दत्त दत्त, दत्ताची गाय (पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 3)

Submitted by नादिशा on 30 August, 2020 - 21:10

प्रत्येक व्यक्ती चा स्वभाव वेगळा, तशी प्रत्येकाची उपजत आवड पण वेगवेगळी असते. स्वयमला पहिल्यापासूनच प्राण्यांचे वेड होते. कळायला लागल्यापासून त्याला हंबा खूप आवडायची. कितीही रडत असू देत, हंबा दिसली की तो शांत व्हायचा. त्याच्या "हंबा"मध्ये गाय, बैल, म्हैस सर्वांचा समावेश होता.या सर्वांना तो हंबा असेच म्हणायचा.

बाबांकडे गेला, की त्याचा ठरलेला प्रोग्राम होता. दुपारच्या वेळी तिथे एक गुराखी म्हैशींचा कळप घेऊन यायचा. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकला, की स्वयम लगेच दुडूदुडू धावत बाबांकडे जायचा. . "बाबा हंबा , बाबा हंबा.. "करत. मग गडबडीने त्यांना बेडरूम मध्ये घेऊन जायचा, खुंटीवरचा शर्ट बोटाने दाखवायचा. मग बाबांनी शर्ट घालायचा आणि बाहेर पडायचे. मग घराबाहेर ठेवलेली चप्पल तो दाखवायचा. चप्पल घालतानाही बाळराजेंचे लक्ष असायचे, बागेत फिरायची चप्पल घातली की बाहेर जायची घातली.. मग उं उं करून, टाचा उंचावून, दोन्ही हात वर करून खुणावायचा, नाही कळाले बाबांना किंवा त्यांनी दुर्लक्ष केले, तर " उंचून, उंचून "असे बोबड्या स्वरात म्हणायचा. मग बाबांनी त्याला उचलून घ्यायचे आणि त्या कळपामागे फिरायचे. तो कळप आमच्या कॉलनी मधून निघून जाईपर्यंत हे दोघे त्याच्या मागेमागे . तो सगळा वेळ बाळराजे बाबांच्या कडेवर बसून त्या कळपाचे निरीक्षण करत राहायचे.त्या कळपात जर 1-2 पिल्ले असतील, तर मग सोन्याहून पिवळे ! म्हैशी चालतात कशा, खातात काय नि कशा, शेपटी कशा उडवतात.. नीट निरखून पाहायचा. मग त्यानुसार प्रश्न विचारणार बाबांना. मिळालेली माहिती पण गंभीर चेहऱ्याने सर्वांना दिवसभर सांगत राहणार. "हंबा, हंबाचे पियू गोत खाते ", "हंबा अश्शी शेपूट हलवते. . एक माशी बसली होती तिच्या पाठीवर, तर अस्सा एक फक्का च मारला त्याच्यावर शेपटीने , भुर्रर्र उडून गेली मग माशी "..असे सांगत राहायचा मग सगळ्यांना रंगवून.

आम्ही राहतो, तो भाग ग्रामीण आहे. घरासमोर रस्ता आहे, त्यावरून लोक त्यांची गुरे, शेळ्या मेंढ्या चरायला नेतात. बैलगाड्या धावतात, रानात काम करणारे बैल सहज आजूबाजूला दिसतात. कोंबड्या, कुत्री सहज नजरेस पडतात.दोन -तीन घोडे पण आहेत पाळलेले.

पण स्वयमला प्रिय होती, ती मात्र फक्त हंबा. तो दीड वर्षांचा असल्यापासून चित्र काढू लागला. सुरुवातीला तो फक्त आणि फक्त हंबाचीच चित्रे काढायचा.सुरुवातीची त्याची चितत्रे म्हणजे नुसत्या रेघोट्याच असायच्या , पण त्या ओढताना त्याच्या डोक्यात मात्र असायची हंबा. त्याला जर विचारले," काय आहे हे , काय काढलंय तू? "तर तो सांगायचा, "हंबा".कधीकधी स्वतः एकटाच चित्र काढत रहायचा आणि त्याचे काढून झाले, की आम्हाला हाताला धरून ओढत आणायचा, त्याने काढलेली हंबा पहायला. अमितला सतत सांगायचा हंबा काढून द्यायला आणि मग तशी स्वतः काढायचा प्रयत्न करायचा .तर कधी समोर दिसणारी, चरणारी हंबा काढायचा प्रयत्न करायचा. अक्षरशः तासन्तास स्वयम घरासमोरच्या ओट्यावर हंबाची चित्रे काढत बसायचा.

रोज अमित ऑफिसला जाताना त्याला एक चक्कर हवी असायची. मग अमित थोड्या अंतरावरच्या दत्त मंदिरापर्यंत आम्हा दोघांना एक चक्कर मारायला न्यायचा , घरापर्यंत आणून सोडायचा आणि मग ऑफिसला जायचा. दत्त मंदिरात दत्त महाराजांची गाय दिसायची. मंदिराच्या समोर एक गोठा होता. तिथे म्हैशी होत्या. स्वयमला आकर्षण चक्कर मिळण्यापेक्षा त्या हंबांचे असायचे. जाताना जर कुणी त्याला विचारले, "कुठे निघाला रे ? "तर हा सांगायचा -"भुर्रर्र.. हंबाला.." आल्यावर पण सांगायचा सर्वांना -"आमी हंबाला गेलो होतो. "

त्याला दोन महिन्यांचा असल्यापासून आम्ही स्कूटी वर फिरवले. पावसाळा असेल तर रेनकोट घालून, उन्हाळा असेल तर सनकोट, घालून, हिवाळ्यात गरम कपडे घालून.पण स्कूटी वरच.त्याने पण छान साथ दिली आम्हाला. आधी झोपल्या अवस्थेत, मग मांडीवर बसून तो टुकूटुकू पाहत राहायचा सगळीकडे. आणि उभे राहायला शिकल्यावर तर मग काय, बोलायलाच नको. बाळराजे स्वारच व्हायचे अक्षरशः गाडीवर. आमच्या दोघांच्या मध्ये सीट वर तो उभा राहायचा मस्त पपांच्या खांद्यावर दोन्ही हात ऐटीत टेकवून. आणि मजा लुटायचा सगळ्या प्रवासाची. रस्त्यात एखादी हंबा दिसली, की मग स्वारी अजूनच खुशीत यायची.आम्हाला दोघांना बोटाने ती हंबा दाखवायचा आणि मग गाडीवर उभ्याउभ्याच उड्या मारायचा. मागे बसून त्याला सावरता सावरता मला पुरेवाट व्हायची.

अमितला सतत त्याला हंबा काढून दाखवावी लागायची. त्यामुळे त्याला एवढी प्रॅक्टिस झाली होती, की झोपेतून उठून, अगदी डोळे झाकून म्हटले तरी तो हंबाचे चित्र काढू शकला असता. कितीही वेळा सांगितले, तरी न वैतागता स्वयम सांगेल तिथे, सांगेल तेव्हा अमित हंबा काढून दाखवायचा त्याला. स्वयमला चित्र काढायला मोठा कॅनव्हास लागायचा. आजूबाजूला पाहत ओट्यावरच चित्र काढायला आवडायचे त्याला. त्यामुळे दिवसातून 3-4वेळा तो ओटा झाडून, डेटॉल ने पुसून द्यायची जबाबदारी माझी असायची.

आम्हा दोघांना इतकी सवय झाली होती स्वयमच्या या हंबा प्रेमाची, की विचारू नका ! कधी माझ्या माहेरी आईकडे त्याला सोडून आम्ही दोघे गाडीवर कुठे निघालो असलो, आणि रस्त्यात एखादी हंबा दिसली, तर आम्ही दोघे पण एकमेकांना हंबा दाखवायचो अनावधानाने, आणि जेव्हा लक्षात यायचे ना, आज स्वयम नाहीये आपल्याबरोबर, तेव्हा हसू आवरता आवरायचे नाही आम्हाला.

तेव्हाचे स्वयमचे आवडते गाणे होते -
"दत्त दत्त,
दत्ताची गाय,
गायीचं दूध,
दुधाची साय,
सायीचं दही,
दह्याचं ताक,
ताकाचं लोणी,
लोण्याचं तूप,
तुपाचा दिवा गणपतीला.
गणपतीच्या देवळात घंटा
वाजते घण घण घण. "
दिवसभरात कित्तीतरी वेळा या गाण्याची पारायणे व्हायची.

कितीही खराब मूड असला , रुसलेला , रागावलेला असला, तरी स्वयमचा मूड परत आणण्याचा रामबाण उपाय होता त्याला हंबा दाखवणे. अगदी कितीही आजारी जरी असला, तरी त्याच्या निस्तेज चेहऱ्यावर तजेला यायचा हंबा दिसली की !काय त्याचे नाते होते हंबाशी, ईश्वरालाच ठाऊक !
स्वयमच्या खेळण्यांमध्ये हंबांचे असणे मग ओघानेच आले. छोट्या - मोठ्या साईझच्या , काळ्या , पांढऱ्या , तांबड्या हंबा त्याच्याकडे होत्या . त्याच्या मावशीने त्याला एक सेल वर चालणारी काळीपांढरी , मोठी हंबा आणली होती, तिचे बटण चालू केले, की ती चालायची, मध्येच थांबून हंबरायची, तेव्हा तिच्या डोळ्यात लाल लाईट लागायची .पण स्वयमला नाही पसंत पडली ती, घाबरायचा तो तिला . शेवटी आम्ही तिला परत करून टाकली ती.

काही दिवसांनी त्याच्या चुलत्यांनी फर टॉय मधली एक गोंडस हंबा महत्प्रयासाने मिळवून त्याच्यासाठी पाठवली. काळीपांढरी फर होती आणि मोठ्ठे बोलके डोळे होते . ती मात्र त्याला खूप आवडली . तिला आमच्या झाडांची पाने द्यायचा स्वयम "खा, गोत खा "म्हणायचा. एका भांड्यात पाणी द्यायचा प्यायला. तिला जवळ घेऊनच रोज झोपायचा तो.

बेंदूर साठी आणलेले बैल पण खूप प्रेमाने जपायचा तो. अगदी लहान असल्यापासून कधीही तो धसमुसळेपणाने खेळला नाही त्या बैलांशी.उलट खूप जपायचा त्यांना , ते फुटू नयेत, याची खूप काळजी घ्यायचा. त्यांना नावे द्यायचा आणि बोलायचा पण त्यांच्याशी.

गावातल्या कुणालाही गुरांचे कौतुक नव्हते. कारण सतत डोळ्यासमोर असायची ना गुरे. माझ्या सगळ्या पेशंटना, गावातल्या लोकांना माहिती झाले होते स्वयमचे हे हंबाप्रेम . कुणाच्या कौतुकाचा तर कुणाच्या कुचेष्टेचा विषय बनले होते . "तुम्हीच एक वासरू पाळा आता याच्यासाठी, "असा काही जणांकडून कौतुकाने , तर काही जणांकडून उपरोधाने सल्लाही मिळायचा आम्हाला.

जवळजवळ साडेतीन वर्षांचा होईपर्यंत त्याचे हे हंबाप्रेम पुरले . आज तो हे सर्व विसरून गेला आहे , पण आजही कुणाच्या तोंडून " हंबा"असा शब्द ऐकला, की तो सारा काळ नजरेसमोर उभा राहतो .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संक्षिप्त मध्ये मुलाला प्राणी आवडतात. ह्यात काटेरी मुकुट असे काही नाही. पालकांचे हँग अप् सोडले तर मुले व प्राणी हे एक विनिन्ग काँबिनेशन आहे. मोगली बघा कसा छान वाढवला प्रा ण्यांनी ते.

अहो, मुलाला सुजाणरीत्या वाढवणे, याच अनुषंगाने एकेक लेख लिहिण्याचे मनाशी योजले आहे. म्हणून एकच शीर्षक देऊन त्याखाली एकेक पोस्ट टाकत जायचे असा माझा विचार आहे. सुजाण पालकत्व कधी काटेरी, कधी सुखद असते.. निदान माझा तरी तसा अनुभव आहे. पण मग प्रत्येक वेळेस तशी नोंद करत बसण्यापेक्षा एकसंधपणा या हेतूने "पालकत्वाचा काटेरी मुकुट "या शीर्षकाखाली लिहिले आहे.

पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा दोन https://www.maayboli.com/node/762

पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा एक https://www.maayboli.com/node/76195

छान लिहीलेत नादिशा Happy

न कळत्या वयापासून त्याच्या मनाचा विचार केलात, हौस पुरवलीत हे महत्वाचे!

अमाच्या प्रतिसादाकडे सिरियसली पाहू नका, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आयडी बहुतेक हॅक झालाय. Happy

क्युट आठवण आहे
साधारण लहान मुलांना टायगर, टेडी किंवा इतर रंगीत प्राणी आवडतात. याने हम्मा सारख्या सात्विक आणि तश्या रंगात साध्या प्राण्याने सुरुवात केली ही गंमत आहे.

छान मालिका सुरू आहे! पण हा लेख वाचताना मी जरा भीतभीतच पुढे जात होते. मी लहान (५/६ वर्षे) असताना माझ्या समोर एक बैल उधळला आणि माझ्या अगदी जवळून गेला तेव्हा त्याचे खूर माझ्या पायाच्या करंगळीला लागले आणि ती चांगलीच सुजली होती. मी भीतीने बराचवेळ रडत होते. अर्थात घरचा गोठा होता त्यामुळे गायी गुरांची भीती आजिबातच बसली नाही. पण लेख "काटेरी मुकुट" शीर्षकाखाली असल्याने आणि माझ्या अनुभवावरून मी काहीतरी वाईट घडले असे डोक्यात धरून लेख वाचला.
सर्व प्रकारचे अनुभव लिहीणार असाल तर मग काटेरी मुकुटाऐवजी कुठलातरी दुसरा मुकुट परिधान केला तर जास्त छान वाटेल!

जिज्ञा सा प्लस वन. काटेरी मुकुट चा रेफरन्स खूप वेगळा आहे हो. जिझस ख्राइसट चा आहे तो मुकुट.

अश्या बारक्या सारक्या फर्स्ट टाइम ऑब्झर्वेशन ला काही काटेरी मुकुट पालकत्वाचे लेसन म्हणता येत नाही. बीन देअर डन दॅट

तुम्हास्न्ही शुभेच्छा . लिहीत राहा. नव्या पालकांना नक्की च उपयोगी पडेल.

खरं तर मलाही काटेरी मुकुट शीर्षक या हसत्या खेळत्यनुअनुभवाना जरा टू मच पेसिमिस्टीक वाटले.
पण ज्याचा त्याचा चॉइस.

सर्वांचे धन्यवाद.
या आधी पण 2 किस्से मी लिहिलेले आहेत. त्याचे धागे वर दिलेले आहेत. आणि ओघात पुढचे किस्से कम अनुभव येतीलच. माझे वैयक्तिक जे अनुभव आहेत, ते मला जसे जाणवले, पालकत्व किती जबाबदारी चे काम आहे, अक्षरशः full time job आहे, याची जाणीव सतत माझ्या मनात जागृत ठेवली, त्यानुसार शीर्षक मी दिलेले आहे . अर्थातच ते माझे वैयक्तिक मत आहे , त्यामुळे त्याच्यावर उहापोह होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे.

नादिशा, मला तुमचे लेखन आवडले पण एक निरीक्षण नोंदवत आहे, हे फक्त तुम्हाला लागू आहे असे नाही तर आज कालच्या नवं पालकांचा दृष्टिकोन सांगत आहे. हे पालक आपल्या पाल्याच्या लहान लहांन गोष्टीच्या खूप प्रेमात असतात. त्यांच्या बाललीला कॊतुकाने फुलवून सान्गतात . मला हे मान्य आहे कि मुले निरागस असतात आणि कौतुकास पात्र पण असतात , तुम्ही लिहिलेल्या लेखातून नेमके काय घायचे ते काळात नाही. आज काल आपले मूल कसे वेगळे कसे गुणी हेच दाखवण्याचा प्रयन्त असतो, पण जर तुम्ही पालकत्व एक काटेरी मुकुट असे लिहीत असाल तर आम्हाला तुमचे एक पालक म्हणून एक डॉक्टर म्हणून अनुभव जाणून घयायला आवडतील. ( हा कायप्पा चा पण ट्रेंड आहे सद्या)
माय बोलीवर असे स्वतःच्या पाल्याच्या अति प्रेमात असलेलं काही पालक आहे ( उदा परी पुराण, पूजा जोशी यांचे लेख ). पन हे वाचायला पण नकोसे होते. अर्थात हे वाचायचे कि नाही हे जो तो ठरवू शकतो.
आणि असेही पालक आहेत कि ज्याच्याशी आपण रिलेट होऊ शकतो ( उदा मी अनु चा लेख होता क्राफ्ट वर आगगाडीचा .. खूप आवडला आणि रिलेट पण झाला , तसेच nimita याचा पण लेख मुलीचा उल्लेख येतो पण प्रसंगानुरूप , आजून एक धागा होता मुलांच्या शिष्टी बद्दल खूप पालकांनी अनुभव लिहिले आणि त्यात बऱयाच घेण्यासारख्या गोष्टी होत्या, mother वोररीर (बसके ) यांचे पण धागा खूप सुंदर होते )
तुम्हाला दुखावण्याचा उद्देश नाही पण पाल्याचे गुण नक्की सांगा पण अनुभवनी समृद्धता असलेले. तुम्ही डॉकटर पण आहात त्यामुळे हा धागा आम्हाला पण उपयुक्त होतील .. साधक बाधाक चर्चा होईल.
फक्त वाचक म्हणून स्पष्ट मत दिले आहे,दुखावण्याचा हेतू नाही.

धन्यवाद प्रकाश घाटपांडे सर link चुकली आहे, हे लक्षात आणून दिल्याबद्दल . कशी काय चुकीची link टाकली गेली कळत नाही. क्षमस्व !

नादिशा, तुम्ही नवीन आहांत. काही चुकले तर दुरुस्त करा. विचारण्यात हयगय करु नका. आम्ही पण चुकतच शिकलो आहोत Happy
स्वतःला अपराधी मानू नका. पुलेशु Happy

धन्यवाद विनिता. झक्कास.
तुमच्या प्रतिसादामुळे धीर आला आहे मला. कृपया मला मदत करा.
मी सुरुवात करताना" ललितलेखन "या विभागाचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामध्ये सुरुवातीचे लेख लिहिले.
"नवीन लेखन "असा option आहे, तिथे चित्रकला दिसले, त्यामुळे मी त्यावर click करून सदस्यत्व घेतले. आणि त्यावर स्वयम ने घरातील साहित्यापासून बनवलेले गणपती पोस्ट केले.
पण गेले 3दिवस मी घरातील साहित्यापासून वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक रेसिपी पोस्ट केल्या. पण" नवीन लेखन "मध्ये मला पाककृती विभाग दिसत नाहीये. त्यामुळे त्या रेसिपी ललितलेखन विभागात च पोस्ट झाल्या.मला प्रतिसादामध्ये काही जणांनी सूचना केली, त्या पाककृती आणि आहारशास्त्र विभागात हलवा.त्या विभागाचे सदस्यत्व घ्या किंवा संपादन करून हे धागे त्या विभागात हलवा. पण मी संपादन करण्याचा प्रयत्न केला, तरी ग्रुप ऑडियन्स मध्ये direct ललितलेखन असे दिसते screen वर, तिथे मला change करता येत नाहीये.
कसे हलवू मी ते धागे पाककृती विभागात?
आणि त्या विभागाचे सदस्यत्व कसे घ्यायचे?
आपल्याला जर वेगवेगळ्या विभागात लिहायचे असेल उदा. बागकाम, विणकाम तर त्यासाठी प्रत्येक विभागाचे सदस्यत्व घ्यावे लागते का? आणि असे किती विभागांचे सदस्यत्व घ्यावे, असे बंधन आहे का?
सॉरी, खूपच मोठी प्रश्नपत्रिका आहे माझी. पण शक्य असेल असेल, तर कृपया मदत करा.

बेबी स्टेप्स
हळूहळू कळत जाईल.
वाचत आणि लिहीत रहा.

त्या विभागाचे सदस्यत्व घ्या किंवा संपादन करून हे धागे त्या विभागात हलवा. >> आधी
पाककृती विभागाचे सदस्यत्व घ्या. मग लेखाच्या संपादनात पाककृती विभाग पण दिसू लागेल. मग धागा त्या विभागात हलवता येईल.
ज्या विभागात लेखन करायचे आहे त्या विभागाचे सदस्यत्व घ्यावे लागते (compulsory नाही पण उपयोगी आहे). यामुळे नवीन लेखन classify होण्यासाठी आणि नंतर शोधण्यासाठी सोपे जाते. यामुळे लेख योग्य वाचकवर्गापर्यंत नीट पोहोचतात. पुलेशु!

अमाच्या प्रतिसादाकडे सिरियसली पाहू नका, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आयडी बहुतेक हॅक झालाय>> आयडी हॅक आजिबात झालेला नाही.
प्रतिसाद सीरीअसली न घेण्याचा ऑप्शन आहे .

पालकत्व हा का टेरी मुकुट नक्कीच आहे. मानसिक किंवा शारिरीक दुर्बलता किंवा दोन्ही असलेली मुले, त्यातही मुली, ( ह्यांच्यावर अजाणता अत्याचार होण्याची शक्यता असते हे पालकांवर जास्तिचे टेन्शन असते.) एकटे पालक आई किंवा बाबा दोन्ही रोल एकट्याने निभवणारे. घटस्फोटित पालक किंवा मिक्स पेरेंट्स आईची / बाबांची दोघांची आधीच्या नंतरच्या नात्यातून झालेली मुले संभाळ्णारे व मोठी करणारे, दत्तक व नैसर्गिक मुलांचे एकत्रित पालकत्व करणा रे व्यक्ति गरीबीत मुले वाढव्णारे, रेफ्युजी पालक जे स्वतःच विस्था पित आहेत. पण मुलांना नॉर्मल जीवन देउ बघणा रे. युद्धाच्या व मृत्युच्या छायेत मुले वाढ वणारे( लाइफ इज ब्युटीफुल व जोजो रॅबिट चित्रपट नक्की पाहा त्यात जोजो व आई सायकल वरून चक्कर मारायला जातात तो सीन एकाच वेळी अतिशय ह्रुद्य व करूण आहे)

इराण इराक अफगाणिस्तान सिरीआ मध्ये स्वतःच स्वतःचे पालकत्व निभव्णारी पोरकी अनाथ मुले अश्या अनेक प्रकारचे व्यक्ति हा काटेरी मुकुट समर्थ पणे घालून जगत आहेत. आपण वैद्यकीय व्यावसायिक आहात तर आई बाप मुलगा आर्थिक सुस्थिती ही एक व्हॅनिला सिचुएशन
ह्याच्या पुढे जाउन काटेरी मुकुटाची व्याख्या जरा जास्त इन्क्ल्युझिव्ह करता येते का ते बघावे, विषयाची व्याप्ति फार मोठी आहे व अनेक प्रकारचे लेख व फिल्म सोर्स मटेरिअल उपलब्ध आहे. आपल्या मायबोलीवरही अनेक व्यक्ति असे पालकत्व समर्थ पणे निभवत आहेत. विषय असताना मी जर त्यांची बाजू मांडली नाही तर ते त्यांचे प्रयत्न अनुल्लेखाने मारण्या सारखे होईल. म्हणून हा पोष्ट प्रपंच. तुमच्या पोस्टी वैयक्तिक आहेत पण इथे पब्लिक फोरम वर मांडल्यावर त्या अनुषंगाने चर्चा होईल की.

प्रत्येकाला आपल्या पाल्याचे कौतुक असते लहानपणी. एकदम गोड गोड किस्से आहेत.
काटेरी मुकुट कदाचित याच्यासाठी की पालकाना कायम भीती असते की पाल्य चुकीच्या मार्गाला तर लागणार नाही. संदर्भ सध्या तरी चुकीचा वाटतोय.

बाई दवे - हे कोणी लिहिले? मला का दिसत नाही? -->> अमाच्या प्रतिसादाकडे सिरियसली पाहू नका, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आयडी बहुतेक हॅक झालाय

नादिशा, तुम्ही पहिल्या पानावर खालच्या बाजूला असलेली -
"सगळ्या मायबोलीवरचे लेखन (माझे ग्रूप + इतर ग्रूप + नवे + आधी पाहिलेले)" ही लिंक पहा.
इथे नावाप्रमाणे तुम्हाला सगळे लेख आणि ग्रुप दिसतील.

मायबोलीवरील शॉर्टफॉर्म आणि विशेष शब्द.
आपली मायबोली

षण्णवतिः शब्द कथा - मिशनरी पोझिशन
नवीन गुलमोहर - कथा/कादंबरी

यातलं पाहिलं लेखाचं नाव आहे आणि दुसरा ग्रुप. अधून मधून असे सर्व लेख असलेले हे पण उघडून हवे असलेल्या ग्रुपमध्ये सामील व्हा. याहून सोपी पध्दत असेल तर मला माहित नाही.

तुमचे लेख वाचले. छान किस्से.

अमा मी थोडाफार असाच लिहीलेला प्रतिसाद डिलीट केला. कारण त्यांना उहापोह नको आहे असे त्यांनी सुचवले. काटेरी शब्दामुळे मलाही स्पेशल चाइल्डच्या पालकत्वाविषयी वाटले.
कदाचित लेखमालेत पुढे काही येणार असेल ज्याने हे शीर्षक जस्टिफाय होतं असेल असेही वाटले. चारचौघांइतकीच (नोकरी आणि एकच मूल) आव्हाने असताना याला का काटेरी म्हणावे हेही कळले नाही. Able bodied able minded असलेले मूलं व आर्थिक सुरक्षितता हे सगळे असताना यांनी काटेरी मुकूट म्हणून आमच्या सारख्या स्पेशल पेरेंटने काय म्हणावं मगं असे झाले.
******
हा होता प्रतिसाद.
******

खूप गोड आहे तुमचा मुलगा आणि ही आठवण सुद्धा.

क्षमस्व पण काटेरी खरंच खटकले पण माझी कारणं वेगळी आहेत तुम्हाला आवडले नाही तर दुर्लक्ष करा.
काटेरी +पालकत्व याने मला मूल स्पेशल चाइल्ड आहे असा गैरसमज झाला.
मला दोन्ही प्रकारची मूलं आहेत प्रामाणिकपणे सांगते चारचौघासारख्या healthy, normal , emotionlly well communicated , able bodied/ निर्व्यंग मुलाला वाढवणे is a cake walk compared to a special child. खूप कष्ट आहेत सामान्य मुलांना मान्य आहे पण सततची भवितव्याची काळजी , आर्थिक असुरक्षितता , आपल्याच दुसऱ्या normal मुलाला सतत करावी लागणारी तडजोड , कुठेच पालक म्हणून फिट इन न होता येणे , हजारो कुठलाच विशेष फायदा न होणाऱ्या physical and occupational therapy ला वेळ आणि शक्ती व पैसेही घालत रहाणे, आईला नोकरी न करता येणे , कायमच्या stressful आणि bad news देणाऱ्या appointments, कुटुंबातील कुणाचाच कसलाच आर्थिक वा फारसा मानसिक आधार नसणे , घरकामाला / कुठल्याच कामाला कुणी कुणी नसणे यासगळ्यातून मी सात+ वर्षांपासून जातेयं मग मी आणि माझ्यासारख्या अनेक पालकांनी काय म्हणावे हा विचार आला. मलाही काटेरी मुकुट म्हणावे वाटत नाही एवढे असूनही, प्रत्येकाची आव्हानं आणि प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असूच शकतात अर्थात .
You are an amazing working parent but this is another level . फक्त काटेरी शब्दाने मला नवल/ वाईट वाटले थोडे म्हणून लिहीले.
I am a nice person and please don't hate me for writing this Happy
तुमचे लेखन छान आहे , लोकांना आवडते सुद्धा , लिहीत रहा . तुम्हाला व तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा! Happy

प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवालाच महत्व देते. ही जनरल मानसिकता आहे. त्यात स्पेशल चाईल्ड किंवा अजून काही कारणांनी सामान्य परिस्थितीत नसलेले मूल म्हणूयात.
पण म्हणून नॉर्मल मुलांना वाढवणे फारच सोपे असते असे नाही. मूल धारण केल्यापासून आईबाबा बनणारे प्रत्येक दिवशी नवीन काही शिकत असतात. चुकत असतात.
नादिशाला जर हे नाव योग्य वाटतेय, तर देवू दे. त्या पुढे काय लिहीणार आहेत, त्या अनुषंगाने त्यांनी हे नाव दिले असावे. त्यांच्या मताचा पण आदर करावा.

कसे हलवू मी ते धागे पाककृती विभागात?
आणि त्या विभागाचे सदस्यत्व कसे घ्यायचे? >> नादिशा, आता संपादनाची वेळ संपली असेल तर अ‍ॅडमिनना मेसेज करा.
उजव्या बाजूला तुम्हांला 'अ‍ॅडमिन' असे निळ्या रंगात नाव दिसेल. ते त्यावर क्लिक केले की तिथे अनेक ऑप्शन दिसतील.
'विचारपूस' भागात जा. ग्रुप बदलायची विनंती करा. ते करतील.

ग्रुप कसा जॉईन करावा >>> पाककृतीचा धागा उघडला की त्यात खाली तो ग्रुप दिसतो. त्यावर क्लिक केले की ह्या ग्रुप्मधे सामील व्हा असा ऑप्शन दिसतो. त्यावर क्लिक करुन सामील व्हा. मग तुम्हांला त्या त्या विभागात लेखन करता येईल Happy

पीनीने सांगितले आहे ते बघा. हळूहळू लक्षात येईलच.

सर्वांनाच त्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पीनी आणि विनिता. झक्कास खूप खूप आभार मार्गदर्शन केल्याबद्दल. मानव पृथ्वीकरांनी पण काही सूचना दिल्या होत्या. तुम्हा सर्वांमुळे योग्य माहिती मिळाली आणि मला त्यानुसार ज्या गोष्टी जमत नव्हत्या, त्या जमल्या. असेच सहकार्य राहूद्या, ही विनंती.

छान आवडला किस्सा. मुलांना आनंद देणारया गोष्टी त्यांच्यासोबतच आनंद उचलत केल्या तर त्या कष्टाच्या वाटत नाही. नंतर या आठवणीही फार सुखावतात.

शीर्षकावरूनच उगाच फार प्रतिसाद आलेत असे वाटते. अगदी या किश्याच्या संदर्भाने ईकडेतिकडे वाटले तरी त्याने फारसा फरक पडत नाही.

पण मुळातच पालकत्वाचा मुकुट हा काटेरीच असतो असे मला वाटते. बाहेरून बघणारयाला शोभा पण निभावणारयाला ती शोभा मिरवत असतानाच शक्य तिथे संघर्ष करावा लागतोच.

बाकी हा संघर्ष स्पेशल चाईल्ड असेल तर पटींनी जास्त असतो मात्र नॉर्मल चाईल्ड असले तरी काही केक वॉक नसतो. कारण प्रत्येक मूल वेगळे असते त्यामुळे आदर्श पालकत्वाचा काही फिक्स फॉर्म्युला नसतो.
वाढायला तर जंगलेच्या जंगले वाढतात, कोणीही लक्ष न देता वाढतात. पण घरच्या कुंडीत वा बागेत झाड लावायचे असेल तर मात्र माळ्याचा कस लागतोच.

धन्यवाद दोघांचेही.
ऋन्मे SS ष, अगदी हेच माझे पालकत्वाच्या जबादारी बद्दल मत आहॆ.

Pages