गोवारीची (गवारीची) भाजी (एक निराळा प्रकार)

Submitted by योकु on 8 September, 2020 - 13:53
gowarichi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो गोवार (का कोण जाणे पण रु चि रा मधला हा शब्द आवडलाच या भाजीचा)
४ - ५ चमचे किंवा आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
मीठ
हळद
जरा नेहेमीपेक्षा जास्त तेल
मोहोरी
हिंग

२ - ३ टीस्पून लाल तिखट
८ - ९ लसणाच्या पाकळ्या (मोठ्या असतील तर ३ - ४ पुरेत)
अर्धा चमचा जिरं

क्रमवार पाककृती: 

गोवार मोडून पाण्यात घालून १० मिनिटं ठेवावी आणि नंतर धूवून निथळत ठेवावी (गोवार मोडण्याचा वेळ कृतीत धरलेला नाही)
गोवार अगदी कोवळी असेल तर चिरून घेतली तरी चालेल

तिखट + लसूण + जिरं एकत्रच बारीक करून घ्यावं मिक्सरला

जाड बुडाचं पितळी पातेलं किंवा जाड बुडाची कढई चांगली तापली की त्यात तेल घालून; मोहोरी घालावी, तीची तडतड संपली की हिंग, हळद घालून वर निथळलेली भाजी घालावी. २ मिनिटं हे सगळं प्रकरण मोठ्याच आचेवर चांगलं परतून घ्यावं.
झाकण घालून एक वाफ आणावी आणि नंतर मीठ + लसणीचं वाटण घालून पुन्हा परतावं अन भाजी शिजवत ठेवावी (गरज असेल तर झाकणावर पाणी घालावं)

शेवटी दाण्याचं कूट पसरून घालावं; मीठ घालावं अन भाजी पुरती शिजवून घ्यावी. तशी कोरडीच होते. तेलाच्या ओलेपणावर भाजी जिंकेल.
भाजी चांगली झाल्याची खूण म्हणजे - रंग बदलतो; दाण्याच्या कूटाचं तेल बाजूनी दिसायला लागतं आणि तिखट + लसणीचा कच्चट वास अजिबात येत नाही त्याऐवजी खमंग खरपूस सुवास दरवळतो.

गरमागरम भाजीवर लिंबू पिळून ताज्या ताज्या मऊ फुलक्यांसोबत खायला घ्यावी; सोबत कैरीचं करकरीत लोणचं असेल तर आहा!

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे. २-३ लोकांना भरपूर होईल.
अधिक टिपा: 

लसणीचं तिखट ताजंच करावं. फारतर आठवडाभराचं. कुठल्याही भाज्या/ उसळी एकदम टेस्टी होतात यानी. नक्की प्रयोग करून पाहा.
गोवार तशी पचायला जड असते आणि थोडी खाजरीही (त्यात पुन्हा दाण्याचा कूटही वापरतो आहोत) सो फोडणीत हिंग आणि वरून लिंबू पिळणे आवश्यक आहे. तसंही ताज्या पिळलेल्या लिंबाच्या रसाने भाजीची चव मस्त खुलते.

बाकी सजावट वगैरे करायची असेलच तर मग नारळाचा चव; कोथिंबीर इ. मंडळींना प्रवेश द्यावा. गरज आहेच असं अजिबात नाही.

(फोटो : मायबोलीकर mrunali.samad )

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडते गवार.
क्रुती छान आणि सोपी आहे पण शेंगदाणे नाही घातले तर चालतील का?
त्याऐवजी वाटलेले खोबरे घातले तर?

छान
फोटू?
कढई सणसणीत तापली नाही का? Light 1

मृणाली, मी नारळ घालून कधीही केली नाहीय गवारीची भाजी. त्यामुळे चवीची कल्पना नाही.
मुळात आमच्याकडे नारळ हा फारफारतर चटणीकरता आणि मोदकांकरता (तेही तळणीच्या) आणल्या जातो.

हो कढई सणसणीत तापायला हवीय यातही. लिहिलं नाही हे ही खरंच म्हणा.
फार काय वेगळी दिसत नाही म्हणून फोटो गिटो नाय...

गोवार हा शब्द खूप आवडला या भाजीकरता! योकु, तुमच्या रेसिप्या करुन पाहात असते - खूप आवडतात माझ्या घरच्यान्ना आणि मला ही. या पध्धतिने करुन पाहीन - ही माझी अतिशय आवडीची भाजी!

नारळ घालून छानच लागते. गूळ घालून करतात आमच्या घरी. माझ्या आवडती भाजी आहे. पण योकु तुमची रेसिपी वेगळी आहे आणि वाचून लगेच करून बघाविशी वाटतेय. गोवार न आवडणारे सभासदही ह्या पद्धतीने केली तर खातील अशी आशा वाटतेय. Happy

गवारिला दाण्याचा कुट मस्ट आहे, मी करते अशि भाजि , फक्त वाटप आधि तेलावर परतुन घ्यायच
आणी फोडणित एक चिमटि ओवा घालायचा
चव, वास सगळ भारी लागत त्याने.

योकु, तो शब्द गोवारी असा असावा. छान आणि जुना शब्द आहे. मी पण ऐकलाय आज्जी पणजीकडून. गोवारी आणली, गोवारी मोडली, आज गोवारीची भाजी केली असा वापरतात तो.

गोवारी आणली, गोवारी मोडली, आज गोवारीची भाजी केली असा वापरतात तो. >>> कोकणातील आणि पुण्यातील आज्यांचा शब्द आहे. मी फक्त त्यांच्याच तोंडून ऐकला आहे. नाहीतर मग माझ्यासारखे गंवार, गवारच म्हणतात. Wink

अहाहा नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटलं ! मला पण जाम आवडते गोवारी ची भाजी .. पण इथे मिळत नाही (माझ्या इथल्या इंडियन shop मधे )मी खूप मिस करते .. माझ्या नावाची खा रे एकेक घास सगळ्यांनी
काय हे !? आज सणसणीत तापलेली कढई नाही , त्यात फुलवलेलं जिरं नाही त्याच्या बदल्यात एक फोटो पण नाही. Light 1
घेऊ चालवून नि काय आता ! Happy

चांगली पाकृ दिसतेय
लसणीचे तिखटला शॉर्टकट तयार लसूण चटणी मिळते ते वापरता येईल असे वाटतेय.
बाकी ते गोवार वाचून लहानपणी झालेला आजार आठवला Uhoh
त्यामुळे गवारच बरं उच्चारायला

माझी आजी "बावच्या मोडून भाजी केली" म्हणायची. बावची म्हणजे गोवार/ गवार.

रेसिपी चांगली वाटतेय. ओगले आजी म्हणतात ( बहुतेक) चिमूटभर ओवा आणि चमचाभर दूध घालून भाजी छान होते..
मी गोडा मसाला, ध-जि पूड, ओलं खोबरं आणि सैल हाताने गूळ घालून करते. कोरडीच, लागेल तसा पाण्याचा हबका मारून. आता अशी करून बघायला हवी.

मस्त रेसिपी, मी फक्त शेंगदाण्याचं कूट घालून करते.. आत्ता जेवताना बघितली आणि नेमकी गवारच आहे ताटात, पुढच्या वेळेस नक्की Happy

गोवार हा शब्द खूप आवडला या भाजीकरता>> आमच्यात फक्त पप्पा हा शब्द वापरतात, आम्ही बाकीचे गवारच म्हणतो, आणि त्यांना नेहमी चिडवतो ते आठवलं Happy

मस्त होते अशी भाजी.
गरम गरम भाताबरोबर पण छान लागते.
आमच्या साबांची ट्रिक म्हणजे भाजी शिजताना थोडं दूध घालायचं लुसलुशीत व्हायला.
आयुर्वेदाला चालत नाही पण आपल्याला छान लागतं खायला.

मस्तच लागतं असणार असं वाटून टाकलेले लसूण तिखट वाली भाजी.

आमच्याकडे हेच साहित्य वापरून करतात, फक्त लसूण जिरे वाटून टाकण्या ऐवजी ठेचून टाकतात फोडणी मध्ये बाकी डिट्टो.

सगळ्या शेंग वर्गीय भाज्या अशाच पद्धतीने करतात, कधी त्या मध्ये पुरवठ्याला बटाटा काचऱ्या टाकायच्या कधी टोमॉटो.

माहेरी इथे दिसते तशी चकचकीत गवार खात नाहीत,ती विलायती आहेत म्हणतात. गावरान गवारीच्या तुलनेत ही थोडी गिळगिळीत लागते.
हाताला कूस लागते, रंग जरा फिका असतो, गावरान गवार अशीच पाहिजे चुकून बाजारातून घेऊन गेले विलायती गवार तर 'उंडगीयेस तू' असं म्हणतात.

दिवाळी मध्ये गोबारसेला अशी गावरान गवारीची भाजी (लसूण न टाकता) गोडा मसाला, थोडा गूळ, शेंगदाणे कूट करतात बरोबर राळ्याचा भात, बाजरीची भाकरी असं नैवेद्य असतो गाईला.

कोकणात बावच्या म्हणतात गवारीला. माझ्या सा बा कधीच गवार म्हणत नाहीत.

आमची टीपिकल पद्धत म्हणजे गोडा मसाला, गुळ घालून केलेली भाजी. माझ्यासाठी यात दाण्याचे कुट मस्ट, ओलं खोबरं असेल तर अजून बहार. गवार थोडी उग्र असेल तर गुळ हवाच आम्हाला म्हणून वर लिहीलं की या भाजीसाठी कोवळी गवार मिळायला हवी.

>> गोवार हा शब्द खूप आवडला या भाजीकरता!
गाईंचे खाद्य होते हे पूर्वी.
गौ आहार -> गोहार -> गोवार -> गवार
अशी व्युत्पत्ती मी ऐकली आहे (स्त्रोत: लहानपणी आईकडून)

माझ्या आवडत्या भाज्यांपैकी एक. रेसिपी छान.

एम पी मध्ये गवारी ला चतुर फली म्हणतात...गवार म्हणजे अडाणी ना म्हणून....
माझी अगदी avadati भाजी आहे ही...लाल भोपळ्याच्या फोडी घालून करतात खास श्राद्धाच्या दिवशी...तीही मस्त लागते.

ए.पी.मध्ये गवारीला मटकी फल्ली आणि तामिळनाडु मध्ये कोत्ता अवरेकाय म्हणतात.
(जास्तीची माहिती Proud )

आंध्रा आणि तामिळनाडू मधे मी गावरान गवार आणि कोवळी गवार पाहिलीच नाहिए.
ती मोठी मोठी गवार मिळते.पण गावरान गवारीची चव छानच असते. पुण्यात मिळायची. सांगलीत तर छानच गावरान आणि ताजी मिळते.

मस्त.. माझी आवडती भाजी. लसणाची अ‍ॅडीशन करून पाहिन पुढच्या वेळी.
या भाजीला मसाल्याच्या मस्त तिखटपणा, गुळाचा थोडा गोडवा, दाण्याच्या कुटाचा नटी फ्लेवर सगळं कसं दाटसर ग्रेव्हीसारखं जमून आलेलं पाहिजे.

आमच्याकडे सातारा side ला, कांदा, लसूण बारीक चिरून घेतात. शिरा काढून गवारी मोडून, धुवून घेतात. जिरेमोहरी टाकून फोडणी करतात, ती तडतडली, की चिरलेला कांदा, लसूण, कढीपत्ता घालतात. कांदा लालसर होईपर्यंत परततात. मग धुतलेली गवारी घालून तीही परतायची. मग हिंग, हळद, मीठ आणि कांदा लसूण मसाला (इकडे प्रत्येकाच्या घरी स्वतः बनवलेला असतो )घालून झाकण ठेवून वाफ आणायची. अशीच खाऊ शकता.किंवा आवडत असेल, तर जाडसर शेंगदाणेकूट घालून पून्हा एक वाफ आणायची. कोथिंबीर घालून serve करायची.
फरसबी, वालपापडी, डिंगरी सगळ्या भाज्या आम्ही याच पद्धतीने करतो.

आमची टीपिकल पद्धत म्हणजे गोडा मसाला, गुळ घालून केलेली भाजी. माझ्यासाठी यात दाण्याचे कुट मस्ट, ओलं खोबरं असेल तर अजून बहार . <<< सेम पिंच.
आता अशीही करून बघणार.
सांगलीत तर छानच गावरान आणि ताजी मिळते.<<< हो , देशी म्हणतो आम्ही. दोन्ही प्रकार असतात. मोठी मोठी स्वस्त असते पण चव नसते तिला.

आज ही भाजी केली होती. आवडली. एकदम टेस्टी. गूळ न घालता गवारीची भाजी करता येईल असं वाटलं नव्हतं.

Pages