेळात त्याचा पुढचा प्रश्न आला -"पण मग सगळे पाहुणे कशाला आले होते ? पूजा कसली होते तिथे ? "
मी -"अरे , असे काही झाले , की सगळे पाहुणे जमतात.. जो माणूस गेला , त्याच्या आठवणी काढतात , गप्पा मारतात . सगळे मिळून बाप्पाची पूजा करतात . "
स्वयम -"बाप्पाची का पूजा करायची ? "
अमित -"अरेv, आपल्याकडे असे समजतात , की माणूस मरतो म्हणजे बाप्पाकडे जातो . त्यामुळे तो माणूस व्यवस्थित देवाकडे पोचावा , म्हणून सगळे मिळून पूजा करतात . "
स्वयम -" एवढी सगळी पूजा? "
आम्ही -"हो , बरेच विधी असतात . तू आत्ता अजून छोटा आहेस , आत्ता नाही कळणार तुला त्यातले काही . "
एकदाचे प्रश्न संपले . आणि आम्ही हुश्श केले .

जवळजवळ तीन महिन्यांनी आमची मांजर, तिचे नाव स्वयमने " मंजिरी "ठेवले होते , तिला पहाटे कुत्र्यांनी पकडले . मी कुत्र्यांना हाकलायचा खूप प्रयत्न केला . पण चार कुत्र्यांनी एकदम हल्ला केला तिच्यावर , त्यामुळे मी नाही वाचवू शकले तिला . उठल्यानंतर अमित आणि स्वयमला सांगितले मी . सगळे मिळून खूप रडलो .
दुपारी काहीतरी कामासाठी आम्ही शहरात निघालो होतो . रस्त्यातच आम्हाला मंजिरी दिसली . अजूनही 2 कुत्री तिचे लचके तोडत होती . आम्ही कसेबसे रडू आवरले आणि पुढे निघून गेलो . स्वयम आम्हांला "थांबा, थांबा "करत होता , पण आम्ही दुर्लक्ष केले . मग त्याचे रडणेच चालू झाले . "पप्पा - मम्मा , तुम्ही का नाही थांबवली गाडी ? बघितली नाही का आपली मंजिरी ? तिला ते कुत्रे खात होते , तुम्ही का नाही हाकलले त्यांना ? मंजिरीला का नाही घेतले आपल्या? "
मी म्हटले, "अरे , मेली होती मंजिरी . आता तिला घरी नेऊन तरी काय करणार ? "
स्वयम -"अगं , ती कुठे मेली ? ती तर तिथेच होती ना.."
मी -"अरे , ती दिसली आपल्याला , पण ती मेलेली होती . आणि ती कुत्री खात होती ना तिला , आपल्याला जवळ पण नसते येऊ दिले त्यांनी , चावले असते , पण मंजिरीला नसते सोडले , म्हणून मग नाही हाकलले त्यांना . "
स्वयमने मात्र रडून गोंधळ घातला , "नाही तू वाईट आहेस . तू वाचवले नाही मंजिरीला . ती मेली नव्हती . ती तर तिथेच होती . "
अमित -"अरे स्वयम, पहाटेच तिला कुत्र्यांनी नेले , तेव्हाच तिला खायला चालू केले असणार कुत्र्यांनी , तेव्हाच ती मेली , आत्ता उरलेलं खायला दुसरे कुत्रे आले . "
पण स्वयम चे मात्र चालूच होते , "ती तिथेच होती , मेली नव्हती . "
अमित -"अरे , तुला दिसली, ती तिची बॉडी . तिचा जीव कधीच निघून गेला होता . "
स्वयम -"जीव म्हणजे काय असतो ? "
मी -"अरे , प्रत्येक माणसात , प्राण्यात जीव असतो . त्यामुळेच तो चालतो , आवाज काढतो , खातो , झोपतो . जेव्हा ते मरतात ना , तेव्हा जीव निघून जातो . बॉडी तशीच शिल्लक राहते नुसती . "
स्वयम -"जीव जातो म्हणजे ? जीव कसा जातो ? म्हणजे काय होते ? "
आता आली का पंचाईत ! आता काय उत्तर द्यायचे ? अमित आणि मी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने काही क्षण पाहत राहिलो . काही वेळ असाच गेला , स्वयम आशेने आमच्याकडे पाहत होता . तेवढ्यात माझी ट्यूब पेटली .
आमच्या सुदैवाने स्वयमला पौराणिक मालिका आवडायच्या . हनुमान , शनीमहाराज , ओम नमः शिवाय वगैरे तो आवडीने पाहायचा . त्यात नाही का , कुणी मेले , तर एक ज्योत अशी आकाशात जाताना दाखवतात , ती देवाकडे जाते , असे दाखवतात , ते मला आठवले . मी त्याची आठवण करून दिली स्वयमला . तो जरा विचारात पडला . मग थोड्या वेळाने म्हणाला , " असाच जीव जातो का सगळ्यांचा ? असेच मरते का कुणीपण..कुत्री , मांजरी , माणसं , पक्षी सगळे? "
आम्ही हो म्हणालो . स्वयमला ते पटले आणि मग आम्ही पुढे गेलो .

त्यानंतर जवळजवळ सात -आठ महिन्यांनी आमच्या शेजारचे आजोबा वारले . अमित अंत्यविधीला जाऊन आला . स्वयमने सगळी चौकशी केली , "कायकाय केलेb, जाळून टाकले का आजोबांना ? आपल्या पणजीआजीसारखी पूजा पण केली का ? "
अमितने होकार दिला .
स्वयम म्हणाला , "ममा , तू सकाळी एका पेशंटला सांगत होतीस , वय झाले , म्हणून ते आजोबा वारले . पणजीआजी आजारी होती , म्हनून वारली होती ना? मंजिरी कुत्र्याने खाल्ली होती म्हणून वारली . मग हे आजोबा वय झाले , म्हणून का वारले ? वय कसे होते ? "
मी म्हटले, "बेटा , वय झाले , म्हणजे खूप म्हातारे झाले. "
स्वयम -"बापरे ! म्हणजे खूप म्हातारे झाले , म्हणून पण मरतात?"
अमित -"हो . "
स्वयम -"असे का बरे ? "
मी -"अरे , देवबाप्पाने प्रत्येक माणसाला काम ठरवून दिलेले असते . ते करेपर्यंत म्हातारा होतो माणूस . मग देवबाप्पाकडे जातो , म्हणजेच मरतो ."
स्वयम -"म्हणजे सगळीच म्हातारी माणसे मरतात ? "
अमित -"हो . "
स्वयम -"म्हणजे बाबा पण मरणार ? आई पण मरणार ? नाना पण मरणार ? नानी पण मरणार ?" दोन्हीकडच्या आजीआजोबांची चौकशी केली त्याने . आम्ही होकारार्थी मान हलवत होतो दोघे . मग त्याला माहिती असणाऱ्या सर्व म्हाताऱ्या लोकांबद्दल चौकशी केली , आम्ही दोघे आपले "हो, हो "करतच होतो .
" मग "! किंचित थांबून स्वयम म्हणाला, "तुम्ही दोघे पण मरणार? "
आम्ही हो म्हणालो . मग खूप रडायला लागला . कशीबशी त्याची समजूत काढली आम्ही . "अरे , लगेच नाही काही मरणार आम्ही . पहिले तर माणूस जन्माला येतो , तेव्हा बघ छोटेसे बाळ असते . मग आपण मोठे होतो . शाळेत जातो , नोकरी करतो , मग लग्न होते , बाळ होते , मग ते बाळ शाळेत जाते, मोठे होऊन कमवायला लागते , तेव्हा हा माणूस म्हातारा होतो , त्यामुळे मग मरतो . "
अमित -"त्यामुळे आम्ही लगेच नाही मरणार . आताशी तर आमचे बाळ म्हणजे तू शाळेत जायला लागलेय . तू कमवायला लागशील , तुझे लग्न होईल , बाळ होईल तुला , तेव्हा आम्ही म्हातारे होऊ . जसे आता आई -बाबा -नाना -नानी झालेत . तेव्हा मग कधितरी मरू आम्ही . "
आता कुठे बाळराजेंची कळी खुलली . त्याचे बाळ म्हटल्यावर तर अस्सा गोड लाजला ! प्रश्नांच्या जंजाळातून आमची सुटका झाल्याने आम्हीही खुश झालो .

त्यानंतर पुन्हा 4-5महिने उलटले . दिवाळी दोन दिवसांवर आली होती . मंजिरी गेल्यावर आम्ही दुसरी मांजर आणली होती , ती काळी होतीn, म्हणून तिचे नाव आम्ही "निशा "ठेवले होते . तिला महिन्यापूर्वीच दोन छान गोंडस पिल्ले झाली होती . त्याच दरम्यान एक दिवस ती बाहेर गेली , काही वेळाने परत आली . आणि साधारण 2तासानंतर तिला उलट्या चालू झाल्या . आम्ही तर तिचे बाळंतपण झालेय म्हणून उलट नेहमीपेक्षा जास्तच लाड करत होतो . पण बहुतेक बाहेर जाऊन ती काहीतरी खाऊन आली असावी , त्यामुळे उलट्या करतेय , असा मी विचार केला . अमितला फोन केल्यावर तो लगेच ऑफिस मधून आला . इथले प्राण्यांचे सरकारी हॉस्पिटल खूप चांगले आहे . आम्ही निशाला घेऊन तिथे गेलो . डॉक्टरांनी तिला तपासले , बहुतेक काहीतरी विषारी खाल्ले असावे , असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. 1 इंजेक्शन दिले , औषधे दिली . आम्ही घरी परतलो . रात्री निशाला ताप भरला . अक्षरशः भाजत होते तिचे अंग . तशातही ती पिल्लांना दूध पाजत होती . मी तिच्या डॉक्टरना फोन केला+, त्यांच्या सल्ल्याने औषध दिले आणि तिला थोडे थोडे ors पाजत कशीबशी रात्र उजाडली . सकाळी परत तिला हॉस्पिटलला नेले . डॉक्टरांनी तिला सलाईन लावले , पुन्हा 2 इंजेकशन्स दिली . थोडीफार तरतरी आली तिला . आम्ही घरी आलो . पिल्लांना प्रेमाने चाटले तिने , त्यांचे लाड केले , दूध पाजले . ह्या सगळ्या वेळी स्वयम आमच्या बरोबर होताच . निशा जरा ok आहे, हे पाहून आमच्या जीवात जीव आला . मग तिला बेडरूम मध्ये पिल्लांसोबत सोडून , बोका येऊ नये , म्हणून दार लावून घेऊन आम्ही किचन मध्ये आलो . रात्रीपासून खाण्यापिण्यात तिघांचेही लक्ष नव्हते , आता जरा व्यवस्थित जेवलो , थोडा टीव्ही पाहिला . 2तासांनी बेडरूम मध्ये गेलो . पाहतो , तर निशा मरण पावली होती . पिल्ले बिचारी तिला चाटत होती , केविलवाणी म्याऊ म्याऊ करत होती ,त्यांना कळत नव्हते , ही उठत का नाहीये ? पण निशाचे हातपाय ताठले होते , डोळ्यातून जीव गेला होता . अमित आणि मी दोघेही रडायला लागलो . रडतच अमित बागेमध्ये खड्डा करायला गेला . मी कपाटातून नवीन कपडा काढला निशाला गुंडाळायला . स्वयम सारे पाहत होता , त्याने निशाला हलवून पहिले , ती उठली नाही . हाका मारल्या , तरी तिने मान वळवली नाही . तिचे हातपाय लाकडासारखे ताठ झाले आहेत , हे त्याने स्पर्श करून स्वतः पहिले . त्याने मला एकही प्रश्न विचारला नाही आणि मी त्याचे जे चालू होते , ते पाहत होते , तरी मीही काही बोलले नाही , काही विचारले नाही त्याला .मी निशाला नवीन कपड्यांत गुंडाळले , अमितने केलेल्या खड्ड्यात पुरले , मीठ टाकले , फुले वाहिली , त्यावर एक झाड लावले . आमच्याबरोबर रडत रडत सगळे काही तो चुपचाप पाहत होता .
सगळे पार पडल्यावर आम्ही घरात आलो .पिल्ले पायाशी आली , त्यांना कुशीत घेऊन खुर्चीवर चुपचाप बसून राहिलो . तेव्हा स्वयम मला येऊन बिलगला , म्हणाला, "मम्मा , आत्ताशी मला समजलं , कुणी मरतें म्हणजे नक्की काय होते?"
आम्ही दोघे अवाकच झालो हे ऐकून , म्हणजे याच्या डोक्यात हे अजूनपर्यंत चालूच होते? पहिल्यांदा भानावर आला, तो अमित .त्याने विचारले , "काय कळाले बेटा तुला? "
स्वयम -"निशा तर आपल्या घरात होती , पण नुसती बॉडी होती तिची तिथे , जीव नव्हता , म्हणून तर ती हलत नव्हती , बोलत नव्हती , समोर तिचा खाऊ असूनही खात नव्हती . डोळे उघडे होते तिचे , पण तिची पिल्ले दिसत नव्हती तिला , म्हणजे जीव गेला होता तिचा बाप्पाकडे . "
आम्ही दोघेही एकदमच म्हणालो, "बरोब्बर . "
स्वयम -"मग त्या नुसत्या बॉडी चा काय उपयोग ? नुसते लाकडासारखे ताठ झाले होते ते . पण मग तुम्ही तिला जाळले का नाही ? पुरले का बरे ? "
अमित -"अरे , तशीच पद्धत आहे , माणसांना जाळतात, प्राण्यांना पुरतात जमिनीत . "
स्वयम -"मग निशाच्या बॉडी चे काय होईल? "
मी -"अरे , आपण मीठ टाकले होते किनई , मातीने झाकून पण टाकले . आता तीची बॉडी पण हळूहळू मातीच होऊन जाईल . आणि आपल्या बागेला खत होईल तिचे . आपण एक झाड पण लावले किनई त्या जागेवर , ते उगवून मोठे होईल , तेव्हा आपल्याला आठवण होत राहील आपल्या निशाची . "
स्वयम गंभीरपणे आम्हाला म्हणाला -" आत्ताशी मला नीट कळाले , कुणीपण मरते म्हणजे काय होते !"
निशा गेली , आम्ही त्या वर्षी दिवाळी केलीच नाही , पण जाताना स्वयमच्या मनातील प्रश्नांचे कायमसाठी समाधान करून गेली .
पण जवळजवळ दीड - दोन वर्षे स्वयमच्या मनात हा विषय घोळत होता . आमच्या उत्तरांनी काही काळापुरते त्याचे समाधान व्हायचे , त्यावर पडदा टाकल्यासारखे व्हायचे , पण आतमध्ये त्याची विचारप्रक्रिया चालूच होती , याचेच हे द्योतक होते . आमच्यासाठी मोठीच परीक्षा होती ती , पण आम्ही खुप शांतपणे , धीराने परिस्थिती हाताळली आणि एकदाचा आमच्या घरातला "यक्षप्रश्न "सुटला .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!!!
मुलीला वाचायला देतोय.

Happy
छान लेख.
सिनेमे बघून माझ्या मुलाला वाटायचे कि कुणी मेले कि परत जरा वेळाने उठतो.

खूप छान लिहिलंय
उत्तरे ही फारच सोपी पण खरी दिलीत हे आवडलं

त्याचे बाळ म्हटल्यावर तर अस्सा गोड लाजला ! >>>>
नशीब, बाळ कसे होते वगैरे नाही विचारले.

धन्यवाद सर्वांना. अहो विक्षिप्त -मुलगा, विचारले होते ना तेही, त्या वेळी नाही, पण नंतर एकदा. त्या अनुषंगाने पण खूप प्रश्न विचारले होते. तेव्हाही आम्ही चांगली उत्तरे दिली (आमच्या मते )आणि योग्य प्रकारे आणि वेळीच त्याचे कुतूहल शमवले. पण त्या विषयावर लिहू की नको या platform वर, रुचेल का लोकांना याबद्द्ल confuse आहे मी.

Mazzya 4 varchya muline same prashne vicharale ani ajunahi ticha samadhan zal nahiye.....pan khar u tyana kaltil ashi khali utter den phar aavgad aset....

धन्यवाद रूपाली विशे -पाटील.
Jollyjui, खरे आहे. आपल्या बुद्धीला खुराक असतो त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे. कायम alert राहावे लागते.

छान लिहिलेय आणि छान समजावले तुम्ही. हे मरणाचे समजावणे खरेच अवघड असते. मुलांच्या डोक्यात चुकीचेही राहायला नको आणि खरे सांगितले तर भितीही राहायला नको. ट्रिकी सिच्युएशन असते.. त्यात कोणते मूल कसा विचार करेल हे जगात कोणीही सांगू शकत नाही.

माझी पोरगी चार वर्षांची असताना तिच्या डोक्यात असेच मरणाचे विचार शिरलेले ते या निमित्ताने आठवले ते कॉपी पेस्ट करतो.

_____________
२२ सप्टेंबर २०१८

त्यादिवशी मी आणि परीची मम्मा, असेच आम्हा दोघांचे बोलणे चालू होते. विषय सहज मरणाचा निघाला. मम्मा म्हणाली, हल्ली आयुष्याचा काही भरवसा राहिला नाही. पण मला या पोरांची लग्ने व्हायच्या आत तरी मरायचे नाही... आणि अचानक शेजारी मोबाईल घेऊन बसलेली परी मोठमोठ्याने रडायला लागली. मम्मा तू मरणाssर ....

अग्ग मस्करी केली असे म्हणून आम्ही तिची समजूत काढली आणि विषय न वाढवता तिथेच थांबवून तिला गप्प केले. उगाच पोरीच्या डोक्यात काही राहायला नको. पण रात्री झोपल्यावरही अध्येमध्ये स्वप्नात दचकून उठत होती.
दुसरया दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा मम्माकडे येऊन म्हणाली, मम्मा माझे लग्न झाल्यावर तू मरणार ... आणि पुन्हा रडायला लागली.

तिचे मरणाचे कन्सेप्ट चेक करावे म्हणून विचारले, परी मरणे म्हणजे काय?
परी - "म्हणजे झोपून जातात.."
मम्मा - "मग ठिक आहे ना, झोपतातच ना.."
परी - "हो पण त्यात झोपले की ऊठत नाहीत.." आणि पुन्हा रडायला लागली.

मम्मा - "अग परी असे कोणी कधीही मरत नाहीत. म्हातारे झाल्यावर मरतात.."

परी - "मग आज्जी म्हातारी आहे ना.." आणि पुन्हा रडायला लागली.

गेले दोन दिवस तिच्या डोक्यात हेच बसलेय. आपले लग्न झाले की मम्मा मरणार..

पोरांना लैंगिक शिक्षण आणि गूड टच, बॅड टच शिकवणे एकवेळ सोपे आहे. पण आईबाप आयुष्यभर पुरत नाहीत आणि एक दिवस आपल्या सर्वांनाच मरायचे आहे हे समजावणे अवघड ! Sad

_________________

खरे आहे ऋन्मे ssष. आमच्या बाबतीत सांगायचे तर मरणाची अपरिहार्यता आम्ही त्याला समजावून सांगितली.. आमची टेरेस गार्डन छान आहे. आम्ही त्यातली फुले दाखवली. फुले कशी आधी कळी, मग फूल, मग गळून जाते. उद्या पुन्हा दुसरे फूल येते. झाडाची पाने पण आधी एवढीशी, मग मोठी होतात, मग पिकून गळून पडतात, पुन्हा नवीन पाने येतात झाडाला. म्हणजे काहीतरी संपते, तेव्हाच काहीतरी नवीन येते. तसेच माणसांचेही असते. प्रत्येकालाच मरावे लागते. म्हातारी माणसे मरतात, मग त्याच घरात बाळे जन्माला येतात. त्याला आजोबा नाहीयेत. मग त्याला तेही सांगितले, बघ आजोबा वारले, मग तू बाळ म्हणून आमच्या घरात आलास.
आमच्या सुदैवाने त्याला पौराणिक सिरिअल्स खूप आवडतात. (वरती पण सांगितले आहे मी )त्यांमध्ये देव असे बोलत असतात, प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. सगळ्यांना मृत्यू येतोच, कुणीच अमर नाहीये, etc. त्याची आठवण करून दिली त्याला. आम्ही जे उदाहरणे देऊन सांगितले होते, त्याला दुजोरा मिळाला बाप्पाच्या बोलण्यामुळे.
मग त्याला म्हटले, असे जर झाले नसते, तर झाडावर कित्ती पाने राहिली असती...जुनी पण, नवी पण.. कित्ती फुले.. जुनी पण.. नवी पण... तशीच घरातली पूर्वीपासूनची सगळीच माणसे असतील, खापर खापर पणजोबा-आजी , खापर पणजोबा-आजी , पणजोबा-आजी , आजोबा-आजी , पप्पा -मम्मा , बाळ... पुढे त्याची बायको, त्याचे बाळ... अशी कित्ती माणसे असली असती मग प्रत्येक घरात.. ! कल्पना करून पहिली. आणि मग स्वयम, मी, त्याचे पप्पा, सर्वांनाच हसू आले.
आणि त्याला मृत्यू म्हणजे काय -त्याची अपरिहार्यता कायमसाठी पटली.

आमची निशा

66f8d341-59a1-4cd5-af27-de0da2fa0ab3.jpg

तिची 2 पिल्ले

f7c90b5b-c226-48aa-b532-d7f8a06da734.jpg

हे अगदी चित्त्यासारखे दिसायचे.

d09f271b-f166-44cd-9650-de2e30c396cb.jpg

हे रंगाने जरा जास्त काळे होते, ते बिलकुल निशाला सोडायचे नाही.

माझी लेक ३ वर्शाची असताना, एकदा डे केअर मधून आल्या वर मला विचारली, "मम्मा, तू कधी मरणारेस?" मी सागीतलं की माझा इतक्यात तरी काही प्लान नहिये. मग म्हणाली, तू लहान असताना एकदा मेलि होतिस ना? तुला खुप खुप bandaids लावले होते. डोरा वाले नाही white वाले आणि round round केलं होतं. (हे with action स्वतः भोवती गोल गोल फिरत)

मी आवाक . नन्तर DayCare चा Dailey report पाहिल्या वर कळल की ते Visit to Egypt करत होते. mummy....

नादिशा, discovery वर Egypt ची documentry लावली. तीला फार काही कळल नाही तरी ती mummyआणि ही,वेगळ्या आहेत एवढ कळल.

थँक्स शिरीन माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. . एक अभ्यासू पालक म्हणून मला मनापासून जाणून घ्यायला आवडते मुलांच्या पेचात पकडणाऱ्या प्रश्नांना पालकांनी काय काय उत्तरे दिली ते !कारण आपल्या बुद्धीचा खूप कस लागतो त्यांना पटतील अशी उत्तरे देण्यात.

नादिशा,
(कधीच कोणत्याच प्रश्नांची खोटी उत्तरे द्यायची नाहीत , थातुरमातुर काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची नाही . कारण त्याचे कुतूहल शमले नाही , तर तो दुसऱ्या कुणाला तरी विचारणार . आणि त्या व्यक्तीने जर चुकीचे काही सांगितले , तर मोठा गुंता होऊन बसतो . त्यामुळे नेहमी खरी उत्तरे द्यायची , प्रश्न आपल्याला कितीही अडचणीत आणणारा असला तरीही.. फक्त स्वयमला समजेल अशा भाषेत , असे आम्ही दोघांनी सुरुवातीलाच ठरवले होते आणि नेहमी तसेच वागायचो . आताही त्याला समजेल अशा पद्धतीने आम्ही त्याला सत्य सांगायचे ठरवले . )

तुम्ही वर जे लिहिलय ते बरोबर आहे.
पण काही प्रश्नांची उत्तरे कशी खरी देणार, जरी त्यांना समजेल असे सांगायचे असले तरीही..
उदाहरणार्थ:-
माझा मुलगा,जाहिराती बघून, मला नेहमी विचारतो तु व्हिसपर का आणतेस? समाधानकारक उत्तर मला अजूनही देता आले नाहीए.मी त्या प्रश्नाला टाळते.
कुणी फेस केलाय का असा प्रश्न लहान मुलांकडून?

हो mrunali. आमच्या स्वयम ने विचारला होता हा प्रश्न.
एकदा T V वर जाहिरात चालू होती, school मधल्या मुली आहेत आणि सॅनिटरी नॅपकिन्स मुळे आरामात खेळतात -वावरतात, अशी काहीतरी. तो त्याच्या पप्पाना म्हणाला, "पप्पा, एवढ्या मोठ्या मुली झाल्यात. आणि बघा, तरी त्या पॅम्पर घालतात. "खूप हसू आले होते त्याला. आम्हाला पण हसू आले ते पाहून आणि बरे वाटले, की प्रश्न नाही विचारला काही.
पण नेहमीसारखा त्याच्या डोक्यात मात्र हा विषय होताच. काही दिवसांनी काहीतरी डान्स वगैरे करणाऱ्या मुलीची जाहिरात लागली. मग मात्र त्याने विचारलेच पप्पाना, "का लागते या मोठ्या मुलींना पॅम्पर, सांगा ना पप्पा. "(मी तेव्हा opd मध्ये होते, घरातच opd असल्याने मला ऐकू येत होता, त्यांचा संवाद. मला सुटल्यासारखे वाटत होते, की नव्हते सापडले स्वयमच्या तावडीत. माझी सुटका झाली होती या प्रश्नाचे उत्तर देण्यातून. आणि मी धडधडत्या छातीने ऐकत होते, की आता अमित काय उत्तर देतोय !
वाचताना हसू येईल सर्वांना, पण माझ्या हुशार नवऱ्याने स्वयम पॅम्पर म्हणालाय सॅनिटरी पॅड ला, या गोष्टीचा फायदा घेऊन त्या वेळेपुरते तरी स्वयमचे समाधान होईल, असे उत्तर दिले.
अमित म्हणाला, "आपण जेव्हा कुठे बाहेर जातो, तेव्हा रस्त्याच्या कडेला कधीकधी जेन्टस शू करायला उभे असलेले दिसतात किनई आपल्याला.. "स्वयम म्हणाला, "हो. "
अमित -"तशा तुला कधी लेडीज रस्त्याला शू करताना दिसल्यात का?
स्वयमला हसू आले, तो म्हणाला -"नाही. "
अमित -"जेन्टस ना शू करायला पण urinals असतात किनई कुठे कुठे रस्त्याने, तसे लेडीज साठी असतात का? "
स्वयम -"नाही. "
अमित -"मग बिचाऱ्या लेडीज नी काय करायचे त्यांना शू लागली तर ! म्हणून त्यांच्यासाठी असतात ते पॅम्पर. "
स्वयम -" अच्छा , म्हणून असतात का ते मोठ्या मुलींचे पॅम्पर? "
अमित -"हो. "
स्वयमचे समाधान झाले.
पण दुर्दैवाने लपवून ठेवलेले असूनही एक दिवस कपाटात ठेवलेले पॅड स्वयम ला दिसलेच आणि मग त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला. "मम्मा, तू तर घरीच असतेस. मग तू कशाला आणलेय हे पॅम्पर?तुला कशाला लागणार आहे? "
मी मग अमितचेच उत्तर पुढे continue केले. म्हटले, "बरोबर आहे तुझे. मी घरीच असते. पण आपण कधी कुठे बाहेरगावी गेलो, outing ला गेलो, तर गरज पडू शकते ना मला पॅम्पर ची. आणि मग तेव्हा दुकान उघडे असेल /नसेल, आपण पहाटे पण जातो ना कधीकधी, मग तेव्हा गडबड नको, म्हणून आपले खरेदी करून ठेवलेय आधीच. "
स्वयम -"म्हणजे नेहमीच तू आणून ठेवतेस का घरी आधीच?"
मी म्हटले, "हो. नेहमीच आणून ठेवते, जसे आपण बाकीचे कपडे , साबण , पावडर वगैरे घरी आणून ठेवलेले असतात ना, तसे !"
हे पटले त्याला आणि त्यानंतर 2-2.5 वर्षे होऊन गेली, तो प्रश्न त्याने परत कधीही कुणालाही विचारला नाहीये, म्हणजे त्याचे पूर्ण समाधान झाले आहे.

पण सॅनिटरी पॅडचा उपयोग पॅम्परसारखा करतात हे उत्तर तात्पुरतं झालं ना?

दहा वर्षांच्या माझ्या मुलाला, मी त्याला कळेल आणि त्याच्या शंकेचे समाधान होईल अशा प्रकारे मासिक पाळी या गोष्टीबद्दल सांंगितलं. शिवाय त्यांना शाळेतही एका टीचरने सांगितलं होतं याचाही उपयोग झाला.

हो वावे. तात्पुरते च उत्तर होते ते. पण तेव्हा तो पाहिलीत होता. एवढ्या छोट्या मुलाला कसे सांगणार खरे कारण? सांगूनही त्याला नीट समजेल, याची खात्री नाही. पण प्रश्नाचे उत्तर तर द्यावेच लागणार होते, तेही त्याचे समाधान होण्यासारखे. नाहीतर जोवर उत्तर मिळत नाही, तोवर मुलांच्या डोक्यातून तो विषय जात नाही आणि आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायची टाळाटाळ करतोय, हे एकदा लक्षात आले, की मुले जणू हट्टालाच पेटतात, दुसऱ्या कुणाला तरी विचारत बसतात, ह्याचाही अनुभव होता शेजाऱ्यांच्या मुलांमुळे. पालकांची फजिती होते चारचौघात त्यांनी असे काही विचारले तर.
त्यामुळे मग स्वयम ने च पॅड ला पॅम्पर समजले होते, तर त्याच अनुषंगाने त्याला पटण्यासारखी उत्तरे दिली. आणि ती हास्यास्पद नाही, तर गरजेची गोष्ट आहे, हे पटवण्यात यशस्वी झालो.
जेव्हा कळण्याच्या वयाचा होईल, तेव्हा त्याला सगळे नीट सांगूच.

माझ्या लेकीनेही विचारलं होतं मागच्या वर्षी हे काय आहे म्हणून. तेव्हा मीही तिला हे माझे डायपर्स आहेत तुझ्यासारखे , असं सांगितलं. पहिल्या वेळेस तिने रात्री पाहिलेले, त्यामुळे रात्री शू आली तर उठायला नको म्हणून मी लावते असं सांगितलं होतं. ते पटलं तिला. आता तिचं कुतूहल शमल्यामुळे फार प्रश्न नाही विचारत ती.

बरोबर आहे माऊमैया. मुलांचे वय आणि समज पाहून शक्य तेवढे खरे आणि शास्त्रीय भाषेत उत्तर द्यायचे, चांगल्या पद्धतीने आपणच त्यांचे कुतूहल शमवायचे, हे महत्वाचे !

नादिशा... खूपच सुंदर लेख. प्रत्येक पालकांनी वाचून मुलाना त्यांच्या वयानुसार समजेल असं कास समजावून सांगायला पाहिजे फार छान रीत्या सांगितलेलं आहे.

Pages