कईदचक्का (अननस) पचडी

Submitted by पार्वती on 14 September, 2020 - 04:44

२३ वर्षांपूर्वी बेंगळूरू मध्ये आल्यावर पहिल्यांदाच अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांशी सामना झाला. आधी सौदिंडियन म्हणजे दोसा इडली चटणी सांबार एवढंच माहिती होतं. पण साऊथ म्हणजे कर्नाटक, तामिळनाडु, केरळ आणि आंध्र असे चार (तेव्हा चार आता तेलंगणा धरून पाच) निरनिराळी राज्यं आहेत, त्यांच्या निरनिराळ्या संस्कृती, खाद्य संस्कृती आहेत आणि आपण खादाड असल्यानं ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. आधीपासून थोडी फसी ईटर असल्यानं सुरुवातीला अवघड वाटलं, पण थोडा आपला दृष्टिकोन बदलल्यावर सर्वच पदार्थ आवडायला लागले.

सगळ्या सौदिंडियन थाळ्या केळीच्या पानावर (आडवं) वाढल्या जातात आणि त्यात भाताचा डोंगर असतो, सांबार, रसम सगळीकडे ओघळत असतं हे एवढंच त्या सर्व थाळ्यांमध्ये साम्य. सांबार, रसम/सारु, भाज्या, कोशिंबिरी करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आणि चवी निरनिराळ्या आणि अगदी स्वर्गीय! हे मी म्हणते आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. आपलंच कसं सगळं चांगलं आणि बाकीच्यांचं सगळं कसं वाईट हा एवढा अहंकार सोडला की जग सुंदर दिसू लागतं. हे स्वानुभवावरून सांगते आहे.

ओणम चे वेध लागले की इथे सगळे ओणम सद्याची वाट पाहायला सुरुवात करतात. १४ निरनिराळ्या पदार्थांनी सजलेलं ते केळीचं पान डोळ्याचं (आणि नंतर आपल्या जठराग्नीचं) पारणं फेडतं. दर वर्षी एक तरी ओणम सद्या खाल्लंच पाहिजे असा आमच्याकडे दंडक आहे. त्या शिवाय तरणोपाय नाही. ह्या वर्षी कोरोनामुळे सर्व बंद. पण आमच्या कॉलनीतल्या एका आंटींनी दहा दिवस आधी एक छानसं पत्रक पाठवलं. त्यात त्यांनी ओणम सद्याची रंगीत फोटोसहित माहिती लिहीली होती आणि आनंदाची बातमी म्हणजे त्या स्वतः ते सर्व बनवून केळीच्या पानासहित घरपोच आणून देणार होत्या. ही संधी कशी सोडणार? घरी सर्वांनीच त्या सद्याचा व्यवस्थित समाचार घेतला. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कईदचक्का (अननस) पचडी. मला त्या पचडीची स्वप्नं पडू लागली. मग माझ्या केरळी मैत्रिणीकडून, गीताकडून रेसिपी घेऊन ती करून खाल्ल्यावरच जरा शांतता लाभली आणि त्या शांत मनःस्थितीत हे सगळं लिहून काढलं.

तर कईदचक्का (अननस) पचडी साठी लागणारे जिन्नस –
१ छान पिकलेला अननस सोलून लहान तुकडे केलेला
अर्धा चमचा हळद
एक चमचा तिखट
मीठ

वाटण : (थोडं पाणी घालून चांगली पेस्ट करून घ्या)
तीन/चार टेस्पू खवलेला नारळ
अर्धा चमचा जिरं
अर्धा चमचा मोहरी
१ हिरवी मिरची (चवीनुसार प्रमाण वाढवू शकता)

फोडणीसाठी :
दोन चमचे नारळाचं तेल (नसल्यास कोणतंही तेल, पण नारळाच्या तेलाची चव अप्रतिम)
मोहरी
दोन सुक्या लाल मिरच्या
कढीपत्ता

कृती :

अननसात हळद, तिखट, मीठ आणि थोडं पाणी घालून शिजवून घ्या.
मऊ शिजला की त्यात वाटण घालून कमी गॅसवर उकळी आणा.
वरून फोडणी घाला.
आवडीप्रमाणे रस ठेवा. जास्त रस चांगलाच लागतो.

अतिशय सोपा असा हा पदार्थ भाताबरोबर छान लागतोच पण पराठा आणि थोडं लोणचं असलं बरोबर तरीही मजा आणतो.

पहिलंच लेखन असल्यामुळे फोटो डकवता येत नाहीये. प्रयत्न सुरू आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला आवडतात केरळी पदार्थ, ओणम साद्द्या मस्तच. इंजीपुले, थोरण, बीट पचडी, मोरु कढी, ओलन, थिय्यल, कोट्टू करी, अवियल... सर्वच्या सर्व पदार्थ.
माझी बालमैत्रीणीची आई, ४० एक पदार्थ तिच्या सासु, वगैरे मिळून करत.

कन्नडा, तुल्लु , तामिळ लोकांचे पण मस्त असतत पदार्थ.
आपला भारत महान.... इतकी विविधता ...

केळीच्या पानात वाढलेलं साद्या बघणं म्हणजे डोळ्याला सुखावणारा अनुभव..
आणि इतकं सगळं करणाऱ्या गृहिणीला साक्षात दंडवतच....
अननसाचा शिरा आणि पचडी करून बघायचं मनात आहे बघू कसं जमत ते..

आमच्या जिव्हेचा रसाग्नी चेतवलात इतकी नाव वाचुन... मलाहि फार आवडतात साउथ इंडियन पदार्थ.. साउथ ला जाणं झालं नाहि अजुन म्हणुन मोजकेच पदार्थ माहित. करुन बघणार हि पचडि. Happy

आमच्याकडे GSB समारंभात हा पदार्थ असतो ... ह्याला ससं म्हणतात.. कधी नुसतेच अननस असते तर कधी मिक्स फ्रुटस.. मस्त लागतो.. खास करून आंबा आणि अननस मिक्स असेल तर..

छान रेसिपी. फोटोही मस्त.

आमच्याकडे GSB समारंभात हा पदार्थ असतो ... ह्याला ससं म्हणतात. >>> येस्स. मी त्यांच्याच समाजातल्या एका लग्नात खाल्लं हे, सुपर्ब होतं. कोणी सासव म्हणतं, कोणी सासम. नक्की काय म्हणायचं. अननसाचंच होतं.

माहेरी शेजारी कारवारचे gsb होते, त्यामुळे बरेच पदार्थ माहिती आहेत तिथले.

मस्त वाटतय वाचून. काल परवाच एक व्हिडिओ बघण्याचा योग आला. केरळी पद्धतीचं जेवण केळीच्या पानावर वाढताना प्रत्येक पदार्थाचं नाव सांगत वाढत होते. खुप छान वाटलं ते बघून. लिंक देता आली तर बघते

मस्त ! कराय्ला ही सोपा पदार्थ वाटतोय.
काल परवाच एक व्हिडिओ बघण्याचा योग आला. केरळी पद्धतीचं जेवण केळीच्या पानावर वाढताना प्रत्येक पदार्थाचं नाव सांगत वाढत होते. खुप छान वाटलं ते बघून. >+१

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूपच छान वाटलं. जमल्यास फोटो टाकते सद्याबरोबर आंटींनी दिलेल्या लहानशा पत्रकाचा. कुठे कुठे काय काय वाढायचं ह्याचं साद्यंत मार्गदर्शन होतं. त्यांनी लिंकही पाठवली होती. https://www.instagram.com/reel/CEgRmySH7SL/?igshid=1pa5billuirv
त्या व्हिडिओच्या पहिल्या शॉटचा हा स्क्रीनशॉट. कौतुक वाटलं मला त्यांचं.
Screenshot 2020-09-14 at 6.57.34 PM.png

छान लेख.

कोकणात अनसा फणसाची भाजी असते म्हणे........ gsb ची खासियत आहे.तुम्ही उच्चारही एकदम बरोबर केलात.
दोन्ही फळांची वाट हे माझे मत.
मात्र सासाव 2-३ वर्षांपासून aavadayla लागले.नाहीतर तेही याच कारणासाठी आवडत नव्हते.

पाककृती लिहण्यासाठी कृपया "पाककृती" हा लेखन प्रकार वापरा. तुम्ही "लेखनाचा धागा" वापरला आहे. "पाककृती" लिहण्याचा मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामधे त्याचे आपोआप वर्गीकरण होते. उदा. "शाकाहारी का मांसाहारी" , भारतीय का इतर देशीय. आणि इतराना शोधायला सोपे जाते. लेखनाचा धागे त्यात दिसणार नाही.
हे पहा. https://www.maayboli.com/node/2548/by-subject

वेमा - ते लक्षात आल्यावर मजकूर हलवण्याचा प्रयत्न केला. जमला नाही. पुढचं लिखाण पाककृती मध्येच करेन.

काल केली होती पचडी. सोपी, आणि छान चवीची ही पाकृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद. मी कॅनमधल्या अननस चकत्या वापरल्या त्यामुळे फारच झटपट काम झाले.

वा छानच! सोपी आणि चविष्ट पाककृती आहे ही. अननस कापणे मात्र मला जिवावर येतं. अननस आणायचा, पिकेपर्यंत वाट पाहायची आणि पिकला की मग मुलीच्या मागे भुणभुण लावायची काप गं काप गं करत. कालच तिनं कापून ठेवलाय. उद्या करणार पुन्हा एकदा. पचडी आणि कोशिंबीर मधला फरक नाही माहीत मला पण. विचारते मैत्रिणींना.