(रानाईची गढी !!..भाग -५)

Submitted by Sujaata Siddha on 7 July, 2020 - 04:53

https://www.maayboli.com/node/75204 (1) 
https://www.maayboli.com/node/75214  (2)
https://www.maayboli.com/node/75292  (3)
 https://www.maayboli.com/node/75371  (४) 

(रानाईची गढी !!..भाग -५)

आलेल्या दिशेने ती वाड्याकडे निघाली , पण काही वेळ चालत राहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण परत परत तिथेच येतोय ,मघाशी दिसलेलं छोटं काटेरी झुडूप ,त्याच्या काट्यांमध्ये देवयानीच्या शालीचं टोक अडकलं होतं , आताही ते परत तसंच अडकलं , एका झाडावर क्षीण झालेल्या चंद्रप्रकाशात एक पांढरी आकृती कोरलेली होती तीही तिला पुन्हा दिसली , त्याच त्याच गोष्टी तिला पुन्हा पुन्हा दिसू लागल्या आणि ती हबकली ! तेव्हा पाहिलं नव्हतं पण आता शक्य होईल तितक्या निरखून तिने ती आकृती पाहिली आणि तिच्या अंगावर सरसरून शहारा आला , त्या आकृतीमध्ये एक स्त्री दिसत होती , केस मोकळे सोडलेली , दात विचकून भेसूर हसणारी ,अगदी सोनाने चित्रात काढली तशीच !!!! ... कधीही कशालाही न घाबरणाऱ्या देवयानीच्या पोटात आता मात्र भीतीने खड्डा पडला , आपण जितके स्वतः:ला सुरक्षित समजतो तितके आहोत का ? गढीवर पहारेकरी असले तरी आपल्याला आत्ता या क्षणी त्यांचा सरंक्षणासाठी उपयोग आहे का ? जर इथेच आपल्याला काही झालं तर कोणाला कळणार आहे ? आई बाबा कुठवर धडपड करतील ? सारंग , निलेश , ऋता ह्याचा कितपत पाठपुरावा करतील ? ,आणि जर आपण रात्रभर इथेच या भयाण जंगलाच्या चकव्यात सापडलो तर ? या कल्पनेने पोटातला खड्डा अजून वाढत चालला .त्याच झाडाला टेकून ती मट्कन खाली बसली , गुडघ्यात मान खुपसून . किती वेळ गेला माहिती नाही , अर्धवट झोपेच्या गुंगीत तिला कोणीतरी हलवत होतं , आधीच घाबरलेली देवयानी जोरात किंचाळली आणि तिने डोळे उघडले , तो सोना तिला हलवून उठवत होती आणि देवयानी चक्क खोलीत बेडवर होती , “मी इथे कशी काय ?मला कोणी आणलं इथे ?सोना तू ? तु पाहिलंस मला जंगलात...? “ तिने सोनाला विचारल , पण सोना तिला उठवून परत झोपी गेली होती , देवयानीने घड्याळात बघितलं पहाटेचे पाच वाजले होते . हे स्वप्न होतं तर हुश्श !.. ..कीती घाबरलो आपण ,एवढ्या थंडीतही ती घामाने निथळत होती , पण स्वप्न इतकं खरं असू शकतं ? तिला काही केल्या ते स्वप्न होतं यावर विश्वास बसेना , ती जंगलात गेली होती तिला चांगलं आठवत होतं , मग ती पुन्हा इथे कशी आली ? विचार करता करता ती पुन्हा निद्राधीन झाली.
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि खोलीत प्रवेश केलेल्या कोवळ्या उबदार सूर्यकिरणांनी तिला जाग आली ,उठून , फ्रेश होऊन ,आवरून ती आणि सोना ब्रेकफास्ट साठी बाहेर पडल्या , सगळीकडे हिरव्यागार मैदानावर दवबिंदू चमकत होते, मोत्यासारखे, नव्हे- नव्हे लखलखीत हिरे कोणीतरी मूठ मूठ उधळून टाकले असावे तसे, आणि त्यातच अधूनमधून पांढरी शेवंती आणि रंगेबिरंगी गुलाबांचे रंगेबिरंगी ताटवे सूर्यप्रकाशात मुक्तपणे डोलत होते, त्या अनुपम निसर्ग सौंदर्याने देवयानीच्या मनातली रात्रीची सगळी जळमटं धुवून काढली . आणि प्रसन्न मनाने तीने जेवणघरात प्रवेश केला, आज टेबलवर काही लोकं आधीच बसलेली दिसली , मुख्य खुर्चीवर एक रुबाबदार गृहस्थ बसले होते ते बहुधा थोरले सरदार असावेत , त्यांच्या डाव्या बाजूला सुह्रदच्या माँ, आणि उजव्या बाजूला त्यांच्यासारखाच देखणा , खानदानी रूबाब असलेला , उंचापुरा असा एक तरुण बसला होता तो कदाचित सुहृदचा मोठा भाऊ असावा ,त्याच्या शेजारी देवयानीच्याच वयाची एक सुंदर मुलगी बसली होती , ती सुहृदची बहीण असावी , आणि तिच्या पलीकडे , हुश्श ..अखेर कालपासून गायब झालेला , सुहृद दिसला !..
माँ नी तिला आपल्या जवळ बसवून घेत सर्वांची ओळख करून दिली , नाश्त्या मध्ये बरेच पदार्थ होते , कालपासून देवयांनीच खाण्याकडे लक्षच नव्हतं , आज मात्र तिने मनसोक्त ब्रेकफास्ट केला , तसे सर्वच पदार्थ अतिशय चवदार होते .पण नारळाच्या दुधात केलेल्या आणि केळीच्या पानात गुंडाळून वरून लोणी सोडून शॅलो फ्राय केलेल्या पानग्या, तिला विशेष आवडल्या. गप्पा मारताना कळालं की ही सगळी मंडळी पहाटेसच आली होती.सरदार घराण्याचा आब राखून बोलत असले तरी बऱ्यापैकी मोकळेपणाने बोलले सर्व , वसुंधरा देवी म्हणजे सुहृदची बहीण , तिने आपण होऊन सगळी गढी दाखवायचं देवयानीला कबूल केलं आणि देवयानी खूष झाली.खाल्ल्यावर त्या दोघी लगेचच निघाल्या त्यामुळे सुहृद शी तिला बोलायला जमलं नाही , तसंही तो अजून मान खाली घालूनच खात होता , हौसाक्का त्याच्या शेजारी उभ्या राहून त्याला हवं नको पाहत होत्या ,त्याच्याकडे पहाताना तिला उगाच असं वाटून गेलं की तो कोणत्या तरी खूप मोठ्या दडपणाखाली आहे .
“ चला देवयानी , निघूया आपण , मुके आज तुला सुट्टी “ वसुंधरा सोनाला म्हणाली तशी सोना उड्या मारत आत पाकगृहात निघून गेली .तिच्याकडे बघताना देवयानीच्या मनात विचार आला एवढी लहानगी पोर , मात्र एकदाही आईजवळ लाडाने जाताना दिसली नाही ,
“ Strange !.. “
“अं ? काही म्हणालात देवयानी ?.. “
“ काही नाही , निघायचं आपण ? आणि प्लिज तु मला अहो जाहो म्हणू नकोस , आपण जवळजवळ एकाच वयाच्या आहोत “
“Oh yes !.. सॉरी, अगं सरदारांचे रीतिरिवाज माँ नी इतके अंगात भिनवले आहेत ना , की काही विचारू नकोस , “.
दोघी एव्हाना जेवणाघरातून बाहेर पडून एका अरुंद जिन्यातून वर निघाल्या , घडीव दगडाच्या त्या मोठाल्या पायऱ्या बऱ्यापैकी अंधाऱ्या आणि गोल गोल होत्या , कुतुबमिनार सारख्या , अजून असेच वर वर जात राहिलो तर आपल्याला चक्कर येईल असं वाटत असतानाच , त्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत पोहोचल्या . “woww..!..आपण तर चक्क खोलीत पोहोचलो, मस्तच गं “ यावर वसुंधरा हसली , हे माझं ‘Doll House “ आहे, लहानपणी आम्ही तासनतास ईथे असायचो “ ,
“आम्ही म्हणजे ? “
“आम्ही म्हणजे मी..( आम्ही सरदार. You konw ? ...वसुंधरा डोळे मिचकावत उपरोधाने हसली )
ओह माय माय !..केव्हढ्या निरनिराळ्या बाहुल्या आहेत ग…:
‘आम्ही अनेक देश फिरलो लहानपणापासून , आता ईथे आम्ही म्हणजे आमची सगळी फॅमिली बरं का ,तर आम्ही जिथे जिथे गेलो तिथून आणलेल्या आहेत या सगळ्या बाहुल्या आणि काही तर अगदी जुन्या आहेत , ठकी पासून सगळ्या बाहुल्या आहेत, हि मेक्सिकन , हे कॅबेज पॅच , आणि हि गुलाबी गालांची रशियन “ वसुंधरा एक एक बाहुली दाखवत होती, सगळीकडे बाहुल्यांचं संमेलनच भरलं होतं जणू , अगदी अंगठ्याएवढ्या छोट्या बाहुलीपासून ते माणसाएवढ्या मोठ्या बाहुलीपर्यँत सगळे प्रकार होते त्यात, दुसरी तशीच एक खोली वेगवेगळ्या पुरातन चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली , सुहृदच्या माँ तशा कल्पक होत्या त्यामुळे त्यांनी काही पुरातन सोन्याच्या वस्तूंपासून वापरता येण्याजोगे दागिने बनवून घेतले होते , उदा. सोन्याचं कान कोरणं असेल तर दोन्ही बाजूंनी दोन माणकं आणि मध्ये ते कान कोरणं गुंफून त्याचा नेकेलस , किंवा जाड जाड चांदीच्या वाक्या असतील तर त्या खाली ठेवून वर त्यावर समई ठेवली होती , सोन्याची जाळीदार नक्षीची पर्सही अशीच कशापासून तरी बनवलेली होती , अस्सल जर असलेल्या पैठण्या त्यापासून तयार केलेलं जॅकेट , भरीव चांदीचा चेस बोर्ड , अशा असंख्य वस्तूंचं दालन होतं तिथे , बघता बघता देवयानी थक्क होऊन गेली .
“आता ‘आयुधचापशाला ‘म्हणजे शस्त्रागार , दाखवते तुला चल “ दोघी एका मोठ्या दालनाला वळसा घालून मागच्या बाजूला आल्या त्यातले शस्त्रांचे विविध प्रकार बघताना देवयानी चकित झाली ,” यातली बरीचशी शस्त्र सरकार जमा केलेली आहेत , नाहीतर तू आणखीन डोळे विस्फारले असतेस .” मिश्किल हसत वसुंधरा म्हणाली .
काही वेळाने त्या टेहळणीच्या जागेवर उभ्या होत्या, “हे बघ या दोनच तोफा आत्ता दाखवायला आहेत तुला, अर्थात बाकीच्या सरकार जमा . ही बघ ही ‘पील नाला ‘ हत्तीवरून या तोफेचा मारा करायचे ,आणि ही ‘ शतुरनाला ‘ उंटावरून या तोफेचा मारा करायचे .
“अमेझिंग ...वसुंधरा तुमच्या घराण्याचा ईतिहास सांग ना जरा , सुहृदचं आडनाव कदम असं सांगायचा तो .तेच आहे का ? “
“ तेच, पण नुसतं कदम नव्हे ,’ सरदार कदमबांडे ‘, पुढे त्याचं नामकरण आम्ही कदम एवढंच केलं , पण माँ अजून आपला वारसा सोडायला तयार नाहीत , त्यामुळे त्या त्याच वेशात आणि अविर्भावात वावरतात . तू पाहिलं असशील तर बाकी आंम्ही सर्व आधुनिक आणि साध्या वेषात असतो . “
“हो पाहिलं मी , सुहृदनेही कधी दाखवलं नाही असं , infact सुह्रद बरोबर येताना फक्त अमरापूरची एक गढी बघायला जायचंय ,सरदारांच्या बरोबर तो रहातो एवढंच ठाऊक होतं , ते बघायचं म्हणून आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी येणार होतो, मी तर सामान घेऊन होस्टेल सोडून निघाले होते, म्हणून सुहृद आधी सगळ्यांना घेऊन मग मला पिक-अप करणार असं ठरलेलं , सकाळी खाली येऊन पाहते तो सुहृद एकटाच आलेला, बाकीचे सगळे मागाहून येणार असं त्याने सांगितलं ,मी ही जास्त विचार न करता निघाले . “
“ओह आय सी !.. “
अजून काही वेळ मनसोक्त फिरल्यानंतर देवयानी थकली , ते बघून वसुंधरा म्हणाली , “चल देवयानी निघुयात आपण, उरलेलं गढी दर्शन नंतर करूयात अजून आहेस ना थोडे दिवस ? “
“ माहिती नाही गं , ठरवलं नाहीये अजून काही”
“ वसुंधरा तुला एक विचारू ?”
“विचार ना ..” वसुंधरा जरी असं म्हणाली तरी देवयानीने असं विचारल्या बरोबर तिच्या चेहेऱ्यावरची झालेली चल-बिचल , तिला लपवता आली नाही. जणू ती काहीतरी अप्रिय विचारणार आहे हे वसुंधरेला ठाऊक होतं .
देवयानी शांतपणे तिच्या चेहेऱ्यावरचे बदललेले भाव टिपत होती , तितक्यात वसुंधरा म्हणाली , “तुला काही तरी विचारायचं होतं ना देवयानी ? “
“ हो , पण एक नव्हे अनेक गोष्टी विचारायच्या आहेत , आधी कोणती विचारू हा विचार करतेय ? “ ती कसं नुस हसत म्हणाली .
“ बरं करा सावकाश विचार , हे बघ आली तुझी रूम , चल भेटू पुन्हा संध्याकाळी ,चहाच्या वेळेला “
“ वसुंधरा थांब ना प्लिज , थोडा वेळ चल ना आत . “ देवयानी तिला आग्रह करू लागली , वसुंधरेने चुळबुळत हातातल्या घड्याळाकडे पाहिलं , आणि ती म्हणाली, “ आत्ता नको , उद्या येईन , तू आता विश्रांती घे . “ आणि ती सरळ निघून गेली .
ती गेली त्या दिशेने देवयानी थोडा वेळ बघत राहिली , मग एक सुस्कारा टाकून ती आत आली . पहिले ऋता किंवा सारंग शी बोलावं म्हणून तिने त्यांचे नंबर डायल केले .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !!
हा भाग फारच छोटा झालाय. पुभाप्र!