गोवारीची (गवारीची) भाजी (एक निराळा प्रकार)

Submitted by योकु on 8 September, 2020 - 13:53
gowarichi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो गोवार (का कोण जाणे पण रु चि रा मधला हा शब्द आवडलाच या भाजीचा)
४ - ५ चमचे किंवा आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
मीठ
हळद
जरा नेहेमीपेक्षा जास्त तेल
मोहोरी
हिंग

२ - ३ टीस्पून लाल तिखट
८ - ९ लसणाच्या पाकळ्या (मोठ्या असतील तर ३ - ४ पुरेत)
अर्धा चमचा जिरं

क्रमवार पाककृती: 

गोवार मोडून पाण्यात घालून १० मिनिटं ठेवावी आणि नंतर धूवून निथळत ठेवावी (गोवार मोडण्याचा वेळ कृतीत धरलेला नाही)
गोवार अगदी कोवळी असेल तर चिरून घेतली तरी चालेल

तिखट + लसूण + जिरं एकत्रच बारीक करून घ्यावं मिक्सरला

जाड बुडाचं पितळी पातेलं किंवा जाड बुडाची कढई चांगली तापली की त्यात तेल घालून; मोहोरी घालावी, तीची तडतड संपली की हिंग, हळद घालून वर निथळलेली भाजी घालावी. २ मिनिटं हे सगळं प्रकरण मोठ्याच आचेवर चांगलं परतून घ्यावं.
झाकण घालून एक वाफ आणावी आणि नंतर मीठ + लसणीचं वाटण घालून पुन्हा परतावं अन भाजी शिजवत ठेवावी (गरज असेल तर झाकणावर पाणी घालावं)

शेवटी दाण्याचं कूट पसरून घालावं; मीठ घालावं अन भाजी पुरती शिजवून घ्यावी. तशी कोरडीच होते. तेलाच्या ओलेपणावर भाजी जिंकेल.
भाजी चांगली झाल्याची खूण म्हणजे - रंग बदलतो; दाण्याच्या कूटाचं तेल बाजूनी दिसायला लागतं आणि तिखट + लसणीचा कच्चट वास अजिबात येत नाही त्याऐवजी खमंग खरपूस सुवास दरवळतो.

गरमागरम भाजीवर लिंबू पिळून ताज्या ताज्या मऊ फुलक्यांसोबत खायला घ्यावी; सोबत कैरीचं करकरीत लोणचं असेल तर आहा!

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे. २-३ लोकांना भरपूर होईल.
अधिक टिपा: 

लसणीचं तिखट ताजंच करावं. फारतर आठवडाभराचं. कुठल्याही भाज्या/ उसळी एकदम टेस्टी होतात यानी. नक्की प्रयोग करून पाहा.
गोवार तशी पचायला जड असते आणि थोडी खाजरीही (त्यात पुन्हा दाण्याचा कूटही वापरतो आहोत) सो फोडणीत हिंग आणि वरून लिंबू पिळणे आवश्यक आहे. तसंही ताज्या पिळलेल्या लिंबाच्या रसाने भाजीची चव मस्त खुलते.

बाकी सजावट वगैरे करायची असेलच तर मग नारळाचा चव; कोथिंबीर इ. मंडळींना प्रवेश द्यावा. गरज आहेच असं अजिबात नाही.

(फोटो : मायबोलीकर mrunali.samad )

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपि !
आत्ता जेवताना बघितली आणि नेमकी गवारच आहे ताटात, > वा वा ! लकी!

हायला! तुमचा फटू माझ्या लेखात कस्काय आला?>>>हो. मला एकदम वाटले १ फोटो २ वेळा का दिसतोय?

‘जशीच्या तशी रेसिपी फॉलो करून बनवली आज...’ म्हणून फोटोपण सारखाच आला असेल. Proud

चाचणी म्हणून काही लेखात/ पाककृतीवर असे चित्र/फोटो चिकटवून पाहिले आहे. त्यामुळे ज्या लेखनात ही चाचणी केली त्यात "बदलून" असे दिसते आहे..... म्हणून लेखातला फोटो अणि मुख्य फोटो यात गडबड झालेली दिसते आहे.

आजच करून पाहीली. लसूण + तिखट + जिरे याचा खमंग स्वाद आला. शेवटी लिंबू पिळायला विसरले तरीही फर्मास लागत होती. एक नवी आणि सोपी पाककृती शेअर केल्याबद्दल आभार.

मी पण करून पहिली, नेहमी गूळ घालून करते, ह्या पद्धतीने छान झणझणीत झाली. धन्यवाद योकू रेसिपीबद्दल .
20200924_125137_compress54-01_compress77.jpg

Pages