पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा एक

Submitted by नादिशा on 24 August, 2020 - 00:28

मुलांचे भाव विश्व इतके निरागस असते ना, अगदी पारदर्शक.. आपण कल्पनाही नाही करू शकत त्याबद्दल. आपल्याला कल्पना नसते, जाणीव नसते, पण त्यांचे आपल्या बोलण्याकडे, वर्तणुकीकडे खूप बारकाईने लक्ष असते. त्यावर त्यांच्या चिमुकल्या मेंदूत काही विचारमंथन पण चालू असते.

मला सुरुवातीपासूनच खूप आवड होती मुलीची.माझ्या पतीचे असे काही नव्हते. आम्ही दोघांनी ठरवले होते, की आपण एकच चान्स घ्यायचा, एकालाच आपण व्यवस्थित आपला वेळ, पैसा, संस्कार देऊ शकतो.आपले होणारे बाळ शारीरिक -मानसिकदृष्ट्या निरोगी असावे, एवढीच प्रार्थना करायची देवाला.जे काही देवाने आपल्यासाठी योजले असेल, त्याचा आदर करायचा. मुलगा/मुलगी, जे काही तो पदरात टाकेल आपल्या, त्याचा प्रेमाने सांभाळ करायचा.

पण मनातून मात्र मला मुलगी हवी होती. नेमका मुलगा झाला. एक दिवसभर मन खट्टू झाले.पण नंतर आम्ही दोघे त्याला वाढवण्यात रमून गेलो.

एक वर्षाचा होईपर्यंत स्वयम ला(आमच्या मुलाला )मुलींचे वेगवेगळे कपडे घालून, फोटो काढून आमची हौस भागवण्याचा प्रयत्न केला. बहिणींच्या, मैत्रिणींच्या, आजूबाजूच्या मुलींचे लाड करून माझी मुलीची आवड भागवण्याचा -दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न आज पण करते.

माझा दवाखाना खेडेगावात आहे. इथे आजही आपल्याला मुलगाच हवा, असा हट्ट असतो लोकांचा. त्यापायी मुलगा होईपर्यंत गरोदरपणे लादली जातात स्त्रियांवर. कित्येकदा परिस्थिती नसल्याने पौष्टिक आहार, वेळेवर औषधे, बाळंतपणानंतर आराम, यातले काहीही मिळत नाही आणि स्त्रियांचे खूप हाल होतात.गेली सतारा वर्षे मी हे अनुभवते आहे आणि व्यथित होते आहे . अशा जोडप्यांना समजावताना मी माझे स्वतः चे उदाहरण सांगायचे.मोजकीच पण निरोगी बाळे त्यांनी जन्माला घालावीत, यासाठी त्यांना मानवण्याचा प्रयत्न करायचे. घरातच दवाखाना असल्याने स्वयम त्यावेळी आजूबाजूलाच खेळत असायचा, तो हे सर्व ऐकत असायचा.

मी सहज बोलता बोलता मैत्रिणींशी वगैरे ही मी असे सर्व शेअर करायचे.तेव्हाही तो जवळपास असायचाच. पण या सगळ्यावर तो काही विचार करत असेल, असे माझ्या गावीही नव्हते कधी.

स्वयम साडेचार -पाच वर्षांचा असतानाचा हा किस्सा आहे. त्याने काहीतरी मला आणायला सांगितले होते आणि मी विसरले होते. घरी आल्यावर त्याला मी सॉरी म्हटले त्यासाठी. तेव्हा तो फटकन मला म्हणाला -"जाऊदे मम्मा, नाहीतरी मी तुला आवडतच नाही ना.. "

त्याचे हे शब्द ऐकून मी चमकलेच.बसलेल्या धक्क्यातून कसेबसे स्वतः ला सावरून मी त्याला म्हटले "का रे, असे का म्हणतोस?"

तो हिरमुसल्या चेहऱ्याने म्हणाला "तुला मुलगी हवी होती ना, मी नको होतो, माहिते मला."
मी म्हटले, "तुला कुणी सांगितले हे? "स्वयम म्हणाला, "मला माहित आहे, तूच सांगत असतेस ना कुणाला फोन वर, नाहीतर तुझ्या पेशंट ना.. "

बापरे !मी मैत्रिणींशी बोलताना सहज शेअर केलेल्या मनातील भावना, पेशंटना त्यांच्या चुकीच्या हट्टापासून परावृत्त करण्यासाठी स्वतः चे दिलेले उदाहरण याचा माझ्या निरागस लेकाने असा अर्थ काढला होता !!किती दिवसापासून चालू आहे हे त्याच्या मनात, आपल्या कधीच कसे लक्षात नाही आले हे, माझे मन मला धिक्कारू लागले.

पण क्षणात स्वतः ला सावरून मी स्वयम ला जवळ घेतले आणि समजवायला लागले. "हो, बरोबर, मी सांगत असते असे. तू ऐकलेस, ते खरे आहे. मला आवडते मुलगी, कारण कित्ती वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे असतात मुलींचे !बांगड्या, केसातले बेल्ट, क्लिप्स, रबरबँड , कानातले, गळ्यातले, कित्ती विविधता असते मुलींसाठी. खूप छान नटवता येते त्यांना... तू पाहतोस ना आपल्या चार्वीला, (माझ्या बहिणीची मुलगी )ती कशी प्रत्येक सणाला वेगवेगळी नटलेली असते, केसांची वेगवेगळी स्टाईल करते !तसे मुलांना काही असते का? कपडे पण पॅन्ट शर्ट, कुर्ता पायजमा, धोती, असे ठराविक च असतात. बरोबर ना? म्हणून मला आवडायची मुलगी. पण आता तू आला आहेस आमचा बाळ, तर मग आपण या बाकीच्या मुलींनाच नाही का मेहंदी, नेलपेंट, बांगड्या, कानातले काही काही देत असतो, माहिती आहे किनई तुला पण? "त्याने मान हलवली. त्याचा चेहरा विचारमग्न होता.

मी पुढे बोलू लागले, "आणि हे बघ, देवबाप्पाने तुला आमच्यासाठी बाळ म्हणून निवडले आहे किनई. मग आता तू मुलगा आहेस - स्वयम. पण जरी आम्हाला मुलगी झाली असती, तरी तूच असला असतास ना तिच्या रूपात , फक्त नाव असले असते - स्वानंदी . कारण मुलगा असो किंवा मुलगी, आतले बाळ तर तूच असतास ना आमचा.आपली फॅमिली तर हीच राहिली असते, जशी आत्ता आहे -तू, मी आणि पप्पा. "

आता मात्र त्याला खुद्कन हसू आले, एकदम घट्ट मिठी मारली त्याने मला. त्याच्या मनातले मळभ दूर झाले होते.माझ्या जीवात जीव आला. मात्र फार मोठा धडा मिळाला होता मला, अनावधानाने त्याच्या समोर काहीही बोलायचे नाही.त्याच्या भावविश्वाला तडा जाऊ द्यायचा नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
मुलं मनाला लावून घेतात आणि शेवापर्यन्त विसरत नाहीत, वेळीच बोललात हे बरे झाले Happy

कोणाचाही एकाचा अट्टाहास वाईटच. मुलगाच हवा न् मुलगीच हवी ह्या दोन्हीतील ‘च’ टाळावेच शक्यतो.आवड, आग्रह असू शकतो अर्थातच.

धन्यवाद !
अशा चौकसबुद्धी असणाऱ्या मुलाला डोळसपणे वाढवणे, हे आपल्यालाच एक पालक म्हणून रोज नवीन आव्हान असते. त्याच्या कुशाग्र बुद्धीला खतपाणी घालण्यासाठी मी त्याची शब्दांशी मैत्री जोडून देण्याचा प्रयत्न करते आहे.त्याविषयीचा माझा हा लेख पण वाचून पहा.
शब्दांशी मैत्री https://www.maayboli.com/node/76167